Sunday, 7 February 2016


गोष्ट बारावी


रोज पहाटे तीन वाजता काँप्यूटर बंद करून झोपी जाणारा ब्रह्मदेव आज मात्र काळ वेळ विसरला की काय असे वाटायला लागले. सव्वातीन, साडेतीन झाले तरी शटडाऊनचे नाव नाही. उलट ब्रह्मा अधिकच स्क्रीनच्या जवळ जाऊन, वर खाली स्क्राॅल करीत एकाग्र चित्ताने, सर्वस्व विसरून, एकटक डोळे विस्फारून पुढे बघत होता. अगदी एखादे शाळकरी मूल नवीन चाचा चौधरीमधे हारवून जाते तसे. पण चेहऱ्यावर तो बालसुलभ निरागस 'पुढे काय?' भाव नसून ब्रह्माच्या चेहऱ्यावर 'हे काय?' असाच भाव ज्यास्त होता.

चित्रगुप्ताची दैनंदिनी समोर पाहून ब्रह्मा चाटच पडला. चित्रगुप्ताच्या सरकारी वहीची पाने त्याने बरेचदा पलटली होती. वहीतील नोंदीप्रमाणे यमदूत पृथ्वीवासियांना आणून, त्यांच्या पापपुण्याचा योग्य तो हिशोब करून, वर्गवारीने त्यांची गटवार विभागणी करीत असत. नंतर मग त्यांची रवानगी क्वचित स्वर्गात किंवा बहुतांश भागवतपुराणवर्णित अठ्ठावीस पैकी यथायोग्य न्यायोचित नरकात करतात याचीही तो मधूनमधून खात्री करून घेत असे. कुठलीही प्रणाली कितीही उत्तम असली तरी तिचे अवलंबन चोखपणे झालेच पाहिजे यावर ब्रह्माचा विशेष भर असे. न्याय आंधळा असतो असे एकदा नारद म्हणाला त्यावरून झालेली बापलेकांची खडाजंगी व त्यामुळे चळाचळ कापलेला कैलासपर्वत व झालेले अभूतपूर्व हिमस्खलन व भूस्खलन ब्रह्मा कधीच विसरू शकला नाही. इंद्राचे सिंहासन तर केवळ नित्याप्रमाणे डळमळलेच नाही, तर त्याच्यासकट कोलमडून पडले होते. न्याय डोळसपणे व्हायला हवा हे ब्रह्माचे स्पष्ट मत होते. त्यामुळे चित्रगुप्ताच्या वहीप्रमाणेच काटेकोरपणे स्वर्गनरकाचा निवाडा होतो की नाही याकडे तो जातीने लक्ष देई. पण चित्रगुप्त खाजगी दैनंदिनी लिहितो हे ब्रह्मालाही माहीत नव्हते. त्याच्या भ्रूकटाक्षाशिवाय त्रिलोकात साधा दगडही हालत नाही हा त्याचा समज मिथ्या ठरला होता. आज त्याचाच पुत्र चित्रगुप्ताची दैनंदिनी समोर पाहून ब्रह्मा स्तब्धच झाला.

दुसऱ्याची दैनंदिनी वाचू नये असे नारद एकदा म्हणाला होता. काकू बरेचदा अपरात्री उठून दैनंदिनी लिहीत व कधीकधी ती डायनिंग टेबलवरच सोडून पुन्हा झोपायला जात. त्यांनी काय लिहिले असावे वा त्या वहीतून काय वाचले असावे याचे ब्रह्माला नेहमीच कुतुहल असे. एकदा दैनंदिनी समोर घेऊन ब्रह्मा ती उघडणार एवढ्यात त्याच्या हातावर नारदाचा हात पडला व त्याने ती डायरी नुसती किलकिली सुद्धा होऊ दिली नाही. एक शब्द न उच्चारता, केवळ मान हालवून, डोळे मिटून नारदाने आपली असंमती दर्शविली होती व दैनंदिनी न उघडण्याची ब्रह्माला मूक विनंती केली होती. मानेची कळेल न कळेल इतकी हलकी हालचाल, व त्याबरोबरच पापणीचे साधे बंद होणे हे शब्दांपेक्षाही किती बोलके असते? ब्रह्माला कळले की पृथ्वीतलावर दैनंदिनी वाचणे हे योग्य समजले जात नाही. त्याचे कुतुहल तितकेच तीव्र असले तरी त्याने दैनंदिनीवरचा आपला हात शिथिल केला व हळूच काढून घेतला. ती दैनंदिनी तशीच बंद पडून राहिली. आणि आज तर ब्रह्माच्या डोळ्यासमोर चित्रगुप्ताची दैनंदिनी विनासायास उघडी पडली होती.

सुरुवातीला ब्रह्मा दचकलाच. नारदमुनी झोपले आहेत हे त्याने पाठीमागच्या डोळ्यांच्या एका चोरट्या कटाक्षाने हेरले. त्यांचे तोंड ब्रह्माकडे असले तरी डोळे बंद होते. त्याची झोप कुंभकर्णाची आहे असे नारद एकदा स्वतःच म्हणाल्याचे आठवून ब्रह्माच्या मागच्या तोंडावर उगाचच हसू उमटले. अतिशयोक्ती असली तरी झोप पूर्ण झाल्याशिवाय किंवा कानात वीजेचा कडकडाट झाल्याशिवाय किंवा नाकात कागदाची सुरळी किंवा पेटकोलीतली कोरडी पिळदार वात घातल्याशिवाय नारद कधी उठत नसे याचा ब्रह्माला अनुभवही होता. आता चित्रगुप्ताची दैनंदिनी वाचली तर त्याला कोणी साक्षीदार राहणार नव्हते. ज्या गोष्टीला साक्षीदारच नाही ती घडली काय, अन् न घडली काय. जणू हिरण्यगर्भातून अजन्माचा जन्मच. एकदा ती पुराणातली कथा वाचून नारद 'हंहंहें होंहं हांहां हिंह्हें हेंहां' असे गुणगुणायला लागला आणि ब्रह्माने काय म्हणतो आहेस ते सांग असा हट्टच केला तेंव्हा गाण्याचे शब्द नारदाने सांगितले होते. 'जंगलमे मोर नाचा, किसने देखा' असे ते गाणे होते. आता ब्रह्माही नकळत ते गाणे हलकेच गुणगुणायला लागला. अगदी हलके, ज्याने सावध झोप असलेले काका सुद्धा उठले नसते. इतक्याशा आवाजाने नारद तर उठणारच नाही याची ब्रह्माला खात्रीच होती. एका बाजूच्या डोळ्यांनी ब्रह्माने भिंतीवरचे घड्याळही पाहून घेतले. काकूंच्या अलार्मला अजून वेळ होता. मागे एकदा गडबड झाल्यापासून ब्रह्मा पहाटे तीन वाजताच काँप्यूटर बंद करून झोपी जात असे. आज थोडा उशीरच झाला होता. पण काकूंचा अलार्म पाचाच्या आत काही होणार नव्हता. समोर आव्हान देणारी चित्रगुप्ताची दैनंदिनी वाचायला ब्रह्माचे मन आतुर होते पण डोळे मात्र तसे करणे टाळत होते. त्याच्याच सृष्टीत असे काही त्याचाच मानसपुत्र युगानुयुगे निर्मित होता याची ब्रह्माला अंधूकशी सुद्धा चाहूल नव्हती.

काकूंची दैनंदिनी वाचण्यापासून नारदाने ब्रह्माला परावृत्त केले तेव्हा दैनंदिनी काय असते याची ब्रह्माला साधी कल्पनाही नव्हती. त्याने तो शब्दही ऐकला नव्हता. कोणाची दैनंदिनी वाचायला पृथ्वितलावर अलिखित बंधन आहे हे तर अजिबातच माहीत नव्हते. असेही साहित्य असते जे लेखक किंवा लेखिका कोणीही वाचू नये अशा अपेक्षेने व कोणी वाचणार नाही अशा खात्रीने लिहितात ही कल्पनाच ब्रह्माला न समजण्यासारखी होती. तसेच असेल तर लिहायचे तरी कां व कोणासाठी? हे तर कोणीही जेऊ नये म्हणून स्वयंपाक करण्यासारखेच आहे असे त्याला वाटले होते. कोणीही ऐकू नये म्हणून त्याने वेदनिर्मिती केल्यासारखे ते झाले असते. पण मग असे वेद त्याच्या नासिकेतून डोक्यात शिरून स्मृतीतून एका दैत्याने चोरले म्हणून तो कां इतका विचलित झाला होता? त्याने वेदनिर्मिती इतरांनी वाचन मनन करावे म्हणून केली नसती तर मग त्या चोराला गाठून चोरलेले वेद हस्तगत करायला कां एक विष्णूचा अवतार खपला असता? मत्स्यपुराणातली ती सत्यकथा आठवून ब्रह्माला आपण तरुणपणी किती गाढ झोपत असू ते आठवले व तेवढ्या पहाटेही त्याच्या ओठांवर हसू उमटले. कुठल्याही साहित्यनिर्मितीला अप्रकटतेचा हा कसा विचित्र श्राप? प्रकट जी होत नाही तिला निर्मिती म्हणणे तरी योग्य आहे काय? हे तर दिसत नसला तरी देव आहे असे म्हणण्यासारखे आहे. अनेक जुनेच विचार ब्रह्माच्या मनःश्चक्षूंसमोर नव्याने तरळले. समोर चित्रगुप्ताच्या दैनंदिनीचे पहिले उघडे पान अचानक दिसेनासे झाले. काहीच हालचाल नसल्यामुळे काँप्यूटर स्लीप मोडमध्ये गेल्याचे ब्रह्माला उमजले. लगेच माऊसवर त्याचे बोट दबले व तेच पान पुनः स्क्रीनवर उजळले. दैनंदिनी सुखरूप आहे हे पाहून ब्रह्माला हायसे वाटले. पण वाचायला अजूनही त्याचे ब्रह्ममन धजू पाहीना.

नारदाच्या निःशब्द 'वाचू नकोस ब्रह्मा' अशा कळकळीच्या सांगण्याचा पगडा अजूनही मनावर बळकट होता. एक मन त्या निरर्थक वाटणाऱ्या शृंखलेला तोडू पाहात होते. दुसरे त्याच शृंखलेतून यदाकदाचित मुक्ती झाली तरीही जखडून राहणार होते. प्रथमच ब्रह्माला मोह आणि विवेक यांचे आंतरिक द्वंद्व अनुभवायला मिळाले होते. काकूंची दैनंदिनी उघडण्याआधीच नारदाने बंद केली तेव्हा त्यात काकू काय लिहितात व कां लिहितात असा प्रश्न सहजच उद्भवला व तो त्याने नारदाला विचारलाही होता. तिला दैनंदिनी म्हणजेच डायरी म्हणतात व त्यात काकूंचे भूत व भविष्य आहे असे नारद म्हणाल्याचे ब्रह्माला आठवले. दैनंदिनीत फक्त दोनच प्रकारची पाने असतात; लिहून भरलेली काही, व बाकी सारी कोरी असेही नारद म्हणाला होता. दैनंदिनी हातात घेऊन, ती थोडी किलकिली करून नारदाने पानांच्या काठांवरून आपला अंगठा फिरविला होता. पाने उघडली नाहीत तरी सुरुवातीची बरीच पाने भरलेली व नंतरची सारी कोरी आहेत हे दिसण्यापुरते तेवढे पुरे होते. नारद तसे करतांना पानांचा फडफड असा विशिष्ट आवाज झाल्याचे, त्यातून थोडी हवा आल्याचे ब्रह्माला आठवले. त्या हवेने की काय, पण त्याचे कुतुहल अधिकच प्रज्वलित झाले होते. जणू दिव्याची ज्योत. एखादी गोष्ट करू नये असे सांगताच, ती कां करू नये याचा शोध घेण्यासाठी तरी ती करून पाहण्याची इच्छा किती प्रबळ होते हे कळून ब्रह्माला स्वतःचीच मौज वाटली. केवळ अशाच अनिवार इच्छेपोटी, क्षणिक मोहापाई पृथ्वीवासी निशिद्ध गोष्टी करीत असतील असा एक विचारही त्याच्या मनात तरळला होता. आणि त्याचे फळ म्हणून त्यांना नरकवास आणि पुन्हा तो चौऱ्यांशी लक्षांचा फेरा. चंचल मनाला एकदाही बळी न पडलेला कधीमधी एखादाच. त्यामुळे नरकातली व जंबुद्वीपावरील कधी न संपणारी, उलट वाढणारी गर्दी. सारेचे सारेच फेऱ्यात अडकलेले. स्वर्गात मात्र विश्वकर्म्याने बांधलेली विशाल पुण्यनगरी ओसाड पडलेली. वेदपुराणात, संहितेत, उपनिषदात, स्वायंभूवापासून वैवस्वतापर्यंत मनूंनी आखून दिलेल्या मनुस्मृतीतील नियमावलीनुसार मनुपुत्र वर्तन करतील व पुण्याचे धनी व तदनुसार स्वर्गाचे मोठ्या प्रमाणात रहिवासी होतील असाच ब्रह्माचा कयास होता, व त्याप्रमाणेच त्यांच्या राहण्याखाण्याची व मनोरंजनाची मुबलक सोय पुण्यनगरीत करण्यात आली होती. पण दैवी अंदाज सपशेल चुकला व ती नगरी तशीच ओसाड पडून राहिली. पापपुण्यांचे कठोर मापदंड शिथिल करून पुन्हा एकदा नव्याने ठरवावे व नव्या युगाशी थोडी हातमिळवणी करावी असे नारदाने एका देवसभेत सुचविलेलेही ब्रह्माला आठवले. 'देवांचाही पाय घसरतो कधी कधी, तर त्या गरीब मानवाचे काय?' असे ठराव मांडणीचे कळकळीचे नारद वचन ब्रह्माला आठवले. पण एकमताने नारदाचा ठराव फेटाळण्यात आला होता व नारद 'नारायण नारायण' म्हणाले होते. दैनंदिनीची पाने फडफडवल्यावर ब्रह्माचे विचार हेरून की काय, पुन्हा तसेच 'नारायण नारायण' म्हणतांना मनकवड्या नारदाच्या ओठावरचे अस्पष्ट हास्य ब्रह्माच्या नजरेतून तेव्हा सुटले नव्हते. तेच नारदहास्य आज त्याचे डोळे व स्क्रीनवरची चित्रगुप्ताची दैनंदिनी यांचा मिलाप होऊ देत नव्हते. नारदमुनी मात्र शेजारी ढाराढूर झोपलेले होते. ओठांवर तेच मिस्किल हास्य पांघरून.

दैनंदिनीत भूत आणि भविष्य दोनही आहेत हे नारदकथन ब्रह्माला धक्कादायक होते. भूतकाळ असणे तसे शक्य होते. एकदा एखादी घटना घडून गेल्यावर तिची नोंद ज्याला हवी त्याने हवी तशी ठेवायला तशी देवनियमानुसार काही हरकत नव्हती. शिवाय अशा खाजगी नोंदीला मृत्योत्तर जो न्यायनिवाडा होऊन स्वर्ग, नरक, मोक्ष वगैरेचा निर्णय होत असे त्यात काही स्थान नव्हते. त्यात फक्त चित्रगुप्ताच्या वहीतील नोंदीच ग्राह्य मानल्या जात. शिवाय कोणाच्या दैनंदिनीत चित्रगुप्ताच्या वहीशी मेळ न खाणाऱ्या गोष्टींचा उल्लेख आहे म्हणून न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचे किंवा न्यायदानाला कोणी आव्हान दिल्याचे ब्रह्माच्या आठवणीत नव्हते. तशी देवकायद्यात तरतूदच नव्हती मुळी. लिहिलेली पाने म्हणजे भूतकाळ व कोरी म्हणजे भविष्यकाळ, की त्याउलट, हे नारदाने सांगितले नव्हते. काहीतरी नेहमी हातचे ठेवायचे ही त्याची जुनी खोड होती. ब्रह्माला वाटले की कदाचित काकू दैनंदिनीत कोऱ्या पानावर लिहीत नसतील, तर गेलेल्या दिवसाचे भरलेले पान पुसून कोरे करीत असतील. भूताची पाने कोरी असतील, व भविष्याची लिहिलेली. पण दैनंदिनीत लिहिलेली भविष्यपाने असावी हे कसे? भविष्यलेख कपाळावर लिहिणे हे ब्रह्माचे, आणि फक्त ब्रह्माचेच काम होते. तो लेख काकूंच्या दैनंदिनी की डायरी काय म्हणतात त्यात कसा असू शकतो? उद्या काय होणार हे वाचून मगच काकू रोज झोपतात की काय? पुढे काय होणार हे ब्रह्मलिखित चित्रगुप्ताच्या दैनंदिनीतही असते की काय? तेच काँप्यूटरवर वाचून लोक आपल्याला लागू पडतो तेवढा मजकूर आपल्या डायरीत उतरवून घेतात की काय? काँप्यूटर आता इतके प्रगत झाले की काय? मानवी काँप्यूटरनेच कैलासावरचे काँप्यूटर क्रॅश केले होते की काय? तसे करून त्याने आपण कल्पना आहोत अशी आपली खात्री पटवून दिली की काय? नारदही ह्या साऱ्या कारस्थानात सामील आहे की काय? माझी दोन मुले, नारद व चित्रगुप्त सत्तापालटाचा खेळ खेळत आहेत की काय? हे सर्व गूढ चित्रगुप्ताच्या दैनंदिनीत सापडेल काय? मनात शंकांचे काहूर! संशयपिशाच्च! शंकानिरसनाकरिताच नियतीने समोर चित्रगुप्ताची दैनंदिनी उघडली असावी असेही पळभर ब्रह्माला वाटले. आपल्यालाही नियतीक्रम लागू आहे हा विचार दुसऱ्याच क्षणी त्याला विचित्र वाटला. त्याने झटकूनही टाकला. पण दैनंदिनीच्या विनासायास समोर उघडलेल्या पानाला त्याची चौफेर नजर टाळतच राहिली.

दैनंदिनीत काकू रोज काय लिहितात असे ब्रह्माने नारदाला विचारले होते. नारदाने नेहमीप्रमाणे ज्ञानदात्याच्या भूमिकेतून उत्तरही दिले होते. वरातगंगा जंबुद्वीपावर आल्यापासून, पृथ्विलोकाच्या ह्या काटेरी अरण्यात तेथील खाचखळग्याचे इत्यंभूत ज्ञान असणाऱ्या नारदाने ब्रह्माचा अक्षरशः आईने मुलाचा, गाईने पाडसाचा करावा असा प्रतिपाळ केला होता. त्याच नारदाचा आज आपल्याला चुकीचा का होईना, क्षणिक का होईना, संशय आला हे ब्रह्माला बोचायला लागले. असे पूर्वी कधी झाले नव्हते. त्याच नारदाचे बोल आता ब्रह्माला आठवायला लागले. नारद म्हणाला होता की काकू रोजच्या ठळक घटनांचे त्यांच्या मनात उमटलेले प्रतिसाद दैनंदिनीत लिहितात. दैनंदिनी ही फक्त स्वतःकरिता लिहिण्यात येते. दैनंदिनीत लिहिणारा ती फक्त स्वतःकरिता लिहितो. सभ्य समाजात कोणीही दुसऱ्याची दैनंदिनी वाचत नाही. त्यामुळे दैनंदिनीत लिहिणारा अभय होऊन, प्रतिक्रियेची चिता न करता, दुष्परिणामाला न घाबरता मोकळेपणाने लिहितो. काय झाले हे लिहिण्यापेक्षा दैनंदिनीत काय व्हायला हवे होते हेच ज्यास्त प्रमाणात उतरते. प्रत्यक्षात कोणालाही मनातली गोष्ट न सांगता येण्यामुळे होणारी कुचंबणा, जीवाची तगमग, घुसमट त्यात शब्दरूप घेते. डायरी कोणी वाचणार नाही अशी पूर्ण खात्री नसली तरी अपेक्षा असते. त्यामुळे दैनंदिनीत उमटणारे मनाचे कवडसे बरेच सत्याला धरून असतात. लोकलज्जेखातर, रीतिरिवाजाला बुजून, लहानथोर असा भेद असल्यामुळे प्रत्यक्षात ओठावर न आलेले शब्द, अस्फुट विचार दैनंदिनीत अक्षररूप घेतात. दैनंदिनी ही व्यक्तीचे बंड, व्यक्तीने स्वतःच स्वतःचा व इतरांचा केलेला काल्पनिक न्यायनिवाडा, झालेल्या चुकींचा कबुलीजबाब, दबून गेलेल्या आशाआकांक्षाचे साकार रूप, नियतीची चीड, भविष्याची भीती, अशी अनेकरूपा असते. धार्मिक म्हणून लोकात वावरणारा, डायरी वाचली तर वेगळाच दिसतो, कठोर म्हणून प्रसिद्ध असणारा डायरीत नारळाचा गर असतो. चित्रगुप्ताची दैनंदिनी वाचली तर खरा चित्रगुप्त कसा हे आज ब्रह्माला कळणार होते. पण नारदाला ते आवडणार नाही असे त्याला वाटत होते.

कोणीच कोणाची डायरी जर वाचत नाही, तर डायरीत काय असते हे नारदाला कसे माहीत असाही प्रश्न ब्रह्माला पडला होता. की काकूंची डायरी नारदाने आधीच वाचली होती व त्यात ब्रह्माने न वाचावे असे काहीतरी आहे म्हणून नारदाने डायरीचे हे अवाच्य स्वरूप सांगून त्याला अप्रवृत्त केले होते? काय असे काकूंनी डायरीत लिहिले असावे जे वाचून ब्रह्मा दुखावल्या जाईल असे नारदाला वाटले? काय असे असेल चित्रगुप्ताच्या डायरीत की आपण डायरी लिहितो ही गोष्टच त्याने ब्रह्मापासून लपविली होती? कां वाचू नये आपण ही आपल्यासमोर उघडी पडलेली डायरी. पण नारदाच्या परवानगीशिवाय वाचायचे तरी कसे? उठवावे का त्याला? सारेच ब्रह्मप्रश्न!

चार डोक्यात चार विचार! विचारांचे चक्रीवादळ काही केल्या शमेना. दैनंदिनी ही कल्पना आली तरी कुठून? ब्रह्माने मनातल्या मनातच स्वरचित चारही वेदांच्या सगळ्या ऋचा पुन्हा एकदा आळवून पाहिल्या. आज वेदांच्या फक्त वीस हजार ऋचाच उपलब्ध आहेत असे नारदाने सांगितल्याचे ब्रह्माला आठवले. पण त्याच्या चार डोक्यातील चार स्मृतिसंदूकात अजूनही चार वेदांच्या मूळ एक लाख ॠचा आज त्याला सहज सापडल्या. त्यात कुठेही दैनंदिनी ही कल्पना सोडा, असा शब्द सुद्धा आढळला नाही. अठरा महापुराणात वा तितक्याच उपपुराणांच्या, सूक्तांच्या, उपनिषदांच्या लाखो श्लोकांपैकी एका श्लोकात सुद्धा एका शब्दाने दैनंदिनीचा उल्लेख नाही. नंदिनीचा आहे फारच फार तर. पण तिचा दैनंदिनीशी तिळमात्र संबंध नाही. मग नारदाला दैनंदिनी हा शब्द वा दैनंदिनीचे स्वरूप याविषयी एवढी माहिती कशी? ही शंभर टक्के मानवनिर्मित कल्पना दिसते. नारद त्रिलोक संचारी असल्यामुळे व पृथ्वीतलावर त्याचे नेहमीच येणे जाणे असल्यामुळेच त्याला डायरी लिहिणे हा मानवी प्रकार माहीत असावा. त्यावर त्याने संशोधन केले असावे. दैनंदिनी लिहिण्यात असलेले आकर्षण त्याने अनुभवले असावे. नारदही दैनंदिनी लिहीत असला पाहिजे. त्यात असलेला विरंगुळा, मनावरचा भार हलका करण्याचे दैनंदिनी लिहिण्यात असलेले सामर्थ्य त्याने जाणले असावे. तेच त्याने आपल्या भावंडांना समजवून सांगितले असावे. पण माझ्यापासून लपविले असावे. म्हणून चित्रगुप्त चोरून डायरी लिहित असावा. तोही तर आपली वही घेऊन पृथ्वीवर बरेचदा येतो. त्याचाही मानवांशी सतत संपर्क आहे. हे जर खरे असेल तर यमराज पण डायरी लिहीत असावे. त्याचाही पृथ्वीशी व पृथ्विवासियांशी जवळचा संबंध आहे. ही सारी माझी लेकरे मला न सांगता दैनंदिनी लिहितात. त्यांचे मन, त्यांचे विचार त्यात कोरतात. दैनंदिनी लिहिण्याचा व ती अधूनमधून आपलीच आपण वाचण्याचा आनंद लुटतात. आपले मन हलके करतात. मला सांगितले असते तर मीही लिहिली असती. मलाही काय कमी विवंचना आहेत? माझेही मन जरा हलके झाले असते. एक ना दोन. ब्रह्माच्या प्रश्नमोराचा पिसारा फुलतच गेला.

आता मात्र ब्रह्माला नारद, चित्रगुप्त, यमराज यांचा हेवा वाटू लागला. मला त्यांच्यापेक्षा ते वेगळे मानतात, कदाचित जुन्या पिढीतला, जुनाट विचारांचा समजतात याचा त्याला रागही येऊ लागला. त्यांच्यावर त्याचा पुत्रवत लोभ असला तरी. येथे मानवात जशी दोन पिढ्यात दरी असते तसेच देवपिढ्यातही जनरेशन गॅप की काय म्हणतात ती असते का? त्यांची दैनंदिनी वाचल्याशिवाय मला त्यांचे मन कळेल काय? ते कळल्याशिवाय मी ही दरी बुजवणार तरी कशी? ती बुजवण्याकरिता तरी मी ही डायरी वाचावी काय? माझा उद्देश पवित्र आहे म्हणून मी ही लक्ष्मणरेषा उल्लंघू काय? माझी ही चूक क्षम्य होईल काय? तसेही माझी चूक आहे असे कोण म्हणेल? मीच त्यांचा जनक नाही काय? अहम् ब्रह्मास्मि हे फक्त मलाच खऱ्या अर्थाने लागू होत नाही काय? मी करीन ते चूक असू तरी शकते का?  आणि चित्रगुप्ताचीच तर दैनंदिनी आहे. माझा पुत्रच तो. काकूंची दैनंदिनी थोडेच मी वाचू जात आहे. ब्रह्मा विचारगंगेत वाहतच गेला. विवेकाचा बांध ढासळतच गेला.

षड्रिपूंच्या पाशवी मिठीत ब्रह्मा आवळतच गेला. नारद गाढ झोपला आहे याची एकदा खात्री करून ब्रह्माने चित्रगुप्ताच्या दैनंदिनीचे पहिले पान उलटले.

तेवढ्यात काकूंच्या घड्याळाचा गजर झाला. नारदाची झोप मोडली जरी नाही तरी चाळवली गेली. कड पलटून, ब्रह्माकडे पाठ करून तो पुन्हा गाढ झोपी गेला.

_____________________


अनुक्रमणिकेकडे

No comments:

Post a Comment