गोष्ट पंधरावी
नन्नी नौन्नुन नानिनानन नना नन्नंननी नैन्नना
नाना ना ननना नना नननिना, नाना नना नीनना
ब्रह्मा: काय नारदमुनी, सकाळी सकाळी कोणाचे लग्न लावता आहात? एकदम 'लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी वैद्यका' म्हणता आहात असे वाटते म्हणून विचारतो.
नारद: ब्रह्मा, खरेच रे. तू टोकले नसते तर मी 'कुर्यात सदा मंगलम्' पर्यंत पोहोचलो सुद्धा असतो. कुणाचही लग्न म्हटलं की ओठावर ही चाल येते. मसजसततग. व्वा!
ब्र: कां? कोणाचे लग्न आहे आज? आणि तू असा सकाळी सकाळी कुठे निघायची तयारी करतो आहेस? मला इथेच सोडून जाणार की काय?
ना: नाही ब्रह्मा. आपल्याला वरातगंगा घेऊन इथे येऊन वर्ष होणार लवकरच. तुला आठवत असेल आपण श्रीनिवासच्या लग्नाच्या निमित्ताने आलो आणि इथलेच रहिवासी झालो. परत जायच नावच नाही. तसेही ही मस्त पृथ्वी सोडून त्या स्वर्गात परत जायला आपल्याला काय वेडबीड लागले की काय? ब्रह्मा, आज मास्तरांच्या आणखी एका नातवाचं लग्न आहे. त्या बाळाचा मुलगा. प्रमोदचा कौस्तुभ. आपल्यालाही निमंत्रण आहे. कुठल्याही लग्नात आपल्याला बोलावले नाही असे होत नाही. एरवी आपण जातोच असे नाही. पण आज तर गेलेच पाहिजे. ते वाडेकरी येतील तिथे. म्हातारे झाले रे त्यातले बरेच. पाहू कोण कोण येतात ते.
ब्र: चल चल. मी पण येतो. घोडा, बँड, अक्षता, मंगलाष्टक, जेवण, वरात. मज्जा मज्जा येईल. पण मागच्या वेळेस सारी वरातगंगा घेऊन लग्नाला गेलो होतो. यावेळेस आपण दोघेच कां? आधी सांगितले असतेस तर त्यांनाही बोलावून घेतले असते.
ना: अरे बाकी देव पण येतील. निमंत्रण सगळ्यांनाच असते लग्नकार्याचे. पण कुठे कुठे जाणार आपण देव तरी! आपली संख्या जेमतेम तेहतीस कोटी. हे लोक आता एकशे तेहतीस कोटी. लग्न, मुंजी सुद्धा करोडोनी असतील. तेवढ्यानेच समाधान होत नाही म्हणून मग तुळसाबाईच दर वर्षी लग्न. बाकीही कार्येही काही कमी नाहीत. सत्यनारायण, युगद्वारप्रहरी यज्ञ, भानामती निवारक पूजा, मावंद, एकसष्टी, सण, वार. सतत काही ना काही सुरूच असते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला निमंत्रण, आपली पूजा, आरती, नैवेद्य. गणेशाची तर फार तारांबळ उडते. कारण सर्वात आधी त्याची पूजा असते. शिवाय प्रत्येक देवळात भक्तांचा विरस होऊ नये म्हणून जो तो देव मूर्तिप्रवेश, फोटोप्रवेश करीत असतो. गणेशाला तर प्रत्येक गंध हळद कुंकू लावलेल्या सुपारीत प्रवेश करावा लागतो. आजही बघशील, मांडवात आधी गणपतीची आराधना होईल. त्या मानानी मग तुझे माझे बरे आहे. ना देऊळ, ना फोटो. तू त्या त्रिमूर्तीत तरी असतो. मी तर कुठेच नाही. फक्त सीरियल मधे असतो तेवढेच. बाकी काय, 'नाही चिरा, नाही पणती' असा मी देवऋषी.
ब्र: नारदा, तसे नाही रे. देऊळ नसले, देवघरात फोटो नसले म्हणून काय झाले? चारही युगात, तीनही लोकात नुसता तू तू तू आहेस. पुराणात, उपपुराणात तूच आहेस. तुझ्यावर जितके लिखाण आहे तितके कोणावरच नाही. अर्नाळपुराण तर पूर्ण तुझ्यावरच आहे. कालच मलाही तुझ्यावरची एक नवीनच कविता सापडली. परवाच मला तुझ्या पूर्वजन्माची, मी जन्म देण्याआधीची कथा सापडली. 'व्रतात व्रत एकादशी, ऋषीत ऋषी नारदऋषी' असे खुद्द नारायण म्हणतो. माझे तर तुझ्याशिवाय पान हालत नाही. काही अडचण आली की ज्याच्याकडे धाव घ्यावी असा तू माझा 'go to' पुत्र आहेस. म्हणून तर मी तुला बरेचदा गोटू म्हणत असे. मोठा झाल्यावर तुला मी गोटू म्हणून हाक मारलेली आवडेनासे झाले म्हणून मग मी नारद म्हणायला सुरुवात केली. पण त्या नावात गोऽऽटू हाकेत जे प्रेम दडलेले आहे ते नाही. गोटू, अरे प्रमोदमधे बाळची मजा, गीतामधे बेबीची मजा, सुधीरमधे राजूची मजा कधीच येऊ शकत नाही. आता मी तुला पुन्हा गोटू म्हणणार आहे. माझा गोऽऽटू!
ना: अरे अशी शेंडी काय ओढतोस? गालगुच्चा काय घेतोस? मी काय आता लहान आहे का? माझेही वय आता दीडशे दोनशे कोटी वर्षांचे आहे. शेंडी उपटशील तर अगदीच गोटा होईल डोक्याचा. सोड शेंडी. आणि ती कविता काय म्हणालास माझ्यावरची? ऐकव तर जरा.
ब्र: नारदा, असू दे. नंतर कधी म्हणीन. आता आधी लग्नाला जाऊ.
नाः ब्रह्मा, छळू नकोस. कार्यालय अगदी घराजवळ आहे. आपण लगेच पोहोचू. पण आधी ती कविता. माझ्याविषयी जे बरेवाईट लिहिले असेल ते असेल. पण कळू तर दे काय आहे ते.
ब्र: बरे बाबा, म्हणतो. पण त्या कवितेवर चर्चा नको. कविता झाली की लगेच मांडवात जायचे. सकाळी सकाळी जाऊन मोक्याची जागा पकडायला पाहिजे. नाश्ता पण असतो म्हणे सकाळी. घे, ऐक तुझ्यावरची कविता.
कपाळ फोडुनी जन्मा येती
ब्रह्मदेवसुत ज्यांची कीर्ती
परंतु राउळी देउळी ज्यांचा
ना फोटो ना मूर्ति
तेथे कर माझे जुळती
त्रिकालज्ञानी त्रिलोकज्ञानी
त्रिलोकसंचारी ते असती
भल्याभल्यांना फूस लावुनी
भांडण गंमत बघती
तेथे कर माझे जुळती
पुराणात उपपुराणात जे
निरुपण कीर्तन आख्यानी जे
कथा कविता कादंबरीते
वीणा चिपळ्या हाती
तेथे कर माझे जुळती
जन्ममृत्यूचे चक्र जयांना
पूर्वजन्म गंधर्व जयांना
शापित, कष्टी, दुःख जयांना
नर नारायण भ्रांती
तेथे कर माझे जुळती
पूर्वकल्पी दासीसुत असती
उच्चकुलाचे वारस नसती
एकलव्यसम ज्ञानासक्ती
म्हणुनि ब्रह्मसुत होती
तेथे कर माझे जुळती
व्यास वाल्मिकी शिष्य ऋषींचे
प्रेरक जे या कवीद्व़याचे
वाल्ह्याच्या पहिल्या श्लोकाचे
नारदमुनी सांगाती
तेथे कर माझे जुळती
नाः व्वा! माझी टीका तर नाही. थोडीफार स्तुतीच आहे. कवितेचा घाट जंतुकवीच्या कवितांसारखा आहे. पण ब्रह्मा, हे माझ्या पूर्वजन्माचे काय रे कथानक? मी गंधर्व होतो काय, मग एका कल्पात दासीचा पुत्र होतो काय. काय हे सारे? मी शुद्ध देव नाही का? मी नर की नारायण अशी भ्रांती कां? कल्पांतानंतर जुन्या कल्पाची आठवण तरी असते का? कल्पांतात तर सारेच लयाला जाते. काळ, वेळ, अवकाश सुद्धा. मग माझी ही गोष्ट या कल्पात कशी आली आणि कोणी सांगितली?
ब्र: नारदा, चर्चा नको. मी वाचल्या आहेत तुझ्या पूर्व जन्माच्या गोष्टी. छान आहेत. फक्त या कल्पातच तू माझा पुत्र आहे असे म्हणतात. तुझ्या पूर्वकल्पातील पूर्वजन्माची गोष्ट तूच वेदव्यासांना सांगितली. महाभारत लिहायला तूच सांगितले. वाल्मीकीकडून रामायण तूच लिहून घेतले. गतजन्मीची तुझी स्मृतीच फक्त कल्पांतातही नष्ट झाली नाही. फक्त तुलाच तुझ्या पूर्वजन्मांची आठवण आहे. आता काय असे विसरभोळ्यासारखे करतोस? पण आता ते विवेचन नको. चला लग्नाला. ते बघ काकाकाकू पण सजूनधजून निघाले. हो पुढे. बस कारच्या डिक्कीवर.
ना: ब्रह्मा नको. टेबलवर पत्रिका आहे. त्यात कार्यालयाचा पत्ता असतो. तो वाचून मी तिथे जायची इच्छा करतो. लगेच आपण तेथे पोहोचू. मी इच्छास्थळी आहे. मला वाहन नको. इच्छा हेच माझे वाहन. उगाच का मी त्रिलोकाचे दौरे करतो? असं 'आॅटो, चलतोस का पृथ्वीवर? चलतोस का वाड्यावर?' म्हणून काय मी मास्तरांकडे जात असे? इच्छा होताच मी तिथे पोहोचत असे. तसेच आजही करू. हे लोक आपल्या नंतर पोहोचतील. चल. ही बघ पत्रिका. अशोक हाॅटेल. आठरस्ता चौक.
धर माझे बोट. हं. पोहोचलो सुद्धा बघ.
ब्र: नारदा, इथे तर फारसे कोणी नाही रे. फक्त हात जोडून तिथे कोणीतरी काहीतरी म्हणताना दिसत आहे. चाल अगदी त्या गलगलगलगलगलगलगलग सारखी आहे. अगदी त्या 'लेह्य पेय चोष्य खाद्य' सारखी. ठसकेदार.
'लेह्य पेय चोष्य खाद्य भक्ष भोज्य आणिले ।
जे जयासि आवडे तयासि तेचि वाढिले ।।
प्रीतिपाद्य बद्धहस्त कौंडणेश लाघवी ।
स्वस्थचित्त जेविजे विवाहियास वीनवी ।।
नाः होय ब्रह्मा. बरोबर ओळखले. फक्त प्रत्येक चरणात एक लघु सुरुवातीला ज्यास्त आहे एवढेच. म्हणजे लगलगलगलगलगलगलगलग. म्हणजेच प्रत्येक चरणात पंधरा ऐवजी सोळा अक्षरे. बाकी तसेच.
मुदाकरात्तमोदकं सदाविमुक्तिसाधकं।
कलाधरावतंसकं विलासिलोकरंजकम् ।
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं ।
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ।।
नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं ।
नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं ।
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरम् ।।
समस्तलोकशंकरं निरस्तदैत्यकुंजरं ।
दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् ।
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं ।
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ।।
अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं ।
पुरारिपूर्वनंदनं सुरारिगर्वचर्वणम् ।
प्रपंचनाशभीषणं धनंजयादिभूषणं ।
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् ।।
नितांतकांतदंतकांतिमंतकांतकात्
अचिंत्यरूपमंतहीनमंतरायकृंतनम् ।
हृदंतरे निरंतरं वसंतमेव योगिनां ।
तमेकदंतमेव तं विचिंतयामि संततम् ।।
महागणेशपंचरत्नमादरेण योऽन्वहं ।
प्रगायति प्रभातके ह्रदि स्मरंगणेश्वरम् ।
अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां ।
समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोऽचिरात ।।
ब्रः नारदा, चाल 'लेह्य पेय चोष्य खाद्य' सारखी आहे आणि मला मोदकम् पण ऐकू आले. म्हणजे आता जेवायची वेळ झाली का रे?
नाः ब्रह्मा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! अरे नाही, जेवायला अजून खूप वेळ आहे. ही गणेशस्तुती आहे. म्हणून मोदकाचा उल्लेख होता एवढेच. तुला हे स्तोत्र म्हणजे मेनूकार्ड वाटलं की काय?
ब्रः अरे देवभाषा समजत नसल्यामुळे होतो गैरसमज. असो. पण संस्कृत स्तोत्र म्हणजे ही व्यासांचीच रचना असेल ना रे? पण काकाकाकूंना कधी ही गणेशस्तुती म्हणतांना ऐकले नाही.
नाः हो ना. आज येथे 'वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ' कां म्हणत नाहीत माहीत नाही. मला ते ऐकायला आवडते कारण त्यात माझे नाव आहे. पण आज जे म्हणत आहेत ती व्यासांची रचना नाही. हे आद्य शंकराचार्यांनी रचलेले महागणेशपंचरत्न स्तोत्र आहे. आत्ता आत्ता, म्हणजे बाराशे वर्षांपूर्वी ते होऊन गेले. मानव होते. देव नाही. याच भारत वर्षात दक्षिणेत केरळ नावाच्या राज्यात ते जन्माला आले. भारतभर फिरले. आणि आपल्या तर्काने व पांडित्याने वादरणात जिंकून त्यांनी दिग्विजय साध्य केला. आधी फक्त शंकर नाव होते. नंतर शंकराचार्य झाले. आता आद्य शंकराचार्य म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांची ही रचना आहे. आपल्याला फारसे संस्कृत कळत नाही. घरी गेल्यावर अर्थ वाचू. पण चाल किती ठसकेदार आहे. मला तर एक पद खूपच आवडले.
नितांतकांतदंतकांतिमंतकांतकात्
अचिंत्यरूपमंतहीनमंतरायकृंतनम् ।
हृदंतरे निरंतरं वसंतमेव योगिनां ।
तमेकदंतमेव तं विचिंतयामि संततम् ।।
व्वा. काय मजा असते रे देवभाषेची? इंग्रजीत असे कधीतरी जमेल का रे? मराठीत कदाचित रचेल एखादी विदुषी. ती मास्तरांची बेबी रचेल कदाचित. ब्रह्मा, तिचा पण ब्लाॅग सुरू झाला बरं. तोही वाचायला पाहिजे. घरी गेल्यावर कर क्लिक या लिंकवर.
http://patkhedkarvishwa.
तिच्या लेखात, ज्याला ती मोदक म्हणते, आपली खूप स्तुती असते. तुला मला शंका आहे आपल्या अस्तित्वावर. पण तिला नाही. ती तर कोर्टात साक्ष पण देईल आपण आहोत म्हणून. मग मात्र पंचाईत येईल. कोर्टाचा हेबियस काॅर्पस चा आदेश आला तर फार कठिण होईल. हेबियस काॅर्पस म्हणजे अमुक काही दिवसात ह्या व्यक्तीला कोर्टात प्रस्तुत करा असा आदेश. आणतील कुठून? मी परकाया प्रवेश करून जाऊ शकतो. तू तर तेही करू शकत नाही. तू माझ्यासारखा परकाया प्रवेश करणार कसा? चार तोंडाचा मानव इथे नाहीच मुळी. तुला सांगतो ब्रह्मा, खूप कोंडीत सापडतील हे लोक कोर्टाने असा काही आदेश दिला तर. आपण नाही हे सिद्ध होईल. असो. आलीच बघ ती बेबाबाई आपल्या चिल्यापाल्यांना घेऊन. भक्त आहेत सारे तुझे. दे आशिर्वाद भरभरून.
ब्र: ठीक आहे, ठीक आहे. चिडवू नकोस. पण आता खरेच लोक यायला लागले बरं.
नाः ब्रह्मा, ते सोड. बघ नवे गणपतीस्तोत्र सुरू झाले. याचीच मी वाट बघत होतो. यात माझे नाव आहे शेवटी. याचीच मला अपेक्षा होती. हे स्तोत्र ऐकतो आपण नेहमी काकाकाकूंकडे. संकटमोचन नाव आहे या स्तोत्राचे.
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम् आयुष्कामार्थ सिध्दये
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्
ब्र: अरे व्वा. मी तर हे स्तोत्र मराठीत पण वाचले आहे. म्हणून मला या संस्कृत स्तोत्राचा पण अर्थ कळतो. मी हेच स्तोत्र मराठीत म्हणून दाखवतो बघ.
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते
तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र ते
पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव ते
सातवे विघ््नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते
नववे श्री भालचंद्र दहावे श्रीविनायक
अकरावे गणपति बारावे श्रीगजानन
देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर
विघ््नभीती नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्धिद
विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गति
जपता गणपतिस्तोत्र सहा मासात हे फळ
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे
श्रीधराने मराठीत म्हणाया अनुवादिले
नारदा, सारीच स्तोत्रे, मंत्र असे मराठीत असते तर किती छान झाले असते रे? अर्थ समजला असता.
नाः पण ब्रह्मा, आज बघ. सगळे मंत्र संस्कृत मधे असतील. वैदिक लग्न म्हणजे संस्कृत. एक अक्षर कळणार नाही. आता गणपतीची आरती होईल. तीच आपली नेहमीची 'सुखकर्ता दुखहर्ता'. ती झाली की गौरीपुत्र विनायकाची प्रतिष्ठापना झाली. मग बाकीचे कार्य निर्विघ्न पार पडेल असे हे लोक समजतात.
ब्रः आता बाकी काय उरले रे?
नाः अरे आत्ता तर कुठे सुरुवात झाली. विवाहविधी तर आता पुढेच आहे. ते बघ नवरदेव कौस्तुभ आणि त्याची आई आले. आज तो चक्क देव असतो, नवरदेव. तू कैलासावर शिव पार्वती विवाह थाटला होता तसेच हे लग्नकार्य असते. आता आतमधे एका कोपऱ्यात ती वैजयंती गौरीहराची पूजा करीत बसली असेल.
ब्र: व्वा! आधी गौरीपुत्राची झाली. आता गौरीहराची. म्हणजे शिवाची. आपला तर कुठे उल्लेखच नाही.
नाः माझा उल्लेख झाला बरं त्या गणपतीस्तोत्रात. मला तेवढं पुरे. तुझा होईल की नाही काही सांगता येत नाही. पण तुझा नामोल्लेख नसला तरी तुझ्या वेदांचा तर होईलच होईल. अरे वैदिक विवाह आहे. तुझ्याशिवाय कसा होईल. धीर धर. तुझं सुद्धा नाव येईल. ही बघ बाकी सारी म्हातारीची मुले पण आली. सगळ्यांच्या एकसष्ट्या बिकसष्ट्या आटोपल्या आहेत. काही वर्षांनी अमृतमहोत्सव सुरू होतील एकेकाचे. आणखीही किती लोक आले बघ. मांडव भरून गेला. आ़ता केव्हाही कौस्तुभ वैजयंती बोहल्यावर येतील. मग मंगलाष्टकं सुरू होतील.
ब्र: नारदा, आपणही अक्षदा टाकायच्या का रे 'कुर्यात सदा मंगलम्' म्हटलं की?
ना: ह्या घे अक्षदा. ये इथे अंतरपाटाच्या बाजूला. म्हणजे जवळून टाकता येतील. आपल बेंड फुटू शकतं, कारण आपण अदृश्य आणि अक्षदा दृश्य. पण चालेल. इतका गोंधळ असतो लग्नात की कोणाच्या लक्षातही येणार नाही. झाले बघ मंगलाष्टकं सुरू. नीट ऐक.
श्रीमत्पंकजविष्टरो हरिहरौ, वायुर्महेंद्रोऽनलः
चन्द्रो भास्कर वित्तपाल वरुण, प्रेताधिपादिग्रहाः
प्रद्युम्नो नलकूबरौ सुरगजः, चिन्तामणिः कौस्तुभः
स्वामी शक्तिधरश्च लांगलधरः, कुर्वंतु वो मंगलम्
ब्र: नारदा, सगळ्यांनी अक्षदा उधळल्या. पण कुर्यात सदा मंगलम् झालेच नाही.
ना: ब्रह्मा, हळू बोल. अरे संस्कृतमधे आहेत मंगलाष्टकं. म्हणून 'कुर्वंतु वो मंगलम्' म्हणण्यात आले. अर्थ तोच. बाकी अर्थ तुझ्या लक्षात आलाच असेल. सूर्य चंद्र इंद्र वरुण विष्णु सारे आपलेच लोक. वरातगंगेतलेच सारे लोक. त्यांचाच नामोल्लेख. असतील इथेच कुठेतरी. मी म्हणालोच होतो ना येतील सारे म्हणून?
गंगा गोमतिगोपतिर्गणपतिः, गोविन्दगोवर्धनौ
गीता गोमयगोरजौ गिरिसुता, गंगाधरो गौतमः
गायत्री गरुडो गदाधरगया, गम्भीरगोदावरी
गन्धर्वग्रहगोपगोकुलधराः, कुर्वंतु वो मंगलम्
नाः हं, टाक अक्षदा. छान. बघ किती सुंदर कडवे. सारे 'ग'पासून सुरू होणारे पाहुणे. त्यांचे पण आवाहन झाले. सारे आपलेच वरातगंगेतले.
नेत्राणां त्रितयं महत्पशुपतेः अग्नेस्तु पादत्रयं, तत्तद्विष्णुपदत्रयं त्रिभुवने, ख्यातं च रामत्रयम्
गंगावाहपथत्रयं सुविमलं, वेदत्रयं ब्राह्मणम्, संध्यानां त्रितयं द्विजैरभिमतं, कुर्वंतु वो मंगलम्
वाल्मीकिः सनकः सनन्दनमुनिः, व्यासोवसिष्ठो भृगुः
जाबालिर्जमदग्निरत्रिजनकौ, गर्गोऽ गिरा गौतमः
मान्धाता भरतो नृपश्च सगरो, धन्यो दिलीपो नलः
पुण्यो धमर्सुतो ययातिनहुषौ, कुर्वंतु वो मंगलम्
गौरी श्रीकुलदेवता च सुभगा, कद्रूसुपर्णाशिवाः
सावित्री च सरस्वती च सुरभिः, सत्यव्रतारुन्धती
स्वाहा जाम्बवती च रुक्मभगिनी, दुःस्वप्नविध्वंसिनी
वेला चाम्बुनिधेः समीनमकरा, कुर्वंतु वो मंगलम्
गंगा सिन्धु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा
कावेरी शरयू महेन्द्रतनया, चर्मण्वती वेदिका
शिप्रा वेत्रवती महासुरनदी, ख्याता च या गण्डकी
पूर्णाः पुण्यजलैः समुद्रसहिताः, कुर्वंतु वो मंगलम्
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा, धन्वन्तरिश्चन्द्रमा
गावः कामदुघाः सुरेश्वरगजो, रम्भादिदेवांगनाः
अश्वः सप्तमुखः सुधा हरिधनुः, शंखो विषं चाम्बुधे
रत्नानीति चतुर्दश प्रतिदिनं, कुर्वंतु वो मंगलम्
ब्रः नारदा, साऱ्या नद्या, सारे देव, सारी रत्ने, पंचमहाभूते, साऱ्या देवी, सगळ्यांचा नावानिशी उल्लेख आणि आवाहन. सारीच वरातगंगा. एवढेच काय, सारे ऋषीमुनी सुद्धा. तुझाही गणेशस्तोत्रात उल्लेख. फक्त मीच सुटलो रे.
नाः ब्रह्मा, मंगलाष्टकातले फक्त सप्तक झाले. शेवटचे कडवे राहिले आहे. पाहू कोण कोण त्यात आहे ते. तुझीही वर्दी लागेल कदाचित. ऐक.
ब्रह्मा वेदपतिः शिवः पशुपतिः, सूर्यो ग्रहाणां पतिः
शक्रो देवपतिर्नलो नरपतिः, स्कन्दश्च सेनापतिः
विष्णुर्यज्ञपतिर्यमः पितृपतिः, तारापतिश्चन्द्रमा, इत्येते पतयस्सुपर्णसहिताः, कुर्वंतु वो मंगलम्
ब्रः आता छान वाटले. आता कळले की तू वरातगंगा येईल असे कां म्हणाला. आता कळले की सगळ्यांना निमंत्रण असते असे कां म्हणाला. त्यांच्याच आशिर्वादाने, त्यांच्याच उपस्थितीत, त्यांच्याच साक्षीने तर विवाह होतो. पण नारदा, मंगलाष्टकं संस्कृतमधे कां रे? हे लोक तर स्वरचित मराठी मंगलाष्टक म्हणतात. तेही सुरेल आवाजात. आज तर हे प्राचीन मंगलाष्टकं गुरुजींनीच भसाड्या आवाजात म्हणून टाकले. नुसती देव, देवी, नद्या, ऋषी, रत्ने, भूते, यांची यादी.
ना: ब्रह्मा, शास्त्रांमधे, सूक्तांमधे हेच मंगलाष्टक आहे. आजकाल मराठीत मंगलाष्टक करून आपली नावे घुसवतात जबरदस्तीने. अाजचे मंगलाष्टक संस्कृतमधे होते. त्या भाषेतच पावित्र्य असते म्हणे. आता बघ सप्तपदीही संस्कृतमधेच होईल. पण त्याआधी वधूवरांचा शपथग्रहण समारोह.
ब्र: म्हणजे रे काय?
नाः ब्रह्मा, आजपासून हे दोघेही पतीपत्नी म्हणून नवीन जबाबदारी, नवीन पदभार स्वीकारीत आहेत. ते भारवहन निष्ठेने करण्याची दोघेही शपथ घेतात असे समज. Oath taking ceremony. मुलगा आजपासून नवऱ्याचे पद सांभाळेल. मुलगी बायकोचे. सरकारी पदाधिकार सांभाळताना मंत्री जसे गाजेवाजे सर्वांसमक्ष शपथग्रहण करतात व ती शपथ कार्यकाल संपेपर्यंत पाळतात तसेच काहीसे. विवाहबंधन ही तर दोघांसाठीही आजीवन जबाबदारी. ही तर आजीवन संकल्पबद्ध करणारी शपथ. हे तर आजीवन बंधन. बघ कौस्तुभ शपथ घेतो आहे.
धर्मपत्नीं मिलित्वैव, ह्येकं जीवनमावयोः
अद्यारम्भ यतो मे त्वम्, अर्द्धांगिनीति घोषिता
ब्रः नारदा, पण शपथ तर गुरुजी घेत आहेत. किती भराभरा म्हणत आहेत जे काय आहे ते.
नाः ब्रह्मा, हेही सारे संस्कृतमधे आहे रे. त्याच्या वतीने गुरुजीच उच्चारत आहेत. मुलीच्या वतीने पण तेच शपथ घेतील. सगळेच आउटसोर्स केलेले असते. तो युगद्वारप्रहरी यज्ञ जसा काकाकाकूंऐवजी गुरुजींनीच केला होता तसेच. पण गुरुजींनी ते काय म्हणतात त्याचा अर्थतरी सांगावा. तसेही करत नाहीत. यालाच कलियुग म्हणतात रे. गुरुजींना तरी अर्थ माहीत आहे की नाही मला नाही माहीत. असो. पण आत्ता ते जे म्हणाले त्याचा अर्थ असा की वर वधूला आजपासून स्वतःची अर्धांगिनी घोषित करतो. ती आपले शरीरच असल्यासारखी तिची काळजी घेण्याची शपथ घेतो. तिला दिलेलं हे वचन आहे ब्रह्मा आणि हे वचन आजन्म निभविण्याची शपथ.
ब्र: छान. अद्वैत.
स्वीकरोमि सुखेन त्वां, गृहलक्ष्मीमहन्ततः
मन्त्रयित्वा विधास्यामि, सुकार्याणि त्वया सह
नाः पत्नीला तो आजपासून प्रसन्नतापूर्वक घराची लक्ष्मी, घराची स्वामिनी म्हणून स्वीकारतो आणि यापुढे प्रत्येक कार्यात, प्रत्येक निर्णयात तिचे मत, तिचा सल्ला यांना बरोबरीचे महत्त्व देण्याचे आश्वासन देतो.
रूपस्वास्थ्यस्वभावान्तु गुणदोषादि सर्वथः
रोगाज्ञानविकारांश्च तव विस्मृत्य चेतसः
नाः ब्रह्मा, पती वचन देतो की तो पत्नीतील रूप, स्वास्थ्य तसेच इतर स्वभावगत गुणदोष व इतर अज्ञानजन्य विकार याकडे एकतर दुर्लक्ष करेल किंवा दोष दूर करण्याचा आत्मीयतेने प्रयत्न करेल. ब्रह्मा, कारण आता मी आणि तू असे द्वैत राहणारच नाही. अद्वैत, एकात्म करणारे हे बंधन. ब्रह्मा, शपथ म्हणजे शपथ असते हे जर मनात रुजले तर मग प्रश्नच काय रे?
सहचरो भविष्यामि पूर्णस्नेहः प्रदास्यते
सत्यता मम निष्ठा च यस्याधारं भविष्यति
यथा पवित्रचित्तेन पातिव्रत्य त्वया धृतम्
तथैव पालयिष्यामि पत्नीव्रतमहं ध्रुवम्
गृहस्यार्थर्व्यवस्थायां, मन्त्रयित्वा त्वया सह
संचालनं करिष्यामि, गृहस्थोचित जीवनम्
नाः ब्रह्मा, पती भविष्यात पत्नीचा सहचर, मित्र म्हणून, सत्य आणि निष्ठा हे सहजीवनाचे मूळ आधार मानून तिला पूर्ण स्नेह प्रदान करेल असा शब्द देतो. घर सुचारू पद्धतीने चालवायला, घरखर्च आपल्या आमदनीत बसवायला, जे काही निर्णय घ्यावे लागतील ते घेण्यात तो पत्नीला मंत्र्याचा दर्जा देईल. थोडक्यात म्हणजे घर तिचे आहे, गृहचालक, गृहस्वामिनी ती आहे असे तो कबूल करतो. ब्रह्मा, आणखी एक फार महत्त्वाची शपथ तो घेतो. तिच्याकडून जशी तो व समाज पातिव्रत्याची, जन्मभर पतिधर्म पालनाची अपेक्षा करतात, तसेच तोही पत्निधर्माचे निर्वहन करण्याची शपथ घेतो. ब्रह्मा, कलियुगात हा भाग लोक विसरतात. म्हणून स्त्रीवर अत्याचार होतात. नवरा बरेचदा पत्नीव्रत पाळत नाही. पण विवाहविधीमधे पत्नी गृहस्वामिनी व पती गृहस्थ अशी अपेक्षा आहे. लग्न म्हणजे पतीला वर्चस्व देणारी कुटुंबपद्धती नाहीच मुळी. शास्त्राप्रमाणे तर नाहीच नाही.
समृद्धि-सुख-शान्तीनां, रक्षणाय तथा तव
व्यवस्थां वै करिष्यामि, स्वशक्तिवैभवादिभिः
यत्नशीलो भविष्यामि सन्मार्गंसेवितुं सदा
आवयोः मतभेदांश्च दोषान्संशोध्य शान्तितः
भवत्यामसमर्थायां, विमुखायांच कर्मणि
विश्वासं सहयोगंच, मम प्राप्स्यसि त्वं सदा
नाः पत्नीचे सुख, शांती, समृद्धी आणि सुरक्षा याकरिता आवश्यक सर्व व्यवस्था स्वतःच्या आर्थिक व इतर परिस्थितीनुसार करण्याची जबाबदारी नवरा स्वीकारतो. भविष्यातही प्रयत्नपूर्वक सन्मार्गावर चालण्याचा व तसेच कधी मतभेद झाला किंवा वर्तणुकीत विकृति उत्पन्न झाली तर त्याचे शांतिपूर्वक निवारण करण्याचाही तो प्रण करतो. पत्नी आपल्या कर्त्तव्यपालनाला काही कारणाने असमर्थ असेल किंवा कर्तव्यपराङमुख झाली असेल तरी तो स्वतःच्या कर्त्तव्याला चुकणार नाही असे आश्वासन देतो. ब्रह्मा, आता मुलगी पण शपथग्रहण करेल. ती करेल म्हणजे तिच्याही वतीने गुरुजीच घडाघडा मंत्र म्हणून टाकतील.
ब्रः नारदा, तू म्हणतोस की कदाचित गुरुजींनाही मंत्रार्थ समजत नसेल. मुलाला तर काहीही समजले नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते आहे. साक्षीदार पाहुणेमंडळी काही ऐकतांना दिसत नाही. ते सारे आपल्याच गप्पात रंगले आहेत. अधूनमधून घड्याळ बघतात व जेवण तयार आहे का पाहून येतात. ऐकले तरी त्यांनाही काही अर्थबोध होईल असे नाही. पण मग हे सगळे कशासाठी? हा अट्टाहास कोणासाठी?
नाः ब्रह्मा, तुझ्या माझ्यासाठी असेल बहुधा. गंमत रे. मी आपला ब्रह्मचारी. पण मला हे मंत्र आवडले हं. मुलीला नवीन संसारात इतके महत्त्व, इतके अधिकार आहेत असे मला वाटले नव्हते. माझ्या त्रिलोकसंचारात मला असे खरेच प्रत्यक्षात असल्याचे आढळले पण नाही. वाडा हा अपवाद होता. असे सर्वत्र असते तर संसार कसे सुरळीत चालले असते. स्त्री अशी अबला राहिली नसती. वाड्यातल्या संसारासारखा सुरळीत संसार आता दिसत नाही. खरे म्हणजे मंत्रध्वनी पेक्षा मंत्रार्थावर भर दिला तर जास्त उचित होईल. झालाच तर फायदा पण होईल. पण खरे म्हणजे संसार चालवणे ही आपली दोघांचीही बरोबरीची जबाबदारी आहे एवढे जरी समजले व नंतर दोघांनी डोळे मिटून परस्पर विश्वासाने भविष्यात उडी घेतली तरीसुद्धा चालेल. ब्रह्मा, आता मुलेमुली दोघेही शिकतात, दोघेही कमावतात, दोघेही आपले विचार एकमेकाला डोळ्याला डोळा भिडवून सांगू शकतात, भांडू शकतात, भांडण मिटवू शकतात. तर मग खरे म्हणजे हे मंत्र सर्वांच्या साक्षीने मोठ्याने उच्चारायची गरज आहेच असे नाही. ब्रह्मा, कधी कधी वाटते की पुढच्या वेळेस जेंव्हा हयग्रीव तुझ्या नाकातून डोक्यात शिरून वेद चोरून नेईल तेंव्हा चोरू द्यावे. बस म्हणावे समुद्राच्या तळाशी. अरे नव्या मन्वंतरात, नव्या कल्पात पुन्हा नवे विचार येतील. नवी वेदनिर्मिती होईल. नवे मंत्र येतील. नवी क्रांती उत्क्रांती होईल. असे नाही का तुला वाटत?
ब्रः नारदा, तुझ्या व्याख्यानात मुलीने घेतलेली पूर्ण शपथ सुरू होऊन संपली सुद्धा. मला तेही ऐकायचे होते. आता तेवढ्यासाठी पुढच्या लग्नाची वाट पहावी लागेल. पण आता ती सप्तपदी की काय म्हणतात ते आहे म्हणे. आता ती तरी बघू दे. तुझे निरूपण नंतर.
नाः ब्रह्मा, हा पण खूप छान विधी असतो. यात वरवधू वेगवेगळ्या समुहांच्या साक्षीने सात पावले चालतात व मिळून शपथ घेऊन एकमेकांना आश्वस्त करतात. बघ साक्षीदार कोण आणि आश्वासने काय ती. सगळे संस्कृत मंत्र पुन्हा गुरुजीच म्हणणार बरे. वरवधू ओठसुद्धा हालवणार नाहीत.
ब्रह्मा, पहिले पाऊल अन्नासाठी असते. स्वादिष्ट नसला तरी पौष्टिक, स्वच्छ, सात्विक, स्वास्थ्यवर्धक अाहाराचा दोघे निर्धार करतात. तेच खरे अन्न. बाकी सारी भेळ. म्हणजे खरे म्हणजे लग्नानंतर पिझ्झा वगैरे नको असे आपली संस्कृती म्हणते. हवे तेवढेच शिजवावे, अन्न वाया जाऊ नये, शिळे पाते खायची वेळ आणू नये, अतिथीला पोटभर जेऊ घालावे, हे सर्व भाव यात आहेत. एकंदरीत काय, 'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' हे मनात ठसवणारे हे नवदंपतीचे पहिले पाऊल. पण आजच हा विधी आटोपल्यानंतरचा जेवणाचा बेत बघ. अगदी तामसी असेल. जेवण झाल्यावर प्रत्येकाची प्लेट बघ. कितीतरी अन्न वाया जाताना दिसेल. म्हणजे सगळं मुसळ केरात म्हणायची पाळी येईल. एकमेव जगद्प्रतिपालक विष्णूच्या साक्षीने नवदंपती सात्विक शुद्ध आहाराची प्रतिज्ञा करतात व वैवाहिक जीवनातले पहिले पाऊल उचलतात. प्रत्येत पाऊल उचलताना म्हणायचा पहिला श्लोक कोण कोण साक्षीदार आहे ते सांगतो. दुसरा श्लोक पाऊल उचलतांना केलेली प्रतिज्ञा आणि अपेक्षा.
ॐ एको विष्णुर्जगत्सर्वं व्याप्तं येन चराचरम्
हृदये यस्ततो यस्य तस्य साक्षी प्रदीयताम्
ॐ इष एकपदी भव सा मामनुव्रता भव
विष्णुस्त्वानयतु पुत्रान् विन्दावहै
बहूँस्ते सन्तु जरदष्टयः
ब्रः पण नारदा, आज तरी जेवण मस्त हवे रे. आजच्या दिवस तरी थोडी सूट घ्यावी. उद्यापासून सात्विक आहार.
नाः असाच विचार प्रत्येक जण करतो. उद्यापासून प्रतिज्ञापालन करीन म्हणतो. फक्त तो उद्या कधी येत नाही. असो. आज आत्ता इथे काय होते ते बघ. ब्रह्मा, दुसरे पाऊल बळ, शक्तीसाठी असते.
ॐ जीवात्मा परमात्मा च, पृथ्वी आकाशमेव च
सूर्यचन्द्रद्वयोर्मध्ये, तस्य साक्षी प्रदीयताम्
ॐ ऊर्जे द्विपदी भव सा मामनुव्रता भव
विष्णुस्त्वानयतु पुत्रान् विन्दावहै
बहूँस्ते सन्तु जरदष्टयः
नाः ब्रह्मा, दुसरे पाऊल जीवात्मा आणि परमात्मा, पृथ्वी आणि आकाश, सूर्य आणि चंद्र अशा ज्या दोन दोनच्या अतूट जोड्या आहेत, अशी जी विलग न होणारी जुळी आहेत, त्यांच्या साक्षीने उचलले जाते. शक्तीची, बळाची उपासना या पावलात अभिभूत आहे. सर्वकल्याणकारक बळ, सर्वविनाशकारक नव्हे. शीरीरिक व मानसिक बळ अभिप्रेत आहे. नियमित व्यायाम, स्वतःचे काम स्वतः करणे, सकस आहार याद्वारे शारीरिक शक्तिप्राप्ती, तसेच अखंड अभ्यास व विचार विमर्श याद्वारे प्राप्त होणाऱ्या मनोसामर्थ्यार्थ उचलायचे हे दुसरे पाऊल. हे झाले की तिसरे पाऊल.
ॐ त्रिगुणाश्च त्रिदेवाश्च त्रिशक्तिः सत्परायणाः
लोकत्रये त्रिसन्ध्यायाः तस्य साक्षी प्रदीयताम्
ॐ रायस्पोषाय त्रिपदी भव सा मामनुव्रता भव
विष्णुस्त्वानयतु पुत्रान् विन्दावहै
बहूँस्ते सन्तु जरदष्टयः
ब्रह्मा, अन्न व बल याकरिता टाकलेल्या दोन पावलानंतर हे तिसरे पाऊल धना करिता होते. धनाचा अपव्यय नको. पैसा आहे म्हणून खर्च करायचा असे नाही. तसेच विनाकारण कंजूसपणा नको. कंजूसपणा व काटकसर यातील फरक पतिपत्नीला कळणे हे दांपत्यजीवन सुखी व्हायला फार आवश्यक आहे. धन दोघांनीही कमवावे. इंग्रजीमधे 'Money saved is money earned' अशी म्हण आहे. पतीने बाहेरची कामे करून धन कमवावे व पत्नीने होतील तितकी कामे घरातल्या घरात करून बचत करावी अशी प्राचीन काळी पद्धत होती. तरी पण दोघांनीही उपार्जन करण्यास तेव्हाही कोठेही अडसर नव्हता. कमावलेल्या व वाचवलेल्या पै अन् पैचा उपयोग हा कुटुंबाच्या प्रगतीकरिता, उन्नतीकरिता करण्याचा निर्धार करवून घेणारे हे तिसरे पाऊल. वाड्यात या पावलाचा मूर्तिमंत साक्षात्कार होत असे. म्हातारीच्या मुलामुलींना 'काटकसरीने संसार करा' असा उपदेश व आशिर्वाद देतांना त्यांच्या आजीला मी पाहिले आहे. त्या लोकांनी तुझ्या कुबेरापुढे कधी हात पसरले नाही.
ब्रह्मा, ह्या तिसऱ्या पावलाला साक्षीदार कोण बघ. त्रिगुण, त्रिदेव, त्रिशक्ति, त्रिलोक आणि त्रिसंध्या.
ब्र: नारदा, हे काहीसे त्या जंतुकवीच्या शरयूच्या लग्नातल्या मंगलाष्टकासारखेच वाटते रे. प्रत्येक कडव्याच्या क्रमांकानुसार त्या त्या गोष्टींचा उल्लेख. हे मानव खरेच फार गणिती बा. मला हे फार आवडते. तिसऱ्या पावलाबरोबर त्रिदेवांचा, म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेशाचा उल्लेख. म्हणजे माझाही. आता पुढचे पाऊल चौथे. बघू पुन्हा माझ्या चार दिशेच्या चार तोंडांचा, चार वेदांचा उल्लेख येतो का ते. मंत्र सुरू झाले बघ.
ॐ चतुर्मुखस्ततो ब्रह्मा चत्वारो वेदसंभवाः
चतुर्युगाः प्रवर्तंते तेषां साक्षी प्रदीयताम्
ॐ मायो भवाय चतुष्पदी भव सा मामनुव्रता भव
विष्णुस्त्वानयतु पुत्रान् विन्दावहै
बहूँस्ते सन्तु जरदष्टयः
नाः झाले समाधान? आले तुझे नाव पुन्हा पुन्हा? अरे हे मंत्रच तुझे आहेत. हे वेदकालीन सूक्तच आहेत. वैदिक छंदातच आहेत. बघ गुरुजीही बरोबर गायत्री मंत्रासारखेच म्हणत आहेत. चौथे पाऊल चतुर्मुखी तुझ्या, चार वेदांच्या, चतुर्युगाच्या उल्लेखानेच, साक्षीनेच सुरू होते. हे पाऊल सुख वृद्धिंगत व्हावे म्हणून आहे. आयुष्याचे रहाट ओढतांना हातावर चट्टे तर पडतातच. तरी पण कुटुंबात हास्यविनोद, मनोरंजनाचे वातावरण असणे आवश्यक आहे. पतीपत्नी प्रसन्नचित्त असले तर आयुष्य हसतहसत सफल होते. संतोषी व्यक्तीसारखा सुखी कोणी नाही. 'संतोषी सदा सुखी' ही भावना. सुखी व्यक्तीपेक्षा श्रीमंत कोणी नाही. आजकाल 'निर्लज्जं सदा सुखी' म्हणतात ते वेगळे. ब्रह्मा, हे तिसऱ्या पावलात अभिप्रेत असलेले सुखाचे सूक्त मी वाड्यात प्रत्यक्षात अनुभवले आहे. मास्तरांच्या लग्नाला मी होतो. त्या दांपत्याची सप्तपदी मी पाहिली आहे. दोघांनीही ती जन्मभर अक्षरशः आचरणात आणली असे मला वाटते. ब्रह्मा, ही मंत्रांची शक्ती असेल वा नसेल, पण मंत्र उच्चारून अगदी तसेच जीवनतंत्र पाळण्यात मास्तर व आई कुठेही कमी पडले नाहीत. मला अर्नाळपुराणातल्या त्या ओळी आठवतात. अगदी सत्यवचन.
नारदाचे डोके आता विचार करून थकले होते
मास्तरांच्या पडक्या वाड्यात त्याचे मन रमले होते
तगर दूधमोगरा जाई चमेली कण्हेर फुले
त्याला ना कळे का कोणी प्राजक्तासाठी रुसले होते
सीताफळ, लिंबू, पेरू, डाळिंबाचे लाल दाणे
मास्तरांचे रोज स्वतः झाडांनाही पाणी देणे
आंगण, फरशी, दगडी टाके सारे आपले वाटत होते
वाड्यामधे नाही असे स्वर्गामधे काय होते?
माजघर आणि स्वैंपाकघर त्याचे फार प्रिय होते
सोवळे ओवळे विटाळ खरकटे थोडे समजू लागले होते
कोबी वाटाण्याचा भात, वर खोबऱ्याचा कीस
तीळगुळाच्या साटोऱ्या, जीभेचे चोचले होते
महालक्ष्म्यांचे जेवण, दिवाळीचा तो फराळ
अन्नपूर्णाबाईंचे हे दिव्य अन्नछत्र होते
मुगोड्या, चुबूकवड्या, बेसनाच्या थापी वड्या
आईच्या स्वैंपाकापुढे अमृतही फिक्के होते
उन्हाळ्यातले दिवस, बाहेर रणरणते ऊन पडे
शाळांना सुट्या, घरात आंब्यांचा माच पडे
आंबे माचता माचता रस आंगावर उडे
रस खाऊन खाऊन पोटास तढण पडे
दारास वाळ्याच्या ताट्या, माठातले थंड पाणी
जाजम घालून आता चौसर पत्यांचे अड्डे
आईसफ्रूट, लस्सी कधी, कधी ऊसाचा ये रस
घर हेच असे स्वर्ग, काय स्वर्गाची मिजास
असो. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. पाचवे पाऊल उचलतील दोघे आता.
ॐ पंचमे पंचभूतानां पंचप्राणैः परायणाः
तत्र दर्शनपुण्यानां साक्षिणः प्राणपंचधाः
ॐ प्रजाभ्यां पंचपदी भव सा मामनुव्रता भव
विष्णुस्त्वानयतु पुत्रान् विन्दावहै
बहूँस्ते सन्तु जरदष्टयः
ब्रह्मा, पाचवे पाऊल परिवारासाठी आहे. परिवार म्हणजे फक्त कुटुंब नाही. कुटुंबाव्यतिरिक्त जे आपल्यावर अवलंबून आहेत किंवा आपण ज्यांच्यावर अवलंबून आहोत तेही सारे यात आले. वसुधैव कुटुंबकम् ची भावना परिवार शब्दात व्याप्त आहे. त्या सर्वांचे भले हेच आपलेही भले ही भावना दांपत्यजीवनात बाळगण्याची दीक्षा म्हणजे हे पाचवे पाऊल. नोकर चाकरही परिवारात आले. वाड्यामधे कुठलाही मोठा सण झाला की गोडाधोडाचे अन्न सर्व कामगारांपर्यंत पोहोचविल्याशिवाय म्हातारीला अन्न गोड लागत नसे. आजही तीच भावना त्यांचे वारस बाळगून आहेत. ब्रह्मा, वाड्यात जे पाचवे पाऊल पंचमहाभूतांच्या साक्षीने व अशा भावनेने पुढे पडले ते आज पुढच्या पीढीलाही मार्गदर्शक झाले आहे. आज ही सप्तपदी पाहतांना माझ्या डोळ्यासमोर मास्तरांचे लग्न तरळते आहे. पंचाहत्तर वर्षे झाली, पण भोसला वेदशाळेत झालेले ते सुशिला-सदाशिवाचे लग्न व सप्तपदी मला आज इथे दिसत आहे.
ब्रः नारदा, इतका भावुक होऊ नकोस रे. भोसला वेदशाळेत अशा वेदकालीन मंत्रोच्चारात झालेले लग्न मलाही पाहायला आवडले असते. थोडसं यश माझ्या वेदमंत्रांनाही द्यायला नको का नारदा?
नाः अरे, सारे यश तुझेच आहे. तूचि कर्ता आणि करविता, नमन तुला भगवंता. बघ सहावे पाऊल पडते आहे ते. षडानन कार्तिकेयाच्या साक्षीने हे पाऊल संतानसुखासाठी पडते आहे. ह्या निसर्गसुलभ कार्याला स्वीकारण्यासाठी लागणाऱ्या संयमाची, संतानप्राप्तीनंतर त्यांच्या प्रगतीला आवश्यक कष्टांची व ओघाने येणाऱ्या पालनपोषणाच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे हे पाऊल.
ॐ षष्ठे तु षड्ऋतूणां च षण्मुखः स्वामिकार्तिकः
षड्रसा यत्र जायन्ते, कार्तिकेयाश्च साक्षिणः
ॐ ऋतुभ्यः षट्पदी भव सा मामनुव्रता भव
विष्णुस्त्वानयतु पुत्रान् विन्दावहै
बहूँस्ते सन्तु जरदष्टयः
ब्रः नारदा, हा अत्यंत महत्त्वाचा विधी संपत आला रे. पण कोणालाच त्याचे गांभीर्य कळते आहे असे वाटत नाही. जेवायची पण वेळ झाली आहे. बरेच लोक तर रांगेत लागले सुद्धा. आपणही एकदा फेरफटका मारून यायचे का? पाहू काय काय पदार्थ आहेत ते.
नाः अरे हे तू रचलेले मंत्र आहेत. तू तरी इथे थांब. बघ सातवे पाऊल टाकतात आहेत वैजयंती कौस्तुभ. तेवढे बघू आणि नंतर जाऊ वाटल्यास.
ॐ सप्तमे सागराश्चैव सप्तद्वीपाः सपवर्ताः
येषां सप्तर्षिपत्नीनां, तेषामादर्शसाक्षिणः
ॐ सखे सप्तपदी भव सा मामनुव्रता भव
विष्णुस्त्वानयतु पुत्रान् विन्दावहै
बहूँस्ते सन्तु जरदष्टयः
ब्रह्मा सातवे पाऊल सप्तर्षी, त्यांच्या भार्या, सप्तसागर, सप्तद्वीप, व त्यावरील पर्वतांच्या साक्षीने उचलले जाते. हे सप्तद्वीप, सप्तसमुद्र, सप्तर्षी आपण आधीच पाहिले आहेत. त्यांच्या साक्षीने नवदंपती आजन्म मैत्रीचे वाण स्वीकारतात. पतीपत्नींनी मित्र म्हणून एकमेकाला स्वीकारणे हा विवाहविधीचा भाग आहे. नाते पतीपत्नीचे असले तरी बंधन मैत्रीचे आहे. किती सुंदर कल्पना! तू आणि मी पितापुत्राचे नाते असून एकमेकाचे मित्र आहोत. तसे असले की मग आणखी काय हवे? पतीसाठी पत्नी आहे, पत्नीसाठी पती आहे. ह्या अतूट मैत्रीची आज सुरुवात आहे.
ब्रह्मा सप्तपदी म्हणजे लग्न. पण त्याचा मतितार्थ मनी बिंबवायला हवा. मंत्र हे तर केवळ ध्वनिलहरी आहेत. त्या फक्त कानात जातील. पण मंत्रार्थ ह्रदयात रुजायला हवा. असे झाले म्हणून तर वाडा वाडा झाला. असो.
ब्रह्मा, एवढे आटोपले की वरवधू त्यांची जागा बदलतील. आतापर्यंत वर डावीकडे, वधू त्याच्या उजवीकडे असे बसले होते. आता ते पतीपत्नी झाले. आता पत्नीला पतीच्या डावीकडे स्थान. ब्रह्मा संख्या लिहितांना जसे एकंच्या डावीकडे दहं, दहंच्या डावीकडे शतंचे स्थान असते तसेच. सर्वात डावीकडचे स्थान म्हणजे सर्वात महत्त्वाचे, सर्वात वजनी. लिहितानाही आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. आरंभ डावीकडे आहे. आद्यता डावीकडे आहे. प्रामुख्य डावीकडे आहे. ते प्रमुख स्थान आता वैवाहिक जीवनात स्त्रीचे आहे. म्हणून ती वामा आहे.
ती बघ वैजयंती आता वामा झाली. वामाङकी रुक्माई नित्य करी शोभा.
ब्रः तथास्तु! सुखी रहा.
नाः ब्रह्मा, तुझ्या पादारविंदाखाली मला हा कागद सापडला बघ. यावरही काही लिहिलेले दिसते. हा बघ दुसरा तसाच कागद. तसेच काहीतरी छापलेला.
ब्र: नारदा, हे तर मसजसततग रे. मंगलाष्टक. मराठीत. चल म्हणू आपण दोघेही. मी माझ्या मुखारविंदानी म्हणतो. तू तुझ्या तोंडानी म्हण. मग घरी जाऊ. चल म्हणायला सुरू करू. एऽऽक, दोऽऽन, तीऽऽन!
मार्तंडा तव दिव्य तेज उजळे वाड्यास ज्या नेहमी
जेथे चित्त सरस्वती गणपती मोरेश्वरा पूजनी
देई सौख्य सदाशिवास वरदा वास्तू, न तेथे उणे
कंठी माळ प्रमोद कौस्तुभ मणी, कुर्यात सदा मंगलम्
वाडा तो जरि जात कालउदरी, वाडेकरी सन्मुख
येती आज समस्त याच नगरी एकत्र कार्यास्तव
आहे जन्मशताब्दिवर्ष विरळा, अनुषा स्नुषा ये घरी
भासे नेत्र नभी जणू झळकती, कुर्यात सदा मंगलम्
येता फाल्गुन नित्य आठवण ये सरल्या दिनांची जरी
तोची मास मनी वसंत फुलवी, नववर्ष दारावरी
हाती घेउनि वैजयंति पद हे जाती भविष्याकडे
येता चैत्र गुढी घरी सजवु या, कुर्यात् सदा मंगलम्
'गेले ते दिन, ते सुवर्णयुग' ही चित्ती जरी भावना
अस्ता जाउनि तोच सूर्य परते पूर्वेस हो नित नवा
सूर्याचा उदयास्त रंग उधळे तो एकची तांबडा
संध्या आणि उषा दिशा बदलती, कुर्यात सदा मंगलम्
सूर्याचा रथ पूर्व पश्चिम पथा लांघूनिया जातसे
सारे विश्व पहा कसे उजळते मोदे प्रमोदे जसे
रात्री अंबर तेच, दीप दुसरे, मंदाकिनी चंद्रिमा
गंगा ही नभप्रांगणी चमकते, कुर्यात सदा मंगलम्
सप्तर्षी-ध्रुव, चंद्र-रोहिणि जसे आकाशिच्या बंधनी
तैसेची प्रमिला सदाशिव, प्रमोदा होय मंदाकिनी
राजा कौस्तुभ आज हात धरितो, ये वैजयंती पुढे
राणी होउनि या नभात तळपा, कुर्यात सदा मंगलम्
नाही उंच निळ्यास अंत, प्रगतीताटास ना काठ हो
जैसे रत्नमणी अनंत असती रत्नाकरी नित्य हो
लक्ष्मी कौस्तुभ येउ द्या घुसळता क्षिरसागरा कष्टुनी
नीरक्षीर विवेक मात्र मिळवा, कुर्यात सदा मंगलम्
आता येत घडी, सुरू युग नवे, चाला नवी पाउले
दृष्टिक्षेप जिथे जिथे पडतसे, ते विश्व हो आपुले
वाड्याचे उघडूनि दार भरुनी तेथील श्वासा उरी
ठेवा ऊब, दिगंत पंख हलवा, कुर्यात सदा मंगलम्
_____________________
अनुक्रमणिकेकडे