गोष्ट चौदावी
बालवेद वाचू नको असे नारदाने सांगितल्यापासून ब्रह्माला काही चैन पडेना. आजकाल असे कां होते ते त्याचे त्यालाच कळत नसे. 'नको करू' या शब्दातच जणू 'कर' असे आव्हान दडलेले असायचे. कोणाची डायरी वाचायची नसते असे नारदाने सांगितले तेव्हाही त्याच्या मनाची अशीच चलबिचल झाली होती. अगदी मन मारून त्याने ते कसेबसे टाळले होते. पण नंतर एक दिवस अशीच चित्रगुप्ताची डायरी समोर दिसली असता त्याचा विवेकाचा बांध ढासळलाच होता. कोंबडी आरवली आणि काकू उठल्या म्हणून त्याच्या हातून ते पाप झाले नाही हे नशीब. पण आज पुन्हा तसेच काहीसे त्याला होत होते.
वेदनिर्मात्या ब्रह्माने बालवेद वाचू नये असे नारदाने कां सांगावे हेही त्यास समजेना. आधी तर हाच नारद त्याला बालवेदातली ही कविता वाच, ती कविता वाच असे म्हणायचा. लिंक द्यायचा. आता काय झाले? आणखी नव्या कविता आल्या की काय? त्यात ब्रह्मावर काही ताशेरे झाडले आहेत की काय? की ब्रह्माचे उगमगूढ त्यात विशद केलेले असेल? त्याला काही कळेना. काय होईल ते होवो असा विचार करून ब्रह्माने त्या बालवेदच्या लिंकवर क्लिक करायचे ठरविले. हा मनस्वीपणा आता त्याचा स्थाईभाव होऊ पाहात होता. कलियुगाचाच परिणाम म्हणून की काय, ब्रह्मा थोडासा चळत जात होता. पृथ्वीतलावर नवा असल्यामुळे त्याला कुठल्याही लिंकवर असे क्लिक करू नये हे माहीत नव्हते. व्हायरस वगैरे तर त्याच्या ध्यानीमनी नव्हते. स्वर्गामध्ये तो सर्वात म्हातारा असल्यामुळे काँप्यूटर वगैरेशी त्याचा फारसा संबंध नव्हता. काँप्यूटर हे दुधारी शस्त्र आहे हे त्याला माहीत नव्हते. शेवटी त्याने नारदाचा सल्ला डावलून जंतुकवीच्या http://balved.blogspot.com/
आधीच एकदा बालवेदमधल्या बऱ्याचशा कविता त्याने वाचल्या होत्या म्हणून की काय पण ब्रह्माला आज कविता वाचता वाचता अनावर कंटाळा आला. ज्रिंभयिका अस्त्राचा निर्माता ब्रह्मदेव आता मानवनिर्मित तशाच अस्त्राचा, नवकवितेचा, हल्ला परतवू शकला नाही. वारंवार येऊ पाहणारी जांभई दाबणे त्याला कठिण गेले. दोन हातांनी स्वतःची चार तोंडे बंद करीपर्यंत एक ब्रह्मजांभई निसटलीच. बालवेद वाचशील तर अनर्थ होईल असे नारद म्हणाला होता. शेवटी व्हायचे ते झालेच. जांभई निसटलीच. नॅनोजांभई काय, ही तर अगदी मेगॅजांभईच. ब्रह्मजांभई. काळ खूप पुढे गेला. काकूंच्या दारावरचे कालनिर्णय २०१६, २०१७, २०१८, २०, २५, ५०, २१००, २२००, २५००, ३०००, ५०००, १००००, २००००, ५००००, १०००००, २०००००, ३०००००, ४०००००, असे वेगाने पुढे जाता जाता आता जरा मंदावले आणि ई. स. ४२८८९८ वर स्थिरावले. १७-१८ फेब्रुवारीची मध्यरात्र झाली आणि आपले चार लाख बत्तीस हजारावे वर्ष संपताच कलियुग संपले. ईसवी सनाचे चार लाख अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठ़्ाण्णवावे वर्ष आले, केवळ एका ब्रह्मजांभईने. कॅलेंडरची पाने अशी उडता उडता केव्हातरी कलकी अवतारही आला आणि गेलाही. जंबुद्वीपावर बरीच कलकीची देवळे पण आली. कलकीचे नवरात्र पण लोकांनी करायला सुरुवात केली. पण तरीही कलियुग संपता संपता पापे इतकी वाढली की युगांताला पर्याय उरला नाही. नवीन मन्वंतरारंभ जवळ आला. आता तर भोवतालचे सारे काही बदलले होते.
प्रत्येक शिवालयातला नंदी आता चारही पाय दुमडून बसलेला असे. कलियुग सुरू होऊन जेमतेन चार पाच हजार वर्षे झाली असतांना वरातगंगा घेऊन पृथ्वीवर आल्यावर लगेचच काही दिवसांनी ब्रह्मा नारदाबरोबर मास्तरांच्या वाड्यासमोरून जाणाऱ्या पाताळेश्वर मार्गावरच्या शिवालयात गेला होता. तिथला नंदी त्यावेळी तीन पाय दुमडून व फक्त एकच पाय न दुमडता बसलेला दिसला होता. नंतर बऱ्याच देवळात नंदी अगदी असाच बसलेला असतो हे ब्रह्माच्या लक्षात आले. ब्रह्माला नवलच वाटले. कारण मंदारपर्वतावरचा शिवाचा नंदी तर नेहमीच उभा असतो. असा पाय दुमडून तो बसत नाही. असा बसला तर तो शिव ध्यानस्थ असतांना राक्षसांचे निवारण, पार्वतीचे रक्षण कसे करणार? त्याला उठायलाच खूप वेळ लागेल. ब्रह्माने नारदाला विचारलेही होते की याचा अर्थ काय? नंदी तीन पाय दुमडून कां बसतो सगळीकडे? नारद म्हणाला होता की पृथ्वीवर देवळात फक्त सत्ययुगातच नंदी चारही पायावर उभा असतो. त्रेतायुगात एक पाय दुमडून पिंडीसमोर बसतो. द्वापारयुगात दोन पाय दुमडून. कलियुगात तीन पाय दुमडून. सत्ययुगापासून कलियुगाकडे येता येता मनुपुत्रांची प्रगति नाही तर अधोगति होत असते. सत्यापासून ते दूर दूर जातात. हे सर्व पाहून नंदी खचत खचत जातो. मानव चळत जातो म्हणूनच मानवांचे आयुष्य आणि युगाची कालमर्यादा सुद्धा कमी कमी होत जाते. सत्ययुगापेक्षा कलियुगात फक्त एक चतुर्थांश वर्षे असतात. आणि आयुष्य तर शंभर वर्षे जरी लाभले तरी उटणाउबड वाटते. शतायु हो असा तोंड भरून आशिर्वाद देतात. दुसऱ्या कुठल्याही युगात असा आशिर्वाद हा शाप झाला असता. सत्ययुगात राजे सहज छत्तीस छत्तीस हजार वर्षे राज्य करायचे. ध्रुवानीच केले होते. आता लोक साठी साजरी करतात. जशी जशी युगे सरतात तशी तशी पापे वाढतात, एन्ट्राॅपी वाढते, अधोगति होते आणि शिवाचे प्रतिरूप असलेला नंदी खचत खचत जातो. कलियुग संपता संपता तर तो चारही पाय दुमडून बसतो. नंदी देवळात कसा बसतो हे पाहिले तर कलियुग संपायला अजून किती वर्षे आहेत, प्रलय व्हायला किती काळ आहे हे ज्ञानी लोक सांगू शकतात. पण ज्ञानी आहे कोण आता? सारे नुसते एम् ए आणि पीएच् डी.
बरेचदा नारद काय म्हणतो हे ब्रह्माला कळत नसे. पण तो तरी कितीदा आणि काय काय समजावून सांगणार? माझा मुलगा खूप हुशार आहे आणि तो काय सांगतो ते मला कळतही नाही यातही ब्रह्माला कौतुक वाटायचे. असो.
ब्रह्माच्या जांभईने काहीतरी चमत्कार केला आणि आता ब्रह्मा आणि नारद एका विशाल समुद्राच्या काठावर 'पाणीच पाणी चहूकडे गं बाई, गेला मोहन कुणीकडे?' असे कुतुहल चेहऱ्यावर घेऊन एकमेकाकडे बघत राहिले.
ब्रह्माला आपल्या नाकातही काहीतरी बुळबुळ होते आहे असे वाटले. आज त्याची चारही तोंडे पण वरचे खालचे ओठ मिटून गप्प होती. सतत वेदांचा उच्चार ब्रह्माच्या तोंडातून व्हायचा. खरे म्हणजे ब्रह्माला सुरुवातीला प्रत्येक वेदाचा; म्हणजे ॠग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेदाचा; अखंड उद्घोष करायला प्रत्येकी एक तोंड आणि इतर व्यवहारातल्या बोलचालीकरिता एक अशी पाच तोंडे होती. पण शिवाबरोबर कैलासावर एक दिवस 'तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ' असा वाद झाला आणि ब्रह्माने शिवाला राग येईल असे काही शब्द उच्चारले. शिवही तसा तापटच. त्यानेही लगेच काळभैरवाचे रूप घेऊन ब्रह्माचे पाचवे तोंड आपल्या करंगळीच्या नखाने धडावेगळे केले होते. तेंव्हापासून चारच तोंडांनी ब्रह्माला काम निभवावे लागत आहे. ब्रह्माचे बोलणे आधीच तसे कमी. आता तर आणखीनच कमी झाले. वेदवदनाकरिता असलेल्या चार वदनांनी अखंड चाललेला वेदपाठ आलटून पालटून थोडा थांबवून तो नारदाशी थोडाफार संवाद करीत असे तेवढेच. पण जांभई आल्यापासून आता त्याच्या मुखातून वेद येणेही अचानकच बंद झाले होते. उच्चार तर सोडा, पण आता तर त्याला वेदांची एकही ऋचा, श्लोक, सूक्त आठवत सुद्धा नव्हते. नाकातील बुळबुळ व स्मरणात असलेले वेद विस्मरणाच्या पडद्यामागे जाणे हा केवळ योगायोग की काय हे ब्रह्माला कळेना. की त्यातही काही अर्थ दडला आहे हेही त्यास कळेना. नारदाला नक्की काहीतरी याबद्दल माहीत असावे असे ब्रह्माला वाटले. पण तो ऐन वेळी कुठे दिसेना. आता आता तर इथे होता. आता हा नेमका कुठे गेला हेही ब्रह्मास कळेना. इंसोम्निया चा त्रास असणाऱ्या ब्रह्माला विलक्षण झोपही यायला लागली. ती कशीबशी टाळून तो जागा राहण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात ओळखीचे 'नारायण नारायण' असे सूर ऐकू आले आणि सोबत चिपळ्यांचा आवाजही आला. आला एकदाचा, असे ब्रह्माला वाटले.
समुद्रालाही आज विलक्षण उधाण आले होते. अशी भरती समुद्राला आलेली हजारो लाखो वर्षात पाहण्यात आली नव्हती. आकाशातही काळेभोर ढग दाटले होते. ढगातून येणाऱ्या जलधारांना पाऊस म्हणणे म्हणजे धबधब्याला शिंतोडा म्हणण्यासारखे झाले असते. आज ढगच नाही तर आकाश फाटले होते. ब्रह्माच्या मनात जंतुकवीच्या मानवचंद्र कवितेचे पालुपद घोळायला लागले आणि तो नारदाकडे तोंड करून म्हणाला, 'महापूर हा, प्रलय असे, की युगांत सांगा तुम्ही'.आज सारेच वेगळे होते. नारदही आज कधी नसतो तितका गंभीर दिसत होता. नारद म्हणाला, ब्रह्मा आपण पृथ्वीवर काका काकूंच्या घरी राहत होतो हे तुला आठवतच असेल. २०१६ चे लीपवर्ष होते. दारावर २०१६ चे कॅलेंडर होते हे तुला आठवतच असेल. तूच लीप वर्षाचे दिवस ३६६ मोजले होते. ब्रह्मा, तुला जांभई येऊ नये म्हणून मी नेहमीच तुझे मनोरंजन करण्याचा, तुला ज्ञानसाधनेत गुंतवायचा प्रयत्न करीत असे. जांभई हे एक महान अस्त्र आहे हे तर तुझ्यापेक्षा ज्यास्त कोणीच समजू शकत नाही. ज्रिंभयिकास्त्राचा तू निर्माता. ते अस्त्र सोडूनच तर तू अंधकाबरोबरच्या युद्धात डाव पालटला होतास व देवांचा विजय झाला होता. म्हणूनच मी तुला स्वतःची जांभई आवरा़़यला नेहमी सांगतो. बुद्धीला सतत चालना दिली, रटाळ नीरस काही वाचले नाही, पाहिले नाही, तर जांभई येण्याची शक्यता कमी होते. म्हणून मी तुला जंतुकवीच्या कविता वाचू नको असे म्हणालो होतो. म्हणून मी तुला काहीच दुसरे वाचायला नसले तर भागवतातल्या मनोरंजक व अद्भुत कथा पण वाचून सांगत असे. पण तू आजकाल रिबेल झाला आहेस. चित्रगुप्ताची दैनंदिनी वाचू नये तरी वाचायला गेलास तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती. तू रात्रीबेरात्री काहीतरी वाचशील व कंटाळून जांभई देशीलच हे मला माहीत होते. तसेच झाले. ब्रह्मा, दारावरचे कालनिर्णय तुझ्या जांभईमुळे फार पुढे गेले. नंदीचा चौथा पाय दुमडत दुमडत जाऊन पूर्ण दुमडल्या गेला. कलियुगाची उरलेली सारी वर्षे भराभर संपून गेली. तूच मला सांगितलेस की हे सातव्या मनूच्या एकाहत्तराव्या चातुर्युगातले शेवटचे कलियुग आहे. हे संपले की या मनूचे राज्य संपेल. आता नवे, म्हणजे आठवे मन्वंतर केंव्हाही सुरू होईल. पुन्हा नवे सत्ययुग येईल. दोन मन्वंतरामधील ह्या संधिकाळात तुला ग्लानी येण्याची शक्यता आहे. पण जागा राहा. ही रात्र वैऱ्याची आहे. आधीच त्याने संधी साधून घाला घातलेला आहे. तुला नकळत तुझ्या नाकपुडीतून तो तुझ्या डोक्यात गेला व सारे वेद त्याने चोरून नेले आहेत. वेद हेच सर्व ज्ञानाचे सार आहेत. पुढच्या मनूला जर ते आपल्या वारसांना देता आले नाही तर मनूचा दनू व मानवाचा दानव होईल. पुन्हा देव दानव युद्धे सुरू होतील. या खेपेसही आपण अंधकावर विजय मिळवू याची काय खात्री? ब्रह्मा, आता पुढे काय होईल हे सर्व शिव आणि विष्णु यांच्यावर अवलंबून आहे. ये, आपण या लाटेवर बसू आणि बघू काय व कसा आठवा मनू नवीन मन्वंतराची सुरुवात करतो ते. तो बघ तुझा मनू, आठवा मनू. समुद्रकाठावर ओंजळीत पाणी घेऊन उदयित सूर्याच्या दिशेने, भविष्याकडे बघतो आहे.
ब्रह्मा आणि नारद चवताळलेल्या समुद्राच्या उत्तुंग लाटेवर बसून आता पुढे काय होणार ते बघू लागले. ब्रह्माने आठव्या मनूला ओळखले. सावर्णी नाव होते त्याचे. या वादळातून त्याला मानवनौका लाखो करोडो वर्षांच्या नव्या मन्वंतरानंतर पुढच्या मनूपर्यंत पोहोचवायची होती. एका मन्वंतरात ७१ चातुर्युगे. म्हणजे ७१ वेळ चारही युगांचे चक्र फिरते. एक चातुर्युग ४३२०००० वर्षांचे. म्हणजे एका मनूचे राज्य जवळजवळ तीस कोटी वर्षे. नव्या सावर्णी मनूचे राज्य तीस कोटी वर्षे चालणार होते. त्या कालावधीत त्याला त्याने निर्मिलेला मानव वैवस्वताच्या कारकिर्दीत निर्मित व प्रगत झालेल्या मानवापेक्षा ज्यास्त प्रगत करायचा होता. पण त्यासाठी त्याला या प्रलयातून मानवबीज, इतर जीवबीज, संस्कृतीबीज, व ज्ञानबीज येणाऱ्या मन्वंतरात सुखरूप पोहोचविणे आवश्यक होते. पण कसे करावे ते त्यास उमगेना. वैवस्वतावरही असाच प्रसंग त्याच्या मन्वंतराच्या सुरुवातीला आला होता. त्याचा सल्ला घेता आला असता तर बरे झाले असते असे सावर्णी मनूला वाटले. पण आता ते शक्य नव्हते. भूत आणि भविष्य कधीच एकमेकाला भेटून हितगुज करणे शक्य नसते. वैवस्वत त्याचे कार्य आटोपून निघूनही गेला होता. सावर्णी आता कुठे कार्यभार ग्रहण करणार होता.
सूर्याला द्यायचे अर्घ्य ओंजळीत धरून सावर्णी समुद्र काठावर उभा असता त्याला ओंजळीत एक लहानसा जीव, एक मासोळी दिसली. तो चिंटू मासा बोलूही लागला. म्हणाला, मला पुन्हा या भवसागरात टाकू नकोस. तो खवळलेला आहे. त्यातले मोठे मासे मला खाऊन टाकतील. मला जीवनदान दे. सावर्णीला दया आली. त्याने
जपून मासा कमंडलूत टाकला, सूर्यार्चना आटोपली व आपल्या कुटीकडे जायला लागला.
जाता जाता कमंडलूतून पुन्हा त्याच माशाच्या बोलण्याचा आवाज आला. बघतो तर काय? मासा कमंडलूएवढा मोठा झाला होता. तो सावर्णीला म्हणाला, मला इथे कोंडल्यासारखे होते आहे. काहीतरी करा. सावर्णीला आश्चर्य वाटले. घरी गेल्याबरोबर आधी त्याने मासा घंगाळात टाकला. तोही मोठ्या जागेत आनंदाने पोहू लागला. सावर्णीची पूजा अर्चा आटोपते न आटोपते तो पुन्हा आवाज आला. जाऊन बघतो तो मासा फुगून घंगाळातही मावणार नाही एवढा मोठा झाला होता. घंगाळातले पाणी ओसंडून छान शेणाने सारवलेल्या जमिनीवर सांडले होते.
सावर्णीने मासा आता कुटीशेजारच्या जलाशयात सोडला व घराकडे यायला वळला. मागून पुन्हा तोच आवाज. पाहतो तर मासा जलाशयाएवढा मोठा झालेला. जलाशयातले पाणी बांध ओलांडून नदीत वाहते झाले होते. माशाचे डोळे सावर्णीकडे आर्जवाने बघत होते. सावर्णीने त्याला जलाशयातून उपजलेल्या नदीत जाण्यास मदत केली. मासा आनंदाने नदीत पोहू लागला. पण पापणी लवते न लवते तोवर तो नदीपेक्षाही मोठा झाला. आता मात्र सावर्णी खूपच आश्चर्यचकित झाला. त्याने माशाला नदीप्रवाहातून समुद्राकडे जायला मदत केली. विशाल समुद्रात शिरताच मासा अधिकच मोठा झाला व त्याला समुद्र अपुरा पडेल असे वाटले. म्हणून समुद्राला पण अभूतपूर्व भरती आली. आत्ता कोठे सावर्णीच्या डोक्यात प्रकाश पडला.
लाटेवर झोके घेणाऱ्या ब्रह्माला हे दृश्य बघून काही कळेना. आताच त्याचा मनू कमंडलूत एक लहानशी मासोळी घेऊन गेला होता. घटकेतच एवढा मोठा मासा घेऊन पुन्हा समुद्रापाशीच आला. तो नारदाला काही प्रश्न विचारणार इतक्यात नारदाने त्याला कोपरखळीने इशारा केला व एकटक सावर्णी आणि माशावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. मुखाने तो 'नारायण नारायण' म्हणाला.
पाहता पाहता सावर्णीने गुडघे टेकले व माशाला नमस्कार केला. सावर्णी म्हणाला, हे नारायणा, तुम्हाला ओळखायला मला उशीर झाला याबद्दल क्षमस्व. चिमुटभर मासोळी समुद्र व्यापते, हे फक्त नारायणाचेच कार्य असू शकते.
ब्रह्माच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडेना. तो गोंधळलेला पाहून नारद म्हणाला की हा मासा म्हणजे बहुतेक विष्णूचा मत्स्य अवतार आहे. सहावा मनू, म्हणजे चाक्षुष मनूचे मन्वंतर आटोपले व वैवस्वत मनूची कारकिर्द सुरू झाली तेव्हाही अगदी असेच झाले होते असा पुराणात उल्लेख आहे. पहिल्या मनूचे, म्हणजे स्वायंभूवाचे, मन्वंतर सुरू झाले तेव्हाही असेच झाले असेही पुराणे म्हणतात. याचाच अर्थ सत्ययुग पुन्हा सुरू होणार आहे. पुन्हा तेच दहा नारायणावतार होतील व सर्व गोष्टी पुन्हा जशाच्या तशा घडतील. ब्रह्मा, जे घडत आहे ते अगदी तसेच आहे जसे आपण Y2K मुळे आपले कैलासावरचे काँप्यूटर क्रॅश झाले तेव्हा घड्याळ साठ वर्ष मागे नेले होते तेव्हा झाले होते. फरक एवढाच की आता काळ मागे नाही, पुढे गेला आहे. कालचक्रच ते. मागे गेले काय, अन् पुढे गेले काय. एकच. तेच ते पुन्हा होणार. आताही पुन्हा जे पुराणात आहे व आधीही झाले आहे तसेच पुन्हा होईल, फक्त मनू वेगळा असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काॅपी पेस्ट प्रत्येक मन्वंतरानंतर होत असावे. बघू पुढे काय होते ते. ती बघ एक रिकामी नाव पण येतांना दिसत आहे. अगदी डिट्टो तेच होते आहे जे मत्स्यपुराणात व्यासांनी आधीच लिहून ठेवले आहे. धन्य ते व्यास!
सावर्णीने मत्स्यावताराला नमस्कार केला. नारदानेही दुरूनच नमस्कार केला. आता मासा बोलू लागला.
वत्सा, तुजप्रत कल्याण असो. तू मनू आहेस. सृष्टिकर्त्या ब्रह्माचा मानसपुत्र. या विश्वातील मानवस्रोताचा उगम. मानवगंगेची गंगोत्री. ही पवित्र वाहती गंगा जसा जसा काळ वाहतो तशी तशी अपवित्र होत जाते. या गंगेचे शुद्धीकरण करणे अशक्यप्राय असते. म्हणून त्या गंगेची गंगोत्रीच अधूनमधून खंडित करावी लागते. गंगा आटली की पुन्हा गंगोत्रीचा शुद्ध सत्य प्रवाह सुरू होतो. तो प्रवाह पुन्हा सुरू होणार आहे. तुझे मन्वंतर आता सुरू होत आहे. पण सुरुवातीलाच ह्या प्रलयाला तुला सामोरे जायचे आहे. बरेच काही लयाला गेले आहे, उरलेले जाणार आहे. अशा वेळी पुढच्या मन्वंतरात पुन्हा सृष्टी निर्माण करायला आवश्यक तेवढ्याच गोष्टी तुला ह्या नावेत ठेऊन समुद्राच्या लाटांवर ही नाव वल्हवायची आहे. मोठे कौशल्य हवे त्यासाठी. नावेत बसताना काही गोष्टी जरूर नावेत घेऊन जाव्या लागतील, स्वत:बरोबर. ते लक्षात घे. जेव्हा केव्हा हे पाणी ओसरेल, कधीतरी ते नक्कीच ओसरेल, तू आणि नाव व त्यातील व्यक्ति व इतर नवीन जीवनावश्यक घटक या नावेत प्रलयपार समुद्रावर तरंगतील. किनाऱ्याकडे नाव वल्हवत आणून तुला पुन्हा मानवसृष्टी अआइई पासून सुरू करायची आहे. आकाशातील सप्तर्षींना पण नावेत बोलावून घे. त्यांची आता पृथ्वीवर गरज आहे. तेच नवीन मानवपुत्रांना जन्म देतील. तुलाही पुन्हा पुत्रप्राप्ती होईल. उत्तानपाद आणि वीरव्रत नावाचे तुझेही दोन पुत्र होतील. बारसे वगैरे करतांना ही नावे लक्षात ठेव. पुन्हा सर्व काही जसेचे तसेच होईल जसे आधी झाले. मूठभर धान्यदाणे, काही रोपटे, एक गाय पण नावेत घे. पंचगव्याशिवाय प्रलयाने झोडपलेली पृथ्वी पुनःपवित्र होणार नाही. आणखी एक गोष्ट नावेत हवी आहे, पण ती मलाच शोधावी लागणार आहे. तिच्याशिवाय नवीन मन्वंतरात मानवी संस्कृती अपूर्ण राहील. तीच गोष्ट शोधायला आता मी जात आहे. ती सापडली की परत येईन. माझी वाट बघ. मी येईन तेंव्हा तू नावेतला हा दोर माझ्या कल्ल्यांच्या दिशेने फेक. म्हणजे मी नावेचा सारथी होईन व नावेला नवीन मन्वंतरात घेऊन जाईन. आता मला जाऊ दे, आणि सांगितले तसे कर. ढग ढळले आहेत. रात्र पण पडते आहे. नाव सोडू नको व अगदी सांगितले तसेच कर. मी येईपर्यंत नाव बुडायला नको. दानव संधी साधून हल्लाही करतील. या वेळेस ते नेहमीपेक्षा ज्यास्त प्रबळ असतात. एरवी मानव व आपण एकीकडे व दानव दुसरीकडे असा लढा असतो. पण कलियुग संपता संपता मानवही दानव झाला आहे. त्यामुळे आता लढाई आपली दानवांशी आहे. शुक्राचार्यही नेहमीप्रमाणे त्यांच्या बाजूने असतील. त्यांनीच बहुधा आपली अनमोल वस्तू कोणाकडून तरी चोरवून घेतली असावी. पण मी ती शोधून आणीनच. चिंता नको. काळजी घे. टेक केअर.
असे म्हणून मासा समुद्रात डुबकी मारून अदृश्य झाला. एवढ्या प्रलयात सुद्धा त्या विशालकाय माशाने सोडलेले कर्बद्विप्राणिदाचे बुडबुडे समुद्रावर येऊन फुटू लागले. बुडबुड्यांची ती रांग पुसट होत होत दृष्टीआड झाली.
ब्रह्मा हे सारेच पाहून व ऐकून अचंबित झाला. वर आकाशात नजर टाकता त्याच्या लक्षात आले की आता तेथे सप्तर्षी नाहीत. ध्रुवतारा मात्र तसाच अढळ, एकटा होता. नावेतही सात जटाधारी व्यक्ति येऊन बसल्याचे ब्रह्माला दिसले. एक गाय, थोडे धान्य व पालापाचोळा पण नावेत दिसला. गाय तर नंदिनीसारखीच दिसत होती. एवढ्या भयाण प्रसंगी पण तिच्या काजळी डोळ्यात तीच नेहमीची करुणा होती. नावेतील सप्तर्षींच्या तेजामुळे एवढ्या रात्रीही नाव लाटांवर हेलकावे घेतांना ब्रह्माला दिसत होती. नाव जवळजवळ भरली होती. मासा आणखी काही घेऊन आला तर नावेत ते मावेल की नाही अशी सावर्णीला चिंता होती. मासा काय आणेल ते सावर्णीला माहीत नव्हते. पण जे असेल ते अत्यंत महत्त्वाचे आहे हे त्याला कळत होते. नाहीतर अशा कठिण प्रसंगी नारायण त्याला सोडून गेला नसता.
इकडे ब्रह्माही आता नारायणाचा मत्स्यावतार समुद्रातून काय घेऊन येणार याचा अंदाज करण्यात गर्क होता. नारदाला ते माहीत असावे असे त्याला वाटत होते. त्याला भूत भविष्य सारेच माहीत असते. पण आज कां कोण जाणे, नारद जरा रिजर्व्ड होता व आपण होऊन काही सांगेल असे त्याला वाटत नव्हते. शेवटी न राहवून त्याने विचारलेच.
नारद म्हणाला की त्यालाही नक्की काही माहीत नाही. पण पुराणे खरी असतील तर एका पुराणात स्वायंभूव मनू टेकओव्हर करतांना जे झाले व दुसऱ्या पुराणात वैवस्वत टेकओव्हर करतांना जे झाले तेच सावर्णी कार्यभार सांभाळतांनाही होईल असे वाटते. दोन्ही वेळा मत्स्यावतार समुद्रात एका कोपऱ्यात दडी मारून बसलेल्या हयग्रीवाला, ज्याने तुझ्या नाकाद्वारे डोक्यात जाऊन वेद चोरले त्याला, शोधून वेद परत घेऊन आल्याचा उल्लेख आहे. याही वेळेस वेद तसेच चोरी गेलेले आहेत. म्हणून तर तुझे नाक बुळबुळ करीत होते. तोच असावा वेद चोरणारा आणि नारायण तेच वेद घेऊन समुद्रातून वर येणार असावा. बघू काय होते ते. आजही मी अंदाज करतो ते खरे झाले तर प्रत्येक मन्वंतरात अगदी तेच ते, तसेच्या तसे, जेव्हाचे तेव्हा, ज्याचे त्यालाच होते असे म्हणायला काही हरकत नाही. काकूंच्याच भाषेत सांगायचे झाले तर अगदी सेम टु सेम.
नारद असे म्हणतच आहे की अचानक समुद्र पुन्हा खवळला. पुन्हा आकाश भरून आले व प्रलयी पाऊस सुरू धाला. नारद आणि ब्रह्मा ज्या लाटेवर बसले होते तिच्याच खालून समुद्रातून तोच मासा अचानक वर आला. लाट दुभंगली. तोल जाऊन ब्रह्मा लाटेवरून घसरला व पाण्यात पडला. नारदाने खूप त्याला सांभाळायचा प्रयत्नही केला. पण ब्रह्मा पाण्यात गेलाच. आता समुद्रातून खूप बुडबुडे वर येऊ लागले. ते लाटेवर फुटत व त्यात कोंडलेला आवाज साऱ्या आसमंतात पसरत असे. बुडबुडेही चार वेगवेगळ्या ठिकाणाहून येत होते. नारदाने ते नक्की आहे तरी काय हे ऐकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डावीकडून येणारे बुडबुडे फुटून त्या प्रलयकाळीही नारदाला ओळखीचे स्वर ऐकू येऊ लागले.
अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजं ।
होतारं रत्नधातमम् ।।
अग्निः पूर्वेभिर्ऋषिभिरीड्यो नूतनैरुत ।
स देवाँ एह वक्षति ।।
हे स्वर म्हणजे तर ॠग्वेदाचे गायत्री छंदातले पहिले सूक्त आहे हे नारदाने ओळखले. नकळत त्याचे हात अग्निदेवाला व ऋग्वेदाला जोडले गेले. जगातले अतिप्राचीन मानवी संस्कृतीचे प्रतिबिंब वेदात आहे हे नारद जाणून होता. म्हणूनच 'तेथे कर माझे जुळती' स्वाभाविक होते. हा काही ब्रह्माने लहानपणी 'बाळ, काकांना नमस्कार कर' म्हटले म्हणून आज्ञाधारकपणे नारदाने काकांना केलेला कृत्रिम नमस्कार नव्हता. हा मनोमन अद्वितीय प्राचीनतम साहित्यसंचयाला केलेला आदरजन्य नमस्कार होता.
आता नारदाच्या पाठीमागेही बुडबुडे वर येऊन फुटू लागले. डावीकडे ऋग्वेदी बुडबुडे फुटतच होते. नारदाने आता आपले लक्ष पाठीमागच्या बुडबुड्यांवर केंद्रित केले.
अग्न आ याहि वीतये गृणानो हव्यदातये ।
नि होता सत्सि बर्हिषि ।।
त्वमग्ने यज्ञानाँ होता विश्वेषां हितः।
देवेभिर्मानुषे जने ।।
नारदाचा चेहरा त्या बिकट परिस्थितीतही उजळला. हे सामवेदातले गायत्रीछंदबद्ध सूक्त ऐकून त्याचे हात पुन्हा जोडले गेले. एकामागून एक सामवेदाचे बुडबुडे लाटेवर येऊन फुटायला लागले.
इतक्यात आता उजवीकडून बुडबुडे यायला लागले. डावीकडचे व मागचे बुडबुडे अखंड फुटतच असता हे नवीन आवाज ऐकून नारद थक्कच झाला.
ये त्रिषप्ताः परियन्ति विश्वा रूपाणि बिभ्रतः ।
वाचस्पतिर्बला तेषां तन्वो अद्य दधातु मे ।।
पुनरेहि वचस्पते देवेन मनसा सह ।
वसोष्पते नि रमय मय्येवास्तु मयि श्रुतम् ।।
अथर्ववेदातील हे सुरुवातीचे अनुष्टुप छंदातले श्लोक ऐकून नारद पुन्हा नतमस्तक झाला. एवढ्यात आता त्याच्या अगदी समोर बुडबुडे फुटायला लागले.
इषे त्वोर्जे त्वा वायवः स्थोपायवः स्थ देवो वः सविता प्रार्पयतु ।।
श्रेष्ठतमाय कर्मण आ प्यायध्वमग्निया देवभागमूर्जस्वतीः पयस्वतीः ।।
कृष्णयजुर्वेदातील तैत्तिरीय संहितेचे हे स्वर कानी येता नारदाच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसांनी पूर्वीचे स्थाई हसू झळकले. सभोवतालची भीषण परिस्थिती आता त्याला विचलित करू शकत नव्हती. तैत्तिरीयाची मजेशीर गोष्टही त्याला आठवली व त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य द्विगुणित झाले. ब्रह्माच्या डोक्यातून चोरी गेलेले वेद नारायणाने पूर्वीसारखेच समुद्राच्या कोपऱ्यात, खोल तळाशी लपून बसलेल्या हयग्रीवाकडून मिळविले व पाण्यात ब्रह्माला ओढून मत्स्यावताराने पुन्हा त्याच्याच चार डोक्यात प्रस्थापित केले हे नारदाने जाणले. ब्रह्माच्या चार मुखातूनच ते चार वेद आता बुडबड्याच्या रूपात वर येऊन डावीकडे, उजवीकडे, मागे व पुढे फुटत होते. याचाच अर्थ ब्रह्माही खाली पाण्यात सुखरूप आहे व लवकरच वर येईल हे त्याला कळले. दानव सुद्धा समुद्राच्या बुडबुड्यांना घाबरतात असे पुराणात त्याने वाचल्याचे त्याला आठवले. हे बुडबुडास्त्र समुद्रमंथनानंतर झालेल्या भीषण सुरासुर संग्रामात इंद्राने वृत्रासुराला मारण्यास वापरले होते. समुद्रमंथनाची ती गोष्ट तो ब्रह्माला कधीतरी सांगणारच होता. वृत्रासुर आठवताच दधीची ऋषींचीही त्याला आठवण झाली आणि त्याने हात जोडले. इंद्र आणि वृत्रासुराचे हाडवैर व दधीचींची हाडे यांची गोष्ट ब्रह्माला सांगावी असेही त्याला वाटले. कालच दोन्ही गोष्टी सांगितल्या असत्या तर ब्रह्माला कंटाळा आला नसता व त्याला जांभई पण आली नसती असेही नारदाला वाटले. पण आता तो विचार करण्यात अर्थ नव्हता. जे व्हायचे ते झालेच. काही का असेना, पण आता परिस्थितीवर त्रिदेवांचे नियंत्रण आहे म्हणून नारदाला आनंद झाला. ब्रह्मा आहे, नारायण आहे, सप्तर्षी आहेत, वेद आहेत, नंदिनी आहे, धान्यबीजे आहेत, वृक्षांकुर आहेत आणि मनु आहे. हे सर्व घेऊन नाव नक्कीच नव्या मन्वंतरात जाईल याची त्याला खात्रीच वाटली. आणखी काय हवे? पुन्हा सत्ययुग, पुन्हा त्रेतायुग, पुन्हा द्वापारयुग, पुन्हा कलियुग. पुन्हा ध्रुवबाळ, पुन्हा राम, पुन्हा कृष्ण. पुन्हा वाडा, पुन्हा मास्तर, पुन्हा म्हातारी, पुन्हा प्रमोद, पुन्हा बेबी, पुन्हा मुले, पुन्हा शाळा, पुन्हा ढाली, पुन्हा कप, .... नारद विचारात खोल खोल शिरतच राहिला. समुद्र वरवर चढतच राहिला.
अचानक पाणी फोडून ब्रह्मा वर आला. त्याच्या चारही मुखातून प्रसवणाऱ्या वेदवाणीत आता नावेतल्या सप्तर्षींचे मंत्रसूरही मिळाले होते. वेदोच्चाराचे व मंत्रोच्चाराचे अद्वितीय सामर्थ्य हेच आता मानवसृष्टीचे कवच होते.
समुद्राने मात्र आता महारौद्ररूप धारण केले होते. सावर्णीची नाव हळूहळू पाण्याने भरली जात होती. केव्हाही समुद्राला स्वाहा होईल असे वाटत होते. सप्तर्षींंचा मंत्रोच्चार समुद्राच्या खळाळ आवाजात दबून गेला होता. सावर्णी पूर्णपणे हतबल झाला होता व त्याने आशा सोडली होती. तेवढ्यात समुद्रात त्सुनामी आली व आकाशाला शिवू पाहणाऱ्या लाटा उसळल्या. तितक्या अंधारातही सावर्णीला लाटांमध्ये माशाचे विराट कल्ले दिसले. काहीतरी मंत्र पुटपुटत त्याने नावेतला दोर गोफण फिरवावी तसा फिरवून माशाच्या दिशेने फेकला. तो नशिबाने त्याच्या कल्यांना वेढा घेत खाली पडला. गळाला मासा लागण्याऐवजी माशाला गळ लागला असेच म्हणावे लागेल. समुद्राचा किनारा म्हणावे असे आता चौफेर नजर टाकली तरी काहीच दिसत नव्हते. दिशाज्ञान कुचकामाचे होते. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा भेद उरला नव्हता. चहूकडे नुसते आकाशाला भिडू पाहणारे, उसळणारे पाणी. मासा भरधाव वेगाने आधी जमीन होती तिकडे न जाता समुद्रात अधिकच दूर जायला लागला असे नारदाला वाटले. अचानक अंधार अधिकच गडद झाला. लाटेवर आरूढ ब्रह्माने डोळे फाडून दूर दूर जाणारी नाव दिसेल तोवर पाहण्याचा प्रयत्न केला. आता मात्र त्या दिशेनी उत्तुंग लाटा सोडून काहीही दिसत नव्हते. ब्रह्मा फक्त बघत होता. डोळे चोळत होता. पुन्हा बघत होता. डोळे चोळत होता. आता त्याने पुन्हा डोळे चोळून उघडले तर दारावर २०१६ चे कालनिर्णय फडफड फडफड उडत होते. काकूंच्या घड्याळाचा गजर ऐकू येत होता.
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment