Friday, 13 May 2016

गोष्ट एकोणवीसावी


नारद: काय ब्रह्माजी? बरेच दिवसांनी पुन्हा रात्रभर काँप्यूटरवर बसले होता वाटते. सारखा माऊस क्लिक केल्याचा आवाज येत होता म्हणून विचारले.

ब्रह्मा: हो रे. पुराणे वाचून वाचून वाचनाचाच वीट आला होता. म्हणून वाचनसुट्टी घेतली. पण आजकाल तू नवे काहीतरी सांगतोस, नवे काहीतरी वाचायला प्रवृत्त करतोस, म्हणून मग पुन्हा वाचनाची सवय लागते आहे. काल रात्री बऱ्याच झेन कथा वाचल्या. टीचभर कथा असतात, पण विचार करायला लावतात. छान वाटते वाचतांना.

ना: ब्रह्मा, ह्या कथा म्हणजे खरे तर कोडे असतात. नक्की काय सांगायचे ते स्पष्ट केले नसते. उत्तर नक्की कोणत्या वाटेने गेले म्हणजे मिळेल ते सांगितले नसते. विचार करता करता अचानक पळभर वीज चमकते आणि घनदाट अरण्यात घनघोर रात्री सभोवताल असलेल्या गुंतागुंतीच्या पायवाटा क्षणभर उजळून जातात. पुन्हा काळोख. गोष्ट संपते. नंतर आपल्या मनाची जशी घडण असेल तशी आपली पावले अंधारात वाट धुंडाळतात. कोणी कुठे पोहोचतो, कोणी कुठे. प्रत्येकाला मिळणारे उत्तर वेगवेगळे. मग जाणवते की उत्तर महत्त्वाचे नव्हतेच मुळी. उत्तर मिळवितांना केलेला प्रयत्न, चाचपडलेली वाट उत्थान करून जाते. गंतव्यापेक्षा प्रवास महत्त्वाचा. मोक्षापेक्षा मोक्षपथ महत्त्वाचा. ही खरी आध्यात्मिक उन्नती. नाहीतर आहेतच पोथीपुराणे आणि पारायणे, गुरुमंत्र आणि विष्णुसहस्रनाम.

ब्र: हं. खरेच. झेनकथा वाचताना मला पदोपदी याचा अनुभव आला. असे पुराण वाचताना झाले नाही कधी. कां कोण जाणे. 'अंधकाला हजार शीरे असतील तर असतील. मला काय घेणे देणे?' अशीच माझी वृत्ती व्हायची. पण या अनाध्यात्मिक पौरुषेय कथा वाचतांना खरेच मजा आली. कथा संपून जायची, पण प्रश्न उमटतच जायचे. लाडू संपून जायचा पण विलायचीची चव जीभेवर रेंगाळतच राहायची. एक मिनिटाची कथा, पण एक तास विचार करायला लावायची. कथाकोडे. व्वा! कोडे सोडवण्यात खरेच आनंद असतो रे नारदा.

ना: ठीक तर. तू आता मानव व्हायला लागला आहेस. बुद्धीचा सतत वापर करण्यातली मजा तुला कळायला लागली आहे. ब्रह्मा, म्हणशील तर आजही आपण काही कोडी सोडवू. झेनकथा म्हणजे अध्यात्मिक कोडी म्हण वाटल्यास. पण कोडी गणिताची पण असू शकतात. तर्कशास्त्राची पण असू शकतात. काय? सोडवायची का काही कोडी? व्हायचे का आणखी थोडे मानव? आपली बुद्धी उत्क्रांत होऊन आपणही मानव होऊ शकतो. देवत्वापलिकडची ती पायरी आहे ब्रह्मा. चढायची का?

ब्र: अरे हो. पण मला जमेल का हे? मला कोड्यांची उत्तरे मिळतील का?

ना: अरे, एकदम नाही तरी हळूहळू जमेल आपल्याला. बुद्धीचे दालन उघडेल हळू हळू. आपली काही परीक्षा थोडीच आहे. चुकले उत्तर तर चुकले.

ब्र: बरे बाबा. जशी तुझी इच्छा.

ना: ब्रह्मा, बघ. समोरची टोपली पाहून मला एक कोडं सुचलं. टोपलीत बघ अकरा संत्री आहेत. नागपुरी संत्री. लाजवाब. ती तुझी आहेत असे समज. ती संत्री तुला समोरच्या त्या अकरा मुलांना प्रत्येकी एक अशी द्यायची आहेत. पण तरीही एक संत्रे टोपलीत असायला हवे. विचार कर. आणि सांग कसे करशील ते.

ब्र: नारदा, तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! अरे असं कसं शक्य होईल? टोपली म्हणजे काही द्रौपदीचं पात्र नाही. मी काही देव नाही.  त्यामुळे मी लबाडी पण करू शकत नाही. अकरा संत्री वाटलीत की टोपलीत काय राहील?

ना: ब्रह्मा, असे सोडून देऊ नये. प्रयत्न करावा. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात. तू स्वत:च परमेश्वर आहेस म्हणा. पण तुला मानव व्हायचे आहे. बुद्धिमान मानव. म्हणून प्रयत्न कर. प्रयत्नांती मानव!

असे कर, मी एकटाच अकरा आहे असे समज. मी रिकामा हात पुढे केला की एक संत्रे देत जा. असे मी अकरादा करतो. दिलेले संत्रे बाजूला ठेवून देत जाईन. हं, सुरू कर. डोके पण सुरू ठेव. ते बंद व्हायला नको. मानवत्व प्राप्त करायचे असेल तर कितीही शिणले तरी डोके बंद व्हायला नको. दे या हातात एक संत्रे. हं. आता दुसरे. तिसरे. छान. आता चौथे, पाचवे, सहावे, सातवे, आठवे. मोज किती उरले आहेत ते टोपलीत. एक, दोन, तीन. हं, आता दे पुन्हा. नववे, दहावे. आता थांब. विचार कर. विचार कर. आता कर काय करायचे ते. हा बघ मी हात पुढे केला. घाई नको. विचार कर. एक हात, एक संत्रे, टोपली. टोपलीत एक संत्रे हवे. मला एक द्यायला पण हवे. खाजव डोके. आणि कर काय ते.

ब्र: अरे चोरा! आता समजले मला. घे हे टोपलीसकट एक संत्रे. बस धरून.

ना: शाबाश ब्रह्मा. मी नेहमीच म्हणतो की तू खूप हुशार आहेस. तू नक्की मागच्या जन्मी मानव असला पाहिजे. बघ कसे कोडे सुटले ते. आता हे दुसरे कोडे बघ.

ते बघ टेबलवर दुसऱ्या टोपलीत बरोबर बारा चिक्कू आहेत. काकाकाकूंकडे फळांची नेहमीच रेलचेल असते. आता असे बघ, तुला प्रत्येकी एक असे हे चिक्कू बारा मुलींमधे वाटायचे आहेत. पण एक चिक्कू तरीही टोपलीत असायला  हवा. सांग कसे करशील ते.

ब्र: हेऽ हेहेऽ हेहेहेऽ हेहेहेहेऽ

ना: अरे हासतोस काय असा? ही तर अमोलची हासण्याची स्टाईल झाली. छान. तुला आता मानवांच्या हासण्याच्या तऱ्हा पण यायला लागल्या. मल्टीस्टोरीड हासता यायला लागले तुला.

ब्र: नारदा! हासू नको तर काय करू? अरे संत्र्याऐवजी चिक्कू, अकरा संत्र्यांऐवजी बारा चिक्कू, अकरा मुलांऐवजी बारा मुली असे बदल केले म्हणून कोडे बदलते का? कोड्याचा आत्मा तोच. फक्त वेष बदलला. तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

ना: ब्रह्मा, छान! अशीच गम्मत केली रे. अरे शाळांमधे आजकाल असेच करतात. वर्गात एक प्रश्न शिकवतात. आणि मुले नापास होऊ नये म्हणून परीक्षेत तोच प्रश्न असेच जुजबी बदल करून विचारतात. तरी पण काही विद्यार्थी असे असतात की त्यांना काही ते कळत नाही. नर्मदेचे गोटे असतात ते. पुजेतल्या शाळिग्रामासारखे गुळगुळीत. अशी मुले मग परीक्षा झाली की निकाल लागेपर्यंत देवळात जातात. पास झाले की मग जन्मभर भाविक होतात. असो. आता दुसरे कोडे. आहेस तयार?

ब्र: हो हो. सांग. गंमत येते आहे. अहं ब्रह्मास्मि!

ना: ब्रह्मा, तो बघ तिसऱ्या टोपलीत द्राक्षाचा घडचा घड ठेवला आहे. आणि समज दहा मुले रांगेने तुझ्यासमोर मोठ्या आशेने उभी आहेत. पहिल्या मुलाला तू एक द्राक्ष दे. दुसऱ्याला दोन. मग तिसऱ्याला तीन, अन् चौथ्याला चार. पाचव्याला पाच, अन सहाव्याला सहा. असे करत करत द्राक्ष तू वाटत गेलास आणि दहाव्याला बरोबर दहा द्राक्षे दिली आणि जर टोपलीतली सारी द्राक्षे संपली, तर घडाला किती द्राक्षे होती?

ब्र: पंचावन्न.

ना: असे कसे तुला झट्टदिशी, पट्टकिन्या उत्तर मिळाले रे?

ब्र: अरे मी वाटता वाटता मोजत गेलो. पंचावन्न भरले.

ना: व्वा. पण मग रांगेत शंभर मुलीमुले असली आणि तू असेच वाटत गेलास तर शंभर मुलांना वाटायला तुला किती द्राक्षे हवी? बिलकुल बोटावर मोजायचे नाही. न मोजता सांग किती ते.

ब्र: नारदा, मग कठिण आहे रे बाबा. पण अंदाजे पाच हजार वगैरे व्हायला हवेत.

ना: ब्रह्मा, गणितात अंदाज नको. उत्तर पक्के हवे. ब्रह्मा, ही मानवजात सतत अंकगणित सोडवत असते. हिला अंकांचे आकर्षण फार पूर्वी पासून आहे. व्यसनच आहे म्हण ना. १, २, ३, ४, ५, ६ .... ही एक शृंखला आहे. अंकशृंखला. नंबर सिरीज. या शृंखलेला अंत नाही. ही अनंत आहे. इंफायनाइट सिरीज. ही जेथे संपते ती इन्फिनिटी. अमित, अपरिमित, अमाप, अनंत, अन्तहीन. तेथून मग पुढे स्वर्ग सुरू होतो असे नास्तिक सुद्धा मानतात. अंतहीनतेच्या पल्याड स्वर्ग. ह्या अंकांच्या अनंत शृंखला म्हणजे स्वर्गाला जायचे जणू रस्तेच. स्वर्गप्राप्तीकरिता आस्तिक तर प्रयत्न करतातच. पण अशा इन्फिनिटीचा शोध सारेच नास्तिकसुद्धा घेत आहेत. अनादि काळापासून हा अनंताचा शोध मानवाला आहे. आणि तो सुरूही राहणार आहे.

ब्र: निरुपणकार, पण शंभर मुलांना द्यायला किती द्राक्षे हवीत ते कसे ठरवायचे? ते सांगायलाही तुम्ही मला अनंत काळ वाट पाहायला लावणार की काय?

ना: अरे हो, ते राहिलेच. ह्या स्वर्गप्राप्तीच्या ध्यासापायी पाय जमिनीवर टिकतच नाहीत बघ. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतो आपण. असो.

तर ब्रह्मा, तुला विचारलेला प्रश्न थोडक्यात असा की एक ते शंभर अंकांची बेरीज किती? ब्रह्मा, याचा एक साधा फाॅर्म्युला असतो. पहिल्या क्ष अंकांची जर बेरीज हवी असेल तर ती क्ष गुणिले (क्ष+१) भागिले दोन अशी करायची. तुझा क्ष १०० आहे. म्हणून मग बेरीज १०० गुणिले १०१ भागिले २ येईल. म्हणजे १०१०० भागिले २ म्हणजे ५०५०. तपासून बघ वाटल्यास. मोज बोटावर तुझ्या पद्धतीप्रमाणे.

ब्र: नारदा, मी आधीच मनातल्या मनात मोजून पाहिले पण. ५०५० आले देखील. पण हा फाॅर्म्युला फार मस्त हं. एक ते दहा ची बेरीज १० गुणिले अकरा भागिले दोन. म्हणजे ५५. एक ते शंभरची बेरीज ५०५०. एक ते हजारची बेरीज ५००५००. एक ते दहा हजारची बेरीज ५०००५०००. नारदा, याचा हा म्हणजे ... आपला म्हणजे ... तो म्हणजे खूपच सुंदर आहे रे.

ना: आले लक्षात ब्रह्माजी. घडण, म्हणजे पॅटर्न खूप सुंदर आहे असे म्हणायचे आहे तुला. ब्रह्मा, पॅटर्नची तुला रे काय नवलाई? तुझी सृष्टी म्हणजे पॅटर्न्सची शोरूम आहे. तू निर्माता असल्यामुळे तुला त्याचे कौतुक नसेल. पण तुझ्या विविध विस्मयकारी साचेबद्ध घडणीचा मानव नेहमीच प्रशंसक असतो. फूल असो की फुलपाखरू, तुझा कुंचला अफाट आहे. आणि तुझ्या कलाकृतींचे आणि त्यात अभिप्रेत असलेल्या तुझ्या निर्माणकौशल्याचे चित्रण तो नेहमीच करीत असतो. आज रात्री ह्या एक दोन लिंक्सवर जा आणि बघ. तूच आश्चर्यचकित होशील.

https://m.youtube.com/watch?v=IGKLZ3NO9Qk

https://m.youtube.com/watch?v=u_CaCie8R4U

आणखीही तुझेच जग तुला पहावेसे वाटले तर गूगलवर patterns in nature सर्च कर. वेळ कसा जाईल ते कळणार नाही. कसे काय तुला हे जमते हे मला सुद्धा कळत नाही.

ब्र: कर, कर थट्टा! पण पाहीन मी ते व्हिडिओज. आज रात्री तोच उद्योग. पण निसर्गाचा आणि गणितातील पॅटर्न्सचा काय रे संबंध? असे पाहता पाहता आपल्या साध्या कोड्यात ५५, ५०५०, ५००५००, ५०००५०००, ५००००५०००० असे पॅटर्न्स कसे येतात? पॅटर्नमधे देव आहे की देवामधे पॅटर्न आहे.

ना: ब्रह्मा, आकाशगंगा असो की सूर्यमाला असो, जीव असो की जंतु असो, अणू असो की रेणू असो. सर्वत्र पॅटर्न्स् असतात. गणितात तर ते पदोपदी असतात. वाड्यातला बाळ पॅटर्न थिअरी वर सतत काम करीत असे. कागदावर आडव्या उभ्या रेघा काढीत असे. पण ते गणितातले, विज्ञानातले पॅटर्नस्. गणितातले पॅटर्न्स् निसर्गातही सापडतात. निसर्गाची अनेक रहस्ये पॅटर्न्सच्या आकलनामुळे मानवाला कळली. नास्तिकसुद्धा गणितेश्वराचे भक्त असतात बरे ब्रह्मा. असो.

ब्रह्मा, आता पुढचे कोडे.

तुझ्यासमोर लांबच लांब मुलांची रांग आहे असे समज. अनंत शृंखला. इन्फायनाईट सिरीज. दुसरे टोक तुला दिसत नाही. पण आता तुला एक काम करायचे आहे. टेबलवरचा साखरेचा डबा घेऊन साखर या मुलांमध्ये वाटायची आहे. पहिल्याला एक दाणा. दुसऱ्याला पण एकच दाणा. आता तिसऱ्याला त्याच्या आधीच्या दोघांना मिळून जितके दाणे दिले तितके दाणे द्यायचे. म्हणजे एक अधिक एक म्हणजे तिसऱ्याला दोन दाणे द्यायचे. चौथ्याला त्याच्या आधीच्या दोघांना मिळून दिले तितके द्यायचे. एक अधिक दोन म्हणजे तीन. मग असेच करीत जायचे. प्रत्येकाला त्याच्या आधीच्या दोघांना मिळून दिले तितके दाणे द्यायचे. सांग आता पहिल्या दहां मुलांना मिळून तू किती दाणे देशील ते. कर बोटांवर वाटल्यास.

ब्र: हं. १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५. एकूण एकशे त्रेचाळीस साखरेचे दाणे वाटावे लागतील. मजा आली.

ना: ब्रह्मा, साखरेचे पंधरा दाणे म्हणजे अंदाचे एक ग्रॅम साखर होते. म्हणजे, दहा मुलांमध्ये तू अंदाजे जेमतेम दहा ग्रॅम साखर वाटशील. आता सांग, वीस जण रांगेत असतील तर?

ब्र: पहिल्या दहांना आधीप्रमाणे १४३ दाणे. नंतरच्या दहांना ८९, १४४, २३३, ३७७, ६१०, ९८७, १५९७, २५८४, ४१८१, ६७६५. म्हणजे एकूण वीस जणांना मिळून ... एकूण ... म्हणजे ... खूपच दाणे रे. सोळा हजार वगैरे होतील. म्हणजे अंदाजे एक किलो साखर. इतकी साखर तरी आहे का डब्यात? जाऊ दे ना. उगीच साखरेची नासाडी. पुढचे कोडे सांग.

ना: अरे वा, असे कसे? नुसते वीस जण रांगेत आले तर तू कोलमडलास. अरे तू फुकट साखर वाटतो आहेस हे कळले तर १३० कोटी लोक रांगेत उभे राहतील. तू परमेश्वर आहेस. त्यांना निराश करशील का?

बरे असू दे. ही शृंखला म्हणजे मारुतीचे शेपूट आहे. फार वेगाने वाढते. आपल्याला हे कोडे सोडवायला काँप्यूटर वापरावे लागेल. एखाद्या दिवशी काकाकाकू भागवताला गेले की मी तुला शिकवीन. आपण एक एक्सेलशीट बनवू. ती पटकन उत्तर देईल आपल्याला या बेरजांचे. वीस जणांना १७७१० साखरेचे दाणे वाटशील तू. एक किलोपेक्षा थोडी जास्तच साखर. तीस जण रांगेत असतील तर २१७८३०८ दाणे. जवळजवळ दीडशे किलो साखर. शंभर जण असतील तर किती साखर हवी जरा अंदाज कर बघू. बरे ते राहू दे. शंभराव्या मुलाला किती साखरदाणे देशील तेवढेच सांग.

ब्र: अंदाजाच्या पलिकडे आहे रे.

ना: हं. राहू दे. पण शंभराव्याला ३५४२२४८४८१७९२६१९१५०७५ साखरेचे दाणे मिळतील असे मी वाचले. म्हणजे त्याला एकट्यालाच अंदाजे २३६०००००००००००००० किलो साखर मिळेल. शंभरांना मिळून जवळजवळ ६१८०००००००००००००० किलो साखर तुला वाटावी लागेल. एकूण किती दाणे वाटले ते मोजता मोजता तुझा सुद्धा जन्म जाईल. कल्पांत!

ब्रह्मा, ही जी अंकशृंखला आहे ही खूप प्रसिद्ध आहे. साधारण आठशे वर्षांपूर्वी फिबोनाची नावाच्या जंबुद्वीपबाह्य वैज्ञानिकाने हिचा शोध लावला व ही शृंखला फिबोनाची सिरीज म्हणून प्रसिद्ध झाली. नवल असे की कळ्या, फुले, पक्षी, प्राणी, शंख, शिंपले, जीव, जंतू काहीही घेतले तरी त्यांच्या घडणीत या सिरीजचे प्रतिबिंब आहे. ही सिरीज फुलांच्या पाकळ्यात आहे, सूर्यकमळात आहे, चक्री वादळात आहे. ही आकाशगंगेत आहे. ही हस्तरेषांमध्ये आहे, ही सुदर्शनचक्रात आहे. तुझ्या सर्व निर्मितीत ही सिरीज व ही वापरून काढता येईल असे फिबोनाची चक्र किंवा आवर्त किंवा स्पायरल आहे. ही सिरीज, ही शृंखला तुझे गुपित होते, पण आता ते मानवाला माहीत आहे.

ब्रह्मा, फिबोनाची स्पायरल मी समजवून सांगण्याऐवजी ही लिंक तू बघ.

https://m.youtube.com/watch?v=nN9gcaQPTVk

हे फिबोनाची स्पायरल किंवा गोल्डन स्पायरल सर्वत्र आहे. तू हे फळ्यावर सुद्धा काढू शकतो. ह्या सिरीजवर आणि ह्या स्पायरलवर जितके संशोधन झाले तितके दुसऱ्या कुठल्याही विषयावर झाले नाही. हे स्पायरल कसे काढायचे बघ आणि मग फळ्यावर काढून बघ. नंतर तुलाही ते तुझ्या सृष्टीत सर्वत्र दिसायला लागेल.

सध्या आणखी एक लिंक बघ.

https://www.inspirationgreen.com/fibonacci-sequence-in-nature.html

फिबोनाची नंबर्स, म्हणजेच Fibonacci Numbers म्हणून गूगलवर सर्च करशील तर असा काही खजिना उघडेल की तू थक्क होशील. फिबोनाची सिरीजचे करोडो भक्त जगभर आहेत. ही सिरीज म्हणजे अफलातून आहे. ही देव आहे. हिची स्तुती करतांना लोक थकत नाहीत. गणित न आवडणाऱ्यांना, गणितातल्या नास्तिकांनाही गणितातली ही शृंखला वेड लावते. मंत्रमुग्ध करते.

https://m.youtube.com/watch?v=SjSHVDfXHQ4

ह्या सिरीजवर आणखी वाचन करशील तर गणितब्रह्म म्हणजे काय हे तुला कळेल. निसर्गाचे कोडे उलगडणारी ही शृंखला आहे. सुवर्ण शृंखला. आणखी काय सांगू?

ना: किती काम देतोस रे? तू पद्धतशीर मला पुराणांपासून दूर नेत आहेस. पण मलाही हे सारे वाचायला आवडेल. आणि कोडे सोडवायला पण. पण आता ही सिरीज सोड. गणिती कोडे सोड. एखादे फळ्यावरचे कोडे सांग. भूमितीचे. मानवाच्या हुशारीचे कोडे. नारदा, मला पण त्याच्यासारखे हुशार व्हायचे आहे रे.

ना: बरे बाबा, दुसरे कोडे. ब्रह्मा, तुला आठवत असेल तू एकदा फळ्यावर काटकोन त्रिकोण, चौकोन काढले होते. नंतर आपण पायथॅगोरसचे प्रमेय शिकलो होतो. आठवतो का तो श्लोक भागवतातला?

भुजकोटिकृतियोगमूलं कर्णश्च दोर्भवेत्
श्रुतिकृत्यन्तरपद कोटिर्दोः कर्णवर्गयोः

फूटपट्टी घेऊन आपण त्या प्रमेयाचा पडताळा पण घेतला होता. आजचे कोडे पण असेच भूमितीचे आहे. वाटल्यास खडू फळा वापर. काकाकाकू घरात नाहीत म्हणून म्हणतो. तर ब्रह्मा, तुला एक आठ इंच लांब व तीन इंच रुंद लाकडी फळी दिली आहे असे समज. या फळीचे तुला वाटेल तसे दोन तुकडे करून, ते तुला वाटेल तसे जोडून बारा इंच लांब व दोन इंच रुंद अशी फळी तयार करायची आहे. सांग कशी करशील ते.

ब्र: थांब, काढून बघतो. ही झाली आठ बाय तीन ची फळी. ही आता दोन तुकड्यात विभागायची. आणि दोन तुकडे  जरा वेगळ्या पद्धतीने जोडून असा बारा बाय दोन चा काटकोन चौकोन करायचा. आठ गुणिले तीन चोवीस. बारा गुणिले दोन पण चोवीस. म्हणजे क्षेत्रफळ सारखेच. म्हणजे तू म्हणतो तसे करणे शक्य आहे. पण तू दोनच तुकडे करायचे म्हणतो म्हणून जरा कठिण वाटते आहे. चार तुकडे करून सोपे आहे. उभे कापून लाकडी फळीचे दोन बाय तीनचे चार तुकडे केले असते आणि ते आडवे करून जोडले असते. काम झाले असते. पण तसे तुला नको आहे. करतो आणखी विचार. पण आता नाही. डोक्यात घोळू दे हे कोडे. मिळेल मला केव्हा तरी उत्तर. एकदम सुचत नाही आहे.

पण नारदा, आता तू मला आणखी एक कोडे विचार. अंकगणित नको. भूमिती पण नको. वेगळेच काही तरी. ते बर्फशास्त्र की काय म्हणतो ते.

ना: अरे बर्फशास्त्र नाही, तर्कशास्त्र. लाॅजिक, लाॅजिक. जे काँप्यूटरवर नाही सोडवता येत ते. जे फक्त मानवच डोके वापरून सोडवू शकतात ते. सोडवतो असे एक कोडे? ऐक तर. काळजीपूर्वक ऐक. तुझीच गोष्ट आहे ही.

ब्रह्मा, समुद्रमंथन वगैरे आटोपून, दैत्यांचा कायमचा बंदोबस्त करून, अमरत्व देणारे अमृत हस्तगत करून तू ब्रह्मपुरीला परत आला तेव्हाची ही गोष्ट. आता विश्वात फक्त देव आणि मानव उरले होते. दानव पूर्ण चीत झालेले. पुन्हा देवांवर संकट नको म्हणून तू ब्रह्मपुरीला अभेद्य करायचे ठरविलेस. ब्रह्मपुरीच्या भोवताल खोल खंदक खोदून तू त्यात विषारी द्रव भरले व त्यातच वासुकीला पण सोडून दिले. आता ब्रह्मपुरीला सारे देव आणि खंदकापलिकडे मर्त्यलोक. तिथे त्या मानवांचा वास. तिथेच ते जन्म घेत. तिथेच मरत. ब्रह्मपुरी म्हणजे त्याकाळचा स्वर्गच. पण तिथे मानवांना मृत्यूनंतर पण प्रवेश नव्हता. काय करायचे ते करा आणि राहता तिथेच मरा असा मानवांविषयी देवांचा निर्णय होता. त्यामुळे पापपुण्याच्या कल्पना वगैरे पण नव्हत्या. देवलोकात, म्हणजे ब्रह्मपुरीत, व मानवलोकात अजिबात ये जा नव्हती. बरीच युगे लोटली. एक दिवस अचानक एक मानव ब्रह्मपुरीत इकडे तिकडे भटकतांना तुझ्या सैनिकांना सापडला. त्यांना आश्चर्य वाटले व ते लगेच त्याला ओढत फरपटत तुझ्या दरबारी घेऊन आले. तू तर विस्मयचकितच झाला. सिंहासनावरून तुझा तोल जाऊन तू तोंडबुचक्या पडणार तितक्यात एका दासीने तुला सावरले. तसा तू कसाही पडलास तरी तोंडबुचक्याच पडशील म्हणा. चारही बाजूला तुला तोंडे.

ब्र: नारदा, तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! अरे, चिडवू नको. पुढे सांग काय झाले ते.

ना: ब्रह्मा, तुला आता आला आहे त्यापेक्षाही कितीतरी पटीने ज्यास्त राग तेव्हा आला होता.  खंदक ओलांडून, वासुकीची नजर चुकवून एक यःकश्चित मर्त्य मानव ब्रह्मपुरीत येऊ शकतो ही कल्पनाच तुला पचेना. रागारागाने तू त्याला मृत्युदंड देण्याचे ठरवले. पण न्यायनिवाडा करण्याआधीच तू त्याची शिक्षा ठरवली हे तुला सलायला लागले. म्हणून तू छद्मीपणाने त्याला म्हणालास 'मानवा, तुझा गुन्हा अक्षम्य आहे. मृत्युदंडाशिवाय तुझ्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा नाही. तरी पण मी तुला फक्त एक विधान करायची मुभा देत आहे. तुझे विधान जर खरे असेल तर मी तुला ऐरावताच्या पायी देईन. ते जर खोटे असेल तर उच्चैश्रवाच्या शेपटीला बांधून ब्रम्हपुरीभर तुला फरफटत ओढल्या जाईल, मरेपर्यंत. आता कर तुझे विधान.

ब्र: हे रे काय नारदा? एवीतेवी त्याचा मृत्यु अटळ आहे. ऐरावताच्या पायी दिले काय किंवा उच्चैश्रवाने फरफटत ओढले काय! मरण येणारच. मृत्युदंड मिळणारच. हा फारच दुष्टपणा झाला हं. आणि त्याचा गुन्हा काय तर तो चुकून ब्रह्मपुरीच्या जमिनीवर आला. असो. देवांनीच असे केल्यावर कोण काय म्हणणार?

ना: ब्रह्मा, पण तुझी गाठ मानवाशी होती हे तू विसरलास. त्या मनुपुत्राने असे काही विधान केले की त्याची सुटका तुला सुद्धा करावी लागली. नाही तर तू खोटा ठरला असतास. त्याला पुन्हा मृत्युलोकात सोडण्यात आले. तेव्हापासून तुला बुद्धिमान मानवाबद्दल फार कुतुहल असते. बराचसा आदरही. म्हणूनच तर तू आपली ब्रह्मपुरी सोडून वरातगंगा घेऊन येथे आलास.

ब्र: अरे, असे कसे शक्य आहे? सुटू कसा शकेल तो? असे काय विधान केले त्या मनुपुत्राने की तो मृत्यूच्या मगरमिठीतून सुटू शकला?

ना: ब्रह्मा, तेच तर कोडे आहे. उत्तर तुला सांगायचे आहे. तूच सांग तो काय म्हणाला असेल ते.

ब्रह्मा, मानव खरेच अद्भुत आहे. तू त्याला बुद्धी दिली त्याचा त्याने पुरेपूर उपयोग केला. तो विचार करतो. बुद्धिप्रामाण्य हा त्याचा स्थायी भाव झाला आहे. असे म्हणतात की आणखी पंचवीस वर्षांनी या विश्वात बुद्धिप्रामाण्यवादी बहुसंख्य होतील. पन्नास टक्क्यापेक्षाही ज्यास्त. तसे एकदा झाले की आई आणि बाबा या दोघांतील एक तरी नास्तिक असण्याची शक्यता खूपच वाढेल. तसे झाले की बालवयातच मुलामुलींना अंधश्रद्धेचे, आस्तिकतेचे बाळकडू पाजण्यात येणार नाही. नवीन पिढीत प्रश्न विचारण्याची हिंमत येईल. आस्तिकांचे पीक कमी येईल. तसे झाले म्हणजे वेगाने बाकीही सारे आस्तिक मृगजलामागे वेड्यासारखे धावणे सोडतील. नंतर मानवजातीची जी प्रगती अपेक्षित आहे ती अमर्याद राहणार आहे. मानवप्रगतीची शृंखला तशीही अनंत आहे. ब्रह्मा, प्रगती खरे म्हणजे पूर्वापार सुरूच आहे. आताही होत आहे. पण ही प्रगतीशृंखला फिबोनाची सिरीजसारखी आहे. जसजसा मानव प्रगतीच्या पायऱ्या चढेल तसतसा प्रगतीला अफाट वेग येणार आहे.







१३
२१
३४
५५
८९
१४४
२३३
३७७
६१०
९८७
१५९७
२५८४
४१८१
६७६५
१०९४६
.
.
.
८३२०४०
.
.
.
१२५८६२६९०२५
.
.
.
३५४२२४८४८१७९२६१९१५०७५
.
.
.

ब्रह्मा, त्या फिबोनाची प्रगतीच्या चक्रीवादळाची चाहूल जंतुकवीच्या एका कवितेत मला जाणवते. हेच मानवाचे अटळ भविष्य आहे ब्रह्मा. हा प्रगत मानव मग पुन्हा नव्याने आपली कल्पना करेल. पुन्हा नवे साहित्य निर्मेल. आणि कदाचित आपल्यावर न्याय करेल.

चंदनाचे खोड घासत घासत जन्म गेला
खोड संपून गेले आणि पारीस सुद्धा झिजला
चंदनाची चोळी नित्य लावुनी कपाळी
माळ हाती, जप ओठी, तू नाही आला
कां रे तू रुसला?
कसा तू रुसला?

सत्यनारायण वर्षाला कधी नाही चुकला
तीन अध्यायाची कथा, पूर्ण विश्वास ठेवला
कळ्या फुले पाने तोडून झाड बोडखे केले
पत्रं पुष्पं फलं तोयं साग्रसंगीत झाले
तरी पुष्पक घेऊनिया कां रे नाही आला
कां रे तू रुसला?
कसा तू रुसला?

पाने पलटून पलटून साऱ्या पोथ्या जीर्ण झाल्या
डोळा फार दिसत नसे, तरी रोज वाचल्या
काना मात्रा विसर्ग आता ओठांवरती रुजले
डोळे मिटून बैल आता मार्ग कापू लागले
तेलघाणीची चाकोरी आंगवळणी पडली
तहान भूक विसरूनिया धावा तुझा केला
कां रे तू रुसला?
कसा तू रुसला?

सकाळी उठोनिया मी स्नान रोज केले
पाटावर तास तास पद्मासन केले
आचमनपळीने तळहाती शुद्धोदक घेऊन
फुर्र आवाजाने तेची जीभेवर नेले
ठसका लागे, जीव होई जरी वर खाली
दोन डझन नावे तुझी ओठी नित्य आली
एक तरी कधी चुकले का तू सांग मला
आतातरी धाव घेई, दावी मार्ग मला
कां रे तू रुसला?
कसा तू रुसला?

देऊळ एक सुटले नाही, एक घंटा नाही
शिवपिंड अशी नाही जिला स्पर्श नाही
एक हजार नावामधले एक सुटले नाही
सहस्रनाम जपासाठी पुस्तक पाहिले नाही
वीस आणि एक प्रदक्षिणा मोजून केल्या
तीर्थ जीभेला, डोळ्याला, भाळी नी डोक्याला
क्षणभर बूड टेके देऊळी मातीला
नंदीच्या कानामधे मी इच्छा व्यक्त केल्या
त्याचेच फक्त तू ऐकतो हे माहीत आहे मला
होऊ दे रे मनाजोगे, मागणे हे तुला
कां रे तू रुसला?
कसा तू रुसला?

सारी धामे, सारी तीर्थे, गड, दऱ्या, गुहा
काही काही सुटले नाही, चेक करून पहा
पूजा अर्चा ध्यान मंत्र गंगास्नाने केली
पाणी कसेही कां असो, देहशुद्धी झाली
शुक्ल कृष्ण पक्षी सारे, चैत्र ते फाल्गुनी
एक उपास चुकला नाही, हे तू घ्यावे मनी
एक व्रत असे नाही जे मी केले नाही
भोळा तू, दयाघना तू माहीत आहे मला
कां रे तू रुसला?
कसा तू रुसला?

आता जीव कासावीस, धीर माझा सुटला
आजच सकाळी मी माझा मार्ग बदलला
पहाटे बाहेरी गेलो, पूर्वमुखी झालो
आकाशाचा रंग पाहून रडू आले मला
लाल नारंगी पिवळ्या छटा आल्या गेल्या
दूर गगनाच्या नीळ्यामधे विखुरल्या
आता सारे लख्ख शुभ्र तेजोमय झाले
ओठी आता मंत्र नाही, ओठ दुरावले
काय ती आभा नभी जी कधी ना देखिली
होती गाभाऱ्याच्या थंड अंधारी लोपली
माझ्या तमोमय मनी कवडसा त्याचा
आज पहिल्यांदा पडे, असा रे मी कसा
आता मनी श्राप नाही, दंभ आता गेला
अहंकाराचा कापूर उडूनिया गेला
आता उघडली माझ्या मनाची कवाडे
आता कळे वेळ आतावरी व्यर्थ गेला
हाची एक जन्म होता, हीच होती संधी
भाग्य माझे आता तरी आली मला शुद्धी
ज्ञानाने उजळू दे रे जंगलेली बुद्धी
बोधिवृक्षछाया आता पुरे आहे मला
आता मला खंत नाही, मुक्ती नको मला
आता तुझे सत्य जरा कळू लागे मला
कां रे तू रुसला?
कसा तू रुसला?

_____________________


अनुक्रमणिकेकडे



No comments:

Post a Comment