गोष्ट वीसावी
ब्रह्मा: काय त्रिलोक संचारी? वर्षं झालं आपल्याला येथे येऊन. मागच्या वर्षी बरोब्बर वैशाख कृष्ण प्रतिपदेलाच आपण वरातगंगा घेऊन येथे आलो होतो. आजच सकाळी कालनिर्णय पाहिला तर लक्षात आले की आजही नेमकी तीच तिथी. वर्षभरात नागपूरनगरीतच एक दोन लग्नं सोडले तर आम्ही काही तुम्हाला कोठे संचार बिंचार करताना पाहिले नाही. पाताळेश्वर, टेकडीचा गणपती, राम मंदिर अशी दोन चार देवळे पाहून आलो तेवढेच. बस्स! हाच काय तुमचा त्रिलोक संचार?
नारद: ब्रह्मा, ब्लाॅगवरचे लेख वाचून वाचून तूही टोमणेबाज झालास रे बाबा. टोमणे मारणे हेही तसे मानवत्वाचे अविभाज्य अंगच आहे म्हणा. गप्पा मारणे, थापा मारणे, बढाया मारणे, टोमणे मारणे तुला यायला लागले. तू सर्व दृष्टीने मानव व्हायला लागला आहेस आता.
ब्र: कुठे रे? मागच्या वेळचे ते मानवी कोडे काही अजून सुटत नाही. ते भूमितीचे जमेल जमेल असे वाटले दोन तीन दिवस. पण नाहीच जमले शेवटी. ते दुसरे कोडे, ऐरावताचे व उच्चैश्रवाचे कोडे तर एक तसूभर पुढे गेले नाही. म्हणजे मला गणितही येत नाही, आणि लाॅजिक, म्हणजे तर्कशास्त्र तर नाहीच नाही. मराठीत आहे थोडीफार गती. पण तोळा मासे गुंजाच म्हणावी लागेल. मग काय मी मानव होणार? ब्लाॅग वगैरे सुरू करणे तर दूरच!
ना: अरे असा निराश होऊ नकोस. आज आधी ते दोनही कोडे सोडवू. नंतर मी तुला आज खरेच त्रिलोत संचारच काय, म्हणशील तेथे नेईन. आता खरेच आपल्याला यात्रेला निघायला हवे. जग पाहायला हवे. वर्ष झाले येथेच बूड टेकून आहेत बापलेक.
ब्र: मुने, जरा मदत करा कोडे सोडवायला. आधी ते भूमितीचे. मग तर्कशास्त्राचे. नंतर मात्र खरेच चला मुनी यात्रेला. आता उबलो रे येथे एकाच खोलीत. आजचा दिवसही चांगला आहे म्हणतात.
ना: बरे देवा. आधी ते भूमितीचे कोडे. एका तीन बाय आठ च्या लाकडी फळीचे फक्त दोन तुकडे करून, ते पुन्हा वेगळ्या रीतीने जोडून आपल्याला दोन बाय बाराची लाकडी फळी तयार करायची होती. हा बघ ३ बाय ८ इंचाचा काटकोन चौकोन. ही आपली फळी समज. हिचे दोन तुकडे करून, ते पुन्हा वेगळ्या प्रकाराने जोडून आपल्याला २ बाय १२ इंचाचा एक काटकोन चौकोन करायचा आहे.
आता हा तीन बाय आठ इंचाचा काटकोन बघ. याच्या आठ इंच लांबीच्या एक एक इंचावर उभ्या रेषा काढू. आणि तसेच ३ इंच रुंदीच्या एक एक इंचावर आडव्या रेषा काढू. बघ १ बाय १ इंचाचे कसे २४ नीट चौरस दिसतात.
|_|_|_|_|_|_|_|_|
|_|_|_|_|_|_|_|_|
|_|_|_|_|_|_|_|_|
आता आपल्याला या तीन बाय आठच्या चौकोनाचे फक्त दोनच तुकडे करायचे आहेत. कापून आपण खालचा एक तुकडा असा काढू. आधी चार चार चौरसांची दुहेरी रांग, नंतर चार चौरसांची एकेरी रांग.
|_|_|_|_|
|_|_|_|_|_|_|_|_|
उरलेला दुसरा तुकडा बघ याच्या अगदी उलटा आहे. आधी चार चौरसांची एकेरी रांग, नंतर चार चार चौरसांची दुहेरी रांग. तो वरचा तुकडा आता चार इंच सरकवून खालच्या तुकड्यावर येऊ दे. बघ २ बाय १२ चा चौकोन झाला.
|_|_|_|_|_|_|_|_|_|_|_|_|
|_|_|_|_|_|_|_|_|_|_|_|_|
ब्र: अरे वा! असे आडवे-उभे-आडवे कापावे असे मला सुचलेच नाही. मी सरळच कापायचा प्रयत्न करीत होतो. नारदा, कां कोण जाणे, पण एकदा का आपण एका दिशेने विचार करायला लागलो, की ती दिशा सोडून दुसरी दिशा धुंडाळणे शक्यच होत नाही. हाही एक प्रकारचा आस्तिकपणाच आहे असे मला वाटते. देव आहे असे एकदा डोक्यात बसले की प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक घटनेत त्या विचाराला, त्या विश्वासाला पूरक असेच काहीतरी आहे अशी मनाची खात्री पटत जाते. बुद्धी बुद्धी राहत नाही. ती साचा बनते. चाकोरी होते. साचलेले पाणी होते. अशी कोडी सोडवल्यामुळे काही नाही तरी वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या दिशेने विचार करण्याची क्षमता वाढत असावी. असो.
आता दुसरे कोडे सोडवू. मी काय सोडवीन म्हणा! तूच सोडव आणि सांग उत्तर. मला कधीच कोडे सोडवता येत नाही. पण उत्तर कळले की मला कोडे खूप आवडते. इतके सोपे उत्तर आपल्याला सुचले नाही याची हळहळ वाटते. पण उत्तर माहित असलेले तेच कोडे दुसऱ्या कोणाला विचारून आपली हुशारी दाखवायची व त्याची परीक्षा पाहायची संधी मिळाली म्हणून खूप छानही वाटते.
ना: ब्रह्मा, तुझ्या ब्रह्मपुरीला चुकून आलेल्या मानवाला मृत्युदंड देण्याचे तू ठरवले. आणि छद्मीपणाने तू त्याला एक विधान करण्याची संधी दिलीस व म्हणालास की त्याने केलेले विधान खरे असेल तर तू त्याला ऐरावताच्या पायी देऊन मारशील, व खोटे असेल तर उच्चैश्रवा नामक सप्तमुखी अश्वाकडून फरफटत ओढून मारशील. तुला खात्री होती की मानवाने काहीही विधान केले तरी तो मरेलच. पण तो मानव होता. तो हुशार होता. तो म्हणाला 'देवा, तू मला उच्चैश्रवाकडून फरफटवून मारणार आहेस.'
ब्र: थांब नारदा. मला थोडा विचार करू दे. मी जर त्याला हत्तीच्या पायी दिले तर त्याचे विधान खोटे ठरेल. म्हणजे मग मी त्याला उच्चैश्रवाकडून फरफटवून मारायला हवे. मी तसे केले तर त्याचे विधान खरे ठरते. पण मग मी त्याला ऐरावताच्या पायी द्यायला हवे. पण मी तसे केले तर त्याचे विधान खोटे ठरते व त्याला उच्चैश्रवाकडून मारायला हवे. अरे, हे तर अजबच झाले. मी त्याला मारूच शकणार नाही. कारण काहीही केले तरी माझाच शब्द खाली पडतो. मानवाने माझ्यावर खरेच कुरघोडी केली रे. तोच श्रेष्ठ रे. ॐ मानवाय नमः
ना: ब्रह्मा, याला paradox म्हणतात. मराठीत विरोधाभास, विरोधापत्ती. असे म्हणावे तर तसे असते, तसे म्हणावे तर असे असते. मानवाने तुला त्यात अडकवून स्वतःची सुटका करून घेतली. आणि तरीही आपण स्वतःलाच, म्हणजे देवांनाच सर्वशक्तिमान, omnipotent म्हणतो. काही अपवाद वगळता आजचा मानवही ते मुकाट्याने मानतो.
ब्र: अरे, पण मग तो तुझा ... तो कोण ... हा आपला ... म्हणजे हा नाही का रे ... काय त्याचे नाव ... अरे चार्वाक, तो चार्वाक देव सर्वशक्तिमान नाही असे कां सिद्ध करून दाखवीत नाही?
ना: ब्रह्मा, चार्वाकाने नाही पण त्याच्यासारख्याच एका मानवाने एकदा एका आस्तिकाला विचारले 'तुझा ब्रह्मदेव omnipotent असेल तर तो त्यालाही उचलता येणार नाही एवढा विशाल दगड निर्माण करू शकेल काय?'.
ब्र: नारदा, हे रे काय. मी जर असा दगड निर्माण करू शकलो तर म्हटल्याप्रमाणे तो मला उचलता येणार नाही. म्हणजे मी सर्वशक्तिमान, omnipotent नाही कारण मी एक साधा दगड उचलू शकत नाही. आणि मी जर असा दगड निर्माण करू शकलो नाही तरीही मग मी सर्वशक्तिमान नाही, कारण अशी एक गोष्ट आहे जी मी निर्माण करू शकत नाही. छे, हा पुन्हा paradox झाला. मी पुन्हा त्याच्या भोवऱ्यात गुरफटलो.
ना: आता कसें? तू नाही का मानवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात गुंतवून टाकले? जन्माला आला म्हणून मृत्यू अटळ, आणि आयुष्यात काही ना काही पाप केले म्हणून मृत्यूनंतर पुनर्जन्म अटळ. तेव्हा कशी मजा वाटते? यमराज, यमदूत, चित्रगुप्त, अठ्ठावीस नरक, अशा साऱ्या क्लिष्ट paradox मध्ये गुरफटवून तू मानवाची अशीच कोंडी नाही का करीत? ते कसे तुला पटते?
ब्र: अरे मी कुठे काही करतो? तुला माहीत आहे ही सारी त्याच्याच बांधवांची करामत आहे. त्याचीच कल्पना. आपल्याच कल्पनेत ते स्वतःच गुरफटले त्याला कोण काय करणार?
ना: असो. पण आता काय करायचे? जायचे का पिकनिकला? की कोडे सोडवत बसायचे? की paradoxes चा अभ्यास करायचा? तर्कशास्त्रातला फार आवडता विषय आहे तो. की जायचे दोघांनी अशा ठिकाणी जेथे कोणीही जाऊ शकत नाही?
ब्र: नारदा, तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!
ना: कां? आता काय झाले?
ब्र: अरे जेथे कोणीच जाऊ शकत नाही तेथे आपण कसे जाणार? आपण गेलो तर तेथे कोणीच जाऊ शकत नाही अशी ती जागा नाही. हा पुन्हा पॅरॅडाॅक्सच झाला. कधी तरी तू खरे बोलतोस का नारदा?
ना: ब्रह्मा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आणि आपल्याला मरण नाही. काय करावे? मी नेहमीच खोटे बोलतो हे मात्र खरे हं. खरे की नाही?
ब्र: नारदा, पुन्हा थांब. मला पुन्हा जरा विचार करू दे. तू स्वतःच एक पॅरॅडाॅक्स आहेस रे बाबा. अरे तू नेहमी खोटे बोलतो हे जर खरे असेल तर तुझे हे विधानही खोटे असायला हवे. म्हणजे तू नेहमीच खोटे बोलतोस हे खोटे आहे. म्हणजे 'मी नेहमीच खोटे बोलतो हे मात्र खरे हं' हे तुझे विधान खोटे आहे. तू कधी खरे बोलतोस, कधी खोटे बोलतोस असा अर्थ होतो तुझ्या विधानाचा. अगदी मानवांसारखा तू खऱ्याखोट्याची सरमिसळ करतो असा त्याचा अर्थ होतो. गोंधळवून टाकतोस रे बाबा. नारदा, मला पॅरॅडाॅक्सून टाकतोस रे बाबा तू. माझा वरचा मजला खाली आहे असे तुला वाटते की काय?
ना: नाही रे ब्रह्मा! सहज गंमत केली. थोडा खोल विचार केला तर वरपांगी जो अर्थ कळतो त्याच्या अगदी विरुद्ध खरा अर्थ असू शकतो. 'मी नेहमीच खोटे बोलतो हे खरे आहे' याचा खरा अर्थ 'मी नेहमीच खोटे बोलतो हे खोटे आहे' असा होतो. म्हणजेच 'खरे आहे' आणि 'खोटे आहे' चा अर्थ एकच. म्हणजेच खोटे म्हणजे खरे. तू नेहमी खोटे बोलत नाही असा तुझ्या म्हणण्याचा अर्थ होतो हे विचार केल्याशिवाय लक्षात येत नाही. बहुतांश लोकांना तू नेहमी खोटे बोलतो असाच अर्थ कळेल. 'मला बाकीच्यांसारखा गर्व नाही' असे कोणीही चिथवले नसतानाही जर कोणी म्हणेल तर त्याचा खरा अर्थ काय हे विचार करणाऱ्यांनाच कळेल. तसेच 'मी आस्तिक आहे' म्हणून विनाकारणच दवंडी पिटणारे काहीतरी लपवत आहेत असे सूज्ञांना कळते. असो. दिसते तसे नसते. आपण कशाला त्यात पडायचे?
जायचे का मग जेथे कोणी गेले नाही तेथे? की राहायचे इथेच तंबू ठोकून? मला तर जावे असेही वाटते, आणि इथेच रहावे असेही वाटते. पण आपण जाऊ तर नक्की कारण तसे मी तुला कबूल केले आहे. पण परत येणार असू तर जाऊ. पण खूप दूर जाणार आहो रे बाबा. एकदा गेल्यावर परत येणे नाही जमणार. ब्रह्मा तुला काय वाटते?
ब्र: डोके फोडून घ्यावेसे वाटते. पण नको. एकदा आधीही फुटले होते. तुझ्या जन्माचीच कथा आहे ती. तू माझ्या भालप्रदेशातूनच निघाला तेव्हा. आजचाच दिवस होता तो. वैशाख कृष्ण प्रतिपदा-द्वितीया. आज तुझा बर्थ डे आहे. Happy Birth Day बाळा. आज पुन्हा डोके फोडले तर दुसरा नारद जन्म घेईल. एकच आवरता आवरत नाही. नको रे बाबा दुसरा.
तू म्हणशील तेथे जाऊ. म्हणशील तसे करू. म्हणशील तेव्हा परतू. पण सरळ काय ते बोलत जा. कोड्यात नको. Paradox तर मुळीच नको. कोड्याला कमीतकमी उत्तर तरी असते. Paradox म्हणजे तर ... म्हणजे तर ... म्हणजे तर ...
ना: Paradox म्हणजे चाकोरीत अडकलेली ग्रामोफोनची रेकाॅर्ड. गोल फिरून पुन्हा सुई तिथेच येते. वर्तुळाचे टोक शोधण्यासारखे ते असते. बरे, ठीक आहे. आता no paradox. चल धर बोट. बघ मावळतीच्या सूर्याकडे. म्हण माझ्याबरोबर.....
ॐ मित्राय नमः
ॐ रवये नमः
ॐ सूर्याय नमः
ॐ भानवे नमः
ॐ खगाय नमः
ॐ पूष्णे नमः
ॐ हिरण्यगर्भाय नमः
ॐ मरीचये नमः
ॐ आदित्याय नमः
ॐ सवित्रे नमः
ॐ अर्काय नमः
ॐ भास्कराय नमः
आलो बघ आपण.
ब्र: नारदा, काय गर्मी रे! कुठे घेऊन आलास? आणि पाय कुठे टेकायचा? जमीन तर कुठे दिसत नाही. नुसते हवेत तरंगतो आहोत आपण. आणि काय हे तेज! माझे तर डोळे दिपले.
ना: ब्रह्मा, आपण सूर्यावर आलो आहोत. सूर्याचे आपण स्मरण केले आणि मी येथे येण्याची मनोमन इच्छा केली. बस्स, मग काय. मी इच्छास्थळी असल्यामुळे क्षणात आपण सूर्यावर येऊन पोहोचलो. मागेही तुला मी असेच बोट धरून वैजयंती कौस्तुभच्या लग्नाला अशोका हाॅटेलला घेऊन गेलो होतो. हा सूर्य त्यापेक्षा थोडा दूर आहे. हाॅटेल काकूंच्या घरापासून दोन किलोमीटरवर होते. सूर्य घरापासून पंधरा कोटी किलोमीटर दूर आहे एवढेच. आपल्या मनाचा वेग अनंत, infinite असल्यामुळे आपल्याला कुठेही पोहोचायला शून्य वेळच लागतो. क्षणार्ध. हे साधे काळ काम वेगाचे गणित आहे. काळ गुणा वेग म्हणजे अंतर. म्हणजे अंतर भागिले वेग बरोबर काळ. अंतर कितीही असले तरी आपला वेग अनंत आहे म्हणून आपल्याला कोठेही जायला लागणारा काळ जवळजवळ शून्य. आहे की नाही मज्जा!
ब्रह्मा, येथे सूर्यावर जमीन नाही. तापमान इतके ज्यास्त की सर्व काही वायुमय. इथले तापमान दीड कोटी म्हणजे १५०००००० डिग्री सेंटिग्रेड आहे. आपण नागपूरनगरीतून निघालो तेव्हा तिथले तापमान फारच फार तर पन्नास डिग्री सेंटिग्रेड असेल. काय आरडाओरडा करतात लोक! पाणी उकळते तेव्हा त्याचे तापमान शंभर डिग्री असते. इथले सूर्याचे तापमान त्यापेक्षा दीड लक्ष पट तरी नक्कीच आहे. कुलर सुद्धा वितळून त्याची वाफ होईल ब्रह्मा. म्हणून येथे जमीन, जल वगैरे नाही. फक्त वायू. आणि तेही फक्त उदजन आणि हिलीयम. दोन सगळ्यात हलके, तरल वायू. तेच राहू शकतात या तापमानावर.
ब्र: नारदा, पण या सूर्याचा तो एक चाकी रथ कुठे दिसत नाही. आणि आपण जंबुद्वीपावरून संध्याकाळी निघालो होतो. आतापर्यंत रात्र व्हायला हवी. पण येथे तर लख्ख उजेड आहे. हे कसे?
ना: ब्रह्मा, सूर्यावर रात्र नसते रे. उलट सूर्यामुळे पृथ्वीवर रात्र आणि दिवस होतात. ती स्वतःभोवती २४ तासात गिरकी घेते. ती गोल असल्यामुळे तिच्या अर्ध्या गोलात दिवस व अर्ध्यात रात्र असते. म्हणून सूर्योदय व सूर्यास्त होत असतात. खरे म्हणजे सूर्याला उदयास्त नाही. मी गिरकी घेऊन तुझ्याकडे पाठ फिरवली की मला तू दिसणार नाही. म्हणून तू नाही किंवा तू कुठे गेला असे होईल का?
ब्र: नारदा, हे मला नाही कळत रे. मी कोणाकडे पाठ केली काय अन् नाही केली काय. चार दिशांना चार तोंडे असल्यामुळे मला दिसत नाही असे काही नाही. पूर्वी तर डोक्यावर मला आकाशाकडे पाहणारे पाचवे तोंड पण होते असे म्हणतात. शंकराने, की भैरवाने ते छाटले असेही म्हणतात. असो. पण नारदा, तो सूर्याचा रथ, रथापुढे चालणारे ते साठ हजार ऋषी कुठे दिसत नाहीत रे.
ना: ब्रह्मा, आता काय सांगू? तसे काही नसते रे. ते फक्त भागवतात असते. भागवताचे मूळ नाव कल्पनाविलास होते. शाळांमधे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा असतात तशीच फार पूर्वी कल्पनाविलास स्पर्धा असायची म्हणे. आज शाळाशाळांमध्ये असते तशी तेव्हा अठरा गुरुकुलांमध्ये स्पर्धा व्हायची. काहीही खरे न लिहिता अफाट कल्पना करून जो सर्वात मनोरंजक असे कपोलकल्पित कथासाहित्य निर्मेल त्याचा सत्कार व्हायचा. कथांमधे काहीही खरे असले तर गुण कापायचे. त्या स्पर्धेतूनच अठरा महापुराणे निर्माण झाली. तुला आता आठवत नाही. पण तुझे गुरुकुल, माझे गुरुकुल सगळ्यांनीच भाग घेतला होता. मी नारद पुराण लिहिले होते. तू ब्रह्मपुराण. पहिला नंबर मात्र भागवतपुराणाचा आला. आपण तसे शुद्ध काल्पनिक कथानक नाही लिहू शकलो. सूर्याच्या रथाची, साठ हजार ऋषींची ही कथा त्या प्रथम पारितोषिक विजेत्या भागवतातलीच आहे. कल्पनारंजकता काय असू शकते त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भागवत आहे. त्याला तोड नाही. म्हणूनच तर आजही त्याचे वाचन होते. त्याद्वारे लोक कल्पित कथा लिहायला प्रवृत्त होतील व नवसाहित्यनिर्मिती करतील अशी अपेक्षा असते.
ब्रह्मा, सूर्यसत्य अगदी वेगळे आहे. हा आगीचा गोळा म्हणजे १४ लाख किलोमीटर व्यासाचे अखंड जळणारे आण्विक रिअॅक्टर आहे. आज यावर अंदाजे ९३ टक्के उदजन वायू व सात टक्के हीलियम वायु आहे. दोन उदजनाचे अणू एकमेकात सामावून एक हीलियमचा अणू तयार होतो व प्रचंड अणुशक्ती प्रकाश आणि उष्णतेच्या रूपात निर्माण होते. हाच प्रकाश व हीच उर्जा सतत पृथ्वीवर आणि इतरत्र सर्वत्र पोहोचते.
पाच बिलियन, म्हणजे पाच अब्ज, म्हणजे ५००००००००० वर्षांपूर्वी हा यज्ञ सुरू झाला. साडे चार बिलियन, म्हणजे ४५०००००००० वर्षांपूर्वी याच सूर्यावर स्फोट होऊन काही लहान मोठे तुकडे दूर फेकल्या गेले. दूर गेल्यामुळे ते वेगवेगळ्या प्रमाणात निवले. त्यातलाच एक निवलेला तुकडा म्हणजे पृथ्वी. तिथूनच आपण आलो. हे सारे तुकडे आजही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. ही सूर्याची पिल्लेच ब्रह्मा. मी जसा तुझा अंश तसे हे सारे तुकडे म्हणजे सूर्यांशच ब्रह्मा. आपल्याला इथून ते सारे दिसतील डोळे किलकिले करून पाहिले तर. पण त्यापेक्षा मी तुला तिथे प्रत्यक्षच घेऊन जाईन.
ब्र: हे फार म्हणजे ... अगदी म्हणजे ... हे म्हणजे ... अगदी हेच आहे रे नारदा. शब्दच अपुरे पडतात. थांब थोडा. जरा खंबीर होऊ दे मला. कुठल्या वणव्यात घेऊन आलास? दीड कोटी डिग्री सेंटिग्रेड! आण्विक आग! बापरे!
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः|
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मरुतः||
अच्छेद्योअ्यमदाह्योअ्यमक्लेद्
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोअ्यं सनातनः||
हं. आता जरा बरे वाटले. आपण केवळ कल्पना असल्याचा हा केवढा फायदा?आपल्याला काहीही होऊ शकत नाही. पण नारदा, हे सारे सूर्यगूढ मानवाला कसे कळले? पुराणात नाही तर त्याने ते कुठल्या दैवी ग्रंथात वाचले? कुठल्याच अपौरुषेय साहित्यात नसतांना हे कोडे त्याने कसे सोडवले? पुराणकथित भ्रमजालातून निघून हा सत्यवेध घेऊन असत्यभेद त्याने कसा केला?
ना: बुद्धी. ब्रह्मा, केवळ बुद्धी. निरीक्षण आणि परीक्षण ह्या त्याच्या ऋद्धीसिद्धीच म्हण. ज्ञान आणि विज्ञान हे त्याचे बाहू. त्यांच्या साह्याने त्याने सूर्यमंडळाचे गूढ उकलले. रात्र रात्र दुर्बिणीच्या साह्याने तो आकाशात बघत असे. हल्ली हल्ली तर तो पृथ्वीबाहेर, आकाशात आपल्या प्रयोगशाळा स्थापू लागला. अशाच एका प्रयोगशाळेचे नाव स्कायलॅब. तिच्या साह्याने त्याने सूर्याचे अध्ययन केले. म्हणून त्याला इतकी माहिती. म्हणून मलाही थोडीफार माहिती. ब्रह्मा, सूर्य इतका तापट की मानव किंवा त्याची प्रयोगशाळा त्याच्या आसपासही फटकू शकत नाहीत. जळून खाक होतील. पण हा मानव दुरूनच निरीक्षण करून इतके काही समजू शकतो की आज त्याला माहीत आहे की सूर्यही पृथ्वीसारखाच स्वतःभोवती फिरतो. पृथ्वी एक दिवसात गिरकी घेते, सूर्याला अंदाजे २७ दिवस लागतात. आज मानवाला हे माहीत आहे की सूर्यावरचा उदजन वायू संपून तो विझायला व निवायला किती काळ लागेल, तसे झाले तर पृथ्वीचे काय होईल, पृथ्वीवर जगणे कठिण झाले तर मानव कुठे जाऊ शकतो, वगैरे वगैरे. भूतकाळात काय झाले आणि भविष्यकाळात काय होऊ शकते याविषयी वर्तमान काळातला मानव नेहमीच चिंतन, संशोधन करीत असतो. म्हणूनच त्याच्या हाती सत्याचे कण हळूहळू जमत जातात. सत्याचा आणि पुराणांचा काहीही संबंध नाही हे त्याला कळत आहे. पण कळले तरी वळतेच असे नाही. पण कधीतरी वळेल हेही तितकेच खरे.
ब्र: नारदा, घरी असतो तर तू मला नक्की यूट्यूब वर सूर्याबद्दल काहीतरी दाखविले असते. पाहून जितके कळते तितके ऐकून वाचून कळत नाही रे.
ना: ब्रह्मा, अरे घरी गेल्यावर आपण बघूच. फार विस्मयकारक आहे सूर्याबद्दलची माहिती. ही आण्विक आग भविष्यात अधिकच प्रखर होत जाणार आणि सूर्य तापत तापत जाणार आहे. याचे तेज आणि उष्णता इतकी प्रखर होईल की पृथ्वीवर जीवजंतू राहणे अशक्यप्राय होईल. पृथ्वीच मृत होईल असे समज ना. पण त्याआधीच आजपेक्षाही अधिक प्रगत झालेली मानवजात सूर्यापासून दूर सूर्याच्याच एखाद्या दूरच्या पिल्लाकडे किंवा पिल्लाच्या पिल्लाकडे मुक्काम हालवेल. सूर्य मात्र आग पाखडतच राहील. पण कधीतरी त्याचेही इंधन, त्याचा उदजन वायू जवळजवळ संपत येईल. तसे झाले की हीलियम वायूचा तो गोळा पुन्हा थंड होत आकुंचन पावत लहान व्हायला लागेल. हीलियम वायूचे घनत्व एका सीमेपेक्षा ज्यास्त वाढले की हीलियमचे अणू एकत्र येऊन त्याचे कार्बन म्हणजे कर्बाचे अणू व्हायला लागतील. असे झाले की पुन्हा हा वणवा थोडाफार जागृत होईल आणि स्वतःच्याच उष्णतेने सूर्य प्रसरण पाऊ लागेल. तो दोनशे पट मोठा होईल आणि पृथ्वीला सुद्धा व्यापून टाकेल. त्याचेच पिल्लू पुन्हा त्याच्याच पोटात जाईल. प्रसरण पावत पावत सूर्य मोठा होऊन त्याचा बराचसा बाह्य भाग त्याच्यापासून दूर होईल. असे झाले की सूर्याचा उरलेला गोळा पुन्हा विझता विझता आकुंचन पावेल आणि सूर्य शेवटी विझेल. नंतरची काळोखी रात्र ... कल्पनाही करवत नाही. तसे होईपर्यंत सूर्याच्या साऱ्या कर्बाचा एक अतिविशाल हीरा, diamond तयार झालेला असेल. ब्रह्मा, सूर्य विझला तरी मानव दुसरीकडे कुठेतरी स्थानांतरीत झाला असेल. हे सर्व व्हायला आजपासून अंदाजे ६ अब्ज म्हणजे ६००००००००० वर्ष लागतील असा अंदाज आहे.
ब्रह्मा, हे सारे कल्पनातीत आहे. तरी पण ही पूर्वीसारखी निव्वळ कल्पना नाही. या अनुमानाला वैज्ञानिक पाया आहे. त्याचे गणित आहे. घरी गेलो की आपण ही लिंक बघू. तुला आवडेल.
https://m.youtube.com/watch?v=
पण आता सध्या माझे बोट धर.
ब्र: अरे व्वा! जरा धग कमी झाली. आणि पायाखाली जमीनही लागते आहे. बाकी हवा वगैरे अजिबात जाणवत नाही बरे. पण एकंदरीत बरे वाटते आहे जमीनीवर पाय ठेवायला. पण तो दूर दिसणारा शुभ्र गोल केवढा मोठा रे! पृथ्वीवरून दिसणारा सूर्यही एवढा मोठा नसतो.
ना: ब्रह्मा, आपण बुद्धी आणि वाणीचा अधिष्ठाता सूर्यपुत्र बुधाच्या घरी आलो आहोत. सूर्यापासून सगळ्यात जवळचा त्याचा तुकडा. हा सर्वात लहान ग्रह. जेमतेम पाच हजार किलोमीटर व्यास असलेला. सूर्याचा व्यास चौदा लक्ष किलोमीटर. तुलनाच करायची झाली तर सूर्य जर हजार तर हा फक्त तीन. म्हणजे याच्यापेक्षा सूर्य तीनशे पट मोठा. बुध एकदमच टिंगू चिंटू ग्रह आहे. आणि आकाशात दिसणारा तो मोठा गोल म्हणजे आपला सूर्यच रे. आपण जवळून बघतो आहोत म्हणून खूप मोठा दिसतो एवढेच.
ब्रह्मा, आपण सूर्यापासून सात कोटी किलोमीटर दूर आलो आहोत. जवळजवळ सूर्य आणि पृथ्वीच्या मधे आपण आलो आहोत.
ब्रह्मा, हा बुध एकदम मजेदार हं. याचे वर्ष याच्या दिवसापेक्षा लहान असते. याच्या एका दिवसात याचे दोन वर्ष सामावतात. म्हणजे याचे वर्ष याच्या अर्ध्या दिवसाचे असते.
ब्र: नारदा, पुन्हा तुझा पॅरॅडाॅक्स का काय तो सुरू झाला. अरे दिवसापेक्षा वर्ष लहान कसे असेल? मग एका दिवसातच दोन तीन वाढदिवस होतील.
ना: ब्रह्मा, तीच तर गंमत आहे. पृथ्वी चोवीस तासात स्वतःभोवती एक गिरकी घेते म्हणून तिचा दिवस चोवीस तासांचा. चोवीस तासात बारा तास उजेड अन् बारा तास अंधारी रात्र. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारायला तिला असे चोवीस तासाचे ३६५ दिवस लागतात. ते तिचे वर्ष. एका वर्षात तिचे उन्हाळा पावसाळा हिवाळा असे ऋतुचक्र. पण बुधाचे जरा वेगळे आहे. याला स्वतःभोवती फिरायला १७६ दिवस लागतात पण सूर्याभोवती फिरायला त्याच्या अर्धेच, म्हणजे ८८ दिवस लागतात. म्हणजे इथे आपण राहिलो तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरचे ८८ दिवस जातील व तेवढ्यात याचे हिवाळा उन्हाळा असे पूर्ण ऋतुचक्र आटोपेल. नंतर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत पुन्हा ८८ दिवस जातील आणि त्या एका रात्रीत पुन्हा एकदा पूर्ण ऋतुचक्र आटोपेल. म्हणजे इथे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत दोनदा हिवाळा उन्हाळ्याचे ऋतुचक्र अनुभवायला मिळेल.
ब्र: हं. पचायला जड आहे पण तू म्हणतोस तर खरेच असेल. पण तू उन्हाळा हिवाळा असेच ऋतुचक्र कां म्हणालास? पावसाळा कुठे गेला?
ना: ब्रह्मा, इथे वायु नाहीच. जल नाही, बाष्पही नाही. ढग नाही, पाऊस नाही. हा फक्त निर्वात निर्जल घन प्रदेश. इथे फक्त धातू आणि वाळूचे दगड असतात. बघ आकाशात कुठे ढग आहेत का. रात्रीपर्यंत थांबलो तर इतका गारठा पडेल की विचारू नकोस. पण आकाश मात्र निरभ्र राहील आणि तारे अगदी स्पष्ट दिसतील. आता तर कुठे सूर्योदय झाला आहे. म्हणशील तर थांबू सूर्यास्तापर्यंत. तिकडे पृथ्वीवर मात्र तोवर काळ ८८ दिवस पुढे जाईल. तीन महिने काळ पुढे गेलेला असेल.
ब्र: नको रे बाबा. केव्हा एकदा परत जातो असे झाले आहे. पण नारदा, इथे काही घरे वगैरेही दिसत नाही रे. नुसते मोठमोठे खड्डेच आहेत चहूकडे.
ना: ब्रह्मा, येथे जीवनपोषक तत्वे नाहीत. प्राणवायू नाही. पाणी नाही. जीवन नाही. नुसता निर्जीव टणक टापू. तापमान पण रात्री शून्याखाली १७० डिग्री तर दिवसा शून्यावर ४३० डिग्री. पण तरीही येथे मानव कधीतरी आपले अवकाशयान घेऊन येईल भविष्यात. बुधावरही मानवी पाउले उमटतीलच उमटतील. त्याचे मरायनर-१० नावाचे एक यान काही वर्षांपूर्वी बुधाजवळून गेले व बरेच फोटो काढून गेले. पुढे कधीतरी यायची तयारी दिसते.
ब्र: नारदा, खूप भयाण वाटते आहे रे. आपण बुधावर आलो असे तू म्हणालास तेव्हा असे वाटले की आपल्याला तो पुराणात सविस्तर वर्णन केलेला बुधदेव दिसेल. गौरकांती, पिंगलाक्ष, कुंतल केसांचा, हसमुख वगैरे वगैरे. पण येथे तर तसे काहीच कोणीच नाही.
ना: ब्रह्मा, जाऊ दे रे. जुना काळ होता तो. केल्या मानवाने कल्पना. जसा जसा काळ गेला तशा तशा त्या कल्पना केवळ पूर्वापार चालत आल्या आहेत म्हणूनच लोकांना सत्य वाटायला लागल्या. पण आता विज्ञानाने बराच अंधार दूर केला आहे. तरीही कोणी जुने तेच सत्य आहे म्हणेल तर त्या मूळ विद्वान कथाकारांचा काय दोष? ब्रह्मा, लहानथोरांच्या गोष्टीत भूत, पिशाच्च, वेताळ असतात. लहानपणी त्या गोष्टी अद्भुत वाटतात. अशा गोष्टींमुळे लहान मुलांना वाचनाची सवय लागते. त्यांचे कुतुहल जागे होते. जिज्ञासा प्रज्वलित होते. कल्पनाशक्ती वाढते. साहित्याची गोडी निर्माण होते. पण मोठे होऊन कोणी म्हणेल की त्याला खरेच भूत दिसले, ते निळ्या रंगाचे होते, वगैरे वगैरे, तर कोण काय करणार? सारेच मुसळ केरात. हा बुध ग्रह त्यांना बुद्धी देवो असे म्हणायचे आणि सोडून द्यायचे झाले.
ब्र: नारदा, इथे तर काही बदलतच नाही रे. आपण इतका वेळ येथे बोलत बसलो पण सूर्य आहे तिथेच आहे. काही केल्या वेळ जात नाही. शिवाय मानव नाही म्हणजे मजा नाही. जायचे का आपण घरी?
ना: ब्रह्मा, घाई काय? तिथे अजून रात्रच आहे. तांबडे फुटायच्या आधी जाऊ आपण. चहा मिळेल तुला काकाकाकूंकडे रोज सारखा. पुन्हा बोट धर बघू. हं. छान.
ब्र: अरे बापरे! काय हे? कोणीतरी आपल्याला चिरडून टाकत आहे असे वाटते. बुधावर हलके हलके वाटत होते. आणि आता गरम पण फार वाटत आहे. काहीतरी चुरचुरतं पण आहे. पण पायाखाली जमीन मात्र इथेही आहे. हे कुठे बरे आलो आपण?
ना: ब्रह्मा, आपण सूर्यापासून आणखी दूर आणि आपल्या घराच्या आणखी जवळ आलो आहोत. हे जे सूर्याचे पिल्लू, हा जो ग्रह त्याचे नाव आहे शुक्र. पृथ्वीवासीयांना याचे फार कौतुक आहे. याच्या केवळ दर्शनाने त्यांचे प्रेम उफाळून येते. हा जर आकाशात नसेल तर पृथ्वीवासी लग्नकार्य सुद्धा लांबणीवर टाकतात. सूर्य आणि चंद्र सोडले तर पृथ्वीच्या आकाशात दिसणारा हा सर्वात तेजोमय तारा. खरे म्हणजे तारा नाही. ग्रह म्हणायला हवे. सूर्यापासून जवळजवळ ११ कोटी किलोमिटर दूर आणि पृथ्वी पासून केवळ तीन साडे तीन कोटी किलोमीटर दूर हा आहे. पृथ्वीला सगळ्यात जवळचा ग्रह, पृथ्वीच्याच आकाराचा, पृथ्वी एवढाच वजनी असा ग्रह. म्हणून पृथ्वी आणि शुक्राला जुळ्या बहिणी म्हणतात. पण बाकी काही साम्य नाही रे बाबा. अगदी उत्तर आणि दक्षिण ध्रुवच म्हण ना.
ब्रह्मा, पृथ्वीवर वातावरणात २० टक्के प्राणवायू आणि ८० टक्के नत्रवायू असतो. बुधावर वातावरणच नाही. पण शुक्रावर मात्र ते आहे. पण इथली हवा म्हणजे ९७ टक्के कर्ब-द्वी-प्राणिद व ३ टक्के नत्रवायू. No प्राणवायू. आपण देव श्वासोच्छवास करीत नाही. आपल्याला त्याची गरज नसते. आपण अमर असल्यामुळे आपल्याला प्राण जपण्यास कुठला वायू वगैरे नको असतो. म्हणून आपण शुक्रावर आत्ता पाय रोवून उभे आहोत आणि प्राणवायूविना जिवंत आहो. मानव येथे अजून तरी आला नाही. भविष्यात तो नक्कीच येणार. पण तो त्याच्यापुरता प्राणवायू घेऊन येणार हे नक्की. नाहीतर तो गुदमरून मरेल बिचारा.
ब्रह्मा, इथला हवेचा दाब पृथ्वीवरच्या हवेच्या दाबापेक्षा जवळ जवळ ९० पटीने ज्यास्त आहे. म्हणून तुला कोणीतरी आपल्याला दाबून टाकत आहे, चिरडून टाकत आहे असे वाटते. पृथ्वीवरचा कोणीही प्राणी तर येथे हवेच्या दाबानेच चटणी होऊन जाईल. ब्रह्मा, आणखी येथे एक विचित्र प्रकार आहे. शुक्रावर पाणी नाही. उष्णताच इतकी की ते सारे पूर्वीच उडून गेले असावे. पण तरी पण ढग बघ किती दाट आहेत. ते अर्थातच पाण्याच्या वाफेपासून तयार झालेले नाहीत. ते गंधकाम्लाच्या, म्हणजे sulfuric acid च्या वाफेचे ढग आहेत. तापमान खूपच असल्यामुळे ते द्रवरूप घेत नाहीत. नाहीतर चक्क sulphuric acid चा पाऊस पडेल.
ब्रह्मा तू omnipotent आहेस, तर येथे जीवनिर्मिती करून दाखव. म्हणजे मग ते सारे नास्तिकही तुला मानतील. तुला काय अशक्य रे? तू काही अमीनो अॅसिड्स् पासून वगैरे जीव निर्मिती थोडीच केलीस. तू sulfuric acid पासूनही जीवनिर्मिती करू शकतो. शुक्राच्या गर्भात नुसते लोखंड व तप्त लाव्हा, जमीनीवर अनेक जिवंत ज्वालामुखी, वातावरणात कार्बन-डाय-आॅक्साईड, गंधकाम्लाचे आंबट ढग आणि चिरडून टाकेल असा हवेचा दाब आहे. कर येथे जीवोत्पत्ती आणि निर्माण कर शुक्रमानव. होऊन जाऊ दे प्रात्यक्षिक. तुझ्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्या चार्वाकांचे तोंड कायमचे बंद कर. मारून टाक त्या साऱ्या नास्तिकांना मेंदूच्या रक्तस्रावाने आणि होऊ दे एकदा आस्तिकतेचा महाविजय.
ब्र: नारदा, किती रे बोलतोस? अरे मी कधी वल्गना केली का की मी सृष्टिनिर्माता आहे म्हणून? मला नको रे ते खोटे श्रेय. मी तर एक कठपुतळी आहे. रंगमंचावरचे एक पात्र. सूत्रधार तो मानव आहे. पण नारदा, घरी केव्हा जायचे? की इथेच थांबायचे रात्रभर? उजाडले की जाऊ म्हणतो परत.
ना: ब्रह्मा, शुक्राचे पण बुधासारखेच आहे रे. याला स्वत:भोवती गिरकी घ्यायला अंदाजे पृथ्वीवरचे २४० दिवस लागतात. तोवर याची एक सूर्यप्रदक्षिणा पण होऊन जाते. याचेही वर्ष दिवसापेक्षा लहान. म्हणजे एका दिवसातच याचे सारे ऋतू पाहायला मिळतात. रोज सकाळी उन्हाळा, संध्याकाळी हिवाळा. काय मजा नाही? सूर्य जरा निवला तर रात्री गंधकाम्लाचा पाऊस सुद्धा पडेल पावसाळ्यात. किती छान वाटेल रे 'ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा' म्हणायला. पैसा खरेच खोटा होईल हं गंधकाम्लात बुडून.
ब्र: नारदा भीती वाटते रे. मी धरले तुझे बोट. कर घरी परतायची इच्छा. केव्हा एकदा आपल्या घरी जाईन असे झाले आहे. मला सूर्यमालेची अशी कल्पनाच नव्हती रे. भागवतात काही वेगळेच वर्णन आहे. प्रत्यक्षात वेगळेच.
ना: भागवतात कुठे सूर्यमालेचे वर्णन आहे? त्या काळी सूर्यमालेला मान्यताच नव्हती. पृथ्वी स्थिर होती आणि सूर्य वगैरे तिच्याभोवती फिरतो अशी धारणा होती. बुध, शुक्र, शनी, मंगळ, गुरू, चंद्र हेही सारे तारे होते.
ब्र: ते खरे. पण तरी ते आकाशात होते. ते सारे व्यक्तिस्वरूप होते व त्यांचा रंग, चेहरामोहरा, केस, डोळे यांचे वर्णन पुराणात आहे. त्या साऱ्यांशी परिचय असणाऱ्याने ते वर्णन केले असावे व ते सत्य असावे असा माझा समज होता. त्या सर्व ग्रहबंधूंबद्दल असलेला माझा गोड समज आज पार खोटा ठरला. डोळ्यात अगदी झणझणीत अंजन तू घातले. अंजन काय, सल्फ्युरिक अॅसिडच घातले म्हण ना! सत्य काय आणि माया काय हेच कळत नाही आहे.
ना: अरे मग त्यात काय एवढे? जे बदलते तेच ज्ञान. जी वाहते तीच गंगा. जसा जसा काळ जातो, तशा तशा रूढ समजुती बदलत जातात. किंबहुना बदलायलाही हव्या. तेव्हा हे सारे माहित नव्हते. नंतर कोपरनिकस, गॅलििलओ अशा जंबुद्वीपबाह्य मनुपुत्रांसारख्याच घडणीच्या द्विपादांनी सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह फिरतात हे बुद्धीला पटेल असे पुरावे देऊन प्रतिपादले. जुने ते सोने अशी मनाची घडण असलेल्यांना ते नाही पटले आणि त्या आस्तिकांनी हिंसेचा वापर करून हे नवे विज्ञाननिष्ठ मत खोडून टाकायचा आटोकाट प्रयत्न केला. पण कोंबडी आरवलीच. ब्रह्मा, हे सारे निर्भीक चार्वाक प्रत्येक काळात होते आणि आहेत म्हणून तर ज्ञान पुढे जाते. असो.
ब्र: नारदा, पण आता घरी जाऊ रे. हे कधीही न पाहिलेले विश्व, हे आकाशात आज धृवाभोवती न फिरता एकाच जागी खिळलेले सप्तर्षी, हे बाकीचेही ओळखीचे वाटणारे पण विचित्रच लुकलुकणारे स्थिर तारे, कुठेही न दिसणारा चंद्र आणि तो पृथ्वीवरून शुक्र दिसतो तसाच येथून टपोरा दिसणारा निळसर तारा. काही कळत नाही. काय झाले काय आकाशाला?
ना: ब्रह्मा, तुझे निरीक्षण खूपच दांडगे हं. सृष्टिनिर्माता नाही तरी उच्च कोटीचा प्रामाणिक वैज्ञानिक, चार्वाक तू नक्कीच होऊ शकतो. अरे आपण पृथ्वीवर नाही. पृथ्वी स्वत:भोवती एका दिवसात फिरते म्हणून तारे आकाशात वेगाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात असा भास होतो कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी गिरकी घेते. शुक्राला गिरकीला २४० दिवस लागतात. म्हणजे इथली रात्र सरायला तब्बल १२० दिवस म्हणजे चार महिने लागतील. तारे आकाश ओलांडून जायलाही तितकाच वेळ लागेल. आपण फारच फार तर एक दोन तास येथे उभे आहोत. तेवढ्यात ते बोटभर सरकलेही असतील पण आपल्याला ते जाणवले नाही. नुकतीच रात्र झाली होती आपण आलो तेंव्हा. रात्रभर, म्हणजे आणखी १२० दिवस थांबशील तर तारे चालतांना दिसतील. तसेच उद्या दिवसा सूर्याचेही होईल. चार महिने रात्र, चार महिने दिवस. येथे खरेच तू चातुर्मास झोपू शकतो. ब्रह्मा, जर आपण रात्रभर थांबलो तर तुझ्या लक्षात येईल की सप्तर्षी नेहमीसारखे डोके पुढे, शेपूट मागे असे न चालता शेपटानी कोणी मागे ओढावे असे आकाशातून जातील. कारण ब्रह्मा, शुक्र पृथ्वीसारखा पश्चिमेकडून पूर्वेकडे असा स्वत:भोवती न फिरता पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. उद्या दिवसभर थांबशील तर तुला जाणवेल की इथे सूर्य पश्चिमेला उगवतो व पूर्वेला मावळतो. सगळंच अजब. शुक्र आणि पृथ्वी बहिणी बहिणी म्हणतात पण अगदीच परस्पर विरोधी रे बाबा!
आणि ब्रह्मा, तो तुला दिसलेला टपोरा निळसर तारा म्हणजे पृथ्वीच आहे बरे! आपले घर!
ब्र: नारदा, मी काय बोलू रे! घराची ओढ काय असते ते मी आज पहिल्यांदा अनुभवतो आहे. मघापासून राहून राहून शांताबाई शेळकेंचे ते गाणे मनात रेंगाळत आहे.
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे
गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे
नारदा, समजा जीवोत्पत्ती शुक्रावर झाली असती व त्यातही एखादा प्राणी मानवासारखा बुद्धिमान निघाला असता तर त्यानेही आकाशाच्या अशा वेगळ्याच रूपावर वेगळ्याच कथा गुंफल्या असत्या का रे? त्या काल्पनिक कथातील पात्रे कालांतराने मग त्याचे नवे देव दानव झाले असते का रे? त्यांचे ते नवे देव मग असेच कल्पनेत पृथ्वीवर गेले असते का रे?
ना: व्वा ब्रह्मा. खरेच! एक नवेच वाङमय, एक नवाच ईश्वरवाद, नवे आध्यात्म जन्म पावले असते. कदाचित पावलेही असेल. आपण कदाचित इथलेच कोणी काल्पनिक ब्रह्म नारद असू आणि गेल्या वर्षी येथूनच पृथ्वीवर गेलो असू. व्वा! कल्पनेला पंख फुटले की तिची गगनभरारी चित्तथरारक व अनंतव्यापी असू शकते. पण तिच्या अनंत भरारीला पुरून उरेल असे हे अनंत विश्व आहे. या विश्वात आपण संचार करतो आहो.
पण ब्रह्मा, आता मलाही घराची ओढ आहे. तिकडे कुकूच्चकू अगदी होणारच असेल. परतावे असे वाटत आहे.
अरे, हे काय? आपण आलो देखील घरी. ब्रह्मा, मी इच्छास्थळी आहे हे क्षणभर विसरूनच गेलो रे. तू माझे बोट धरले होतेस म्हणून बरे. म्हणून तूही माझ्याबरोबर घरी आलास. नाहीतर मीच एकटा पोहोचलो असतो घरी. मग मी तुला कुठे शोधले असते एवढ्या मोठ्या विश्वात?
बापरे! कल्पनेने सुद्धा घाम फुटतो. नेमकी माझ्या वाढदिवशी ताटातूट झाली असती रे आपली. पुन्हा नको अशी भ्रमंती. मंगळ, गुरू, शनी, चंद्र सारे आज पाहायचा माझा मनसुबा होता. पाहायचे राहिलेच. पण ते असू दे. तुला मी दोन तीन लिंक्स् देतो. बघ सवडीने. काँप्यूटरवरच भेट घे साऱ्यांची.
https://m.youtube.com/watch?v=
https://m.youtube.com/watch?v=
http://planetfacts.org/
सूर्यमालेची बरीच माहिती घर बसल्या मिळेल. अद्भुताहून अद्भुत आहे. पृथ्वीला एकच चंद्र. पण काही ग्रहांना अनेक चंद्र. काय सुंदर ते दृश्य असेल तेथल्या आकाशाचे! आकाशात एकाच वेळी अनेक चंद्र विहरतांना दिसतील. कोणाची पोर्णिमा, कोणाची तीज. गणेशाचे पोट फाटले म्हणून आपला एक चंद्र हासला. तेथे फाटले असते तर सारी चंद्रसेना हासली असती. कोणा कोणाला काय काय शाप देईल तो? काही ग्रहांभोवती कंकणासारखी वलये! ब्रह्मा, वाच सारे. आणखीही सर्च कर. म्हणशील तर कधी जाऊ तिकडेही. पण आधी माझे बोट सोड आणि कपाळावरचा तो घाम पूस बघू. कां इतका भेदरलास रे?
ब्र: नारदा, नको रे बोट सोडायला लावू कधी. असाच चुकून मला सोडून कधी दूर निघून जाशील तर माझे काय होईल? तू माझी बुद्धी आहे. माझे डोके. मला अंतर देऊ नकोस रे. नारदा, मी तू आहे, तू मी आहे.
ना: ब्रह्मा, अरे हा पण पॅरॅडाॅक्स झाला की काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ तू तू आहे आणि मी मी आहेे असाही होतो का? 'मी तू आहे, तू मी आहे' मधे अद्वैताचा भास होतो. 'मी मी आहे, तू तू आहे' मधे द्वैत डोकावते. गोंधळवून टाकलेस रे तू बाबा. बसतो आता विचार करत पुढच्या वाढदिवसापर्यंत आणि शोधतो या वर्तुळाचे टोक.
_____________________