गोष्ट एकवीसावी
स्वये श्रीरामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिने तेजाची आरती
कुश लव रामायण गाती
स्वये श्रीरामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती
ब्र: नारदा, हे गीत गीतरामायणातलेच ना रे? दरवर्षी चैत्रात लागते, रामनवमी का काय असते तेव्हा. मला गीत, ताल वगैरे तर खूप आवडतातच, पण 'पुत्र सांगती चरित पित्याचे' ही कल्पनाच खूप आवडते. त्याचे वर्णन 'ज्योतिने तेजाची आरती' अशा शब्दात करण्यात तर गीतकाराचेच तेज तळपते.
ना: होय ब्रह्मा. हे गदिमांच्या गीतरामायणातले गीत आहे. गीतरामायण म्हणजे मराठी माणसाची अस्मिताच जणू. गीतरामायण आवडत नाही तो मराठी माणूस किंवा ती मराठी बाईच नाही असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ब्रह्मा, गजानन दिगंबर माडगूळकरांचे गीतरामायण म्हणजे दर्जाने माडासारखे उंच व चवीला गुळासारखे गोड. Gadima.com वर त्यांच्याच पुत्राने त्यांची आठवण जतन केली आहे. ही साईट म्हणजेही मला 'पुत्र सांगती चरित पित्याचे' अशीच वाटते. गदिमांचे समग्र साहित्य येथे तुला वाचायला मिळेल. गीतरामायण तर आहेच आहे. आणखीही इंटरनेटवर सर्फिंग करशील तर गीतरामायणातली सारीची सारी छप्पन्न गाणी सुधीर फडकेंच्या मूळ आवाजात ऐकायला मिळतील. ब्रह्मा, तुझ्या त्या समुद्रमंथनात कष्टाने काढलेले ते अमृत सुद्धा इतके अवीट गोडीचे नसेल. ऐकू सारी गाणी एकदा सवडीने. आता काय, आपल्याला मोकळे रानच आहे. आता काकाकाकू ३-४ महिने काही इकडे फिरकायचे नाहीत. ते जंबुद्वीपाबाहेर सातासमुद्रापलिकडे अमरद्वीप का काय म्हणतात तेथे गेले आहेत हिंडायला.
ब्र: तरीही मला वाटतच होते की आज गजर कसा नाही झाला. काल रात्रीही तशी लवकरच दिवे मालवण झाली. नारदा, मी काय म्हणत होतो की ही पुत्राने पित्यालाच पित्याचीच कथा ऐकवणे तसे थोडेफार आपल्याही बाबतीत होतेच कधीकधी. तूच मला माझे मूळ काय, हिरण्यगर्भ वगैरे काय, माझे वय काय वगैरे सांगायचास. मला ते काहीच माहीत नाही ही गोष्ट वेगळी. पण पुराणे पालथी घालून तूच मला माझी ओळख करून देतोस. माझ्याच कथा सांगतोस. ब्रह्मकथा. मग कोणी आपल्यावर गीतब्रह्मायण कां लिहीत नाही? कोणी नाही लिहिले तरी तूच लिहून, तूच आपल्या भसाड्या आवाजात गात कां नाहीस? कशी वाटली आयडिया?
ना: ब्रह्मा, मी जसा इच्छास्थळी आहे व इच्छा होईल तेथे क्षणात जातो, तसाच तूही इच्छालेखणी आहेस. तुझ्या मनात येईल ते लगेच तुझ्याच सृष्टीतला कोणीतरी लेखणीत उतरवतोच. बघ गीत ब्रह्मायण तुझ्यासमोरच स्क्रीनवर उघडले आहे. म्हणशील तर गातो. पण हसू नकोस. आवाजाकडे दुर्लक्ष कर. फक्त भाव लक्षात घे.
ब्र: म्हण म्हण. मराठीत असल्यामुळे मला थोडेफार समजेल. तरी पण गीत असल्यामुळे त्याला लौकिकार्थ, मतितार्थ, भावार्थ, गर्भितार्थ, ध्वन्यार्थ वगैरे वगैरे अर्थांचे अनेक थर असतील. मला कितपत कळते ते तू जाणतोसच. मला कळले नसावे असे तुला वाटेल तेव्हा तू मधे मधे चोच मारत जा. अर्थ स्पष्ट करून सांगत जा. मला ते चालेल बरें.
ना: ठीक तर. ऐक. ओळखीची चाल आहे तुझ्या.
स्वये श्री ब्रह्माजी ऐकती
मुनिवर ब्रह्मायण गाती
ब्र: अरे वा! ही तर नक्कल झाली. पण चाल जमली हं. तू म्हटले त्या ओळी धृवपद म्हणून पुन्हा पुन्हा आळवता घोळवता येतील. मी पण तुझ्याबरोबर म्हणतो.
पंचमुखी तो, आद्य देव तो
रहस्यसृष्टीचा मालक तो
हिरण्यगर्भोत्पन्न स्रोत तो
सकलची ब्रह्मांडाचा पती
महापुराणे समग्र वाचुनी
ब्रह्मपुत्र त्या हात जोडुनी
समुद्रमंथन कथा गुंफती
आतुरे ब्रह्मकर्ण श्रवती
छान. पण ही तर समुद्रमंथनाची कथा दिसते. चला, ती कथा तू सांगीन सांगीन म्हणायचा, पण कधी सांगितली नव्हती. आज योग आला. पण मग याला ब्रह्मकथा किंवा ब्रह्मायण कां म्हणतात?
ना: ब्रह्मा, समुद्रमंथनात तुझा सहभाग होता. म्हणून ही तुझीही कथा. तुझ्या चरित्राचा भाग. ब्रह्मायण म्हणजे तसे तुझे चरित्र नसले तरी तू जेथे जेथे आहेस अशा पौराणिक कथांचे काव्यमय संकलन असावे असे मला वाटते. एक माझा अंदाज, बरं का?
विजयी दानव विश्व व्यापिती
देववैर तव शुक्र पोसती
अनेक युद्धे जिंकुनि असुरे
अवघा त्रिलोक संक्रमिती
दिनरजनीचे युद्ध सदाचे
द्वंद्व नित्य शुभ्राशुभ्राचे
वैर जसे मुंगुस सापाचे
पसरली स्वर्गव्याप्त भ्रांती
ब्रह्म इंद्र शिव व्याप्त भयाने
विष्णुलोकी जाती आशेने
दानव दैत्यांचे गाऱ्हाणे
लक्ष्मिपती नारायण ऐकती
ब्रह्मा, आपसात गुंतागुंत झालेले असे त्रिलोकात तीनच वंश; देव, दानव व मानव. मानव हा नेहमी तुझ्या, म्हणजे देवांच्या बाजूचा. मुख्य मतभेद देव आणि दानव या दोन पक्षात. नेहमी त्यांच्या लढाया. देव कितीही सत्याच्या बाजूचे, न्यायाच्या बाजूचे वगैरे असले तरी सरशी बहुतांश दानवांचीच व्हायची. त्यात शुक्राचार्यांचे देवांशी काही कारणानी हाडवैर. दैत्यांचे गुरूच ते. त्यांनी संजीवनी विद्येचा वापर करून मृत राक्षसांना पुन: जीवित करण्याचा चंग बांधला. मग काय, दानवांवर चिरस्थाई विजय देवांना अशक्यच झाला. हळूहळू देवजात दुबळी व्हायला लागली, व दानव अधिकाधिक बलशाली. देवांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उठायला लागले. म्हणून तू, शंकर, इंद्र सारे विष्णूकडे गेले व त्याच्यासमोर आपले रडगाणे गाऊन उपाययोजना सुचवा असे म्हणाले. अगदी 'आईऽऽ, याला बघ ना गं, हा मला चिमटा काढतो. भ्याँऽऽऽ'.
ब्र: चिडव, चिडव. जसा तू कधी रडलाच नाहीस लहानपणी. खरे म्हणजे तू नाही कधी रडलास. तू नुसता रडवतोच सगळ्यांना. चला आता पुढे.
उपाय एकच, समुद्रमंथन
देवांसी सांगे नारायण
क्षीरसागरी ज्यांचे आसन
भूत नी भविष्य जे जाणती
क्षीरसागरी अद्भुत रत्ने
मिळती करिता मंथन यत्ने
अशक्य जोवर आहे अघटित
या जगी दानव देव युती
नारायण सांगे देवांना
लोटांगण घाला शुक्रांना
मागतील ते द्या दैत्यांना
तयांची पदरी घ्या स्वीकृती
दैत्यराज बळि त्यांची शक्ती
शुक्राठायी त्याची भक्ती
शुक्राचार्यच वळवू शकती
महाबली बळिराजाची मती
वचन बळीला द्यावे देवे
समुद्रमंथनी जे जे यावे
दोघांनी सम सम वाटावे
तद्वतचि दिव्य भोग अमृती
इंद्रा धाडा बळीचे द्वारी
युद्धबंदीचा शब्द साखरी
देव दानवी शांती समरी
घडविजे देव दैत्य प्रगती
कठिण काळ देवांचा आहे
ग्रह दैत्यांचा बलिष्ठ आहे
संकटकाळी गर्व न राहे
जाणिजे हीच सुजाण नीती
ना: ब्रह्मा! नारायणाला माहीत होते की संजीवनी विद्येमुळे दानव मरूनही पुन्हा जिवंत होत. त्याला शह म्हणून देवांनाही अमरत्व प्रदान करणारे अमृत प्राशन करणे आवश्यक आहे असे नारायणाला वाटले. पण असे काही द्रव्य वा औषधी सृष्टीत आहे असे ऐकिवात नव्हते. क्षीरसागरात विष्णूंचा बरेचदा वास असल्यामुळे त्याच्या उदरात असे द्रव्य असावे व घुसळण केले की ते वेगळे होऊन वर तरंगावे असा त्यांचा कयास असावा. म्हणून एक शेवटचा डेस्परेट उपाय म्हणून त्यांनी समुद्रमंथनाचा तुम्हाला सल्ला दिला.
पण समुद्र म्हणजे काही वाड्यातल्या म्हातारीच्या दगडीतले सायीचे दही नव्हे. घेतली रवी आणि काढले लोणी अशातला तो प्रकार नव्हता. हजारो वर्षे क्षीरसागर घुसळला तर कदाचित अमृत बाहेर येईल असे विष्णूस वाटले. पण तुम्ही देव आधीच पराभूत व दुर्बळ. त्यात मनोधैर्य खचलेले. म्हणून कसेही करून मंथन करायला दानवांचाही साथ मिळविणे नारायणास आवश्यक वाटले. त्यासाठी थोडी पड खावी लागली, असुरांच्या मान मान मिंता कराव्या लागल्या तर तसेही करावे असा उत्तम सल्ला त्यांनी तुला दिला. दैत्यराज बळीकडे जाऊन, त्यालाही समुद्रमंथनात जे प्राप्त होईल त्यात दैत्यांचा वाटा कबूल करून, त्याला व समस्त दैत्य, दानवांना मंथनाला हातभार लावायला राजी करावे असे त्याला वाटले. समुद्रमंथन करायचे तर देव दानव युती आवश्यक आहे हे नारायणाने बरोबर जाणले. पण असुरांना ते पटेल की नाही हे त्यालाही माहीत नव्हते. हे सर्व अमृताचे आमिष दाखवूनच करावे लागणार होते. अशा ह्या कृष्णशिष्टाईवरही वरताण कार्याला तुला, शिवाला, इंद्राला जायचे होते. त्यांनी होकार दिला तरच मग मंदारपर्वत उचलून क्षीरसागरात नेण्याचे, त्याची रवी करून, वासुकीचा दोर करून सुर असुरांनी दोन बाजूंनी गौळण गात गात दूध घुसळून लोणी काढायचे होते. काय काय करावे लागते देवांना!
बळिराजाची बलाढ्य सेना
असुरसैन्य शांती मागे ना
आमिष अमृत पुढे ठेविता
आसुरी बळि देई संमती
शक्ती आसुरी, युक्ती दैवी
दोर वासुकी, मंदार रवी
कथा अशी ना घडली पूर्वी
ब्रह्मसुत मुनी गौळण गाती
दुर्मिळ क्षण हा इतिहासाचा
मेळ होतसे सुरासुरांचा
एकजूट ही, सारे मिळुनी
अचल त्या मंदारा उचलती
अचल नव्हे तो दगडमातीचा
सबाह्य पर्वत तो सोन्याचा
बळे उचलती योद्धे सारे
मिळुनिया त्या खांद्यावरती
जंबुद्वीपस्थित अचल निघाला
द्वीपे सागर लांघायाला
क्षीरसागरा मंथन करता
प्रसादे अमृत ये वरती
भार न पेले मंदाराचा
गर्व हरितसे तो साऱ्यांचा
खचुनी लटपट पाय कापती
असुर सुर काय तयांची गती
ब्र: नारदा, एकट्या हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून लंकेला नेला होता ना रे? वाचले होते मी रामायणात. मग येथे सारे देव, दानव असतांना एक मंदार उचलून क्षीरसागरात न्यायला कां इतके कठिण गेले?
ना: अरे द्रोणागिरी एक दगडमातीची टेकडी. मंदार म्हणजे लक्ष योजने उंच, तेवढाच रुंद सोन्याचा पर्वत. ब्रह्मा, लोखंड पाण्यापेक्षा ७-८ पट जड. सोने लोखंडापेक्षा तिप्पट जड. साधे आंगभर सोन्याचे दागिने घातले तर लोकांना जड वाटते. हा तर सोन्याचा साॅलिड विशाल पर्वत. खूप वजनी. मजा नाही बरे. हा मंथनाच्या वेळी समुद्रात तरंगलाच कसा ह्याचेच नवल वाटते. असो. केली असेल नारायणाने काहीतरी करामत. बरेचसे देव दानव मंदाराखाली चिरडले गेले असा भागवतात उल्लेख आहे. तू तर घाबरूनच गेला असशील. मग तू काय केले असेल याचा पण मी अंदाज करू शकतो ब्रह्मा. नारायण नारायण!
इंद्र ब्रह्म शिव हतबल होती
देव नि दानव हार मानती
हात जोडता गगनी दिसले
कष्टहर गरुड नी त्याचे पती
नारायण सांगे गरुडाला
उचली अचला, घे पाठीला
सुरासुरांना सांगे या तुम्ही
चढुनिया मंदारावरती
शिखरावर बसला नारायण
खाली सारे अदेव सुरगण
गरुडे पंख हलविता सहजी
लीलया सुटली ती धरती
गरुडभरारी अपूर्व आता
सुवर्ण तळपे नभात जाता
द्वीपे सागर ओलांडुनि ते
सकुशले क्षीरसागरी येती
ब्र: चला. एक मोठेच काम झाले. काय दृश्य असेल ते! पर्वतचा पर्वत पक्षाच्या पाठीवर बसून आकाशातून जात आहे. जीव मुठीत धरून त्याच्या सोनेरी गुळगुळीत जमिनीवर देव आणि दानव स्वत:ला कसेबसे सावरत रामरक्षा म्हणीत बसले आहेत. पर्वताच्या टोकावर साक्षात नारायण बसला आहे. व्वा! साधे आकाशातून जाणारे विमान पाहायला पण किती मजा वाटते. हे विमान तर केवढे मोठे. आणि सारे पॅसेंजर विमानात न बसता विमानावर बसले आहेत. व्वा! अद्भुत.
ना: ब्रह्मा, हे तर गीत असल्यामुळे थोडक्यात उरकलेले वर्णन आहे. सविस्तर वृत्तांत तर भागवतात आहे. तुला संस्कृत येत नाही पण आता तीही अडचण दूर झाली आहे. मराठीत समश्लोकी भागवत आले आहे. मूळ प्रत्येक श्लोकाचा त्याच वृत्तात तेवढ्याच ओळीत मराठी अनुवाद. वाच कधी या लिंकवर.
http://satsangdhara.net/bhp/
कधीपासून तुला देईन देईन म्हणतो. पण तूच भागवत म्हटले की चारही नाके मुरडायचा.
अतल अशा त्या क्षीरसागरी
गरुड उतरला लाटांवरती
पाठीवरच्या गिरीसी अलगद
ठेविले त्याने हो खालती
पर्वत काही नाही नवनित
तरंगेल तो कसा काष्ठवत
बुडूनी जाईल सुवर्ण पर्वत
सुरासुर सर्वांना ही भीती
सुहास्य वदने शेषशायी तो
कूर्मरूप घे क्षीरसमुद्री
पाठीवरती श्रीनारायण
लीलया मंदारा पेलती
ना: ब्रह्मा, बघ मी म्हटले तसेच झाले. बुडायला लागला की मंदार. म्हणून मग नारायणानी कासवाचे रूप घेतले. रूप काय, चक्क कूर्मावतारच घेतला. अवतार नंबर टू. म्हणजे सत्ययुगातली बरे ही कथा. विशाल कासव समुद्रात एकाच जागी पोहू लागला व त्याच्या ढालीसारख्या टणक पाठीवर मंदार पर्वत उभा. बाकी या मंदाराची खूपच शान हं. हा विष्णूच्या गरुडावर बसून आला आणि आता विष्णूच्याच दुसऱ्या अवताराच्या पाठीवर उभा झाला. खालीही नारायण, मुकुटही नारायण. नशीब असते एकेकाचे.
आता वासुकी घेऊिन देवे
वेढे दिधले अचलरवीसी
क्रोध येत त्या हे पाहोनी
भक्तवत्सल विष्णू शमविती
ब्रह्मा शिव गणपती देवेतर
मुखे वासुकीच्या गोंजारती
हस्तस्पर्श होता देवांचा
झडकरी त्यास मिळे शांती
पुच्छभाग दोराचा धरण्या
वृथाभिमानी असुरापत्ती
मुखभागा वासुकीच्या धरण्या
अहंकारी अडुनी बसती
देव दुराग्रही, ते न मानती
नारायण मध्यस्थी करिती
पुच्छ देव अन मुख नागाचे
वक्रमन असुरांच्या हाती
ना: ब्रह्मा, सापामुंगसाची एकी ती काय? थोडा जरी धक्का लागला तरी फुटणारे मातीचे ठिसूळ ढेकूळ. वासुकीच्या तोंडाचा भाग कोणी धरायचा आणि शेपटीकडचा कोणी यावरच जुंपली. दानव म्हणाले की शास्त्रांप्रमाणे सर्पाची शेपटी अशुभ असते. ती आम्ही कां धरावी? देवही काही कमी नाही. दोघांनाही तोंडाकडचाच भाग हवा. तसे नारायणाचेच चुकले म्हणा. त्याने दोर म्हणून वासुकी निवडावाच का? त्याऐवजी एखादा दुतोंडी साप वापरावा दोर म्हणून. मंथनाशी काम. दोर कसाही का असेना! असो. शेवटी त्यालाच तो तंटा सोडवावा लागला. देवांना दानवाची गरज होती. नारायणाने दानवांचा दुराग्रह मानला व त्यांना तोंडाकडचे दोराचे टोक धरू दिले. पण या साऱ्यात वासुकीचे काय मत आहे, त्याची काय आवडनिवड आहे हे विचारावे असे कोणासही वाटले नाही. असो.
वासुकीस ये क्रोध भयंकर
तो सोडी विषमय फूत्कार
विषबाधेने दानव सारे
अवचिते मूर्च्छितची पडती
बाधा येता समुद्रमंथनी
शिखरी मंदाराच्या बसुनी
दैत्यांना पुन्हा शुद्धीवर
कृपाळू नारायण आणिती
वासुकीस गरुडाची भीती
नारायण हे मनी समजती
विष्णुलोकि गरुडा तू जावे
सविनये ऐसे त्या म्हणती
समुद्रमंथन आरंभाचा
क्षण हा नारायण इच्छेचा
टिपण्या त्यांचे परम भक्त जे
देवऋषि नारद ते प्रकटती
ब्र: हे बरे झाले. घ्या म्हणावे. धरा नागाचे तोंड. घ्या त्याचा प्रसाद. त्यांनीच ते मागून घेतले. आता कोणाच्या नावानी बोंबलता?
ना: अरे! हे काय? ही फक्त गोष्ट आहे. तू तर त्यात फारच समरस झाला आहेस. आता वासुकी समजून हा दोर नको ओढूस तावातावात. काकूंची धुणं वाळत घालायची दोरी आहे ती. आणि आपण सत्ययुगात नाही, कलियुगात आहोत. ब्रह्मा, तूही म्हणजे ... आपलं म्हणजे ... हा म्हणजे ... खूपच बा!
दैत्य सारे मूर्छित होताच मोठेच संकट ओढवले. त्यांच्या शक्तीविना होणारे हे कामच नव्हते. विष्णूने मग आपल्या लीलेने त्या सर्वांना पुन्हा शुद्धीवर आणले. आधीही विष्णू दैत्यांच्या बाजूने कल देता झाला. आता पुन्हा त्यांना त्याने शुद्धीवर आणले. देवांना नाही आवडली ही पार्शालिटी पण करतात काय? दानव मात्र हळूहळू नारायण इम्पार्शल आहे अशा मताकडे वळू लागले. त्याला आता ते न्यूट्रल अंपायर मानू लागले. तसा नारायणही जबरदस्त आहे हं. बरोब्बर त्यानी आपलं फील्डिंग जमवलं.
इकडे गरुडाचं आणि सापाचं खानदानी वैर. केव्हा एकदा त्या आधीच संकटात असलेल्या वासुकीला चोच मारून त्रास देऊ असे गरुडाला झाले. नारायणाच्या नजरेतून तेही नाही सुटले. त्याने लगेच गरुडाला वैकुंठात जाऊन तेथली सारी व्यवस्था स्वत:च्या अनुपस्थितीत पाहायला सांगितले. गरुडही खूश, वासुकीही खूश! नारायण म्हणजे अगदी मुरलेला डायरेक्टरच रे ब्रह्मा! फर्स्ट क्लास! शेवटी त्याला हवे होते ते मंथन सुरू झालेच. ईश्वरेच्छा बलीयसी!
देव ओढती, दैत्य सोडती
दैत्य ओढती, देव सोडती
दोर वासुकी, मंदार रवी
शुभ्र क्षीराब्धीला घुसळती
शुभ्र क्षीर ते, शुभ्र फेस तो
शुभ्र रवीचे किरण त्यावरी
मंदाराच्या सुवर्णावरी
किरण तै सूर्याचे झळकती
मंथन आणी शंख शिंपले
जलचर अगणित वरती आले
समुद्रफेसा उधाण आले
मंथने परी न रत्नप्राप्ती
काळ सरतसे असा कितीतरी
सहस्र वर्षे जात भूवरी
देव दानवांच्या कष्टाला
अजुनिही नाही यशप्राप्ती
गिरिशिखरावर उत्सुक विष्णु
लक्ष ठेवुनी समुद्रावरी
त्यांस अपेक्षा ज्या रत्नाची
काय ते तेच मनी जाणती
ब्र: हे रे काय नारदा? सारे ओम् फस्स होणार की काय? नुसते शंख, शिंपले, मासे, बेडकं, खेकडे, मगरी, सुसरी, पाणघोडेच आले की काय? आणि नारायणाला अमृत सोडून दुसऱ्या कुठल्यातरी रत्नाची अपेक्षा अाहे असे सुचविले आहे. त्याचा काय अर्थ?
ना: ब्रह्मा, सबूर! अरे अमृत काय असं चुटकीसरशी येणार होय? इतके सोपे असते तर साक्षात नारायणाने कशाला त्यात जातीने लक्ष दिले असते? समुद्रमंथन दहा हजार वर्षंे चाललं असं मी कुठेतरी वाचलं. आत्तातर कुठे सुरू झालं आहे. बाकी नारायणाला काही दुसरीच अपेक्षा आहे किंवा समुद्रमंथनाचा सल्ला त्याने दुसऱ्याच काही कारणाने दिला असावा असा गीतात संकेत आहे खरा. काहीतरी रहस्य नक्कीच आहे. पाहू काय होते ते पुढे. नारायण नारायण!
कालकूट होई दृग्गोचर
हालाहल हे ये फेसावर
वासानेही त्रिलोक काळे
अशी ज्या वीषाची महती
सजीव पृथ्वी करपू लागे
वीष सृष्टिला ग्रासू पाहे
शरण जात सुर सारे ज्याला
हर हर महादेव म्हणती
शिव घेती विषकुंभा हाती
लावुनी ओठी प्राशन करिती
त्रिलोकसंकट उदरी घेऊन
सांबशिव नीलकंठ होती
देव दैत्य हे साक्षी होती
क्षणभर मंथनही थांबवती
ब्रह्मा विष्णु महेशा नमिती
सती जी गदगद हो पार्वती
ब्र: अरे बापरे! हे तर विपरीतच झाले. अमृतासाठी मंथन केले आणि मिळाले काय तर विष. तेही कालकूट नावाचे जहाल हलाहल. ऐकले होते मी. पण मग ते शिव कां प्यायला? चहा वाटला की काय त्याला?
ना: तसे नाही ब्रह्मा. हा सारा उपद्व्याप कशासाठी? तर देवांच्या, मानवांच्या आणि ओघाने साऱ्या सृष्टीच्या भल्यासाठी. हलाहल दानवांचे काही वाईट करू शकणार नव्हते. कारण ते मेले तरी शुक्राचार्यांची संजीवनी विद्या त्यांना पुन्हा जिवंत करू शकली असती. नुकसान देवांचे आणि पिढ्यानपिढ्या येणाऱ्या काकाकाकूंचे होते. म्हणून सारे देव थोड्याश्या भोळ्या सांबाकडे गेले. सांब खरेच फार साधा रे! त्याने जगाच्या हितार्थ ते विष स्वत:च पिऊन टाकायचे ठरवले. पण त्याने आधी पार्वतीला विचारले बरें. तीही कशी बघ. केवळ स्वत:पुरता विचार न करता तिनेही जड अंत:करणाने पतीला विषप्राशनाची परवानगी दिली. नंतरच सर्वांसमक्ष महादेवाने विषप्राशन केले आणि सृष्टीवर आलेले संकट टळले. विषाने जळून त्याचा कंठ निळा झाला. त्याला इतका दाह झाला की आजतागायत त्याला गळ्याभोवती थंड रक्ताचा सर्प, शरीरभर शीतकारी भस्म, कपाळी गार चंद्रकोर, व डोक्यावर शीतल गंगा घ्यावी लागते.
अरे रडतोस काय?
ब्र: कसे पाणी येणार नाही रे डोळ्यात? आता मला कळले सिरियल पाहतांना काकू बरेचदा रडतात कां ते. त्यांनाही माहीत असते की हे कथानक आहे. हे कलाकार आहेत. हे सारे नाटक आहे. पण पाहणारा त्या पात्राशी एकरूप होतो. त्या भूमिकेशी समरस होतो. शिवपार्वतीचे असे रेखाटन कोणाला हालवून सोडणार नाही? हा आस्तिक नास्तिक प्रश्न नाही. हा म्हणजे ... आपला म्हणजे ... याचा म्हणजे ... ह्याचा प्रश्न आहे.
ना: ब्रह्मा, हाच मानवमनातला देव आहे. आणि यात काही वाईट नाही रे. चांगल्याचे अनुमोदन म्हणजे देव. तो असो की नसो. पण त्या कल्पनेला, त्या पात्राला, त्या भूमिकेला मनाने दिलेला दुजोरा हे सत्कर्माला प्रवृत्त करणारे, कुकर्मापासून परावृत्त करणारे बंधन होते बरेच जणांकरिता. म्हणून तर ब्रह्मा आजही राम, कृष्ण यांचा जनमानसावर अतूट पगडा आहे. त्या भावनेच्या दुरुपयोगाने त्याला विरोध होतो हे मात्र खरे. असो. हे आस्तिक-नास्तिक विचारमंथन समुद्रमंथनाहून कठिण आहे रे बाबा. त्यातूनही बरेचदा आधी हलाहलच निघते. पण पुढे कधीतरी अमृत निघेलही.
समुद्रमंथन पुन्हा होतसे
रत्न पहा त्यातुनी येतसे
सुरभी धेनू समृद्धीसह
उसळुनी ये लाटेवरती
एकमताने सुर असुरांनी
ऋषी मुनींना तिला देउनी
समुद्रमंथन सुरू ठेवले
अष्टप्रहरी नच विश्रांती
कर्णी ये कर्कश ध्वनी हा
पुढती येई शुभ्र अश्व हा
सप्तमुखी उच्चैश्रव नामे
अश्वराजा हा ये वरती
अश्वराज हा अद्भुत दैवी
इंद्रा इच्छा 'माझा होई'
देवराज मी, अश्वराज हा
खचित ही नियतीनियत युती
बळिराजाची तैसिच इच्छा
दैत्यराज तो सोडी न पुच्छा
'हा माझा, हा माझा! म्हणुनी
राजद्वय इंद्र बळी लढती
रत्न एक, दावा दोघांचा
समय सुरासुर संग्रामाचा
देव दैत्य युति ढासळण्याचा
संकटी विष्णु येई पुढती
ब्र: चला, काहीतर उपयोगी निघाले. सुरभी नावाची कामधेनू निघाली व एकमताने देवांनी व दैत्यांनी तिला ऋषीमुनींना देऊ केली ही बाब तर विलक्षण आहे. दोन परस्पर विरोधी वृत्तींचे मिलन. अहो आश्चर्यम्. पण लगेच त्या घोड्यावरून भांडण झाले. बरे वाटले. नारदा, मलाही अशा सप्तमुखी घोड्यावर बसायचे होते माथेरानला. पण तू म्हणाला होतास की कलियुगात तसे घोडे नसतात म्हणून. इंद्र हाही राजा व बळि हाही राजाच. एक देवांचा, एक दैत्यांचा. अश्वांचा राजा उच्चैश्रव त्यांना मिळावा ही त्यांची अभिलाशाही काही अगदीच अनाठायी नाही. कसा सोडवला नारायणानी हा पेच? पुन्हा दैत्यांच्या बाजूनेच झुकले की काय त्याचे माप?
नारायण इंद्रासी सांगे
ध्येय आपुले पडेल मागे
दे अश्वाला बळिराजासी
मानुनी मंथनास दे गती
दैत्य जिंकले, मनी हुरळले
नव जोमाने पुन्हा जुंपले
नारायण ओठातचि हसले
अष्टभुज भविष्य ते जाणती
हजार वर्षे अशीच गेली
अनेक प्राणी वरती आले
आज अचानक सागर फोडुनी
निघतसे अद्वितीय हत्ती
ऐरावत ये सर्वांपुढती
गजराजा नच शत्रु न भीती
चार सुळे, अन् शुभ्रकांतीचा
अन्य ना, एकमेव जगती
ऐरावत प्राप्ती इंद्राला
राजाला गजराज मिळाला
अश्व बळीला, गज इंद्राला
न्याय्य हे, मंथनास ये गती
ना: तुझा अंदाज खरा ठरला ब्रह्मा. सप्तमुखी घोडा बळीराजालाच मिळाला. ध्येय अमृत असतांना केवळ एका घोड्यासाठी देवदानव युती तुटू नये असे नारायणाला वाटणे साहाजिक आहे. काहीही का असेना, इंद्राला पण ऐरावत मिळाला. ब्रह्मा, तुलाही आता वाटले असेल ना की तुझ्याकरिता पण काहीतरी मंथनात निघेल असे. खरे सांग.
ब्र: वाटले असेल रे. मोह कुणाला सुटला आहे?
रत्नमणी रत्नाकर आणी
असा कधी पाहिला न कोणी
कमलरूप, तेजाने लखलख
उज्ज्वला कौस्तुभ ये वरती
समस्त विश्वाचा जो स्वामी
त्या विष्णूसही इच्छा हो मनी
कौस्तुभमणी हा त्यांचा व्हावा
स्वये ते देवांना सुचविती
तेव्हापासुन अलंकार हा
रुळतो नारायण देहावर
कोण कुणाला शोभा देई
खात्रिने कोण वदू शकती
स्वर्गवृक्ष प्राजक्त क्षीरावर
येता पसरे सुगंध भूवर
पारिजातका इच्छा सांगा
कामना क्षणात हो पूर्ती
ब्र: कौस्तुभ मणी विष्णूला आवडला हे त्या मण्याचे अहोभाग्य. नारदा मला अगदीच काही मिळाले नाही असे नाही. पारिजातकाचा सुवास खरे म्हणजे सर्वांनाच मिळाला. मला बाकीच्यांपेक्षा चौपट मिळाला यातच मला खुशी.
ना: तुला कां चौपट मिळाला? वास तर सगळीकडे सारखाच दरवळला असेल.
ब्र: हा हा हा. आज मी तुला हारवले. अरे मला बाकीच्यांपेक्षा चौपट मिळाला कारण मला चार नाके आहेत. बाकीच्यांना एकच. कसें?
ना: नारायण नारायण!
सहस्रवर्षे काळ सरकला
मंथनात कधी खंड न पडला
एके दिनी अप्सरापुंज ये
पाहुनी समुद्रास भरती
सुरासुरांच्या नजरा खिळल्या
नेत्रांना जणु जिव्हा फुटल्या
मोहक सौंदर्याला लेऊन
कामिनी चहूकडे विचरती
समुद्रास ये पुन्हा भरती
लाटा अनुपम तेज उधळती
नारायण शिखरावर बसुनी
पाहता प्रसन्न कां होती?
ना: ब्रह्मा, पारिजातकानंतर जे काही निघाले त्यात मात्र तुला काही रस नसावा. तसा मलाही नाही. अप्सरांनी मात्र साऱ्यांनाच मोहात पाडले बरे. क्षणभर मंथन पण मंदावले असावे. पण नारायणाला आता कशाची बरे चाहूल लागली? आता जे कोणी येणार त्यासाठी तर त्याने हा समुद्रमंथनाचा घाट घातला नव्हता? हेच तर मंथनामागचे रहस्य नव्हते?
सागरउदरातून प्रकटली
चराचरांची मायमाउली
दिव्य तेज लक्ष्मीचे बघुनी
जाहली धन्य वीज धरती
अलंकार अंगावर लेउनि
त्यांचीच शोभा द्विगुणित करुनी
हाती वरमालेला धरुनी
चहुकडे कुणा शोधते ती?
नजर भिरभिरे इकडे तिकडे
काय कुणी तिज त्यात आवडे?
असुरांच्या मनी फुटती फुलझडे
चहुकडे कुणा शोधते ती?
मंदाराला वासुकी वेढा
मुखाकडे दैत्यांचा बेडा
शेपटी धरुनी देव जाणती
चहुकडे कुणा शोधते ती?
ऋषि मुनि ब्राह्मण दर्शक असती
असंख्य जलचर पोहत असती
वरमालेला योग्य ह्रद्पती
चहुकडे कुणा शोधते ती?
गरगर दृष्टी फिरे चहुकडे
त्यात कोणीही तिला नावडे
देवाचा धावा करण्यासी
जगज्जननी बघते वरती
उच्चासनी दिसला नारायण
सुवर्ण मंदाराचे भूषण
लाट येउनी रमे उचलता
रम्यमुख हसले लक्ष्मीपती
ताटातूट किती दिवसांची
विरह संपला, शांती मनाची
समुद्रमंथन अमृत कारण
होतसे, की ही फलश्रुती?
मीलन नारायण लक्ष्मीचे
देवां उधाण आनंदाचे
तिरस्कार हा ऐसा होता
अधोमुख दैत्य मनी झुरती
ना: ब्रह्मा, आता मला आठवले. एका पौराणिक कथेप्रमाणे, लक्ष्मी एकदा रुसली व नारायणाला सोडून निघून गेली. सर्वत्र शोधले तरी ती कुठे दिसेना. ती क्षीरसागराच्या तळाशी लपून बसली असावी असा नारायणाचा कयास होता. पण विशाल आणि अतल समुद्रात कुठे आणि कसे शोधणार? लक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी समुद्रमंथनाचे प्रयोजन होते असेही ज्ञानी लोकांचे मत आहे. पण हे फक्त विष्णूलाच माहीत होते असे दिसते. काही का असेना. त्यानिमित्ताने लक्ष्मीनारायणाचे पुनर्मिलन झाले हे किती छान? दैत्यांना मात्र हीच ती लक्ष्मी हे माहीत नव्हते. कोणी सुंदरा स्वयंवरासाठी आली आहे असे त्यांना वाटत होते. प्रत्येकाला आपणच योग्य वर आहो असेही वाटत होते. पण निराशा पदरात पडली. ते खरे म्हणजे स्वयंवर नव्हतेच. लक्ष्मीला फक्त नारायण दिसत नव्हता कारण तो उंच मंदारशिखरावर विराजमान होता. तो दिसल्याबरोबर रमामाधवाचे पुनर्मिलन झाले.
ब्रह्मा, या साऱ्या पुराणांमधे एक खूबी आहे. यात अनेक गुंतागुंतीच्या कथा आहेत. एका कथेत अनेक कथा आहेत. कथांचे सुंदर जाळे विणण्यात पुराणकारांना खरेच कौशल्य प्राप्त होते. आजकाल तसे नसते रे. लघुकडेच जोर असतो. कथा, लघुकथा, लघुलघुकथा. कविता, लघुकविता, चारोळी, दोनोळी, एकोळी, अळी अशी घसरण सुरू आहे. तसे पुराणात नाही. जे घुसवता येईल ते घुसवा असा प्रयत्न असतो. आता समुद्रमंथनाचीच गोष्ट घे. त्यातल्या शंकराच्या विषप्राशनाचे कथानक सांगून कथाकाराचे समाधान झाले नाही. विषाचे जे काही थेंब जमिनीवर पडले तेही लगेच विंचू, साप व काही वृक्षवल्लींनी चाटून टाकले व म्हणून ते विषारी झाले असाही उल्लेख आहे. म्हणजे जणू त्याआधी विंचू विषारी नव्हतेच. विंचू चावला की जणू लोक 'मला किनी विंचू चावला. कित्ती छाण! चावट मेला!' म्हणत असावे. समुद्रमंथनानंतर मात्र ते एकदम विषारी झाले. नंतर मग एकनाथी भारूड झाले असावे.
अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
अग बया, बया ..... विंचू चावला
अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले जकाय एकाएकी?
ब्र: नारदा, आता तुझं भारूड आवरतं घे. आपल्याला अमृत हवे आहे.
सागरावरी पुन्हा लाटा
कोण येतसे दानव पाहता
त्यांच्या सेवेसाठी आता
मंथनी वारुणी ये हाती
मदिरादेवीरूप वारुणी
दैत्यांसाठी आली मंथुनी
लक्ष्मीऐवजी वारुणी मिळता
क्षुब्ध दैत्यांना हो शांती
ब्र: व्वा! लक्ष्मीने न वरल्यामुळे खट्टू झालेल्या दैत्यांना प्रसाद मिळालाच. खुद्द मदिरादेवीच प्रकट झाल्या. विष्णूनेही तिला दैत्यांना सुपूर्द केले. मदिराप्राशनानंतर दैत्य अधिकच जोमाने मंथन करू लागले. पण थोडे टल्लीच झाले असावे बहुधा. जरा hyper झाले असतील. हाही नारायणाचा काहीतरी डाव तर नसावा? मुद्दामच त्याने दानवांना मदिराप्राशन तर करवले नसावे?
हाती घेऊनी कुंभ कशाचा?
पुढे येत धन्वंतरी साचा
वैद्यराज हा मर्त्यजीवांचा
दिव्यप्रभ ये आता पुढती
नारायण सावधान होती
देव कुतुहले समोर बघती
'नारायण नारायण' देवां
नारदी बोल कानी येती
देव उमजती कुंभ अमृती
धन्वंतरी आणिला स्वहाती
समुद्रमंथन ज्यासाठी ती
प्राप्त हो अमरत्वाची घुटी
देव पुढे सरसावुनी आता
कुंभामागे जात पाहता
असुर ताडुनी सत्य, कुंभ तो
चपळतेने हाती घेती
अमृत आता दैत्यांहाती
ब्रह्म इंद्र शिव हताश होती
प्राशन करिता दैत्य, देव ना
अंतत: अमरपदा जाती
ऐसे होता विनाश होईल
देववंशही लयास जाईल
मद्यपि मर्कट हाती कोलित
दैत्य हे सृष्टिदहन करिती
ना: ब्रह्मा, शेवटी हाती अमृतकुंभ घेऊन वैद्यराज धन्वंतरी प्रकटले. कुंभावर काही 'अमृत' अशी नावाची पट्टी नव्हती. धन्वंतरी स्वत:ही काही 'अमृत घ्याऽऽ अमृऽऽत' असे ओरडत ओरडत आले नाही. काहीही गाजावाजा न करता वैद्य आणि तो अमृतकुंभ ही दोन रत्ने एकदम बाहेर आली. तोपर्यंत एका वेळेस एक असाच रत्नांचा येण्याचा क्रम होता. त्यामुळे दैत्यांना वाटले असेल की एखादा वैदिक पंडित आला असेल गंगाजल किंवा गोमुत्र घेऊन देवांसाठी. त्यांना त्यात काही रसही वाटला नसता व तो कुंभ त्यांनी सहज देवांना घेऊ दिला असता.
पण हाती कुंभ घेऊन तो युवक समुद्रातून आला आणि 'नारायण नारायण' असा आवाजही आला. दैत्यांना नारदाची नेहमीच धास्ती. हा आगलाव्या नेहमी असे काही देवांच्या कानात कुजबुजतो की देवांची सरशी होते. आताही तसेच झाले. 'नारायण नारायण' म्हणत नारद आले आणि साऱ्या देवांमध्ये अनोखा उत्साह भरलेला जाणवला. सारे देव कुंभाकडे उत्सुकतेने पाहू लागले. जणू नारदाने त्यांना सांगितले असावे की कुंभातच अमृत आहे. दैत्यांना संशय आला आणि त्यांनी चपळतेने तो कुंभ देवांआधीच त्या तेज:पुंज पीतांबरधारी युवकाकडून हस्तगत केला.
कुंभात खरेच अमृत होते आणि आता तो दैत्यांच्या हाती होता. ब्रह्मा, वृत्तीने चांगला माणूस, कां कोण जाणे, नेहमीच थोडा बुद्दू बावळट पण असतो. देवांची पण तीच गत. ज्या अमृतासाठी एवढा सारा घाट नारायणाने घातला ते मंथनात प्राप्त तर झाले, पण दैत्यांच्या कब्जात गेले. माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखेच ते झाले. देव नेहमीप्रमाणे घाबरले आणि नारायणाला शरण गेले.
ब्र: नारदा, घाम फुटला रे. आता पुढे काय होईल?
ना: नारायण नारायण!
'शांत शांत' म्हणती नारायण
पहा कसे भांडती राक्षसगण
देव असूनी, जगतासाठी
निश्चये वापरू कपटनिती
क्षणात आता ये सामोरी
मोहक मोहिनी, काय खुमारी!
राक्षस आता अमृत सोडुनी
मोहुनी तिजमागे धावती
मोहिनी ब्रह्मास्त्राहुनी मारक
दैत्यबुद्धीची ती संहारक
वश करुनी साऱ्या असुरांना
सुंदरा कुंभ घेई हाती
ना: ब्रह्मा, सेना आणि सेनापती यात हाच फरक असतो. सेनापतीला घाबरून चालत नाही. नारायण आणि इतर देव यात हाच तर फरक आहे. तसा म्हणायला इंद्र राजा, पण तो बरेचदा घाबरतो. त्याचे सिंहासन तर केव्हाही डळमळतच असते. तुझे तर काही सांगायलाच नको. खुट्ट झाले की तुला घाम सुटतो. कसा काय सृष्टिनिर्माणाचा एवढा मोठा इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट तू एकट्याने हँडल केला याचे मला आश्चर्यच वाटते. तरुणपणी तू खूप आत्मविश्वासी असावा म्हणा. पण वयोमानाप्रमाणे आता जरा ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... हा झाला आहेस.
नारायणाला माहीत होते की दानव तसेही भांडकुदळ. त्यातही वारुणीने आधीच आपले काम केलेले असल्यामुळे जरा त्यांचा तोल गेलेलाच होता. पाय डगमगतच होते. अमृतकुंभ एका कोणाच्या हातात आल्याबरोबर त्याच्यासाठी ते आपसात भांडायला लागले. असे होईल असे नारायणाला पूर्वानुभवावरून माहीत असावे. आपसात पडलेल्या दुहीमुळे त्याला संधी मिळाली. त्याने कपटनीती वापरायचा विचार केला. तसे म्हणावे तर दानवांना मंथनाला राजी करण्यातही कपट होतेच. पण सत्यासाठी कपट काय, बापट सुद्धा चालतील असे त्याला वाटायचे.
ब्र: नारदा, बापट म्हणजे ते किराणावाले बापट बंधू का रे? काका काकू आणतात कधीकधी तिथून किराणा.
ना: अरे जोक होता ब्रह्मा तो. इतका गंभीरपणे घेऊ नये. तर मी काय म्हणत होतो की नारायणाने कपटाचा वापर केला आणि मोहिनीचे रूप घेऊन दैत्यांच्या गर्दीत शिरला. आधीच मुळात राक्षसी प्रवृत्ती, मदिरेचा अंमल, त्यात अमृतप्राशनाने अमरत्व प्राप्त होणार हा 'आपल्याला तर नक्कीच स्वर्गप्राप्ती होणार' असा जो आस्तिकांमधे अज्ञानजन्य दर्प असतो तसाच काहीसा गर्व, आणि आता समोर मोहिनीचे रूप व मनातले मांडे. काय विचारता!
जो तो ती जाईल तिथे मागोमाग जायला लागला. तीही ठुमकत मुरकत फुलपाखरू जसे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते तशी भ्रमण करायला लागली. दैत्यांच्या नकळत अमृतकुंभ केव्हा तिने हस्तगत केला ते कुणाला कळलेही नाही. सारे कसे झपाटलेले. दैत्य त्या अवस्थेत असतांना तिने गोडीगुलाबीने त्यांचे मन वळवले व दैत्य एका रांगेत व देव दुसऱ्या रांगेत बसवले. अगदी लग्नाची पंगतच बसली देव दानवांची एकमेकाकडे तोंड करून. आधी देवांना आणि नंतर दैत्यांना अमृत द्यायचे असे तिने सुचविले व ते सर्वांनी मानले पण. संमोहन संमोहन काय असते त्याचे ते प्रात्यक्षिकच होते ब्रह्मा.
ब्र: नारदा, विचारू नये पण विचारतो. दानव जर तिच्या रूपावर इतके भाळले, लट्टू झाले, तर देवांवरही रूपास्त्राचा काहीतरी परिणाम झालाच असेल ना रे?
ना: ब्रह्माजी, तुमचं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! ब्रह्मा, तू जसं विचारू नये तरी विचारलस, तसच मीही सांगू नये तरी सांगतोच. अरे रूपावर भाळणार नाही असा जीव नाही. देवही त्याला अपवाद नाहीत. तू तर हे चांगलेच जाणतोस. हो किनई? पण ते सोड. बरेचसे देवही घायल झाले बरे. 'बडी चोट खाई है कम्बख्त ...' वगैरे वगैरे. त्यातला एक तर पार भुईसपाट. त्याची गोष्टही आहे भागवतात. पण ती तू आणि मी वाचावी अशी नाही. की सांगू?
ब्र: नाही नाही. राहू दे, राहू दे. असू दे असू दे. मी वाचीन समश्लोकी भागवतात.
मोहिनी सांगे सुरासुरांना
अमृत वाटीन मी साऱ्यांना
पंगत मांडू या साऱ्यांची
कुणाच्या मनी नसावी भिती
लग्नाची जणु पंगत बसली
ठुमक ठुमक मोहिनी चालली
ओंजळीत देवांच्या आधी
मृत्युहर धार पडे अमृती
संशय येई राहूला मनी
कपट दिसे त्यां देवांच्या मनी
रूप बदलुनी राहू बसला
चोरटा देवांच्या पंगती
ना: क्रमाक्रमाने मोहिनीने देवांना अमृत द्यायला सुरुवात केली. ज्याला मिळेल त्याने ते प्राशन पण केले. तूही आणि मीही. पण इकडे दैत्यांच्या रांगेत बसलेल्या राहूला संशय आला. साऱ्या देवांना वाटून झाले की ही बया अमृतकुंभ घेऊन अदृश्य तर नाही ना होणार? बाकीचे दैत्य जाओ खड्ड्यात, पण आपल्याला तरी अमृत मिळावे म्हणून तो लपत छपत येऊन देवांच्या रांगेत बसला. कोणाच्या लक्षातही आले नाही. फक्त सूर्यचंद्राला ते लक्षात आले. त्यांनीही लगेच नारायणाकडे चुगली केली. मोहिनीला मात्र यातले काही कळले नाही. तिने राहूला पण ओंजळीत अमृत दिले.
रविचंद्राने स्वतः पाहिले
नारायण कानी कुजबुजले
राहू अमृत गिळण्याआधी
विष्णुजी शिरच्छेद करिती
अमृत राहूच्या कंठातच
असता सुटले चक्र सुदर्शन
शीर अमर राहूचे केवळ
दैत्यधड पण चाटे धरती
ब्र: बापरे, सूर्यचंद्राचे उपकारच मानायला हवे साऱ्यांनी. नाहीतर राहू अमर झाला असता.
ना: होय ब्रह्मा, विष्णूने वेळीच त्याचा शिरच्छेद केला म्हणून संकट टळले. पण तसा थोडा उशीर झाला. सुदर्शन चक्राने त्याचे शिर धडावेगळे केले तोवर अमृत तोंडातून त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचले होते. म्हणून राहूचे शिर अमर झालेले होते. धड मात्र मेले व मातीला मिळाले. शुक्राचार्य पण त्याला संजीवनीने रिलीफ देऊ शकले नाही कारण त्याकरिता धडावर शिर हवे.
ब्रह्मा, भागवत इतके सुंदर आहे की त्यातले राहूचे कथानक आपल्याला चंद्र व सूर्यग्रहणाचे सत्य कथारूपात सांगते. अमर झालेल्या राहूच्या शिराला ब्रह्मदेवाने दयेने ग्रहाचा दर्जा देऊन आकाशी पाठविले. राहूला कळले की चंद्राने व सूर्याने विष्णूला सांगितले की तो देवांच्या रांगेत बसला आहे म्हणून. तेव्हापासून त्याचे दोघांशी हाडाचे वैर. योग्य वेळ साधून तो चंद्राला गिळतो. पण त्याला फक्त िशरच असल्यामुळे त्याने जरी गिळले तरी चंद्र खालून उघड्या असलेल्या गळ्यातून बाहेर येतो. हे तेंव्हापासून आजतागायत सुरू आहे. राहूने त्याला गिळायला सुरुवात केली की आपल्याला चंद्राचा काही भाग दिसेनासा होतो. पण चंद्र खालून बाहेर यायला लागला की तो पुन्हा दिसतो. ब्रह्मा, हेच चंद्रग्रहणाचे कारण आहे. आपल्याला काळ्या रात्री चंद्र गिळणारा राहू दिसत नाही कारण तो दैत्य असल्यामुळे काळा आहे. चंद्र मात्र तोंडातून घशात जातांना व दुसऱ्या बाजूने परत निघतांना दिसतो कारण तो प्रकाशमान आहे. असेच त्याने सूर्याला गिळायचा प्रयत्न केला की सूर्यग्रहण होते.
आहे की नाही भागवताची कमाल?
ब्र: होय रे नारदा. अगदी धृवतारा व त्याच्याभोवती फिरणाऱ्या सप्तर्षींचे सत्य जसे भागवतात समजावून सांगितले आहे तसेच. छान. I am thoroughly impressed.
नारदा, आता पुढचे मी गातो. प्रयत्न तरी करतो. तू धृवपद म्हणत नाही प्रत्येक पदानंतर. ते म्हणायला हवे. नाहीतर मजा किरकिरी होते. तू कवितावाचन करतोस. गीतगायन करायला हवे. बघ मी कसे करतो ते.
पाहुनी आता दैत्य समजले
अमृतास ते कैसे चुकले
क्षणात दैत्य नी देव जुंपले
शेवटी तुटली आता युती
नारद ब्रह्मायण गाती
स्वये श्री ब्रह्माजी ऐकती
नारद ब्रह्मायण गाती
समुद्रमंथन पहा संपले
देव सकल अजरामर झाले
पण आता त्या क्षीरसागरी
जाहली तुंबळ युद्धस्थिती
नारद ब्रह्मायण गाती
स्वये श्री ब्रह्माजी ऐकती
नारद ब्रह्मायण गाती
इंद्र बळीचे युद्ध भयंकर
हजार वर्षे चाले संगर
वज्रास्त्राचा वापर करता
भूमीवर पडला दैत्यपती
नारद ब्रह्मायण गाती
स्वये श्री ब्रह्माजी ऐकती
नारद ब्रह्मायण गाती
आता ये नमुची युद्धावर
दानवास या सांबाचा वर
अस्त्र शुष्क वा ओले असता
वराने त्यास न मृत्युभीती
नारद ब्रह्मायण गाती
स्वये श्री ब्रह्माजी ऐकती
नारद ब्रह्मायण गाती
असे काय नाही ओले जे
तरीही नाही शुष्क परी ते
ब्रह्म इंद्र शिव विचार करुनी
शेवटी थकुनी ओशाळती
नारद ब्रह्मायण गाती
स्वये श्री ब्रह्माजी ऐकती
नारद ब्रह्मायण गाती
ना: ब्रह्मा, बरा गायलास. अगदी ब्रह्माजी फडके नाही तरी ब्रह्माजी रडके सुद्धा नव्हता बरे. असो. राहूचा शिरच्छेद झाला आणि अमृताची वाट पाहणाऱ्या दैत्यांना खरे काय ते कळले. देवांच्या मनी लबाडी आहे हे गुपित उघडे झाले. अर्थातच दैत्य चिडले. अमृतमंथन संपले पण देव दानवात तुंबळ युद्ध सुरू झाले. युद्ध कसले, महायुद्धच ते.
अमृतकुंभ दैत्यांच्या हाती पडण्याआधीच मोहिनीने आपले खरे रूप प्रकट केले व गरुडावर बसून विष्णु वैकुंठाकडे रवाना झाले. उरलेल्या अमृतासकट कुंभ कोणाच्या हाती गेला, वैकुंठावर नेता नेता त्याने जंबुद्वीपावर कोठे कोठे ठेवला, जातांना कोठे कोठे अमृताचे थेंब पडले त्याची सविस्तर कथा पुराणात आहे. ती नंतर कधी. पण जेथे जेथे कुंभ जमीनीला टेकला तेथे तेथे आजही भाविक सात्विक आस्तिक लोक यात्रा भरवतात व नदीत स्नान करतात. जाऊ कधीतरी कुंभमेळ्यात ब्रह्मा. नाहीतरी आपल्याला येथे येऊन वर्ष उलटले. एकदा ते सूर्यावर, बुधावर, शुक्रावर जाऊन आलो तेवढे सोडले तर आपण खरेच कोठे गेलो नाही. आता कधीतरी यात्रेला निघायला हवे. तीर्थयात्रेला पण, ज्ञानयात्रेला पण. बोट धरून नेईन. घाबरू नको.
ब्रह्मा, पंगतीत सारेच दैत्य होते. महत्त्वाची नावेच घ्यायची झाली तर बळि, शुंभ, निशुंभ, शंबर, अयोमुख, बाण, विप्रचित्ती, तुझ्या नाकातून जाऊन वेद चोरणारा तो हयग्रीव वगैरे वगैरे. पूर्ण यादी भागवतात आहे वाचशील तर. अमर झालेल्या एकेका देवाने दैत्यांचा खरपूस समाचार घेतला व वध केला. पण मुख्य लढाई देवराज इंद्र आणि दैत्यराज बळि यांचीच. तसे भीषण युद्ध झाले नाही आणि होणारही नाही. पण शेवटी इंद्राने वज्राने बळीचा घात केला. नंतर त्याचे पुत्र व उरलेले दैत्य सेनापती लढले. दानव शूर होते, देवांपेक्षाही, हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. आता शेवटी नमुचीचे इंद्राशी युद्ध झाले. इंद्राने आपले प्रसिद्ध वज्र त्यावर फेकले. पण नमुचीने फार पूर्वीच शंकराकडून असा वर घेतला होता की त्याला कुठल्याही ओल्या वा कोरड्या अस्त्राने मृत्यु येणार नाही. मग तो मरणार कसा? वज्र व्यर्थ गेले. इंद्र तर जेरीस आला बिचारा.
शेवटी नारदाने त्याला हे गुपित सांगितले व दुधाचा फेस हा न कोरडा न ओला असे खुणेने सुचविले. इंद्राला समजण्याआधी ऐरावताला समजले व त्याने आपल्या सोंडेत होईल तितका फेस भरून घेतला. इंद्राने पण खोट्या स्तुतीने नमुचीला क्षणभर गाफील केले व ऐरावताच्या फेसास्त्राने त्याचा वध झाला. झाले, दैत्य पडल्याबरोबर एकच पळापळ माजली व समस्त दैत्यसेना पराभूत झाली.
मुनिवर सांगती त्यांच्या कानी
फेस दुधाचा हाती घेऊनी
'नारायण नारायण' म्हणुनी
ब्रह्मसुत गालातचि हसती
इंद्र समजला, कोडे सुटले
ऐरावत माहूत समजले
सोंडेमध्ये फेस भरूनी
वज्रहीन इंद्र बसे वरती
येई गज नमुचीच्या सन्निध
इंद्र म्हणे तू धन्यचि असशी
विजय तुझा होणार आज ही
मला नी देवांना निश्चिती
नमुची देई पीळ मिशीला
गर्वाने तो गाफील झाला
ऐरावत सोंडेतून सोडे
गर्जुनी फेस तयावरती
नमुची दैत्य रणांगणी पडता
दानवसेना हतबल होता
सारे असुर पराजित होउनि
अन्तत: देव विजयि होती
ब्र: All is well that ends well. दानवमुक्त त्रिलोक ही कल्पनाच किती छान वाटते.
पूर्ण विजय ऐसा ना पूर्वी
देव दानवांच्या इतिहासी
दानवरहित त्रिलोकासी ना
प्राप्त हो ब्रह्माची अनुमती
नारद ये, देवांसी सांगे
क्षमा करावी आपण त्यांना
कश्यपकूळ दिती दनु माता
देवतांची ही युद्धनीती
ब्र: नारदा, देवांचा हा उदारपणाच तर त्यांचा घात करतो रे. कशाला दैत्यांना पुन्हा पुन्हा माफ करायचे म्हणतो मी. ही देवांची क्षमाशील वृत्तीही अमर झाली की काय त्या अमृताने? मला नाही हे आवडले बरे नारदा.
ना: ब्रह्मा, कोणालाही असे वाटेल. पण त्या वेळचा तुझा विचार अलगच असावा. सारे दानव फक्त मेले होते. पण शुक्राचार्य होतेच की. त्यांनी पुन्हा संजीवनी विद्येचा वापर केलाच असता व दैत्य पुनरुज्जीवित झालेच असते. त्याऐवजी देवांनीच त्यांना माफ करून जीवनदान दिले तर त्याने झालाच तर देवांचा फायदाच झाला असता. काही नाही तर देवांना good will तरी मिळेल. थोडा तरी soft corner राहील त्यांच्या मनात देवांप्रती. पुढे कधी त्यांची गरज पडली तर पुन्हा त्यांच्याशी बोलता तरी येईल. शिवाय देवांनी आपल्या वर्तणुकीने मानवी मनावर योग्य ते विचार बिंबवावे असेही त्याला वाटले असावे. क्षमाशीलता हा फार मोठा गुण आहे बरें. ब्रह्मा, विचार करशील तर तुलाही त्यावेळचा तुझा विचार पटेल. तुझ्या सांगण्यावरूनच मी इंद्राला विनंती करून ते महायुद्ध थांबविले होते. आगलाव्या म्हणून मी प्रसिद्ध आहे खरा. पण हे निकराचे देव दानव युद्ध तुझ्या आदेशानुसार नारदाने थांबविले बरें. तुला तुझा त्यावेळचा निर्णय आज पटत नसला तरी गोष्टीतल्या नारदाला तो नक्कीच पटला होता.
'नारायण नारायण' गुंजन
त्रिलोकास ते टाकी भारून
नारद नमुनी देवगणांना
महती नी चिपळ्या घे हाती
नारद पुराणमंथन करिती
कथामृता त्यातुनी काढती
त्यात हातचे जोडुनी काही
त्रिलोकी कीर्तनात कथिती
नारद ब्रह्मायण गाती
स्वये श्री ब्रह्माजी ऐकती
नारद ब्रह्मायण गाती
ब्र: नारदा, तुला जितका नारायण कळतो तितका आम्हा देवांनाही कळत नाही. मानव तर आम्हाला कळतच नाही. तो फक्त तुलाच कळतो कारण तू त्यांच्याबरोबर उठतो बसतो. म्हणून तर त्या अर्नाळपुराणात तुझा भरभरून उल्लेख आहे. तू स्पाँसर केलेले ते पुराण असावे असा संशय यावा इतके ते पुराण तुझ्याभोवताल फिरते. असो.
नारदा, समुद्रमंथनाची कथा खरेच सुरस हं. पण नंतर झालेल्या महायुद्धाचीही कथा सांग रे. युद्धस्य कथा रम्या म्हणतात. महायुद्धस्य कथा महारम्या. त्यात तू वरून आपला मीठमसाला लावणार. तुझे ते जोक्स! अगदी तोंडाला पाणी सुटते आहे. सांगतोस का तीही कथा?
ना: ब्रह्मा, सांगितलीही असती रे. खरे म्हणजे ती युद्धकथा ब्रह्मायणाच्या पुढच्या खंडात असेलही. कारण ते युद्ध थांबवण्यात तुझी मोठी भूमिका आहे. भागवतात ही कथा अगदी सविस्तर आहे. साऱ्या राक्षसांची नावे, कोणाचे काय वाहन, कोणी कोणावर कोणते अस्त्र सोडले, कोण कोणाला काय बोलले, सारे सारे आहे. तू समश्लोकी भागवत वाच ना. घे ही लिंक. अगदी नेमका युद्धाचा अध्यायच उघडेल. आठव्या स्कंधातला दहावा अध्याय.
http://satsangdhara.net/bhp/
तू वाच, मी आलोच. काहीतरी पोटापाण्याची सोय करून येतो. तुझ्याकरिता पण घेऊन येतो पार्सल जमले तर. तू नको येऊ एवढ्या पावसात बाहेर. तुझे ते वाचून झाले की churning of milk ocean youtube अशी कडी टाक गूगलवर. समुद्रमंथनाचे व्हीडिओज पाहायला मिळतील. काय शोभून दिसतो तू देवांमधे ते वासुकीचे शेपूट धरून. कोणालाही तुझ्यासारखी मल्टिपल तोंडे नाहीत ब्रह्मा. तू तसा अगदी युनीक आहेस बरे.
ब्र: बरे बाबा. पण लवकर ये. मी वाचतो तोवर भागवत पुराण.
समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १० वा
देवासुरसंग्राम -
श्री शुकदेवजी परीक्षिताला सांगतात -
(अनुष्टुप् छंद)
जरी सावध राहोनी दैत्यांनी कष्ट घेउनी ।
मंथनी घेतला भाग परी त्या श्रीहरीस तै ॥
विन्मूख राहिले तेणे अमृत लाभले नसे ॥
राजा! श्रीहरीने केले समुद्र मंथनो तसे ।
स्वजनो देवता यांना अमृत पाजुनी स्वये ॥
गरूडी बसता गेले निघुनी निज धामि ते ॥
दैत्यांनी पाहिले जेंव्हा शत्रू सफल जाहले ।
न साहोनि करी शस्त्र घेता युद्धास पातले ॥
.
.
.
तदा देवासुरो नामे संग्राम थोर जाहला ।
क्षीराब्धी तटि तो ऐसा रोमांचकारिही बहू ॥
दोन्हीही एकमेकांना प्रबळ जाहले बहू ।
समोर खड्ग शस्त्रांनी जखमा करु लागले ॥
त्या वेळी शंख भेऱ्या नी मृदंग वाजु लागले ।
हत्ती किंचाळले मोठे रथांचा घर्घराटही ॥
घोडे खिंकाळले सेनीं मोठा कल्लोळ जाहला ॥
रथ पायदळी घोडे हत्तीदळ परस्परा ।
भिडले एकमेकांना लढाई जाहली सुरू ॥
गाढवे उंट नी सिंह व्याघ्र गौरमृगावरी ।
बसोनी कुणि ते वीर पातले लढण्यास की ॥
ससाने बगळे कंक गिधाडा वरती कुणी ।
मासे नी माकडे रेडे गेंड्यांच्या वरती कुणी ।
बैसोनी वीर ते कोणी लढाया पातले तिथे ॥
सायाळ मुंगुसे आणि उंदरे कृष्णमृगही ।
बकरे माणसे हंस वराह वाहने कुणा ॥
जल स्थळ नि आकाशी वीर ते देव दानवी ।
भिडले एकमेकांसी घुसोनी मारु लागले ॥
.
.
.
वीरांच्या भिडल्या रांगा देव नी दानवी तशा ।
महासागर जै दोन्ही एकमेकास भेटले ॥
वैहायस विमानात विरोचनसुतो बळी ।
बैसला इच्छिता नेई हवे तेथेहि यान ते ॥
.
.
.
श्रेष्ठ ऐशा विमानात बळीराजा विराजला ।
श्रेष्ठ सेनापती त्याच्या भोवती ठाकले उभे ॥
.
.
.
गटांचे स्वामि ते कैक नमुची शंबरादिक ।
विप्रचित्ती नि तो बाण शंबरो नि अयोमुख ॥
द्वीमूर्धा कालनाभो नी प्रहेती हेति इल्वलो ।
शकुनी भूतसंतापो वज्र दंष्ट्र विरोचन ॥
हयग्रीव शंकुशिरा कपिलो मेघ दुदुंभी ।
चक्राक्षो तारको शुंभ निशुंभो जंभ उत्कलो ॥
अरिष्टनेमि अरिष्टो त्रिपुराधिपती मय ।
कालेय पौलमो तैसा नि वात-कवचादिक ॥
मंथनी सगळे होते परी अमृत ना तयां ।
देवता हरवील्या त्या जयांनी युद्धि कैक त्या ॥
सिंहनाद करोनीया दैत्यांनी शंख फुंकिले ।
उत्साहे पातले सर्व उन्माद क्रोधही तसा ॥
ऐरावतावरी इंद्र बैसला सूर्यची जसा ।
उदयांचलि तेजाने, मंद तो गालि हासला ॥
देवता वाहनारुढ ध्वज आयूध घेउनी ।
इंद्राच्या भोवती आले वायू अग्नी वरूणही ॥
एकासी एक बाजूला गाठोनी लढु लागले ।
नावें ओरडुनी कोणी धिक्कारूनि हि बोलती ॥
इंद्र तो बळिसी तैसे कार्तिको तारकासुरा ।
वरुणो हेतिसी तैसा प्रहेतीसीच मित्र तो ॥
यम तो कालनाभासि विश्वकर्मा मयाशि नी ।
त्वष्टा तो शंबरासूरा सविता हा विरोचना ॥
अपराजितासि नमुची वृषपर्वासि अश्विनो ।
बाणादी बळिचे पुत्र शत त्या भिडला रवी ॥
राहूशी लढला चंद्र पुलोमायास वायु तो ।
भद्रकाली निशुंबासी-शुंबासी लढु लागली ॥
जंभासुरास हर नी अग्नि तो महिषासुरा ।
वातापी-इल्वलो यांना मरिच्ये गाठिले असे ॥
दुर्मर्षासी कामदेवे उत्कला मातृदैवते ।
शुक्र-बृहस्पति जोडी शनी नी नरकासुरो ॥
निवातकवचाला ते मरुद्गण तसे पहा ।
विश्वदेवो लढाया ते पौलोमा पुढती तसे ॥
क्रोधवशा सवे रुद्र संग्रामा लागले तदा ॥
(इंद्रवज्रा)
असे सुरासूर परस्परात
यशास इच्छोनि लढ्यात आले ।
नि बाण खड्गे क्षति पोचवीत
परोपरीने लढु लागले की ॥
तोफा गदा पट्टिश प्राश भाले
उल्मूक फर्शा तलवार बाण ।
नी भिंदिपाले परिघे करून
छेदोनि गेले शिर कैक वीर ॥
अश्वो गजो नी रथ वाहने ती
विच्छिन्न सेना तइ काळ झाळी ।
जांघा भुजा मान नि पाय कैका
तुटोनि गेले कवच ध्वजो ही ॥
हत्ती नि वीरे पद आपटीता
तसे रथाने भुमि छिन्न झाली ।
धुळीत गेला रवि झाकुनी तो
दाही दिशांना धुळ-धूळ झाली ।
कांही क्षणांनी मग रक्तपाते
पृथ्वी भिजोनी धुळ शांत झाली ॥
पुन्हा शिरांचा रणि ढीग झाला
ती क्रोधमुद्रा मुकुटे तशीच ।
ते शस्त्र तैसे तुटल्या करात
ऐशी भुमी भीषण ती जहाली ॥
(अनुष्टुप् छंद)
कांहीची तुटकी डोकी पाहता धड वेगळे ।
हातात शस्त्र घेवोनी शत्रूंच्या वरि धावले ॥
.
.
.
बळीराये दहा बाण इंद्राच्या वरि नी त्रय ।
ऐरावता वरी चार रक्षकांवरि सोडिले ॥
महावता वरी एक आठरा सोडिले असे ॥
इंद्राने पाहिले हे तो घायाळ करु पाहती ।
भल्लतीरे तये सारे तोडिले वरच्यावरी ॥
इंद्राची स्फूर्ति पाहोनी चिडला बळि तो बहू ।
उल्केपरी दुजी शक्ती योजिता नष्टली तशी ॥
क्रमाने शूळ नी प्रास तोमरा शक्ति स्थापुनी ।
धरिता करि ते तेही इंद्राने सर्व तोडिले ॥
इंद्राचा पाहुनी वेग जाहला गुप्त तो बळी ।
निर्मिली असुरी सृष्टी गिरी देवांचिया वरी ॥
दावाग्नी परि ते तप्त वृक्ष पाषाण त्यातुनी ।
पडता देवतांचा तो चेंदाचि करु लागले ॥
थोर सर्प तसे विंचू अंगासी दंशु लागले ।
डुकरे सिंह वाघादी हत्तींना फाडु लागले ॥
परीक्षिता! करीं शूळ कापा-मारा असे मुखे ।
बोलता नागडे कैक आले राक्षस राक्षसी ॥
आकाशी घन ते आले टकरी गर्जले बहू ।
कडाडल्या विजा तैशा तमात वृष्टि जाहली ॥
अग्निची वृष्टि ही केली बळीने ती भयानक ।
क्षणात सुटला वारा पेटले देवसैन्य ते ॥
वादळी सागरीलाटा चौदिशीं उठल्या पुन्हा ।
जणू समुद्र उल्लंघी सीमा नी वेढितो असा ॥
भयानक अशी दैत्ये लपोनी सृष्टि निर्मिली ।
न दिसे शत्रु तो गुप्त देवता दुःखि जाहल्या ॥
प्रतिकारा तदा इंद्रे विचारा योजिले परी ।
उपाय खुंटला तेंव्हा स्मरिले हरिला तये ॥
तात्काल हरि तो साक्षात् समोर राहिला असे ॥
(इंद्रवज्रा)
ते श्रेष्ठ सौंदर्य असेचि होते
ठेवी गरूडी पदपंकजाते ।
शस्त्रे करी नी कटि पीतवस्त्र
कौस्तूभकंठी शिरि तो किरीट ।
ती कुंडले शोभलि कर्णभागी
देवे असा हा हरि पाहिला की ॥
त्याच्या प्रवेशे कपटी अशी ती
लोपूनि गेली मग सर्व माया ।
जै स्वप्न दृश्ये ठरती असत्य
तशा विपत्ती हरि नष्टितो तो ॥
(वसंततिलका)
तो काल नेमि बघता हरि युद्ध क्षेत्री
अंबारिसीच बसुनी त्रिशुळास फेकी ।
तो लागणार गरुडा हरिने धरीला
श्री विष्णुने वधियला त्रिशुळेचि दैत्य ॥
माली-सुमालि अति ते बळि दैत्य होते
युद्धात चक्रिं वधिले हरिने तयांना ।
तो माल्यवान करि घेवुनि ती गदा नी
मारीयली गरुडजी वरती तयाने ।
तो गर्जुनी करित ना करितो प्रहार
चक्रेचि श्रीहरि तया वधुनीहि ठेला ॥
.
.
.
ना: हं ब्रह्माजी. आलो पण. लग्नाचा मोसम आहे. आपल्याला आमंत्रण असतेच. करून आलो एका मांडवात यज्ञकर्म. हं आता सांगा काय करायचे ते. झाली का भागवतातली युद्धकथा वाचून?
ब्र: नारदा, शू श्श्शशू! थांब थोडा. रणधुमाळी माजली आहे. एक दहा मिनिटे वाचू दे. मग बोलतो.
.
.
या परी बोलता बोल ऐकोनी इंद्र थांबता ।
बळीने शेकडो बाण तयाच्या वरि सोडिले ॥
सत्यवादी असे शत्रू बोलता मर्म भेदुनी ।
अंकूश लागता हत्ती तसा तो चिडला असे ॥
वज्रप्रहार इंद्राने जोराने घातला असे ।
विमाना मधुनी तेंव्हा पृथ्विशी पडला बळी
.
.
.
परीक्षिता! तये वेळी ब्रह्म्याने पाहिले असे ।
दैत्य ते संपती सर्व नारदा बोलले तसे ॥
तयांचा टाकुनी शब्द देवता रोधिल्या तदा ॥
नारदजी म्हणाले -
हरिच्या आश्रयाने तो तुम्ही अमृत प्राशिले ।
लक्ष्मीजीच्या कृपेने ती वृद्धी सर्वचि मेळिली ।
म्हणोनी लढणे थांबा देवतांनो अता तुम्ही ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
नारदी बोध हा सर्व देवांनी मानिला असे ।
स्वर्गी निघोनि ते गेले यशोगानहि जाहले ॥
वज्राचा घाव लागोनी मेलेला बळि घेउनी ।
वाचले दैत्य ते सारे नारदांना विचारुनी ॥
अस्तांचल गिरीच्या त्या यात्रेसी निघले तदा ॥
शुक्राचार्ये तिथे विद्या संजीवनिच योजुनी ।
न शीर कापता मेले त्या सर्वां जीव तो दिला ॥
स्पर्शिता शुक्र-आचार्ये झाला चेतन तो बळी ।
स्मरले सर्व ते त्याला न खेद ज्ञानि तो असे ॥
हं, बोल आता. नारदा, भागवत वाचायलाच हवे रे. काय साद्यंत हकीकत असते त्यात. पण त्यामुळेच मनात शंका येतात रे. वर्षभर इथे राहून मीही हॅरी पाॅटर वाचले आहे. थोडेफार विज्ञान वाचले आहे. तसा मी विज्ञानाच्या बालकमंदिरातच आहे म्हण ना. तरीही मला गोष्ट आणि सत्य यात फरक असावा असे वाटते. भागवत रसाळ असेल ब्रह्मा, पण ते माचून पिळले तर रस का निघणार? फार ओढाताण होते रे मनाची ही पुराणे वाचून. लिहिणाऱ्याची कमाल वाटते, पण वाचून विश्वास ठेवणाऱ्याची खरेच कीव येते रे पुत्रा.
ना: ब्रह्मा, विश्वास अविश्वास ह्या वैयक्तिक बाबी आहेत. तू मात्र सत्याकडे, नास्तिकतेकडे झुकतो आहेस. खऱ्या अर्थाने शिक्षित होतो आहेस. असो! पण ब्रह्मा, युद्धकथेचे ते दोन अध्याय तुझे वाचून झाले. त्याच्या पुढचाही वाच कधीतरी. स्कंध आठवा, अध्याय बारावा. त्यात काय आहे हे मी नाही सांगू शकत. पण तू वाच. नंतर तूच काय ते ठरव. नारायण नारायण!
ब्र: वाचीन कधीतरी. मराठीत असल्यामुळे प्रकरण जरा सोपे झाले हे मात्र खरे. चांगले केलेस ती लिंक देऊन. पण नारदा, खरेच हे राक्षस वगैरे होते का रे?
ना: ब्रह्मा, या सगळ्या समुद्रमंथनाच्या, नंतरच्या लढाईच्या कथेतले तू व मी जितके खरे, तितकेच ते दैत्य दानवही खरे. आपण जसे वरातगंगा घेऊन, स्वर्गाला कुलुपे लावून, दहा बाय दहाच्या खोलीत आलो तसे तेही कदाचित त्यांची वरातयमुना घेऊन आले असतील व इथेच कुठेतरी राहात असतील. कदाचित याच खोलीत आत्तासुद्धा असतील. कदाचित शेजारी चांडक काकांकडे उतरले असतील. तेही कदाचित असेच पुराणे वाचून स्वत:ला शोधत असतील. कदाचित आजच त्यांनीही भागवत वाचले असेल व बळीचे, नमुचीचे कौतुक केले असेल. असाच कुठेतरी कोणी एखादा दैत्यपुत्र आपल्या पित्याला त्याचे चरित्र वाचून दाखवीत असेल.
स्वये श्री दैत्यराज ऐकती
दनुसुत दैत्यायण गाती
ब्रह्मा, ते सुद्धा कश्यपाचे वंशजच नाही का? दैत्य दानव अगदीच काही हे ... म्हणजे ... आपलं ते म्हणजे ... अगदी असेच काही नाही आहे काही.
ब्रह्मा, कल्पनेचा जन्मच अमृत पिऊन होतो. ती जन्मत:च अमरत्व घेऊन येते. कल्पनेला मरण नाहीत. अमर्त्य तीच कल्पना. म्हणून जसे आपण, तसेच दैत्य दानवही अमर आहेत. अमर नाही तो केवळ मानव.
ब्रह्मा, देव वा दानव वा मानव. एक गोष्ट मात्र खरी. आणि ती म्हणजे कन्यापुत्रांचे मातापित्यांवरील प्रेम. ते त्रिकालाबाधीत आहे. गेले वर्षभर ते आपण पाहतच आहोत. मास्तरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे कन्यापुत्र त्यांचे चरित्र, म्हातारीचे चरित्र त्यांच्यापुढे व जगापुढे गातच आहेत. त्यांचे प्रभु, त्यांचे मातापिता त्यांच्याच मुलामुलींच्या मुखाद्वारे, लेखणीद्वारे स्वत:चे चरित्र ऐकत वाचत आहेत. ऐकत वाचत असावे अशी त्यांची धारणा तरी नक्कीच अाहे. जन्मशताब्दीवर्ष आज संपते आहे. पण ब्रह्मा जसा काळ अनंत, तशाच आठवणीही अनंत. वर्ष संपले म्हणून काय? आठवणी थोड्याच संपणार. चरित्रगायन सुरूच राहणार. आठवणींच्या समुद्राचे मंथन गेले वर्षभर सुरू आहे. रत्ने निघतच आहेत. मला तर ह्या वर्षात आपण जोडीने येथे होतो याचा आनंद आहे. हे मानवांचे स्मृतिसमुद्रमंथन आपण अनुभवले. थोडे आपणही आपले कोआॅर्डिनेट्स पडताळून पाहिले. थोडे मी पण ब्रह्मायण गाऊ शकलो. तू ऐकू शकला. पण ब्रह्मा, आपल्यालाही आता पुढे जायला हवे. पाण्याच्या टाकीचा बोळा काढायला हवा. पाणी वाहते करायला हवे. नवे काहीतरी करायला हवे. ब्रह्मा, थांबला तो संपला रे.
ब्रह्मा, पौराणिक साहित्य अमाप आहे. काय काय वाचशील? पौराणिक काळ म्हणजे अतिप्राचीन काळ. थोडे आपण अलिकडे वळलो, अर्वाचीन इतिहासाकडे वळलो तर जरा थोडेसे मनाला पटेल असे साहित्य, वाङमय मिळेल. काही शतकांपूर्वी झालेले राजे व लढाया, समाजात झालेली परिवर्तने, समाजाशी निगडित संतवाङमय, कला ज्ञान विज्ञान यांनी घेतलेली उत्तुंग भरारी, येणाऱ्या भविष्याची झलक यांचे चित्रण निरखता येईल. मला असे वाटते आता आपण येथून बूड उचलायला हवे. आपले उदंड आयुष्य खरे म्हणशील तर एक शाप आहे. त्यामुळे आपल्याला काळाचे व वेळे़चे खरे महत्त्व कळत नाही. काळ अनंत असला तरी वेळ अनंत नाही रे. यांना बघ. प्रत्येक क्षण जगतात. आला तो क्षण जगतात. गेला तो जाऊ देतात. येणाऱ्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात. आपल्यालाही मानव व्हायला हवे. ज्ञानग्रहण करायला हवे. ते पुढच्या पीढीला द्यायला हवे. वेळ व्यर्थ व्यतीत नको व्हायला.
ब्रह्मा, सूर्यमालेच्या यात्रेवरून परत आल्यावर तू म्हणाला होतास की मी तुझी बुद्धी आहे. ब्रह्मा, ते खरे आहे. म्हणूनच माझा जन्म तुझ्या डोक्यातून आहे. गेले वर्षभर आपण केलेला संवाद हा एका दृष्टीने तू तुझीच बुद्धी वापरून स्वत: स्वत:शीच केलेला संवाद आहे.
मन आणि बुद्धी म्हणजे ब्रह्म आणि नारद. यांची फारकत झाली की कल्पांत निश्चित. ब्रह्मा, मन आणि बुद्धी जोवर एकमेकाचे बोट धरून चालतात तोवर विश्वोपयोगी ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य यांची सुंदर सृष्टी निर्माण होत असते, टिकत असते. मनाने बुद्धीचे धरलेले हे बोट कधी सुटू नये. नाहीतर काय होते हेही आपण आपल्या पृथ्वितलावरील वास्तव्यात पाहिले आहे, अनुभवले आहे. ब्रह्मा, आपण एकमेकाचे बोट सोडू या निव्वळ कल्पनेने सुद्धा तुला मला घाम फुटला होता. पण तसे होणार नाही. मानव तसे होऊ देणार नाही. आपणही तशी खबरदारी घेऊ. चल आता क्षितिजापार.
चल धर बोट. नव्या पहाटेकडे जाऊ या.
_____________________
No comments:
Post a Comment