गोष्ट अठरावी
ब्र: उठा कम्युनिस्ट, सकाळ झाली. नाश्त्याचा खमंग वास येत आहे. इडली सांबार आहे आज बहुतेक. रसगुल्ले पण असावेत असे वाटते.
ना: कम्युनिस्ट? हा शब्द तुम्हाला कोणी सांगितला? मी तर या शब्दाचा उच्चार पण कधी केला नाही. भारतवर्षात कम्युनिस्ट बिम्युनिस्ट नसतात बरे.
ब्र: अरे चुकला असेल शब्दप्रयोग. पण असाच काहीतरी शब्द तू सांगितला होतास मागच्या वेळेस. अरे ते नाही का, खोटं बोलणारे, काहीही ढाप मारणारे.
ना: ब्रह्मा, कठिण आहे रे बाबा तुझे! अरे ढाप नाही, थाप, थाप. ढापचा अर्थ वेगळा. थापा म्हणजे फोका. थापा मारणारा, फोका मारणारा तो फोकनाडिस्ट.
ब्र: ओहो! फोकनाडिस्ट. तेच ते. कम्युनिस्ट नाही, फोकनाडिस्ट. तरीच मला वाटत होतं की माझं काही तरी चुकत आहे. फोकनाडिस्ट. फोकनाडिस्ट. आता नाही विसरणार.
ना: बरे झाले मलाच कम्युनिस्ट म्हणालास. दुसऱ्या कोणाला म्हणाला असता तर पडली असती पाठीत ती कोपऱ्यातली लाठी. काका घेऊन जातात ती रविवारी सकाळी शाखेत की कुठेतरी. 'संघाची लाठी, कम्युनिस्टांच्या पाठी' अशी म्हण आहे नागपूर नगरीत. विळ्या भोपळ्यासारखे मधुर प्रेमसंबंध आहेत त्यांचे.
बरे, ते राहू दे. चल नाश्ता बघू. खास बेत दिसतो आहे आज. कोणी तरी येणार असेल नाश्त्याला. इडली आणि रसगुल्ले. कालपासून बेत शिजत होता. आपल्याला मात्र नुसतं दृष्टिसुख लाभेल. थोडसं अवघ्राणसुख पण. बाकी नाश्त्याचा नैवेद्य वगैरे नसतोच म्हणा. तू बघ थोडा वेळ इथेच उभा राहून. मी आलोच. हा असा गेलो आणि असा आलो.
काका: अग बघ जरा. बेल वाजली. भैय्याजी म्हणजे अगदी घड्याळ आहेत, घड्याळ. बरोब्बर आठाला हजर.
काकू: या या भैय्याजी. अगदी वेळेवर आलात. एकदम सुरू करू या यज्ञकर्म. आज अगदी स्पेशल बेत केला आहे बरें.
काका: हो म्हणजे, दोन डझन इडल्या अन् दोन डझन रसगुल्ले खाऊन दाखवीन असे म्हणालो होतो मी तुम्हाला. आज प्रात्यक्षिक आहे. आज मीच काय, आज तुम्ही सुद्धा खाऊ शकाल. या असे. बसा.
काकू: अहो भैय्याजी, हे म्हणजे अगदी फोकनाडिस्ट. सहज बोलता बोलता बोलून गेले की हे एका बैठकीत दोन डझन इडल्या अन् दोन डझन रसगुल्ले खातात म्हणून. पतीदेव खोटे पडू नयेत म्हणून आजचा हा बेत. मिनी इडली आणि अंगूरी रसमलाई. द्राक्षाएवढे लहान लहान रसगुल्ले पिळून बासुंदीत टाकलेले. पोटभर खा. मग निघू सारे अखंड भागवत सप्ताहाला. आज समुद्रमंथनाची कथा लागेल असं म्हणतात.
काका: छान. सहज गेले दोन दोन डझन नग पोटात. कळलेही नाही. तरीही पोट भरले असे वाटत नाही. वाड्यातले एका पेढ्याचे एकवीस मोदक आठवले. म्हणायला खूप, पण खरे म्हणजे एकच पेढा. अडजीभ खाते, आणि पडजीभ बोंबल्या मारते. चला आता. 'अथ श्री नारदपुराणे' ऐकायला.
ब्र: बापरे नारदा! कुठे जाऊन आलास रे? ते भैय्याजी आले होते. दहा पंधरा मिनिटात वीस इडल्या, वीस रसगुल्ले खाऊन गेले सुद्धा. सगळेच गेले. काका काकू पण. कुठेतरी भागवत पारायण आहे असे म्हणत होते. समुद्रमंथनाची गोष्ट लागणार आहे म्हणे आज. मी पण जाईन म्हणतो. तू नेहमी सांगतो सांगतो म्हणतो. पण तू काही ती गोष्ट कधी सांगशील असे वाटत नाही मला. कम्युनिस्ट कुठला.
ना: ब्रह्मा, अरे कम्युनिस्ट नाही. फोकनाडिस्ट. कितीदा सांगायचं? आणि काही नको जायला देवळात वगैरे भागवत ऐकायला. मी सांगीन कधीतरी ती सत्यकथा. तुझ्यापाशी अथ ते इति नारद खुद्द असताना तू देवळात ते 'नारद उवाच' वगैरे ऐकायला कां जावे म्हणतो मी.
ब्र: बरं राहिलं. नाही जाणार मी. पण तू थोड्या वेळापूर्वी गायब कुठे झाला होता?
ना: अरे मी आपलं ... म्हणजे ते नाही का... जिथे ते त्यांचं ... म्हणजे ते आपले ...
ब्र: बरं राहू दे. नको सांगू वाटल्यास. थोडासा अंदाज मला आला आहे. तरीच म्हटलं, तू गेला आणि नेमकी तेव्हाच बेल कां वाजली. बरं असू दे.
नारदा, किती सुंदर रे ती मिनी इडली अन् ते अंगूरी रसगुल्ले. अशाच चिटुकल्या मिटुकल्या गोष्टी कां असत नाहीत? मिनीकथा, अंगूरीकथा. द्राक्षकथा.
ना: ब्रह्मा, असतात. अगदी करंगळी एवढ्या गोष्टी असतात. अंगुरी रसगुल्ल्याची चव जशी दिवसभर जीभेवर रेंगाळत राहते तशाच ह्या गोष्टी. लहानश्या असल्या तरी बराच वेळ विचार करायला लावणाऱ्या असतात. ब्रह्मा, पेवंदी बोरेही असतात, आणि गावरानी शेंबडी बोरेही. कुठलाही खाणारा सांगेल गावरानी बोरांचा शेंबूड किती चविष्ट असतो ते. व्वा! अजूनही जीभेवर ती चव आहे. गेलो होतो एकदा असाच राधाबाई होऊन संक्रांतीच्या हळदीकुंकवाला वाड्यात. ओटीमधली ती अर्धवट वाळलेली, धुळीने माखलेली बोरे. व्वा. तशाच ह्या अंगूरी कथा पण असतात. माळरानावरची जंगली बोरे. ह्या अंगूरी रसगुल्ल्यांचे पण तसेच आहे. मिनी इडली तर काही विचारूच नकोस. उम्म्म्म्मा!
ब्र: तुला रे कशी रसगुल्ल्याची चव माहीत. तुला कसे माहीत अंगूरी रसगुल्ले होते म्हणून? तुला कसे माहीत मिनी इडली होती म्हणून? तू तर येथे नव्हतास नाश्त्याच्या वेळेस?
ना: अरे तूच आत्ता सांगितलेस. ते जाऊ दे. आज आपण काय करायचं ते सांग. काका काकू नाहीत आज. आपलं करमणुकीचं साधन नाही. नाही तर बरा वेळ जातो दिवसभर. आज मात्र घर खायला उठेल.
ब्र: नारदा, आपण आज १०-२० चिंटू गोष्टी ऐकायच्या का? तू सांग, मी ऐकतो. मलाही एखादी सुचली तर मी पण सांगतो. अंगूरी गोष्टी. गावरानी गोष्टी. शेंबड्या गोष्टी. मिनी गोष्टी. गोष्टीच गोष्टी.
ना: मेला कोष्टी. ब्रह्मा, अशा गोष्टी सांगायला मलाही आवडेल. पण अशा सानुल्या गोष्टी विचार मात्र खोल करायला लावतात बरें. प्रत्येक गोष्टीनंतर आपणही वाटल्यास चर्चा करू. पण फार नाही. चर्चेपेक्षा चिंतन फार महत्त्वाचे असते या अशा गोष्टींमधे. पण चिंतन करेल कोण? सारेच जण डोळ्याला पट्टी बांधून आंधळी कोशिंबीर खेळत असतात, आणि झाडाचा बुंधा जरी हातात आला तरी 'सापडला, सापडला, मला देव सापडला' म्हणून ओरडत सुटतात. काय म्हणावे या दुर्गतीला! पण त्यालाच ते positivity म्हणतात. म्हणोत बापडे!
ब्र: नारदा, मला सुद्धा हे चिंतन कठिण आहे रे. कठिण आहे. मला तर समजावून सांगितल्याशिवाय काही समजत नाही. पण बघतो प्रयत्न करून. आणा पहिले द्राक्ष.
ना: ब्रह्मा, एक असेच सिद्धपुरुष होते. फारच अबोल. अगदी मितभाषी. एक दिवस त्यांच्याकडे एक श्रीमंत माणूस आला. शिष्यच त्यांचा. सिद्धाला नमस्कार वगैरे करून म्हणाला, स्वामी, तुम्ही त्रिकालदर्शी आहात. माझे भविष्यसत्य थोडक्यात मला सांगावे, मी आतापर्यंत कधीही वाममार्गाने गेलो नाही. त्यामुळेच की काय, आजपर्यंत कधीही दु:ख फारसे पाहिले नाही. पण म्हणूनच मनात आजकाल अनिष्टाची पाल चुकचुकते. माझ्या भविष्यात काय आहे हे मला संक्षेपाने कथन करावे.
मितभाषी सिद्धाने एका पाटीवर लेखणीने काहीतरी लिहिले व पाटी शिष्याला दिली. 'सुखी रहा' असा आशिर्वादही ते पुटपुटले.
पाटीवर जे लिहिले होते ते वाचून शिष्याचा चेहरा खर्रकन उतरला. सिद्धाने पाटीवर लिहिले होते 'आधी तू मरशील, मग तुझा मुलगा मरेल, मग तुझा नातू मरेल.'.
ब्र: नारदा, अरे पुढे काय? असा अचानक थांबलास कां?
ना: ब्रह्मा, मी थांबलो नाही. गोष्ट सरली. अशाच असतात रे ह्या गोष्टी. संरून जातात. अरे द्राक्षच हे. दाढेखाली दबले की क्षणात रस निघून तोंड गोड करून जाते. मागे काही उरत नाही. बत्तीसदा चावायची गरज नसते अंगूरी गोष्टींना. तूच म्हणालास ना अंगूरी कथा सांग म्हणून?
ब्र: हे रे काय? ही काय कथा? आता मी पण एक गोष्ट सांगतो तुला. ऐक. एक था राजा. एक थी रानी. दोनो मर गए. खतम कहानी.
ना: ब्रह्मा, चिडू नकोस. पण माझी गोष्ट साधी नव्हती. खूप अर्थरस होता त्या द्राक्षात. ब्रह्मा, सिद्धाने जे लिहिले त्याचा अर्थ असा होता की त्या श्रीमंताच्या आयुष्यात तोवर होते तसेच सुख पुढेही राहील. तू मला सांग, सिद्धाने लिहिलेल्या क्रमात जरा तरी बदल केला तर काय होईल? त्याच्या आधी त्याचा पुत्र मेला तर त्याला आवडेल का? त्याचा नातू त्याच्या पुत्राआधीच गेला तर त्यांना आनंद होईल का? ब्रह्मा, आपण अविनाशी आहोत म्हणून आपल्याला मृत्यू ह्या कल्पनेची गहनता कळत नाही. पण मनुपुत्रांचे तसे नाही. मृत्यूचे अटळ सत्य त्यांना नेहमी भेडसावत असते. पण तरी पण आपल्या आधी आपल्या अपत्याने जाण्यासारखे दु:ख नाही. मरायचेच आहे तर नैसर्गिक क्रमाने मृत्यु होणे हेही सुखच आहे. तेच सुख श्रीमंत माणसाच्या भविष्यात होते. पण पाटीवरचे वाचतांना 'मृत्यु' हा शब्दच त्याला इतका दु:खी करतो की मृत्युशृंखलेच्या नैसर्गिक क्रमात दडलेले सुख त्याला जाणवत नाही. ह्याच मानवस्वभावावर हा कथाकण आधारीत होता. मृत्यूच्या विचाराने आपण जिवंत आहोत तोवरही मानव समोर वाढून ठेवलेल्या सुखाचा नकळत अव्हेर करतो असाही कथेचा बोध आहे. ब्रह्मा, ही पौराणिक कथा नाही. ही सिद्धकथा आहे. सत्यकथन आहे. आपल्याला पौराणिक कथांची खूपच सवय झाली आहे. अद्भुत, विराट, भव्य, अपौरुषेय असे काहीतरी कथेत हवे. शेवटी कथाबोधही स्पष्ट सांगायला हवा. साठा उत्तरांची कहाणी हवी. डोक्याला ताण नको. आजच्या आपल्या कथा औट घटकेचे अस्तित्व असणाऱ्या मानवांच्या आहेत. यात साठ काय, पाच काय, सहज सांगितलेले एकही उत्तर नाही. उत्तर ऐकणाऱ्याला शोधायचे आहे. काय? नसेल पटत तर समुद्रमंथनाची गोष्ट सांगतो. रंगवून रंगवून सांगतो. साठा उत्तरांची कहाणी सहाशे उत्तरात सांगतो. ऐकणाऱ्याला काय सुफळ मिळेल तेही सांगतो. कथा संपली की 'संपूर्णम्' म्हणूनही अनाउंसमेंट पण करतो. काय?
ब्र: नको रे. आवडली मला ही छोटूशी कथा. अशाच आणखी सांग. मीही विचार करीन. माझ्या बुद्धीचा वापर तरी होईल. जंगायला लागली होती पुराणे वाचून. जरा मेंदू उजळेल आजच्या कथांनी. अशा चिंचोक्याएवढ़्या कथा म्हणजे बुद्धीकरिता चिंच आहे. बुद्धिपात्र उजळून निघेल काकूंच्या देवाच्या पात्रांसारखे. चल पुढे. एक कथा झाली, आता दुसरी.
ना: ब्रह्मा, एक अध्यात्मिक माणूस सत्यशोध करण्याकरिता हिमालयात निघून गेला. चालता चालता मार्गात त्याला एक नदी दिसली. नदीचे पात्र फार रुंद नसले तरी नदी दुथडी भरून वाहत होती. माणसाने इकडे तिकडे पाहिले. नाव, नावाडी तर सोडाच, एक काळं कुत्र सुद्धा त्याला दिसलं नाही. अगदी निर्जन नदीचा काठ. अचानक त्याला पलिकडच्या तीरावर एक बालक दिसले. माणसाने मोठ्याने ओरडून त्याचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. मुलाचे लक्ष जाताच त्याने मोठ्या आवाजात त्याला विचारले 'पलिकडे कसे जायचे?'. मुलाने थोडा विचार केला व म्हणाला 'तुम्ही पलिकडेच तर आहात.'.
ब्र: हं. तू थांबलास म्हणजेच गोष्ट संपलेली दिसते. खूपच लहानशी इडली होती. पण मला अर्थ कळला. काकूंच्या त्या आवडत्या गाण्यातही असेच काहीसे होते.
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी
झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी
रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती
हाय अभाग्या भगवे नेसुन घर संन्यासुन जाशी
देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होउनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी
ना: शाबाश ब्रह्मा. या गोष्टीतही देव पलिकडच्या तीरावरील बाळमुखातूनच बोलला. पण कथेचे मर्म ऐकणाऱ्याला समजून घ्यायचे आहे. गाण्यातल्यासारखे ते explicitly सांगितलेले नाही. तसे सांगितले की मजा किरकिरी होते रे. 'हा विनोद होता. आता हासा पाहू सगळे.' असे म्हटल्यासारखे होते. टीव्हीवरच्या विनोदी कार्यक्रमात मधून मधून हास्यध्वनी, म्हणजे laugh track लावतात तसे. मला नाही आवडत तसले प्रकार. विनोदाकलन म्हणजे काय बटननी लागावा असा दिवा आहे? मग डोके कशासाठी?
ब्रह्मा, तुला आठवलेले गाणेही खूप सुंदर रे. पण मी हे तीस वर्षांपूर्वी वाड्यात ऐकले होते. त्या म्हातारीच्या सुनेने गायले होते तिच्या स्वयंवरात. छान.
ब्र: कसे प्रत्येक गोष्टीचे धागे कुठे ना कुठे जुळलेले असतात ना नारदा? पण तू म्हणतोस तसे ते सरिताचे स्वयंवर वगैरे नव्हते बरे. ती फक्त मास्तरांचा मुलगा थोडाफार तरी बरा आहे का हे पहायला आली होती. अरे ती तर मी बांधलेली गाठ होती म्हणतात. पक्की असते. असो. एक, दोन. आता तिसरी गोष्ट सांगा मुनिश्रेष्ठ.
ना: ब्रह्मा, एक शेतकरी होता. वृद्ध झाला होता बिचारा. त्याचा मुलगा आता शेती करायचा, आणि हा वृद्ध दिवसभर शेताच्याच बांधावर खाटेवर पडून मुलाकडे-शेताकडे-आकाशाकडे-मुला
पेटी ओढत ओढत मुलाने टेकडीच्या कड्यापाशी आणली. आता तो पेटीचा बापासकट कडेलोट करणार तोच पेटीतून आतून बापाने पेटीच्या झाकणावर टकटक आवाज केला. मुलगाच तो. त्याने पेटीचे झाकण उघडले. बाप म्हणाला 'अरे बाहेर काढून फक्त मलाच ढकलून दे. पेटीला कशाला ढकलतोस? पुढे ती तुझ्या कामी येईल.
ब्र: हं. काय म्हणावे? पुढे काय झाले विचारण्याचीही सोय नसते या अशा गोष्टीत. कलियुग रे बोवा कलियुग! चला पुढे. एक, दोन, तीन. आता चवथी गोष्ट सांगा देवर्षी.
ना: ब्रह्मा, ही गोष्ट गुरु शिष्याची आहे. पूर्वी गुरूच्या आश्रमातच शिष्य बालपणी राहात असत. विद्यार्जन आणि पडेल ते काम करणे हे त्यांचे काम. एक दिवस गुरूने शिष्याला मातीच्या वाडग्यात त्यांच्याकरिता पाणी आणायला सांगितले. शिष्य गेला आणि काही वेळाने रिकाम्या हातीच आला. गुरूंनी विचारले, काय झाले? शिष्य म्हणाला, 'गुरुदेव, नश्वरता म्हणजे काय?'. गुरुजी म्हणाले 'बाळा, ज्याला आदि आहे, त्याला अंत आहे. जन्म आहे त्याला मृत्यु आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस अंत पावतेच. हा निसर्गाचा नियम आहे व याला अपवाद नाही.'. एवढे सांगता सांगता गुरूच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.
ब्र: हं. हा निसर्ग नियम तुझ्या या चिंटू गोष्टींनाही लागू आहे. सुरू होता होता संपून पण जातात. शोधत बसा अर्थ. नारदा, मी जरा पाणी पिऊन येतो. काका काकू नसल्यामुळे आज चहा नाही. कपात नळाचे पाणीच भरून पितो घोटभर.
ना: जातोच आहेस तर मलाही दे आणून कपभर पाणी. हा नागपूरचा उन्हाळा म्हणजे फारच बा! आज काका काकू नाहीत म्हणून कुलर पण नाही.
ब्र: मुनी, तुझ्या ह्या गुरुशिष्याच्या गोष्टीचा अर्थ मला आत्ता कळला रे. शिष्याच्या हातून पाण्याचे वाडगे पडले व फुटले. आता गुरू रागवेल असे वाटून त्याने नश्वरता म्हणजे काय ते विचारले. गुरूंनीही त्याच्या मनातले खरे कारण हेरले व त्याला उत्तर दिले. त्यातच 'बाळा, फुटले तर फुटले. त्यात काय एवढे. वाडगेच ते. नश्वर गोष्ट. चिंता सोड आणि अध्ययनाला लाग' अभिप्रेत होते. गुरुशिष्याचे नाते पितापुत्राचे नाते असते. न सांगताही, न उच्चारताही ते एकमेकांच्या विवंचना हेरू शकतात, वारू शकतात. अवघड सत्य ओठावर आणण्यात जी कुचंबणा होते ती टाळू शकतात.
ना: आले माझ्या लक्षात ब्रह्माजी. तुम्ही माझ्यासाठी पाणी न आणताच आलात तेव्हाच मला थोड्या वेळापूर्वी झालेल्या खळ्ळ्ळ्ळ आवाजाचे मर्म समजले. चिंता नको करूस. भानामती वगैरेचा संशय नाही येणार काकूंना. फारच फार तर मांजरीला एक रट्टा पडेल त्यांचा कप फोडला म्हणून.
ब्र: नारदा, तूही सिद्धच आहेस रे बाबा. शितावरून भाताची परीक्षा करतोस. खरेच माझ्या हातून काकूंचा कप फुटला. नश्वर कुठचा! ते असू दे. पाचवी गोष्ट सुरू कर. काका काकू येईपर्यंत जेमतेम दहाच गोष्टी होतील आज असे वाटते. बाकी नंतर कधी.
ना: ब्रह्मा, हे द्राक्ष खूपच लहान आहे. ऐक. एक शेरपा यात्रेकरूंना म्हणाला 'माझ्या हुशारीने आज आपला फायदाच झाला. आपण काळवीट बरोबर घेऊन गेलो म्हणून जखमी यात्रेकरूला त्याच्या पाठीवर टाकून दिवस बुडण्याआधी येथवर घेऊन येऊ शकलो.'. एका चोंबड्या यात्रेकरूने विचारले 'पण यात्रेकरू जखमी झालाच कसा?'. शेरपा उत्तरला, 'काळवीटाने त्याला लात मारून खाली पाडले म्हणून'.
ब्र: व्वा. हा यात्रेकरू म्हणजे तर चार्वाकच दिसतो. फाजील कुठला. बरे आता सहावी गोष्ट सांग झटपट. दहा तरी व्हायला हव्या आज.
ना: ब्रह्मा, चार आस्तिक माणसांना गुरूने चार दिवस मौनव्रत पाळण्याचा सल्ला दिला. नंतर त्यांना मोक्षप्राप्तीचा मंत्र ते देणार होते. चौघेही मुकाट्याने झोपडीत गेले. रात्र झाली. झोपडीत मिणमिणणारी दिव्याची ज्योत व तितकीच भयाण शांतता. इतक्यात वाऱ्याची झुळुक आली व दिवा विझला. 'अरे, दिवा विझला वाटते' पहिला म्हणाला. 'आपण मौनव्रत धारण केले आहे हे तू विसरलास वाटते.' दुसरा म्हणाला. 'तुम्ही दोघांनीही मौनव्रत तोडले. आता कुठला तुम्हाला मोक्षाचा मंत्र?' तिसरा म्हणाला. 'तुमच्या तिघांचाही व्रतभंग झाला. फक्त मीच यशस्वी झालो' चौथा वदला.
ब्र: छान. गोष्ट होती की मला टोमणा? 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण' हेच सुचवायचे आहे ना? की तुझी नेहमीची आस्तिकवादाची टिंगल? तुझा काही नेम नाही रे बाबा. जे असेल ते असो. आता सातवी गोष्ट सांगा मुने.
ना: ब्रह्मा, एक वृद्ध संन्यासी आणि एक तरुण संन्यासी आन्हिकादि विधी आटपून रानातून जात होते. अचानक पाऊस सुरू झाला आणि पाहता पाहता वाटेतले नदीचे कोरडे पात्र भरून वाहायला लागले. संन्यासी पात्रात उतरून पोहून पलिकडे जाणार तेवढ्यात एक तरुणी धावत धावत आली व तिलाही त्यांनी नदी पार करून द्यावी अशी गयावया करू लागली. वरिष्ठ संन्याशाने तिला लगेच खांद्यावर उचलून नदी पार करून दिली. तिला पैलतीरावर सोडून दोघे आश्रमात परत आले.
दोन तीन दिवसांनी लहान संन्यासी मोठ्याला म्हणाला 'बंधु, संन्याशांना स्त्रीस्पर्श वर्ज्य असतांना तुम्ही त्या तरुणीला कसे उचलून घेतले? मोठा संन्यासी म्हणाला, 'अरे मी तिला पैलतीरावर खांद्यावरून उतरवूनही आलो. तू तर तिचे ओझे अजूनही वाहतच आहेस'.
ब्रह्मा, पुढची गोष्ट पण एका दमात सांगूनच टाकतो.
एकदा डोंगरवाटेने जात असता एका माणसामागे एक भुकेला वाघ लागला. जीव मुठीत घेऊन तो माणूस पळू लागला व पळता पळता डोंगराच्या काठावर आला. पुढे खोल खाई. इकडे आड तिकडे विहीर. वाघ आता झेप घेणार एवढ्यात त्या माणसाने दिसेल ती वेल घट्ट हातात धरून कड्यावरून उडी मारली. वेल बरीच लांब होती. तिला धरून तो माणूस आता कसाबसा अधांतरी लोंबकळू लागला. कड्याच्या टोकावर उभा राहून वाघ रागाने गुरकावत होता. वेल धरून वर जाण्यात अर्थातच काही अर्थ नव्हता. माणसाने खाली पाहिले तर दरी बरीच खोल होती. वेल सोडून उडी मारली असती तर जीव कदाचित वाचला असता पण हाडेकुडे तुटली असती. जरा निरखून पाहता त्याच्या असे लक्षात आले की दरीतही एक वाघ वर पाहून भक्ष्य केंव्हा खाली पडेल याचीच वाट पाहत होता. पुन्हा वर बघतो तर एक काळा व एक पांढरा उंदीर वेलीच्या मुळाशी भराभरा कुरतडत होते.
एवढ्यात त्याची नजर बाजूलाच लोंबकळणाऱ्या एका वृक्षाच्या फांदीकडे गेली. सुंदर आकर्षक फळांनी ती लदलदलेली होती. प्रयत्न करून माणसाचा एक हाक कसाबसा एका फळाजवळ पोहोचला व ते फळ तुटून त्याच्या मुठीत आलेही. त्याने ते फळ आनंदाने चाखले. इतके गोड फळ त्याने उभ्या आयुष्यात चाखले नव्हते.
ब्र: अरे गोष्ट संपली की समाप्त तर म्हणत जा. मी आपला वाट बघत बसतो पुढे काय होणार याची. नारदा, गोष्ट छान हं. मला त्याचे पूर्ण मर्म कळणारही नाही म्हणा. मी आपला अनादी अनंत. पण खरेच. मला हा दोषपूर्ण, सगुण, साकार मानव खूप आवडतो. आस्तिक असो की नास्तिक. आपण देव त्याच्यापुढे अगदीच अळणी रे बाबा. महालक्ष्म्यांच्या फुलोऱ्यातली करंजी तो, साटोरीही तोच. आपण नुसती फुलोऱ्यातली पाती. तो बेसनाचा लाडू, तो बुंदीचा लाडू. आपण मात्र घोळणाचा लाडू. बेचव. पांचट.
ना: ब्रह्मा, ठेविले अनंते, तैसेची रहावे. आपल्या बाबतीत असे म्हणता येईल की 'रेखिले मानवे, तैसेची रहावे'. स्थितप्रज्ञ व्हावे. आपल्या हाती काय आहे? माझ्या हाती आता एकच गोष्ट आहे. ती म्हणजे पुढची गोष्ट सांगणे. तुझ्या हातीही एकच गोष्ट आहे. पुढची गोष्ट ऐकणे. ऐक तर.
एक सिद्ध ध्यानमग्न असतांना अचानक अंगुलीमाल नावाचा एक बलशाली, उन्मत्त डाकू त्याच्यासमोर उभा ठाकला आणि त्याचा जीव घेतो म्हणाला. सिद्ध त्याला म्हणाला 'जीव घेतोस तर घे पण माझी शेवटची इच्छा तरी पुरी कर. तू खरेच बलशाली असशील तर तेवढे तरी नक्कीच करू शकशील. नसेल शक्य तर राहू दे.'.
अंगुलीमाल म्हणाला, एक काय, दोन इच्छा पूर्ण करीन. मला जगात काहीच अशक्य नाही. सांग पहिली इच्छा.
सिद्ध म्हणाला, हा समोरचा वृक्ष भुईसपाट कर. डाकूने क्षणात तलवारीचा एकच घाव वृक्षाच्या बुंध्यावर केला आणि वृक्ष कोलमडून पडला. एक घाव, दोन तुकडे. गर्वाने अंगुलीमाल म्हणाला, 'सांग तुझी दुसरी इच्छा. ती पूर्ण करूनच मी तुझा जीव घेईन.'.
सिद्ध म्हणाला 'माझी दुसरी इच्छा साधी आहे. हा वृक्ष तू पुन्हा पूर्ववत करून दाखव.'.
अंगुलीमाल चिडून म्हणाला 'हे जगात कोणी तरी करून दाखवू शकेल का? देव सुद्धा करू शकणार नाही. मला तरी कसे ते शक्य होईल?'.
सिद्ध म्हणाला, 'मुला, तोडू काय कोणीही शकतो. त्याकरिता तूच कशाला हवा? त्याकरिता काहीच कला नको. जोडण्यात कला आहे, जोडण्यात पुरुषार्थ आहे.'.
इति श्री नारदपुराणे, द्राक्षकथा नाम, संपूर्णम्
ब्र: अरे वा, असे कसे? नऊच गोष्टी झाल्या. दहाची आपली बोली होती. असे नाही चालणार. नो चीटिंग! नो अक्षदाम् समर्पयामी!
ना: ब्रह्मा, अरे दहा गोष्टी झाल्या. नऊ माझ्या, एक तुझी. तुझी ती राजाराणीची गोष्टही उत्तम होती. तीही मी धरली. एक था राजा. एक थी रानी. दोनो मर गए. खतम कहानी. व्वा. सत्य सत्य ते काय. हेच मानवजीवनाचे प्रखर सत्य. ब्रह्मा, मला तर ही गोष्ट मनापासून आवडली. मी ऐकलेली ही सर्वात सुंदर अंगूरी कथा.
ब्रह्मा, अंगुलीमालाचे गर्वहरण करणारा सिद्ध दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द बुद्ध होता. आपल्या विष्णूचा नववा अवतार. कलियुगातला आतापर्यंतचा एकमेव अवतार. दशावतारातला सगळ्यात अनपाॅप्युलर अवतार. आस्तिकांनीसुद्धा दुर्लक्षिलेला अवतार. पुराणात दोन चार श्लोकात बोळवलेला अवतार. भगवान बुद्ध. हाही तसा चार्वाकच म्हणायला हवा. म्हणूनच याच्यावर साऱ्यांचा राग. पण आपण या अवताराकडे दुर्लक्ष केले तरी याची शिकवण जगभर पसरली आहे.
ब्रह्मा, बुद्धधर्माचे अनुयायी जगभर आहेत. त्यांना बुद्धिस्ट म्हणता येईल. मला तू बुद्धिस्ट म्हणालास तर आवडेल. मी आज सांगितलेल्या चिंटु कथा सुद्धा झेन बुद्धिझमच्या अगणित कथांमधल्याच काही कथा. वालुकाकणांसारख्या लहान व अमाप कथा. रोज एखादी वाचावी अशा कथा. अंतर्मुख करणाऱ्या कथा. या कथांच्या चिंतनातून प्रत्येकाने स्वबुद्धीने बोध घ्यायचा असतो. गूगलवर zen stories म्हणून सर्च करशील तर हजारो अशा गोष्टी दिसतील. द्राक्षांचे घड चे घड. वेळ मिळेल तेव्हा एक दोन द्राक्ष तोडून चाखावे. काही द्राक्षे आंबट, काही गोड. पण साऱ्याच गोष्टी विचार करायला लावणाऱ्या. यांचे पठण श्रवण केले की पुण्यप्राप्ती होते असे कोठेही लिहिलेले नाही. त्यामुळे यांचा वाचकवर्ग जंबुद्वीपावर फारसा नाही. पण आपल्याला वाचायला काय हरकत आहे? तुला मला पुण्याची काय रे गरज?
मी तर म्हणतो आपणही अशा गोष्टींमधे भर घालायला काय हरकत आहे? मी काही रचल्या पण आहेत. सांगीन कधीतरी.
ब्र: आता पुरे रे बाबा. मीही वाचीन रात्री काही झेन कथा. काका काकू आलेच बघ. आता काही मांजरीचे खरे नाही.
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment