Monday, 23 November 2015


कापुसकोंड्या


लहानपण जसे भावंडांशी, मित्रांशी घरातल्या घरात खेळायच्या अनेक खेळांसाठी आपल्याला आठवते, तसेच याच मंडळींना चिडवण्यासाठी, खिजवण्यासाठी, भांडण उकरून काढण्यासाठी हमखास वापरायच्या अनेक युक्त्यांसाठी पण आठवते. त्यातली एक म्हणजे कापुसकोंड्याची गोष्ट. ही आपण लहान असतांना आपली भावंडे आपल्यावर वापरतात. आपण थोडे मोठे होताच आपण आपल्या लहान भावंडांवर वापरतो. आजकाल हे कोणाला समजायला कठिण जाईल कारण इतकी पुरून उरणारी भावंडांची संख्याच नसते. पण आम्ही 'हम सात सात है' असल्यामुळे कापुसकोंड्या आमच्या घरी बरेच वर्ष राहिला. अगदी घरच्यातला. आताही तो आठवणीत आहेच. ह्या पुस्तकाच्या शीर्षकाचा जनकही तोच आहे.

ज्याला चिडवायचे आहे त्याला साळसूदपणे जाऊन विचारायचे 'कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?'. तो 'सांग' म्हणेल बापडा. गोष्ट कोणाला आवडत नाही? आपण मग म्हणायचे 'सांग काय म्हणतोस? कापुसकोंड्याची गोष्टं सांगू?'. तो भोळा जरासा चिडून म्हणेल 'सांग नं'. आता आपण म्हणायचे 'सांग नं काय म्हणतोस? कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?'. तो अधिकच चिडेल, काहीतरी म्हणेल, समजा xxx. आपण तेवढेच लक्षात ठेवायचे व पुन्हा 'xxx काय म्हणतोस, कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?' म्हणायचे, and so on. शेवटी तो चिडतोच चिडतो. शहाणा असेल तर मात्र तोही जितकेदा तुम्ही विचाराल तितकेदा 'सांग' म्हणतो. शेवटी दोघांत जो ज्यास्त चिडका असेल तो चिडतो. एकदोनदा माझ्यावर प्रयोग झाला. मग मी 'कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?' असे विचारले की 'कापूसकोंड्याची गोष्ट सांगू असे काय म्हणतोस? कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?' असे म्हणून लगाम आपल्या हातात घेतले. असो!

लहानपण गेलं, मोठा झालो, पण कापुसकोंड्याची गोष्ट मात्र कोणी सांगितलीच नाही. पण बऱ्याच उशिराने साक्षात्कार झाला की, अरे! आपल्या सभोवती कापुसकोंड्याच्या गोष्टींचच तर श्रवण कथन नित्य सुरू असतं. देवळात, मठात, कीर्तनात, प्रवचनात, सभात, शिबिरात, खाजगीत, लोकांत, भाषणात, राजकारणात, बातम्यात, लेखात, लग्नात, मुंजीत, श्राद्धात, कार्यात, सत्संगात, पेपरात, धारावाहिकात, सतत कानीतोंडी कापुसकोंड्याच्याच गोष्टी तर सुरू असतात. ह्या गोष्टींनीच तर जग व्यापलेलं आहे. आपण ह्या गोष्टी जीवेभावे ऐकतो, ऐकवितो. विश्वास ठेवतो. हा साक्षात्कार झाला आणि ह्या अमोल गोष्टी पुढच्या पीढीकरिता संकलित करायचा संकल्प केला.

आज सुरुवात करायला आणखी एक कारण आहे. आज आमच्या लहान बहिणाबाई, वृंदा आमोद देव, ज्यांना मी लहानपणी कापुसकोंड्याच्या गोष्टीनी हैराण केले, ती साठी ओलांडते आहे. २-१२-१९५५ ला ती माझ्या पाठीवर पाय देऊन आली. अजूनही L4-L5 त्रास देतात. आजपासून मात्र 'कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?' विचारता ती जेंव्हा जेंव्हा 'सांग' म्हणेल तेव्हा तेव्हा मी आढेवेढे न घेता सांगणार आहे. पापक्षालन!

खरे म्हणजे कवीने व कथाकाराने अशी संधी सोडू नये. 'कापुसकोंड्याची कविता वाचू?' विचारता जर कोणी 'वाच' म्हणत असेल तर पडत्या फळाची आज्ञा समजून सुरू व्हावे. हा चिडविण्याचा लहानपणच्या युक्तीपेक्षा ज्यास्त जालीम उपाय आहे असे मी अनुभवाने सांगतो. ह्या पुस्तकातील गोष्टी वाचून तुम्हाला प्रत्यय येईलच म्हणा.

हे पुस्तकही एक कापुसकोंड्याची गोष्टच आहे. याला अंत नाही. गोष्टी हळूहळू आपआपल्या लिंकवर येतील. येथूनच माझा आधीचा कवितासंग्रह 'बालवेद' कडे जाण्याचा मार्गही दिला आहे. तेथून बाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त काढलेल्या स्मरणिकेकडेही जाता येईल. बाबांच्या साहित्यसंपदेकडे जायला 'सदाशिव साहित्य' लिंक उपयोगी पडेल. सर्व सवडीने वाचावे. अभिप्राय जरूर कळवावा. तो कालांतराने 'प्रतिसाद' लिंकवर दिसेल.

वृंदा! कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?

सांग म्हणाली वाटते!


अरुण सदाशिव मोहरीर
२-१२-२०१५
amoharir@iitb.ac.in


कापुसकोंड्या

  गोष्ट पहिली
  गोष्ट दुसरी
  गोष्ट तिसरी
  गोष्ट चवथी
  गोष्ट पाचवी
  गोष्ट सहावी
  गोष्ट सातवी
  गोष्ट आठवी
  गोष्ट नववी
  गोष्ट दहावी
  गोष्ट अकरावी
  गोष्ट बारावी
  गोष्ट तेरावी
  गोष्ट चौदावी
  गोष्ट पंधरावी
  गोष्ट सोळावी
  गोष्ट सतरावी
  गोष्ट अठरावी
  गोष्ट एकोणवीसावी
  गोष्ट वीसावी
  गोष्ट एकवीसावी

प्रतिसाद

स्मरणिका

बालवेद

सदाशिव साहित्य

No comments:

Post a Comment