गोष्ट सोळावी
ब्र: नारदा, आज पुन्हा काहीतरी पूजेची तयारी दिसते. आज पुन्हा युगद्वारप्रहरी यज्ञ आहे काय रे? पुन्हा रावणाची तोंडे उमटलीत की काय? खरे सांगतो नारदा, मी काही नाही केले रे. मी तर काल काँप्यूटरला हात सुद्धा लावला नाही. खरे म्हणजे गेले काही दिवस मी वाचनसुट्टीवर आहे. अगदी कंटाळा आला आहे ती पुराणे वाचायचा. हसावे की रडावे हे सुद्धा कळत नाही बरेचदा. मग ते काहीच्या बाही अफाट अफलातून वाचलेले स्वप्नात येते. काल परवाच माझ्या स्वप्नातच हे मन्वंतर संपले. हयग्रीवाने माझ्या नाकात शिरून पुन्हा वेद चोरले व समुद्राच्या तळाशी जाऊन बसला. मी खवळलेल्या समुद्रात पडलो. विष्णूने पुन्हा मत्स्यावतार घेऊन चोरलेले वेद परत आणले व माझ्या मेंदूत भरले. मी पाण्यातच पुन्हा चारही वेद चार तोंडातून वदायला लागलो. वेदांचे बुडबुडे समुद्रतलावर येऊन फुटायला लागले. नशीबाने मी डोळे उघडले व हे सारे स्वप्न आहे हे लक्षात आले. खरे सांगतो नारदा, पण स्वप्न स्वप्न असल्याचा व आपणही तसेच काल्पनिक असल्याचा जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय. हे सत्य नाही, ही कापूसकोंड्याची गोष्ट आहे हे कळले की हायसे वाटते. जीवात जीव येतो. तेव्हापासून ठरवले की पुन्हा पुराणाकडे ढुंकूनही पाहायचे नाही. नको त्या जादुई गोष्टी. आपल्या समोरची ही सत्यसृष्टी इतकी अद्भुत असतांना दुसरे कृत्रिम मनोरंजन हवे तरी कशाला मी म्हणतो.
ना: ब्रह्मा, मी याच दिवसाची वाट पाहत होतो. वरातगंगा घेऊन आल्यापासूनच मला आजच्या दिवसाची वाट होती. आपण कल्पना की सत्य याचा तुला, आणि त्यामुळे मलाही, बरेचदा संभ्रम पडायचा. बरेचदा असे काही घडायचे की तू पलटी खायचा व जे समोर घडते त्यावरून तू काल्पनिक नसून सत्य आहेस असे अनुमान काढायचा. पुन्हा आपला वाद व्हायचा व तुला आपण केवळ मानवकल्पना आहो हे सत्य तात्पुरते का होईना, पण पटायचे. पुन्हा काही तरी अनाकलनीय घडायचे व तुझ्या मनात पुन्हा शंका यायची. तू खरेच आहेस, तूच वेदनिर्माता आहेस, तूच सृष्टीनिर्माता आहेस असे तुला पुन्हा पटायचे. तुझी ही चलबिचल अर्नाळ पुराणात टिपल्या गेली आहे. कुठे तरी तुझ्या मनाला असे वाटायचे की तू आहेस, देव आहेत हे खरे ठरावे. तुझ्या, खरे म्हणजे मानवांच्या इतक्या युगांच्या विश्वासाला तडा जाऊ नये असेही तुला मनोमन वाटायचे. पोटातून तुझी ती इच्छा असल्यामुळे तुला प्रत्येक गोष्टीत तुझ्या अस्तित्वाचा दाखला दृग्गोचर व्हायचा. पण ब्रह्मा, तू प्रामाणिक असल्यामुळे सारासार विचार केल्यावर, थोडा बुद्धिवाद, युक्तिवाद, वादविवाद केल्यावर तुझे विचारपरिवर्तन व्हायचे. तुझा एक गुण म्हणजे तुझे मत वादातीत आहे असा दुराग्रह तुझा कधीच नसतो. म्हणून तर मला तुझ्याबरोबर वाद करायला मजा येते. आधीच ज्यांचा घडा पालथा असतो त्यांच्यावर कुठल्याही तत्वज्ञानाचा अभिषेक व्यर्थच नाही का?
ब्रह्मा, मी माझे मत बदलणार नाही, काहीही झाले तरी मी माझ्या मतावर ठाम राहीन असा ज्यांचा हट्ट असतो त्यांनी कोणाशी किंवा कोणी त्यांच्याशी वाद करणे हा वेळेचा अपव्यय नाही का? वाद करायला बुद्धीची कवाडे उघडी असावी किंवा ती उघडण्याची क्षमता असावी. मतपरिवर्तन होण्याची थोडी तरी शक्यता असेल, विचारार्ह मुद्यांवर प्रामाणिक, पूर्वग्रहविरहित विचार होणार असेल, मुद्यांचे मूल्यमापन करून त्यानुसार मग काही निर्णय होणार असेल तर माणसाने मुद्दे मांडावे. उगाच कशाला वादावादी?
तुला पुराणे फोल आहेत असे आता वाटते हे योग्य की अयोग्य हा तुझ्यामाझ्याकरिता तसा गौण प्रश्न आहे. आपण काल्पनिक असल्यामुळे कल्पनासृष्टीत वावरलो काय अन् सत्यसृष्टीत वावरलो काय, एकच. आज मी तुला पुराणबाह्य दोन तीन गोष्टी सांगतो. तुला आवडतील. साध्या वाटल्या तरी या पौरुषेय गोष्टी साध्या नाहीत. विचार करायला लावणाऱ्या आहेत. अर्थाची वलये आहेत त्यांना. मला खलील जिब्रानची एक सुंदर गोष्ट आठवते. तिनेच सुरू करू. ऐक.
एका नगरात दोन बुद्धिमान व्यक्ती राहात होत्या. खरोखरच पंडित उपाधी ज्यांना शोभेल असे ते दोघेजण. विद्यावाचस्पती म्हणावे असे. दोघांचाही व्यासंग दांडगा. पण दोघांची मते अगदी परस्परविरोधी. एक अगदी आस्तिक, दुसरा तितकाच नास्तिक. एकाचा देवाच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वास. दुसरा देव आहे ह्या कल्पनेचा सुद्धा कट्टर विरोधी. दोन विचारधारा. नदीचे दोन काठ. कधीही न मिळणारे. पण दोघेही पंडित वादाला, चर्चेला न घाबरणारे. दोघांचेही व्यासंगी पांडित्य जनतेला मोहविणारे. पण परस्परविरोधी मतांचे पुरस्कर्ते असल्यामुळे जनता मात्र नित्यच बावचळलेली. हे घेऊ का ते घेऊ अशी तिची गत? नदीपात्रातले मासे कधी डाव्या नदीकाठाजवळ येत, तर कधी उजव्या.
एके दिवशी जनप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन दोघांना आस्तिकवाद व नास्तिकवादावरच जाहीर वादाचे निमंत्रण दिले. दोघांनीही ते स्वीकारले पण. आणि वादरण माजले. सारा गाव लोटला. पावसाळ्याच्या सुरुवातीला ओले ढग आणि कोरडे ढग एकाच आकाशात एकमेकासमोर आले की जे होते ते झाले. पांडित्य एकमेकाला भिडले. विचारमेघांचा गडगडाट व्हायला लागला. वीजा तळपायला लागल्या. सारा आसमंत पांडित्यतेजाने न्हाऊन निघाला. श्रोत्यांना तर ही पर्वणीच वाटली. 'असा वाद, पांडित्य पुन्हा न होणे' हीच सर्वांची भावना.
शेवटी मेघ बरसले व ओसरले. आकाश पुन्हा स्वच्छ निळे झाले.
दुसऱ्या दिवशी नास्तिकशिरोमणी पंडित सर्व लोकांच्या साक्षीने नगरातील देवळात गेले. देवळात कधीही प्रवेश न करणाऱ्या त्या पंडिताने गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला साष्टांग दंडवत घातले व साश्रुनयनांनी देवाची माफी मागितली.
इकडे आस्तिकशिरोमणी पंडित महाशय भर माध्यान्ही आपली सारी पुराणे, धर्मग्रंथ व साहित्यरचना घेऊन गावाच्या सीमेला लागून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीपाशी गेले. डोक्यावर सारी ग्रंथसंपदा घेऊन, डोळ्यात घळाघळा अश्रू भरून ते हळूहळू नदीच्या पात्रात खोलवर उतरले व त्यांनी डोक्यावरचे सारे ओझे नदीला समर्पण केले. गावकऱ्यांच्या व डोक्यावर तळपणाऱ्या सूर्याच्या साक्षीने हे सारे घडले. मतपरिवर्तन झालेल्या पंडिताने सूर्याला नमस्कार केला व जड पावलाने तो घरी परतला.
ब्रह्मा, ही कथा मला खूप आवडते. नास्तिक शिरोमणी आस्तिक झाले आणि आस्तिक शिरोमणी नास्तिक झाले. जगाला त्याने काही फरक पडला असे नाही. पण विचारमंथन झाले. दोघांनीही 'काहीही झाले तरी मी माझे मत बदलणारच नाही' अशी टोकाची व मुळातच आढ्यतेची भूमिका घेतली नाही. एकमेकांचे बोलणे आदरपूर्वक ऐकून घेतले. ब्रह्मा, हा खरा ज्ञानादर. हा बुद्धीचा खरा वापर. श्रोत्यांनाही हा सारा उहापोह अनुभवता आला. त्यांनी त्यांना जे योग्य वाटले ते स्वीकारले असेल. न पटलेले सोडून दिले असेल. हीच बुद्धीची कसोटी. खलील जिब्रानलाही गोष्टीद्वारे हेच समजावून द्यायचे असावे. नाहीतरी ब्रह्मा, एवढ्या मोठ्या जगात, आणि ते जंबुद्वीपापेक्षाही मोठे आहे बरे, कोण आस्तिक, कोण नास्तिक याने काय फरक पडतो? कोण विष्णुसहस्रनाम सहस्र वेळा म्हणतो आणि कोण नाही याला काय महत्त्व? कोण आध्यात्माकडे वळला आणि कोण भक्तिमार्गावरून चळला ही क्षुल्लक बाब आहे. भाविकांनी जगन्नाथाचा रथ ओढला काय नी न ओढला काय, पृथ्वीची सूर्याला प्रदक्षिणा तशीच सुरू राहणार. तुझी चार तोंडे चार दिशांकडे पाहतच राहणार. माझी शेंडी हवेवर उडतच राहणार.
ब्रह्मा, मला आणखीन एक गोष्ट खूप आवडते. जगप्रसिद्ध आहे. लहानशा मुलाची आहे. खूप जुनी आहे. जवळजवळ दीडशे वर्ष जुनी. जंबुद्वीपाबाहेरच्या एका हँस अँडरसन नावाच्या लेखकाची आहे. पुराणात त्याचाच कदाचित हंस इंद्रसेन असा उल्लेख होईल. हँस अँडरसनच्या जन्माला गेल्याच आठवड्यात दोनशे अकरा वर्षे झाली. पण त्याच्यासारखा प्रौढांनाही बोधकर ठरतील अशा बालकथा लिहिणारा अजूनतरी दुसरा झाला नाही.
एक आटपाट नगर होतं. तिथला राजा तसा चांगला होता, पण त्याला कपड्यांचा फारच शौक होता. राजाच तो, अपार धनसंपत्ती. त्याला कोणाला हिशोब द्यायची गरज नव्हती. तो म्हणेल ती पूर्व. राज्यातही सुबत्ता आणि संपन्नता नांदत होती. कोणाची दृष्ट लागावी असे ते राज्य होते.
राजाला आपले हातमागावर विणलेले, कशिदा केलेले, विणकाम भरतकाम केलेले, रंगीबेरंगी तलम वस्त्र दाखवायला देशोदेशीचे विणकर यायचे. वर्ष वर्ष खपून राजाच्या नजरेत भरेल असे वस्त्र विणणे व राजाला दाखविणे याची सतत चढाओढ लागली असे. राजाला जर पसंत पडले तर मग काय! राजा भरपूर मोबदला द्यायचा. सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल असा भरभरून द्यायचा. राजाचाही शौक इतका दांडगा की तो दर तासाला कपडे बदलायचा.
एके दिवशी राज्यात दूरदेशीचे दोन विणकर आले. बहुधा भाऊ भाऊ असावे. झाडाखाली, देवळाबाहेर, नदीकाठी ते जात व आपण विणलेल्या तलम वस्त्राबद्दल एकमेकाशीच बोलत. असे वस्त्र न आजवर झाले, न पुढे होणार असे म्हणत. अशा वस्त्रांचा पारखी दुनियेच्या पाठीवर नसावा असे म्हणत व उसासे टाकत. आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या कानावर ही गोष्ट जाई व त्यांचे कुतुहल वाढे. पण त्यांनी काही विचारले तरी ही दोघे 'आमचे अद्वितीय वस्त्र फक्त अद्वितीय राजासाठी आहे. सामान्यांसाठी नाही.' असे म्हणत व दुसरीकडे जात. असे बरेच दिवस गेले. ही गोष्ट राज्यात सर्वत्र सांगोवांगी पसरली व प्रजाजनांच्या चर्चेचा विषय झाली. शेवटी ती राजाच्या प्रधानमंत्र्याच्या कानावर गेली. आपल्या महाराजांचे वस्त्राचे वेड प्रधानाला चांगलेच माहीत होते. अनायासे राज्यात बाहेरचे नवीन विणकर आले आहेत तर त्यांना राजाकडे घेऊन जावे असा विचार त्याच्या मनात आला. राजा खुश झाला की खूप उदार होऊन आपल्यालाही बक्षीस देईल असाही विचार मनात होताच. लोभ कोणाला चुकला आहे?
प्रधानाने दोन्ही विणकरांना राजासमोर पेश केले. राजानेही त्यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या वस्त्रकलेविषयी सांगण्यास सांगितले. त्यातला एक विणकर बोलू लागला.
राजन, आमचे कूळ फार प्राचीन आहे. अत्यंत तलम वस्त्र विणण्याची कला आमच्या कुळात फार पूर्वापार चालत आली आहे. कापड विणणे, रंगविणे, कशिदा काढणे, शिवणकाम हे सर्व आम्हाला अवगत आहे व आम्ही स्वतःच करतो. आमचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही एकच वस्त्र चार हातमागावर मिळून विणतो. चार रंगांचे चार धागे वापरतो. चार बोटातून जातांना ते चार धागे आणि रंग असे बेमालूम मिसळतात की तयार होणारे नक्षीदार वस्त्र अनन्य. आमच्या देशात तर आम्ही विणलेल्या वस्त्राला अनन्य असेच नाव आहे. तुमच्यासारख्या कदरदान राजाने आमचे वस्त्र स्वीकारले तर आम्हीच काय, आमचे कूळच धन्य होईल. आमच्या जन्मजात कलेची कदर व्हावी म्हणून आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा नाही. आमच्या कलेला राजदेहाचा स्पर्श व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. कलाकाराचा मोबदला धन नाही, कलेची कदर आहे.
राजा त्याचे बोलणे ऐकून भारावून गेला. राजाने त्यांना वस्त्राचे काही नमुने पेश करायला सांगितले.
आता दुसरा विणकर म्हणाला, हे राजन! आम्ही आपल्यासारख्या असामान्य व्यक्तीला असामान्य वस्त्रच देऊ इच्छितो. ते आम्ही आपल्याच राज्यात राहून विणू. त्या वस्त्राची विशेषता अशी की ते पाहणाऱ्याला त्याच्या गुणानुसार दिसेल. हे वस्त्र असे आहे की ते स्वतःच्या पदाला अयोग्य असलेल्या किंवा मनात राजद्रोह असलेल्या व्यक्तीला दिसणारच नाही. अशा अपारदर्शी व्यक्तीसमोर हे वस्त्र स्वतःचे स्वरूप प्रकटच करणार नाही. जी व्यक्ती दिसते तशी नाही तिच्याकरिता हे वस्त्र अदृश्य असेल. ही कला फक्त आमच्याकडेच वंशगत आली आहे. आम्ही असेच वस्त्र आपल्यासारख्या कल्याणकारी, परोपकारी राजाकरिता विणू इच्छितो. आपण आम्हाला अशी संधी द्यावी हीच आपल्या चरणाशी प्रार्थना.
राजा अधिकच प्रभावित व प्रसन्न झाला. त्याने प्रधानजींना आदेश दिला की दोन्ही विणकरांना राज्यात त्यांना हवे तसे घर द्यावे. महिनाभर त्यांची पूर्ण व्यवस्था ठेवावी, त्यांना उत्तम दर्जाचे रेशीम व इतर आवश्यक सामग्री उपलब्ध करावी व राज्याच्या लौकिकाला शोभेल अशी त्यांची खातिरदारी करावी. दोन्ही विणकर नतमस्तक होऊन, आदराने कुर्निसात करीत, राजाला पाठ न दाखवता राजाच्या खाजगी दालनातून बाहेर आले. राजाच्या चेहऱ्यावरचा आनंद अपूर्व होता.
राजाचा आजचा आनंद दुहेरी होता. एकतर त्याला लवकरच असा वेष मिळणार होता जो आगळा वेगळाच होता. पोत, रंग, नक्षीकाम तर वस्त्राचे गुण आहेतच, पण पाहणाऱ्याच्या मनाचा रंग दर्शविणारे वस्त्र त्याच्याही ऐकण्यात नव्हते. हे वस्त्र घातले की मंत्रिपरिषदेत व जनसामान्यात कोण कोण आपल्या पदाला योग्य आहे व कोण नाही, तसेच राज्यात राजद्रोहाचे विष शिरले तर नाही ना हे त्याला कळणार होते. एका दगडात दोन पक्षी मारले जाणार होते. राजाला केव्हा हा महिना जातो व आपण नवीन वेष घालून थाटाने राज्यात मिरवणूक काढतो असे झाले.
इकडे विणकरांनी प्रधानजींंना सांगून उच्च प्रतीचे रेशीम मागवून घेतले. अहोरात्र काम करावे लागणार असल्यामुळे मेणबत्याही मुबलक मागवून घेतल्या. स्वयंपाकात वगैरे विनाकारण वेळ जाऊ नये म्हणून जेवण सकाळ संध्याकाळ राजाच्या मुदपाकखान्यातूनच आले तर बरे होईल असे नम्रपणे प्रधानजींना सुचवून पाहिले, व त्यांनी लगेच तसा आदेश जारीही केला. सारी जय्यत तयारी झाली व रंगीत, रेशमी राजवस्त्र विणण्यास सुरुवात झाली.
एक आठवडा गेला. दोन आठवडे गेले. राजाला काही चैन पडेना. बरेचदा त्याला वाटे, वेष बदलून पाहून यावे काम कुठपर्यंत आले ते. पण असा उतावीळपणा त्याच्या पदाला शोभला नसता. तोच त्याच्या पदाला अयोग्य तर नाही ना अशी शंकेची पाल पण त्याच्या मनात चुकचुकली. छे, असे करणे योग्य नाही. पण चैन काही पडेना. शेवटी त्याला एक युक्ती सुचली. त्याने प्रधानजींना बोलावले. म्हणाला, जा प्रधानजी जरा स्वतः जाऊन बघा विणकरांची व्यवस्था चोख आहे की नाही. त्यांना काय हवे नको ते विचारा. आम्ही आठवण केली म्हणावं. आणि जाताच आहात तर बघून या वस्त्र कुठवर विणून झाले ते. रंग, वीण, नक्षीकाम बघून या. काही सूचना असतील तर जरूर द्या. काम उत्तम व्हायला हवे.
'जशी आज्ञा महाराज!' म्हणून प्रधानजी त्वरित विणकरांच्या घरी आले. हातमागाचा आवाज येत होता. दोन्ही विणकरांच्या हाताची बोटे हवेत हालत होती. पण प्रधानजींना हातमागावर धागे किंवा तयार होणारे वस्त्र काही दिसेना.
विणकरांनी प्रधानजींना येतांना पाहिले व काम न सोडता त्यांना 'या, बसा' म्हणाले. गरीबांच्या कुटीला प्रधानाचे पाय लागले म्हणून आम्ही धन्य झालो असे म्हणाले. रंगसंगती कशी आहे असे विचारून त्यांनी प्रधानजींच्या तोंडाकडे पाहिले तेंव्हा प्रधानजी जरा बुचकाळ्यातच पडले. पण विणकरांनीच जेंव्हा सोनेरी, चंदेरी, घननीळ आणि रक्तवर्ण असे चार रंग कां निवडले ते स्वतः होऊनच सांगितले तेंव्हा 'अप्रतीम, अप्रतीम' असे शब्द ते वदले. चिमटीत वस्त्र घेऊन 'पोत तर बघा' असे विणकर म्हणाले तेव्हा प्रधानजींनीही पोत बघण्याचा आविर्भाव आणला व 'उत्तम उत्तम' म्हणाले. नंतर विणकरांनी वस्त्रावरचे बारीक नक्षीकाम त्यांनी मुद्दामच गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा व शमिपत्रावर आधारीत कसे घेतले व त्यामुळे त्यांचे काम किती वाढले ते सांगितले तेंव्हा प्रधानजींनी 'बहोत खूब, बहोत खूब' म्हंटले. महाराजांना मी या अवर्णनीय कलेचे वर्णन करून सांगीन असे म्हणून प्रधानजींनी त्यांचा निरोप घेतला व विणकरांच्या विनंतीवरून आणखी भारी रेशीम पाठविण्याचे आश्वासन दिले.
राजमहालाकडे परततांना प्रधानजींच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. आपल्याला वस्त्र, धागे, रंग, नक्षी काहीच कसे दिसले नाही? म्हणजे आपण प्रधानपदाला अयोग्य आहोत की काय? की आपल्या मनात कुठेतरी राजद्रोहाचे बीज नांदत आहे? बरे झाले आपण खोटेखोटेच पोत, रंग, नक्षी यांची भरघोस स्तुती केली. नाहीतर त्या विणकरांना आपले खरे स्वरूप कळले असते. महाराजांकडे जाऊन आपल्याला न दिसलेल्या वस्त्राचे साद्यंत वर्णन करून सांगावे आणि झाले गेले विसरून जावे असा विचार करून ते त्वरित राजमहालाकडे वळले.
इकडे महाराज प्रधानजींची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांचा प्रवेश झाल्याबरोबर विचारते झाले 'प्रधानजी, कसे येत आहे रंगरूप आमच्या अद्भुत नव्या वेषभूषेला? कुठवर आले काम? केव्हा होईल वस्त्र तयार आणि केंव्हा येतील ते आमचे माप घ्यायला?'. राजाची प्रश्नांची सरबत्ती पाहून प्रधानजी हसून म्हणाले 'महाराज, न भूतो न भविष्यति असे ते तलम वस्त्र विणून होत आले आहे. काय तो चंदेरी, सोनेरी, निळा व लाल रंग! काय ती त्यांची स्वाधर्म्य राखूनही झालेली एकरूपता! काय ते बारीक दुर्वा व शमीपत्रांचे नक्षीकाम! मी तर थक्कच झालो आहे. महाराज, थोडे रेशीम कमी पडते आहे. ते जर अर्थमंत्र्यांकरवी पाठवून दिले तर योग्य होईल.'
राजाचा आनंद पोटात मावेना. पण तो ओठात येऊ नये याची काळजी त्याने घेतली व म्हणाले 'बरे, बरे! तुम्ही म्हणाल तर मी त्या दोघांची राज्याचे राजविणकर म्हणून नेमणूक करतो. एवढे वस्त्र विणून झाले की त्यांनी आपल्या प्रजेकरिता वस्त्रनिर्मिती करावी. प्रजेचे हित तेच आपले हित. नाही का?'. 'होय महाराज' म्हणून प्रधानजींनी राजाचा निरोप घेतला.
अगदी वेळेवर अर्थमंत्र्यांचे नाव सुचले म्हणून प्रधानजी स्वतःवरच खूश झाले. अर्थमंत्र्यांची राजाशी सलगी वाढत आहे व राजनिर्णयात राजा त्यांच्या मताला आजकाल जरा जास्तच महत्त्व देतो हे प्रधानजींना नाहीतरी खटकायलाच लागले होते. त्यांना वस्त्र दिसले नाही की ते पदाला किती अयोग्य आहेत हे राजाला परस्परच कळेल हे मनात येताच प्रधानजी मनोमन खुष झाले.
इकडे राजाने अर्थमंत्र्यांना पाचारण केले व त्यांना नवीन राजविणकरांच्या नेमणुकीबद्दल व स्वतःच्या तयार होत असलेल्या अद्भुत वस्त्राबद्दल सांगितले. अर्थमंत्र्यांनी विणकरांना रेशीम घेण्याकरिता हव्या तितक्या सुवर्णमुद्रा स्वहस्ते द्याव्या व प्रजेलाही एक एक वेष राजाकडून राज्यमहोत्सवाआधी देण्याकरिता पैशाची बेगमी करावी असे सुचविले. आणि जाताच आहात तर वस्त्रनिर्मिती कुठवर आली तेही पाहून या व माझे माप घ्यायला येतांना विणलेले वस्त्रही घेऊन येण्यास विणकरांना सांगा
असे सुचविले. 'जशी आज्ञा महाराज!' म्हणून अर्थमंत्री राजमहालातून बाहेर आले.
सुवर्णमुद्रांनी भरलेली रेशमी थैली घेऊन अर्थमंत्री तडक विणकरांकडे गेले. दोघेही हाताच्या बोटांनी आपल्या समोरून सरकणारे काहीतरी चाचपत आहेत, निरखून पाहत आहेत असे त्यांना दिसले. पण ते नेमके काय आहे हे मात्र कळेना. मंत्र्यांना पाहून दोघांनीही हात न जोडता नमस्कार केला. हात त्यांचे कामात गुंतले होते. त्यातला मोठा भाऊ म्हणाला, 'तुमच्याच राजांचे काम सुरू आहे. तहानभूक विसरून गेला पंधरवाडा आम्ही हेच काम करीत आहोत. तुमचे प्रधानमंत्री आले होते. तलम, चतुरंगी, नाजुक नक्षीकाम असलेले हे वस्त्र बघून ते तर चकितच झाले. सोनेरी, चंदेरी, निळा आणि रक्तासारखे लाल रंग कसे जादुई किमया करतात व त्यातच त्रिदल दुर्वा आणि बहुपर्णी नाजुक शमीच्या पानांचा जो नाच या वस्त्रावर चालतो असे वाटते ते पाहून ते तर आऽऽ वासून बघतच राहिले. धनी, 'ज्या कलेत कसर नाही, तीच खरी कलाकुसर' अशी आम्हाला वडिलांची शिकवण आहे. तिचे काटेकोर पालन आम्ही करतो. ह्या वस्त्राचा अंगरखा व चुडीदार आपल्या महान राजांच्या अंगाखांद्यावर खेळेल तेंव्हा राजा हाच देव असे प्रजेला वाटेल. प्रजेलाही आपण या वस्त्राच्या खूबीबद्दल आधीच सांगितले तर बरे होईल. हातातली कामे सोडून ते मिरवणुकीच्या वेळेस रस्त्याच्या दुतर्फा उभे राहतील.
अर्थमंत्र्यांना घाम सुटू लागला. छातीचे ठोके ऐकू यायला लागले. हे वस्त्र आपल्याला दिसत नाही हे महाराजांच्या कानावर गेले तर? मेहनतीने व हुशारीने संपादन केलेला महाराजांचा विश्वास धुळीस मिळेल. एक दिवस प्रधानपदावर आरूढ होण्याची तीव्र मनिषा मनिषाच राहील.
अचानक मंत्र्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले 'व्वा! क्या बात है!'. त्यांनीही बोटे फिरवून वस्त्राचे पोत अलगद चाचपून पाहिले. म्हणाले, 'आमचे महाराज कलेचे व कलाकारांचे कदरदान आहेत. त्यांनी तुमची राजविणकर म्हणून घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्याकरिता ही सुवर्णमुद्रांची पिशवी त्यांनी पाठविली आहे. तिचा स्वीकार करा. नवे रेशीम घ्या. आणखी धन हवे असेल तर तसे सांगा. तुमचे वस्त्र विणून झाले की तसाही सांगावा धाडा. महाराजांचे माप घ्यायला शक्य तितक्या लवकर या. मिरवणुकीच्या आधल्या दिवशी महाराज एकदा हा विलक्षण वेष खाजगीत घालून बघू इच्छितात. आमचे महाराज कुठलीही गोष्ट परखून घेतात.'.
विणकरांनी ४-५ दिवसांनी माप घ्यायला यायचे कबूल केले व मंत्र्यांना निरोप दिला.
मंत्री राजवाड्यात येतांना सुन्न होते. आलेले संकट त्यांनी शिताफीने टाळले होते खरे पण इतरांना नाही तरी त्यांना स्वतःलाच आपण स्वतः पदाला योग्य नाहीत हे कळून बरे वाटले नाही. राजवाड्यात शिरतांना बळेच त्यांनी चेहऱ्यावर आनंदमुद्रा चिकटविली व राजांसमोर दाखल झाले.
उतावीळ राजा उत्सुकतेने उठून बसला. मंत्र्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांनी काय ते ताडले व म्हणाले 'काय अर्थमंत्री, कशी वाटली आमची निवड? आहेत का आमचे विणकर दरबारी होण्याच्या योग्यतेचे?'.
मंत्री स्वतःला सावरत म्हणाले, राजा, खचितच. म्हणून तर ते असे चतुरंगी, सोनेरी रुपेरी लाल निळे आकाशासारखे तलम वस्त्र विणू शकले. त्यावर ते हुबेहूब दुर्वांचा व शमीपत्रांचा आभास करून देणारे नक्षीकाम! सोने पे सुहागा! मी जर राजकवी असतो तर त्यावरच एक महाकाव्य रचले असते. महाराज, आपल्याला जी श्रेष्ठतेची पारख आहे ती त्रिभुवनात कोणात नाही. म्हणूनच ते विणकर सप्तद्वीप ओलांडून आपल्या राज्यात आले. त्यांच्या कलेचे खरोखरच चीज झाले.'.
राजाला खूप विचारावेसे वाटले की विणकर माप घ्यायला कधी येतील. पण उतावीळपणा उच्चपदस्थांना शोभत नाही असे त्याने ऐकले होते. पण त्याला विचारायची गरजच पडली नाही. अर्थमंत्र्यांनीच त्यांना सांगितले की ३-४ दिवसात विणकर मापाला येऊ इच्छितात व येतांना वस्त्रही दाखवायला घेऊन येतील. ते ऐकून राजाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तरी पण जरा गंभीर होऊन त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडी चर्चा केली व मंत्र्यांना निरोप दिला.
पुढचे तीन चार दिवस अर्थमंत्र्यांनी शिपायांकरवी राज्यात घरोघरी येणाऱ्या मिरवणुकीची व राजाच्या नव्या वेषाची व त्याच्या विशेषतेची माहिती पोहोचवली. राज्यातील घरभेद्यांची तर पाचावर धारणच बसली. त्यांनी मिरवणुकीच्या दिवशी घरातून बाहेरच न निघण्याची शपथ घेतली. बहुसंख्य साध्याभोळ्या राज्यप्रेमी जनतेने मात्र राजदर्शनाचा योग येणार म्हणून आगामी मिरवणुकीची आतुरतेने वाट पाहायला सुरुवात केली.
तीन चार दिवस गेले आणि दोघेही विणकर राजदरबारी आले. हाती काहीतरी परीटघडीचे ठेवले असावे असे दोघांचेही हात पुढे केलेले होते. त्यामुळे कोणीच राजाला नमस्कार वा कुर्निसात केला नाही. राजाला जरा रागच आला कारण त्याला तर विणकरांचे हात रिकामे दिसत होते. तेवढ्यात प्रधानमंत्री व अर्थमंत्री पुढे आले व विणकरांच्या हाताकडे बघून 'व्वा, अप्रतिम, अद्भुत' असे म्हणाले. राजाकडे वळून म्हणाले की विणकर विणलेले वस्त्र घेऊन आले आहेत व राजाचे माप घेऊ इच्छितात.
राजाला मात्र कितीही प्रयत्न केला तरी विणकरांच्या हातातली वस्त्रघडी दिसेना. स्वतःला कसेबसे सावरत राजा प्रधानजींना म्हणाला की विणकरांना पाहून त्याला प्रसन्नता आहे व माप देण्यासाठी दोघांना तो खाजगीत भेटू इच्छितो. एवढे बोलून महाराज उठले. सारे दरबारी पण उभे होऊन राजा जाईपर्यंत आदराने कुर्निसात करीत राहिले. विणकर मात्र तसे करू शकले नाही कारण त्यांच्या हाती ते अद्भुत वस्त्र होते. दोन शिपाई त्यांना राजाच्या खाजगी दालनात घेऊन गेले. तेही जाता जाता विणकरांच्या हाताकडे पाहून मधून मधून वाहवा करते झाले.
राजाच्या दालनात आल्याबरोबर दोघाही विणकरांनी त्यांच्या हातातले वस्त्र समोरच्याच सोन्याच्या ताटात ठेवले व आता प्रथमच राजाला लवून कुर्निसात केला. राजाने केवळ स्वीकारार्थ मान हालवली. विणकरांनी वस्त्राची घडी ताटातून उचलून ती उलगडली व लग्नात अंतरपाट धरतात तसे ते वस्त्र दोन बाजूला उभे राहून राजासमोर धरले. रंग, पोत व नक्षीकाम यांचे वर्णन केले व राजाची काय प्रतिक्रिया होते हे जाणून घेण्यास उत्सुकतेने त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले.
राजाच्या मनात काय सुरू होते हे राजाच जाणे. काही वेळ तरी राजा काहीच बोलला नाही. पण नंतर जागीच उभा राहून टाळ्या वाजवत 'शाबाश, शाबाश' म्हणाला. काल माझ्या स्वप्नात हेच चंदेरी, सोनेरी, लाल व निळ्या रंगात न्हायलेले, दुर्वा व शमीपत्राने पवित्र झालेले अंबरासारखे नीतळ वस्त्र आले होते. तेच आज प्रत्यक्षात उतरले की काय असे मला वाटते, असे तो म्हणाला. दोघेही विणकर कृतकृत्य होऊन एकदमच 'महाराज! आपण कृपावंत आहात. आज आमचे जीवन सार्थक झाले.' असे म्हणाले.
विणकरांनी वस्त्राची नीट घडी करून सुवर्णाच्या ताटात ठेवली. राजाचे माप घेतले. राजानेही त्यांना कंठातली मोत्यांची माळ काढून दिली. मिरवणुकीच्या दिवशी थोडे आधीच येऊन आम्ही आपणाला वेष धारण करण्यास मदत करू असे म्हणून, वस्त्राची घडी करून, ती अलगद हाती घेऊन विणकर परतले.
राजाच्या मनातच राजद्रोह कसा असू शकेल? म्हणजे आपण नक्कीच राजधर्म निर्वहनाला कुठेतरी कमी पडतो आहे व राजपदाला अयोग्य ठरलो आहे असे राजाला वाटले. प्रधानजींनी आधीच आपल्याला वस्त्राचे वर्णन सांगितले होते म्हणून आजचा कठिण प्रसंग टळला हे कळून राजाला हायसे वाटले.
मिरवणुकीचा दिवस आला. संध्यासमयी मिरवणूक निघायची असली तरी मध्यान्हीपासूनच मिरवणूकीच्या मार्गावर दुतर्फा लोक जमायला लागले व मोक्याची जागा अडवायला लागले. इकडे विणकरबंधू राजाचा नवा वेष, सुईधागा, कात्री व एक नवीनच विणलेले वस्त्र घेऊन राजाच्या दालनात दाखल झाले. राजाची उत्कंठा शीगेला पोहोचली होती. विणकर येताच तो पुढे आला व विणकरांच्या हाताकडे बघू लागला. त्यातल्या एकाने राजाचा अंगरखा घडी मोडून, झटकून राजासमोर धरला. दुसऱ्याने राजाचा चुडीदार पायजामा तसाच घडी उलगडून, झटकून राजासमोर धरला. राजाला काही दिसले नाही खरे पण तो तसे बोलला नाही. विणकर म्हणाला, 'महाराज, हा अंगरखा व पायजामा आपण परिधान करावा. नेसूचे कपडे बदलून घ्या म्हणजे आम्ही स्वहस्ते आपल्याला नवे परिधान नेसवून देऊ. राजाने तसेच केले. विणकर म्हणाला, राजा हा वेष अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखा हलका आहे. कदाचित आपणाला आपण काहीच घातले नाही असेही वाटेल. असे म्हणून दोघांनी हलकेच राजाला पायजाम्यात पाय घालायला सांगितले. काहीच दिसत नसूनही राजाने अंदाजानेच पाय टाकले. विणकरांनी दोन्ही हातांनी तंग पायजामा राजाच्या पायात हळूहळू वर सरकवला. गुदगुल्या तर होत नाही ना असे राजाला विचारले. राजा नाही म्हणाला. नंतर तसेच अंगरख्याच्या बाह्यांतून राजाचे हात ओढले व अंगरखा व्यवस्थित अंगावर बसलेला पाहून त्याच्या नक्षीदार गुंड्या काचातून घातल्या. एवढे झालेले पाहून दोघेही एकदमच 'व्वा' म्हणाले. बंधुद्वय म्हणाले 'राजा, हा वेष फारच फार तर गुंजभर वजनाचा असेल. तुम्हाला तर जाणवतही नसेल. पण आरशात पहाल तर त्याचे स्वर्गीय सौंदर्य आपणाला कळेल. तुम्ही तसेच करा. आम्ही तोवर हे काळ्या रंगाचे अंगवस्त्र कापून व शिवून आपणाला देतो. गेला महिनाभर अहोरात्र राबूनही हे थोडे काम राहूनच गेले.
राजाला आतापर्यंत फक्त विणकरांचे हात हालतांना दिसत होते. वस्त्र काय, वस्त्राचा एक धागाही त्याला दिसला नाही. तरी पण राजा आरशासमोर जाऊन आपला शृंगार न्याहाळू लागला. मागे वळून पाहतो तो दोघेही काहीतरी त्यांनी हातात ताणून धरले असावे असे उभे होते व त्यातला एक भाऊ हवेत सपासप कैची चालवत होता. कापड कापून होताच दुसऱ्याने लगेच सुईत धागा घातल्यासारखे करून धावदोऱ्याने काहीतरी शिवावे अशी बोटांची व हातांची हालचाल केली. राजाने अंदाज बांधला की ते आपले अंगवस्त्र शिवत असावेत. तसेच होतही होते. फक्त राजाला मात्र ते दिसत नव्हते. शिवून होताच विणकरांनी अंगवस्त्राची घडी करून ती अलगद राजाच्या खांद्यावर व्यवस्थित बसवली व सुईधाग्याने खांद्यावरती हलका टाका मारून अंगवस्त्र घसरू नये म्हणून अंगरख्याशी जोडून टाकले. आता दोघेही राजाकडे डोळे विस्फारून बघू लागले व म्हणाले 'राजन, आमचे या जन्माचे सार्थक झाले. आता आमचे हातही जरी कोणी मागितले तरी आम्ही ते आनंदाने देऊ. या हातांनी अशी कलोत्पत्ती पुन्हा होणे नाही'. असे म्हणून दोघेही घळाघळा रडू लागले.
राजाने दोघांचे सांत्वन केले व म्हणाला, 'तुम्हाला आता आजन्म राजाश्रय आहे. तुमचे हे कलापूर्ण हात मागणाऱ्याची गर्दन छाटण्यात येईल.'. एवढे म्हणून राजाने टाळी वाजवली. एक हुजऱ्या लगेच आत येताच 'जा आणि प्रधानजी व अर्थमत्र्यांना बोलावून आण' असा आदेश दिला. 'जी हुजूर!' म्हणत हुजऱ्या बाहेर गेला व क्षणात प्रधानजी व अर्थमंत्री दालनात आले.
दोघे शिरतात, न शिरतात तेवढ्यात विणकर राजाकडे अदबीने हात दाखवत म्हणाला, 'कसा शोभून दिसतो महाराजांना त्यांचा वेष बघा. अंगरखा व पायजाम्याचे वस्त्र तुम्ही आधीच पाहिले होते. कृष्णवर्णी अंगवस्त्र मात्र आम्ही कालच विणले व आजच शिवले. राजवेष आता पंचरंगी झाला आहे. कसा वाटतो?'.
क्षणाचाही विलंब न करता दोघेही उद्गारले 'अति सुंदर, अति सुंदर'. दोघांनीही राजाचे अभिनंदन केले व म्हणाले 'महाराज, मिरवणुकीची वेळ झाली आहे. रथ सुसज्ज आहे. आपण चलावे व रथारूढ व्हावे. समस्त प्रजा आपले महाराज व त्यांचा हा अवर्णनीय राजवेष पहायला आतुर आहे.'.
पुढे वाजंत्री, घोडदळ, दरबारी, अर्थमंत्री, सेनापती, प्रधानमंत्री, रथात नववेषधारी महाराज, नंतर राजकवी, राजवैद्य, राजविणकर, सैन्य, व शेवटी हत्तीवरून साखर वाटणारे राजसेवक अशी भव्य मिरवणूक निघाली. आपला वेष सर्वांना दिसावा म्हणून राजा रथात बसण्याऐवजी ऐटीत उभा होता. राजवेषाचे प्रजाजन करीत असलेले कौतुक कानावर येत होते व राजाला आनंद देत होते. मिरवणूक मुख्य राजरस्त्यावर आली. तेथे तर अमाप गर्दी होता. दुतर्फा उभी जनता वाहवा करीत होती. आपण केलेले राजाचे व राजवेषाचे कौतुक त्या कोलाहलातही सर्वांना ऐकू यावे म्हणून जरा वरच्या आवाजातच स्तुती करण्याची प्रजाजनांत अहमहमिका लागली होती. इतक्यात .....
राजमार्गावरच्या गर्दीत आपल्या तीन वर्षाच्या नातवाला खांद्यावर बसवून एक वृद्ध नागरीक उभा होता. त्या लहानग्या नातवाला प्रथमच राजाचे दर्शन होणार होते. वाजंत्री, घोडे पाहून ते लहान मूल खूपच खूष झाले. आता राजाचा रथ त्याला दिसू लागला. त्यात उभा असलेला राजाही आता त्याच्या दृष्टिपथात आला. मुलगा अचानक हासायला लागला व म्हणाला, 'आजोबा, आजोबा, राजा बघा कसा नंगू पंगू आहे. राजा कपडे घालायलाच विसरला. शेम शेम पप्पी शेम, आॅल द मंकीज नो युवर नेम'. असे म्हणून तो आणखीनच मोठमोठ्याने हासायला लागला.
अचानक सर्वत्र शांतता पसरली. आता कुजबुज कुजबुज सुरू झाली. नंतर एक, मग दोन, मग तीन असे आवाज यायला लागले 'राजा निर्वस्त्र, राजा निर्वस्त्र'. आवाज वाढायला लागले आणि पाहता पाहता सारी प्रजा म्हणायला लागली 'राजा निर्वस्त्र, राजा निर्वस्त्र'.
ब्रह्मा, ही कथा मला खूपच आवडते. आस्तिकवाद, नास्तिकवाद, देवाच्या अस्तित्वावर विश्वास, त्याच्या अनस्तित्वावर विश्वास याकडे व त्यांच्या कारणमीमांसेकडे ही कथा अंगुलिनिर्देश करते असे मला वाटते.
ब्र: नारदा, मलाही दोन्ही कथा आवडल्या रे. त्या पुराणातल्या कथांपेक्षा ज्यास्तच आवडल्या. पण दोन्ही गोष्टींवर चिंतन करायला हवे. नुसत्या गोष्टीच आहेत की यात आणखी काही संदेश आहे ते पाहिले पाहिजे. पण सध्या तरी तू मला आणखी एक गोष्ट सांग. तू म्हणाला होतास दोन तीन गोष्टी सांगीन म्हणून. दोन झाल्या, आता तिसरी सांग. मग पुरे कर वाटल्यास.
ना: ब्रह्मा, आता तिसरी गोष्ट नंतर कधी. लवकरच मी तुला याच श्रुंखलेतली आणखी एक कथा नक्कीच सांगेन. पण आता चल, बघ काकाकाकू काय करतात ते. ते बघ मास्तरांच्या फोटोची पूजा करीत आहेत दोघे. हार घालून नमस्कार करीत आहेत. अगदी देवाला करतात तसा. पण ब्रह्मा, आजचे हे त्यांचे पूज्य देव मात्र खरेच अस्तित्वात होते. हे आताच्या गोष्टीतल्यासारखे नसलेले वस्त्र नव्हते. मास्तर डोळ्यांना दिसत होते. या पृथ्वीवर कधीकाळी चालले होते. या घरी आले होते. आज मास्तरांची पुण्यतिथी आहे. म्हणून हे पुण्यस्मरण. आपणही हात जोडू या. ये असा.
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment