गोष्ट चौथी
काकू: अहो! इकडे या पटकन. बघा काय झाले ते.
काका: अगं, मी फुले तोडतो आहे. घटस्थापना आहे ना आज. हार करायला नको का? तिथूनच सांग काय झाले ते.
काकू: अहो! काँप्युटरच्या टेबलवर बघा हे काय दिसते. मोठमोठे गोल उमटले आहेत. काल रात्रीपर्यंत नव्हते. रात्रीतूनच आले असतील.
काका: अगं तुझ्यामाझ्याशिवाय घरात आहेच कोण? सकाळपासूनही कोणी आले नाही. मोज किती गोल आहेत ते. मी पण आलोच बघ.
काकू: एक, दोन, तीन, ..... नऊ, दहा. अहो दहा आहेत.
काका: अरे रामा! आज घटस्थापना. देवीचे नवरात्र सुरू. दहा दिवसांनी दसरा. आणि हे दहा गोल काय? रावणाची दहा तोंडे की काय? अरे देवा!
नारद: ब्रह्माजी उठा. तुमच्या हातून टेबलावर उमटलेल्या शून्यांनी कहर केला आहे.
ब्रह्मा; खरेच की काय? की तुझी कापुसकोंड्याची गोष्ट?
ना: देवा, खऱ्यात आणि कापुसकोंड्याच्या गोष्टीत फरक ऐकणाऱ्यानी करायचा असतो. सांगणाऱ्यानी नाही. आज मी तुला वा तू मला कापुसकोंड्याची गोष्ट सांगायची गरज नाही. गोष्ट घडणार आहे. कदाचित ह्या घडणाऱ्या गोष्टीत कापुसकोंड्याची गोष्ट दडलेली असेल तर मला माहीत नाही. आज आपण फक्त श्रोते. डोळे उघडे ठेऊन बघायचे व कान उघडे ठेऊन ऐकायचे. शक्यतोवर तोंड उघडा़यचे नाही. काय?
ब्र: ठीक आहे बाबा! आपण अदृष्य असल्याचा आज चांगलाच फायदा होईल. अगदी जवळून सगळे पाहता येईल. मला सगळे समजेलच असे नाही. तू आहेसच शंका निरसन करायला. कानात विचारीन तुझ्या.
काकू: अहो या लवकर. भानामती असेल असे वाटते. माझ्या मैत्रिणीच्या घरच्या बोर्डवर पण रात्रीतून असेच काहीतरी उमटायचे. भानाम़तीचा प्रकार निघाला. नऊ दिवस अखंड नवनाथ मंत्राचा जप केला तेंव्हा कुठे अरिष्ट टळले.
काका: अग, आपल्याला यातलं काही माहीत नाही. समजत नाही. भानुमती का भानामती ऐकलं खरं, पण आपल्याला अनुभव नाही. आज अनायासे पूजा सांगायला गुरुजी यायचेच आहेत. त्यांना विचारू. ते म्हणतील ते करू. सगळं ठीक होईल. तू म्हणजे, ... आपलं म्हणजे, ... हे म्हणजे, ... खूपच बा!
काकू: अहो तसं नाही. काळजी वाटणं साहजीकच आहे. अशा अनपेक्षित गोष्टी बहुतेक अशुभ असतात. नवरात्रच नेमकं अपशकुनानी सुरू झालं तर पुढे काय होईल? केव्हा गुरुजी येतील असे झाले आहे.
काका: अगं बाई, शांत हो आता. भित्यापोटी ब्रह्मराक्षस म्हणतात तेच खरे.
ब्र: नारदा मला राक्षस म्ह्णाले का रे? त्यांना कसे कळले मी टेबलावर गोल काढले म्हणून. तू तर म्हणाला आपण अदृष्य आहोत म्हणून.
ना: ब्रह्मा, 'भित्यापोटी ब्रह्मराक्षस' हा वाक्प्रचार आहे. ज्याला भीती वाटते, जो घाबरतो, त्याच्या मनात वाईटाहून वाईट विचार येतात. त्या वाईट विचारांचे स्वरूप अफाट असू शकते. या विचारांना, भीतीमुळे उठणाऱ्या पोटातल्या अवास्तव, निराकार, निराधार, निर्गुण गोळ्याला ब्रह्मराक्षस म्हटले आहे. तसा तुझ्या निराधार, अवास्तव, पण तरीही सत्य मानण्यात येणाऱ्या अस्तित्वाकडे अंगुलीनिर्देश नाहीच असे म्हणता येणार नाही. पण तू, मी येथे वावरतो हे काका काकूंना कळले वा त्यांना जराही संशय आला असा याचा अर्थ नाही.
ब्र: मग ठीक. मला आपली उगीचच भीती वाटली.
ना: ब्रह्मापोटी ब्रह्मराक्षस, आणखी काय!
ब्र: हास, हास. नारदा, तू म्हणजे, ... आपलं म्हणजे, ... हे म्हणजे, ... खूपच बा!
काका: आलेच बघ गुरुजी. गुरुजी, शंभर वर्षं आयुष्य आहे बघा तुम्हाला. अगदी तुमचीच आठवण करीत होतो आम्ही.
गुरुजी: हं. घरून वेळेवर निघालो. पण येता
येता पुन्हा परतावे लागले. वाटेत नेमके आज मांजर आडवे गेले. आज घरोघरी पूजा, नवरात्र स्थापना तुमच्याकडे. त्यामुळे अपशकुनाकडे दुर्लक्ष केलेले चालणार नव्हते.
काकू: अगं आई! आज सकाळपासून अपशकुनच अपशकुन. गुरुजी, आमच्या घरी पण बघा काय झाले ते.
गुरुजी: आलोच पाय धुऊन.
काका: या गुरुजी. हे बघा. काल रात्री मी बराच वेळ काँप्युटरवर सर्फिंग करीत होतो. झोपायला जाण्याआधी टेबल साफ करून उठलो. सकाळी आम्ही उठलो तर हिला टेबलवर हे १० गोल गोळे उमटलेले दिसले. आम्ही सोडून घरात कोणीच नाही. आणि तसेही इतक्या आतपर्यंत कोणाला घरात प्रवेश नाही. टेबलवर दहा गोळे पाहून आमच्या दोघांच्याही पोटात गोळे उठले.
गुरुजी: म्हणजे एकूण बारा गोळे म्हणा की. हाऽ हाऽ हाऽ हाऽ.
काकू: गुरुजी, तुम्हाला थट्टा सुचते आहे. इथे माझ्या तोंडचे पाणी पळाले आहे. मला तर भानामतीचा प्रकार वाटतो आहे. हल्ली ती आपल्याच एरियात आहे असे म्हणतात.
गुरुजी: असेलही आणि नसेलही. आज नेमका घटस्थापनेचा दिवस. दहा दिवसांनी दसरा. आणि म्हणून रावणदोष पण नाकारून चालत नाही. तो महा भयंकर. भानामती परवडली एक वेळ. तुमच्याकडे येतांना नेमकी मांजर आडवी गेली यातही काही संकेत असेल असे आता वाटायला लागले आहे. आणि आता हा पालीचा चुकचुक आवाज.
काका: गुरुजी, आधी जरा एक कप गरमागरम चहा घ््या बघू. मग सांगा काय उतारा करायचा ते. तुम्ही म्हणाल ते करू. अरिष्ट टळले म्हणजे झाले.
ब्र: नारदा, झालं यांच चहापान सुरू. काहीही झाल तरी त्यावर रामबाण उपाय. मला तर वाटतं की रोज चहाच्या पाण्यानी ते दहा गोल पुसले तरी ते पुसट होत होत नाहीसे होतील. नाहीतरी चहाच्या भांड्यात तळाशी रोज थोडा चहा उरलेला असतोच.
ना: ब्रह्मा, इतका सोपा उपाय इथे नाही चालत बाबा. उपाय कसा भारदस्त असायला हवा. तहान लागली तर 'पाणी प्या' हा उपाय नाही. तृष्णादोष असू शकतो. योग्य तो उपाय करायलाच हवा. दोषनिवारण विधीपूर्वक व्हायला हवे. बघ पुढे काय होते ते.
गुरुजी: चहा मात्र उत्तम हं. वहिनी, दहा कप चहा करायला हवा अजून. तुमच्या घरी दशानन आलेले आहेत. त्यांची काही खातिरदारी नको का?
काकू: गुरुजी, थट्टा नको, पण तुम्हालाही ती रावणाची तोंडे वाटतात का? यांनाही तसेच वाटले. मला वाटते भानामतीचा प्रकार असावा. नवनाथ मंत्राच्या जपाला ती घाबरते असे ऐकले होते.
गुरुजी: वहिनी, एरवी कुठल्या दिवशी अशी तोंडे उमटली असती तर मीही आधी तोच उपाय केला असता. पण नेमकी आज ती उमटली म्हणून रावणाची शक्यता दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यातही तुम्ही बारकाईने पहाल तर डावीकडून ५ नंबरचे तोंड आकाराने थोडे मोठे आहे. त्याखाली रावणाची मान असली पाहिजे. म्हणजे रावण पाठमोरा नाही. आपल्याकडे बघतो आहे. येतो आहे, जात नाही. जात असता तर डावीकडून ६वा गोल थोडा मोठा असता. रावण दहन पाहणाऱ्यांना हे समजेल. मी तर म्हणतो भानामती आणि रावण, दोन्हीचा इलाज करावा. काहीही असले तरी आपली सुटका होईलच होईल.
काका: पण गुरुजी, त्या तोंडांचा तसा आपल्याला काही त्रास नाही. टेबलक्लाॅथ टाकला तर दिसणारही नाहीत. मग असा घाबरून जाऊन उतारा बितारा कशाला? राहतो तर रहा बाबा. तसेही आमच्या घरात असेच आत्मे वावरतात म्हणे. मागे नाही का स्वैंपाकघरातला एक पेलाच दोन दिवस गायब झाला. नंतर आपण होऊनच परत आला. बरेचदा चित्राहुती जेवण होण्याआधीच गायब होते. दशाननाला पण वावरू दे काही दिवस.
गुरुजी: तुम्ही ठरवा बाबांनो. पण कानाडोळा करण्यासारख्या ह्या गोष्टी नाहीत. मोठा अनर्थ होऊ शकतो.
काका: पण मी म्हणतो, रावण कां येईल?
गुरुजी: अहो, रामायण त्रेतायुगात, महाभारत द्वापारयुगात घडून गेले हे खरे. पण रावणाचे रामाशी वैर, भावाभावातील भाऊबंदकी आज कलियुगातही कोणत्या ना कोणत्या रूपात दृग्गोचर होतेच. म्हणूनच तर हरिविजयातले युद्धकांड, रामायणातले अरण्यकांड आजही घरात कोणी वाचत नाही. वाचायचेच झाले तर देवळात वाचावे असे सांगतात. 'युद्धस्य कथा रम्या' म्हणून कोणी महाभारत युद्धाचे घरी पारायण करीत नाही. युगे उलटली तरी राम-रावण भांडण संपले नाही. ते व्यक्तींचे नसून वृत्तींचे युद्ध आहे. सत्यासत्यतेचे युद्ध आहे. त्याला युगसीमा नाही. कलियुगात तर ते अजूनच भयानक रूपात प्रकट होते. तुम्हाला हवे असेल तर होऊ द्या तुमच्या गृहलंकेत राम-रावण युद्ध १० दिवस. दसऱ्याला काय तो निकाल लागेल. मला काय, मी आपला पूजा सांगून परत जातो. पण हितैशी म्हणून सांगतो की संकटाला देठापासून खुडून टाका. विषाची परीक्षा पाहणे योग्य नाही.
काकू: नाही नाही गुरुजी. तसं अजिबात नाही. तुम्ही म्हणाल ते आम्ही करू.
काका: होय गुरुजी. सर्व उपाय करा आणि आमची सुटका करा.
गुरुजी: ऐका तर मग. भानामतीची ट्रीटमेंट तशी स्टँडर्ड आहे. पाच वर्षंाची गॅरंटी पण आहे. फक्त तीन दिवस रोज सकाळी तीन तास तिघांनी तीन खोल्यात नवनाथ मंत्राचा जप करायचा. भानामतीला सळो की पळो होईल. दहा तोंडे जशी अचानक उमटली तशी तिसऱ्या दिवशी अचानक गायब होतील. नंतर पाच वर्ष तरी पुन्हा त्या अवदसेची चिंता नको.
काका: गुरुजी, तसेच करू. पण तिघे कोण? तुम्ही आणखी दोघांना घेऊन याल का? आणि तीन दिवस तीन तीन तासाऐवजी एकाच दिवशी ९ तास करून नाही का होणार. नाही म्हणजे, तीन त्रिक नऊ म्हणून म्हटलं.
काकू: ते मात्र खरच. एका दिवसात काम खतम्.
गुरुजी: काम खतम्, पैसा हजम्! हाऽ हाऽ हाऽ! तसं नसतं हो. तीन तास तीन खोल्यात मंत्रोच्चार झाला की तुमचं ७०० स्क्वेअर फूटचं घर मंत्रशक्तीनी भरून जाईल. नंतर मंत्र म्हणून न म्हणून काही फायदा नाही. मंत्र घरात मावणार नाहीत. मग ते शेजारी पाजारी जातील व त्यांचा फायदा होईल. तो आपण कशाला करायचा. जाऊ दे की भानामतीकाकूंना शेजारी. ही मंत्रशक्ती एक दिवस टिकते. म्हणून दुस-या दिवशी पुन्हा तीन तास जप. असा हिशोब असतो. तुमच्या ७०० स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटप्रमाणेच मी सांगितले. अगदी भानामती स्पेशल ट्रीटमेंट आहे.
काकू: बरं, करू तीन दिवस. पण तिघे कोण?
गुरुजी: तुम्ही दोघे आणि मी. म्हणजे खर्च कमी पडेल. तुम्हाला दक्षिणा नको.
काकू: अहो पण मला आॅफिसमधे inspection आलं आहे. अर्धा दिवस पण सुटी कठिण आहे.
काका: माझी पण तीच अडचण. क्लोजिंगचे दिवस आहेत. अर्धा दिवस काय, एक तास सुद्धा उशिरा जायची सोय नाही. आमचे साहेब म्हणजे भानामतीकाकूंचे यजमानच हो!
गुरुजी: हाऽ हाऽ हाऽ! मग आॅफिसमधे पण म्हणा नवनाथ मंत्र. काय?
काका: ही बरी आयडिया दिली हो.
गुरुजी: आणखी दोघे मंत्रोच्चाराला मिळणे कठिण हो. डबल दक्षिणा देऊन सुद्धा आजकाल कोणी मिळत नाही. असं करू, एका खोलीत मी बसतो, दोन खोल्यात रेकाॅर्ड लावू. मी आणीन सीडी प्लेअर. त्याचे पैसे दक्षिणेपेक्षा जरा कमीच पडतात. तुम्ही आॅफिसमधे गेले की लावून देईन रेकाॅर्ड.
काका काकू: ते उत्तम.
गुरुजी: आता राहिली non-भानामती ट्रीटमेंट. हा जर भानामतीचा प्रकार नसेल तर मग खरेच रावणप्रवेश झाला असावा. त्याचा इलाज करायला हवा. रावण म्हणजे काही साधासुधा नाही. त्याला हँडल करायला विष्णूला सातवा अवतार, प्रभुरामचंद्र अवतार घ््यावा लागला. मी तर नुसता भडभुंजा. तरी पण प्रयत्न करू. आज नवरात्र बसले की चंडिकेचा वास तुमच्या घरात आहेच. त्याचाही फायदा होईलच. जोडीला 'युगद्वारप्रहरी' यज्ञ करू रोज. यामुळे आधीच्या युगात झालेल्या राक्षसांना आजच्या कलियुगात प्रवेश घेणे कठिण जाते. नाकाबंदी सारखा हा प्रकार आहे. त्रेतायुगातल्या रावणाला नाकाबंदी तोडून, द्वापारयुग ओलांडून कलियुगात येणे कठिण जाईल. रोजचा यज्ञ झाला की यज्ञाच्या पवित्र मंत्रभरीत तीर्थाने मंत्रोच्चारासह ती दहा तोंडे पुसली की दहा दिवसात ती लुप्त होतील. पहिल्या तीन दिवसातच हे टेबलवरचे गोल गेले तर भानामतीचा प्रकार म्हणता येईल. मग पुढचे सात यज्ञ करायची गरज नाही. तेवढाच तुमचा पैसा वाचेल. तीन दिवसात गोळे नाहीच गेले तर मग नक्कीच रावणप्रवेश म्हणावा लागेल. मग उरलेले सात दिवस यज्ञ सुरू ठेवावा लागेल. दशमीला रावण पूर्णतया काढता पाय घेईल. खर्च वाढेल. पण रावणसंकटापुढे पैसा गौणच मानला पाहिजे. नाही का?
काका: हो, ते खरेच. पण गुरुजी, आम्हा दोघांना ह्यातले काहीच जमणार नाही. रोज तुम्हीच येऊन काय ते करा. घराची किल्लीच तुम्हाला देतो. आम्ही आॅफिसमधे गेल्यावर तुम्ही तुमच्या सवडीने या व तो जप, यज्ञ, पूजा वगैरे करा. आमची नावे, पूर्वजांची नावे, गोत्र, गण वगैरे आताच लिहून घ््या. पूजेत ती लागतील तुम्हाला. अॅडव्हांस दक्षिणा पण ठेवा. सविस्तर सगळं होऊ द्या. पूर्ण पाॅवर आॅफ अटर्नी तुम्हाला.
काकू: होय गुरुजी. आम्ही आपले संध्याकाळी टेबलवर रावण आहे की नाही तेवढे मात्र बघू.
गुरुजी: तुम्ही पूर्ण कार्यच मला outsource करता आहात. जमानाच तसा आहे. करीन बापडा. तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळा, मी माझा. पण आता मी जातो. पुजेचं, मंत्रोच्चाराचं, यज्ञाचं सामान गोळा करून आणतो. तुम्ही तेवढी घटस्थापनेची तयारी करा. देवीचा परकर, घटाची समई वगैरे तयार ठेवा. फुलं आहेतच. बाकी असू द्या. अक्षदा मात्र भरपूर असू द्या. बाकी देवीचं नवरात्र वगैरे मी मांडून घेईन.
ना: ब्रह्मा, बघ तुझ्या रात्रीच्या करामतीने केवढा प्रसंग आणला बिचाऱ्या काकाकाकूंवर. गुरुजींना दहा दिवस आता काही दुसरं गिऱ्हाईक बघायला नको. काकाकाकूंना मात्र तू खूप खर्चात पाडलस बाबा. रोजचे कमीककमी १०००० रुपये. म्हणजे दहा दिवसांचे १००००० रुपये. एक लाख मानवमुद्रा. एकावर पाच शून्य. ते आता कुठे टेबलवर बीबलवर नको लिहूस. नाहीतर चार तुझी आणि एक माझे मिळून पाच तोंडे आहेत असा अर्थ काढतील. मग तर देव दानव युद्धच सुरू होईल.
ब्र: नारदा, चूक झाली काल रात्री. आता पुन्हा नाही व्हायची हो.
काका: अगं चल, लोकल चुकेल. मग टॅक्सीचा खर्च. आता काटकसर करायला हवी.
काकू: चला. आणि हो. ते पिकनिक वगैरे कँसल हो. पुढच्या वर्षी बघू.
ना: ब्रह्मा बघ. भीतीचा दशानन यांना काय काय करायला लावतो ते. खुट्ट झालं की हे देवाकडे धावतात. वाट्टेल तेवढा खर्च करतात. तुला आणि तुझ्या वंशजांना वश करायला. आणि हे सर्व व्हायला आज आपणच कारण आहो. पण करणार काय? फक्त पाहणे आपल्या हाती.
ब्र: नारदा, बघ गुरुजी आले. रिक्षाभर सामानही घेऊन आले. मदतीला काही लोक पण आलेले दिसतात. बघ. भराभर त्यांनी सर्व खोल्यांमध्ये गाणे लावले.
ना: गाणे नाही ब्रह्मा. भानामतीचा कोंडमारा करायला घरभर नवनाथ मंत्र भरत आहेत. ऐक ते ऱ्हाम ऱ्हुम ऱ्हीम. बघ गुरुजी कसे यज्ञकुंड बांधत आहेत ते.
ब्र: नारदा, कुंडाला नऊ काठ कां रे? पंचकोनी, किंवा अष्टकोनी, किंवा साधे गोल कां नाही?
ना: ब्रह्मा!
सत्य, अहिंसा, निर्लोभता
त्याग, सेवाभाव, शांतता
शील, संयम आणि शुचिता
असा सुरेख नवकोनाचा
घडवा आकार यज्ञकुंडाचा
असे मास्तरांचे एक भक्तीगीत आहे. यज्ञ नाव आहे कवितेचं. त्यांच्याच 'अमृत कलश' संग्रहात मी वाचल्याचे आठवते. लिंक देतो. तूही वाच फुरसतीनी.
http://sadashivsahitya.
ब्र: जरूर! पण हा धूर बघ किती. ह्या धूरानी पण ती भानुमती पळाली असती.
ना: ब्रह्मा, भानुमती नाही, भानामती. तुला ब्रह्माऐवजी ब्रम्ह म्हटलेलं चालेल का? अर्थाचा अनर्थ होतो. पृथ्वीवर नाव अगदी जीव की प्राण बाबा. ते घेण्यात चूक नको. म्हणून तर बायांना म्हाताऱ्या झाल्या तरी नवऱ्याचे नाव घ््यायला सांगतात. ते चुकायला नको. ह्या लोकांना हजार नावे नसतात रे. एक जीव, एक नाव!
ब्र: भानामती, भानामती. आता नाही चुकणार. पण नारदा, तास झाला. यज्ञ केव्हा आटोपेल.
ना: ते बघ. संपतच आला. ॐ शांति: शांति: शांति: झालच बघ. बघ गुरुजी यज्ञतीर्थ घेऊन काँप्युटरच्या टेबलकडे जात आहेत. आता त्याने रावणाची तोंडे पुसतील.
ब्र: नारदा, तीर्थानी पुसून झाल्यावर आता पुन्हा दहा तोंडांना ते काय लावत आहेत? कापसाच्या फोव्यावर बाटलीतले थेंब कशाचे? हा औषधाचा वास कसा येतो?
ना: ब्रह्माजी, हे मात्र मलाही माहीत नाही हं. पण रावणाची तोंडे थोडी पुसट झाली बघा. काका काकू नक्कीच खूश होतील संध्याकाळी आल्यावर.
ब्र: रावणदहन होणार बहुतेक दहाव्या दिवशी. बाकी गुरुजी एकदम पाॅवरफुल हं. गेले पण बघ. ते मंत्र मात्र दिवसभर चालतील असे दिसते. डोकेदुखीच आहे.
ना: ब्रह्मा, भानामती जाईल की नाही मला नाही माहीत. पण आपण आता जाऊ या बाहेर जरा. त्या झाडावर कालपासून दोन पक्षी येऊन बसतात. एक वरच्या फांदीवर, एक जरा खालच्या. तो काय प्रकार आहे मला कळत नाही. अगदी तत्वचिंतकासारखा बसलेला असतो वरचा पक्षी, न बोलता, न हालता. खालचा सतत काहीतरी खात असतो. हे दोन पक्षांच कोडं मला सोडवायचं आहे. बघू त्यांच्या आसपास घोटाळून काही सुगावा लागतो का.
ब्र: नारदा, मी थकलो रे. झोपीन म्हणतो जरा. काका काकू आले की उठीन. त्यांची काय प्रतिक्रिया होते ते मला पहायचे आहे. रावणतोंडे थोडी पुसट झाली पाहून त्यांना खूप आनंद होईल. मानवमुखावर आनंद फार दुर्मिळ असतो नारदा, अगदी ब्रह्मकमळासारखा. आज मला त्यांचा आनंद पाहण्याचा आनंद घ््यायचा आहे.
ना: ठीक ब्रह्मा. कर तू आराम. मी जरा बघतो ते दोन पक्षी. Two Birds. थोडा फेरफटकाही मारीन म्हणतो. शुभनिद्रा!
ब्र: नारदा, खरं म्हणजे मला झोप येणेही कठिणच! हे दहा दिवस काय होते आणि ही मनुपिल्ले हा भानामतीचा उत्पात किंवा रावणाचा उच्छाद कसा सोडवतात आणि यातून कसे सहीसलामत सुटतात हे मला पहायचे आहे. खूप उत्कंठा लागलेली आहे. पण त्यासाठी नऊ रात्री उलटाव्या लागतील. पृथ्वीवर वेळ जाता जात नाही बरें.
ना: ब्रह्माजी, वेळेचा वेग तुमच्या हातात आहे हे तू विसरतो. तुझा एक सेकंद, एक ब्रह्मसेकंद म्हणजे पृथ्वीवर ९८६३० मानववर्षांबरोबर असतो. एका वर्षात ३६० दिवस म्हणजे तुझा एक सेकंद येथे ९८६३० x ३६० = ३५५०६८०० दिवसांचा. तुझा एक नॅनो सेकंद म्हणजे येथे ०.०३५५ दिवस. तुझे साधारण ३० नॅनोसेकंद म्हणजे इथला १ दिवस. ब्रह्मा, तू जर अशा लहान लहान जांभया, मायक्रो-नॅनो जांभया घेशील तर इथे आताच्या आता भराभर दिवस जातील. फास्ट फाॅरवर्ड. उलट्या जांभया घेशील तर काळ तसाच उड्या मारत मागे जाईल. रिवाइंड केल्या सारखा. अर्नाळ पुराणात तू उलटी जांभई घेऊन मास्तरांचा काळाच्या उदरात गेलेला वाडा पुन्हा उत्पन्न केल्याचा उल्लेख आहे. पुराणातच लिहिले म्हणजे ते सत्यच असले पाहिजे. म्हणून मी तुला त्या पुराणाची लिंक दिली होती. तो श्लोक असा बघ.
नारद ब्रह्मा जाती पुन्हा पाताळेश्वर मार्गी हो ।
नारद दावी जागा जेथे वाडा पूर्वी होता हो ।
आता तेथे वाडा नाही, तो काळाच्या उदरी हो ।
रामभक्ती मास्तरांची पूर्वी त्यानेही अनुभवली हो ।।
ब्रह्मनेत्र चमकले, काहीतरी मनात त्याला सुचले हो ।
उलटी जांभई घेई ब्रह्मा, घड्याळ मागे गेले हो ।
वाडा तेथे पुनः पूर्ववत, अंगणात झाडे तीच ।
तेची माजघर, ओसरी, माडी, आटाळेही हो तेच ।।
मुनीस खात्री येथे आले वरातीतले सीता राम ।
जेथे दोघे, तेथे त्यांचा परमभक्त नक्की हनुमान ।
आटाळ्यावर निरखुनी पाहता ब्रह्मा दिसले श्री रघुराम ।
सीता आणि सेवक ओळखती ब्रह्माला, करी प्रणाम ।।
ब्र: नारदा, मग घेऊ का ९-१० नॅनो जांभया?
ना: घे, पण टप्याटप्याने. प्रत्येक दिवशी काय होते ते बघायला हवे. एक जांभई, एक दिवस!
ब्र: ठीक. तू नोट कर आणि मग काय काय घडले ते मला सांग. तुझी नजर फार तीक्ष्ण. तिच्यातून काही महत्त्वाचे सुटायचे नाही.
ना: ठीक देवा. पण प्रत्येक ३० नॅनो सेकंदाच्या जाभईनंतर थोडा थांबत जा. मला सर्व मनात साठवायला हवे. मग ते नारदपुराण मी तुला सांगीन. बाकी ही माझी नॅनो जांभईची कल्पना मात्र मलाच खूप आवडली हं. क्या बात है!
ब्र: तू आहेच नारदा हुशार. घेतो तर मी ८-१० नॅनो जांभया. भेटू इथल्या दहा दिवसांनी. मग सांग मला सर्व साद्यंत कथा. मग जा तुझे ते दोन पक्षी पहायला. हे बघ मी उलवले माझे ओठ जांभईला!
ना: बस बस बस बस बस! उलटले पण दहा दिवस.
ब्र: मग सांग काय झालं ते.
ना: ब्रह्मा! पहिल्या दिवशी गुरुजी नवरात्र बसवून, सगळ्या खोल्यात नवनाथ मंत्राची रेकाॅर्ड लावून, यज्ञ करून, टेबलवरची दहा तोंडे तीर्थाने तसेच आणखी एका शीशीतल्या द्रव्याने पुसून गेले ते तू पाहिलेच. तोंडं थोडीशी पुसट झाली हेही तू मी पाहिले. नंतर दहा दिवसांच्या घडामोडी मी सांगू का? कापूसकोंड्याची गोष्टं सांगू का?
ब्र: अरे पटकन सांग. छळू नको. ब्रह्म सुद्धा उतावीळ होईल असा हा प्रकार. सांग सांग!
ना: ब्रह्मा, पहिल्या दिवशी संध्याकाळी काका काकू आले ते सरळ काँप्युटरच्या खोलीत गेले. टेबलवरचे दहाही गोल, तू वेंधळेपणाने काढलेले, किंचित पुसट झालेले पाहून काकू तर खूप आनंदी झाल्या. त्यांना इतके आनंदी आपण क्वचितच बघतो देवा. काकांनी लगेच गुरुजींना फोन करून त्यांचे आभार मानले. पलीकडून फोनवरच गुरुजी म्हणाले की त्यांनी असे शंभर रावण नी शंभर भानामत्या पाहिल्या आहेत. प्रत्येक वेळी जीत मंत्रांचीच होते. याही वेळी ते पाहून घेतील. काका काकू त्यांना थँक्यू म्हणाले. थँक्यू म्हणजे आजकाल आभार मानणे झाले.
ब्र: बरं, मग दुसऱ्या दिवशी?
ना: जरा सबूर! दुसऱ्या दिवशी पुन्हा यज्ञ आणि रेकाॅर्डचे मंत्र. पुन्हा तीर्थाने व त्या गुरुजींच्या शर्टच्या खिशातल्या शिशीतल्या द्रव्याने दहा तोंडे पुसल्या गेली. ती आणखी थोडी पुसट दिसायला लागली. संध्याकाळी काका काकू पुन्हा अधिक पुसट तोंडे पाहून आनंदी झाले. पुन्हा गुरुजींना थँक्यू. गुरुजी फोनवर म्हणाले की भानामती नसून प्रत्यक्ष लंकाधिपती असावा असे त्यांना वाटते आहे. त्यामुळे दहा दिवस यज्ञविधी करावा लागेल आणि तसा खर्चही वाढेल. खर्चाची मुळीच चिंता नको पण घरात रामरावण संग्राम नको असे काका म्हणाले.
ब्र: पुढे, पुढे चल.
ना: ब्रह्मा, तिसरा दिवस तसाच. यज्ञकर्म थोडे त्रोटक वाटले. टेबलावरचे गोल थोडे आणखी पुसट झाले, पण गेले नाहीत. रात्री काकाकाकू तेवढ्यानेही खुष झाले. रावणाची तोंडे जसजशी फिकट होतात तसतसे काकाकाकूंचे चेहरे उजळत जातात असे मला वाटले. गुरुजी म्हणाले भानामती नक्कीच नाही. त्यांनी नवनाथ मंत्रांची रेकाॅर्ड बंद करायला सांगितली.
चौथ्या दिवशी गुरुजींनी यज्ञ केला. तीर्थाने न पुसता फक्त शिशीतल्या द्रव्यानेच टेबलवरचे गोल पुसले. कॅसेट प्लेअर काढून ते घेऊन गेले. संध्याकाळी काका काकू प्रगति पाहून आनंदले. पण प्रकरण भानामतीचे नसल्यामुळे उपाय १० दिवसावर गेला म्हणून जरा नाराज पण झाले. काका 'आलिया भोगासी असावे सादर' पुटपुटले.
ब्रह्मा, नंतरचे सहा दिवसही यज्ञ झाला. नवव्या दिवशीच दहा तोंडे पूर्णच नाहीशी झाली होती. संध्याकाळी काकाकाकूंनी गुरुजींना विचारलेही की दहाव्या दिवशी, दसऱ्याला यज्ञाची गरज आहे का? गुरुजी म्हणाले की हा उपाय आपण तापावर अँटिबायोटिक घेतो तसा आहे. एकदा सुरू केला की पूर्ण कोर्स करायलाच हवा. ते स्पष्टीकरण काकाकाकूंना पटलेही. आजच दसरा. सकाळीच यज्ञ झाला. रावण पळून गेला. टेबल स्वच्छ झाला.
ब्र: नारदा, आजच दसरा दिसतो. काका काकूही लवकरच आलेले दिसतात. बघ कडी काढून घरात शिरलेही. सरळ टेबलकडे गेले.
ना: ब्रह्मा, तुला हे सर्व बघायला मान सुद्धा वळवावी लागली नाही. चारही दिशांना तोंडे असल्याचा हा फायदाच हं.
काकू: अहो, गेला बघा एकदाचा. काय तोड असते गुरुजींकडे प्रत्येक संकटाची बघा. गेली ती पीडा. शेवटी पुन्हा दसऱ्याला सत्याचा असत्यावर विजय झाला. ही खरी विजयादशमी हो.
काका: खरं आहे तुझं. दुपारी गुरुजींचा पण फोन होता. अभिनंदनाचा. अरिष्ट टळलं म्हणून. AMC करा म्हणाले.
काकू: हे AMC काय?
काका: अगं, ए. एम्. सी. म्हणजे Annual Maintenance Contract. आपल्या काँप्युटरचा असतो तसा. वर्षाकाठी काही पैसे गुरुजींकडे भरायचे. म्हणजे वर्षांतून काहीही बिघाड झाला तर आपल्याला भुर्दंड नाही. तसंच 'रावणोद्भवनिवारण' यज्ञ दरवर्षी एक करावाच म्हणजे रावण पुन्हा अशी हिंमत करणारच नाही असे म्हणाले. मी लगेच हो म्हणालो आणि येतांनाच पैसेही देऊन आलो. कटकट नको.
काकू: तुम्हीच आहा म्हणून बरं हो. एखाद्या अडाणी माणसाला अशी दूरदृष्टी पण नसणार. काय आणि कसे करतील ते बिचारे गरीब लोक देवच जाणे. भोगत बसतील रावणाचा जाच.
काका: अगं, संध्याकाळ झाली. रावण मारायला हवा.
ब्र: नारदा, आता हा काय प्रकार रे? रावण तर गेला.
ना: ब्रह्मा, दसऱ्याच्या दिवशी हे लोक ताटात तांदुळाचा रावण काढतात. त्याच्या नाभीत काकू आपली सोन्याची अंगठी ठेवतील. रावणाचा प्राण त्याच्या नाभीत आहे असे फितूर बिभीषणाने रामाला सांगितले होते. नंतर रामाने नेमका त्याच्या नाभीस्थलावर बाणाने वार केला म्हणून रावण वारला.
ब्र: अरे असे रावण वारला वगैरे काय म्हणतोस? रावणाचा प्राण गेला तरी म्हण. तू म्हणजे, ... आपलं म्हणजे, ... हे म्हणजे, ... फारच बा.
ना: ब्रह्मा, पृथ्वीवर राहून मला पण वारला, मेला, गचकला, off झाला म्हणायची सवय झाली आहे. ब्रह्मा, बघ काकांनी ठेवणीतल्या जंगलेल्या तलवारीने तांदळाचा रावण मारला. ते बघ त्याचा प्राण, म्हणजे काकूंची अांगठी त्यांना सापडली. असा पराक्रम आपल्या नवऱ्याने केला म्हणून काकूंनी काकांना ओवाळले. याला म्हणतात संस्कृति.
ब्र: नारदा थट्टा नको. मला हे सर्व मनापासून आवडते. हे सर्व करून जर असत्यावर सत्याचा विजय होतो अशी यांना शिकवण मिळत असेल तर त्यात काय वाईट, मी म्हणतो.
नारदा, राहून राहून मला एक गोष्ट मनात येते. त्या दिवशी पहाटे टेबलावर रावण उमटला, तेव्हाच मी एक लहानशी उलटी नॅनोजांभई घेतली असती तर काळ थोडा मागे गेला असता. दहा तोंडे आपोआपच नाहिशी झाली असती. होत्याचे नव्हते झाले असते. काकाकाकूंचा हा सर्व त्रास वाचला असता. नाही का?
ना: होय ब्रह्मा. पण विधिलिखित कोणाला टळलं आहे का? जे व्हायचं ते होतच. लक्ष्मी काकाकाकूंकडून गुरुजींकडे जाणार असे कुठेतरी लिहिले होते. ते कसे टळणार!
ब्र: होय. तुला नी मला आता झोप येते आहे ती येणारच. शुभरात्री!
ना: तू झोप. मी आपला ते पक्षी बघतो. शुभरात्री!
No comments:
Post a Comment