गोष्ट पहिली
ना: ब्रह्मा, कापुसकोंड्याची गोष्ट सांगू का?
ब्र: हो, सांगा मुनिवर! पण कृपा करून जरा सोपी, सरळ!
ना: ऐक तर! तुलाच माहित नसलेली, तुझीच गोष्ट, तुलाच सांगतो.
फार फार वर्षांपूर्वी, खरं म्हणजे फार फार शतकांपूर्वी, तसं म्हणावं तर फार फार युगांपूर्वी. जाऊ दे, असं नाही समजणार तुला.
ब्र: राहू दे. आवडली मला गोष्ट.
ना: तसं नाही रे! किती काळापूर्वी हे सांगता येत नाही आहे. अगदी सुरुवातीला. अगदी काळाच्या सुरुवातीला. Zero of time. पण तसं म्हटल तर तू म्हणशील, मग त्याच्या आधी काय? म्हणून विचार करीत होतो की गोष्टीला हात कसा घालावा. तू म्हणजे....आपलं म्हणजे....हे म्हणजे....खूपच बा!
ब्र: बरं सांग.
ना: ब्रह्मा! काळाचे तीन तुकडे; आधी, आता आणि नंतर. Past, present and future. भूत, वर्तमान आणि भविष्य.
ब्र: नारदा, थांब थांब. मला पण कविता जमली.
आधी, आता आणि नंतर
past, present and future
भूत, वर्तमान आणि भविष्य
मी पण मोठ्ठा कवी झालो, इश्श!
ना: Keep it up ब्रह्मा, keep it up! जंतुकवीवर पण ताण! पण जरा गोष्ट पुढे नेऊ दे please!
तर असा हा तीन तुकड्यात वाटला गेलेला काळ! 'आधी' म्हणजे किती आधी सांगणे व्यर्थ. कारण मग त्याच्याही आधी काळ असलाच पाहिजे. 'आधी' ला सुरुवात नाही. 'आधी'ला आदि नाही. तो अनादि. पण त्याची सीमा म्हणजे 'आता'. ह्या घडीपर्यंत. आताच्या पुढे तो जात नाही. तो अनंत नाही. फक्त अनादि. तो 'आता' पाशी येऊन संपतो.
'आता' म्हणजे आता.
ब्र: व्वा, काय व्याख्या 'आता'ची? आता म्हणजे आता! ब्रह्म म्हणजे ब्रह्म, नारद म्हणजे नारद. कापुसकोंड्या म्हणजे कापुसकोंड्या. व्वा!
ना: कर, कर टिंगल. तुलाच माहित नसलेल्या, तुझ्याच गोष्टीची तूच टिंगल कर. तसं नाही रे. 'आता' म्हणजे हा क्षण. हा क्षणभंगुर क्षण. पुढचा नाही, आधीचा नाही! फक्त हा. जिथे 'आधी' चा अंत होतो तो क्षण. जेथे 'नंतर'ची सुरुवात होते तो क्षण. 'आता' म्हणजे आता.
पण हा स्थिर नाही. हा पुढे पुढे सरकतो आहे. हा बिंदु कालरेषेवर पुढे सरकतो आहे. ह्याला अवधि नाही. ह्याला duration नाही. क्षणापेक्षाही लहान, क्षणांश, एक दशांश क्षण, एक शतांश, सहस्रांश ...... जवळ जवळ शून्य होऊ पाहणारा कालावधी. Tending to zero म्हणतात गणितात. हा येतो आणि जातो.
ब्र: पण ह्याची व्याख्या करण्यात मात्र बराच अवधी गेला, नारदस्वामी. पण मला समजले हो मुनी. हा जवळजवळ नसलेला, एकीकडे 'आधी' च्या अंताला व दुसरीकडे 'नंतर'च्या आदिला चिकटलेला वेळेचा एक अतिसूक्ष्म तुकडा. भूत आणि भविष्य यांच्या मधला वर्तमानाचा अस्थिर, निसटता, पण सत्य पळ.
ना: होय ब्रह्मा, तेच खरे. वर्तमान भूतात जाऊ शकत नाही, भविष्यात शिरू शकत नाही. पण सतत पुढे सरत असते. ह्याच्यामुळे भूत भविष्याला स्पर्श करू शकत नाही. ह्या वर्तमानाची सुरुवात आणि शेवट एकच. आदि म्हणजेच अंत. दोन्ही एकात सामावलेले. अनादि नाही, अनंत नाही. हा एकाद्यंत. 'वर्तमान हे अधर अलौकिक । इथेच थांबो कालचक्र हे ।।' असे कलियुगातील जंतुकवीने उगाचच नाही म्हणून ठेवले. पण ब्रह्मा, कालचक्र थांबत नाही, थांबू शकत नाही. काळाशी कोणी 'statue, over' चा खेळ खेळूच शकत नाही. जंतुकवीने म्हटलेच आहे:
''स्टॅच्यू' जर तो कधीही झाला ।
'स्टॅच्यू' सारे विश्वची घडे ।।'
ब्र: बाळा, हा कलियुगातील जंतुकवी कोण? ह्या त्याच्या कविता कुठल्या? हा 'स्टॅच्यू, ओव्हर' चा खेळ काय? थोडं मलाही सांग. माझं वाचन जरा कमीच. पण कविता वाचाव्याशा वाटताहेत.
ना: ब्रह्मा, आता इथे नको. नाहीतर कापुसकोंड्याची गोष्ट राहिली दूर, कवितावाचन सुरू. तसाही हा जंतुकवी avoidable आहे. तरी पण लिंक तुला देतो. जा हवे तर! पण नंतर.
http://balved.blogspot.com/
ब्र: जाईन बापडा. ने तू गोष्ट पुढे.
ना: ब्रह्मा! 'आधी' व 'आता' नंतर येतो 'नंतर', भविष्य, पुढे येणारा काळ. 'आता' संपला की ह्याची सुरुवात होते. हा अनादि नाही. वर्तमान पळ हा याचा आदि. पण ह्याला अंत नाही. हा अनंत. 'आधी'चं आरशातलं प्रतिबिंब! आरसा वर्तमान क्षणावर ठेवलेला.
ब्र: नारदा, ह्याचा अर्थ काळाचे तीन खंड, आधी, आता, नंतर. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. पहिला अनादि पण ज्याचा अंत आहे, दुसरा एकाद्यंत म्हणजेच ज्याचे आदि अंत एकच आहेत, व तिसऱ्याचा आदि आहे पण जो अनंत आहे. तिन्ही जोडले तर मग काळ अनादि अनंत झाला की, माझ्यासारखा.
ना: ब्रह्मा, तू, मी तसे आहोत की नाही ते तुला माहीत. खरे म्हणजे 'तसे आहोत की नाही' च्या आधी 'आहोत की नाही' हाच प्रश्न आहे. पण काळ खरेच अनादि अनंत आहे. भूमितीमधे 'सरळ रेषा' अशी एक व्याख्या आहे. ती सरळ रेषाही अशीच अनादि अनंत. आज कोणाही शाळकरी मुलाला विचारशील तर तो तुला y = mx + c असे सरळ रेषेचे समीकरण सहज सांगेल. हिच्या कोणत्याही तुकड्याला रेषाखंड, किंवा रेखाखंड, किंवा line segment म्हणतात. तूही नववीच्या वर्गात शिकला आहेस वाड्यातल्या मास्तरांकडून. भूतकाळातली ही गोष्ट विसरला असशील तर जा भविष्यकाळात मी देतो त्या लिंकवर. पण आत्ता, वर्तमानकाळात कापूसकोंड्याची गोष्ट जाऊ दे पुढे.
http://sadashivsrushti.
ब्र: थोडं थोडं आठवतं आहे नारदा. y = mx + c, x goes from minus infinity to plus infinity, line is made of infinite connected points. A point, म्हणजे बिंदु, has existence, but is dimensionless.
व्वा! काय शिकवायचे मास्तर!
ना: छान! माझं काम सोपं झालं. ब्रह्मा, काळ पण अशीच सरळ रेषा आहे. Minus infinity पासून plus infinity पर्यंत. वर्तमान हा त्यावरचा एक बिंदु. जो सतत पुढच्या, पुढच्या बिंदूवर जात आहे. Minus infinity पासून ह्या बिंदूपर्यंत भूतकाळ, हा बिंदु वर्तमानकाळ, व ह्याच बिंदूपासून plus infinity पर्यंत भविष्यकाळ.
ब्र: हात्तिच्या! मग काळ ही सरळ रेषा आहे. मग कालचक्र कां म्हणतात? ते चूक आहे.
ना: Good आणि बरोबर ब्रह्मा! नुसती सरळ रेषाच नाही, तर एकाच दिशेनी वाहणारी अखंड ओघवती नदी आहे ती. भूत-वर्तमान-भविष्य. काळ उलट्या दिशेनी वाहू शकत नाही. ह्या रेषेवरही दिशा दाखवणारा बाण, म्हणजे arrow हवा. आजकाल अशा रेषेला diagraph म्हणतात. पण ते असू दे. ब्रह्मा, ह्या अनादि अनंत कालरेषेच्या भूतकाळातल्या एका कालबिंदूवर आपली आजची गोष्ट सुरू होते एवढचं मला सांगायचं आहे. थकला नसशील तर पुढे जाऊ. नाहीतर उद्या.
ब्र: इर्शाद इर्शाद! गोष्ट संपवण्याच्या दिशेने कथनाचा diagraph पुढे जाऊ द्या.
ना: अनादि अनंत जसा काळ, तसाच अनादि अनंत अवकाश, खगोल, space. कुठे सुरू, कुठे संपते ही जागा ते सांगणे कठिण. इथून इथपर्यंत म्हणाव तर 'इथून'च्या अलिकडे काय आणि 'तिथून'च्या पलिकडे काय असे प्रश्न उभे होतात. अलिकडे पलिकडेही अवकाशच. ह्या विश्वाला कुंपण नाही, boundary wall नाही. कारण त्याच्याबाहेरही काही असलेच पाहिजे. तोही तर विश्वाचाच भाग. तीही तर spaceच. मग त्याच्या बाॅर्डरला कुंपण टाका. पण मग त्याच्या बाहेर काय? एकूण काय की अवकाशाला सीमा नाहीत.
फरक फक्त एवढाच की काळ 1-D आणि अवकाश 3-D.
ब्र; आता हे 1-D, 2-D, 3-D रे काय? काही समजेल असं बोलावं माणसानं.
ना: ब्रह्मा, काळासारखाच अवकाश अनादि अनंत असला, तरी दोघांच्या अनादिअनंतपणात फरक आहे. गणितात बिंदूला zero dimensional, सरळ रेषेला one dimensional (1-D), वक्र रेषेला, जर ती पाटीसारख्या सपाट पृष्ठभागावर असेल तर, two dimensional (2-D), सपाट पृष्ठभागालाही 2-D, अ-सपाट पृष्ठभागाला तसेच कुठल्याही घनाकार वस्तूला three dimensional (3-D) म्हणतात. ज्यास्त सांगत नाही, नाहीतर गोष्ट रुळावरून घसरेल. थोडं गूगल कर वाटल्यास नंतर. थोडक्यात, रांगोळीचा थेंब 0-D; रांगोळीच्या सरळ रेघा, स्वस्तिकात असतात तश्या, 1-D; लाटलेली पोळी 2-D. पण तव्यावर मस्त फुगली की 3-D; लाडू, काकू, वडा, मोदक, सगळे 3-D.
मुख्य म्हणजे काळ हा 1-D अनादिअनंत, अवकाश, हे विश्व 3-D अनादि अनंत. अवकाश
कुठे सुरू होत नाही, ह्याला कुठे अंत नाही. अगदी अनादी अनंत. ब्रह्मदेवासारखा!
ब्र:
ना: ब्रह्मा, अगदी चुपचाप? अगदी ब्र काढत नाहीस? कसा ब्र काढणार म्हणा! मग उरेल फक्त ह्म.
ब्र: हा हा हा! What a joke? अस अद्वैताला द्वैत करणे शक्य आहे का? ब्रह्म चा ब्र आणि ह्म. मग ब्र चा ब आणि र. ह्म चा ह आणि म. ब, र, ह, म. बर हं!
ना: ब्रह्मा, राग नको मानू, पण आपली गोष्टही अशीच काही आहे. एकाचे दोन, आणि दोनाचे चार करणारी आहे. पृथःकरण करणारी आहे. शुभ्र सूर्यप्रकाशाचे VIBGYOR सप्तरंगी इंद्रधनुष्य करणारी आहे. विघटन करणारी आहे. विभाजन करणारी आहे. Fission करणारी आहे.
ब्र: चला पुढे. गूढ उकला मुनी. Suspense वाढतो आहे. म्हाताऱ्याच्या heart वर दडपण येतं आहे. बाकी लाडू आणि काकू एका दमात म्हणालास हा चावटपणा हो नारदा! काकूंना कळले तर रुसतील, आणखी फुगतील.
ना: ब्रह्मा, हा अनादि अनंत अवकाश, हे अखंड विश्व, ही सगळी space फार फार पूर्वी, अनादि भूतकाळातल्या एका कालबिंदूपर्यंत, एका विशालकाय अंड्याने व्यापली होती. अर्थातच ह्या अंड्याला छिलका नव्हता. कारण मग त्याच्या पलिकडे काय असा प्रश्न पडेल. ह्या अंड्याच नाव होतं .... ह्या अंड्याच नाव होतं ..... ह्या अंड्याच नाव होतं .....
ब्र: रेकाॅर्ड अडकली वाटतं. रेकाॅर्ड लावून तू फक्त ओठ हालवीत होतास की काय?
ना: हिरण्यगर्भ. ह्या अनादि अनंत सर्वव्यापी 3-D अंड्याचं नाव होतं हिरण्यगर्भ. आत काय कोणाला माहित नाही. गर्भात, I mean, हिरण्यगर्भात, काय होतं कोणीच सांगू शकत नाही.
ब्र: पुढे?
ना: फार फार पूर्वी, खोल खोल भूतकाळी, तो एक कालबिंदू, तो एक क्षण शेवटी आला आणि हिरण्यगर्भाचं विभाजन झालं. ब्रह्मा! साईचं दही घुसळता घुसळता असा एक क्षण आला की अचानक त्यातलं सत्व, लोणी वेगळ झालं आणि सत्वहीन चोथा ताक वेगळं झाल. त्याच मडक्यात, ज्यात आधी एकसंध दही होतं, आता लोणी आणि ताक वेगळेवेगळे दिसू लागले. अद्वैत दह्याचं द्वैतात, लोण्यात व ताकात रुपांतर झालं.
ब्र: नारदा! अगदी पार्श्वसंगीत द्यावं, आजच्या भाषेत म्हणायचे म्हणजे 'म्यूझिक मारावं', असा हा प्रसंग. अरे, काही नाही तर चिपळ्या तरी वाजवायच्या. कथेला उभार आला असता. इतकी मोमेंटस् घटना तू waste केलीस बघ. नारायण नारायण!
ना: खरेच ब्रह्मा! अलौकिक! तूप कढवतांना होतं तसं. पातेल्यात बराच वेळ उकळणारं वितळलेलं लोणी अचानक एका क्षणी नितळ लोणकढ्या तुपात व काळ्याबेऱ्या तळाशी बसणाऱ्या जड बेरीत split होतं तसं. दह्याचं लोण्यात आणि ताकात, लोण्याच तुपात आणि बेरीत विभाजन, पृथःकरण, fission. अद्वैताचं द्वैतात, द्वैतातल्या दोन अद्वैतांच पुनः प्रत्येकी द्वैतात पृथःकरण.
ब्र: नारदा, काकूंच्या स्वयंपाकघरात, बागेत, खरं म्हणजे अवतीभवती सर्वत्र असे पृथःकरण तू मी रोजच पाहतो. त्यात नवे काहीच नाही. लोणी काढणे व लोणी कढवणे तू तुझ्या दृष्टांतात घेतलेच आहेत. अरे पण चहा करतांना रोजच असेच होते. उकळत्या पाण्यात चहापत्ती टाकून, झाकून निवळू दिलं की सत्व पाण्यात उतरतं आणि व्यर्थ पत्ती गाळण्यात. 'उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे' म्हणतात. पण मी काकूंना तेही करतांना पाहिले आहे. पांढरे व काळे दाणे वेगळे झाले की वाटत सुद्धा नाही की आधी ते एकत्र नांदत होते. तीन आठवड्यापूर्वी काकूंनी झाडावरची एक अळी घरात आणून टोपलीत ठेवली. एक दोन दिवसातच पाने खाऊन ती सुस्त झाली व कोशात गेली. आजच सकाळी, अचानक कोश फोडून सुंदर फुलपाखरू बाहेर आलं. निर्जीव, निःसत्व निपचित कोशकवच मागे राहिलं.
ना: खरे आहे ब्रह्मा. पृथःकरण सतत डोळ्यासमोर घडत असते. तसेच झाले हिरण्यगर्भाचे. रोजच्या पृथःकरणाचे तू, मी, काका, काकू साक्षी. पण हिरण्यगर्भाच्या अशा पृथःकरणाचे साक्षीदार कोण? हिरण्यगर्भ सोडून बाकी कोणी नव्हतेही म्हणा!
आणखीन एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल. पृथःकरणाने जे एकाचे दोन होतात त्यांचे गुणधर्म सारखे नसतात. ते वेगवेगळे आहेत म्हणून तर पृथःकरण झाले म्हणायचे. एक घटक आधीच्या अद्वैतापेक्षा उत्कृष्ट तर दुसरा त्यापेक्षा निकृष्ट. एक superior व दुसरा सापेक्ष भावाने inferior. एक काळा तर दुसरा गोरा, एक हलका तर दुसरा जड, एक फुलपाखरू तर दुसरा कोशाचा चोथा वगैरे. सांगून खरे वाटणार नाही ब्रह्मा, पण शुभ्र मऊ मेण व काळे चिकट डांबर एकाच खनिज तेलाचे घटक आहेत. मानव ते रोज रिफायनरीत वेगळे करतो. त्या रीतीला तो distillation म्हणतो. पृथःकरणानी एका घटकाचं शुद्धीकरण, व दुस-याचं मलीनीकरण वा अशुद्धीकरण हा निसर्गनियम आहे व मानवापेक्षा ज्यास्त तो कोणीच अनुभवला व वापरलेला नाही. शेती असो, स्वयंपाकघर वा कारखाना!
ब्र: एकाच समुद्रमंथनातून अमृत व विष निघावे तसे. पण मग हिरण्यगर्भाच्या विभाजनानेही असेच झाले असेल?
ना: होय ब्रह्मा. एक घटक असा ज्यात गुण एकवटले, व दुसरा ज्यात दुर्गुण. एक शुभ्र, शुद्ध, सत्य; तर दुसरा अशुभ्र, अशुद्ध, असत्य. सद्गुणांचा पुतळा तो ब्रह्म. तू. ही तुझ्या जन्माची कथा देवा! ब्रह्मोत्पत्तीची कथा. विश्वोत्पत्तीची कथा. ब्रह्मजन्माची कथा.
ब्र: अरे बापरे! आणि दुसरा?
ना: तो दुर्गुणांचा पुतळा, तो मलिन, कुटिल, नीरस, जड घटक म्हणजे रात्र. काळीकुट्ट रात्र. तू जीव, ती अजीव. तेही तसे पाहण्यातलेच ब्रह्मा. कोशातून एक सजीव फुलपाखरू निर्माण होते तर दुसरे निर्जीव कोशकवच उरते. एक सत्व, दुसरे निःसत्व. एक सजीव, दुसरे निर्जीव. तसेच हिरण्यगर्भातून निघाले एक ब्रह्म, उरली रात्र.
ब्र: हं. Interesting! पण नारदा, माझा जर जन्म झाला तर मग मी सत्य असलो पाहिजे.
ना: नाही ब्रह्मा. जन्म जीवाचाच होतो असे नाही. कल्पनेला पण जन्म असतो. कोणीतरी आपल्या सुपीक डोक्यातून कल्पनेला जन्म देतो. ती उदरोत्पन्न नाही, पण मनोत्पन्न, बुद्ध्योत्पन्न, विचारोत्पन्न आहे, असू शकते. त्यामुळे जन्म होणे हा अस्तित्वाचा निकश नाही. पुरावा नाही.
जीव आणि कल्पना, सत्य आणि कल्पना यात आणखी एक मोठा फरक आहे ब्रह्मा. जीवाला जन्म आहे तसा मृत्यूही आहे. पण कल्पनेला फक्त जन्म. मृत्यू नाही. कल्पना कशी मरणार? तुझे आणि माझेच बघ. आपल्या कल्पनेवर किती लिखाण, किती चित्र, किती वदंता! आपल्या स्तुतीपर किती कविता, किती शिल्पे, किती कलाकृती? आपली कल्पना एक अखंड निर्मितीस्रोत आहे. आपण मनामनात ठसलो आहे. आपण पुसले जाऊ शकत नाही.
ब्रह्मा, मृत्यु किंवा मर्त्यता फक्त जीवाला आहे. अस्तित्वाला आहे. त्याला गुण आहे, आकार आहे. कल्पनेचे तसे नाही. ती अमृत्यु आहे, अमर्त्य आहे. ती खरेच निर्गुण, निराकार आहे.
ब्र: हं. समजायला लागलं थोडं थोडं. मी निर्गुण निराकार. बरं पुढे? पुन्हा विभाजन?
नाः होय ब्रह्माजी. सत्य, शुद्ध, शुभ्र, शिव, सुंदर ब्रह्माचे पुन्हा दोन भाग झाले. त्यातला जो अधिक उजळून निघालेला घटक; सत्यातिसत्य, शुद्धातिशुद्ध, शुभ्रातिशुभ्र, शिवातिशिव, सुंदरातिसुंदर घटक; तो ब्रह्मा तू. ब्रह्म+ म्हणू वाटल्यास.
न तत्र सूर्यो भाति न चंद्रतारकं
नेम विद्युतो भान्ति कुतोऽ यमग्निः
त्वमेव भांतमनुभाति सर्वं
तस्य भासा सर्वमिदं विभाति
तुझ्या तेजापुढे न सूर्य तेजस्वी, न चंद्र, न तारका. तुझ्यापुढे न वीज चमकते न अग्नी. तुझ्यामुळे तर त्यांची आभा, त्यांचे तेज. तूच ब्रह्मा सर्व तेजाचे मूळ.
आणि असा तेजस्वी तू निघाल्यावर उरलेला दुसरा घटक, तुझ्यापेक्षा खालच्या दर्जाचा असला तरीही सुयोग्य, तेजस्वी असा घटक म्हणजे दिवस. प्रकाशाने उजळलेला दिवस. तुझ्या प्रकाशाने उजळलेला दिवस!
ब्र: व्वा. म्हणजे मी आंघोळ करून निघाल्यावर उरलेले टबातले पाणी. नाही म्हणजे, तुझ्यासारखच दाखले देऊन समजवायचा प्रयत्न केला. नाक काय मुरडतोस? नसेल आवडलं तर सोड. आता ब्रह्म, रात्र व दिवस झाले. हिरण्यगर्भ म्हणजे अवकाश. त्यातून मी म्हणजे जीव, व दिनरजनी म्हणजे काळाचे दोन मुख्य खंड उत्पन्न झाले. आणि त्याच अवकाशात व्यापले. सुंदर!
ना: होय बाबा. कल्पना सुंदर. अति सुंदर. फक्त तो बुद्धीमान मानवच करू शकेल अशी. Time, space व life हे तीन तत्व सत्य आहेत. ह्या विश्वाचे ते तीन dimensions आहेत असेही म्हणता येईल. ह्या दृष्टीनेही विश्व 3-D आहे. ही कथा सत्य असो नसो. ह्या सुंदर विचाराचं सौंदर्य त्याच्या सत्यासत्यतेनी कमी होत नाही. उलट ती कल्पना आहे असे म्हटले तर कथाकाराच्या, कल्पनाकाराच्या कल्पनाविलासाची, creativityची अधिकच दाद द्यायला पाहिजे ब्रह्मा.
ब्र: नारदा, गोष्टीत पुढे पुन्हा विभाजन आहे का?
ना: दोन महत्त्वाची आहेत. रात्रीचा, काळ्या रात्रीचा, एक भाग पुन्हा विभाजित झाला. अधिकच काळवंडून, मलिनतम, कुटिलतम असा जो घटक निघाला ते दानव. उरलेला, ज्यास्त काळे दानव निघाल्यामुळे तुलनेने थोडा उजळलेला भाग म्हणजे सायंकाळ, दिवस व रात्र यातील संधीकाळ. तसेच, दिवसाचा सुरवातीचा भाग विभाजित होऊन दिवसापेक्षा तेजस्वी देवांची उत्पत्ती झाली. दिवसाचा तुलनेने काळवंडलेला भाग म्हणजे पहाट, रात्र आणि दिवस यातील संधीकाळ.
ब्र: चला, म्हणजे शुद्धातिशुद्ध ब्रह्म, देव, दानव, दिवस, रात्र आणि दोन संधीकाळ अश्या सात गोष्टींची उत्पत्ती एका हिरण्यगर्भापासून झाली. पण नारदा, तुला मी माझे सत्य सांगितले आहे. मग हे सगळं काय? तुझीच कल्पना की काय? पण दिवस, रात्र, संधिकाळ तर आपण पाहतो. ते सत्य. मग मी, देव, दानव पण सत्यच असलो पाहिजे.
ना: नाही ब्रह्मा. मी तुला आज जी कथा सांगितली ती माझी नाही. हा बहुतेक गरुड पुराणाचा, किंवा दुसऱ्या कुठल्या पुराणाचा अंश आहे. मी ते पुराण इथवरच वाचलं आहे. नंतर मला big bang theory वर वाचनाची चटक लागली. असाच जाता जाता विज्ञान संस्थेच्या, म्हणजे जवळच्याच Institute of Science च्या एका वर्गात डोकावलो. तेथे ही कथा थोडी ऐकली. मंत्रमुग्ध झालो देवा. अरे! Big Bang! महास्फोट! प्रगत मानवाची ती कथा नंतर वाचायला घेतली आणि गरुड पुराण मग मागेच पडले. वाचीन पुन्हा कधी सवड मिळाली की.
ब्रह्मा! वाचला तेवढा गरुड पुराणाचा हा भाग मला खूप आवडतो. सृष्टीनियमांना बराचसा धरून आहे म्हणून. सत्यकथा नसली तरी कल्पना म्हणूनही मला ती आवडेलच. उलट अधिकच आवडेल. ती रोजच्या आपल्या अवलोकनावर आधारीत आहे. पृथःकरणात एका घटकाचं शुद्धीकरण तर दुस-याचे अशुद्धीकरण होते हे विज्ञाननिष्ठ आहे. काळ्यातून अतिकाळा घटक बाहेर निघाला तर उरलेला दुसरा घटक सावळा होईल ह्याचे ज्ञान त्यात आहे. हे ज्ञान प्रगत मानवांना अनेक काळापासून आहे. तेच मोठ्या प्रमाणावर, वैश्विक पातळीवर scale up केल्या गेले आहे असे म्हणायला हरकत नाही. इथपर्यंतची कथा, आजची कापुसकोंड्याची कथा, मानवाच्या कल्पक बुद्धीची, कल्पनाविलासकलेची व कल्पनाशक्तीची कल्पना आपल्याला देते. कल्पकतेचा कल्पतरु आहे हा मानव. कथेच्या सत्यासत्यतेवर भाष्य करायचा अधिकार तुमचा ब्रह्माजी. मी fiction म्हणूनही ह्या कथेला डोक्यावर धरायला तयार आहे. वा रे मनुपुत्रा!
ब्र: मुनीवर, कथा जशी सुंदर, तशी कथाकथनाची तुमची शैलीही सुंदर. गायकीच्या ज्ञानाला कसलेला गळा जोवर मिळत नाही, ज्ञानाला जोवर विद्या कला मिळत नाही, गणेशाला जोवर सरस्वतीची जोड नाही, तोवर मजा नाही. तुमच्याजवळ दोन्ही आहेत. म्हणून तू तू आहेस नारदा.
कथेवर भाष्य, तिच्या सत्यासत्यतेवर विवेचन, पुढच्या कथेच्या आरंभी करू. नाहीतर नंतर कधी. तोवर गरुडपुराणाच्या ह्या भागावर मनन करू. मला तू दिलेल्या त्या दोन लिंक्स पण पहायच्या आहेत. रात्र फार झाली आहे. काका काकू झोपले आहेत. काँम्प्युटर फ्री आहे. थोडं गूगल करून काही अवांतरही वाचीन म्हणतो. ते 1-D, 2-D, 3-D वगैरे. मास्तरांनी शाळेत ते शिकविले नव्हते. काॅलेजमधे तू कधी नेले नाही मला. म्हणाला असता तर मीही आलो असतो विज्ञान संस्थेत तुझ्याबरोबर. मी काय तुझ्या त्या Big Bang ला घाबरतो की काय!
ना: देवाजी. तुम्ही गालात हसत आहात. काहीतरी गडबड दिसते. रात्रीतून पुन्हा विभाजन होणार की काय? कथेत आता माझी उत्पत्ती होणार की काय? ब्रह्माजी, कापुसकोंड्याच्या गोष्टीत काहीही होऊ शकतं म्हणून भीती वाटते. बघू! आलीया गोष्टीशी असावे सादर. आणखी काय! शुभरात्री!
No comments:
Post a Comment