गोष्ट तिसरी
नेहमी पडल्याबरोबर गाढ झोप लागणा-या नारदाला कां कोण जाणे काल रात्री शांत झोप लागली नाही. सतत या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर. केंव्हा ब्रह्मा काँप्युटर सोडून येईल असे झाले त्याला. गजर झाला, काका काकूंची चाहूल लागली आणि काँप्युटर सोडून क्षणात ब्रह्मा नारदाजवळ आला. हाती काही चिटोरे होते. जाड जाड अक्षरात, अगदी नवशिक्याने लिहावे तसे, काहीतरी लिहिलेही होते त्यावर असे पहाटेच्या अंधारात नारदाला वाटले.
ब्रह्मा! तुझीच आठवण करीत होतो मी. शंभर वर्ष आयुष्य आहे तुला.
ब्रह्माजी घाबरूनच म्हणाले, तुला कसे माहीत? तुला कोणी सांगितले मला शंभर वर्ष आयुष्य आहे ते?
ना: सांगायला कशाला पाहिजे. पृथ्वीवर असे म्हणायची पद्धत आहे. आपण कोणाची आठवण काढत असावे, व तेवढ्यात त्या व्यक्तीने यावे, असे झाले की असे म्हणतात. त्यात एवढे दचकायला काय झाले? तू म्हणजे, ... आपलं म्हणजे, ... हे म्हणजे, ... खूपच बा!
ब्र: मग ठीक आहे. काय, कशी गेली रात्र? कंटाळा येत असेल तर कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?
ना: सांग, ऐकीन बापडा! आयुष्यात नाहीतरी तेवढाच एक विरंगुळा उरला आहे.
ब्र: ऐका तर, मुनीवर! काल मी रात्रभर हिरण्यगर्भातून माझा जन्म कधी झाला ते शोधायचा प्रयत्न केला. खूप माहिती मिळाली. मी खूप म्हणजे, खूप म्हणजे, खूप्पच वर्षापूर्वी आलो नारदा. कल्पना करवणार नाही तुला.
ना: शंभर वर्षांपेक्षाही ज्यास्त आधी की काय? तसं असेल तर तुला शंभर वर्ष आयुष्य आहे असे म्हणणे खूपच चुकीचे झाले ब्रह्मा. मग ती शुभेच्छा नाही, ते अभद्र वचन झाले. मला माफ कर देवा.
ब्र: तस नाही नारदा. हे काळ, वेळ, ती तुझी काळाची सरळ रेषा वगैरे खूपच गोंधळात टाकते आता. जे मी काल रात्री वाचलं ते काहीच्या बाहीच आहे. पुराणांच्याही आधी लिहिण्यात आलेल्या वेदांमध्ये माझा जन्म, माझं आजचं वय, माझा मृत्यू यावर सविस्तर व सविस्तार माहिती आहे. ज्यांनी हे सर्व ग्रंथ लिहिले ते नुसते ऋषीच नाही तर वैज्ञानिक असावे असे मला आता वाटते नारदा. मला आता माझा भूत, वर्तमान व भविष्य काळ समजायला लागला नारदा! वाड्यातली ती म्हातारी मला म्हातारा कां म्हणते ते मला आता कळले नारदा. माझं वय किती हे विचारूच नको नारदा.
ना: बरं नाही विचारत. तू ओघाओघात सांगशीलच पुढे. तुझ्या पोटात काही ते फार काळ टिकणार नाही. पण जरा सविस्तर व समजेल असे सांग. मुख्य म्हणजे मला तुझी जन्मशताब्दी कधी ते जाणून घ््यायची इच्छा आहे. मीही एक ब्लाॅग सुरू करीन म्हणतो. स्मरणिकाही काढू. एखादं माझं पुराण पण खपवीन.
ब्र: ऐक तर. नारदा, भिंतीवरच्या ह्या घड्याळापासून सुरू करतो. तूच मला एकदा समजावून सांगितलं होतं ते काय असतं ते. हा बारका, लांब उड्या मारणारा काटा म्हणजे सेकंद काटा. ६० उड्यात हा एक प्रदक्षिणा करतो. याची एक उडी म्हणजे एक सेकंद. याची एक प्रदक्षिणा म्हणजे एक मिनिट. दुसरा थोडा अंगाने भरलेला, पण तितकाच उंच काटा म्हणजे मिनिट काटा. त्याची एक उडी म्हणजे एक मिनिट. त्याची एक प्रदक्षिणा, त्याचे ६० घरे चालणे म्हणजे एक तास. तो बोदा, बुटका काटा पाच घरे पुढे चालतो एक तासात. ६० घरे चालून त्याची प्रदक्षिणा झाली की १२ तास. त्याच्या दोन प्रदक्षिणा म्हणजे एक पूर्ण दिवस, सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत, २४ तासांचा. असे ३६० दिवस म्हणजे मानवांचे १ वर्ष.
ना: माणसांचे म्हणजे? आपले देवांचे काय वेगळे असते? की आपले वर्षही आपल्यासारखे काल्पनिकच?
ब्र: नारदा, सध्यातरी तसेच समज. पण त्यावर आत्ताच चर्चा नको. ते नंतर बघू.
ना: ठीक.
ब्र: नारदा, हिरण्यगर्भातून माझी उत्पत्ती झाली ती खूपच जुनी घटना. त्यावेळी देवही नव्हते. खरे म्हणजे दानव पण नव्हते. दिवस, रात्र, पहाट, संध्याकाळ काहीच नव्हते. हे तूच मला सांगितले होते. पण आज आपण माझ्या जन्मापासून आजपर्यंत पुढे न येता, आजपासून मागे जाऊ. समजायला सोपे जाईल.
ना: असेच त्या जंतुकवीने त्याच्या 'उद्या लग्न आहे' ह्या कवितेत पण केले होते. तो पण काळाच्या उलट्या दिशेनी गेला होता. वेळ मिळाला तर वाचून बघ. लिंक विचारशीलच म्हणून आधीच देतो.
http://udyalagnaaahe.blogspot.com/2015/11/blog-post.html
ब्र: वाचीन, पण नंतर. आधी ह्या पुराणातल्या सत्यकथा तर वाचून होऊ दे. मला खरेच काही घाई नाही. माझ्याजवळ वेळच वेळ आहे. आता कुठे माझी पन्नाशी उलटली आहे.
ना: खरेच. मग म्हातारी तुला म्हातारा म्हणते ते खरे कसे?
ब्र: सबूर नारदा! कळेल, कळेल. तीही खरी आणि मीही खरा. मी पन्नाशीत, ती नव्वदीत. तरी पण मी तिच्यापेक्षा मोठा. असो! तर मुनी, सध्या आपण कलियुगात आहो हे तुला माहीतच आहे. 'कलियुग गं बाई, कलियुग!' असे उसासे टाकतांना तू काकूंना नेहमी ऐकतोच. हे कलियुग हजारो वर्षंापूर्वी सुरू झाले. स्पष्टच सांगायचे तर ५११७ वर्षंापूर्वी सुरू झाले. आज ईसवी सन २०१५ आहे असे हे भिंतीवरचे कालनिर्णय आपल्याला सांगतेच आहे. म्हणजे, कलियुग ईसवी सन सुरू होण्याच्या ३१०२ वर्षे आधीच्या वर्षी सुरू झाले. पक्की तारीख सुद्धा माहीत आहे नारदा. त्या वर्षीच्या १७-१८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजता कलियुग सुरू झाले असा स्पष्ट उल्लेख आहे. तेव्हापासून ४३२०००, म्हणजे चार लाख बत्तीस हजार वर्षे मोजली तर १७-१८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ई. स. ४२८८९८ मधे कलियुग संपेल.
जुनं कालनिर्णय असेल तर बघ. कलियुगाची सुरुवात त्यात नमूद असेल.
ना: ते शक्य नाही ब्रह्मा. तू पाहतोच दर महिन्यात काकाकाकू रद्दी विकतात ते. इतके जुने कालनिर्णय कसे मिळेल? ब्रह्मा, तुझी उत्पत्ती कलियुगाच्या सुरुवातीची दिसते. म्हणजे तू आज ५११७ वर्षंाचा. खूपच म्हातारा रे! बाप रे बाप!
ब्र: नारदा, इतके सोपे नाही ते. जरा धीर धर. काळ हा काळापेक्षा पण भयंकर आहे बरे! तर हे कलियुग अजून ४२६८८३ वर्षे चालणार आहे. म्हणजे कलियुग एकुण ४३२००० वर्षंाचे असते. असे वेद पुराणे सांगतात. बघ मी तसे लिहून आणले आहे काळजीपूर्वक.
ना: पण कलियुग संपल्यावर काय?कलियुगाच्या आधी काय होते?
ब्र: सांगतो, सांगतो. घाईची काय गरज? कलियुग काही इतक्यात संपत नाही. आणि ते संपले तरी आपण आहोच की. आपण ते सुरू व्हायच्या आधी आलो, आणि ते संपल्यावरही राहणार आहो.
ना: हा! अगदी हायसे वाटले. नाहीतर बांधबूध करायचा विचार होता माझा.
ब्र: नारदा! तुला माहीतच आहे की विष्णूचा ९वा अवतार बुद्ध कलियुगाच्या सुरुवातीस झाला. दहावा अवतार अजून व्हायचा आहे. कलकी अजून यायचा आहे. तो या कलियुगाच्या अंताला येईल असे म्हणतात. त्याचे अवतारकार्य संपले की कलियुग संरेल.
ना: पण मी ऐकले की चार युगे असतात, एकामागून एक येणारी.
ब्र: ते खरेच! पण त्या चार युगातले हे चौथे. कलियुगाआधी द्वापार युग आले. कृष्णावतार त्या युगातला. द्वापारयुग कलियुगापेक्षा दुप्पट अवधीचे. तब्बल ८६४००० वर्षे ते चालले. त्या युगात कलियुगापेक्षा कमी पापी लोक होते असे म्हणतात. मानवांमधे दानवाचा अंश कमी प्रमाणात होता असे म्हणतात. त्याची सत्यावरची आस्था आजच्यापेक्षा ज्यास्त. कलियुग त्या मानाने सर्वात भ्रष्ट म्हणतात नारदा. जितका मानव भ्रष्ट, तितका त्या युगाचा अवधी कमी. म्हणून कलियुग सर्वात लहान.
ना: ब्रह्मा, पण काकाकाकू तर तसे चांगले वाटतात. ते आधीच्या युगातले की काय?
ब्र: तसे नाही नारदा. सगळेच कलियुगी खराब असतात असे नाही. पण एकंदरीत वाईट विचार, वाईट कृती, वाईट लोकांचे प्रमाण ज्यास्त एवढेच.
ना: हं.
ब्र: मुनी, द्वापारयुगापूर्वीचे युग त्रेतायुग. ते कलियुगापेक्षा तिप्पट मोठे, म्हणजे १२९६००० वर्षंाचे. लोक द्वापारयुगापेक्षाही ज्यास्त गुणी, ज्यास्त सत्यप्रेमी. पण perfect नाहीत. थोडी तृटी आहेच. विष्णूनी तीन अवतार घेतले ह्या युगात; वामन, परशुराम व रामचंद्र. त्याच्या आधीचे युग सत्ययुग. कलियुगापेक्षा चौपट याचा अवधी. बरोबर गुणाकार करशील तर १७२८००० वर्षंाचे. ह्या सर्वात मोठ्या युगात विष्णूजींनी ४ अवतार घेतले; मत्स्य, कूर्म म्हणजे कासव, वराह व नरसिंह. समुद्रमंथन पण ह्याच युगात झाले. तुला आठवतच असेल. आताआताचीच तर गोष्ट.
ना: ब्रह्मा, कां टोमणे मारतोस. मला एक गोष्ट कळत नाही. काकू गीता वाचतात तेंव्हा एका श्लोकावर आल्या की आनंदतात.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहं ।।
हा श्लोक वाचला की काकू देवाला नमस्कार करतात. पापे जेव्हा जेव्हा बोकाळतील, धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येईल, तेव्हा पाप्यांचा नाश करायला मी अवतार घेतो असे आश्वासन भगवंताने गीतेत दिले आहे. तू आताच म्हणाला की कलियुग सर्वात भ्रष्ट व सत्ययुग अगदी लोणकढे म्हणून. मग सत्ययुगात चार आणि कलियुगात फक्त दोन, द्वापारयुगात फक्त एकच अवतार कां?
ब्रः ते मला नाही माहित. सोपं काही विचार. मी सध्या बालकमंदिरात आहे असे समजून.
ना: बरे, राहू दे. पण म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी चारही युगे जोडली तर असे चातुर्युग एकूण ४३२०००० वर्षांचे म्हण की. कलियुगाच्या बरोब्बर दहापट.
ब्र: नारदा, बरोबर. तू तसा गणितात पक्काच आहेस म्हणा. चार अन् तीन सात, अन् दोन नऊ, अन् एक दहा.
ना: ब्रह्मा, मला इथली एक गंमत सहज आठवली म्हणून सांगतो.
मास्तरनी सांगितले दऽऽहा
आम्ही काढले आऽऽठ
मास्तरला दिसले सऽऽहा
मास्तरचं तोंड पऽऽहा
ब्रह्मा, एकावर शून्य दहा लिहून मग एकाच्या खाली जोडून आठ लिहायचे. आठला खाली सहाचा आकडा जोडायचा. मग उलटी एक गोल रेघ काढत आधी काढलेल्या दहातल्या एकाच्या डोक्याला जोडायची. अगदी काकांसारखा चेहरा दिसतो पाटीवर, कागदावर. असे करत असतांना वरचा श्लोक म्हणायचा. खूप मजा येते.
ब्र: नारदा, पण हे तर मास्तरांनी कधी नाही शिकविले. आता हे राहू दे. पुढे चल.
ना: ब्रह्मा, पण मग कलियुग संपल्यावर पुढे काय?
ब्र: पुन्हा तीच चार युगे, त्याच क्रमानी येतील नारदा. असे वेदात पुराणात सांगितले आहे. कलियुग संपल्यावर पुन्हा सत्ययुग येईल. नंतर त्रेतायुग, नंतर द्वापार युग, नंतर कलियुग, नंतर सत्ययुग, नंतर त्रेतायुग, नंतर द्वापारयुग, नंतर कलियुग, नंतर सत्ययुग, नंतर
ना: पुरे पुरे. आलं लक्षात. पण हे चातुर्युगचक्र कधी सुरू झाले आणि केंव्हा संपेल? आणि पुन्हा तेच युग आले की पुन्हा तेच अवतार होतील की नवे अवतार, नव्या गोष्टी?
ब्र: पुन्हा तेच अवतार होतील की नवे हे मला माहित नाही. पण तुझा प्रश्न मात्र छान हं. बघू काही माहिती मिळते का. नारदा, असे ७१ वेळा हे चातुर्युग, चार युगांचे चक्र फिरते असे म्हणतात. म्हणजे ७१ x ४३२०००० वर्षे, म्हणजे, तूच कर बाबा गुणाकार. माझा गुणाकार त्याच्या चिन्हासारखा नेहमीच चूक, म्हणजे x येतो.
ना: नंतर करू ब्रह्मा. त्या वाड्यातल्या म्हातारीचा सगळ्यात लहान नातू सहज करेल बघ. ते काय अॅबाकस की काय वापरून. किंवा असेच हवेत बोटे फिरवून. वाड्यातल्या मास्तरांसारखे. आपण नंतर करू. मला हे सांग की हे ७१ चातुर्युगं झाले की मग काय?
ब्र: नारदा, अशा ७१ चातुर्युगांसाठी ब्रह्मा, म्हणजे मीच, एक मनु, म्हणजे ह्या मानववंशाचा जनक निर्माण करतो. ७१ चातुर्युग संपले, की त्या मनूचे राज्य संपते. तसे झाले की मी पुढचा मनु पुढे करतो. तोही मग ७१ x ४३२०००० वर्षे पुरतो, मग आणखी एक मनु.
ना: असे किती मनु?
ब्र: असे १४ मनु एकामागून एक मी निर्माण करतो असे मला कळले. सध्या त्यातल्या सातव्या मनूचे राज्य सुरू आहे. त्याचे नाव वैवस्वत आहे असे म्हणतात. म्हणजे काकाकाकू ह्या सातव्या मनूचे वंशज आहेत. ह्या सातव्या मनूचेही हे शेवटचे, म्हणजे ७१ वे चातुर्युग सुरू आहे. त्या शेवटच्या चातुर्युगातलं हे शेवटचे युग, म्हणजे कलियुग सुरू आहे. हे एवढे कलियुग संपले की त्याचा, म्हणजे वैवस्वताचा अवधी संपेल. तेवढे झाले म्हणजे १४ पैकी अर्धे मनु आटोपले. मग मी लगेच, टंगळमंगळ न करता आठवा मनु आणीन. मग त्याला ७१ चातुर्युगे मिळतील. मग मी ९ वा मनु आणीन. मग त्याला ७१ चातुर्युगे मिळतील. मग मी दहावा मनू
ना: पुरे पुरे. चौदा मनूंचे राज्य आटोपले की काय? मग तुझा The End की काय?
ब्र: नाही रे. घाई करू नको. चौदा चौदा मनूंचे राज्य किती वर्ष चालेल ते जरा बघ. एका मनूचे ४३२०००० x ७१ वर्ष असे आधी आपण पाहिले. त्याला एक मानवांतर म्हणतात. १४ मनूंचे मग १४ मानवांतर म्हणजे ४३२०००० x ७१ x १४ म्हणजे ४३२०००० x ९९४ वर्ष जातील. पहिल्या मनूच्या आधी मला तयारीला थोडा काळ हवा. १४ झाल्यावर आवरासावरीला थोडा वेळ हवा. त्याला संधिकाल म्हणतात. तोही हिशोबात घेतला तर १४ मनू आटोपायला ४३२०००० x ९९४ ऐवजी ४३२०००० x १००० वर्ष लागतात. म्हणजे ४३२००००००० वर्ष. चारशे बत्तीसवर सात शून्य.
ना: पण नंतर काय?
ब्र: १४ मनूंची ही शृंखला आटोपली की ह्या सृष्टीचा अंत.
ना: आणि तुझा पण?
ब्र: नाही नाही. एवढे झाले की माझा फक्त १२ तासाचा एक दिवस संपतो. याला कल्प म्हणतात. १४ मनूंचा हा कार्यकाल आटोपला की फक्त कल्पांत. मग माझी १२ तासाची एक रात्र होते. मी रात्रभर फक्त आराम करतो. माझा २४ तासांचा एक दिवस संपतो. नारदा माझा एक दिवस, ब्रह्मदिवस अशा त-हेनी ४३२००००००० + ४३२००००००० म्हणजे ८६४००००००० मानववर्षांचा असतो.
ना: बाप रे बाप!
ब्र: माझ्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी नवीन सृष्टी तयार करतो. पुन्हा १४ मनू एकामागून एक येतात. माझा दिवस संपतो. कल्पांत होतो. सृष्टीचा अंत होतो. मी रात्रभर झोपतो. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा निर्मिती करतो. १४ मनू पुन्हा तयार करून एकामागून एक आणतो. १४ मनू झाले की कल्पांत होतो. मी रात्रभर झोपतो. सकाळी उठून पुन्हा सृष्टीनिर्माण करतो. १४ मनू झाले की
ना: पुरे ब्रह्मा. असे कितीदा?
ब्र: असे ३६० ब्रह्मदिवस झाले की माझे एक वर्ष होते, ब्रह्मवर्ष. एक ब्रह्मवर्ष म्हणजे मानवांचे ८६४००००००० x ३६० वर्ष. म्हणजे ३११०४०००००००० वर्ष. सध्या माझ्या उत्पत्तीला, माझ्या जन्माला ५० ब्रह्मवर्ष होऊन ५१ वे सुरू आहे. मला १०० वर्षे, ब्रह्मवर्षे, आयुष्य आहे. म्हणजे पृथ्वीवरचे ३११०४०००००००००० वर्ष. ३११०४ वर दहा शून्य.
ना: ब्रह्मा, तुझ्या १०० ब्रह्मवर्षातली ५० झाली असे तू म्हणाला. म्हणजे जवळजवळ १५६०००००००००००० मानववर्षे आटोपली. म्हणजे हिरण्यगर्भातून तुझा जन्म १५६०००००००००००० वर्षांपूर्वी झाला. तुझी १०० ब्रह्मवर्षे झाली की मग काय?
ब्र: माझ्या मृत्यूनंतर नारदा, हे विश्वच संपेल. सगळे विश्व एका बिंदूत सामावेल. काळ सुद्धा संपेल. काळ तू म्हणतोस तसा अनादि अनंत नाही नारदा. तो सुद्धा मी मेलो की मरतो. पुन्हा १०० ब्रह्मवर्षांनी नव्या ब्रह्माची नव्या हिरण्यगर्भातून उत्पत्ती होईल असे भाकीत वेदात पुराणात आहे. पुन्हा काळ सुरू होईल. पुन्हा दानव, देव, मानव, रात्र, दिवस, संधिकाळ वगैरे वगैरे. नव्या ब्रह्माला १०० ब्रह्मवर्ष आयुष्य, त्यात पुन्हा एका ब्रह्मदिवसात १४ मनू, एका ब्रह्मवर्षात ५०४० मनू, १०० ब्रह्मवर्षात ५०४००० मनू वगैरे.
ना: ब्रह्मा, मी थोडी आकडेमोड करून पाहिली. ब्रह्मदिवसात जर २४ ब्रह्मतास धरले, ब्रह्मतासात ६० ब्रह्ममिनिटे धरली, ब्रह्ममिनिटात जर ६० ब्रह्मसेकंद धरले, तर तुझा एक ब्रह्मसेकंद पृथ्वीवर ९८६३० मानववर्षांबरोबर असतो. ब्रह्मा रोज पृथ्वीवर कापुसकोंड्याची एक गोष्ट जरी मी तुला वा तू मला सांगितली तर कितीतरी गोष्टी होतील. सगळं कल्पनातीत आहे. कल्प, कल्पांत म्हणजे खरेच कल्पनांत आहे.
ब्र: नारदा, थोडी गडबड झाली आहे रे! काल रात्री हे सर्व वाचत असता मी बरीच टिपणं घेतली. माझ अक्षर अगदीच नवशिक्या मुलासारख भदाडं आहे. ३११०४०००००००००० चिटो-यावर लिहितांना चिटोरा केव्हा संपला ते कळलेच नाही रे. मी लिहीतच गेलो आणि बरीच शून्ये काकूंच्या टेबलवर लिहिल्या गेली. काकाकाकू उठले आणि मी घाईघाईने इकडे आलो. शून्ये टेबलवर तशीच राहिली. काही होणार तर नाही ना?
ना: ब्रह्मा! होणार काय? एक नवे पुराण घडेल आज. बघू काय होते ते! आलीया भोगासी असावे सादर. आणखी काय!
ब्र: नारदा, माझ डोकं पण रात्रभर वाचून बधीर झालं आहे. मीही एक शून्य आहे असे वाटायला लागले आहे. पडावे म्हणतो जरा दिवसाचं.
ना: पड वाटल्यास. पण माझा डावा डोळा लवतो आहे. अपशकुन असतो हा. काहीतरी अघटित घडेल असे वाटते आहे. झोप तू. काही घडलेच तर उठवीन तुला. शुभनिद्रा!
No comments:
Post a Comment