Tuesday, 22 December 2015


गोष्ट सहावी


काकू: अहो, मी काय म्हणते, आपण नं जरा घराची रचना बदलू. मुलांची खोली आपण आता स्टडी रूम करू. काँप्यूटरही तिथेच शिफ्ट करू. सगळी पुस्तकेही तिथेच ठेऊ. त्यानिमित्तानी तरी आपले दिवसाकाठी अर्धाएक तास तिथे जाणे येणे होईल. मीही थोडं वाचन करीन म्हणते. तुम्हीही करा. हळूहळू आपल्यालाही दुसरा काही विरंगुळा हवा. तुमचं रिटायरमेंट सहा महिन्यावर आलं आहे. मीही व्ही. आर. एस. घेईन म्हणते तेव्हाच. मग काय नुसत्या गप्पा मारायच्या? धारावाहिकं बघायचे? आतापासूनच वाचन मनन वाढवलं पाहिजे. नाहीतर रिटायरमेंट खायला उठेल. मलाही कविता करून युग उलटलं. तुम्हाला लेखनाची वाचनाची आवड आहे असं मी फक्त लग्नाआधी ऐकलं तेवढच.

काका: राहू दे, राहू दे. तूही विणकाम भरतकामात एक्सपर्ट होती म्हणे. एम्ब्राॅयडरीत तर स्पेशलायझेशन. स्पेलिंग सोडून बाकी काहीतरी त्याच्याशी नातं आहे का आता कोण जाणे!

काकू: बरं, ते टोमणे सोडा. पण आज अनायासे शनिवार आहे तर करू या का हालवाहालव, उचलदडप? अहो खरंच मला कविता करावीशी वाटते. आपल्याला विचार आहेत, मुळाक्षरे येतात, व्याकरण समजते. विचार उसनेही घेता येतील. दुसऱ्या भाषेतील कवितांचे भाषांतर केले तरी कुठे बिघडते? मोठमोठे लोक तसे करतात. त्यानेही साहित्यसेवा होईल.

काका: नवीन काही करायचं तर ते नेमकं शनिवारी कशाला. नकर्त्याचा वार असतो शनिवार. उद्या करू सुरुवात. पण काय गं, हे नवीन काय खूळ? ते भूत आलं होतं म्हणून की काय? भूत का़य आतल्या खोलीत येणार नाही? ते त्रिलोक संचारी असतात म्हणे. केव्हाही कुठेही जाऊ शकतात. की तू खोलीबाहेर पाटी लावणार 'परवानगीशिवाय आत येणे निषिद्ध. आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बाय आॅर्डर!'.

काकू: करा, करा थट्टा. पण खरं सांगायचं तर तेही एक कारण आहे. मुलांच्या खोलीजवळ देवांची खोली आहे. तेवढाच वचक वाढेल. भूतसुद्धा देवांना घाबरेलच, नाही का? काल मी कुठेतरी वाचलं की दारापाशी सुदर्शनचक्राचा नुसता फोटो जरी असला तरी राहू केतू सुद्धा घाबरतात म्हणून. मग ह्या भानामतीची, भूताची काय बिशाद?

काका: अगं काय हे? भूत, राहू, केतू, सुदर्शन चक्र? कलियुग संपून पुन्हा सत्ययुग सुरू झालं की काय?

काकू: अहो तसं नाही. 'सुदर्शन चक्र जेथे, विष्णुदूत तेथे' असे म्हणतात. आपल्याला दिसत नाहीत पण ते असतात. विष्णुदूतांपुढे यमदूतसुद्धा निष्प्रभ होतात म्हणे. कालच नाही का विष्णुपुराणाच्या एपिसोडमधे दाखविली अजामिळाची गोष्ट? काय अजागळ ते यमदूत अन् काय राजबिंडे ते विष्णुदूत! जीव ओवाळून टाकावासा वाटतो.

काका: अगं मी नाही पहात तसली सिरियल्स. तूही एखादं महापुराण वाचायला सुरू केलेले दिसते. की शेजारच्या देवळातला भागवत सप्ताह?

काकू: अहो! थोडं अध्यात्म कानावरून गेलं तर काय हरकत आहे म्हणते मी. चाळीशी उलटली की आध्यात्माकडे वळावे असे आई सांगायची. थोडा उशीरच झाला. पण बेटर लेट दॅन नेव्हर!

काका: कर बाई काय करायचं ते. मिळव पुण्य. मी आपला तसाच राहीन. पण मग नंतर तू स्वर्गात अन् मी नरकात अशी आपली ताटातूट होईल. मग म्हणत बसू:

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ

आणि देऊ हुंदके.

काकू: अहो असं काय म्हणता. बायकोचं पुण्य नवऱ्याच्याही कामी येतं म्हणे. जाॅइंट अकाउंट असतं. शिवाय, आपण काय इतके पापी आहोत का नरकात जायला? डास ढेकूण सोडून काहीतरी मारतो का आपण? तुमच्या नाकावरची तर माशीसुद्धा उडत नाही असे सासूबाईच म्हणायच्या! इतके आपण सहिष्णु!

काका: अगं पण माशी बसेलच का म्हणतो मी तिथे. नाकाच्या शेंड्यावर काय मध चिकटला असतो की काय?

काकू: अहो! मला एवढच म्हणायचं आहे की आपल्या पुण्याच्या अकाउंटमध्ये बरीच जमा असेल. आपण आपल्या मोतीवर किती प्रेम करतो. सतत घोटाळत असतो मोती आपल्या अवती भवती. प्राणिप्रेमाचे पण काही पुण्य गाठीशी पडेल. भोज राजाला सुद्धा प्राणिमात्रावरील त्याचे प्रेम नोंदनीय आहे असे वाटायचे.

एके दिवशी गाढ झोपेत स्वप्नात मग्न असतांना भोज राजाला अचानक जाग आली आणि सुंदर मंदिरात दिव्य प्रभा फाकलेली दिसली.

स्वप्नी गाढ निमग्न भोज असता ये जागृती त्याजला
पाहे सुंदर मंदिरात भरली दिव्यप्रभा सोज्ज्वला

काका: व्वा! पहिल्यांदाच तुला गाताना बघतो आहे.

काकू: अहो ही भेंड्यांच्या वहीतली कविता मला तोंडपाठ आहे. तर, भोज राजाने जरा निरखून पाहता त्याला व्याघ्राजिनावर बसलेला एक चैतन्यमयी तरुण काहीतरी लिहिताना आढळला. न राहवून भोज राजाने त्यास तो काय लिहीत आहे असे विचारले. तो उत्तरला की तो महान शूर लोकांची यादी करीत आहे. त्यावर भोज राजाची प्रतिक्रिया फार सुंदर आहे.

माझे नाव नसो तयात नसले, जे प्राणिमात्रावरी
सप्रेमा करिती तयातचि मला द्या स्थान कोठेतरी

प्राणिमात्रावर प्रेम करणाऱ्यांच्या यादीत तरी आपल्या नावाची नोंद व्हावी असे त्याला वाटले होते. अहो, प्राण्यांवर दया करणे, प्रेम करणे हे मोठे पुण्य आहे हेच ही कविता सांगते. म्हणून मला खात्री आहे की आपले मोतीवरचे प्रेम आपल्यासाठी पुण्यदायी आहे. शिवाय आपला दानधर्म, देवळात जाणे, चतुर्थ्या एकादश्या आहेतच की. काहीतरी गाठीशी पुण्य पडतच असेल. रिटायर झालो की चारधाम यात्रा पण करू म्हणते. थेंबे थेंबे तळे साचे. आतापर्यंत आपल्या पुण्याचा अंबाझरी नाही तरी शुक्रवार तलाव तरी साचलाच असेल. असं वाकड्यात काय शिरता? राह्यलं. नाही करू बदल. जैसे थे. तुमचं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

काका: तसं नाही गं. आधी तू चहा आण. मस्त फुरके मारीत चहा पिऊ, पेपर वाचू, मग बघू काय ते. होऊ दे तुझ्या मनासारखं. पुन्हा दम्पतीचं भांडण नको. बाबा काय म्हणाले होते? विसरलीस का एवढ्यात?

काकू: आणते चहा. खरच भांडण नको. पण मग काँप्युटर तरी आज हालवूच या.

ब्र: नारदा, काहीही कळलं नाही रे. ती पुराणं तरी समजतात. नाही समजले तर अनुवाद असतो. भावार्थ असतो. एकदा नाही दोनदा वाचता येते. हळू हळू वाचता येते. इथे तसं नाही. काही रिपीट होत नाही. एकदा शब्द गेला की गेला. आधीच संदर्भ कळत नाहीत. त्यात ते काकाकाकूंचे फाडफाड बोलणे. एकच गोष्ट कळली मला. आज तुला काकांनी भूत म्हटले तेवढे आले लक्षात. बाकी सारे तूच सांग बाबा समजावून.

ना: मला बरेच समजले. माझा त्रिलोकी संचार असल्यामुळे आणि काकाकाकूंना मी फार पूर्वीपासून ओळखत असल्यामुळे मला ते काय म्हणाले ते बरेचसे समजले. पण काका मला भूत म्हणाले हे तुला कसे समजले ते मात्र मला नाही समजले. ते सांग बघू आधी समजावून.

ब्र: मुनी, काकाच नाही का म्हणाले भूत त्रिलोकसंचारी असते म्हणून. तुला सोडून कोणी आहे का त्रिलोक संचारी? म्हणजे मग तू आणि भूत एकच नाही का?

ना: ब्रह्माजी, भाषेत असे सुतावरून स्वर्गाला जायचे नसते.

ब्र: मी कुठे रे स्वर्गाला गेलो? त्या नसलेल्या स्वर्गाला परत जायचे असते तर मग आलो असतो का वरातगंगा घेऊन आपण पृथ्वीवर? बाकी तुझं ते अर्नाळपुराण अगदी सत्याला धरून हं. वाचले मी त्याचे आठही स्कंध. वरातगंगा नावाचा स्कंध पण वाचला. जे घडले ते लिहिले त्या अर्नाळ ऋषींनी. कुठेही अतिशयोक्ती वा असत्यकथन नाही बघ. म्हणूनच मला वाटते की अर्नाळपुराणासारखीच अठराच्या अठरा महापुराणे, हरिपुत्र पुराण व रजनीपुराणही खरी असली पाहिजेत.

ना: वा! तुझी गाडी पुन्हा मूळपदावरच येते. अरे, सुताने स्वर्गाला जाणे म्हणजे छोट्याश्या कथनाचा संदर्भविरहित शब्दश: अर्थ घेऊन अवास्तव निष्कर्षाप्रत पोहोचणे. अरे, मनुपुत्र बरेचदा जे बोलतात ते त्यांच्या मनात नसते. जे मनात असते ते ते बोलत नाहीत. वाक्प्रचार, म्हणी, उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती, व्यंजना वगैरे अलंकार ते भाषेत वापरतात. नक्की काय म्हणायचे ते कळायला ऐकणाऱ्याला कष्ट पडतात. त्यात हे मूळचे वाड्यातले लोक. कधी सरळ बोलतील तर शपथ. जपून रे बाबा. भूत त्रिलोकसंचारी असते म्हणजे मी भूत आहे असे हे देवभक्त काकाकाकू कसे म्हणतील? त्यांना हा अर्थ अभिप्रेत नसावा. आता मला कळले आज तुला काहीच कां कळले नाही ते. म्हणशील तर आज तेच मी तुला समजावून सांगतो. आज कापुसकोंड्याच्या गोष्टीला सुट्टी. काय?

ब्र: हे मात्र छान. असे रोज केले तर मलाही हे लोक हळू हळू कळतील. मग मलाही कापुसकोंड्याच्या गोष्टीतला कापुस व कोंडा वेगळा करता येईल. हो सुरू.

ना: ब्रह्मा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काकू म्हणाल्या ती म्हणजे काँप्यूटर आता आपल्या खोलीत येणार. या खोलीलाच ते मुलांची खोली म्हणतात. मुले परदेशी गेल्यापासून ही खोली तशी रिकामीच असते. त्याचा फायदा घेऊनच तर आपण वरातगंगेत आल्यापासून येथे आपले बिऱ्हाड मांडले. बहुधा या खोलीत भानामती किंवा रावण येणार नाही असे काकूंना वाटत असावे. काकांची तशी फारशी इच्छा दिसली नाही. पण ब्रह्मा, शेवटी घरात बाईचीच इच्छा गरीयसी.

ब्र: झालेच. आपली तर खूपच कुचंबणा होणार. आपण जायचे कोठे? माझे तर कुठे देऊळही नाही जिथे जाऊन मूर्तीत रहावे. मला तर खूपच भीती वाटते.

ना: ब्रह्माजी, काय हे! आपल्याला स्थितप्रज्ञ असायला हवे ना? अरे काकू लहानपणापासूनच चंचल स्वभावाच्या आहेत. काहीतरी उलथापालथ करीत असतात. 'म'चा प्रभाव असावा बहुधा.

ब्र: 'म'चा प्रभाव? म्हणजे?

ना: अरे त्या लग्नापूर्वीच्या मोहरीर. महालातल्या त्या मास्तरांच्या वाड्यातली ती मुलगी. मास्तरांच्या वडिलांची, म्हणजे मोरेश्वर मार्तंड मोहरीरांची ती नात. महाल, मास्तर, मुलगी, मोरेश्वर, मार्तंड, मोहरीर. नुसता म, म, म चा प्रादुर्भाव. हा म फार चंचल असतो, मनस्वी असतो. 'म' मुळे हे मानवही मनस्वी व चंचल असतात. सतत बदल हवा असतो या 'म'कार लोकांना.

ब्र: काहीही काय सांगतोस? असे कुठे लिहिले आहे? असे नावावरून काय स्वभाव ठरतात?

ना: नारायण नारायण! ब्रह्मा, असे संस्कृत सुभाषित आहे. संस्कृतमधे आहे म्हणजे खरेच असले पाहिजे. नाही का?

ब्र: नारदा, मला तुझ्या ह्या 'नारायण नारायण' ची खूप भीती वाटते. जांभई दाबायची म्हणून जसे काही लोक खोकला किंवा शिंक आल्याचे नाटक करतात व तोंडावर हात ठेवून जांभई आतल्याआत जिरवतात, तसेच तूही खट्याळ हसू दडविण्यासाठी नारायण नारायण म्हणतो, हे मला कळले आहे. आताही तुझ्या मनात तसेच काहीतरी आहे. सांग बरे काय ते सुभाषित आहे ते.

ना: ऐका तर.

मनो मधुकरो मेघो मद्यपो मत्कुणो मरुत् ।
मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचलाः ।

ब्र: आता अर्थही सांगा. कमीतकमी संधीविग्रह करून द्या. तरच कळेल ही देवभाषा ब्रह्माला.

ना: ब्रह्मा! मन, मधुकर म्हणजे मधमाशी किंवा भ्रमर, मेघ म्हणजे ढग, मद्यपी म्हणजे दारुडा, मत्कुण म्हणजे ढेकूण, मरुत म्हणजे वारा, मा म्हणजे लक्ष्मी म्हणजे संपत्ती, मद म्हणजे मस्ती, मर्कट म्हणजे माकड व मत्स्य म्हणजे मासा हे मकाराने सुरु होणारे दहाही लोक चंचल असतात.

ब्र: वा! म्हणून ही महालातली मोहरीर मास्तरांची मुलेमुलीही चंचल का? छान. पण मुनी, मग मकाराने ज्यांचे नाव संपते त्यांचा स्वभाव कसा असतो याबद्दलही काही आहे का संस्कृतात?

ना: ब्रह्माजी, तसे मला माहीत नाही खरे. पण त्यांचा स्वभाव चंचलच्या उलट धीरगंभीर असावा असे मला वाटते. अशी एक व्यक्ती मला माहीत आहे.

ब्र: कोण?

ना: ब्रह्मा, तुम्हीच. तुमच्या नावात मकार शेवटी आहे. तुमचा स्वभाव स्थितप्रज्ञ हवा. पण तुमचे मन तर काकूंपेक्षाही कधीकधी अधिक चंचल दिसते. जसे आत्ता.

ब्र: पण नारदा, माझ्यापुरते माझे नाव 'मी' आहे म्हणून तसे असेल. 'मी', 'माझे', 'मला' हे मकार जेंव्हा मनात शिरतात तेंव्हा चंचलपणा येत असावा. मनुपुत्र मानव तर मकारीच आहे. म्हणून सर्वच मानव चंचल.

ना: उत्तम ब्रह्माजी. तुम्हीही आता भाषेशी खेळू लागला. मानव चंचल कां हे दाखवून दिले. तुम्ही शब्दांना गोंजारू लागला. ब्रह्माजी, शब्दब्रह्माशी खेळण्यात ह्या मनुपुत्रांचा बराच वेळ जातो. तसे करणे हाही साहित्यनिर्मितीचाच एक भाग आहे असे यांना वाटते. तू यांना दिलेली वर्णमाला ह्या मानवांनी खूप वापरली, नव नव शब्दोत्पत्ती केली, वापरातल्या शब्दांना नवे नवे अर्थ दिले. भाषा समृद्ध केली. यांच्या प्रगतीत भाषेचा मोठा सिंहाचा वाटा आहे. जंतुकवीच्या मानवचंद्र काव्यात भाषा हा मानव व मानवेतर प्राण्यातला मुख्य फरक आहे असे सुचविले आहे.

आवाजांचे विविध विश्व हे प्राणीजगत असे
अर्थ काय आवाजांना त्या, प्रश्न तुला हा असे
युगे उलटली, मांजर करते म्याँव म्याँव फक्त
नव नव उच्चारांची शेती तूच करी फक्त

आवाजांना अर्थ दिला तू, शब्दांना शक्ती
भाषेला तू जन्म दिला रे, तू केली क्रांती
बोळा निघता पाणी जैसे प्रवाहास मुक्त
विचारधारा तुझी वाहते जगात स्वच्छंद

अग्नीचा तू स्वामी झाला, तू प्राणी भिन्न
अन्न स्वतःचे स्वतः पिकवितो, दुजा नसे अन्य
भाषेचे तू शस्त्र मिळविले, विचार तू करतो
सृष्टीमध्ये एकमेव तू जो प्रगती करतो

चतुष्पाद-उत्क्रांत द्विपादी, पाया राऊळीचा
पंचमहाभूतज्ञान होतसे वास्तू प्रगतीचा
विचार, भाषाज्ञान जणू हो कळस देऊळीचा
पुजारी रे तू गाभाऱ्यातील ज्ञानदेवतेचा

ब्र: नारदा, मी पण 'उद्या लग्न आहे' वाचले. त्यात तर भाषेची आरती आहे. मला पाठ पण झाली आहे.

असे शास्त्र भाषा, असे शस्त्र भाषा
असे जात भाषा, असे गोत्र भाषा
असे प्रेम भाषा, असे वैर भाषा
असे संस्कृतीची गणाधीश भाषा

असे देव भाषा, असे धर्म भाषा
असे शक्ति भाषा, असे युक्ति भाषा
असे व्याघ्र भाषा, असे गाय भाषा
असे माय भाषा, अशी मायभाषा

जंतुकवीचा बालवेद कवितासंग्रह पण मी वाचला. बालवेदमध्ये पण वर्णमालेवर बऱ्याच कविता आहेत. पण नारदा, वर्णमाला मी मानवांना दिली असे तू कां म्हणतो ते मात्र मला कळले नाही. असे कुठे लिहिलेले मला दिसले नाही. असे काही मी केल्याचे मला आठवतही नाही.

ना: ब्रह्मा, असे लिहिलले आहे. भागवत पुराणात असे स्पष्ट सांगितले आहे. अ आ इ ई, 'क'वर्ग म्हणजे क ख ग घ ङ, 'प'वर्ग म्हणजे प फ ब भ म, तसेच य र ल व वगैरे, ऱ्हस्वदीर्घ, सारे सारे तूच निर्माण केलेस ब्रह्मा. नंतर तू तुझ्या प्रत्येक मुखातून एक असे एकूण चार वेद निर्माण केले, असाही उल्लेख आहे. आणि आता तूच वेद पुराणे वाचून त्यात काय आहे, त्यात तू कुठे आहे, ते शोधतो आहेस. कालचक्र काय काय खेळ पाहायला लावते ब्रह्मा! निर्मात्यालाच त्याची निर्मिती माहीत नाही इतकी त्याची निर्मिती विशाल!

ब्र: नारदा, प फ ब भ म म्हणजे 'प'वर्ग असे तू म्हणालास म्हणून मला पण वाचलेला एक श्लोक आठवला. म्हणू का? त्याचा अर्थ मला जेमतेम समजला, पण पूर्ण नाही. पूर्ण अर्थ समजावून सांगा मुनीबाबा.

ना: म्हण म्हण. आपल्याला देवभाषा हळूहळू समजायला लागली आहे असे वाटते. अरे असे वाचता वाचताच आपणही मराठी, संस्कृत समजायला लागू. थोडेफार आले की मग म्हातारीच्या त्या दोन भाषाविदुषी असलेल्या मुलींकडे काही दिवस जाऊ म्हणजे आणखी प्रगती होईल. भाषेत १५० अलंकार आहे असे त्या म्हणतात. साहित्यशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांच्या आश्रमात काही दिवस राहिलो तर आपणही भाषेत पारंगत होऊ. मग आपणही सालंकृत भाषेत लिहू लागू काहीतरी. म्हण की ती कविता 'पफबभम'ची.

ब्र: ऐक तर.

पिनाक फणि बालेन्दु भस्म मन्दाकिनी युता ।
पवर्ग रचिता मूर्तिः अपवर्ग प्रडास्तु नः ।

ना: ब्रह्माजी सुंदर. मीही हाच श्लोक थोड्या वेगळ्या रूपात वाचला आहे. हा श्लोक म्हणावे तर शिवस्तुती आहे. पण त्यात एक खोच पण आहे. कदाचित शिवाला टोमणा पण असेल. व्यंग पण असेल. व्यंजना पण असेल. भाषेतले हे अलंकार दिसले की खूप छान वाटतं ब्रह्मा.

ब्रह्माजी, पिनाक म्हणजे भाला, त्रिशूळ. फणि म्हणजे नागाची फणी. बालेंदु म्हणजे बाल इंदु, म्हणजे बाल चंद्र, म्हणजे चंद्रकोर. भस्म म्हणजे राख. मंदाकिनी म्हणजे गंगा नदी. प फ ब भ म पासून सुरू होणाऱ्या ह्या पाचही गोष्टी शंकर धारण करतो. हाती त्रिशूळ, गळ्यात नाग, कपाळी चंद्र,  शरीरभर भस्माचा लेप, डोक्यावर गंगा धारण केलेले शंकर 'प' वर्गातील पाचही व्यंजनांनी सजलेले आहेत असे कवी म्हणतो. अशा 'प'वर्गाने सजलेल्या देवाने आम्हाला अपवर्गाचा म्हणजेच स्वर्गाचा रस्ता दाखवावा अशी प्रार्थना कवीने केली आहे. अपवर्ग म्हणजे स्वर्ग, मोक्ष, मुक्ती. पवर्गयुक्त देव अपवर्ग दाखवतील हा उपहास पण असू शकतो. ह्या श्लोकात शिवस्तुती, शिवोपहास किंवा शब्दांचा सुंदर खेळ करून भाषास्तुती पण असू शकते. कवितेचा अर्थ ऐकणाऱ्याने लावायचा असतो. अनेक अर्थ जेथे, तीच कविता. 'जे न देखे रवी, ते देखे कवी' असे म्हणतात. त्याहीपुढे जाऊन असे म्हणता येईल 'जो अर्थ न कवीच्या मनी, तो उमटतो जनांच्या कानी'. पुराणात, संस्कृत साहित्यात असे काव्य पदोपदी विखुरलेले दिसते.

ब्र: वा! पण नारदा, हा शिवाचा पोशाख असा आगळा वेगळा कां रे?

ना: ब्रह्माजी, ती एक मोठी गोष्टच आहे कापुसकोंड्याची. नंतर कधी सांगीन. समुद्रमंथनाची ती कथा खूप मजेशीर आहे. पण आज नको. नाहीतर तूच पुन्हा म्हणशील 'एक ना धड, भाराभर चिंध्या'.

ब्र: बरे बाबा! मर्जी तुझी. पण मुनी, मला कां हो कविता करता येत नाही? वाट्टेल तो उठल्या सुटल्या कविता करतो, माझ्यावर इतक्या कविता, पण मला एखादी अर्थपूर्ण कविता कां सुचत नाही?

ना: अरे, असे काय म्हणतोस? त्या दिवशीचा तुझा श्लोक काही अगदीच टाकाऊ नव्हता. सुरुवात अशीच ट ला ट, री ला री ने होते.

आधी, आता आणि नंतर
past, present and future
भूत, वर्तमान आणि भविष्य
मी पण मोठ्ठा कवी झालो, इश्श!

पुढे पुढे मग कविता जन्म घेते. जंतुकवीची 'इडकीत जाऊ, खिडकीत जाऊ' कविता वाच कधी. ब्रह्मा, प्रत्येकानी कविता करावी. भाषेच्या लवचिकपणाशी छान ओळख होते त्याने. लोकांना आवडो वा न आवडो. कविता करणाऱ्याचा, लिखाण करणाऱ्याचा नेहमी फायदाच असतो.

कुणी निंदा, कुणी वंदा
अमुचा स्वहिताचा धंदा

अशा वृत्तीने कविता लिहावी, लेख लिहावे. आणि ब्रह्मा, तुलाच माहित नाही, पण तू सर्वात थोर कवी आहे असे म्हणतात. मला हे माहीत नव्हते. पण माझ्या वाचनात तसे आले आहे. मी कविपुत्र आहे.

ब्र: थट्टा काय करतोस रे!

ना: ब्रह्माजी, थट्टा नाही. ऐका.

अपारे काव्यसंसारे कविरेकः प्रजापतिः ।
यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते ।

कवितेच्या अथांग विश्वात, प्रजापति, म्हणजे ब्रह्माच एक असा कवि आहे जो पूर्ण विश्व, म्हणजे त्याचा अर्थ, त्याला वाटेल तेव्हा आणि वाटेल तसा बदलू शकतो.

ब्रह्मा, हे विश्वच तुझी कविता. मग ह्या छोट्यामोठ्या कविमत्कुणांशी, स्वतःला कवी म्हणणाऱ्या व म्हणवून घेणाऱ्यां ढेकणांशी तुझी काय रे स्पर्धा? तुझी थोरवी निर्विवाद आहे. तुझी काव्यनिर्मिती वादातीत आहे.

ब्र: बरे वाटले ऐकून. खोटी असली तरी स्तुती प्रथमश्रवणी मधुरच वाटते. असो. पण नारदा, माझी मूळ विवंचना काकाकाकूंचे या खोलीवरचे आक्रमण आहे. तसे झाले तर आपण विस्थापित होऊ रे. ती खरी भीती काही या खोट्या स्तुतीने शमत नाही.

ना: ब्रह्मदेवा! तुम्ही उगाच काळजी करता. मला तर ही चालून येणारी सुवर्णसंधी वाटते. जर काँप्यूटर खरेच आपल्या खोलीत आले तर आपली चंगळच आहे. काका फारसे काँप्यूटरवर बसत नाहीत. काकूंना वेळ नसतो. मुलांनी घेतला म्हणून काँप्यूटर घरी आहे एवढेच. खोलीत त्यांची पुस्तके पण ठेवणार म्हणतात. तेही आपल्याला फावेल. भागवतपुराण, विष्णुपुराण, हरिविजय, रामविजय, विष्णुसहस्रनाम, असे अनेक ग्रंथ यांच्याकडे आहेत. तेही वाचता येतील. ब्रह्मदेवा, आता मला वाटते की १८ महापुराणे, तितकीच उपपुराणे, वेद, उपनिषदे व इतर ग्रंथ आपल्याला वाचता येतील.  आपण कोण हे आपल्याला कळेल. सगळं सगळं वाचून काढू.

ब्र: पण वेळ पुरेल का रे? इतकं वाचायचं म्हणजे?

ना: ब्रह्मा, एकट्याला कठिण वाटले तरी दोघांना नाही. आणि तुला तर चार तोंडे. तू जर वर्णमाला निर्मून चार तोंडांनी चार वेद निर्माण करू शकतो तर तुझी चार व माझे एक अशी पाच तोंडे व १० डोळे मिळून काय अशक्य आहे? अरे आपण दोघे आहोत हे तू विसरतोस. तू नेहमी संकटाच्या चाहुलीने हबकून जातोस, नाहीतर स्तुतीने हरखून जातो. शांत हो. दोघे मिळून आपण काय करू शकत नाही?

एकचित्ते द्वयोरेव किमसाध्यं भवेदिति

दोन व्यक्ती जेंव्हा एकसारखाच विचार करतात तेव्हा अशक्य असे काय असू शकते?

ब्र: खरे आहे तुझे नारदा. सगळं सगळं वाचून काढू. 'आपण कोण?' ह्या प्रश्नाचं उत्तर केव्हा मिळेल असं झालं आहे मला. आपली आपल्याशीच ओळख झाली की मीही 'मज्जीवनमणिमाला' लिहीन म्हणतो.

ना: तसं नसतं ब्रह्मा. तू स्वत:चं आत्मचरित्र लिहू शकतो. पण त्याचं नाव असं उधार घेऊन चालणार नाही. मज्जीवनमणिमाला हे मास्तरांच्या आत्मचरित्राचं त्यांनी ठेवलेलं नाव. तुला तुझ्या आत्मचरित्राचं दुसरं काही नाव ठेवावं लागेल. जसं की चतुर्मुख. एक कल्पना म्हणून सुचवलं. माझ्या आत्मचरित्राचं नाव मी 'नारायण नारायण' ठेवू शकतो.

ब्र: 'शेंडी' शीर्षक पण ठेवले तरी चालेल नारदा. अरे पण काकूच तर म्हणाल्या की विचार उसने घेतले, भाषांतर केले तरी साहित्यसेवा होते म्हणून. खरेच असे चालते का?

ना: नारदा, कविता, लिखाण स्वत:साठी करतात. इतर लोक ते वाचतात. वाचोत. आवडले तरी ठीक, नावडले तरी ठीक. आणि भाषांतर तर मोठमोठे कवी करतात. इतर भाषातील साहित्य आपल्या भाषेत आणणे, किंवा दुसऱ्याची एखादी कृती घेऊन, तिलाच थोडी कलाटणी देऊन नव्याने मांडणे यात फारसे वावगे मोठे लोक पण मानत नाहीत.

ब्रह्मा, काका बरेचदा आंघोळ करून आल्यावर कुडकुडत कां होईना पण 'अनुदिनि अनुतापे' म्हणतात. एक दिवस मला तो श्लोक व तसेच आणखी ७ श्लोक इंटरनेटवर सापडले. आपल्या रामाचा तो धावा आहे म्हणतात. त्या मकाराने नाव सुरु होणाऱ्या व्यक्ति जशा चंचल मनाच्या असतात तसेच चंचल मन असणारा हा कवी रामाचा धावा करतो व म्हणतो 'चपळपण मनाचे नावरे आवरीता ।  तुजविण शिण होतो, धाव रे धाव आता ।'. ब्रह्मा, तू म्हणालास तसा मानव पण मकारी, त्याचे मन पण मकारी आहे. म्हणूनच बहुधा चंचल असावे. तुझ्यासारखेच. तू पण म्हणत जा ही कविता. करुणाष्टक म्हणतात याला. चालही खूप सुंदर. अनुष्टुभ छंद. सांगायची गोष्ट अशी की करुणाष्टक देवभाषेतही आहे, काकाकाकूंच्या भाषेतही आहे. मराठीत:

अनुदिनि अनुतापे तापलो रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुज विण शिण होतो, धाव रे धाव आता!

तर संस्कृतमध्ये:

अनुदिनमनुतापेनास्म्यहं राम तप्तः ।
परमकरुण मोहं छिन्धि मायासमेतम् ।
इदमतिचपलं मे मानसं दुर्निवारं ।
भवति च बहु खेदस्त्वां विना धाव शीघ्रम् ।

बहुधा हे मूळ मराठीतले श्लोक आहेत व भाषांतर होऊन संस्कृतात गेले. चाल एकच, छंद एकच, भाव एकच. आत्मा तोच, फक्त शरीर बदलते, तसेच. नाही का? नारायण नारायण!

ब्र: अरे हासतोस काय? कवितेचा भाव हाच कवितेचा आत्मा. तो अमरच नाही का?

ना: जाऊ दे ब्रह्मा. आत्मा नसला तरी आत्म्याची कल्पना मात्र अमर आहे. कल्पना जन्माला आली की तिला मृत्यू नाही. ती अजन्मा नसली तरी अमृत्यु मात्र आहेच आहे. आपल्यासारखीच!

ब्रह्मा, सर्व चांगली वाईट निर्मिती तुझीच आहे. अज्ञान सुद्धा तूच निर्माण केलं आहे असे म्हणतात.

स्वायत्तमेकान्तहितं विधात्रा ।
विनिर्मितं छादनमज्ञतायाः ।
विषेशतः सर्वविदां समाजे ।
विभूषणं मौनमपण्डितानाम् ।

अज्ञानाचं कवच सुद्धा लोकांच्या भल्यासाठी तूच निर्माण करतोस. पंडित, ज्ञानी लोक जे सांगतात त्यास अज्ञानी माणूस म्हणूनच मूक संमती देतोच देतो. गुरुजींनी सांगितलेल्या युगद्वारप्रहरी यज्ञाला काका तसे तयार नव्हते. पण त्यांनी शेवटी संमती दिलीच ना?

ब्रह्माजी, या श्लोकाचेही मराठी भाषांतर आहेच.

विनिर्मिले झाकण अज्ञतेचे ।
स्वाधीन जे पद्मभवे फुकाचे ।
मूर्खास जे मौनचि फार साजे ।
सभेस त्यांच्या बहु जाणते जे ।

ब्रह्माजी, अशी उदाहरणे अनेक आहेत. गीता, रामायण व इतर प्राचीन संस्कृत साहित्य तर सर्व भाषात अनुवादित झाले आहे. म्हणून ते सर्वदूर पोहोचलेही. साहित्यकारांनी जरी ते स्वांतःसुखाय लिहिले असले तरी त्याचा प्रकाश सर्वदूर पोहोचला. ब्रह्मा, काकू दारासमोर दिवा लावतात, उंबरठ्यावर प्रकाश पडावा म्हणून. पण त्याचा प्रकाश अंगणात व रस्त्यावरही पडतोच की. स्वानंदासाठी लिहिलेली कविताही तशीच असते. ती इतरांनाही आनंद देऊन जाते. कविता तशी परोपकारी स्वभावाची असते ब्रह्मा.

आत्मनः परितोषाय कवेः काव्यं तथापि तत् ।
स्वामिनो देहलीदीपसमं अन्योपकारकम् ।

पण ब्रह्मा! तुला ह्यात काय रे रस? तू कां कविता लिहावी? तू कां साहित्यिक व्हावे? हे सर्व तुझेच तर आहे. तूच तर वेद लिहिलेस. तूच तर पुराणे लिहविलीस. सर्व तू तू तू केलेस, करतोस, करशील. नारायण नारायण!

ब्र: असू दे रे. मलाच 'नारायण नारायण' म्हणायची वेळ आणतोस तू. नारदा, मला आणखी एक गोष्ट कळत नाही रे. ते आपल्या खोलीच्या बाहेर सुदर्शन चक्र लावतील व राहू केतू सुद्धा त्याला घाबरतात म्हणजे रे काय? मला तर काहीच संदर्भ कळला नाही.

ना: ब्रह्मा, तीही एक मोठी गोष्ट आहे. कापुसकोंड्याची सुंदर गोष्ट. समुद्रमंथनाचीच पुढची गोष्ट. ती पुढे कधी सांगीन.

ब्र: समुद्र घुसळण्याची गोष्ट? काकू दही घुसळतात, त्यातून लोणी निघते तसेच? त्याची रे काय गोष्ट? त्यात काय तू रवीचे वर्णन करशील? की दह्याचे? की लोण्याच्या गोळ्याचे?

ना: मंथन म्हणजे घुसळण हे खरे. समुद्रमंथनातही रवी वापरावी लागली होती हेही खरे. तिला नावही आहे, मेरु. पण हा प्रकार फार प्राचीन, फार महान आहे रे. यातून लोण्याचेही अनेक प्रकार निघाले. ती गोष्ट आज नको. पुढे कधीतरी.

ब्र: बरे मुनी. मग ते अजामिळ, विष्णुदूत, यमदूत हे कोण ते तरी सांग. तेही माझ्या डोक्यावरून गेले. आज काकू काय बोलत होत्या हे अजिबात कळले नाही बघ. असे आजवर कधी झाले नाही. त्यांचे बोलणे कळायचे मला.

ना: ब्रह्मा, अजामिळाची गोष्ट पण मोठी आहे रे. माझ्या नारायण नारायण म्हणण्यामागे काय कारण आहे तेही तुला अजामिळाच्या गोष्टीद्वारे कळेल. तूही आज एकदोनदा नारायण नावाचा उच्चार केलास हे योग्यच झाले. आता आपले काहीही वाईट होऊ शकत नाही. पण ही अजामिळाची कापुसकोंड्याची गोष्ट पुन्हा कधी. आज नको आग्रह करूस.

ब्र: अरे मग आज काय? आज फक्त गोष्टींची अनुक्रमणिकाच तयार करायची काय? काकूंच्या ५ मिनिटांच्या बोलण्यात इतक्या गोष्टींचे संदर्भ? त्या सगळ्या एकत्र केल्या तरी एक पुराण, काकूपुराण, लिहिता येईल. अरे काहीतरी तर सांग. बरे ते डास मारणे, ढेकूण मारणे, पाप वगैरे काय होते? ढेकूण म्हणजे मत्कुण हे आता मला कळले आहे. ते काकूंसारखेच चंचल असते हेही कळले. डासाची ढेकणाचीच गोष्ट सांग. आजची कापुसकोंड्याची गोष्ट.

ना: हं. ती आज समजून घेऊ. पुराणात ह्या गोष्टीचा उल्लेख आहे.

ब्र: सांगा मुनी. ढेकणाची पौराणिक गोष्ट. डासांची पण गोष्टं. उवांची पण गोष्टं. नारदपुराणातली की काय?

ना: ब्रह्मा, अनेक पुराणात आहे ही गोष्टं. मी भागवतपुराणात व नारदपुराणात वाचली आहे. दोन दोन पुराणात आहे, म्हणजे खरीच असली पाहिजे. नारायण नारायण!

ब्र: अरे, जे सांगायचे ते न हासता सांग.

ना: ब्रह्मा, तू बरेचदा काकाकाकूंना स्वतःच्याच कपाळावर, गालालर, किंवा हातावर जोराने चापटी मारताना बघितले असशील. चापटी मारल्यावर ते हळूच हात काढून बघतात की तिथे काही आहे का. काही चिकटलेले दिसले तर बोटाच्या टिचकीने ते उडवतात. 'मेला एकदाचा' म्हणून निश्वास सोडतात व खुष होतात. ब्रह्मा, त्यांनी डास मारलेला असतो. काही क्षणापूर्वीच तो उडणारा डास, तूच निर्मिलेला जीव, त्यांच्या हातावर बसून, नांगी टोचून, त्यांचे रक्त शोषत असतो. ह्या डास मारण्याच्या क्रियेचा उल्लेख काकूंनी केला होता. अशा डासहत्येत पाप नसते असा त्यांचा समज आहे.

ब्र: आणि ढेकूण?

ना: ब्रह्माजी, हाही डासासारखाच मानवरक्तशोषक, पण न उडणारा जीव. मास्तरांच्या वाड्यात लाकडी खाटांच्या फटीत हा लपलेला असायचा. खाटेवर जो झोपेल त्याला हा हळूच फटीतून बाहेर येऊन, चावून, रक्त शोषून, मानवरक्ताने टर्र फुगायचा. पुन्हा चपळतेने फटीत जाऊन लपायचा. हाच तो श्लोकातला 'म'कार मत्कुण. याला दिसताच हाताच्या किंवा पायाच्या आंगठ्याने चिरडून टाकायचे असते. याची अशी हत्या, मत्कुणमर्दन, केले की मग एक विशिष्ट वास येतो. अजूनही तो वास माझ्या नाकात भिनलेला आहे. डास किंवा ढेकूण यांच्या हत्येचे पातक लागत नाही आणि म्हणून काकाकाकूंना पाप लागले नाही असे काकू म्हणत होत्या. माशी तर डास व ढेकणापेक्षाही चपळ असते. असणारच! तीही 'म'कार आहे. तिला असे चापट मारून वा चिरडून मारणे शक्य नाही. ती त्या दोघांसारखी रक्तपिपासू पण नसते. म्हणून काका तिला ती नाकावर बसली तरी उडवत सुद्धा नाहीत. बसली तर बसो बिचारी घटकाभर, अशी संतवृत्ती त्यांची आहे. ह्या संतवृत्तीची काकू टिंगल करीत होत्या. आले का लक्षात?

ब्र: बापरे, एका एका शब्दात भारूड सामावलेले असते. कसे कळावे अत्रिलोकसंचारी देवांना पृथ्वीवास्यांचे हे संदर्भ? त्याकरिता तुझ्यासारखाच त्रिलोकी झेंडा लावणारा पुत्र हवा. तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... कितीही केलं तरी कमीच बा! पण नारदा, हे पाप म्हणजे काय रे?

ना: ब्रह्मा, पाप म्हणजे अपुण्य. हे मनुपुत्र जे काही करतात त्याचे त्यांना पाॅइंट्स मिळतात. चांगले काम केले तर काही पाॅइंटस्, म्हणजे काही गुण यांच्या खात्यात जमा होतात. वाईट काम केले तर गुण कटतात. जन्मभर केलेल्या पापपुण्याचा प्रत्येक मानवाचा हिशोब तुझा चित्रगुप्त अगदी चोख ठेवतो. माणसाचे आयुष्य संपले की पापपुण्याचा हिशोब करून जमेला पुण्य असेल तर विष्णुदूत पुण्यकऱ्याला स्वर्गात घेऊन जातात. स्वर्गात आपण त्यांचे कसे आदरातिथ्य करतो, सर्व सुखे कशी त्यांच्या पायाशी लोटांगण घालतात ते तुला मी कशाला सांगायला हवे? स्वर्ग म्हणजे अपवर्ग म्हणजे तुझेच घर. तुझ्या घरीच ते पुण्यात्मे युगानुयुगे येत असतात. तुला सर्व माहीतच आहे. नारायण नारायण!

ब्र: पुन्हा तेच हसू! पण नारदा, जे पापी आहेत त्यांचे काय? त्यांना पृथ्वीवरच ठेवतात काय?

ना: नाही ब्रह्मा. पापांचे गुण पुण्याच्या गुणांपेक्षा अधिक असतील तर ती व्यक्ति एकूण पापी समजण्यात येते. मग मृत्यूनंतर तिला यमदूत, म्हणजे आपल्या यमराजाचे चाकर, नरकात घेऊन जातात. विष्णुदूत पुण्यकऱ्याला स्वर्गात नेतात, तसेच यमदूत पाप्याला नरकात घेऊन जातात. मृत्यूनंतर आत्म्यांना कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक ह्या दोनपैकी एका काॅलनीत जावेच लागते. पृथ्वीवर राहता येत नाही. मृत्यूनंतर इथे त्यांचा फक्त फोटो आणि आठवणीच राहू शकतात.

ब्र: मग पाप्यांचे नरकात कसे स्वागत होते?

ना: ब्रह्मा, तुला आठवत असेल तुला अधर्म व मृषा नावाचे पुत्रकन्या होते. त्यांचाच खापर खापर पणतू मृत्यू. मृत्यूचा मुलगा नरक व मुलगी यातना हेही सांगितले मी तुला. पापात्म्यांची सर्व जबाबदारी नरकावर असते. तिथेच त्यांना त्यांच्या पापाच्या वर्गवारी नुसार योग्य त्या यातना देण्यात येतात.

ब्रह्माजी, हे सर्व सविस्तर वर्णन भागवत पुराणात व नारद पुराणातही आहे. अघोषित असे यात काहीच नाही. सगळं above the board अाहे. तक्रारीचा काही वाव नसतो.

थोडक्यात सांगायचे तर ब्रह्माजी, पुण्यात्म्यांना विष्णुदूत स्वर्गात आणून तुझ्या हवाली करतात, पापात्म्यांना यमदूत नरकात आणून यातनेच्या हवाली करतात. दोन्ही ठिकाणी खातिरदारी करणाऱ्या यजमानांचा वंश एकच. सगळे ब्रह्मवंशी. पिढीत फक्त बदल एवढेच! नारायण नारायण!

ब्र: नारदा, देतोस का नरकाबद्दल सविस्तर माहिती? कसे वागतात माझे नरक व यातना पाप्यांशी हे मला जाणून घ््यायचे आहे. की तेही नंतर कधीतरी सांगणार? आज तू नुसती तोंडाला पाने पुसतो आहेस बघ! हे तरी आज सांग.

ना: ब्रह्माजी, ही पण कापुसकोंड्याची गोष्ट फार मोठी आहे. बराचसा गोष्टीचा भाग पितापुत्रांनी संवाद करावा असा नाही. अनेक पापांचा व त्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा ह्या काकाकाकूंच्या सात्विक घरी उच्चारही नको. ते सर्व तुला काँप्युटरवरच वाचावे लागेल. भागवतपुराणाचा हा अंश आवडीने वाचावा असा नाही. तरी थोडीफार मला जी माहिती आहे ती देतो बापुडा!

ब्र: छान! तुला जे प्रशस्त वाटेल ते सांग. बाकी मला माझा मानसपुत्र गूगल सांगेल. तो आजकाल माझा आवडता पुत्र आहे.

ना: आणि मी? मी आता नावडता झालो की काय? तसे असेल तर मीही तपस्या करून अढळपद मागीन.

ब्र: तसे नाही रे. तू जवळ नसतांना तो. तू नंबर वन, गूगल नंबर टू! दोघेही मला ज्ञानदान करत असतात. प्रायव्हेट ट्यूशन!

ना: मग ठीक!

ब्रह्मा, स्वर्ग एक असला तरी नरक एक नाही. ते सहाजिकच आहे म्हणा! स्वर्गापेक्षा नरकात पोहोचणाऱ्यांची संख्या कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे नरक अतिविशाल आणि बहुविध आहे.

देवा, एकूण २८ वेगवेगळे नरक आहेत. त्यांची नावेही भागवतपुराणात आहेत. नारदपुराणात पण तीच नावे आहेत.

ब्र: अठ्ठावीस? सांग बरे नावे. एखादे तरी कानावरून गेले आहे का बघू.

ना: ब्रह्मा, भागवत पुराणात २८ नरकांची नावे व त्यात ज्यांना ब्रह्मपुत्र यमराजांचे दूत घेऊन जातात त्या पापी लोकांची पापे यांचे सविस्तर वर्णन आहे. नरकांची नावे तामिस्र, अंधतामिस्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सूकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संन्दंश, तप्तसूर्मी, वज्रकंटकशाल्मली, वैतरणी, पूयोद, प्राणरोध, विशसन, लालाभक्ष, सारमेयादन, अवीची, अयःपान, क्षारकर्दम, रक्षोगणभोजन, शूलप्रोत, दन्दशूक, अवटनिरोधन, पर्यावर्तन अशी आहेत.

ब्र: पण नारदमुनी, ही तर सत्तावीसच झाली. अठ्ठावीसावे नरक मुंबई की काय? मुंबई म्हणजे अगदी नरक असे जंतुकवीच्या बालवेदातील नरकचतुर्दशी कवितेत वाचल्याचे आठवते म्हणून अंदाज केला.

ना: नाही ब्रह्मा. तसे तर मग भारतवर्षात पुष्कळच नरक असतील. ते पृथ्वीवरचे नरक वेगळे. ते सारे मनुष्यनिर्मित नरक. ब्रह्मदेवनिर्मित नाहीत. तू निर्माण केलेल्या अठ्ठावीसाव्या नरकाचे नाव सूचीमुख. माझ्या यादीतून ते चुकून सुटलेले दिसते. बाकी तू मात्र गणितात आता बराच तीक्ष्णबुद्धी झालास हं. सतत मोजत असतोस. हाच सतत अभ्यासाचा फायदा ब्रह्मा. मास्तरांच्या शाळेत तू अंकगणित शिकलास त्याचा हा फायदा.

ब्र: नारदा, वेळ असेल तर काय पाप केले की कुठल्या नरकात जावे लागते व तेथे काय काय यातना देतात ही माहिती दे.

ना: ब्रह्माजी, सांगतो, पण मन घट्ट करून ऐकावे लागेल. अजिबात अतिशयोक्ती न करता, भागवत पुराणात शुकाने परिक्षिताला जे कथन केले ते थोडेफार सौम्य करून सांगतो. त्या नरकाच्या विचाराने सुद्धा मला घाम फुटतो आहे. बघ जमीनीवर घर्मबिंदू पडलेले आहेत. आपण अदृश्य असलो तरी आपला घाम दृश्य आहे ब्रह्मा. तो दिसला तर पुन्हा भानामती भानामती होईल. त्यापेक्षा आपण झाडाखाली बसून हे विवेचन करू. घाम जमीनीत जिरून जाईल व कोणाला कळणारही नाही. त्या सीताफळाच्या झाडाखाली बसू. खूप सीताफळं पण लागली आहेत. चाखू एक दोन. सकाळीच काकू कौतुकाने बघत होत्या. एक दोन दिवसात तोडतील पण. मग सीताफळाचे कालवण! आधीपण तू चव पाहिली आहेस बरें.

ब्र: नारदा, चल जाऊ. पण फळ चाखणे राहू दे. फळे कमी झाली तरीही मग भानामतीचा संशय येईल.

ना: नाही ब्रह्माजी. फोतर आणि बिया तिथेच जमीनीवर टाकल्या की झाले. पक्षांवर आळ येईल. नाहीतरी पक्षी बरीच नासधूस करतातच. त्यामुळे एकदोन फळे आपण घेतलेली चालतील. नैवेद्य समज वाटल्यास. नाहीतरी आपण भक्तिभावाने दिलेला नैवेद्य हातही न लावता प्रसाद म्हणून परत करतोच की रोज. ब्रह्मा, ही सारी सृष्टी तुझीच रे!

ब्र: बरे बाबा. तुझ्यासारखा त्रिलोकज्ञानी, त्रिकालज्ञानी सोबत आहे म्हणून माझे बरे चालते हो. नाहीतर ह्या पृथ्वीवर काही माझी धडगत नव्हती रे बाबा.

ना: ब्रह्माजी, सुरू करू या. तुम्ही इथे वरच्या फांदीवर बसा. मी जरा खालच्या फांदीवर बसतो. दोन पक्षांसारखे.

ब्र: बरे मुनी. सुरू करा तुमची नरकलोकाची गोष्ट. नारायण नारायण!

ना: ब्रह्मा, दुसऱ्यांचे पैसे व बायकापोरांचे जो अपहरण करतो त्याला यमदूत तामिस्र नावाच्या नरकात लोटतात. अत्यंत अंधःकारपूर्ण ह्या नरकात त्याचे अन्नपाणी बंद करून छडीने मारणे, भीती दाखवणे वगैरे प्रकार करतात. सहन न होऊन तो बेशुद्ध होतो.

वरीलप्रमाणेच जो फसवणूक करतो व अपह्रत स्त्रीबरोबर दुर्व्यवहारही करतो त्याची रवानगी अंधतामिस्र नरकात होते. येथे देण्यात येणाऱ्या यातना इतक्या की त्याची स्थिती मूळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे होते व त्याची शुद्ध हरपते.

ब्र: नारदा, थोडे पाणी हवे रे. तोंडाला खरेच कोरड पडते आहे.

ना: जरूर ब्रह्मा. तू खरोखरच कोमल ह्रदयाचा आहेस बरे! हे घे. शांत हो. अरे पाप करणाऱ्यांना काही लाज नाही, आणि तू मात्र हळवा होतोस. तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... दयासागरच बा!

ब्रह्मा! पृथ्वीवर बरेच लोक असे असतात ज्यांचे स्वतःवरच प्रेम असते. बायको, धन हे सर्व माझेच आहे अशी त्यांची धारणा असते. असे लोक स्वकेन्द्रित असतात व स्वतःच्या व कुटुंबाच्या पालनपोषणातच मग्न असतात. स्वार्थासाठी ते इतर प्राण्यांचा द्वेष करतात. मृत्यूनंतर असे लोक आपण होऊनच रौरव नावाच्या नरकात जाऊन पडतात. तेथे ज्या जीवप्राण्यांना त्याने स्वतःच्या आयुष्यात त्रास दिला ते रुरु नावाच्या प्राण्याचे रूप घेऊन त्याला अगदी तसाच त्रास देतात. रुरु म्हणजे सापापेक्षाही क्रूर असा प्राणी असतो जो फक्त रौरव नरकातच सापडतो. 'करावे तसे भरावे' असे म्हणतात. तशीच काहीशी स्थिती अशा पाप्यांची होते.

महारौरव नरक याहीपेक्षा भयंकर. स्वतःच्या कुटुंबाकरिताही नाही, जो फक्त स्वतःकरिताच जगतो व इतर प्राण्यांचा द्वेष करतो व त्यांना त्रास देतो तो महाभाग महारौरव नरकात पडतो. इथे तर रुरु प्राणी त्या पाप्याला फाडूनच खातात.

ब्रह्मा, जे लोक मांसाहार करतात त्यांना तर राक्षसांपेक्षाही क्रूर समजण्यात येते. मृत्यूनंतर ते कुंभीपाक नरकात जातात. तेथे त्यांनाच उकळत्या तेलात शिजवितात म्हणे. म्हणून तर ह्या नरकाचे नाव कुंभीपाक. मोठमोठ्या कुंभात येथे असा मांसाहारी स्वंयंपाक सुरू असतो.

जे लोक मातापिता, ब्राह्मण व तू निर्मिलेल्या वेदांचा विरोध करतात त्या पापी लोकांना यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात. हे फार मोठे नरकस्थान आहे. तिथले पटांगण तांब्याचे आहे. हे पटांगण वरून सूर्य व खालून जाळामुळे खूपच तापलेले असते. अशा दाहक पटांगणावर हा पापात्मा हजारो वर्षे पोळल्या जातो व तडफडत राहतो.

ब्र: नारदा, थोडा ब्रेक घ््यायचा का रे. हे सर्व पचायला फारच जड आहे.

ना: ठीक ब्रह्मा. सांगणाऱ्याला सुद्धा हे काही सोपे नाही. तुझ्या डोळ्याला डोळा भिडवून सांगणे सुद्धा मला जड जात आहे. एक एक सीताफळ खाऊ या. नाहीतर भेंड्या खेळू. आता आपल्याला पुष्कळ कविता येतात. वाड्यातली भेंड्यांची वही आणली असती तर बरे झाले असते.

ब्र: नको. भेंड्या नको. तूच जिंकशील. मलाही थोड्या कविता वाचू दे. मग कधी खेळू. आता सध्या सीताफळ खाऊ या.

ना: ब्रह्मा, सीताफळ खरेच गोड होते. आता पुन्हा नरकात जाऊ. जाऊ नाही, पण त्यांची माहिती घेऊ.

जो मनुपुत्र जेवण्याआधी पंचयज्ञ करून आधी दुसऱ्या कोणाला अन्नदान करीत नाही व फक्त स्वत:च खातो त्यात आणि कावळ्यात काही फरक नाही असे म्हणतात. मृत्यूनंतर अशा पाप्याची रवानगी थेट कृमिभोजन नावाच्या नरकात होते. अठ्ठावीस नरकांमध्ये सुद्धा हे अत्यंत खालच्या दर्जाचे नरक मानण्यात येते. या नरकात एक लक्ष योजने लांब एक अगणित किड़्यांनी भरलेले विशाल टाके आहे. या कुंडात या पाप्यालाही कीडा बनून राहावे लागते. तेथे तो कीडे खातो व कीडे त्याला चावतात. हेच त्याच्या पापांचे फळ.

ब्र: नारदा एक योजन म्हणजे किती रे अंतर? ग्रह ताऱ्यातील अंतरही योजनांमधे दिलेले मी वाचतो. पण एक योजन म्हणजे किती? इथून आपल्या खोलीपर्यंत, की रस्त्यापर्यंत?

ना: ब्रह्मदेवा, नक्की माहीत नाही. पण विश्वकर्मा सांगत होता की काकूंच्या घरापासून मास्तरांच्या वाड्यापर्यंतचे अंतर अंदाजे तीन योजने आहे म्हणून. त्यावरून कल्पना कर.

ब्र: बापरे, म्हणजे हे कीडाकुंड खूपच मोठे आहे. हा जंतुकवी पण त्या कुंडातलाच की काय?

ना: नाही रे. ते त्याचे टोपणनाव आहे. खरे नाव छगन बापू मोरे आहे म्हणे.

ब्रह्मा, इतरांचे सोने, जडजवाहिरांची चोरी करणारा संदंश नरकात जातो. येथे त्याला गरमागरम लोखंडी गोळ्यांनी चटके देतात व चिमट्यांनी त्याची कातडी सोलतात.

जे राजे किंवा राजाचे सेवक धर्माच्या मर्यादांना उल्लंघून धर्मबाह्य वर्तन करतात ते वैतरणी नरकात त्याच नावाच्या नदीत पडतात. ही नदी म्हणजे मल, मूत्र, विष्टा, चिपड, शेंबूड, कानमळ, नखे, व तत्सम घाण गोष्टींचे गटारच आहे म्हण. त्या पाप्याला नदीतले जीव ओरबाडतात. ब्रह्मा, नरकात कोणी राजा नाही, कोणी रंक नाही. सगळे फक्त पापी.

ब्र: नारदा पुरे! हे सर्व ऐकणे सुद्धा कठिण आहे. त्या वैतरणीचा वास मला येतो आहे असे वाटते. कदाचित जवळच्या नाग नदीचा पण असेल. जाऊ दे. मी वाचीन कधीतरी हा यमराजाचा पापपुण्य निवाडा. लोकांनी पापे करावीच कां मी म्हणतो. जसे वेद पुराणात सांगितले आहे तसेच वर्तन ठेवले तर सारे नरक ओसाड पडतील.

ना: ब्रह्मा, होत आहे ते मात्र अगदी उलट बरे. पापे वाढत आहेत असे काकूच नाही का म्हणत? असू दे. पण एक आणखी पाप व त्याची भागवतपुराणात सांगितलेली शिक्षा मात्र ऐक. बाकी तू स्वतः वाच. आपल्या हातून पण असे पाप घडू नये असे वाटते.

ब्रह्मा, जे मानव पृथ्वीवर ढेकूण व तत्सम जीवांना मारतात ते अंधकूप नरकात पडतात. डास, ढेकूण माणसाला चावतात यात त्या बिचाऱ्या कीटकांचा काही दोष नाही. तूच ही त्यांची उपजीविका ठरविली आहेस त्यांना निर्माण करतांना. असे करण्यात आपण इतरांना कष्ट देतो हे समजण्याइतकीही त्यांची बुद्धी नाही. पण मानवाला मात्र पापपुण्याचे ज्ञान आहे, योग्यायोग्यतेची जाणीव आहे. त्यामुळे पशू, मृग, पक्षी, साप, गेंडूळादि सरपटणारे प्राणि, डास, ढेकूण, माशा, उवा मारणे अक्षम्य पाप आहे. अंधकूप नरकात हे सर्व त्रस्त प्राणी त्या पाप्यावर तुटून पडतात. अशा नरकात कुठली झोप अन् कुठले काय! तो पापी तसाच तडफडत राहतो व पापाची फळे भोगतो.

ब्र: बापरे बाप. मग तर नारदा सारेच पापी. आजकाल तर डास, उवां इत्यादींची आम कत्तल करतात औषधाने. आता पुरे नारदा. नाही ऐकवत.

ना: ब्रह्मा, येथे सारेच पापी रे. नारायण नारायण! पण ब्रह्मा, ही पापे पुण्य कमावले तर कँसल होत असावी. म्हणून तर ही पुण्य कमावण्यासाठी चढाओढ लागलेली असते. सतत पोथीपाठ, देवदर्शन, उपासतापास, गंगास्नान, दानधर्म.

ब्र: पण त्यात वाईट काय? स्वार्थासाठीच कां होईना, लोक अशा गोष्टी करतात. दान देणे, फुकट जेवू घालणे वगैरे चांगले नाही का?

ना: तूच सांग ब्रह्मा. एक दोन गोष्टी नरकाच्या भीतीपाई व स्वर्गप्राप्तीच्या मोहापाई कदाचित चांगल्या घडतही असतील. पण सर्वच विधींबद्दल तसे म्हणता येईल का?

ब्र: नको प्रश्न विचारूस नारदा. माझ्याजवळ तरी कोठे उत्तर आहे? तू काही सांगत असतोस, मी फक्त ऐकत अाहे. केव्हा संपतील ही पुराणे? कधी संपेल रे पारायण? माझ्यापेक्षा तूच ज्ञानी. नारायण नारायण!

ना: ब्रह्मा! तुझ्या लक्षातही आले नसेल. पण आत्ता तुझ्या मुखातून जे बोल निघाले तो तुझ्या ह्रदयाचा पाझर होता. हीच खरी कविता. तुझी आजची कविता. फक्त कवितेसारखी लिहायला व म्हणायला हवी.

नको प्रश्न विचारूस नारदा
माझ्याजवळ तरी कोठे उत्तर आहे?
तू काही सांगत असतोस,
मी फक्त ऐकत आहे
केव्हा संपतील ही पुराणे?
कधी संपेल रे पारायण?
माझ्यापेक्षा तूच ज्ञानी
नारायण नारायण!

व्वा! छान!  ब्रह्मा, तू निर्माण केलेल्या विश्वातली पहिली वहिली कविताही अशीच क्रूरतेच्या दर्शनाने झाली होती.

मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौंचमिथुनादेकं अवधीः काममोहितम् ।

ब्रह्मा, असं म्हणतात की क्रीडामग्न क्रौंचदम्पतीला शिकाऱ्याने बाण मारून त्यातील नरक्रौंचाला घायाळ करताना पाहून वाल्मिकी ॠषींच्या मुखातून हे उत्स्फूर्त शब्द निघाले. ते शब्द म्हणजे तुझ्या विश्वातील पहिली कविता आणि वाल्मिकींना म्हणूनच आद्यकवीचा मान. नंतर अनेक कवी आले, येतील. पण पहिला तो पहिला. ब्रह्मा! पहिले असणे, किंवा पहिले येणे याचा काय आनंद असतो हे मी थोडेफार अनुभवले आहे. आपला पहिला मुलगा मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला आला तो आनंद काय असतो हे मास्तरांनी मज्जीवनमणिमालेत वर्णिले आहे. मी साक्षी पण होतो त्या मंतरलेल्या दिवसांचा. तू, वाल्मिकी, सदाशिवसुत प्रमोद सारेच आपापल्या परीने पहिले.

ब्र: नारदा, तूही काही कमी नाहीस. तू तर पहिलाच नाही, तर पहिला व शेवटला एकमेव त्रिलोकसंचारी आहेस. खट्याळपणातही तूच पहिला. गोष्टम्या तर एकमेवाद्वितीयम्. सर्वप्रथम! सदा सर्वदा! गर्वाने माझी सुद्धा छाती फुलून जाते.

नारदा! मला एक प्रश्न नेहमी सतावतो रे. आपण अदृश्य हे खरे. पण आपला अदृश्यपणा आपले शरीर पारदर्शक आहे म्हणून, की आपण अशरीर आहो म्हणून? एवढ्यासाठी विचारतो की काकाकाकू आता ह्या खोलीत काँप्यूटर आणण्याची तयारी करीत आहेत. तसे होत असतांना आपण खोलीत जावे की नाही? नाहीतर नेमकी त्यांच्याशी अनवधानाने टक्कर व्हायची. पुन्हा काकू पडायच्या. पुन्हा भुंग्यावर आळ यायचा. किंवा टक्कर टाळतांना आपलीच आणखी कशाशी तरी टक्कर व्हायची. काहीतरी पडायचे, फुटायचे. मग पुन्हा भानामती. पुन्हा गुरुजी.

ना: ब्रह्माजी, मलाही माहीत नाही ह्या प्रश्नाचे उत्तर. देवाचा वास सर्वत्र असतो असे म्हणतात. पण कोणी देवाशी टक्कर होऊन पडला असे ऐकिवात नाही. म्हणजे बहुधा देवांना शरीर नसावे. म्हणून कदाचित तुला निर्गुण निराकार म्हणत असावेत. असो. होऊ दे काकाकाकूंचे काम. मग जाऊ आपल्या खोलीत. म्हणजे चिंताच नको.

ब्रह्मा, आणखीन एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल. साधी मांजर जरी झाडाच्या फांदीवर चढली तरी मांजरीच्या वजनाने फांदी वाकते. किंवा फांदीचे फळ तोडले तरी वजन कमी झाले म्हणून फांदी, थोडी का होईना, वर जाते. पण तू मी झाडाच्या फांदीवर चढून बसलो तरी ती जराशीही वाकली नाही. याचा अर्थ तुला मला वजन नाही. काकूंना वजन आहे. कितीदा त्या वजन करीत असतात. कितीदा त्या १०० ग्रॅम वजन कमी झाले म्हणून आनंदतात. वजन आहे म्हणून त्या खऱ्या आहेत. आपण त्यांच्यासारखे नाही. म्हणजेच आपण नाही.

ब्रह्मा, आणखी एक गोष्ट लक्षात घे. आपल्याला कधी डास चावत नाही. ना कपाळाला, ना हाताला. कधी डास चावून धामे येत नाही. वाड्यात सुद्धा मला कधी ढेकूण चावले नाही. फक्त त्याचा तो विशिष्ट वास आल्याचे मात्र अंधुकसे आठवते. म्हणजेच आपल्याला रक्त नाही. पण म्हणजे आपण नाही का? मला नाही माहीत. मला वाटते की आपण नाही अन् आहोत पण. पण आपली ह्या अस्तित्व असलेल्या मनुपुत्रांबरोबर टक्कर होऊ शकते असे मला वाटत नाही. पण मला खात्री नाही.

ब्रह्मा, आपण नाही म्हणावे तर सगळ्या पुराणात, वेदात, उपनिषदात, काव्यात आहोत. मानवाच्या  डोक्यात, विचारात, स्वप्नात आपण आहोत. जोवर तो आहे, जोवर तो आपल्याला पुसून टाकत नाही, तोवर आपणही आहोत.

ब्र: ठीक आहे मुनीश्रेष्ठ. तुम्हाला पहिल्यांदा मी उत्तर देतांना इतके गोंधळून गेलेले पाहिले. आपण असू वा नसू. पण जोपर्यंत ह्या मनुवंशजांचा आपण आहोत असा ठाम विश्वास आहे तोपर्यंत आपण आहो.

चल. तू पक्षीद्वय बघ. मी जरा ब्रह्मकमळाची दुसरी कळी कुठपर्यंत आली ते बघून येतो. काँप्युटर आपल्या खोलीत आला की मग जाऊ खोलीत. आता वाचनाचा वेगही वाढवायला हवा. केवढा अफाट हा साहित्यसागर. सागरमंथन करायलाच हवे. त्यातूनच अमृत निघेल.

ना: ब्रह्मा, खरेच रे. मंथन करून युगे उलटली. तळवे अगदी सुळसुळतात रवीने ताक घुसळायला, नवनीत काढायला. ते बघ झाडावर दोन पक्षी. खालचा सतत काहीतरी खात आहे. वरचा निर्विकारपणे बघत आहे. ह्यांचे गूढ उपनिषदात उकलले आहे म्हणतात. तेही वाचायला हवे. विचारमंथन करायला हवे. तत्त्वामृत काढायला हवे.

ब्रह्मा! हे दोन पक्षी म्हणजे आपणच दोघे तर नाही? हे सीताफळाच्या झाडावर बसलेले ब्रह्म व ब्रह्मपुत्र तर नाहीत? हेच आपले दृश्यरूप तर नाही?

_____________________


अनुक्रमणिकेकडे

No comments:

Post a Comment