गोष्ट सतरावी
ना: ब्रह्माजी, तुम्ही तर आजकाल पुराणे सोडून इतरच वाचन करीत असता. समुद्रमंथन, भक्त प्रह्लाद, अजामीळ, राहू-केतू यासारख्या मनोरंजक व ज्ञानवर्धक पौराणिक गोष्टी वाचायला हव्या होत्या तुमच्यासारख्या भाविकाने. तुम्हीच जर नास्तिक झाला तर तुमच्या सृष्टीचे काय होईल?ब्र: नारदा, त्या गोष्टी तर तू आधीच सांगायच्या कबूल केल्या आहेत. पण त्या सांगायची आश्वासने विसरून तू खलील जिब्रान, हँस अँडरसन वगैरेंच्या गोष्टी सुरू केल्या. काल मग मीही जरा गूगल करून त्यांच्याच आणखी काही गोष्टी वाचल्या. आवडल्या. पण नारदा, त्यांचे देव वेगळे असतात काय रे? त्यांच्या एकाही गोष्टीत तुझा-माझा उल्लेख नाही. आपल्या नद्या पर्वतांचा उल्लेख नाही. सुवर्णमेरू, क्षीरसागर सुद्धा नाही. आपले सण त्यांचे नाहीत. काहीच साम्य दिसत नाही. ते जंबुद्वीपाचे रहिवासी नाहीत असे तू म्हणाला होतास. पण मग ते कुठले रहिवासी? त्यांचा स्वर्ग, त्यांचे नरक, त्यांचे चित्रगुप्त, त्यांचे यमदूत सगळे वेगळेच की काय? ते लोक माझ्या अखत्यारीत येत नाहीत का? म्हणजे माझ्या सृष्टीव्यतिरिक्त आणखीही वेगवेगळ्या सृष्ट्या आहेत का? मला काही कळत नाही. पण आपले स्वर्ग-नरक, वेद, पुराणे हे फक्त मोजक्या लोकांसाठीच असावे असे मात्र मला आता वाटू लागले आहे. माझ्या अधिकारवलयाबाहेरही मानवसृष्टी असावी असेही मला वाटू लागले आहे.
ना: ब्रह्मा, तू फार हुशार आहेस रे. खरोखरच तुझ्या ज्युरिसडिक्शनच्या बाहेरही लोक आहेत. इतर जीवही आहेत. गणितात जशी तुला फटाफट उत्तरे मिळतात तसेच तू जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो, जे अनुभवतो त्यावरून तू पटापट योग्य निष्कर्षाप्रत पोहोचतोस. आणि ते बोलूनही दाखवितो. कारण तुला दुष्परिणामांची भीती नाही. बरेचदा तुझे निष्कर्ष खरे ठरतात. पण तुझी ही विद्या, तुझी ही कला, तुझी ही प्रतिभा, तुझी ही बुद्धीचा सदैव वापर करण्याची मनोवृत्ती तूच निर्माण केलेल्या मानवाला मात्र तू दिलेली दिसत नाही. किंवा दिली असली तरी ती कुठल्यातरी ओझ्याखाली, कुठल्यातरी भीतीने दबून जाते. त्यांना बऱ्याच गोष्टी कळतात, पण वळत नाही रे. ते स्वत:चीच फसवणूक करतात.
ब्र: होय नारदा. तसेच असावे. कालच्या त्या राजाच्या गोष्टीचेही मर्म तेच आहे. आपण आपल्या पदाला अयोग्य समजण्यात येऊ, किंवा आपल्या मनात राजद्रोह आहे असे राजाला किंवा राजसत्तेला वाटेल व आपल्याला शिक्षा होईल या भीतीपोटी राजापासून रंकापर्यंत सारेचे सारे ते धूर्त विणकर बंधू जे काही सांगतील, जे काही अस्तित्वात आहे असे म्हणतील ते ते अनाक्षेप मानायला तयार होते. आपल्या डोळ्यांनी जे दिसते, आपल्या हाताला जे जाणवते, आपल्या बुद्धीला जे पटते ते बाजूला ठेवून फक्त भीतीमुळे जो तो नसलेल्या गोष्टीचेही अस्तित्व मानतो व आपल्याला राजवेष जसा दिसावा अशी दुसऱ्या कोणाची अपेक्षा आहे तसा तो दिसतो याची ग्वाही देतो. नारदा, ह्या भीतीचा पुरेपूर फायदा ते कपटी विणकर बंधू उचलतात. नारदा, हे कपट फक्त त्या लहान मुलापर्यंत पोहोचत नाही. तो ह्या भीतीच्या व दबावाच्या पल्याड आहे. त्याला जे दिसते ते तो सांगतो. त्याच्यावर सामुदायिक अपेक्षेचे वा राजसत्तेचे बल काम करीत नाही. तो खूपच निरागस आहे व फक्त त्याची पंचेंद्रिये जे सांगतील तेच त्याला समजते. त्यामुळे तो सत्य वदून जातो. तेच सत्य व त्याचा उच्चार मग इतरांना साहस देतात व राजा निर्वस्त्र आहे हे चक्षुसत्य समाजात पसरते. नारदा, हा भ्रम लोक वाईट आहेत वा कपटी आहेत म्हणून पोसला जातो असे नाही. तर उलट ते भोळे आहेत, कुठेतरी घाबरलेले आहेत म्हणून उत्पन्न होतो. नारदा, ही तीच भीती आहे, जिला चालाख पण बुद्धिमान लोक खतपाणी घालतात व गैरफायदा घेतात. नारदा, ही भीती व नरकाची भीती, ही भीती व दैवी कोपाची भीती, ही भीती व पापाची भीती ह्या सगोत्री आहेत. राजाचे वस्त्र चतुरंगी आहे, त्यावर दुर्वा व शमीपत्रासारखे दिसणारे बारीक नक्षीकाम आहे असे म्हणणारे समाजाच्या सर्व स्तरातले लोक व आजचे 'देव आहे. आम्हाला देवाचा प्रत्यय आला आहे.' व आमचा त्याच्यावर विश्वास असल्याचे सांगणारे आस्तिक लोक एकच. अगदी सेम टु सेम.
ना: होय ब्रह्मा, नंगू पंगू राजाची ही गोष्ट आस्तिकवादाचे मूळ काय आहे हे मोठ्या खूबीने मांडते. आजही समाजात ते विणकर बंधूही आहेत, राजाही आहे, मंत्रीही आहेत आणि प्रजाही आहे. अगदी काही काही बदलले नाही. बहुधा काही बदलणारही नाही. कारण भागवत पुराणात अठ्ठावीस नरकांची व त्यातील यातनांची माहिती आहे व काय केले की कोणत्या नरकात जावे लागते ते स्पष्ट सांगितले आहे. आणि पाप करूनही नरकप्राप्ती टाळायची असेल तर कुठला यज्ञ करायचा व पुरोहिताला काय दान द्यायचे हेही सांगितले आहे. ब्रह्मा, शतकानुशतके अनेक विणकरांनी अशीच सुंदर, अद्भुत वस्त्रे विणली आहेत आणि अजूनही विणतच आहेत. ती वस्त्रे घालून राजांची मिरवणूक आजही निघतेच आहे. आणि रस्त्याच्या दुतर्फा उभी प्रजा राजाच्या वस्त्राने मोहित होऊन राजाचा जयघोष करतेच आहे. नारायण नारायण!
ब्र: नारदा, पण तो राजा, ते मंत्री, ती प्रजा, ते विणकर आजही आहेत असे तू म्हणतोस. ते खरेही आहे असे देवळातली गर्दी पाहून मला पटतेही. पण मग आज किंवा इतिहासात, पुराणकालात ते लहान बालक कां नाही रे? राजा नंगू पंगू आहे असे म्हणणारा कोणीच झाला नाही का रे?
ना: ब्रह्मा, झाला. आणि आज त्याचीच गोष्ट मी तुला सांगणार आहे. त्या बालकाची, 'राजा निर्वस्त्र आहे' म्हणण्याचे धैर्य दाखविणाऱ्या त्या सत्यवादी बालकाची, नोंद इतिहासाने पद्धतशीर खोडून टाकायचा प्रयत्न केला तरी त्याचे नाव, त्याचे विचार थोड्याफार प्रमाणात आजही उपलब्ध आहेत. ब्रह्मा, नावात काय आहे? आपण त्या बालकाचे नाव नुसते बाळ होते असे म्हटले तर कोठे काय बिघडते? बाळ नाव तसे संस्कृतनिष्ठ नाही कारण संस्कृतमधे 'ळ' नाही. पण आपला हा बाळ संस्कृत पंडित होता. असणारच, कारण तोही वेदकालीन होता. वेद जितके जुने, तितकेच याचेही लिखाण. वेदांग तत्त्वज्ञान जितके प्राचीन, तितकेच याचेही तत्त्वज्ञान. पण प्राचीन तत्त्वज्ञानाची, तर्कशास्त्राची, चिंतनाची, दर्शनाची ही दोन अगदी भिन्न, परस्पर विरोधी टोके. एक उत्तर धृव, तर दुसरा दक्षिण धृव. पण या दोन विचारांचे, यांच्या पुरस्कर्त्या पंडितांचे खलिल जिब्रानच्या कथेतील पंडितांसारखे जाहीर वादरण कधी झाले नाही. पांडित्याच्या अहिंसक विद्युल्लता चमकल्या नाही. फक्त तलवारीची हिंसक पाती तळपली. बाळाचे तत्त्वज्ञान नामशेष करण्याचे प्रयत्न झाले. बहुतांशी ते यशस्वी झालेही. जेमतेम दहा पंधरा श्लोक उरले आहेत असे म्हणतात. आपण त्यातले काही आज बघूही. त्यातल्याही काही श्लोकांना पद्धतशीर विकृत स्वरूप देण्यात आले. मूळ शब्द बदलून अर्थाचा अनर्थ होईल असे शब्द नंतर आलेल्या विद्वानांनी घुसवले आहेत. ते जाणूनबुजून बाटवलेले श्लोक आजही काही विद्वान बाळाच्या नावाने खपवून त्याला पद्धतशीर बदनाम करीत आहेत. काही पुराणात तर या बाळाला राक्षसकुळातला म्हणून रंगविण्यात आले आहे. बाळाचा आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा द्वेष इतका जबर की त्या द्वेषापोटी बऱ्याच वेदकालीन वाङमयात याचा व याच्या विचारांचा उल्लेख आढळतो. तो किती नीच होता हे दाखवून द्यायला तत्कालीन पंडितांनी त्याचे काही श्लोकबद्ध विचार आपल्या वाङमयात घेऊन त्याचा खरपूस समाचार घेतला आहे. पण त्यामुळेच बाळाचे काहीतरी विचार आजही उपलब्ध आहेत. जसे जसे ज्ञान वाढत गेले, जसा जसा मानव विज्ञाननिष्ठ व्हायला लागला, तसेतसे या बाळाचे तत्वज्ञान त्या प्राचीन काळीही किती प्रगल्भ होते ते अभ्यासकांच्या लक्षात यायला लागले. आणि आजतर त्याचा सर्वत्र प्रसार झाला आहे. ब्रह्मा, ह्या बाळाने पेटवलेला एका विचारधारेचा तो वेदकालीन टेंभा कितीही जणांनी, कितीही वेळा विझवायचा प्रयत्न केला, तरी अजून जळतोच आहे. मला एक कविता आठवते.
केला जरी पोत बळेचि खाले
ज्वाला तरी ते वरती उफाळे
ब्र: नारदा, ही बाळाची गोष्ट तुझ्या खूपच आवडीची दिसते. आज तुझा आवेश काही वेगळाच आहे. आज तुझ्या वीणेचे सूर जरा वेगळेच आहेत. घे गोष्ट सांगायला. कोण जाणे, वेदनिर्माता मी पण त्या बाळाचा प्रशंसक होईन. खुद्द माझे मतपरिवर्तन होईल. खलिल जिब्रानची गोष्ट पुन्हा घडेल माझ्याबाबतीत.
ना: ब्रह्मा, तू वेदांचा निर्माता. त्यामुळे वेद अपौरुषेय आहेत असे मत प्रचलित होते. बाळाचे मत मात्र भिन्न होते. वेद हेही इतर वाङमयासारखे मानवनिर्मित आहेत असे त्याचे मत. ते किती वर्षांपूर्वी रचण्यात आले, ते कुणा एकाचे मत आहे की त्याला अनेकांचा हातभार लागून मोठ्या कालावधीत थोडे थोडे निर्मित होत गेले ही वादाची गोष्ट असू शकते. पण वेद सुद्धा मानवप्रतिभेची उपज आहेत असे बाळाचे मत. ब्रह्मदेवाच्या चार दिशांच्या चार मुखातून निघणारे चार वेद हे अपौरुषेय आहेत म्हणणे हे चार हातमागावर, विणकरबंधूंच्या चार हातांनी, चार रंगाचे वस्त्र, चार आठवड्यात विणले हे जितके सत्य तितकेच सत्य आहे. पण तरीही राजाचा असा निर्माण झालेला वेष सर्वांना दिसतो आणि आवडतो असे गोष्टीतले सर्वच म्हणतात. फक्त आपला हा बाळ अतिप्राचीन काळी, जेंव्हा वेदांचा बोलबाला होता तेंव्हा, असे म्हणायला धजला की राजाच्या अंगावर वस्त्रच नाही. वेद अपौरुषेय नाहीत.
ब्रह्मा, वेद देवनिर्मित नाहीत, तर देव वेदनिर्मित आहेत असेही त्याचे म्हणणे. देव वेदनिर्मित आणि वेद मानवनिर्मित. अर्थातच देव ही मानवनिर्मित कल्पना. देव म्हणजे कथेतले राजाचे वस्त्र. अस्तित्वात नसलेले. पण सगळ्यांना दिसणारे, किंवा दिसते असे वाटणारे, किंवा दिसते असे भीतीपोटी म्हणावे लागणारे.
ब्रह्मा, हा प्राचीन, वेदकालीन, पुराणकालीन बाळ 'राजा निर्वस्त्र आहे' असे वदताच गदारोळ माजला. देव नाही असे म्हणणाऱ्या ह्या बाळप्रणित नास्तिकवादाने ढोंगी, कपटी, निशाचर विणकरबंधूंच्या पोटावरच पाय दिला आणि युद्धाला तोंड लागले. कायमची रणधुमाळी. विणकर बंधू आणि बाळ कायमचे वैरी झाले.
ब्र: काय ती हिंमत बाळाची! दाद द्यावी लागेल. नारदा, आपणही शेवटी 'देव नाहीत' ह्याच निष्कर्षाप्रत पोहोचलोच आहोत. पण वेदकालीन परिस्थितीत असे म्हणणे म्हणजे कठिणच गेले असेल त्याला. तेव्हा तर वेदांचा, पुराणांचा दाखला देऊन धर्माचा सत्तेसाठी वापर होत असे. पापपुण्याचा बडगा दाखवून जनतेची पिळवणूक करणारा पौरोहित्य करणाऱ्या पंडितांचा एक वर्गच निर्माण झाला होता. बरीचशी पुराणे राजाशी संगनमत करून जनतेला सदैव दडपणाखाली ठेवण्याकरिता लिहिण्यात आली असे म्हणतात. तीही सारी व्यासांनीच लिहिली असेही सांगण्यात आले. मग काय, पुराणातले अक्षर नी अक्षर सत्य गृहित धरण्यात आले. त्यातील स्वर्ग-नरकाची कल्पना, पाप-पुण्याचा तराजू, अग्निहोत्र, कर्मकांडविधी यात सामान्य जनता दबून गेली. भयजन्य श्रद्धेखाली बुद्धी दबून गेली. अशा पार्श्वभूमीवर जर बाळाने बुद्धिवादाचा पुरस्कार केला असेल तर तो धन्यच रे बाबा.
ना: होय ब्रह्मा. ते करतांना सर्व सत्ता व सत्ताभोगी त्याच्या विरोधात गेले यात नवल ते काय? पण या विरोधाने बाळाचे विचार अधिकच कठोर झाले असावे. त्याच्या तलवारीची धार अधिकच पाजळली. महायुद्धच झाले म्हण ना. त्यात बाळाचे सर्व ग्रंथ नष्ट झाले असे म्हणतात. जे काय त्याचे दार्शनिक वाङमय उरले आहे ते तुटपुंजे आहे. तेही वेद पुराणांसारखे सलग नसून तुटक तुटक आहे. पण आहे ते मात्र परखड, जहाल आहे. उदाहरणच बघ.
त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम्
ब्रह्मा राग आला का रे ऐकून?
ब्र: कां? माझ्यावर काही ताशेरे झाडले आहेत की काय? बाकी हे सारे संस्कृतमधे आहे हे मात्र छान. मला काही त्याचा गंध नाही. त्यामुळे आनंदच आनंद! बाकी ते जर्भरी तुर्फरी मात्र आवडले हं. जरतारी वस्त्राचे वर्णन असावे असे वाटले.
ना: ब्रह्मा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! अरे ते दोन शब्द अगदी वायफळ आहेत. त्यांना काही अर्थ नाही. तीन वेदांचे कर्ते लबाड, धूर्त, आणि निशाचर आहेत असे श्लोकात म्हटले आहे. जर्भरी, तुर्फरी वगैरे अर्थहीन बोल वैदिक पंडितांच्या तोंडून निघतांना सारेच जण ऐकतात असे सांगून पंडितांची व ऐकणाऱ्यांची उघड उघड टिंगल केली आहे.
ब्र: नारदा, पण वेद तर चार आहेत अशी आपली समजूत आहे. मग इथे ते तीनच आहेत असे कां म्हटले आहे रे? मला मग एक तोंड स्पेअर असावे म्हणून दिले आहे की काय?
ना: ब्रह्मा, प्रश्न छान. पण मूळ तीनच वेद आहेत असेही बऱ्याच संशोधकांचे मत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद. अथर्ववेद नंतर निर्माण झाला असे म्हणतात. ब्रह्मा, हे वाङमय इतके प्राचीन आहे की नक्की कालावधी खात्रीने सांगणे अशक्य आहे. शहानिशा करायला मानवांना भूतकाळात जाता येत नाही. ते फक्त तुला शक्य आहे. तू उलटी जांभई घेशील तर आपण सहज भूतकाळात जाऊ शकू. एकदा तू तसे केले आहेस. तसा अर्नाळपुराणात उल्लेख पण आहे. वरातगंगा घेऊन आल्यावर तुझ्या उलट्या जांभईने आपण वाड्याच्या भूतकाळात गेलो होतो व आटाळ्यावर जाऊन सीता, राम व हनुमानाला येथे घेऊन आलो होतो. आठवते का?
ब्र: हो तर. ते मी बरे विसरेन.
नारद ब्रह्मा जाती पुन्हा पाताळेश्वर मार्गी हो
नारद दावी जागा जेथे वाडा पूर्वी होता हो
आता तेथे वाडा नाही, तो काळाच्या उदरी हो
रामभक्ती मास्तरांची पूर्वी त्यानेही अनुभविली हो
ब्रह्मनेत्र चमकले, काहीतरी मनात त्याला सुचले हो
उलटी जांभई घेई ब्रह्मा, घड्याळ मागे गेले हो
वाडा तेथे पुनः पूर्ववत, अंगणात झाडे तीच
तेची माजघर, ओसरी, माडी, आटाळेही हो तेच
मुनीस खात्री येथे आले वरातीतले सीता राम
जेथे दोघे, तेथे त्यांचा परमभक्त नक्की हनुमान
आटाळ्यावर निरखुनी पाहता ब्रह्मा दिसले श्री रघुराम
सीता आणि सेवक ओळखती ब्रह्माला, करी प्रणाम
पण नारदा, इतक्या खोल भूतकाळात शिरायला आता उलटी जांभई केवढी घ्यायची? ज्यास्त लांब झाली तर पुन्हा तू माझ्या कपाळात शिरशील व मी एकटा पडीन. ज्यास्तच लांब झाली तर मी पुन्हा हिरण्यगर्भात जाऊन पडीन. नको रे बाबा भूतकाळाच्या खोल डोहात जाणे. थोडीशीही चूक फार महाग पडेल. आपणही मानवांसारखे वर्तमानातच राहू.
ना: जशी आपली इच्छा. ब्रह्मा, बाळाने वेद अपौरुषेय नसून पौरुषेय, म्हणजे मानवनिर्मित आहेत असे म्हटले. देव ही मानवकल्पना आहे असे म्हटले. तसेच परलोक ही सुद्धा केवळ कल्पना आहे असेही म्हटले.
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः
स्वर्ग, मोक्ष, मृत्यूनंतर परलोकात आत्मा जातो वगैरे कल्पनांचे त्याने खंडन केले. वर्ण, आश्रम व त्यानुसार आखून दिलेले कर्मकांड केल्याने अमुक एक फलप्राप्ती होते ही वेद पुराणातील कल्पना तर त्याच्या टीकेचा मुख्य विषय झाली. जे आहे ते पृथ्वी, आप, तेज व वायू या चार तत्वातून निर्माण होते असे त्याचे परखड मत होते. चैतन्य किंवा जीव दुसरे काही आहे, ते किंवा आत्मा मृत्यूनंतरही जिवंत राहतात, आत्मा अमर आहे ह्या कल्पनाच त्याने खोडून काढल्या. सर्व काही पदार्थमूल आहे असा त्याचा सिद्धांत होता. म्हणून पदार्थविज्ञान हेच ज्ञानमूल आहे. वेद, देव व परलोक याबद्दलच्या कल्पना अशा तऱ्हेने फेटाळून लावल्यामुळे त्याला जबर प्रतिकार सहन करावा लागला.
ब्रह्मा, त्याकाळी वेदप्रणित दर्शन हेच जीवनदर्शन होते. त्यानंतर तेच थोडे पुढे नेऊन अनेक पुराणात पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, प्रायश्चित्त, कर्मकांड, यज्ञ अशा पराकोटीच्या स्वार्थपूरक कल्पना मांडण्यात आल्या. साध्या अवर्षेने दुष्काळ पडायचा व गरीबगुदा कामकरी वर्ग सावकारांकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी व्हायचा. कर्ज न चुकविले तर पाप लागेल व नरकात जावे लागेल म्हणून पुरोहित त्यांच्याकडून पापाचा उतारा म्हणून यज्ञयाग करवून घेवून त्यांना आणखी पिळायचा. या कर्मकांडावरही आपल्या बाळाचे भाष्य मोठे कठोर आहे.
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृनिर्मिता
अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड, शरीराला भस्म फासणे इत्यादी बाह्यदर्शन विधी बुद्धी आणि पौरुष नसलेल्या या तथाकथित स्वप्रस्थापित धर्मरक्षकांच्या उपजीविकेसाठीच जणू त्यांच्याच विधात्याने निर्माण केल्या आहेत असे उपरोधात्मक भाष्य ह्या श्लोकात आहे.
ब्र: नारदा, हे फारच जळजळीत आहे रे. पण बहुजनसमाजाचे धर्माच्या नावाने, पापपुण्याच्या, मोक्षाच्या, नरकाच्या कल्पनेने आतंकित करून केले जाणारे शोषण असेच क्रोधजनक असावे. हा बाळ मला तर क्रांतिकारीच वाटतो रे नारदा.
ना: होय ब्रह्मा. शोषितांविषयी कळवळा तर त्याला असलाच पाहिजे. पण त्यांचे शोषण होण्याला त्यांची अंधश्रद्धाही कारणीभूत आहे असेही त्याचे मत असावे. अंधश्रद्धेवरचा त्याचा प्रहार प्रबळ आहे. ब्राह्मणांनी सांगितले म्हणून यज्ञ, प्रेतविधी, श्राद्ध लोक कां करतात, हे किती बुद्धिहीन काम आहे याचा जरासाही विचार ते कां करीत नाही असे त्याला वाटायचे. हे सर्व विधी किती हास्यास्पद आहेत हे समजवून सांगण्याकरिता त्याने उपरोधाचा उपयोग पदोपदी केला आहे.
पशुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते
जीवबळी देण्याची प्रथाही त्याकाळी धर्माच्या नावाने बोकाळली असावी. पण ते तर अनेकांना पाप वाटेल. म्हणून मग बळी दिलेला प्राणी सुद्धा मुक्ती पावून स्वर्गात जातो, आणि बळी देऊन आपण त्या जनावराचे हितच करतो असे त्या क्रूर प्रथेचे समर्थन धर्माचे ठेकेदार करू लागले. ज्योतिष्टोम नावाच्या यज्ञात जनावराचा बळी दिला जाई. मारलेले जनावर जर स्वर्गात जाते, तर यजमान स्वतःच्या पित्यालाच का मारत नाही असा प्रश्न बाळाचा हा श्लोक विचारतो.
मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम्
निर्वाणस्य प्रदीपस्य स्नेहः प्रज्वलयेच्छिखाम्
ब्रह्मा, जंबुद्वीपावरचा श्राद्धविधी तू पाहशील तर तुझ्या अंगावर शहारे येतील. माणूस मरून जातो. तरीपण त्याची स्वर्गाची वाट मोकळी करून देण्याकरिता पुराणात व वेदवाङमयात सविस्तर विधी व मंत्र आहेत. गरुडपुराण कधी वाचशील तर तू पेटून उठशील. त्या विधीबाबतही बाळाने प्रश्न उभे केले आहेत. मेलेल्या जीवांची तृप्ति जर श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल, तर विझलेल्या दिव्याची ज्योतही त्यावर तूप ओतून मोठी होईल असा उपहास ह्या श्लोकात आहे.
ब्रह्मा, माणुस मरून गेला तरी विधी संपत नाहीत रे. त्याचा पुढील प्रवास, त्याची कैलासयात्रा यांचा पण प्रेतकर्मात विचार केला आहे. हसू नकोस, पण स्वर्गारोहण करतांना वाटेत खायला असो म्हणून प्रेताच्या तिरडीला शिदोरी बांधायची पद्धत आहे. नंतर श्राद्धविधीमधेही आत्म्याच्या तृप्तीकरिता कणकीचे गोळे, भाताचे गोळे असतात. हे सगळे हास्यास्पद प्रकार तू निर्मिलेल्या वेदांच्या दुरुपयोगामुळे रूढ झालेले आहेत. पुराणे वाचतांना हसावे की रडावे ते कळत नाही असे तू त्यादिवशी म्हणाला. खरे म्हणजे फोडावे की झोडावे असे वाटायला हवे. असो. हिंसा नको. प्रेताबरोबर शिदोरी देण्याच्या रूढीवर बाळाचे प्रश्न फार मार्मिक आहेत.
गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम्
गेहस्थकृतश्राद्धेन पथि तृप्तिरवारिता
जिवंतपणी प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तीबरोबरही शिदोरी द्यायची पद्धत आहे. 'भूक नसो, पण शिदोरी असो' असे म्हणतात. बाळ म्हणतो, ते तरी कशाला? ते प्रवासाला निघाले की घरीच श्राद्धासारखा काहीतरी प्रकार करावा, म्हणजे त्याना असतील तेथे आपोआपच अन्न मिळेल व त्यांची तृप्ती होईल.
स्वर्गस्थिता यदा तृप्तिं गच्छेयुस्तत्र दानतः
प्रासादस्योपरिस्थानामत्र कस्मान्न दीयते
ब्रह्मा, स्वर्ग वर आहे असे म्हणतात. पाताळ खाली व इहलोत मध्ये. म्हणजे पाताळ हा इमारतीचा तळमजला व स्वर्ग हा वरचा मजला. मृत्यूनंतर स्वर्गात, म्हणजे वरच्या मजल्यावर गेलेल्यांच्या नावे इथे मागे राहिलेल्यांनी दान द्यावे अशी रूढी आहे. ते दान अर्थातच पौरोहित्य करणारा वैदिक ब्राह्मणच घेतो. ही जी स्वतःच्या आमदनीची सोय पुरोहितांनी करून ठेवली आहे त्यावर हा उपहास आहे. दानामुळे स्वर्गात असलेल्यांची तिथल्या तिथे तृप्ति होत असेल, तर इमारतीत वरच्या भागात राहाणाऱ्यांसाठी अन्न खालीच कां देत नाहीत असा कुजकट प्रश्न बाळाने विचारला आहे.
यदि गच्छेत्परं लोकं देहादेव विनिर्गतः
कस्माद्भूयो न चायाति बन्धुस्नेहसमाकुलः
मृत्यूनंतर देह सोडून गेलेली व्यक्ती जर परलोकात जात असेल, तर नातलगांच्या जिव्हाळ्यामुळे ती वारंवार परत कां येत नाही? ब्रह्मा, वरील सारे प्रश्न कुजके वाटतीलही. पण तसे पाहिले तर ते कुणाही किमान बुद्धी असणाऱ्या बालकालाही पडावेत असे प्रश्न आहेत. आणि त्या बालमनाने ते विचारलेही आहेत. राजा निर्वस्त्र कां आहे हा साधा सोपा प्रश्न. पण तो एवढ्या मोठ्या प्रजेत कोणी विचारत नाही. फक्त एका बालकाला तो प्रश्न पडतो.
ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहिस्त्विह
मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित्
नंतर मात्र या साध्या प्रश्नाचे खरे उत्तरही हा बाळ देतो. हे सर्व विधी मृतात्म्याकरिता वगैरे नसून स्वत:च्या उपजीविकेसाठी ब्राह्मणांनी सांगून ठेवले आहेत असे त्याचे सरळसोट प्रतिपादन आहे. नाहीतर येथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापि अस्तित्वात नसती असे तो सांगतो.
ब्रह्मा, बाळ असे म्हणतो कारण त्याचा आत्मा, मोक्ष, परलोक या सर्वांवर विश्वास नाही. हे सर्व भ्रमजाल आहे असे त्याचे दर्शन आहे. मृत्यु म्हणजे बाळाकरिता THE END आहे.
परलोक, पुनर्जन्म, आत्म्याचे अमरत्व हे तो मानत नाही. जे आहे ते फक्त इहलोक. एकच लोक. म्हणजे मी त्रिलोकसंचारी वगैरे नाही. खरे म्हणजे मीच नाही. ह्या साऱ्या मिथ्या कल्पना आहेत. एकच लोक. म्हणून बाळाच्या ह्या दर्शनाला लोकायतवाद असेही नाव आहे.
ब्र: नारदा, की बाळाचे नावच लोकायत आहे रे. त्याचा वाद म्हणून लोकायतवाद?
ना: नाही ब्रह्मा. इहलोकाचे सत्य हेच फक्त सत्य असे त्याचे तत्वज्ञान आहे म्हणून लोकायतवाद. आणि आपल्या बाळाला स्वत:चे नाव पण आहे. ते मात्र मी तुला कधीतरी नंतर सांगीन.
ब्र: नारदा, छळू नकोस. आता तुला ही वृत्ती सोडली पाहिजे. आता काही तू त्रिलोकसंचारी वगैरे नाही. आपण देव नाही. आत्ता सांग बाळाचे खरे नाव काय ते. आत्ताच्या आत्ता.
ना: ब्रह्मा, बाळाचे नाव चार्वाक आहे असे म्हणतात. अंधश्रद्धेवर, प्रेतविधीवर त्याचा आक्षेप होता. अग्निहोत्र, यज्ञयाग, कर्मकांड याचा तो घोर विरोधी होता. पण हा चार्वाकदर्शनाचा एक लहानसा भाग झाला. त्याचा मूळ सिद्धांत होता की ही सर्व सृष्टी पृथ्वी, आप, तेज, वायु अशा चार परमतत्त्वांपासून निर्माण झाली आहे. आकाश हे महाभूत तो मानीत नाही. प्राणी सुद्धा व त्यांचा प्राण सुद्धा या चार तत्त्वांनीच बनतो. 'भूतेभ्यः चैतन्यम्!‘ हा चार्वाकाचा आत्मा किंवा प्राण किंवा जीव याविषयीचा सिद्धांत. पृथ्वी आप तेज व वायू ही चार भूतेच चैतन्यनिर्मितीही करतात असा याचा अर्थ. 'भूतान्येव चेतयन्ते' हा या दर्शनाचा सिद्धांत. 'असे कसे' असा प्रश्न बरेच जण विचारतात. त्याचे उत्तर म्हणून सामान्यांना समजेल असे उदाहरणही तो देतो. विड्याचे पान, चुना, काथ, सुपारी ही तत्त्वे चघळून, त्यांचे चर्वण करून विडा रंगला की आपण विड्यात प्राण आले असे म्हणू का? विड्याचे रंगणे म्हणजेच विड्याचे चैतन्य. त्याचे मूळही तीच चार तत्त्वे. ब्रह्मा, हाच चार्वाकाचा जडवाद.
जडभूतविकारेषु चैतन्यं यत्तु दृश्यते
ताम्बूलपूगचूर्णानां योगाद् राग इवोत्थितम्
ब्रह्मा, हा चार्वाक फार चांगला शिक्षक पण असावा असे वाटते मला. काय सुंदर उदाहरण देतो तो. प्राण्यांचा प्राण, जीव ते आहेत तोवरच आहेत. शरीरातील चैतन्यसुद्धा मृत्यूनंतर नष्ट होते. ते शरीरापासून वेगळे नाही. ती प्राणज्योत सिनेमात दाखवतात तशी कुठे वर वगैरे जात नाही.
चार्वाकदर्शनाचा मुख्य गाभा म्हणजे प्रत्यक्षवाद. 'प्रत्यक्ष' अनुभूती हीच फक्त अस्तित्वाची ग्वाही. 'प्रत्यक्षमेव प्रमाणम्'. अक्ष म्हणजे इंद्रिय. इंद्रियांना ज्याची जाणीव होते व बुद्धीला जे पटते तेच सत्य. यालाच बुद्धिप्रामाण्यवाद, रॅशनॅलिझम म्हणतात. कधीकधी अनुमानाने अस्तित्वाची सत्यता सिद्ध होऊ शकते. किंवा आपला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला जे सत्य पटले आहे तेही सत्य मानायला चार्वाकदर्शनाने तशी थोडीफार सूट दिली आहे. पण कोण असा विश्वासू यावरही मल्लीनाथी आहे. धर्माचे ठेकेदार तर नक्कीच त्या श्रेणीत नाहीत हे त्याचे अढळ मत.
चार्वाकदर्शनात वर्णभेदालाही प्रखर विरोध आहे. हे सारे मनुस्मृतीच्याही आधीचे मत. ब्रह्मा, वर्णभेदाचे खापर हे धूर्त कपटी धर्माचे टेंभेकरी तुझ्याच माथ्यावर फोडतात. भागवत पुराणात तर वेदांचा दाखला देऊन सांगतात की तुझ्या मुखापासून सत्त्वप्रधान ब्राह्मण, तुझ्या भुजांपासून सत्त्वरजप्रधान क्षत्रिय, तुझ्या मांड्यांपासून रजतमप्रधान वैश्य आणि तुझ्या चरणांपासून तमप्रधान शूद्र निघाले. म्हणून ब्राह्मण सर्वश्रेष्ठ.
तूच चार वर्ण निर्माण केले आहेत असे म्हणतात व दाखल्याकरिता कुठलातरी वेदोक्त वा पुराणोक्त श्लोक फेकतात. सर्वत्र वरच्या अर्थाचे श्लोक विखुरले आहेत. चार्वाकाने हे सर्वच खोटे उघडकीस आणले. उच्चवर्णीयांना अर्थातच चार्वाक दर्शन आवडत नाही. आवडेलही कसे? वेदकाळा़त म्हणूनच चार्वाकाचे सर्व साहित्य पद्धतशीर नष्ट करण्यापुरतीच यांची मजल गेली नाही तर त्याला बदनाम करण्याची चढाओढ सुरू झाली. चार्वाक हा राक्षस होता असे पुराणात सुचविले आहे. महाभारतात तर त्याचा खुद्द युधिष्ठिरासमोर खून झाल्याची गोष्ट आहे. पण पुराणातला तो धर्मराज एका शब्दाने बोलला नाही. 'शेवटी विजय माझाच होईल' असे मृत्यूआधी चार्वाक म्हणाल्याचाही कुठेतरी उल्लेख आहे. सत्याचा विजय होईल हे सत्य तर आहेच. आणि खरेच तसे झाले. चार्वाकदर्शन मृत तर झाले नाहीच, पण जसा जसा मानवसमाज प्रगत होत गेला तसे तसे ते अधिक प्रबळ झाले व त्याचे अनुयायीही वाढले. कौटिल्याने तर त्याच्या अर्थशास्त्रात चार्वाक दर्शनाचा आन्वीक्षिकी असा आदरपूर्ण उल्लेख केला आहे. प्राचीन वैज्ञानिक, समाजसुधारक, मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून चार्वाकाचा उल्लेख होतो. बुद्धिप्रामाण्यवादी होता म्हणून तो अनीश्वरवादी व नास्तिक होता हेही खरे.
ब्रह्मा, चार्वाकापूर्वीही हे विचार होते, नाही असे नाही. चार्वाकाच्याही आधी अजीत केशकंबली म्हणून एक विद्वान होता. त्यानेही अशीच मते मांडली. त्याचे केशकंबली नाव त्याच्या विरोधकांनीच त्याला दिले असावे, कारण वाल्मीकी रामायणात अशोकवनातील राक्षसिणींच्या वर्णनात याच नावाचे एक पात्र आहे. तिचे केस इतके लांब की ती तेच पांघरूण म्हणून वापरते. म्हणून केशकंबली. अनीश्वरवाद्यांची ही शृंखला तशी थेट बृहस्पतीपर्यंत पोहोचते असे म्हणतात. देवांचे गुरु. म्हणून या अनीश्वरवादी विचारांना ब्रहस्पैत्य असे काहीसे म्हणतात. केशकंबली याचे तत्त्वज्ञान उच्छेदवाद म्हणूनही प्रसिद्ध आहे. मृत्यूनंतर आत्मा वगैरे असलाच तरी तोही नष्ट होतो असे याचे मत. शाश्वतवादाच्या अगदी विरोधी मत. शाश्वतवाद म्हणजे आत्मा अमर आहे असे मत. म्हणून मग पुनर्जन्म, मोक्ष, स्वर्ग वगैरे वगैरे. म्हणून मग पौरोहित्य करून दक्षिणा उकळणारा लंबोदर वर्ग.
ब्रह्मा, उच्छेदवाद, जडवाद, बुद्धिवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, भौतिकवाद, लोकायतवाद, ब्रहस्पैत्य, निरीश्वरवाद, आन्वीक्षिकी, अनीश्वरवाद, रॅशनॅलिझम, चार्वाकदर्शन हे नास्तिकवादाचे सहस्रनाम असल्यासारखेच आहे. एकूण मत हेच की देव व त्याला निगडित इतर कल्पना वेद पुराणात मांडणारे लोक हे फोकनाडिस्ट आहेत.
ब्र: नारदा, म्हणजे काय रे? मी पहिल्यांदा हा शब्द ऐकतो आहे. शब्दकोशात असेल का?
ना: बहुधा नसावा. अरे फोकनाडिस्ट म्हणजे फोका, फोकनाडा मारणारा. पुड्या सोडणारा. नागपूर नगरीत अब्बुमियाँच्या पुड्या म्हणतात फोकांना.
ब्र: नाही समजले रे.
ना: ब्रह्मा, ही खास नागपुरी भाषा आहे. फोकनाड म्हणजे थाप. फोकनाडिस्ट म्हणजे थापा मारणारा, थापाड्या. ज्या गोष्टींना शेंडा ना बूड अशा गोष्टी ठोकून देणारा. कापुसकोंड्याच्या गोष्टी सांगणारा. कीर्तनकार म्हण वाटल्यास. पण हळू, नाहीतर मार पडेल.
ब्र: व्वा! आवडला हा शब्द. आता मी तुला फोकनाडिस्ट म्हणत जाईन लाडाने कधी कधी. एकदम भारदस्त वाटतं.
ना: म्हण बाबा. मला काय? तू वेदनिर्माता, सृष्टिनिर्माता, अन तुझा पुत्र फोकनाडिस्ट. व्वा!
पण ते असू दे. ब्रह्मा, चार्वाक हा कोणी व्यक्तिविशेष नव्हता तर जडवाद, नास्तिकवादाचे समर्थन करणारे, प्रत्यक्षवादाचे समर्थन करणारे जे कोणी असतील ते सारे चार्वाक असेही म्हणतात. ़चारु म्हणजे सुंदर व वाक् म्हणजे कथन किंवा वाणी. गोड वाणीने लोकांना भुरळ पाडणारे म्हणजे चार्वाक असे हेटाळणी करणारे नाव या नास्तिकवादाचा पुरस्कार करणाऱ्यांचा तिरस्कार करणाऱ्या प्राचीन काळच्या ब्राह्मणांनी त्यांना दिले. चार्वाकांची टिंगल करण्यात आजही तथाकथित आस्तिक लोक मागे पुढे पाहत नाहीत. जो तो चार्वाकाचा एक श्लोक उद्धृत करायला थकत नाही.
यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिवेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:
जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाचा उपभोग घ्या. गरज पडली तर कर्ज काढून सुद्धा लोणी खा. एकदा मृत्यूनंतर देह अग्नीत राख झाला की पुन्हा काही पुनर्जन्म वगैरे नाही.
या श्लोकाचा शब्दशः अर्थ घेऊन जो तो चार्वाकावर किंवा चार्वाकदर्शनावर आसूड ओढत असतो. त्याचे सारे तत्त्वज्ञान भोगवादी आहे असे म्हणतो. हे एवढ्याच करिता की आम्ही बघा किती विरक्त वृत्तीचे, किती अलिप्त आणि आध्यात्मिक वगैरे वगैरे सुचविण्याकरिता. चार्वाकाच्या काळात ब्राह्मणवाद खूप बोकाळला होता. पापपुण्याची कल्पना भोळ्या जनतेत रुजवून तिला यज्ञयाग व कर्मकांडात गुरफटून, अमुक करा म्हणजे तुमचा पुढचा जन्म तरी सुखात जाईल म्हणून ब्राह्मण त्यांना लुबाडीत असत. त्या बहुजनसमाजाच्या मनातून ही भीती काढून त्यांचे सशक्तीकरण करणारे तत्त्वज्ञान साऱ्याच चार्वाकांनी मांडले. खरे म्हणजे वरील श्लोकात भोगवाद नाहीच मुळी. चार्वाक तत्त्वज्ञान तर उलट कर्मयोगावर जोर देते. शेती, गोपालन, व्यापार, सरकारी काम व इतर सदुपयोगी काहीतरी विधायक काम करून बुद्धिमान व्यक्तीने उपजीविका कमवावी असे सुचविते.
कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादि
एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि
नरकाची वगैरे भीती बाळगून, कर्ज घेणे पाप आहे समजून, गेल्या जन्माचे पाप म्हणून हा जन्म गरीबीतच जाणार असे निराशावादी विचार मनात घेऊन कष्टात जीवन जगू नका. तसेच पुढचा जन्म चांगला जावा म्हणून कर्ज काढून यज्ञयाग करण्यापेक्षा यज्ञात वाया जाणारे लोणी वाटल्यास तुम्हीच प्या असा वास्तववादी सल्ला देणे हाही या श्लोकाचा उद्देश असू शकतो. पण सर्वच लोभी लबाड ब्राह्मणांच्या भाल्याची टोके चार्वाकाकडेच वळल्यामुळे त्याच्या कथनातील सामाजिक, मानवी संदेशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले.
ब्रह्मा, हे सर्व प्रयत्न तात्पुरते यशस्वी झाले तरी चार्वाक तत्त्वज्ञान काही नष्ट झाले नाही. त्यावर आजवर जितके संशोधन झाले तितके दुसऱ्या कशावर झाले नसावे. वैज्ञानिक, सामाजिक, मानवीय अशा कुठल्याही निकषावर घासून पाहिले तरी चार्वाक तत्त्वज्ञान अस्सल बावनकशी सोने आज ठरते. आणि इतर धार्मिक वाङमयाचे पितळ उघडे पडते. ब्रह्मा, त्याकाळचे तथाकथित धर्मरक्षक किती खालच्या पातळीपर्यंत पोहोचले होते हे अलिकडच्या संशोधनाने सिद्ध झाले आहे. चार्वाकाला बडवायला सोटा म्हणून जो वरचा श्लोक नेहमी वापरण्यात येतो तो मुळात तसा नसून असा आहे.
यावज्जीवेत् सुखं जीवेत् नास्तिमृत्युरगोचर:
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:
पाचशे सहाशे वर्षांपूर्वी एका तत्कालीन प्रतिष्ठित विद्वानाने तो श्लोक जाणूनबुजून बदलून त्याच्या अर्थाचा अनर्थ केला. आणि हेच लोक मग आपल्या सहिष्णुतेचा टेंभा मिरवतात. मूळ श्लोकात कुठेही दूरान्वयानेसुद्धा भोगवादाचे समर्थन नाही.
ब्र: नारदा, आता असे वाटते रे की उलटी जांभई घेऊन काळ मागे न्यावा व या सगळ्या वैज्ञानिक वृत्तीच्या, सुधारकांचा, मानवतावाद्यांचा सत्कार करावा व दांभिक धर्माचार्यांचा खरपूस समाचार घ्यावा. माझ्या सृष्टीतही माझ्याच नावाचा दुरुपयोग करून धर्माच्या नावाने असा अनाचार झाला याचे मला खूप दु:ख होते आहे.
ना: ब्रह्मा, अन्याय झाला खरा. पण अनीश्वरवादाचे सत्य काही लपलेले नाही. ते सर्वांना माहीत आहे व पटले आहे. नाहीतर खऱ्या देवाला 'अमुकार्थे अक्षदाम् समर्पयामी' असे म्हणून कोणी फसविले नसते. तो नाही, नरक नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून तर पूजेत, यज्ञात असे चीटिंग चालते. पण सारे जण संस्कारांच्या ओझ्याखाली, सामुहिक दडपणाखाली गप्प आहेत, प्रवाहपतित आहेत. म्हणून तथाकथित आस्तिक आहेत. रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत व जयजयकार करीत आहे. तरीपण त्याच प्रजेतील एक भयहीन चार्वाक खरे ते बोलूनच जातो.
प्रत्येत पीढीत चार्वाक होतातच. ब्रह्मा, मिरवणुकीतला लहान मुलगा, अजित केशकंबली, बुद्ध, जैन, आंबेडकर, सावरकर, आगरकर, पु ल देशपांडे, ज्योतिबा फुले व इतर अनेक याच आस्तिकांचे एरवी आवडते असलेले लोक. सारेचे सारे चार्वाक. 'कुणी निंदा, कुणी वंदा, अमुचा मानवहिताचा धंदा' म्हणणारे मृदुभाषी चार्वाक.
ब्रह्मा, आज ही गोष्ट सांगतांना मला विशेष आनंद होतो आहे. आजच माझ्या महती वीणेची ही तार अचानक छेडल्या गेली हाही एक योगायोगच. ब्रह्मा, आजच आणखी एका चार्वाकाचा जन्मदिन आहे. मास्तरांच्या बाळाचा आजच जन्मदिवस. लहानपणी आस्तिकतेचे बाळकडू प्यायलेला हा बाळ मोठा होताच, विज्ञाननिष्ठ, समानतावादी, मानवतावादी झाला. सर्व अभ्यासून, व्यासंगून नंतरच तो तथाकथित नास्तिक झाला. विज्ञान, ज्ञान, समाजावलोकन जर मतपरिवर्तन करू शकले नसते तर मानव आजही आदिमानवच राहिला असता. बाळाच्या बाबतीत तसे झाले नाही, त्याला अभ्यासाचा, व्यासंगाचा फायदा झाला. तो सत्यशोधक, सत्यवादी, सत्यकाम, सत्यार्थी झाला. पिलानी नावाच्या गावी प्रशासनाशी पटले नाही म्हणून बाळाने राजीनामा दिला. तेव्हा त्याला निरोप द्यायला विद्यार्थ्यांची गर्दी लोटली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या मुखपत्रात 'आणखी एका सत्यकामाला निरोप' मथळ्याचा लेख छापला होता. ब्रह्मा, सत्यशोधक, सत्यार्थी, सत्यवादी, सत्यकाम, चार्वाक, प्रमोद हे सारे समानार्थी शब्द आहेत. आणि ते सर्वांना आवडतात. आपण क्रांतिकारी झालो नाही तरी क्रांतिकारी व्यक्ती लोकांना आवडतेच.
चार्वाकाची ज्ञानवेल वाढत राहिली म्हणून आजचा दिवस आला. ब्रह्मा, देवाच्या अस्त्तित्वावर सगळ्यांनाच प्रश्न असतो रे. शंका असतेच. पण लहानपणचे संस्कार, नरकाची भीती, सामाजिक दडपण तसे म्हणू देत नाही. जंतुकवीची एक कविता अशा आस्तिकांच्या गुदमरवणाऱ्या अट्टाहासावरच आहे.
माझ्यामुळे सावली नाही
सावलीमुळे मी आहे
ती मला घेऊन जाते
पाऊल फक्त माझे आहे
आरशामधे तो असतो
जिकडे जातो मला नेतो
त्याला जेव्हा हसू येते
ओठ माझे उलवून जातो
डोळ्यांनी मी जे बघतो
ते केवळ स्वप्न आहे
रात्री बंद डोळा दिसते
तेच सार्थक सत्य आहे
ज्ञानविज्ञानाची मांजर
मला आडवी जात नाही
ॐकाराच्या नादामधे
म्यँाव तिचे उमटत नाही
मी साधा भोळा आस्तिक
तर्काला भीक घालत नाही
गोत्र माझे पुसू नका
चार्वाक तर ते नक्कीच नाही
असो. कोणाला वेड पांघरून पेडगावला जायचेच असेल तर आपण तरी काय करणार? फारच फार तर वेडकंबली म्हणून त्यांचे नामकरण करू.
ब्र: नारदा, तू म्हणजे ... आपल म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!
ना: ब्रह्मा, बाळाला वर बोलावून तू स्वत: खाली पृथ्वीवर पळून आला नसता तर तुला आज चार्वाकदर्शन झाले असते. पण तसा योग नव्हता रे!
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment