Saturday, 20 February 2016


गोष्ट तेरावी


नारद आपल्याच विचारात तल्लीन असता ब्रह्माने गुपचुप मागून येऊन त्याचे डोळे झाकले. 'ओळख, कोण आहे' असे मुद्दामून वेगळ्याच आवाजात म्हणाला. हा खेळ त्याने बरेचदा पाहिला होता. नारदही काही कमी नव्हता. त्याला जरी माहीत होते की हे राकट हात ब्रह्माचेच आहेत तरी तो उगाचच ब्रह्माला चिडविण्यासाठी त्याचे नाव सोडून, ओळखण्याचे नाटक करीत इतरच नावे सांगू लागला. नारद म्हणाला, रंभा. ब्रह्माला खूप राग आला. पण करतो काय. ज्यास्त काही बोलावे, तर आवाजावरून नारदाला ओळखू येईल. तो नुसतेच तशाच नकली आवाजात 'अंहं' म्हणाला. नारद पण वस्ताद. पुन्हा ओळखण्याचे नाटक करून म्हणाला 'उर्वशी'. ब्रह्माला आणखीनच राग आला. त्याला वाटले, आला मोठा, रंभा उर्वशी म्हणणारा. जणू याच्या मैत्रिणीच लागून गेल्या त्या. तरी पण एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून तो पुन्हा नकली आवाजात लटके 'अंहं' म्हणाला. नारदाला आता मजा यायला लागली होती. 'कोण बरे, कोण असेल बरे' असे म्हणत तो शेवटी मोठ्याने म्हणाला 'काय ग ए मेनका, काय त्रास देतेस? विश्वामित्र सुटीवर की काय?'. एवढे म्हणून, बळेच डोळ्यावरचे ब्रह्माचे हात झटकून नारद मागे वळला. म्हणाला, ब्रह्मा, तू होय रे. अगदी ओळखू नाही आले बघ. बायकी आवाज अगदी छान काढलास हं.

ब्र: मुनी, काय हे? तुमच्या डोक्यात रंभा, उर्वशी, मेनका कशा?

ना: नाही रे ब्रह्मा, गंमत केली. मी आधीच तू आहेस हे ओळखले होते. पण म्हटलं तू आज मजा करायच्या मूडमधे आहेस तर आपणही जरा गंमत करावी.

ब्र: नारदा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा. अरे आज सकाळपासूनच माझ्या लक्षात आलं की आजचा दिवस वेगळा आहे. म्हणून म्हटलं की आपणही काही वेगळे करावे. म्हणून मी हा खूप जुना खेळ खेळून पाहिला. माझ्याशी हा खेळ कोणी कधीच खेळू शकत नाही. कारण मला पाठीमागे पण डोळे आहेत. कोणी पाठीमागून येऊन काय आणि कसे माझे समोरचे डोळे झाकणार? या चार डोक्यांचा तसा त्रासच आहे रे. असो.

पण नारदा, आज ही शाळेतली मुले शाळेत जातांना इतकी आनंदी कशी रे? एरवी तर अगदी रडकी तोंडे जातांना दिसतात सकाळी सकाळी. आज त्यांचा पोशाख पण वेगळाच दिसतो. नेहमीची ती निळी चड्डी व पाढरा अंगरखा आज दिसत नाही. पाठीवरही रोजचे ते ओझे लादलेले दिसत नाही. काय आहे तरी काय आज?

ना: ब्रह्मा, आज ही मुले सहलीला जातांना दिसतात. रोज रोज अभ्यासाला मुलेही कंटाळतात. रोज तेच दळण दळायला कोणालाच आवडत नाही. मग एखाद्या दिवशी अभ्यासाला सुटी देऊन शाळेचे मास्तर बाया त्यांना सहलीला घेऊन जातात. कोणी नदीकाठावर, कोणी मोठ्या तलावावर, कोणी जंगलात, कोणी डोंगरावर तर कोणी कोठे. काहीतरी बदल हवा आयुष्यात. रोज नुसत मचूळ अमृत पिऊन समाधान मानणारी ही जमात नाही. झणझणीत पंचामृत हवं मधूनमधून.

ब्र: हं. माहीत आहे मला. टोमणा समजतो बरे मला. मागेही तू मला एकदा माथेरान बद्दल सांगितले होतेस. अर्नाळ पुराणात पण तू मला माथेरानची गोष्ट सांगितल्याचा उल्लेख आहे. ते पुराण म्हणजे अगदी सत्यकथाच रे बाबा. एवढी सुद्धा त्यात अतिशयोक्ती नाही. मग थापा तर दूरच राहिल्या. आपल्या भृंगीपुराणात पण मी तीच भूमिका घेणार आहे.

ना: अरे भृंगीपुराण काय म्हणतोस? भ्रमरपुराण नाव ठेवलं होतस ना? तसे भृंगीपुराण वा भृंगपुराण नावही काही वाईट नाही. भृंग म्हणजे भुंगा म्हणजे भ्रमर. भृंगी नाव तर कुठेतरी ऐकल्याचेही आठवते. असेल आपल्या स्वर्गातलाच कोणीतरी. असो. तो अर्नाळपुराणातला माथेरानचा अध्याय मात्र मला पण आठवतो. मात्रावृत्त. अर्नाळछंद. व्वा.१६-१४-१६-१४. चल दोघे मिळून गाऊ.

नारद सांगे ब्रह्माजी कल्पना पुराणाची छान
आज सांगतो गोष्ट नवी मी, नाव तिचे माथेरान
पर्वतमाथ्यावरती जाती लोक त्यागुनी आराम
सूर्योदय सूर्यास्त पाहुनी समजती स्वतःसी धन्य

रोज उगवतो, रोजच बुडतो, सूर्याला हे नवे नसे
पठार पर्वत दऱ्या कपारी त्याचेची हो राज्य असे
भेदभाव ना त्याच्या ठायी, शहरी गावी तो असतो
झोपडीच्या फाटक्या छतातून सुदाम्याघरी तो शिरतो

आजही ब्रह्मा लहानपणचे पहिले चित्र मुलामुलीचे
दोन टेकड्यातून दाखवी उदयातुर मुख सूर्याचे
निसर्गसौंदर्याची पहिली वहिली ओळख बाळाची
चित्रातील तो लाल तांबडा सूर्याचा चतकोर असे

काळ बदलला, प्रगती झाली, निसर्ग परका झाला रे
चित्रातील तो सूर्य दिवाकर प्रत्यक्षात न दिसला रे
मुले होउनी मोठी आता आई बाबा झाली रे
दिनकर उदयास्ताचे दर्शन केवळ माथेरानी रे

उदयास्ताचे कौतुक करण्या माथेरानी लोक किती
कोणी घोडसवारी करती, कोणी पायी लंगडती
पहाटे उठूनी ते जाती उंच उंच शिखरावरती
पूर्व दिशेला नजर खिळवुनी निसर्गहोळी अनुभवती

नियत क्षणाला, नियत ठिकाणी आता त्याची वाट असे
लाल तांबडा गोळा आता क्षितिजावरती उसळतसे
डोळे भरुनी लोक पहाती, चमत्कार हा नियतीचा
आस्तिक नास्तिक हात जोडती, तोच देव ह्या जगताचा

दिवसभरीची मार्गक्रमणा त्याच लाडक्या सूर्याची
ढुंकुन सुद्धा कोणी पाहीना, गोष्ट नसे ती नवलाची
आता ओढ जनांना भारी मावळणाऱ्या सूर्याची
लहानमोठे वाट क्रमिती विशिष्ट एका जागेची

इथून दिसतो अखेरचा तो सूर्य सौम्य तांबडा पहा
मावळत्या सूर्याची किरणे उजळती डोंगर शिखर पहा
सकाळचे ते रंग तसेची, परंतु कां वाटती उदास?
अस्ताची चाहूल लागता गलबल ह्रदयी टळे कुणास?

मावळत्या दिनकरास बघुनी परत पावले फिरताती
उदय-अस्त हे अटळ सत्य नियतीचे मनात साठविती
पाहता पाहता रात्र उतरते, सहल संपते सर्वांची
डोंगर उतरुनी सूर्याची ही पिल्ले घरास जाताती

ब्रह्मा तू जरी माया असशी, माया असू दे जगावरी
दिनकर उदयास्ताचा अन्वय ठसो मानवी मनावरी
माथेरान तसेची असू दे, वारे नकोच प्रगतीचे
बिंब बिंबवो उदयास्ताचे सत्य मानवास्तित्वाचे

वानर नर साक्षी होऊ दे नित्य सूर्य उदयास्ताचे
तथास्तु म्हण रे ब्रह्मा जरी तुज माहित ते ना कामाचे
उदयास्ताच्या चाकोरीचे गुलाम आपण नाही रे
चल घोड्यावर बसुनी जाऊ आपण माथेरानी रे

ब्र: नारदा, मग खरेच आपण नंतर माथेरानला कां गेलो नाही रे? कधी जायचे का? सूर्योदय सूर्यास्त तर पाहूच पाहू, पण मला घोडा पाहायचा आहे. तिथे घोडे खूप आहेत असे काकाकाकू म्हणत होते. ते जाऊन आले तिथे बहुतेक. मला घोडा अशाकरिताही आवडतो की मला मानवांपेक्षा तीन तोंडे ज्यास्त, घोड्याला माझ्यापेक्षा तीन तोंडे ज्यास्त, आणि रावणाला त्याच्यापेक्षा तीन तोंडे ज्यास्त. १, ४, ७, १० असे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तीन तीनच्या फरकाची अंकशृंखला. शिकलो होतो शाळेत. असो.

नारदा, इथे कधी घोडा दिसला नाही रे. इंद्रापाशी उच्चैःश्रवा नावाचा शुभ्र पांढरा घोडा पाहिला होता तेवढेच. काय राजबिंडा दिसत होता! राजाचा घोडा होताच. पण घोड्यांचा राजा पण होता म्हणे. मला तो हवा हवासा वाटत होता. पण मग इंद्रानी हट्ट धरला म्हणून मी मन मारले. नंतर तो इंद्राजवळही दिसला नाही. नंतर बळी राजाकडे होता असेही म्हणतात. तुला न मला, घाल कुत्र्याला असेच काहीसे झाले. नंतर कधी घोडा पाहिल्याचे आठवत नाही. सात तोंडांचे घोडे खूप छान दिसतात नाही? कुठून मिळाला इंद्राला हे तोच जाणे. माथेरानवरून आपणही आणू एखाद्या सप्तमुखी अश्वाला.

ना: ब्रह्मा, जंबुद्वीपावरचे घोडे फक्त मानवांसारखे एक तोंडी असतात. माथेरानला पण साऱ्या घोड्यांना एकच तोंड असते. कदाचित आधी सात असतीलही. नंतर कोणीतरी सहा छाटले असतील. तुलाही आधी पाच होती म्हणे. नंतर कोणीतरी एक छाटले असे मी पुराणात वाचले. नारायण नारायण! चारही काही कमी नाहीत म्हणा. पण ब्रह्मा, तू पाहिलेस तसेच सारे घोडे सप्तमुखी असते तर माथेरानला काय मजा आली असती? सात तोंडांच्या घोड्यावर चार तोंडाचा ब्रह्मदेव सात घोड्यांच्या रथावर बसून येणाऱ्या सूर्याला पहायला जातो आहे, Sunrise Point वर. आणि समोर चिपळ्या वाजवत मी पायी चालतो आहे. व्वा! क्या सीन है?

ब्रह्मा, आपण माथेरानला गेलो नाही कारण तू मी तेथे पूर्वी बरेचदा गेलो आहोत. अरे, आजचे माथेरान म्हणजे सत्ययुगातले मंदारण्य. मंदार पर्वतावरचे अरण्य, मंदार रान. पुढे घासून घासून, अपभ्रंश होत होत तेच माथेरान झाले. ब्रह्मा, मंदार पर्वत म्हणजे शिवपार्वतीची आवडती जागा. तिथेच तर शिवाने हजारो लाखो वर्षे तप केले. त्यावरच तर मार्तंडाने सतत नजर ठेवली. म्हणून तर तेथला सूर्योदय सूर्यास्त जगात इतरत्र नाही. नारायण नारायण!

ब्र: मग राहू दे. एक तोंड, चार पाय, एक शेपटीचे प्राणी खूप दिसतात इथे. घोड्याची शेपटी पण घोडपुच्छाच्या वेणीसारखी असेल. असामान्य असे त्यात काहीच नाही. माथेरानचा घोडा फारच फार तर नाकी डोळी ज्यास्त नीटस असेल एवढेच. बरे ते राहू दे. पण आज आपणही वेगळेच काहीतरी करायचे. देहाची नाही तरी मनाची सहल. आपले मन आजकाल रोज एकाच मार्गानी जाते. तेच रहाट, तेच चऱ्हाट. अभ्यास एके अभ्यास. पुराणातल्या गल्ल्याबोळातून जातांना मास्तरांच्या वाड्यापासच्या चांदेगल्लीतून आपण जात आहोत असे मला वाटते. आणि तेही छंदशास्त्र, खगोलशास्त्र, गणितशास्त्र शिकायला. कधी एखादी छान साधी अद्भुत गोष्ट पण नाही. गोष्टीमधे मस्त अतिशयोक्ती हवी. खरे म्हणजे अत्यतिशयोक्ती हवी. अत्यत्यतिशयोक्ती असली तर छानच. आपले साधे भांडण पण कधी होत नाही. भांडणात सुद्धा किती मजा असते. जीवनात मतमतांतर हवे. एकमत फार अळणी असते बा. ते जंतुकवीच्या 'तात्या, अहो तात्या' सारखं. तोंडचोपड्या गोष्टी नुसत्या. छी!

ना: तू तात्या, मी तुझा मुलगा असे वाटले होते मला ती कविता वाचताना. पण मला ती कविता आवडते. तू मात्र त्या लिंकवर पुन्हा कधी जाऊ नकोस रे बाबा. सांगून ठेवतो. अनर्थ होईल. http://balved.blogspot.com/2015/09/blog-post.html
ही लिंक अगदी डिलिट करून टाक. जशी कोणाची डायरी वाचू नये तशीच जंतुकवीची कविता पण वाचू नये.

पण ब्रह्मा, आपण ना कधी भांडलो, ना कधी तुला माझा राग आला, ना संशय आला, ना हेवा वाटला, ना तू मला कधी शाप दिला. तुला माझा फक्त लोभच लोभ. खरं म्हणजे आपल्या आयुष्यात खमंग असं काही नाहीच रे. त्या फक्त पुराणातल्या गोष्टी. अत्यत्यत्यत्यत्यत्य... असे हजार त्यत्यत्य जोडले तरी पुराणातल्या त्या अत्यत्यत्य...त्यत्यतिशयोक्ती अलंकाराचे वर्णन अपुरे पडेल. गाढवालाच काय, घोड्याला पण जर येईल अशा गोष्टी. तू हो म्हणशील तर आपणही आज वेगळे काही करू. रोजपेक्षा एकदम हटके. ते पुराण नको. अस काही वाचू जे निशिद्ध आहे. नारायण नारायण. जसं की कोणाची डायरी, कोणी कोणाला लिहिलेलं प्रेमपत्र वगैरे. किंवा एखाद्या नास्तिकाचे लेख, कविता. किंवा एखाद्या शिवभक्ताने विष्णूवर, किंवा वैष्णवाने शिवावर, गाणपत्याने त्रिदेवावर झाडलेले ताशेरे. कालच मी काही अभंग वाचले. नवीन एखाद्या पुराणातले असावे. आपली देवांची तर टिंगलच केली आहे. तेही एका अगदी अास्तिक माणसाने.

तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती ।।
सामान्य माणसाची मती । गुंग होऊनी जातसे ।।

गाणपत्य म्हणती गणपती । शाक्त म्हणती महाशक्ति ।।
स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्रीविष्णु ।।

नाना देव नाना देवता । प्रत्येकाची ज्येष्ठश्रेष्ठता ।।
आपापल्या परीने भक्ता । आकर्षुनी घेतसे ।।

हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ । कोण कोणाहुनी कनिष्ठ ।।
हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडतसे ।।

कार्तिकेयानी अगस्त्य ऋषींना दिलेले ज्ञान आहे ह्या पुराणात. काळभैरवाच्या असीम भक्ताने लिहिले आहेत हे अभंग. पण एकंदरीत लिहिण्याची ढब पाहिली तर कळते की ते सारे किती अभद्र आहे. आधुनिक आहे. अठरा पुराणातल्या अनेक गोष्टी पटल्या नाही तरी कोठेही शालीनता सोडली नाही रचणाऱ्याने. भाषा, छंदबद्धतेची शिस्त काटेकोरपणे पाळतात सारे पुराणकवी. पण हे नवपुराण? काही अभंग तर भंगलेले आहेत. मी वाचणार नव्हतो. पण तुझा उल्लेख दिसला म्हणून वाचले जरा. माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली ब्रह्मा.

अंगी विश्वोद्धारक शक्ति । त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ।।
ऐसी पाहूनी बालमूर्ति । ब्रह्मदेव त्यासी बोलला ।।

माझ्या पाचव्या मुखापासुनी । जन्म तुझा झाला म्हणोनी ।।
मला आता शरण येउनी । शुभाशिर्वाद घेई तू ।।

भणाणले ब्रम्हदेवाचे मस्तक । शिवनिंदा करी पाचवे मुख ।।
ऐकुनी त्याची बकबक ।। काळभैरव क्रुद्ध जाहला ।।

भव्य रूप प्रगट केले । अक्राळ विक्राळ आगळे ।।
डोळे लालेलाल झाले । जळत्या निखाऱ्यासारखे।।

मग त्या काळभैरवानें । डाव्या करंगळीच्या नखाने ।।
ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने । अपराध केला म्हणोनी ।।

तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे । एका क्षणात चक्क उघडले ।।
आणि त्यांनी हात जोडीले । चुकलो चुकलो म्हणोनी ।।

ब्रह्मा, आपण काल्पनिक असलो तरी आपली कल्पनाही किती निरुपद्रवी आणि सुंदर आहे रे! पण आता आपल्यावर कोणीही काहीही लिहितो. तरी भक्त म्हणवतो. त्याचा देव हाच खरा देव म्हणतो. बाकी सारे खोटे म्हणतो. त्रिदेवांचेच भांडण लावतो. काहीतरी लिहून चित्रगुप्ताची दैनंदिनी म्हणून छापतो. एकंदरीत काय की सारखी चिखलफेक, धूळवड, होळी. म्हणशील तर वाचू आज असे काही साहित्य बदल म्हणून. सर्व वर्ज्य असलेल्या गोष्टी चाखू. पथ्य मोडू. 'प्रवेश निशिद्ध, उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल' असा फलक जेथे आहे तेथे जाऊन नेमके तेच करू. विवेकाला खुंटीला टांगू. काय, आहे हिंमत? होळी येते आहे. दाखवीन तुला कशी मज्जा मज्जा करतात लोक ते.

ब्र: पण नारदा, मला असं म्हणायचं आहे की ... म्हणजे मी म्हणतो की ... म्हणजे मला असं वाटतं की .....

ना: आलं लक्षात. राहू दे मग. आपण आपलं भागवतच वाचू. डोक्याला त्रास नको. पुण्य पण मिळेल. तर आज मी तुला एक अगदी सुरुवातीची, सत्ययुगाच्या सुरुवातीची, बहुतांशी आपण व राक्षसच या विश्वात होतो तेव्हाची सुंदर गोष्ट सांगतो. हजारो लाखो दानव त्या काळी. एक संपला की दुसरा यायचा. अमुकासुर मारला की तमुकासुर यायचा. तो मारला की ढमुकासुर. देव दानवांच्या खूप लढाया रे बाबा त्या काळात. अगदी नाकी नऊ आणले होते त्यांनी. शेवटी आपण विजय मिळवला म्हणा त्या शत्रूंवर. आता फक्त सहा रिपु राहिले आहेत. ते मात्र अजेय आहेत.

ब्र: पुराणच ठीक नारदा. नको त्या निशिद्ध गोष्टींच्या वाटी जायला. उगाच त्या सहा अजेय राक्षसांच्या नादी नको रे लागायला बाबा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. त्यांच्यावर देवांनाच काय, ब्रह्मदेवाला सुद्धा विजय नाही मिळविता आला अजून. आजही माझा पाय थोड्याश्या प्रलोभनाने घसरतो. ते नकोच. नको त्या डायऱ्या, प्रेमपत्रे वाचायला. भागवतच ठीक. नाहीतर दुसरे एखादे पुराण लाव आज. आज दुसऱ्या एखाद्या पुराणाची सहल.

ना: ब्रह्मा, आजची गोष्ट पण आजच्या तुझ्या मागून येऊन डोळे झाकण्याच्या खेळापासूनच सुरू झाली. फार भयंकर खेळ असतो रे हा. साधा गमतीजमतीचा खेळ वाटतो. पण या खेळाचे परिणाम मात्र फार भयावह असतात. ही गोष्ट तुला मी आधीच सांगितली असती तर तू आज चुकूनही मागून येऊन माझे डोळे झाकले नसते.

ब्रह्मा, गोष्ट मंदार पर्वतावर सुरू झाली. आपले शंकर महादेव मंदार पर्वतावर ध्यानमग्न होते. पार्वतीबाई आज तू होतास तशाच खेळकर मूडमधे होत्या. शिवाच्या मागे जाऊन त्यांनी हळूच शिवाच्या डोळ्यांवर हात ठेवले. तिसरा डोळा बंदच होता. तो तसाही केंव्हाही उघडायचा डोळा नव्हताच. शिवाचे ध्यान भंग झाले नाही. पण शिवाचे डोळे पार्वतीच्या हातांनी झाकले गेल्याबरोबर साऱ्या विश्वात अंधःकार झाला. ध्यानभंग मात्र काही झाला नाही. शिव आधीच तसा गरम. प्रवृत्ती पण गरम आणि शरीर तर अनेक उपाय करून सुद्धा गरम. भाळी चंद्र, गळ्यात गार गार वासुकीचा विळखा, डोक्यावर गंगा नदी असूनही शिवाचे टेंपरेचर तसे कधीच नाॅर्मल आले नाही. झालेला दाहच तसा भयंकर होता. त्याचे डोळे बराच वेळ झाकून ठेवल्यामुळे पार्वतीलाही गर्मी झाली. तिच्या तळहाताला तर घाम फुटला. घामाचे थेंब टपकून जमिनीवर पडले. आणि काय चमत्कार! बापरे! काय हे विपरीत!

ब्र: नारदा, उत्कंठा ताणू नकोस रे. सांग काय झाले ते. की ते तुला अंधारात दिसले नाही?

ना: ब्रह्मा, सांगतो. दुसऱ्याच क्षणी आदिशक्ती पार्वतीला ज्या जागी घामाचे थेंब भूमीवर पडले तेथे एक कुरूप, हिडीस, भयकारी, बीभत्स, बेढब, अजागळ, किळसवाणा, अलोभस, अनर्गळ, घृणास्पद, ...

ब्र: अरे बाबा, पुढे चल. विशेषणं परिशिष्टात टाक वाटल्यास. मला तर ही भीमपुत्र घटोत्कचाची जन्मकथा वाटते आहे. तोही असा घर्मबिंदूतूनच उपजला होता म्हणे. तरीही त्याचा पुत्र.

ना: पार्वतीला समोर असाच एक अभूतपूर्व बालक दिसला. दचकून तिने शिवाच्या डोळ्यावरचा हात काढला. पुन्हा सारे विश्व उजळले. आता तर तो बालक स्पष्टच दिसायला लागला. शिवाच्या गळ्यातला वासुकी सुद्धा त्याला पाहून घाबरला. त्याने भीतीने शिवाच्या मानेभोवतीचे आपले वेढे अधिकच घट्ट केले. गळा आवळला गेल्यामुळे शिवाचेही ध्यान भंग झाले. शिवाचीही नजर त्या असामान्य बालकावर पडली. आणि नंतर पार्वतीच्या चेहऱ्याकडे. आता दोघांनाही ते बालक स्पष्ट दिसले. पण ते बालक मात्र आंधळे होते. विश्वव्यापी अंधारात जन्म घेणारा डोळस कसा असणार म्हणा!

ब्र: नारदा, हे तर तसेच रे जसे धृतराष्ट्राचे. पुराणातल्या गोष्टीत त्याच त्या कल्पना आलटून पालटून येतात का रे?

ना: असेलही बा. ब्रह्मा, ते बालक सामान्य नव्हते. विशेषणे अपुरी पडावी असे ते होते. त्या बालकाला एक हजार तोंडे होती. दोन हजार डोळे. सगळे आंधळे. दोन हजार हात. तेवढेच पाय. हातापायाची मिळून वीस हजार बोटे. तितकीच नखे. कालभैरवाने एका नखाने ब्रह्मदेवाचे शीर छाटले. हा बालक मोठा झाल्यावर काय करेल? तुला सुद्धा आधी पाच, व नंतर कालभैरवाने एक छाटल्यावर चारच तोंडे राहिली तरी तू सतत तक्रार करतोस. या अद्भुत, अपूर्व बालकाला जन्मजातच एक हजार तोंडे.

पार्वती त्याला झिडकारू पाहत होती. पण आपला भोळा शंकर काही वेगळाच विचार करीत होता. तो दयाळू नीळकंठ पार्वतीला म्हणाला की आपल्या स्पर्शाने हे बालक जन्माला आले आहे. म्हणून तो आपला पुत्र आहे. शिवपुत्र. अंधारात जन्म झाल्यामुळे व जन्मांध असल्यामुळे शिवाने त्याचे नामकरणही अंधक असे केले. ब्रह्मा, शिवपुत्र कार्तिकेय आणि गणेश आपल्या माहितीतले आहेत. पण अंधक प्रसिद्धीच्या झोतात फारसा आला नाही. त्याचे कधी उत्सव वगैरे झाल्याचे मी तरी ऐकले नाही. दोन तीन पुराणे सोडली तर अंधकाचा फारसा उल्लेख नाही. म्हणून आजची कापूसकोंड्याची गोष्ट तशी वेगळी आहे. आज आपण नेहमीच्या भागवतपुराणाच्या लोकप्रिय गोष्टींच्या शाळेत न जाता वामनपुराणाच्या बगिच्यात बौद्धिक सहलीला जात आहोत. अंधकजन्माची ही कथा कशी वाटली?

ब्र: अगदी हिरण्यगर्भभंगासारखीच रे नारदा. सहस्रहस्ते कमलाकराने वगैरे ऐकले होते. पण या मुलाला तर दोन सहस्र हात. रावणाला दहा तोंडे म्हणजेच फार वाटत होते. अंधकाला तर एक हजार. नवा विश्वविक्रमच झाला हा. विष्णुसहस्रनाम ऐकले होते. पण असे प्रत्यक्षात सहस्रमुख बालक म्हणजे फारच बा. गालगुच्चा नाही, गालगुच्चे घ््यावे लागतील बाळाचे. एक हजार गालगुच्चे. हात थकतील घेणाऱ्याचे. बाकी मला ही दोन हजार हातांची कल्पना आवडली. चार तोंडे, पण दोनच हात असले की फार अडचण होते नारदा. प्रत्येक चेहऱ्यावर दोन डोळे. दोन नाकपुड्या. मग त्यांच्या स्वच्छतेकरिता प्रत्येक डोक्यासाठी दोन हात नको का? मला बघ किती त्रास होतो पंचेंद्रियांची सफाई करतांना. ते डोळ्यातले मेकडं अन नाकातले चिपडं काढायला किती कठिण.

ना: ब्रह्मा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! तुझं गणित कुठेही सुरू होतं. आणि डोळ्यात असतो तो चिपड बरे. तू शब्दांची अदलाबदल केली. ते असू दे. राहू दे.

तर ब्रह्मा, त्याच काळात तो सत्ययुगातला हिरण्याक्ष राजा पुत्रप्राप्तीकरिता तप करीत होता.  राजानंतर त्याचा पुत्रच राजा होतो. चितेला अग्नी द्यायला पण पुत्र हवा असतो. पण हिरण्याक्षाला संतानप्राप्तीचे सुख लाभले नव्हते. ते फक्त शिवाला प्रसन्न केले तरच साध्य होईल असे त्याला वाटले. तशी पद्धतच होती त्या काळी. काहीही हवे असले की बसा शीळेवर आणि सुरू करा तप. त्याने कठोर शिवाराधना केली. त्याचे कठोर तप पाहून शिव प्रसन्नही झाला होता व त्याला त्याने पुत्रप्राप्तीचा वरही देऊन टाकला होता. तसा हिरण्याक्ष दैत्यकुळातला होता. ब्रह्मा, दानवांशी आपली देवांची किती रे युद्धे. तूही सुरुवातीला युद्धावर युद्ध करायचा. पण हा भोळा सांब अशा राक्षसांनाच वंशवृद्धीचा वर देतो. तिकडे ते शुक्राचार्य राक्षसांना संजीवनी देतात, इकडे आपला हा भावभोळा शंकर. काय हे!

तर, आपणच दिलेला पुत्रप्राप्तीचा वर हिरण्याक्षाच्या झोळीत नुकताच जन्म झालेल्या अंधकाला टाकून शिवाने निभवून नेला. हिरण्याक्ष पण खूष. पार्वती पण खूष!

ब्र: नारदा, हा फक्त भोळेपणाच नाही, तर आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... काय म्हणजे ... हाचपणा झाला रे. आपल्याच कुळावर उठलेल्या दानवाला वर देणे, वरून त्याला आपलाच पुत्र देणे म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! माझा पण धावा करतात लोक. मी नाही कधी असा अविचारी वर देणार भक्ताला. काय हे!

ना: ब्रह्मा, भोळेपणाची चढाओढ असते रे देवांमधे. तूच त्याला अपवाद असशील कदाचित. असो. तर ब्रह्मा, हिरण्याक्ष हा हिरण्यकश्यपूचा भाऊ. हिरण्यकश्यपू हा कश्यप ऋषींचा दितीपासूनचा मुलगा. म्हणून कश्यपू. दितीचा मुलगा म्हणून दैत्य. सोनेरी म्हणून हिरण्य. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रह्लाद. आणि आता शिवकृपेमुळे प्राप्त झालेला हिरण्याक्षाचा मुलगा अंधक. म्हणजे अंधक आणि प्रह्लाद हे दोघे चुलतभाऊ. एक एक करून सगळेच जण बराच काळ राजे होते. नंतर अंधकाची पाळी आली आणि तो पण राजा झाला. पण तो मूळ राक्षसकुळातला नसल्यामुळे प्रजा त्याला राजा मानायला तयार नव्हती. तो फार दुःखी झाला. व प्रह्लादावर राज्याचा भार सोडून वनात निघून गेला. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करायला कित्येक वर्षे घोर तप केले. आहुती म्हणून तो रोज आपला एक हात उपटून टाकीत असे असे साक्षीदार सांगतात. दोन हजार हात असल्याचा एक फायदाच झाला भक्ताला. अगदी रक्तरंजित तप. न भूतो न भविष्यति. रोज जंगलात त्याचे रक्त वाहायचे.  शेवटी शिवासारखाच महादयाळू, महाकृपाळू, महाविरघळू, महापाघळू ब्रह्मदेव महाचिघळू मामला आणखी चिघळू न देता प्रसन्न झाला. म्हणाला 'भक्ता, माग काय हवे ते'.

ब्र: नारदा, पहिली गोष्ट ऐकतो आहे मी ज्यात मला प्रसन्न करण्याकरिता कोणी भक्ताने तप केले. नाहीतर माझी कुठेच गिनती नाही रे. एवढ्या एक लक्ष योजने लांब जंबुद्वीपावर माझे फक्त एकठो देऊळ.

ना: ब्रह्मा, तसे नाही रे. तुला लोक कमी लेखतात असे नाही. पण तुझी मूर्ती करायला शिल्पकाराला फार कठिण जाते. चार तोंडे, आठ डोळे, आठ कान, चार नाक, आठ नाकपुड्या, आठ ओठ, वगैरे दगडात कोरणे म्हणजे काही सोपे नाही. म्हणून तुझी देवळे कमी एवढेच.

ब्रह्मा, अंधकाने तुला दोन वर मागितले. एक म्हणजे तू त्याला अजेय करावे. दुसरे म्हणजे तू त्याचे अंधत्व दूर करावे. तू काय केले असे तुला वाटते?

ब्र: खरेच काही आठवत नाही नारदा. जरा विस्मरण होते आजकाल.

ना: ब्रह्मा, तू त्याला दृष्टी प्रदान तर लगेच केली. पण अजेय, अजिंक्य करणे तुला जरा योग्य वाटले नाही. कारण त्याकाळी अजेय म्हणजे अमर असाच अर्थ झाला असता. मृत्यू फक्त युद्धातच येत असे. युद्धात पराजय झाला तरच मृत्यू. मूळव्याधीने एखादा राक्षस मेल्याचा कुठेही उल्लेख नाही. सगळ्यांचा युद्धात वध झाला आहे. त्यामुळे अंधकाला अजेय करणे म्हणजे एका राक्षसाला अमर करणेच झाले असते. जो जन्माला आला तो मरणे आवश्यक आहे. त्यामुळे तुझ्या चार डोक्यात विचारयुद्ध सुरू झाले. कसे करावे, काय करावे. वर मागायला तूच सांगितले होते. पण मागितलेला वर देणे ब्रह्माला योग्य वाटत नव्हते. शेवटी तू त्याला अट घालून वर दिला की त्याचा पराभव तेव्हाच होईल जेव्हा तो आईसमान स्त्रीकडे वक्रदृष्टीने पाहील. अंधकाला असे होण्याची काहीच शक्यता वाटली नाही. एवढी एकच पथ्य त्याला पाळा़यची होती. त्यामुळे तू दिलेला वर त्याने आनंदाने स्वीकारला.

ब्र: म्हणजे मी पण भोळा सांबच रे. देव असाच असतो बहुधा. ब्रह्मा असो, की विष्णू असो की महेश. सगळे एकाच माळेचे मणी. बरे असू दे. मग पुढे काय झाले?

ना: ब्रह्मा, होणार काय. अंधक आता खरेच खूप शक्तिशाली झाला. सगळे दैत्य राजे एक एक करून पराभूत झाले किंवा शरण आले. अंधकाने स्वर्गावरही स्वारी केली व देवांना हारवले. बरेचदा हारवले. पाताळालाही त्याने सोडले नाही. तेथेही तो विजयी झाला. यशाच्या मागोमाग गर्वही आला. तरी बरे तो शिवपुत्र आहे हे त्याला स्वतःला माहीत नव्हते. तो दैत्य नसून खरे तर देव होता. पण कृतीने मात्र राक्षसच होता. पण ब्रह्मा, तुझ्या औदार्याने तो अधिकच शक्तिमान व उन्मत्त झाला होता.

ब्रः नारदा, हा तर त्रिपुरासुर किंवा नरकासुरापेक्षाही भयंकर राक्षस रे. याचा अंत कधी होणार?

नाः ब्रह्मा, गर्वाचे घर नेहमी खाली असे म्हणतात. पण हे गर्वाचे घर कधी खाली होणार हे कोणालाही कळत नव्हते. एक दिवस मी मंदार फुलांची माळ घालून पृथ्विलोकावर असाच फिरत होतो. मंदार पर्वतावरच ही फुले असतात. पृथ्वीवर नाही. या फुलांसारखा सुवास त्रिभुवनात दुसरा नाही. जाई, जुई, चमेली, शेवंती, झेंडू, गुलाब, पारिजातक, केवडा, कश्शाकश्शाला असा सुवास नसतो. आपल्या राज्यात हा अनोखा सुवास कसा हे समजावे म्हणून अंधकाने आपले सैन्य चौफेर पाठवले. सुवासाचा मागोवा घेत घेत त्यातला एक दैत्य माझ्यापाशी येऊन पोहोचला व मला महाराजांकडे बळेच घेऊन गेला. मीही गेलो. माझ्या त्रिलोकभ्रमणात मी इतक्या काही व्यक्ती आणि वल्ली पाहिल्या आहेत की मी सहसा कोणाला घाबरत नाही. महाराज झाले तरी मला काय करतील? चिपळ्या आणि वीणा सोडून माझी काही स्थावरजंगम इस्टेट नाही. ब्रह्मपुत्र असल्यामुळे मला काही मरण नाही. मग भीती कशाची? गेलो त्या दैत्याबरोबर सहस्रमुखी महाराजांकडे.

दरबारात जातांना माझ्या दोन्ही बाजूंना उंचच उंच एकसारखे स्तंभ ओळीत उभे होते. लांबच लांब पॅसेजच्या दोन्ही बाजूला खांब असावे तसे. मी एका बाजूचे खांब एक दोन तीन चार असे मोजत गेलो. कालनिर्णयातले ३६६ दिवस मोजता मोजता तू रडकुंडीला आलास. येथे तर तो पॅसेज संपता संपेना. एका बाजूचे एक हजार स्तंभ मी मोजले. दुसऱ्या बाजूचेही तेवढेच. म्हणजे एकूण दोन हजार. दोन स्तंभातील अंतर दहा फूट तरी असेल. म्हणजे त्या पॅसेजची लांबी दहा हजार फूट असावी. म्हणजे मी २-३ योजने तरी चाललो. नंतर तो सैनिक मला वरच्या माळ्यावर घेऊन गेला. तिथेही दुतर्फा तसेच छतापासून लोंबकळणारे, थोडे कमी जाडीचे खांब. त्यातून जाता जाता मी तेही मोजले. पुन्हा दोन्हीकडे हजार हजार, म्हणजे एकूण दोन हजार भरले. चालून चालून थकायला झाले. एखादा रथ असता तर बरे झाले असते असे वाटले. रथ नाही तर कमीतकमी घोडा तरी असायला हवा होता. पण ऋुषिमुनींना कोण गाडीघोडा देणार? नंतर तो सैनिक मला आणखी वरच्या माळ्यावर घेऊन गेला. आता स्तंभ नव्हते, पण बरेच लोक गोलाकार करून बसलेले दिसले. सारे अगदी एकसारखे दिसणारे. प्रत्येकाला तो सैनिक कुर्निसात करीत असे व मी नमस्कार. पूर्ण गोल फिरून पुन्हा पहिल्यासमोर येईपर्यंत एक हजार चेहरे भरले. आता मी पुन्हा पहिल्या चेहऱ्यासमोर आलो. आता कुठे तो सैनिक बोलू लागला. म्हणाला, महाराज, हे मुनी वनात वीणावादन करीत होते. साऱ्या राज्यात, साऱ्या आसमंतात दरवळलेला स्वर्गीय सुवास यांच्या गळ्यातील माळेच्या फुलांचा आहे.

ब्रह्मा, मला खरे म्हणजे कळले होते की खालच्या माळ्यावरचे दोन हजार स्तंभ हे अंधकाचे पाय होते. वरच्या माळ्यावरचे दोन हजार छतापासून टांगलेले वाटणारे खांब त्याचे हात होते. मी ज्या हजार चेहऱ्यांना फेरफटका मारून आलो ते अंधकाचेच हजार चेहरे होते. एकंदरीत माझी अंधकाच्या विशाल दैत्यदेहाची सहलच झाली होती.

अंधकाने मला आदराने बसवून घेतले. त्याने मंदार फुलांबद्दल विचारले. मीही आढेवेढे न घेता सांगितले की असे झाड फक्त मंदार पर्वतावर व्याघ्रासनी बसलेल्या, सतत ध्यानमग्न असलेल्या एका योग्याच्या गुहेसमोर आहे. इतर कोठेही नाही. त्याची फुले त्यांच्या पत्नीला फार प्रिय आहेत. योगसामर्थ्याने त्या योग्याने हे फुलझाड निर्माण केले आहे. माझी त्यांची जुनी ओळख असल्यामुळे मला अधून मधून ही फुले तोडण्याची मुभा आहे. इतर कुणालाही नाही.

अंधकाला राग येताना दिसला. त्याने गर्जना केली की तो आत्ताच्या आत्ता ससैन्य मंदार पर्वताला वेढा टाकेल व ते दैवी झाड पृथ्वीवर घेऊन येईल. क्षणात ते हजार चेहरे, दोन हजार हात, दोन हजार पाय हालायला लागले व तो दैत्य सारे पाय दाणदाण आपटत तेथून चालता झाला. नारायण नारायण!

ब्रह्मा, दैत्यकुल्य नसूनही अंधक राक्षस होता. त्याची वृत्ती राक्षसी होती. पण तुझ्या वराने तो अजिंक्य, अजेय, अमर झाला होता. आता तो मंदार पर्वतावर चढाई करणार होता. ध्यानस्थ शिव, आदिशक्ति पार्वती व त्यांच्या गुहेच्या द्वाराशी त्यांचे रक्षण करणारा त्यांचा प्रिय नंदी, मंदार वृक्ष आणि मंदार पर्वताची उत्तुंग शिखरे यांना पृथ्वीवरून चालून येणाऱ्या संकटाची चाहूल सुद्धा नव्हती.

पृथ्वीवरून नारायण नारायण शब्द आणि चिपळ्यांचा आवाज आता स्वर्गलोकाकडे अंधकापेक्षाही वेगाने जात होते. अभूतपूर्व देव दानव युद्धाचे वारे त्रिलोकात वाहू लागले होते.

नारद पृथ्वीवरून स्वर्गलोकात चुटकीसरशी पोहोचला. नारद इच्छास्थळी होता. त्रिलोकात जेथे कुठे जाण्याची इच्छा मनात होईल तेथे नारदमुनी क्षणात पोहोचत असत. अंधकाला मात्र ते लाखो योजनांचे अंतर पार करून जावे लागत असे. वेळ लागणार होता त्याला मंदार पर्वतापर्यंत पोहोचायला. पण तो निश्चिंत होता. एका साध्या योग्यालाच तर त्याला हारवायचे होते आणि मंदारवृक्ष उपटून पृथ्वीवर आणायचा होता. हा तर त्याच्या दोन हजार हातांपैकी कुठल्याही एका हाताचा मळ होता.

जाता जाता अंधकाने आपल्या सेनापतीला विचारले की त्रिभुवनात त्याच्या तोडीचा दुसरा कोणी आहे का? त्याची शक्ती, त्याचे वैभव, त्याचा पराक्रम यांची कोणी बरोबरी करू शकतो का? असे काय आहे जे त्याच्याजवळ नाही पण जे दुसऱ्या कोणाजवळ आहे?

सेनापती म्हणाले, राजन, तुमची बरोबरी कोण करणार? पण राग मानत नसाल तर एक गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो. आपणाजवळ सर्व काही आहे पण स्त्रीशिवाय आपण अपूर्ण आहात. ज्या मंदार पर्वतावर आपण जातच आहोत, ज्या वैराग्याकडे आपण जात आहो त्याच्यापाशी कमंडलू, आसन आणि जटा सोडून काही नाही असे जग म्हणते. पण त्याची सहधर्मचारिणी त्यालाच त्रिलोकातील सर्वात भाग्यवान व्यक्तीचा दर्जा देते.

अंधकाचा रागाचा पारा आता तर आणखीच वर चढला. वैरागिणीला प्राप्त करणे हे त्याचे ध्येय झाले. त्या अक्राळ विक्राळ राक्षसाची काळी सावली मंदार पर्वताच्या शिखरमाथ्यांवर पसरू लागली.

ब्र: नारदा, मला तर असे वाटते की तू मुद्दामच अंधकाच्या राज्यात सुवासिक मंदार पुष्पमाला घालून गेला होतास. मी चुकून अंधकाला अजेय केले होते. पण त्याने जर मातेसमान स्त्रीकडे दुर्दृष्टीने पाहिले तरच ते वरदान निष्फळ होणार होते. हे तुला माहीत होते. तसेच अंधकाला तो शिवपार्वतीसुत आहे हे माहीत नव्हते. हे सर्व लक्षात घेऊन तू काहीतरी कारस्थान केलेले दिसते. अंधकाची वाईट दृष्टी तूच शिवपार्वतीकडे वळवलेली दिसते. अंधकाला वाघाच्या गुहेत शिरायला तूच प्रवृत्त केलेस. होय की नाही?

ना: नारायण नारायण!

ब्रह्मा, मंदार पर्वताच्या पायथ्याशी अंधकाच्या छावणीने तळ ठोकला. उंच उंच मंदारशिखरे अचानकच अंधकाचे विचित्र शरीर पाहून हासायला लागली. त्याच्या दोन हजार तळपायांची आग त्याच्या एक हजार मस्तकात पोहोचली. आपल्या दोन हजार डोळ्यातून आग पाखडून त्याने मंदार पर्वताची सारी वृक्षराई क्षणात भस्म केली. शिखरे उघडीबोडखी दिसायला लागली. भूमीवर सर्वत्र वृक्षराई जळून काळा लाकडी कोळसा पसरला.

अंधकाने आपल्या सेनापतीला त्या वैराग्याकडे धाडले व त्याने आपली पत्नी राजाला द्यावी अशी मागणी करायला सांगितले. वैरागी गुहेमध्ये ध्यानमग्न होता व पत्नीच्या रक्षणाची जबाबदारी त्याने त्याच्या प्रिय नंदीवर सोपवली हेती. सेनापती गुहेत गेले व त्यांनी वैराग्याचे ध्यान भंग करून राजाचा निरोप कळवला. आपल्या राजाला जे हवे असेल ते त्याने स्वतः येऊन मागावे असे त्यास सांगून वैरागी पुनः ध्यानमग्न झाला.

सेनापतींनी निरोप अंधकाला येऊन दिला. आगीत तेल ओतल्यासारखे झाले आणि आगीचा डोंब उसळला. तावातावाने पर्वत चढून सैन्यासकट अंधक वर आला आणि त्याने रणशिंग फुंकले.

ब्रः नारदा, पर्वतावरचा तो वैरागी व त्याची पत्नी म्हणजे शिवपार्वती हे मला आधीच कळले. पण ते दोघे व नंदी राक्षसी अंधकासमोर काय रे टिकाव धरणार? मला तर भीती वाटते आहे.

नाः ब्रह्मा, देव भोळे असले तरी काहीजण फार हुशार रे. नारदाने स्वर्गात जाऊन होणाऱ्या युद्धाची देवांना आधीच जाणीव करून दिली होती. सारा घाटच नारद मुनींनी घातला होता. गणदेवता आधीच मंदार पर्वतावर पार्वतीच्या संरक्षणाकरिता आल्या होत्या व युद्धासाठी सज्ज होत्या. देवदानवांचे युद्ध अटळ होते. पण त्याआधी अंधकाची गाठ शिवाच्या प्रिय नंदीशी होती. आणि त्याही आधी त्याची गाठ आदिशक्ती पार्वतीशी होती.

गुहेच्या द्वाराशी येतायेताच अंधकाची नजर समोर मंदाराची फुले तोडून परडीत टाकणाऱ्या पार्वतीवर पडली. ब्रह्मा, पृथ्वीवरच्या साध्या मनुकन्यांना सुद्धा परपुरुषाची वाईट नजर डोळे बंद असतानाही कळते. पार्वतीला ती कळणार नाही असे कसे होईल? आसपास आपले रक्षण करायला कोणी नाही हे पाहून पार्वतीने पळायला सुरुवात केली. पर्वतकन्याच ती. पाहता पाहता नजरेआड झाडाआड झाली. आपले अवाढव्य व बेढब शरीर घेऊन तिचा पाठलाग करायचा अंधकाने कसाबसा प्रयत्न केला. पण तो फोल ठरला. अधिकच चिडून क्रोधांध अंधक गुहेच्या तोंडाशी आला आणि युद्धाला तोंड लागले. इकडून नंदी व तिकडून पार्वती व अनेक गणदेवता युद्धात उतरल्या. ब्रह्मा एक हजार वर्ष घनघोर युद्ध चालले. अनेक राक्षस लोळले. अंधकाने माघार घेऊन पाय मागे घेतला व पुन्हा तो पर्वतपायथ्याशी आला. सभोवती दैत्यसेनानींच्या मृत देहांचा सडा पडलेला. एकट दुकट देहात थोडीशी धुगधुगी. गुहेत मात्र ध्यानमग्न शिवाला काहीही फरक पडला नव्हता. त्याचा ध्यानभंग झाला नव्हता.

ब्र: तो तसाच आहे रे पूर्वीपासून. एकतर ध्यान, नाहीतर तांडव. नारदा, पण हे कसे रे देवदानव युद्ध? अंधकवध तर झालाच नाही. तुझा सगळा बेत फसलेला दिसतो. तो मास्तरांचा मंत्र आठवला, ॐ फस्स्!

ना: ब्रह्मा, हे युद्ध नव्हतेच. फक्त आगामी युद्धाची ट्रेलर. सापाच्या शेपटीवर आता तर कोठे पाय पडला होता. चवताळून आपला फणा तो आता कुठे दाखवणार होता.

अंधक तसा हुशार होता. शिवपुत्रच तो. शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र हे त्याला चांगलेच कळत होते. तो गेला सरळ शुक्राचार्यांकडे. शुक्राचार्यांचं देवांशी विळ्या भोपळ्याच नातं. अंधकाचे रडगाणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. शुक्राचार्य आपल्या विद्येचा नेहमीच देवांविरुद्ध व दानवांच्या फायद्यासाठी उपयोग करीत. ते तसे कां ही एक मोठी गोष्टच आहे. सांगीन तुला तू मोठा झाल्यावर.

शुक्राचार्यांनी दोन गोष्टी केल्या. एक तर संजीवनी विद्येचा वापर करून अंधकाचे सर्व मृत दैत्यसैन्य त्यांनी पुन्हा जिवंत केले. दुसरे म्हणजे त्यांनी अंधकाला असा वर दिला की त्याच्या शरीरातून जमीनीवर पडणारा रक्ताचा प्रत्येक थेंब लगेच एक राक्षस निर्माण करेल.

ब्रः बापरे! माझे वरदान, शुक्राचे वरदान, शिवाचे ध्यान! अंधकाला कोण हारवू शकेल!

नाः ब्रह्मा, खरेच, आता त्याचे पारडे खूपच जड झाले होते. परत येऊन त्याने आता निकराचा हल्ला केला. अंधकाची सरशी होत गेली. त्याला होणाऱ्या जखमांतून भूमीवर निथळणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवा राक्षस निर्माण होत गेला. नशिबाने बरेच रक्त जमिनीवर पसरलेल्या कोळशातच जिरून जात असे. कोळशाचा तो गुणधर्मच आहे. तरीपण बरेच रक्त जमिनीपर्यंत पोहोचले. अंधकाचे सैन्य वाढत वाढत कोट्यावधी झाले. अंधकाच्या दैत्यांनी तेहतीस कोटी देवांना भराभर गिळायला सुरुवात केली. पाहता पाहता देवांची संख्या कमी होत गेली. बोटावर मोजता येतील एवढेच देव उरले. तेहत्तीस मूळ देवच उरले असे म्हणतात. तुझ्याच वेदात देव तेहत्तीसच आहेत असा उल्लेख आहे. तेवढेच उरले. आता तर युद्ध एकतर्फी झाले. काय होणार हे स्पष्ट दिसू लागले.

ब्रः नारदा. जीव मळमळतो आहे रे. हे काय केले मी! आता मला कळले की आपण देव म्हणजे काही कल्पना नव्हतो. आपण चालते बोलते होतो. सत्य होतो. पण या युद्धानंतर आपण नामशेष होऊन फक्त कल्पनेतच राहिलो. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत मीच. हिरण्यगर्भातून निघालेला अजन्मा, सत्य, ब्रह्म मी, केवळ भक्ताच्या भक्तीने विरघळून, खोट्या स्तुतीला भाळून देवकुलनाशाला कारणीभूत झालो. तू प्रयत्न केलास. अंधकाला स्वतःच्या अधःपतनाकडे ओढून आणलेस. पण माझे वरदान भारी पडले आणि देवांचा पराजय झाला. स्वर्गात आपल्या फक्त सावल्या, कल्पना राहिल्या. त्यांची वरातगंगा घेऊन आपण पृथ्वीवर आलो. आता सारे चित्र स्पष्ट झाले. हा हन्त हन्त!

नाः ब्रह्मा, असे नकोस रे म्हणू. कठिण काळ येतो चांगल्या चांगल्यांनाही. पण असे हतबल होऊ नये माणसाने. शिवाने अंधकाचे दान हिरण्याक्षाला देऊन चूक केली. अंधक काही दैत्यकुलोत्पन्न नव्हता. पण त्याला हिरण्याक्षाला दिल्यामुळे त्याचे संगोपन राक्षसी वातावरणात झाले. तूही त्याला वरदान देऊन चूक केली असे आता जरूर तुला वाटत असले तरी पण तेव्हा तुला त्याची कीव आली असावी. तसा तो तेव्हा बिचाराच होता. प्रजा त्याचा तो दैत्यकुलोत्पन्न नाही म्हणून स्वीकार करायला तयार नव्हती. आणि आपण त्याला तो लहान असताना, तो एक वस्तू असल्यासारखे दान दिले होते. तो ना धड इकडचा, न तिकडचा. त्याने तरी जावे कुणीकडे? ब्रह्मा, दयाळूपणा हा काही गुन्हा नाही. जे दयाळू तेच देव, नाही का? ब्रह्मा, गोष्ट अजून संपली नाही. पिक्चर अभी बाकी है दोस्त!

तर ब्रह्मा, देवांना गिळून दानवांनी तोंडे बंद करून घेतली होती. देव सारे दानवांच्या पोटात बंद झालेले पाहून तू ज्रिंभयिकास्त्र सोडले. साऱ्या दैत्यांना अशी जांभई आली की जी काही केल्या बंद होईना. साऱ्यांची तोंडे उघडीची उघडी. पटापट टपाटप त्या उघड्या राक्षसमुखांतून बंदिस्त देव बाहेर पडले. हे नवीन अस्त्र देवदानव युद्धात पहिल्यांदाच वापरण्यात आले होते. अशा आवरता न येणाऱ्या जांभया त्या जंतुकवीच्या कवितावाचनातच मी फक्त पाहिल्या आहेत.  पण त्याला ते कळत नाही. त्याला वाटते की त्याच्या कविता इतक्या उत्कृष्ट असतात की श्रोते आश्चर्याने आऽऽ वासतात. त्याला कोण समजवणार? तू नको रे बाबा त्याच्या कार्यक्रमाला कधी जाऊस. तुला जांभई अनावर होईल आणि काळ पुढे जाईल.

ब्रः हायसे वाटले रे मला. पण तो शिव कुठे आहे? त्यानेही काहीतरी करामत करायला हवी आता.

ना: शिवाच्या लक्षात आले होते की अंधकाला शुक्राचार्यांचे पाठबळ आहे. त्यानेही आता घामाचे दोन बिंदु गाळून चर्चिका नामक मुलगी आणि मंगल नावाचा मुलगा निर्माण केला. दोघेही  पूर्ण कोळशासारखे काळे होते. कोळसाच होते म्हण ना. शिवाने त्यांना त्यांचे कार्य समजावून सांगितले व आपल्या उजवी व डावीकडे उभे रहायला सांगितले. नंतर पापणी लवायच्या आत शिवाने त्रिशूळावर अंधकाला टोचून आपल्याच डोक्याच्या वर उंच आकाशात पेलले. अंधक तसाच लोंबकळत राहिला. त्रिशूळ जेथे त्याच्या विशाल देहात रुतले होते तेथून रक्ताचे थेंब टपकायला लागले. पण भूमीवर पडण्याआधीच कोळशासारख्या चर्चिका आणि मंगल यांच्या शरीरात ते शोषले जात. आता अंधकाच्या रक्तातून नवे दैत्य निर्माण होणार नाही हे निश्चित करून शिवाने नंतर काही काळ तांडवनृत्य केले. सारी धरती चळाचळा कापली. नंतर तिसरा नेत्र उघडून इतर दैत्यांचा संहार केला. युद्ध संपले. देव जिंकले. दानव हारले.

ब्र: पण नारदा, अंधकाचा वध झाला का रे? कारण कालनिर्णयात त्रिपुरारी पोर्णिमा, नरकचतुर्दशी वगैरे असते तशी अंधक पंचमी वगैरे कधी ऐकली नाही.

ना: ब्रह्मा, अंधक हजार वर्षे तसाच लटकत राहिला. रक्तक्षती होऊन तो बराचसा हाडाचा सापळा होऊन निर्जीवही व्हायला लागला. उपरती होऊन त्याने शिवाचा धावा सुरू केला. प्रसन्न होऊन शिवाने अंधकाला माफ केले. अंधकाने पार्वतीचीही क्षमा मागितली. तिनेही त्याला माफ करून पुत्र मानले. तोच अंधक पुढे भृंगी नावाने गणांचा प्रमुख झाला. तसेही आता तो आंधळा नसल्यामुळे अंधक नाव योग्य नव्हते. म्हणूनही नाव बदलण्यात आले असावे.

ब्र: वा, शेवट गोड झाला. नारदा, खऱ्या असोत वा खोट्या. पण राक्षसी वृत्तीचा शेवटी पराभव होतोच होतो हेच ह्या साऱ्या गोष्टी सांगतात. सन्मार्गानी जाऊ इच्छिणाऱ्यांना हा केवढा मोठा दिलासा आहे. म्हणूनच हे जग टिकून आहे रे बाबा. आणि म्हणूनच आजही नव्व्याण्णव टक्के मनुवंशज आपल्या शिवासारखे साधे भोळे असले तरी पृथ्वीवर टिकून आहेत. काळ्याकुट्ट रात्री अचानक समोर येणाऱ्या हजारो अनाहुत संकटांना हे रोजच सामोरे जातात. पडतात धडतात रडतात. पण पुन्हा उभे होऊन कष्टाचा घाम गाळतात. उन्हातान्हात राबून कोळशासारखे काळवंडतात. तरीही हे स्वकष्टाने हरितक्रांती करतात. वनराई फुलवितात. सुवास पसरवितात.

पण नारदा, ही गोष्ट खरेच पुराणात आहे, की हे तुझे नवे भृंगीपुराण आहे रे? माझ्या भ्रमरपुराणाशी स्पर्धा करणारे नवे नारदीय पुराण की काय?

ना: नारायण नारायण!

_____________________


अनुक्रमणिकेकडे

Sunday, 7 February 2016


गोष्ट बारावी


रोज पहाटे तीन वाजता काँप्यूटर बंद करून झोपी जाणारा ब्रह्मदेव आज मात्र काळ वेळ विसरला की काय असे वाटायला लागले. सव्वातीन, साडेतीन झाले तरी शटडाऊनचे नाव नाही. उलट ब्रह्मा अधिकच स्क्रीनच्या जवळ जाऊन, वर खाली स्क्राॅल करीत एकाग्र चित्ताने, सर्वस्व विसरून, एकटक डोळे विस्फारून पुढे बघत होता. अगदी एखादे शाळकरी मूल नवीन चाचा चौधरीमधे हारवून जाते तसे. पण चेहऱ्यावर तो बालसुलभ निरागस 'पुढे काय?' भाव नसून ब्रह्माच्या चेहऱ्यावर 'हे काय?' असाच भाव ज्यास्त होता.

चित्रगुप्ताची दैनंदिनी समोर पाहून ब्रह्मा चाटच पडला. चित्रगुप्ताच्या सरकारी वहीची पाने त्याने बरेचदा पलटली होती. वहीतील नोंदीप्रमाणे यमदूत पृथ्वीवासियांना आणून, त्यांच्या पापपुण्याचा योग्य तो हिशोब करून, वर्गवारीने त्यांची गटवार विभागणी करीत असत. नंतर मग त्यांची रवानगी क्वचित स्वर्गात किंवा बहुतांश भागवतपुराणवर्णित अठ्ठावीस पैकी यथायोग्य न्यायोचित नरकात करतात याचीही तो मधूनमधून खात्री करून घेत असे. कुठलीही प्रणाली कितीही उत्तम असली तरी तिचे अवलंबन चोखपणे झालेच पाहिजे यावर ब्रह्माचा विशेष भर असे. न्याय आंधळा असतो असे एकदा नारद म्हणाला त्यावरून झालेली बापलेकांची खडाजंगी व त्यामुळे चळाचळ कापलेला कैलासपर्वत व झालेले अभूतपूर्व हिमस्खलन व भूस्खलन ब्रह्मा कधीच विसरू शकला नाही. इंद्राचे सिंहासन तर केवळ नित्याप्रमाणे डळमळलेच नाही, तर त्याच्यासकट कोलमडून पडले होते. न्याय डोळसपणे व्हायला हवा हे ब्रह्माचे स्पष्ट मत होते. त्यामुळे चित्रगुप्ताच्या वहीप्रमाणेच काटेकोरपणे स्वर्गनरकाचा निवाडा होतो की नाही याकडे तो जातीने लक्ष देई. पण चित्रगुप्त खाजगी दैनंदिनी लिहितो हे ब्रह्मालाही माहीत नव्हते. त्याच्या भ्रूकटाक्षाशिवाय त्रिलोकात साधा दगडही हालत नाही हा त्याचा समज मिथ्या ठरला होता. आज त्याचाच पुत्र चित्रगुप्ताची दैनंदिनी समोर पाहून ब्रह्मा स्तब्धच झाला.

दुसऱ्याची दैनंदिनी वाचू नये असे नारद एकदा म्हणाला होता. काकू बरेचदा अपरात्री उठून दैनंदिनी लिहीत व कधीकधी ती डायनिंग टेबलवरच सोडून पुन्हा झोपायला जात. त्यांनी काय लिहिले असावे वा त्या वहीतून काय वाचले असावे याचे ब्रह्माला नेहमीच कुतुहल असे. एकदा दैनंदिनी समोर घेऊन ब्रह्मा ती उघडणार एवढ्यात त्याच्या हातावर नारदाचा हात पडला व त्याने ती डायरी नुसती किलकिली सुद्धा होऊ दिली नाही. एक शब्द न उच्चारता, केवळ मान हालवून, डोळे मिटून नारदाने आपली असंमती दर्शविली होती व दैनंदिनी न उघडण्याची ब्रह्माला मूक विनंती केली होती. मानेची कळेल न कळेल इतकी हलकी हालचाल, व त्याबरोबरच पापणीचे साधे बंद होणे हे शब्दांपेक्षाही किती बोलके असते? ब्रह्माला कळले की पृथ्वीतलावर दैनंदिनी वाचणे हे योग्य समजले जात नाही. त्याचे कुतुहल तितकेच तीव्र असले तरी त्याने दैनंदिनीवरचा आपला हात शिथिल केला व हळूच काढून घेतला. ती दैनंदिनी तशीच बंद पडून राहिली. आणि आज तर ब्रह्माच्या डोळ्यासमोर चित्रगुप्ताची दैनंदिनी विनासायास उघडी पडली होती.

सुरुवातीला ब्रह्मा दचकलाच. नारदमुनी झोपले आहेत हे त्याने पाठीमागच्या डोळ्यांच्या एका चोरट्या कटाक्षाने हेरले. त्यांचे तोंड ब्रह्माकडे असले तरी डोळे बंद होते. त्याची झोप कुंभकर्णाची आहे असे नारद एकदा स्वतःच म्हणाल्याचे आठवून ब्रह्माच्या मागच्या तोंडावर उगाचच हसू उमटले. अतिशयोक्ती असली तरी झोप पूर्ण झाल्याशिवाय किंवा कानात वीजेचा कडकडाट झाल्याशिवाय किंवा नाकात कागदाची सुरळी किंवा पेटकोलीतली कोरडी पिळदार वात घातल्याशिवाय नारद कधी उठत नसे याचा ब्रह्माला अनुभवही होता. आता चित्रगुप्ताची दैनंदिनी वाचली तर त्याला कोणी साक्षीदार राहणार नव्हते. ज्या गोष्टीला साक्षीदारच नाही ती घडली काय, अन् न घडली काय. जणू हिरण्यगर्भातून अजन्माचा जन्मच. एकदा ती पुराणातली कथा वाचून नारद 'हंहंहें होंहं हांहां हिंह्हें हेंहां' असे गुणगुणायला लागला आणि ब्रह्माने काय म्हणतो आहेस ते सांग असा हट्टच केला तेंव्हा गाण्याचे शब्द नारदाने सांगितले होते. 'जंगलमे मोर नाचा, किसने देखा' असे ते गाणे होते. आता ब्रह्माही नकळत ते गाणे हलकेच गुणगुणायला लागला. अगदी हलके, ज्याने सावध झोप असलेले काका सुद्धा उठले नसते. इतक्याशा आवाजाने नारद तर उठणारच नाही याची ब्रह्माला खात्रीच होती. एका बाजूच्या डोळ्यांनी ब्रह्माने भिंतीवरचे घड्याळही पाहून घेतले. काकूंच्या अलार्मला अजून वेळ होता. मागे एकदा गडबड झाल्यापासून ब्रह्मा पहाटे तीन वाजताच काँप्यूटर बंद करून झोपी जात असे. आज थोडा उशीरच झाला होता. पण काकूंचा अलार्म पाचाच्या आत काही होणार नव्हता. समोर आव्हान देणारी चित्रगुप्ताची दैनंदिनी वाचायला ब्रह्माचे मन आतुर होते पण डोळे मात्र तसे करणे टाळत होते. त्याच्याच सृष्टीत असे काही त्याचाच मानसपुत्र युगानुयुगे निर्मित होता याची ब्रह्माला अंधूकशी सुद्धा चाहूल नव्हती.

काकूंची दैनंदिनी वाचण्यापासून नारदाने ब्रह्माला परावृत्त केले तेव्हा दैनंदिनी काय असते याची ब्रह्माला साधी कल्पनाही नव्हती. त्याने तो शब्दही ऐकला नव्हता. कोणाची दैनंदिनी वाचायला पृथ्वितलावर अलिखित बंधन आहे हे तर अजिबातच माहीत नव्हते. असेही साहित्य असते जे लेखक किंवा लेखिका कोणीही वाचू नये अशा अपेक्षेने व कोणी वाचणार नाही अशा खात्रीने लिहितात ही कल्पनाच ब्रह्माला न समजण्यासारखी होती. तसेच असेल तर लिहायचे तरी कां व कोणासाठी? हे तर कोणीही जेऊ नये म्हणून स्वयंपाक करण्यासारखेच आहे असे त्याला वाटले होते. कोणीही ऐकू नये म्हणून त्याने वेदनिर्मिती केल्यासारखे ते झाले असते. पण मग असे वेद त्याच्या नासिकेतून डोक्यात शिरून स्मृतीतून एका दैत्याने चोरले म्हणून तो कां इतका विचलित झाला होता? त्याने वेदनिर्मिती इतरांनी वाचन मनन करावे म्हणून केली नसती तर मग त्या चोराला गाठून चोरलेले वेद हस्तगत करायला कां एक विष्णूचा अवतार खपला असता? मत्स्यपुराणातली ती सत्यकथा आठवून ब्रह्माला आपण तरुणपणी किती गाढ झोपत असू ते आठवले व तेवढ्या पहाटेही त्याच्या ओठांवर हसू उमटले. कुठल्याही साहित्यनिर्मितीला अप्रकटतेचा हा कसा विचित्र श्राप? प्रकट जी होत नाही तिला निर्मिती म्हणणे तरी योग्य आहे काय? हे तर दिसत नसला तरी देव आहे असे म्हणण्यासारखे आहे. अनेक जुनेच विचार ब्रह्माच्या मनःश्चक्षूंसमोर नव्याने तरळले. समोर चित्रगुप्ताच्या दैनंदिनीचे पहिले उघडे पान अचानक दिसेनासे झाले. काहीच हालचाल नसल्यामुळे काँप्यूटर स्लीप मोडमध्ये गेल्याचे ब्रह्माला उमजले. लगेच माऊसवर त्याचे बोट दबले व तेच पान पुनः स्क्रीनवर उजळले. दैनंदिनी सुखरूप आहे हे पाहून ब्रह्माला हायसे वाटले. पण वाचायला अजूनही त्याचे ब्रह्ममन धजू पाहीना.

नारदाच्या निःशब्द 'वाचू नकोस ब्रह्मा' अशा कळकळीच्या सांगण्याचा पगडा अजूनही मनावर बळकट होता. एक मन त्या निरर्थक वाटणाऱ्या शृंखलेला तोडू पाहात होते. दुसरे त्याच शृंखलेतून यदाकदाचित मुक्ती झाली तरीही जखडून राहणार होते. प्रथमच ब्रह्माला मोह आणि विवेक यांचे आंतरिक द्वंद्व अनुभवायला मिळाले होते. काकूंची दैनंदिनी उघडण्याआधीच नारदाने बंद केली तेव्हा त्यात काकू काय लिहितात व कां लिहितात असा प्रश्न सहजच उद्भवला व तो त्याने नारदाला विचारलाही होता. तिला दैनंदिनी म्हणजेच डायरी म्हणतात व त्यात काकूंचे भूत व भविष्य आहे असे नारद म्हणाल्याचे ब्रह्माला आठवले. दैनंदिनीत फक्त दोनच प्रकारची पाने असतात; लिहून भरलेली काही, व बाकी सारी कोरी असेही नारद म्हणाला होता. दैनंदिनी हातात घेऊन, ती थोडी किलकिली करून नारदाने पानांच्या काठांवरून आपला अंगठा फिरविला होता. पाने उघडली नाहीत तरी सुरुवातीची बरीच पाने भरलेली व नंतरची सारी कोरी आहेत हे दिसण्यापुरते तेवढे पुरे होते. नारद तसे करतांना पानांचा फडफड असा विशिष्ट आवाज झाल्याचे, त्यातून थोडी हवा आल्याचे ब्रह्माला आठवले. त्या हवेने की काय, पण त्याचे कुतुहल अधिकच प्रज्वलित झाले होते. जणू दिव्याची ज्योत. एखादी गोष्ट करू नये असे सांगताच, ती कां करू नये याचा शोध घेण्यासाठी तरी ती करून पाहण्याची इच्छा किती प्रबळ होते हे कळून ब्रह्माला स्वतःचीच मौज वाटली. केवळ अशाच अनिवार इच्छेपोटी, क्षणिक मोहापाई पृथ्वीवासी निशिद्ध गोष्टी करीत असतील असा एक विचारही त्याच्या मनात तरळला होता. आणि त्याचे फळ म्हणून त्यांना नरकवास आणि पुन्हा तो चौऱ्यांशी लक्षांचा फेरा. चंचल मनाला एकदाही बळी न पडलेला कधीमधी एखादाच. त्यामुळे नरकातली व जंबुद्वीपावरील कधी न संपणारी, उलट वाढणारी गर्दी. सारेचे सारेच फेऱ्यात अडकलेले. स्वर्गात मात्र विश्वकर्म्याने बांधलेली विशाल पुण्यनगरी ओसाड पडलेली. वेदपुराणात, संहितेत, उपनिषदात, स्वायंभूवापासून वैवस्वतापर्यंत मनूंनी आखून दिलेल्या मनुस्मृतीतील नियमावलीनुसार मनुपुत्र वर्तन करतील व पुण्याचे धनी व तदनुसार स्वर्गाचे मोठ्या प्रमाणात रहिवासी होतील असाच ब्रह्माचा कयास होता, व त्याप्रमाणेच त्यांच्या राहण्याखाण्याची व मनोरंजनाची मुबलक सोय पुण्यनगरीत करण्यात आली होती. पण दैवी अंदाज सपशेल चुकला व ती नगरी तशीच ओसाड पडून राहिली. पापपुण्यांचे कठोर मापदंड शिथिल करून पुन्हा एकदा नव्याने ठरवावे व नव्या युगाशी थोडी हातमिळवणी करावी असे नारदाने एका देवसभेत सुचविलेलेही ब्रह्माला आठवले. 'देवांचाही पाय घसरतो कधी कधी, तर त्या गरीब मानवाचे काय?' असे ठराव मांडणीचे कळकळीचे नारद वचन ब्रह्माला आठवले. पण एकमताने नारदाचा ठराव फेटाळण्यात आला होता व नारद 'नारायण नारायण' म्हणाले होते. दैनंदिनीची पाने फडफडवल्यावर ब्रह्माचे विचार हेरून की काय, पुन्हा तसेच 'नारायण नारायण' म्हणतांना मनकवड्या नारदाच्या ओठावरचे अस्पष्ट हास्य ब्रह्माच्या नजरेतून तेव्हा सुटले नव्हते. तेच नारदहास्य आज त्याचे डोळे व स्क्रीनवरची चित्रगुप्ताची दैनंदिनी यांचा मिलाप होऊ देत नव्हते. नारदमुनी मात्र शेजारी ढाराढूर झोपलेले होते. ओठांवर तेच मिस्किल हास्य पांघरून.

दैनंदिनीत भूत आणि भविष्य दोनही आहेत हे नारदकथन ब्रह्माला धक्कादायक होते. भूतकाळ असणे तसे शक्य होते. एकदा एखादी घटना घडून गेल्यावर तिची नोंद ज्याला हवी त्याने हवी तशी ठेवायला तशी देवनियमानुसार काही हरकत नव्हती. शिवाय अशा खाजगी नोंदीला मृत्योत्तर जो न्यायनिवाडा होऊन स्वर्ग, नरक, मोक्ष वगैरेचा निर्णय होत असे त्यात काही स्थान नव्हते. त्यात फक्त चित्रगुप्ताच्या वहीतील नोंदीच ग्राह्य मानल्या जात. शिवाय कोणाच्या दैनंदिनीत चित्रगुप्ताच्या वहीशी मेळ न खाणाऱ्या गोष्टींचा उल्लेख आहे म्हणून न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचे किंवा न्यायदानाला कोणी आव्हान दिल्याचे ब्रह्माच्या आठवणीत नव्हते. तशी देवकायद्यात तरतूदच नव्हती मुळी. लिहिलेली पाने म्हणजे भूतकाळ व कोरी म्हणजे भविष्यकाळ, की त्याउलट, हे नारदाने सांगितले नव्हते. काहीतरी नेहमी हातचे ठेवायचे ही त्याची जुनी खोड होती. ब्रह्माला वाटले की कदाचित काकू दैनंदिनीत कोऱ्या पानावर लिहीत नसतील, तर गेलेल्या दिवसाचे भरलेले पान पुसून कोरे करीत असतील. भूताची पाने कोरी असतील, व भविष्याची लिहिलेली. पण दैनंदिनीत लिहिलेली भविष्यपाने असावी हे कसे? भविष्यलेख कपाळावर लिहिणे हे ब्रह्माचे, आणि फक्त ब्रह्माचेच काम होते. तो लेख काकूंच्या दैनंदिनी की डायरी काय म्हणतात त्यात कसा असू शकतो? उद्या काय होणार हे वाचून मगच काकू रोज झोपतात की काय? पुढे काय होणार हे ब्रह्मलिखित चित्रगुप्ताच्या दैनंदिनीतही असते की काय? तेच काँप्यूटरवर वाचून लोक आपल्याला लागू पडतो तेवढा मजकूर आपल्या डायरीत उतरवून घेतात की काय? काँप्यूटर आता इतके प्रगत झाले की काय? मानवी काँप्यूटरनेच कैलासावरचे काँप्यूटर क्रॅश केले होते की काय? तसे करून त्याने आपण कल्पना आहोत अशी आपली खात्री पटवून दिली की काय? नारदही ह्या साऱ्या कारस्थानात सामील आहे की काय? माझी दोन मुले, नारद व चित्रगुप्त सत्तापालटाचा खेळ खेळत आहेत की काय? हे सर्व गूढ चित्रगुप्ताच्या दैनंदिनीत सापडेल काय? मनात शंकांचे काहूर! संशयपिशाच्च! शंकानिरसनाकरिताच नियतीने समोर चित्रगुप्ताची दैनंदिनी उघडली असावी असेही पळभर ब्रह्माला वाटले. आपल्यालाही नियतीक्रम लागू आहे हा विचार दुसऱ्याच क्षणी त्याला विचित्र वाटला. त्याने झटकूनही टाकला. पण दैनंदिनीच्या विनासायास समोर उघडलेल्या पानाला त्याची चौफेर नजर टाळतच राहिली.

दैनंदिनीत काकू रोज काय लिहितात असे ब्रह्माने नारदाला विचारले होते. नारदाने नेहमीप्रमाणे ज्ञानदात्याच्या भूमिकेतून उत्तरही दिले होते. वरातगंगा जंबुद्वीपावर आल्यापासून, पृथ्विलोकाच्या ह्या काटेरी अरण्यात तेथील खाचखळग्याचे इत्यंभूत ज्ञान असणाऱ्या नारदाने ब्रह्माचा अक्षरशः आईने मुलाचा, गाईने पाडसाचा करावा असा प्रतिपाळ केला होता. त्याच नारदाचा आज आपल्याला चुकीचा का होईना, क्षणिक का होईना, संशय आला हे ब्रह्माला बोचायला लागले. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्याच नारदाचे बोल आता ब्रह्माला आठवायला लागले. नारद म्हणाला होता की काकू रोजच्या ठळक घटनांचे त्यांच्या मनात उमटलेले प्रतिसाद दैनंदिनीत लिहितात. दैनंदिनी ही फक्त स्वतःकरिता लिहिण्यात येते. दैनंदिनीत लिहिणारा ती फक्त स्वतःकरिता लिहितो. सभ्य समाजात कोणीही दुसऱ्याची दैनंदिनी वाचत नाही. त्यामुळे दैनंदिनीत लिहिणारा अभय होऊन, प्रतिक्रियेची चिता न करता, दुष्परिणामाला न घाबरता मोकळेपणाने लिहितो. काय झाले हे लिहिण्यापेक्षा दैनंदिनीत काय व्हायला हवे होते हेच ज्यास्त प्रमाणात उतरते. प्रत्यक्षात कोणालाही मनातली गोष्ट न सांगता येण्यामुळे होणारी कुचंबणा, जीवाची तगमग, घुसमट त्यात शब्दरूप घेते. डायरी कोणी वाचणार नाही अशी पूर्ण खात्री नसली तरी अपेक्षा असते. त्यामुळे दैनंदिनीत उमटणारे मनाचे कवडसे बरेच सत्याला धरून असतात. लोकलज्जेखातर, रीतिरिवाजाला बुजून, लहानथोर असा भेद असल्यामुळे प्रत्यक्षात ओठावर न आलेले शब्द, अस्फुट विचार दैनंदिनीत अक्षररूप घेतात. दैनंदिनी ही व्यक्तीचे बंड, व्यक्तीने स्वतःच स्वतःचा व इतरांचा केलेला काल्पनिक न्यायनिवाडा, झालेल्या चुकींचा कबुलीजबाब, दबून गेलेल्या आशाआकांक्षाचे साकार रूप, नियतीची चीड, भविष्याची भीती, अशी अनेकरूपा असते. धार्मिक म्हणून लोकात वावरणारा, डायरी वाचली तर वेगळाच दिसतो, कठोर म्हणून प्रसिद्ध असणारा डायरीत नारळाचा गर असतो. चित्रगुप्ताची दैनंदिनी वाचली तर खरा चित्रगुप्त कसा हे आज ब्रह्माला कळणार होते. पण नारदाला ते आवडणार नाही असे त्याला वाटत होते.

कोणीच कोणाची डायरी जर वाचत नाही, तर डायरीत काय असते हे नारदाला कसे माहीत असाही प्रश्न ब्रह्माला पडला होता. की काकूंची डायरी नारदाने आधीच वाचली होती व त्यात ब्रह्माने न वाचावे असे काहीतरी आहे म्हणून नारदाने डायरीचे हे अवाच्य स्वरूप सांगून त्याला अप्रवृत्त केले होते? काय असे काकूंनी डायरीत लिहिले असावे जे वाचून ब्रह्मा दुखावल्या जाईल असे नारदाला वाटले? काय असे असेल चित्रगुप्ताच्या डायरीत की आपण डायरी लिहितो ही गोष्टच त्याने ब्रह्मापासून लपविली होती? कां वाचू नये आपण ही आपल्यासमोर उघडी पडलेली डायरी. पण नारदाच्या परवानगीशिवाय वाचायचे तरी कसे? उठवावे का त्याला? सारेच ब्रह्मप्रश्न!

चार डोक्यात चार विचार! विचारांचे चक्रीवादळ काही केल्या शमेना. दैनंदिनी ही कल्पना आली तरी कुठून? ब्रह्माने मनातल्या मनातच स्वरचित चारही वेदांच्या सगळ्या ऋचा पुन्हा एकदा आळवून पाहिल्या. आज वेदांच्या फक्त वीस हजार ऋचाच उपलब्ध आहेत असे नारदाने सांगितल्याचे ब्रह्माला आठवले. पण त्याच्या चार डोक्यातील चार स्मृतिसंदूकात अजूनही चार वेदांच्या मूळ एक लाख ॠचा आज त्याला सहज सापडल्या. त्यात कुठेही दैनंदिनी ही कल्पना सोडा, असा शब्द सुद्धा आढळला नाही. अठरा महापुराणात वा तितक्याच उपपुराणांच्या, सूक्तांच्या, उपनिषदांच्या लाखो श्लोकांपैकी एका श्लोकात सुद्धा एका शब्दाने दैनंदिनीचा उल्लेख नाही. नंदिनीचा आहे फारच फार तर. पण तिचा दैनंदिनीशी तिळमात्र संबंध नाही. मग नारदाला दैनंदिनी हा शब्द वा दैनंदिनीचे स्वरूप याविषयी एवढी माहिती कशी? ही शंभर टक्के मानवनिर्मित कल्पना दिसते. नारद त्रिलोक संचारी असल्यामुळे व पृथ्वीतलावर त्याचे नेहमीच येणे जाणे असल्यामुळेच त्याला डायरी लिहिणे हा मानवी प्रकार माहीत असावा. त्यावर त्याने संशोधन केले असावे. दैनंदिनी लिहिण्यात असलेले आकर्षण त्याने अनुभवले असावे. नारदही दैनंदिनी लिहीत असला पाहिजे. त्यात असलेला विरंगुळा, मनावरचा भार हलका करण्याचे दैनंदिनी लिहिण्यात असलेले सामर्थ्य त्याने जाणले असावे. तेच त्याने आपल्या भावंडांना समजवून सांगितले असावे. पण माझ्यापासून लपविले असावे. म्हणून चित्रगुप्त चोरून डायरी लिहित असावा. तोही तर आपली वही घेऊन पृथ्वीवर बरेचदा येतो. त्याचाही मानवांशी सतत संपर्क आहे. हे जर खरे असेल तर यमराज पण डायरी लिहीत असावे. त्याचाही पृथ्वीशी व पृथ्विवासियांशी जवळचा संबंध आहे. ही सारी माझी लेकरे मला न सांगता दैनंदिनी लिहितात. त्यांचे मन, त्यांचे विचार त्यात कोरतात. दैनंदिनी लिहिण्याचा व ती अधूनमधून आपलीच आपण वाचण्याचा आनंद लुटतात. आपले मन हलके करतात. मला सांगितले असते तर मीही लिहिली असती. मलाही काय कमी विवंचना आहेत? माझेही मन जरा हलके झाले असते. एक ना दोन. ब्रह्माच्या प्रश्नमोराचा पिसारा फुलतच गेला.

आता मात्र ब्रह्माला नारद, चित्रगुप्त, यमराज यांचा हेवा वाटू लागला. मला त्यांच्यापेक्षा ते वेगळे मानतात, कदाचित जुन्या पिढीतला, जुनाट विचारांचा समजतात याचा त्याला रागही येऊ लागला. त्यांच्यावर त्याचा पुत्रवत लोभ असला तरी. येथे मानवात जशी दोन पिढ्यात दरी असते तसेच देवपिढ्यातही जनरेशन गॅप की काय म्हणतात ती असते का? त्यांची दैनंदिनी वाचल्याशिवाय मला त्यांचे मन कळेल काय? ते कळल्याशिवाय मी ही दरी बुजवणार तरी कशी? ती बुजवण्याकरिता तरी मी ही डायरी वाचावी काय? माझा उद्देश पवित्र आहे म्हणून मी ही लक्ष्मणरेषा उल्लंघू काय? माझी ही चूक क्षम्य होईल काय? तसेही माझी चूक आहे असे कोण म्हणेल? मीच त्यांचा जनक नाही काय? अहम् ब्रह्मास्मि हे फक्त मलाच खऱ्या अर्थाने लागू होत नाही काय? मी करीन ते चूक असू तरी शकते का?  आणि चित्रगुप्ताचीच तर दैनंदिनी आहे. माझा पुत्रच तो. काकूंची दैनंदिनी थोडेच मी वाचू जात आहे. ब्रह्मा विचारगंगेत वाहतच गेला. विवेकाचा बांध ढासळतच गेला.

षड्रिपूंच्या पाशवी मिठीत ब्रह्मा आवळतच गेला. नारद गाढ झोपला आहे याची एकदा खात्री करून ब्रह्माने चित्रगुप्ताच्या दैनंदिनीचे पहिले पान उलटले.

तेवढ्यात काकूंच्या घड्याळाचा गजर झाला. नारदाची झोप मोडली जरी नाही तरी चाळवली गेली. कड पलटून, ब्रह्माकडे पाठ करून तो पुन्हा गाढ झोपी गेला.

_____________________


अनुक्रमणिकेकडे