Saturday, 30 January 2016

गोष्ट अकरावी


ना: ब्रह्माजी, आज सकाळी सकाळी एवढे उदास कां हो? रात्री काही काँप्यूटरवर वाचनात आले की काय? की स्वर्गाची आठवण झाली?

ब्रह्मा: नारदा, तू माझे जे गणितब्रह्म म्हणून कौतुक करतो ते अगदी फोल आहे रे. साधी अंकमोजणी मला येत नाही.

ना: कां? काय झाले?

ब्र: नारदा, तुला आठवते, मीच तुला मानव वर्ष आणि ब्रह्मवर्षातला फरक समजावून सांगितला होता? तूही नंतर माझा एक सेकंद, म्हणजे ब्रह्मसेकंद, म्हणजे मानवांचे ९८६३० वर्षें असा हिशोब मांडला. गेल्या महिन्यातच मी दारावरचे जुने २ कालनिर्णय पाहून वर्षभरात किती दिवस असतात हे मोजले. प्रत्येक वर्षात ३६५ दिवस असतात हे मला कळले. पण काल नवीन कालनिर्णय दारावर पाहून सहज दिवस मोजून पाहिले तर ३६६ भरले. तीनतीनदा मोजले, पण आता ते ३६६च भरतात. कुठेतरी काहीतरी चुकते आहे. फार कुचंबणा होते आहे रे. कुठे लिहिता येत नाही. नाहीतर भानामती येईल. नुसतं तोंडी मोजता मोजता काहीतरी चूक होत असावी. मला त्याचीच खूप लाज वाटते आहे. ३६५ मधे एकची चूक म्हणजे तशी फार नाही. एक दिवस इकडे काय अन् तिकडे काय! पण चूक ती चूकच. व्हायला नको. माझ्याकडून लहानशी जरी चूक झाली तरी ती ब्रह्मचूक!

ना: ब्रह्मा, गणिताचे असेच आहे. लहानशी चूकही फार खुपते. तुझ्यासारख्या सुपरकाँप्यूटर कडून झाली तर ती अक्षम्य. इतरांनी दुर्लक्ष केले तरी गणितातली चूक स्वतःची स्वतःलाच खुपते. पण प्रयत्नाने अशा चुका दुर्मिळ होत जातात. आणि खरे म्हणजे, तुला आज जी चूक वाटते आहे ती चूक नाहीच मुळी. हे वर्षच ३६६ दिवसांचे आहे. २०१६ साल आहे हे. १६ म्हण वाटल्यास. साल जर चार ने भाग जाणारे असेल तर ते लीप वर्ष असते. म्हणजेच दर चार वर्षांनी असे होते. अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. एक महिन्यापूर्वीच ते सुरू झाले. दारावर नवे कालनिर्णय आले. पुढच्या वर्षी २०१७. ते पुनः ३६५ दिवसांचे राहील. पुढचे लीप वर्ष एकदम २०२०. ब्रह्मा तू खरे म्हणजे अभिनंदनास पात्र आहेस. लीप वर्ष आहे माहीत नसतांना तू कॅलेंडर वरून दिवस मोजून बरोबर ३६६ दिवस म्हणालास.

ब्र: हा. जीव भांड्यात पडला. चूक गणितात नव्हती. अज्ञानाची होती. आता ते अज्ञानही दूर झाले. आता २०, २४, २८, ३२, ३६, ४०, ४४, ४८, ५२, ५६, ६०, ६४, ६८, ७२, ७६, ८०, ८४, ८८, ९२, ९६, २१०० सारे लीप वर्ष. ३६६ दिवसांचे.

ना: ब्रह्मा, तुझा गणिताचा हुरूप खूपच बा. एकदम एकवीसशे सालापर्यंत पोहोचला पण. अरे, तोवर इथे खूप बदल झालेले असतील. बरेच नवे चेहरे येतील. २१०० सालात तू पुन्हा दिवस मोजशील आणि ३६६ न भरता ३६५च भरले म्हणून रडशील. म्हणून आताच सांगतो. २१०० साल लीप वर्ष नाही. २०९६ पण लीप वर्ष, २१०४ पण लीप वर्ष, पण २१०० मात्र नाही. आहे की नाही मजा?

ब्र: कठिण आहे बा. पृथ्वीवर हे नियम, आणि प्रत्येक नियमाला अपवाद फारच असतात बा. ठीक आहे. माझे ज्ञान आणखीन वाढले. २१००, २२००, २३००, २४००, २५००, २६००, २७००, २८००, २९००, ३००० लीपवर्ष नाहीत, चारने भाग जात असूनही. तसेच २००० पण लीप वर्ष नव्हते. उगीच आठवण झाली रे बाबा २००० ची. आपला स्वर्गातला काँप्यूटर क्रॅश झाला होता त्या Y2K
मुळे.

ना: हं. पुन्हा तुझा तो गणिताविषयीचा बालसुलभ  हुरूप. पण ब्रह्मा, २००० साली ३६६ दिवस होते. ते लीप वर्ष होते. पण २१००, २२००, २३०० लीप वर्ष नाही. पण २४०० लीप वर्ष राहील. २८०० पण. हे जे शताब्दी वर्ष आहेत ते लीप वर्ष नसतात. पण त्यातली ४०० वर्षांनी भाग जाणारी वर्षे लीप वर्ष असतात.

ब्रह्मा, हे सगळं गणित अशाकरिता की सूर्याला पूर्ण प्रदक्षिणेला पृथ्वी ३६५ दिवस न घेता ३६५ दिवस सहा तास घेते. दर चार वर्षांनी असे केले नाही तर प्रदक्षिणा पूर्ण करायला १ दिवस कमी असतांनाच ती पूर्ण झाली असे वाटेल. ब्रह्मा, पृथ्वीवरचे सारे ऋुतु सूर्यामुळे आहेत. प्रदक्षिणेच्या गणितात चूक व्हायला नको. चूक दुरुस्त केली नाही तर ती साठत जाईल. कालांतराने चूक खूप मोठी होईल. दिवाळी उन्हाळ्यात येईल. अन होळी पावसाळ्यात. म्हणून दर चौथ्या वर्षी चुकीची दुरुस्ती करतात. वर्षात एक दिवस जास्त घेतात.

पण ब्रह्मा, प्रदक्षिणा ३६५ दिवस सहा तासांऐवजी
३६५ दिवस सहा तास ९ मिनिटे घेते. त्याची दखल घ््यायला दर शंभरावे वर्ष लीप वर्ष नसते. पण तरीही थोडी चूक राहते म्हणून दर ४०० वे वर्ष लीप वर्ष असते. अरे हे लोक गणितच खातात. गणितच पितात. गणितच झोपतात. आपल्यासारख्या साध्या देवांची इथे फार कुचंबणा होते यांचे गणित पाहिले की.

ब्र: सगळं माझ्या डोक्यावरून, चारही डोक्यावरून, जात आहे. पण ठोकळ मानानी समजलं मला. मी म्हणजे ... अगदी म्हणजे ... हा म्हणजे ... काही असाच नाही काही.

पण बरं वाटलं ऐकून आणि हे लीप वर्षांच गणित समजून. माझी दिवस मोजण्यात चूक झाली नाही. माझा जीव खरेच भांड्यात पडला.

ना: अरे उचल उचल. नाहीतर प्रलय होईल. त्याच भांड्यात काकू दूध घेऊन तापवतील. मग जीव गुदमरेल. आणि मग जीव मुठीत घेऊन पळावे लागेल.

ब्र: नारदा, जीव मेटाकुटीला येतो बा तुझ्या या वाक्प्रचार आणि म्हणींनी. पण खरेच जायचे का रे पळत कोठे दुसरीकडे? आता इथे कंटाळा आला. पण नकोच. आता आपल्याला २४ तास काँप्यूटर मिळाला आहे. पुस्तकं पण आहेत. सपाटा लावू वाचनाचा आणि संपवून टाकू सारी पुराणे. एक नवीन चंद्रपुराण पण दिसलं काल मला सहज शोधता शोधता. विश्वोत्पत्तीची काही आगळी वेगळीच गोष्ट होती त्यात. पूर्ण वाचणे जमले नाही कारण गजर ऐकू आला व काँप्यूटर लगबगीने बंद करावे लागले. काका काकू आॅफिसमधे गेले की वाचीन म्हणतो. तू नारदपुराण वाचतोच आहेस. मीही ब्रह्मपुराण वाचीन म्हणतो. पाहीन काय लिहिले आहे माझ्यावर ते. चंद्रपुराण पण वाचीन.

ना: खरेच. ब्रह्मा, मी नक्कीच पूर्ण नारदपुराण वाचीन. अरे त्यात गणित आहे. ते तुला मला खूप कामी पडेल. तुला आता बेरीज करता येते. मोठमोठी गणिते सुद्धा तू मोजत मोजत सोडवतोस. पण गुणाकार जर आला तर तुझ्या बेरजा अधिक गतीने होतील. एका तोंडानी १० श्लोक, तर चार तोंडानी किती हे गणित तू दहा अधिक दहा अधिक दहा अधित दहा असे करतोस. सुपरकाँप्यूटर असल्यामुळे ते तू फटाकदिशी करतोस. पण गुणाकार आला तर तेच गणित दहा गुणिले चार करशील व चाळीस म्हणशील. लीप वर्षात किती तास विचारले तर तू चोवीस अधिक चोवीस अधिक चोवीस असे तीनशे सहासष्ट वेळा करतोस आणि सांगतोस. गुणाकार आला तर तीनशे सहासष्ट गुणिले चोवीस करशील. तसेच भागाकार हाही एक प्रकार आहे. तोही शिकायला पाहिजे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आला की तू निराकार असला तरी गणितात पक्का होशील. गणित हा मानवांचा वेद आहे. ही त्याची भाषा आहे.

ब्रह्मा, एक गणितच फक्त शाश्वत आहे. त्याची विधी बदलली तरी उत्तर बदलत नाही. तुझी तोंडे मोजली तर ती चार होती, चार आहेत व चारच राहतील. डोळे आठ होते, आठ आहेत, आठ राहतील. तोंडे चारा़ची पाच वा तीन होत नाहीत. डोळे आठाचे सात वा नऊ होत नाहीत. गणिताला ऊन पाऊस वारा बाधत नाही. गणिताला जन्ममृत्यू नाही. गणित निर्गुण निराकार आहे. गणित सनातन आहे. अजरामर आहे. गणित देव आहे.

काँप्यूटरवर मी नारदपुराण डाऊनलोड केले आहे. त्यामुळे इंटरनेट नसले तरी आपल्याला केव्हाही वाचता योईल. थक्क करेल असे या पुराणाचे काही अध्याय आहेत. छंदशास्त्रावरचे काही श्लोक काल आपण समजवून घेतलेच. तुला काल जांभई यायची भिती वाटली म्हणून काल आपल्याला थांबावे लागले. नाहीतर छंदाच्या गणितावरचे आख्यान पुढे वाचले असते. बघू जमले आज तर. आजही कापुसकोंड्याची गोष्ट नको. आज फक्त गणित पुराण! काय? कसा वाटतो विचार?

ब्र: गणितही तुला सनंदन ऋषींनीच शिकविले की काय? तू त्यांचा पट्टशिष्य दिसतोस.

ना: तसे नाही ब्रह्मा. मी फक्त कारणमात्र. मलाच सांगण्यात कदाचित काही संकेत पण असेल. भाषा, काव्य, गणित, विज्ञान हे चिरंतन ज्ञान आहे. सर्वांना मोक्ष देणारे. प्रगतीचे मूळ. तू निर्माण केलेले आदिविश्व प्रगतविश्व करण्याची ही साधने आहेत. आदिमानवाला प्रगतमानव याच गोष्टींनी केले. मला ही साधने शिकविली की मी त्यांचा तिन्ही लोकात प्रसार करीन असे त्यांना वाटले असावे. नाहीतर त्यांना तिन्ही लोकात वेगवेगळी शिबिरे आयोजित करावी लागली असती. त्यामुळे त्रिलोकसंचारी नारदाला ज्ञान दिले की तो ती ज्ञानज्योत सर्वत्र नेऊन ज्ञानविज्ञानाचा वन्ही पेटवेल व अज्ञानाची लंका भस्म करील अशी त्यांना माझी खात्री असावी. तसाही मी आगलाव्या म्हणून बदनाम आहेच. मग हा ज्ञानवणवा पेटवायला मीच योग्य शिष्य असे त्यांना वाटले तर त्यात वावगे काय? आणि तसाही मी म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... अगदीच काही ढ नाही.

ब्रह्मा मीही गणिताला खरेच मनोमन महत्त्व देतो. त्याला सबळ कारण आहे. मोराचा तुरा जसा शीर्षस्थानी शोभतो, नागमणी जसा फण्यावर सर्वात उच्चस्थानी विराजमान असतो तसेच गणिताचे.

यथा शिखा मयूराणां, नागानां मणयो यथा
तद् वेदांगशास्त्राणां, गणितं मूर्ध्नि वर्तते

अर्थात, जसे मोराच्या तुऱ्याचे, नागाच्या मण्याचे स्थान सर्वोच्च असते, तसेच वेदात व शास्त्रात गणिताचे स्थान सर्वोच्च आहे ब्रह्मा. वेदशास्त्र अभ्यासाकरिताही गणित हवे.

ब्र: नारदा, चल वाचू. पण मला समजेल का रे? मला आता ३६६ पर्यंत मोजता आले आहे. नारदा, असे अंक कुठपर्यंत असतात रे? त्यांचे पण काही शास्त्र आहे का?

ना: अरे असे काय म्हणतो? सव्वीस अक्षरांपर्यंतच अक्षरे कवितेच्या छंदात असतील तर १३४२१७७२६ प्रकारची वेगळी वृत्ते होऊ शकतात हे तूच मला फटाफट गणित सोडवून सांगितले होते. तुला पटकन गणित सुटते हे तुझ्याही लक्षात आले आहे. ब्रह्मा, पुराण लिहिणारे जे कोणी असतील त्यांनाही गणिताचे बरेच ज्ञान होते. नारदपुराणात तर खूपच गणित आहे. बाकी कापुसकोंड्याच्या गोष्टीही खूप आहेत म्हणा. पण वृत्तबद्ध संस्कृत श्लोकात सनंदन मुनी मला जे गणित शिकवत ते मी कधीच विसरू शकत नाही. आज ते गणित परम्युटेशन काँबिनेशन म्हणून शिकवितात. सोपे नाही. याशिवाय मोठमोठे आकडे, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, काय काय त्यांनी शिकविले. वृत्तांना त्यांचा ओळख क्रमांक कसा द्यायचा हे ही ते सांगायचे. प्रत्येत वृत्ताला एक युनीक आयडेंटिफिकेशन नंबर. तूही तेहतीस कोटी देवांना असे यूआयडी नंबर दिले असते तर किती छान झाले असते. तुझा रोल नंबर १. नंतर मग जसे जसे देव येत गेले तसे तसे त्यांना रोल नंबर देता आले असते. स्वर्गाचे काँप्यूटरायझेशन करायचे राहूनच गेले. चित्रगुप्त करू शकला असता. पण त्याला तू कोण डास मारतो, कोण ढेकूण मारतो त्याचा हिशोब ठेवायचे काम दिले. त्याच्यासारख्या हुशार मेधावी मुलाला तू त्याच्या सुप्त प्रतिभेनुसार काम दिले असते तर आज चित्र वेगळे असते. पृथ्वीवर बघ कशी प्रगती केली या लोकांनी.

ब्र: नारदा, असेच जर गणित शिकवशील तर मी नापास होईन रे. तू काय म्हणतो आहेस हे एक अक्षर कळले नाही मला. अरे कंदमूळ ऐकले होते. आता हे वर्गमूळ, घनमूळ नवीन खूळ काय? आत्ता कुठे मंदाक्रांता वृत्तातलं ते 'शांताकारम् भुजगशयनम्' मला पाठ झालं. पण तू आता ते गुणाकारम् भागाकारम् म्हणायला सुरुवात केली. कितीही शिकावे तरी तू सुरू झाला की मला गंध नसलेले काहीतरी सांगतो. गंधातला अनुस्वार काढू नकोस रे. अरे जरा समजेल असे सांग. आधी मला हे सांग, आजचे संकीर्तन काव्यावर आहे की गणितावर?

ना: अरे असे नाही सांगता येत. कवितेत गणित आहे. गणितात कविता आहे. गणित म्हणजे दशाक्षरी कविताच बरे. गणिताची दहा अक्षरे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य. हे दहा आकडे गणिताची मूळाक्षरे आहेत. दहा मूळाक्षरांची ही भाषा. 'उद्या लग्न आहे' मधे गणिताला यामुळेच भाषुली म्हटले आहे.

दहा अंक मूळाक्षरे ऐसि भाषा
किती छोटि भाषा, तिच्या बोटि भाषा
कशी छोटुली सानुली बाहुली ही
जणू बाकि भाषा, असे भाषुली ही

असे नाव या भाषुलीचे गणीत
हिच्या व्याक्रणाची निराळीच रीत
जरी अक्षरे मोजकी, शब्दनंत
जशी अक्षरे हाति हाता धरीत

कधी अंकबेरीज विश्वास ग्रासी
वजाबाकिने सर्व जाई लयासी
गुणाकारि साकारते विश्वरूप
अभागी असे भाग हा कंसरूप

हीच भाषुली मला सनंदन ऋषींनी शिकवली. हीच आज आपण शिकू. ऐक तर श्लोक. अनुष्टुप्.

उत्पत्तिलक्षणं चैव सर्वं संक्षेपतो ब्रुवे
एकं दश शतं चैव सहस्रायुतलक्षकम्

प्रयुतं कोटिसंज्ञां चार्बुदमब्जं च खर्वकम्
निखर्वं च महापद्मं शंकुर्जलधिरेव च

अंत्यं मध्यं परार्धं च संज्ञा दशगुणोत्तराः
क्रमादुत्क्रमतो वापि योगः कार्योंत्तरं तथा

ब्र: ऐकायला छान वाटल. पण अर्थ?

ना: ब्रह्मा, कुठेतरी लिहिल्याशिवा़य हे नाही रे समजवता येणार. ह्या फळ्यावर लिहिता येईल. पण नंतर आठवणीने पुसायला हवे. नाहीतर पुनः ये रे माझ्या मागल्या. भानामती.

ब्र: नारदा, तू लिहीत जा, बोलत जा. मी ऐकत जातो, वाचत जातो, पुसत जातो. माझ एक तोंड मी काकाकाकूंच्या खोलीकडे ठेवतो. दार वाजलं की फळा साफ करून गिडीगुपचुप.

ना: बघ रे बा. काही झाले तर माझ्यावर नाव नको. नाहीतर थोडा थांब. हे लोक आता आॅफिसला जातील. मग आपल्याला रान मोकळं. संध्याकाळ पर्यंत मग नुसतं गणित. नुसतं पुराण.

ब्र: बरे बाबा. गेलेच बघ ते लोक. दार ओढल्याचा आवाज झाला. आता संध्याकाळपर्यंत आपल्याला रान मोकळे. करा सुरू नारद कोचिंग क्लासेस.

ना: ब्रह्मा, बऱ्याच जणांना गणिताची खूप भीती वाटते. बाकी विषयात चांगले असूनही बरेच शाळकरी विद्यार्थी गणितात नापास होतात. तुला आठवते तू मास्तरांच्या शाळेत गेला असतांना बाईंनी मुलांना अंकज्ञान किती सुंदर रीतीने दिले होते. त्याचा उल्लेख अर्नाळपुराणात पण आहे.

ब्र: हो, आठवते मला. अर्नाळ पुराणातले ते श्लोक तर मला तोंडपाठ आहेत.

एक नाक, अन् दोन नेत्र, दत्ताला तोंडे तीन पहा
चार हात गणपतीस, बोटे हाताला तव पाच पहा
सहा ऋुतूंचे चक्र, सात घोड्यांचा रथ हो सूर्याचा
आठ हात जगदंबेला, नऊ दिवसांचे नवरात्र पहा

ब्रह्मा वाटे मौज शिकवणे पाहुन खेळीमेळीचे
अंक लिहूनी, चित्र फळ्यावर दत्त गणपती देवीचे
बाई लिहिती दहा, विचारिती 'दहा काय' त्या बाळांना
राम उठोनी सांगे 'तोंडे दहा रावणा' बाईंना

ना: ब्रह्मा, शाळेतून आल्यावर तू बराच वेळ हाताच्या दहा बोटांवर अंक मोजायचा. पण पुढे जाऊन मुलामुलींना तेच गणित कठिण वाटते रे.

बहुभिर्प्रलापैः किम्, त्रयलोके सचरारे
यद् किंचिद् वस्तु तत्सर्वम्, गणितेन् बिना न हि

ब्रह्मा, कितीही प्रलाप केला तरी काय फायदा? चराचर जगामधे अशी एकही गोष्ट नाही जी गणिताधारीत नाही, किंवा जिला गणिताशिवाय समजले जाऊ शकते. म्हणून गणिताचा अभ्यास आवश्यक. चला, सुरू करू. संपल्यावर मात्र फळा साफ पुसायचा. जमिनीवर पडलेला खडूचा भुरका केरसुणीने गोळा करून बाहेर कुठेतरी फेकायचा. बागेतल्या सीताफळाच्या झाडाच्या बुंध्याशी नको. काकूंची नजर घारीची आहे. त्यांना संशय येईल. केरसुणी पण जिथून घेतली तिथेच ठेवायची. तशीच ठेवायची जशी आधी होती. ही सर्व काळजी घ््यायला हवी. नाहीतर भानामती. पुन्हा ती काकाकाकूंचे डोके खाईल. मांसाहारी कुठली! कधी हाती आली तर सरळ कुंभीपाक नरकात धाडीन तिला.

ब्र: बरे. शिकव पुढे. पण आधी त्या सनंदन ऋषींच्या श्लोकांचा अर्थ सांग.

ना: ब्रह्मा, नारदपुराणातला हा अध्याय तसा गणितावर नाही. ग्रहांचा वेग व स्थिती, दिवस, तिथी, वार, नक्षत्र, लग्नमुंजीचे मुहूर्त, इतर गोष्टींचे, जसे बारसे, गृहप्रवेश यांचे शुभमुहुर्त, इत्यादींचे निर्णय घ््यायला आवश्यक असणारे गणित सनंदन ऋषी मला शिकवितात. एक, दश म्हणजे दहा, शत म्हणजे शंभर, सहस्र म्हणजे हजार, अयुत म्हणजे दशहजार, लक्ष, प्रयुत म्हणजे दशलक्ष, कोटि, अर्बुद म्हणजे दशकोटि, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, जलधि, इत्यादि संख्यावाचक शब्द आहेत. आधीच्या पेक्षा पलिकडचा दहापट, त्यापेक्षा त्यापलिकडचा दहापट असे ते चढत्या क्रमाने दहा दहा पट होत गेले आहे असे सनंदन ऋषी म्हणतात.

ब्रह्मा, आता तुझी परीक्षा. तुला आठवतो तो भानामतीचा दिवस? तू एक संख्या लिहितांना शेवटचे दहा शून्य काकूंच्या टेबलवर उमटले आणि हाहाकार झाला ते? ती संख्या म्हणजे तुझे आयुष्यमान होते. तुझे आयुष्य शंभर ब्रह्मवर्षे आहे. ते मानववर्षात किती होईल हे सांगणारा तो आकडा होता. सांग तो आकडा.

ब्र: ३११०४००००००००००. ३११०४ वर दहा शून्य. दहा रावणाची तोंडे. त्याच्यासाठीच तर मग युगद्वारप्रहरी यज्ञ करावा लागला या लोकांना. काय ते हुशार गुरुजी! काहीतरी शिशीतले द्रव्य लावून त्यांनी रावणाची तोंडे मिटवली. आव मात्र यज्ञाचा आणला आणि काकाकाकूंना खर्चात पाडले. नंतर मी गूगलवर शोधले तेंव्हा कळले की त्या औषधाला इंक रिमूव्हर म्हणतात. आधी माहीत असते तर मीच पुसून टाकले असते त्या रावणतोंडांना.

ना: अरे ते जाऊ दे. जे झाले ते झाले. झाले गेले गंगेला मिळाले. म्हणून तर गंगा इतकी घाण. पण तू आता मला तुझे आयुष्य किती आहे ते शब्दात सांग बघू.

ब्र: त्यात काय एवढे. तीन जलधि एक शंकु एक महापद्म शून्य निखर्व चार खर्व शून्य अब्ज शून्य अर्बुद शून्य कोटि शून्य प्रयुत शून्य लक्ष शून्य अयुत शून्य सहस्र शून्य शत शून्य दश शून्य एक. म्हणजेच ३११०४००००००००००. हासायला काय झाले? चुकले की काय?

ना: तसं नाही रे. पण ही यंत्रमानवासारखी पद्धत झाली. तू मानव निर्मिती केलीस. तो इतका प्रगल्भ झाला की त्याने यंत्रमानव निर्मिती केली. तो इतका पुढे गेला की आता तू त्याची बरोबरी करू पाहतोस. म्हणून जरा गंमत वाटते. आपणही आता यंत्र झालो की काय असे वाटते. यंत्राला जसे तेल पाणी देऊन फिट ठेवावे लागते, वर्षाकाठी डागडुजीकरिता मेंटेनंस शटडाऊन घ््यावा लागतो, दसऱ्याचे निमित्त करून पूजा करावी लागते तसेच आपलेही होते आहे. आपल्या नावाने पण एखादी पंचमी षष्ठी करून लोक वर्षभर आपण त्यांचे काम करावे अशी अपेक्षा करतात. आपलाही पोळाच असतो. आपणही आता मानवनिर्मित यंत्रासारखे वागतो असा विचार मनात आला म्हणून गंमत वाटली.

ब्र: नारदा, तू अगदी गोंधळी आहेस रे बाबा. अगदी गोंधळून टाकतोस. आपण मानवनिर्मित कल्पना आहोत हे मला जवळजवळ पटले असतांना आता तू आपण मानवनिर्मित यंत्रच की काय असे म्हणतो. मलाही आता थोडफार कळायला लागलं आहे हे पृथ्वी प्रकरण. मला नाही वाटत यंत्र अदृश्य असू शकतं. पण असेलही बाबा. मनुपुत्र काय काय चमत्कार करेल ते तोच जाणे.

ना: ब्रह्मा, अरे, हे खरेच काहीही करू शकतात. तू रोज पाहतोस काकांनी दुरून बटन दाबले की टी. व्ही. बंद होतो. म्हणजेच कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांच्या हातातून सुटून, टी. व्ही. पर्यंत जाऊन तो बंद करीत असेलच की नाही? म्हणजे अदृश्य यंत्र असतीलच की नाही? मानव आज सर्व काही करू शकतो जे फक्त आपण देवच करतो अशी त्याने कल्पना केली होती. म्हणजे एकंदरीत आपण त्याची कल्पना नाही, त्याचे ध्येय होतो. त्याच्या प्रयत्नांनी त्याला ध्येयप्राप्ती अटळ आहे. मानव देवपण प्राप्त करणार आहे.

बरे ते असू दे. ब्रह्मा, मी हासलो त्याला आणखीही एक कारण आहे. तू शब्दात सांगतांना प्रत्येक शून्य कोणत्या जागेवर आहे हेही सांगितलेस. उदाहरणार्थ १००० म्हणजे शब्दात किती ते सांगतांना तू एक सहस्र शून्य शत शून्य दश शून्य एक असे म्हणशील. त्याऐवजी फक्त एक सहस्र म्हटले तरी चालते. कारण शून्य कुठेही उभे राहिले तरी शून्यच. त्याची दखल घेण्याची काही गरज नाही. तू आज एखाद्या शाळकरी मुलाला विचारशील तर तो तुझे आयुष्य एक जलधि अकरा महापद्म चार खर्व असे सांगून मोकळा होईल. मानवांना आयुष्य कमी म्हणून की काय, पण ते विनाकारण पाल्हाळ लावत नाहीत. थोडक्यात, संक्षिप्त, त्रोटक हे त्यांचे मूलमंत्र आहेत. फटाफटयुग आहे हे. तुझे माझे बरे आहे. वेळच वेळ. माशा मारत बसलो तर त्याही संपून जातील पण आयुष्य संपणार नाही. मग मुंग्या माराव्या लागतील. असो.

ते राहू दे ब्रह्मा. आता मला सांग दिवसांमध्ये मोजले तर तुझे आयुष्य किती दिवस? वर्षाकाठी तीनशे पासष्ट दिवस धर. लीप वर्ष वगैरे सोड. शब्दात सांग.

ब्र: ११३५२९६००००००००००० दिवस म्हणजे एक हजार एकशे पस्तीस जलधि एकोणतीस महापद्म साठ खर्व. इतके दिवस माझे आयुष्य.

ना: बरोबर. आता तुला पृथ्वीवासी म्हणायला हरकत नाही. पण तू हे केले कसे? इतक्या लवकर?

ब्र: जसे कालनिर्णयवर दिवस मोजले तसेच. मोजत गेलो, मोजत गेलो, मोजत गेलो, मोजत गेलो, मोजत गेलो, मोजत गेलो, मोजत ...

ना: पुरे पुरे. ब्रह्मा, तू खूपच निरागस आहेस रे. तुझे गणित चुकत नाही हे खरे, पण एवढे मोठे गणित असे सोडवायचे नसते. बेरीज करायची. गुणाकार करायचा. सनंदन ऋषींनी हे मला शिकवले. ब्रह्मा, पूर्ण वर्षाचे दिवस एक दोन तीन असे मोजत जाण्यापेक्षा तू आधी पहिल्या पानावरचे मोजले असते तर एकतीस भरले असते. मग दुसऱ्या पानावरचे मोजले तर एकोणतीस भरले असते. मग तिसऱ्या पानावर पुन्हा एकतीस, चौथ्यावर तीस असे बाराही पानांवरचे दिवस मोजायचे. मग त्या बारा संख्या एकाखाली एक लिहायच्या व बेरीज करायची. ती कशी करायची हे नारदपुराणात आहे. बघ मी करून दाखवतो.

ब्र: अरे वा! हे तर खूपच सोपे झाले. एकाखाली एक लिहायचे व उजवीकडून डावीकडचे अंकस्तंभ मोजत मोजत जायचे. व्वा! किती सोपे झाले.

ना: ब्रह्मा, असे केले असते तर तू आज सकाळी इतका खिन्न झाला नसता. दुसऱ्या पानावर मागच्या वर्षी अठ्ठावीसच दिवस होते. यावर्षी एकोणतीस आहेत. तिथेच तुला तो एकचा फरक लक्षात आला असता. लीप वर्षात फक्त दुसऱ्या महिन्यात, म्हणजे फेब्रुवारीत, एक दिवस वाढतो. बाकी महिने तसेचे तसे.

आता आपण गुणाकार शिकू. तुझे आयुष्य दिवसात किती हे काढतांना तुला वर्षांना फक्त तीनशे पासष्टने गुणायचे. बघ.

ब्र: अरे हे तर खरेच सोपे आहे. तुझे सनंदन गुरुजी म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

ना: असेच वजाबाकी, भागाकार पण मला त्यांनी शिकवले.

गुण्य गुणक गुणाकार
भाज्य भाजक भागाकार

म्हणत म्हणत हे अंकगणित केंव्हा अंगवळणी पडले ते कळले पण नाही. नंतर मग वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ. अंकगणिताचा महासमुद्र त्यांनी मला दाखवला. या समुद्राला तळ आहे की नाही ते मला माहीत नाही. पण त्यात रत्नांचा मोठा साठा आहे, तो मी मिळवावा अशी त्यांची इच्छा असावी. ब्रह्मा, आजही पृथ्वीवर शाळाशाळातून ह्या अंकगणित नामक समुद्राचे मंथन अव्याहत सुरू असते. ह्या रत्नाकरातून रत्नामागून रत्न अजूनही निघत असतात. 'अनंत हस्ते कमलाकराने । देता किती घेशिल दो कराने ।।' असे हे अंकगणित.

ब्र: नारदा, हीच का रे ती समुद्रमंथनाची गोष्ट जी तू मला सांगीन सांगीन म्हणत होतास?

ना: नाही रे. ती कापूसकोंड्याची गोष्ट आहे. ती वेगळीच. ती नंतर कधी सांगीन. मला खूप आवडते. पण गणिताची आणि विज्ञानाची चटक लागलेल्या ब्रह्माला आता पुराणातल्या कापूसकोंड्याच्या गोष्टी आवडतील की नाही हा एक मोठाच प्रश्न आहे. असो.

ब्रह्मा, आता मी फळ्यावर हा एक त्रिकोण काढतो बघ. याच्या दोन बाजू एकमेकाशी काटकोन करतात. या दोन भिंतींमधला कोन बघ. किंवा फळ्याचा हा आडवा आणि उभा काठ बघ. त्यांच्यातलाही कोण किंवा कोन काटकोन आहे. काठांमधला कोन म्हणून काठकोण, काटकोन.

ब्रह्मा, आता मी माझ्या डावीकडचे फळ्याचे वरचे टोक आणि माझ्या उजवीकडचे खालचे टोक जोडणारी एक रेष खडूनी काढतो. डावीकडचा काठ पण थोडा खडूनी पांढरा करतो. खालचा काठ पण. ब्रह्मा, या पांढऱ्या आकृतीला किती टोके आहेत सांग बरे.

ब्र: तीन.

ना: आणि किती बाजू?

ब्र: तीन.

ना: हं. म्हणून अशा आकृतीला त्रिकोण म्हणतात. एक कोण काटकोण आहे म्हणून काटकोण त्रिकोण म्हणतात. त्रिभुज पण म्हणता येईल याला.

ब्र: हं. म्हणजे फळा चतुर्कोण. माझा भाऊच शोभतो. आणि तुझ्या त्या आडव्या रेषेनी फळ्याचे दोन त्रिकोणात विभाजन झाले नारदा.

ना: छान ब्रह्मा. चतुर्कोण नाही, पृथ्वीवर चौकोन म्हणतात. अर्थ तोच. चतुर्भुज पण म्हणता येईल. आणि त्याचे चारही कोण काटकोन आहेत म्हणून त्याला काटकोन चौकोन म्हणतात.

ब्रह्मा, सध्या फक्त ह्या त्रिकोणाकडे लक्ष दे. याच्या तीनही बाजूंना नावे आहेत. हा उभा काठ म्हणजे भुजा. हा खालचा आडवा काठ म्हणजे कोटि. आणि ही तिरकी बाजू म्हणजे कर्ण. हा त्रिकोणाचा कर्ण म्हणजे या चौकोनाचा पण कर्णच म्हणतात. या कर्णानी चौकोनाचे दोन त्रिकोण केले. समजले?

ब्र: होय नारदा. मला कर्ण हे नाव पण आवडले. खालचा त्रिकोण म्हणजे पांडव. वरचा त्रिकोण म्हणजे कौरव. हा दोघांच्यामधली रेघ. म्हणावे तर कौंतेय म्हणून पांडवांचा, म्हणावे तर दुर्योधन मित्र म्हणून कौरवांचा. म्हणून कर्ण.

ना: ब्रह्मा, तू खरेच कवी रे बाबा. जे न देखे रवी, ते देखे कवी. नारदपुराणात सुद्धा काटकोन चौकोनाचा कर्ण व महाभारतातला कर्ण यांतील हे साम्य कोणी अधोरेखांकित केले नाही. लोकांच्या आवडत्या भागवत पुराणात तर नाहीच नाही कारण त्यात गणितच नाही. पण मला आवडली हं कर्ण नावाची ही मीमांसा. छान. लिही भ्रमरपुराणात यावर एखादा अध्याय. चौकोनाचा कर्ण आणि राधेय कर्ण यांची द्विधा मनस्थिती. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. पण आता नको. आता त्रिकोणमीति. नारदपुराणात अंकगणिताप्रमाणेच त्रिकोणमीति पण आहे. हा गणिताच्याच एका अंगाचा, भूमितीचा भाग आहे.

तर ब्रह्मा, एक काम कर. ती टेबलवरची पट्टी घे. फूटपट्टी म्हणतात याला. हिची लांबी एक फूट आहे म्हणून. ती घेऊन मोज बरे या त्रिकोणाची भुजा किती लांब आहे ते. ये असा. हं, मोज आता.

ब्र: हा खालचा आडवा काठ चार फूट आहे. हा उभा काठ तीन फूट आहे.

ना: छान. बरोबर. ब्रह्मा, मला सनंदन ऋषींनी शिकविले की काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी जर माहीत असेल तर तिसऱ्या बाजूची लांबी गणिताने कशी काढायची? ते मी आता तुला सांगतो.

भुजकोटिकृतियोगमूलं कर्णश्च दोर्भवेत्
श्रुतिकृत्यन्तरपद कोटिर्दोः कर्णवर्गयोः
विवरात्तत्कर्णपदं क्षेत्रे क्षणे त्रिचतुरस्त्रके
राश्योरन्तरवर्गेण द्विघ््ने घाते युते तयोः
वर्गयोगोऽथ योगान्तन्तिर्वर्गान्तरं भवेत्
व्यास आकृतिसंक्षुण्णो व्यासास्यात्परिधिर्मुने

ब्र: खूप छान! अगदी छान समजलं. तू म्हणालास की पुरणपोळीत जायफळ नसेल तर मजाच येत नाही.

ना: अर्थ सांगणारच होतो ब्रह्मा. गणित म्हटलं की तुझा उतावीळपणा फारच वाढतो बा. ब्रह्मा, ऋषी म्हणतात की काटकोन त्रिकोणाच्या भुजा आणि कोटीच्या वर्गाचा योग, म्हणजे बेरीज, कर्णाच्या वर्गाबरोबर असते. तसेच कर्णाच्या वर्गाचे आणि एका बाजूच्या वर्गाचे अंतर, म्हणजे, दोघातील फरक, दुसऱ्या बाजूच्या वर्गाबरोबर असते. हा सिद्धांत काटकोन त्रिकोण आणि काटकोन चौकोनाला लागू आहे.

ब्रह्मा, एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे त्याच संख्येला तिनेच गुणले असता जी संख्या येते ती. सांग बघू आपल्या त्रिकोणाच्या आपण मोजलेल्या बाजूच्या लांबीचे वर्ग आणि त्यांची बेरीज.

ब्र: आडवी बाजू चार फूट लांब. तिचा वर्ग सोळा. उभी बाजू तीन फूट लांब. तिचा वर्ग नऊ. सोळा आणि नऊ पंचवीस. म्हणजे कर्णाच्या लांबीचा वर्ग पंचवीस. पण मग कर्णाची लांबी किती?

ना: ब्रह्मा हे तर तुला सोपे आहे रे. अशी कोणची संख्या आहे जिला तिनेच गुणले तर पंचवीस येतील?

ब्र: पाच. म्हणजे कर्णाची लांबी पाच. मी मोजून बघतो. एक, दोन, हे झाले तीन, चार, अन् हे पाच. अरे, खरेच पाच फूट भरली. सनंदन ऋषींचा सिद्धांत खरा ठरला.

ना: ब्रह्मा, शाळांमध्ये हा सिद्धांत पायथ्यागोरस नावाच्या अडीच हजार वर्षांपूर्वीच्या गणितज्ञाच्या नावाने ओळखला जातो. पायथ्यागोरसचे प्रमेय. शाळेच्या  कोणत्याही मुलाला मुलीला विचार. पटकन उत्तर देतील. 'उद्या लग्न आहे' मधे पण याचा उल्लेख आहे. पायथ्यागोरसचे हे प्रमेय सिद्ध करणे आजही शाळकरी मुलांना शिकविले जाते.

अता खेळ नाही, मुळी वेळ नाही
अता काळ कामास वेगाचि घाई
अता पायथ्यागोरसाचे प्रमेय
कधी सिद्ध नाही, कधी साध्य होय

सनंदन ऋषींनी हे प्रमेय जरूर वापरले पण ते सिद्ध कसे करायचे ते शिकविले की नाही हे मला माहीत नाही. मी ते मास्तरांकडून शिकलो.

ब्र: नारदा, सनंदन ऋषींच्या खोलीत पण असाच खडू फळा होता का रे?

ना: ब्रह्मा, मला रे काय माहीत? मी जे सांगतो ते जसे पुराणात आहे तसे सांगतो. मला काही आठवत नाही रे बाबा. सनंदन ऋषींनी मला गणित शिकविले ही गोष्ट खरी की खोटी हे नाही मला माहित. पण सिद्धांत मात्र खरा. मीही हे सगळे मास्तरांच्या शाळेत शिकलो. मी वाड्याच्या अंगणात वेगवेगळ्या आकाराचे त्रिकोण काढून हा सिद्धांत तपासून पाहिला. त्यामुळे तो नारदपुराणातही आहे हे पाहून मला खूप छान वाटले. पुराणात कविता, भाषा, गणित आहे ही गोष्ट किती छान!

ब्र: अरे पण तू अंगणात फूटपट्टी घेऊन कसा गेलास? बिंग फुटले असते. तू अदृश्य. फूटपट्टी येतांना लोकांना दिसली असती. ती अंगणात रांगोळीभोवती फिरतांना पण दिसली असती. मग भानामत भानामती.

ना: नाही रे. मी काळजी घेत असे. मी मोजायला बोटे, वीता, हात वापरत असे. हे बघ ढोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंत एक हात लांबी. ही बघ वीत. अंगठ्याच्या टोकापासून करंगळीच्या टोकापर्यंत एक वीत लांबी. तशीच ही चार बोट लांबी. यानेच सारी मोजमाप. मास्तरांकडूनच शिकलो हे तंत्र. मास्तर धोतर घेतांना दुकानात त्याची लांबी हात, वीता, बोटाने मोजून बघायचे. रुंदी पण मोजायचे. मोजमाप चोख केल्याशिवाय ते काहीच करीत नसत. फारच गणिती होते. मला तर आता वाटते की तेच माझे सनंदन ऋषी.

ब्र: पण मग नारदा, पुराणात जर गणित आहे तर पुराण ऐकायला जातांना लोक पाटी पेन्सिल घेऊन कसे रे जात नाहीत? मला तर कापसाची पेटकोली अन् रांगोळी घेऊन जातांना दिसतात बाया. रांगोळीत बोट बुडवतात, कापसाच्या बोंडातून पीळ देत देत धागा काढतात, तो मग चार बोटांभोवती गुंडाळून वात वळतात. आणि हे सर्व बुवा भागवत शिकवत असतांना होते. त्यानी रे कसे त्यांना पुराणातले गणित समजेल?

ना: ब्रह्मा, तेथे कोणी शिकवत नाही. कोणी शिकायलाही जात नाही. कापसाच्याच वाती अन् कापूसकोंड्याच्याच गोष्टी. पण पुण्य मिळते असे म्हणतात बा. मिळतही असेल. नाही मिळाले अशी तक्रार मी तरी ऐकली नाही.

ब्रह्मा, आता तूच त्रिकोण मिटवून फळ्यावर एक गोल काढ. हं. छान काढलास. आता त्याचा व्यास मोज बघू. किती आला?

ब्र: नारदा, एक फुटापेक्षा थोडा ज्यास्त येतो. ते कसे मोजायचे?

ना: ब्रह्मा, हे बघ. एका फुटाचे असे बारा भाग पट्टीवर केलेले आहेत. प्रत्येक भागाला इंच म्हणतात. तुझ्या वर्तुळाचा व्यास एक फूट आणि दोन इंच, म्हणजे चौदा इंच आहे. आता वर्तुळाचा परीघ मोज.

ब्र: नारदा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! अरे, सरळ पट्टीनी हा गोल परीघ कसा मोजणार? काहीही काय?

ना: बरे नको मोजूस. त्या ऐवजी तू व्यासाला बावीस ने गूण व नंतर उत्तराला साताने भाग. तुला आता गुणाकार भागाकार येतातच. असे कर, साताने भाग व नंतर बावीस ने गूण.

ब्र: चौदा भागिले सात म्हणजे दोन. बावीस गुणीले दोन म्हणजे चौरेचाळीस.

ना: बरोबर. मग या वर्तुळाचा परीघ चौरेचाळीस इंच. मोजून बघ. असे कर, हा धागा घे. हा परीघावर लावत लावत जा परीघ संपेपर्यंत. मग तेवढाच धागा ताणून त्याची लांबी मोज. सांग मला.

ब्र: चौरेचाळीस इंच भरली. अरे वा! म्हणजे, वर्तुळाच्या व्यासाला बावीसने गुणून साताने भाग दिला की परीघाची लांबी येते.

ना: होय ब्रह्मा. हे पण नारद पुराणात आहे. ब्रह्मा, अशा अनेक गोष्टी आहेत. आजही शाळेत हे शिकवतात. हे ज्ञान वापरून सनंदन मुनी मग मला ग्रहताऱ्यांची गती, ते रोज आकाशात केव्हा कुठे दिसतील, सूर्यग्रहण कधी होईल, चंद्रग्रहण कधी होईल ते शिकवतात. त्याकरिता हे सर्व गणित उपयोगी आहे म्हणूनच तर त्यांनी मला शिकविले.

ब्रह्मा, काका काकू यायची वेळ झाली. फळा पुसू. खडूचा पडलेला भुरका झाडून टाकू. तो धागा, फूटपट्टी जागच्या जागी ठेवू आणि साळसूदासारखे मुकाट निर्विकार बसू. पुन्हा भानामती नको. नंतर मग मी तुला आणखी एक गंमत सांगतो.

ब्र: ठीक. आज मात्र मजा आली हं.

भाज्य भाजक भागाकार
गुण्य गुणक गुणाकार
त्रिकोण चौकोन गोलाकार
ब्रह्म निर्गुण निराकार

ना: झाले काम. आता एक कोडं सोडव. बंडू आणि गुंडूच्या वयांची बेरीज २६ वर्षे आहे. त्यांच्या वयातील अंतर ६ वर्षे आहे. तर त्यांची वये काय?

ब्र: अरे नाही जमत मला. हे अंकगणितही नाही. अन भूमिती पण नाही. हे कोणचे गणित? कसे सोडवायचे?

ना: ब्रह्मा, याला बीजगणित म्हणतात. नारदपुराणात हे पण आहे. दोघांची वये म्हणजे दोन संख्याच आहेत. आपल्याला त्या दोन संख्यांची बेरीज, म्हणजे योग माहीत आहे. दोन संख्यातील फरक, म्हणजे अंतर माहीत आहे. योग सव्वीस. अंतर सहा. हे गणित असे सोडवायचे. योग आणि अंतर यांची बेरीज करायची. सव्वीस आणि सहा म्हणजे बत्तीस. त्याला दोनने भागायचे. म्हणजे सोळा. ही झाली एक संख्या. एकाचे वय. आता योग आणि अंतर यांची वजाबाकी करायची. सव्वीस मधून सहा काढले तर वीस येतात. त्याला दोनने भाग दिला तर येतात दहा. दुसरी संख्या दहा. हे दुसऱ्याचे वय. आहे की नाही मजा? नारदपुराण आहे हे. हं.

ब्र: अरे हे गणित नाही. ही तर जादू आहे.

ना. ब्रह्मा, आता आणखी एक कोडे. दोन संख्यांच्या वर्गांचे अंतर ७ आहे. त्या संख्यांची बेरीज पण ७ आहे. तर त्या संख्या कोणत्या?

ब्र: अरे हे खूप कठिण आहे. कसे करायचे?

ना: ब्रह्मा, दोन संख्यांच्या वर्गांच्या अंतराला संख्यांच्या बेरजेने भाग दिला तर संख्यांचे अंतर येते. तर संख्यांचे अंतर किती?

ब्र: हे सोपे आहे. सात भागिले सात म्हणजे एक. अरेच्चा! आता सुटले कोडे. संख्यांची बेरीज सात, वजाबाकी एक. म्हणून एक संख्या सात अन् एक  म्हणजे आठ, भागिले दोन, म्हणजे चार. दुसरी संख्या सात उणे एक म्हणजे सहा. सहा भागिले दोन म्हणजे तीन. दुसरी संख्या तीन. अरे हे तर आधीच्या कोड्यापेक्षाही वरताण आहे. व्वा.

ना: होय ब्रह्मा. आज शाळेत हे शिकवतांना

(क्ष वर्ग - य वर्ग) = (क्ष - य) गुणा (क्ष + य)

असे शिकवितात. हेही बीजगणितच आहे. हेही नारदपुराणात सनंदन गुरुजी मला शिकवतात. खूप सुंदर श्लोक आहेत. वाच कधी.

अशा अनेक गमतीजमती आहेत ब्रह्मा नारदपुराणात. दोन संख्यांच्या अंतराच्या वर्गात त्याच दोन संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट मिळवली तर त्याच दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज येते असेही आधी सांगितलेल्या श्लोकात आहे. आज हेच बीजगणिताचे समीकरण

(क्ष-य) चा वर्ग + २क्षय = क्ष चा वर्ग + य चा वर्ग

असे लिहितात. करून बघ कुठल्याही दोन संख्या घेऊन.

ब्रह्मा, आज आपण अंकगणित, बीजगणित, भूमिती शिकलो. नारद पुराण वाचून. गणित ज्यात आहे त्या एकमेव पुराणाला माझे नाव आहे असे कळले तेव्हा मला खूपच अभिमाम वाटला. आता तर गणित, विज्ञान खूपच पुढे गेले आहे. मानवही त्याच्या सहाय्याने वर वर जात आहे. ज्ञानाचा उत्तुंग पर्वत चढत आहे. पण जसजसे ज्ञान वाढते तसतसे आपल्याला माहीत नसणाऱ्या गोष्टी वाटत होत्या त्यापेक्षा अधिकच ज्यास्त आहे हेही त्याला कळते. म्हणून म्हणतात की जसे ज्ञान वाढते तसे अज्ञान पण. आपले अज्ञान किती आहे हे माहित होणे हेही एक प्रकारचे ज्ञानच आहे. ज्ञानाचा हा पर्वत खूपच उंच आहे आणि जसजसे तो चढून वर जावे तसतसा तो अधिकच रुंदावतो हे मानवाला माहीत आहे. हा मेरुपर्वतासारखाच आहे. पण हा ज्ञानाचा मेरुपर्वत चढण्याची त्याची जिद्द आहे. हा ज्ञानाचा मेरु पर्वत, हा पायथ्याला कमी रुंद व वर शिखराकडे जाता जाता अधिकाधिकच रुंदावणारा मेरु पर्वत, हा चढायला दुर्गम पर्वत, हा सोनेरी चमचमणारा उलटा ज्ञानपर्वत हा जंबुद्वीपाचा रहिवासी मानव अविरत चढतो आहे. वाटेत आंब्याच्या रसाच्या नद्या, हत्तीएवढी जांभळे, उसाच्या रसाचे डोह, जांबुनद सोने त्याला प्रलोभन दाखवतात. अप्सरा, गंधर्व, ऐश्वर्य वाटेत त्याला मोहवश करू पाहतात. पण ब्रह्मा, हा ज्ञानयोगी सतत ज्ञानरूपी मेरुपर्वतारोहणात मग्न आहे. अशा या मानवाला तू निर्माण केले की त्यानेच अति प्राचीन काळी अशा मेरुपर्वताला दिपून वा त्याच्या दर्शनाने बावचळून तुझी कल्पना केली हा खरेच गौण प्रश्न आहे.

ब्र: नारदा, आलेच बघ काका काकू. आता रात्रीपर्यंत मौन. आता मस्त चहाचा सुवास दरवळेल. वाटाणे टाकून पोहे सातळले तर मग काय, विचारायलाच नको. कालच काकूंनी ३६ शेंगा सोलल्या. ३६ म्हणजे सहाचा वर्ग. प्रत्येक शेंगेत चार दाणे. १६ दाणे किडके निघाले. १६ म्हणजे चारचा वर्ग. ३६ गुणिले चार उणे १६. म्हणजे १२८ दाणे चांगले निघाले. म्हणजे प्रत्येकाला १२८ भागिले २ म्हणजे ६४ दाणे येतील. ६४ चे वर्गमूळ आठ. ६४ चे घनमूळ ४. म्हणजे माझी तोंडे. चाराचे वर्गमूळ दोन. म्हणजे तू आणि मी. व्वा. आनंदमूळ आहेत हे तुझे सनंदन.

_____________________



अनुक्रमणिकेकडे

गोष्ट दहावी


माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
मना मनाचिये गुंती
राहिले न वेगळाले

ना: काय ब्रह्माजी, आज सकाळी सकाळी हे काय गुणगुणता?

ब्र: अरे सहज. काल काकाकाकू मनोभावे एक धारावाहिक बघत होते. मीही पाहिले घटकाभर. त्याचे हे गीतकण अडकून राहिले मनाच्या दाढेत. रात्रभर गणवृत्त आहे की मात्रावृत्त ते तपासून बघत होतो. गोंधळून गेलो. सकाळी सकाळी ओठातून तेच शब्द बाहेर आले एवढेच.

ना: ब्रह्मा, हे गीत म्हणताना सर्वत्र लघुचा उच्चार दीर्घ आहे. म्हणून तो गुरु होतो. मन म्हणायच्या ऐवजी आपण मऽनऽ असे नकळत म्हणतो. आपण कसे म्हणतो हे लक्षात घेतले तर ही कविता अशी वाटेल.

माझे मऽनऽ तूझे झाले
तूझे मऽनऽ माझे झाले
मऽना मऽनाचीये गुंती
राहीले नऽ वेगऽळाले

असे हेल काढत काढत आपण हे गीत म्हणतो. येलपाड्या म्हणेल ती वाड्यातली म्हातारी आपल्याला. पण असे करतो म्हणून त्याला चाल व लय येते. नाहीतर हे कडवे गणवृत्ताच्या वा मात्रावृत्ताच्या साच्यात बसत नाही. उच्चाराप्रमाणे जर लघुला गुरु धरले व मोजले तर मग हे ममगग गण असलेले अष्टाक्षरी वृत्त म्हणायला काही हरकत नाही. ब्रह्मछंद नाव आहे ह्या छंदाचे.

ब्र: खरेच? माझ्या नावाने पण छंद? हा सगळ्यात पहिले निर्माण झालेला छंद की काय? हिरण्यगर्भातून माझ्याबरोबर निघालेला अजन्मा छंद की काय?

ना: नाही रे ब्रह्मा! गंमत केली. याला थाप मारणे म्हणतात. द्यायचे खोटेनाटे धडक ठोकून. फार आवश्यक आहे ही कला भारतवर्षात. पुराणकालापासून. तुला मात्र आता छंदाचा छंद लागला आहे. तू छांदिष्ट झाला आहेस. आणि तसेही तेरा कोटी छंदांमधे एखादा छंद आपण आपल्याही नावाने खपवला तर कुठे बिघडते? थोडी काटछाट जोडजाड केली तर नवा छंद सुद्धा होऊ शकतो. वरच्या कडव्याच्या प्रत्येक चरणातून दोन दोन अक्षरे काढून बघ. अर्थ न बदलता दुसरा छंद तयार होतो. करून बघ गंमत.

माझे मऽनऽ तूझे
तूझे मऽनऽ माझे
मऽनाचीये गुंती
नाही वेगऽळाले

हे झाले मम गण असलेले षष्ठाक्षरी वृत्त. याला पण छान चाल आहे. शेवटच्या ओळीतले आणखी दोन शब्द आपण जर काढले तर अगदी अभंगाची चाल येईल याला.

देवाचीये द्वारी
उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी
साधियेल्या

हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा
पुण्याची गणना
कोण करी

ब्रह्मा, ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातले हे अभंग. काय सुंदर चाल आहे. आपल्याला असे काही कधी लिहिता येईल का रे? मला नाही वाटत. असो.

ब्र: नारदा, चाल सोड. विचार सुद्धा किती छान. फक्त क्षणभर देवाच्या द्वारी उभे राहिले तरी उद्धार होतो असे सांगतात. म्हणजे त्यासाठी मोठमोठे यज्ञ करायला नको. तासनतास भागवत सप्ताहात बसायला नको. यात्रेला जायला नको. जागृत देवस्थाने धुंडाळायला नको. नवस सायास करायला नको. म्हणजे अंधश्रद्ध लोकांची कानपिळीच दिसते. फक्त तुझ्यासारखे तोंडानी हरीनाम घ््यायचे मधून मधून. नारायण नारायण. म्हणजे मोक्षप्राप्ती.

त्या जंतुकवीची पण एक कविता आहे आध्यात्मावर. बालवेदातली कविता.

वाती वळता वळता कीर्तन कानावरून गेले होते
जाते वळता वळता ओठी श्लोक मनाचे चालत होते
कणिक मळता मळता चिंतन स्मरण नेहमी त्याचे होते
पुऱ्या तळता तळता मंथन गीतेच्या श्लोकांचे होते
दही घुसळता घुसळता नकळत चित्त गोकुळी गेले होते
धुणे दगडावर आपटता मन कंसावर चिडले होते
भांडी घासता घासता सहस्रनामाचे पारायण होते
रांगोळीच्या ओळी रेखत मन लक्ष्मणरेषेत होते
हात कामात गुंतले असता मन आध्यात्मी रमले होते
भले आध्यात्माने केले की कामाने माहित नव्हते
आजच्यासारख्या रिकामटेकड्या आध्यात्माचे वावडे होते
हात आमच्या आजीचे कधी माळेचे मणी ओढत नव्हते

नारदा, पुण्याची गणना बिणना कोणी करीत नाही असे पण म्हणतो रे हा ज्ञानियांचा राजा. म्हणजेच चित्रगुप्त वगैरे कोणी नाही. माझा तो मानसपुत्र, तुझा भाऊ नाही म्हणजे तू नाही, मी नाही. आपण सारेच काल्पनिक. हेही सत्यकथन मला आवडले ज्ञानेश्वरांचे.

ना: बरोबर. आध्यात्माच्या नावाखाली बोकाळलेल्या कर्मशून्यतेवर हा सरळ सरळ प्रहार आहे. ब्रह्मा, मी त्या विज्ञानसंस्थेत जात होतो हे तुला आठवतच असेल. बर्डीच्या गणपतीला जातांना मी तुला एकदा दाखवले होते. त्याच्या बाजूलाच नागपूर विश्वविद्यालय आहे. त्याला आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ म्हणतात. तेच तुकडोजी महाराज विचारतात

देव एका जागी जागृत
दुसरे जागी काय ते भूत?

देव सर्वत्र आहे म्हणणारेच जागृत देवस्थाने शोधतात, तिथे जाऊन नवस करतात मुलगा व्हावा म्हणून. नाही झाला तर स्वतःला दोष देतात, झालाच तर देव नवसाला पावला म्हणतात. मजा मजा असते बघ. यांचेच राष्ट्रसंत तुकाराम महाराज जे म्हणतात ते हे भाविक लोक विसरून जातात आणि त्यांच्याच लाडक्या पंढरीच्या रायाला नवस करतात, साकडे घालतात.

नवसे कन्यापुत्र होती
तरी का करणे लागे पती

आहे की नाही गंमत? किती छान प्रश्न विचारला आहे तुकोबांनी अंधश्रद्ध लोकांना!

ब्र: नारदा पुरे. खरे म्हणजे देव आहे हे मानणे हीच अंधश्रद्धा आहे. तुला मला हे माहीत आहे. मलाही आता पुराणांऐवजी संतवाङमय वाचावे की काय आपण असे वाटायला लागले आहे. त्यात आहे का रे विश्वोत्पत्तीची कथा? मी कोण हे मला त्यात सापडेल का? पण ते राहू दे. तू त्या षष्ठाक्षरी छंदाबद्दल बोलत होता. काय नाव त्याचे?

ना: आपले विषयांतरच फार होते रे. असो. तर या षष्ठाक्षरी वृत्ताचे नाव आहे नारद. ममगग मधून समोरचे मम विभक्त झाले. ब्रह्माच्या भालप्रदेशातून ब्रह्मपुत्रोत्पत्ती झाली तसेच काहीसे. ब्रह्मवृत्ताचा मानसपुत्र, म्हणून नारदवृत्त. नारदवृत्त म्हणजे ब्रह्मवृत्ताचेच प्रत्यंग. तोच अर्थ. तोच विचार. तेच मन. नावही म्हणूनच नारद छंद. याचे गण मम. पुजेत गुरुजी मधून मधून काकांना 'मम' म्हणायला सांगतात आणि ते म्हणतात तसेच याचेही गण. मम.

ब्र: नारदा, ही मात्र चेष्टा हं. पण तू माझा मानसपुत्र आहे हे मात्र खरे. तुझ्या आणि माझ्या मनात बरेचदा एकच विचार येतो. मला तुझ्या मनात काय आहे हे सहज कळते. तूही माझ्या मनात काय आहे ते हमखास हेरतो. आपली मने एकच की काय असे बरेचदा वाटते. की आपली मनेही आपल्यासारखीच पारदर्शक आहेत रे? आरपार बघून घ््या कोणीही? तूही आज नेमका विश्वोत्पत्तीचा विचार कसा केला? तुला पुन्हा उत्पत्ती कशी आठवली? माझ्याही मनात रात्रभर तोच विचार येत होता अधूनमधून. काय झाले असावे त्या विश्वोत्पत्तीच्या क्षणाला? माझ्या मनात तो विचार आला म्हणून तुझ्या मनातही उमटला की तुझ्या मनात तो आधी आला म्हणून माझ्या मनात उपजला? की रात्री तू चोरून माझ्या मनात शिरतोस? नारदा, ममगग पासून मम आले की मम पासून ममगग झाले? ममगग आधी की मम आधी? पण काहीही असले तरी काय बिघडले? काय फरक पडतो आपल्याला?

ना: नाही ब्रह्मा! कशाचीही सुरुवात कशी झाली हे फार महत्त्वाचे आहे. तू काकूंचा जप ऐक. आणि सांग त्या काय म्हणत आहेत ते.

ब्र: मरा मरा मरा मरा म्हणत आहेत.

ना: ब्रह्मा, त्या राम राम राम राम म्हणत आहेत. त्यांनी जप सुरू करतांना 'रा'पासून सुरू केला हे मला माहीत आहे. सुरुवात कुठून झाली हे माहीत नसले तर मरा मरा मरा मरा ऐकू येईल. म्हणूनच सुरुवात कशी झाली हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. म्हणून मला नेहमी विश्वोत्पत्तीची खरी कथा जाणून घ््यायची असते. सुरुवात खूप महत्त्वाची असते ब्रह्मा. तिचे ज्ञान हवे. काका नामस्मरण करतात बघ. सांग काय म्हणतात ते.

ब्र: ठलविट् ठलविट् ठलविट् ठलविट् म्हणतात असे वाटते.

ना: ती त्यांची पोरही काहीतरी घोष करते आहे बघ. सांग काय म्हणत असावी.

ब्र: अरे त्यात काय कठिण? यमाचा धावा करते आहे. यमा यमा यमा यमा यमा यमा यमा यमा.

ना: तेच म्हणतो आहे मी ब्रह्मा. सुरुवात कशी झाली हे फार महत्त्वाचे. काका विट्ठल विट्ठल म्हणत असावे. जपाची सुरुवात 'वि' पासून झाली होती. पोर विट्ठल माउलीला माय माय म्हणत असावी. जप 'मा' पासून सुरू झाला, 'य' पासून नाही. जपाला सुरुवात कुठे झाली हे माहीत असायला हवे. म्हणून मला विश्वोत्पत्तीची कथा जाणून घ््यायची आहे. रुद्राक्षाच्या माळेत सुद्धा सारे मणी सारखे असले तरी एक मोठा असतो. तो पहिला मणी. मेरुमणी! तिथून जप सुरू होतो. विश्वमाळेतला पहिला मणी तू. विश्वोत्पत्तीची कथा फक्त तूच सांगू शकतो. आधी काय झाले? आधी कोण आले? त्याने काय केले?

ब्र: अरे हाच तर मला बरेच दिवसापासून प्रश्न पडला आहे. काकूंना दही लावताना मी रोज रात्री पाहतो. थोडे कुणकुण दूध घेऊन त्यात चमचाभर दही टाकायचे, त्याच चमच्याने ढवळायचे व झाकून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घट्ट दही तयार. त्याच दह्यातले चमचाभर दही दुसऱ्या दिवशी विरजण म्हणून नव्या दुधात वापरायचे. असेच दिवसानुदिवस, वर्षानुवर्ष चालते. घरात आधी दही असल्याशिवाय नवे दही होत नाही. घरात नसेल तर बरेचदा शेजारी मागून आणावे लागते. दह्याशिवाय विरजण नाही. विरजणाशिवाय दही नाही. नारदा, मला प्रश्न पडतो की अगदी सुरुवातीला, जगातले पहिले वहिले विरजण लावायला दही कुठून आले असावे. दे पाहू उत्तर.

ना: ब्रह्मा, आज सकाळी कोंबडी आरवली आणि मला एक प्रश्न पडला. कोंबडी अंडे देते. अंड्यातून कोंबडी येते. ती मोठी होते आणि अंडे देते. अशा कोंबड्यांच्या पिढ्यानपिढ्या उलटतात. पण सुरुवात, आरंभ कुठून झाला? आधी अंडे आले की आधी कोंबडी. ती कशी आली? कोणी आणली. दे उत्तर.

ब्र: नारदा, त्यादिवशी आपण सीताफळ खातांना मी चुकून एक बी गिळली. मी खूप घाबरलो. पोटातून आता सीताफळाचे झाड नक्की येणार असे वाटले. किती विचित्र दिसले असते ते! मी अदृश्य, पण उदरोत्पन्न वृक्ष दिसला असता सगळ्यांना घरात वावरतांना. कसे दिसले असते ते? घरात झाड इकडून तिकडे जात आहे. वा! सुपर भानामतीच! केवढे घाबरले असते हे लोक! यज्ञ बिज्ञ करण्याआधी यांनी ते झाड बाहेर फेकले असते. माझे पोट त्यात अडकल्यामुळे मीही घराबाहेर. असो. बीचा वृक्ष होतो. वृक्षाला फळे येतात. फळात बीया असतात. बीया जमीनीत रुजतात. कोंब फुटतो, रोपटे वाढते, वृक्ष होतो, फळे येतात, बीया देतात. हे चक्र अव्याहत सुरूच आहे. पण पहिले काय आले? फळ की वृक्ष? कोणी आणले? कसे आणले? दे पाहू उत्तर.

ना: ब्रह्मा, उन्हाळ्यानंतर पाऊस पडला की कसे छान वाटते. पाऊस कां व कसा पडतो हा मला नेहमीच प्रश्न पडतो. मास्तर सांगायचे जलचक्र काय ते. ऊन तापते. समुद्राच्या पाण्याची वाफ होते. हलकी वाफ वर जाते. थंड हवेने ढग होते. वाऱ्यावर ती वाहत जाते. डोंगर तिला अडवतो. थंडीने ढगांचे पाणी होते. पाऊस पडतो. धरती भिजते. ओढे नाले पाणी वाहत नेऊन नदीला मिळतात. नदी वाहत वाहत समुद्रास मिळते. पाणी पाण्याला मिळते. पुन्हा ऊन, पुन्हा वाफ, पुन्हा ढग, पुन्हा पाऊस. पण पाऊस पडतो म्हणून समुद्रात पाणी की समुद्रात पाणी म्हणून पाऊस पडतो? सगळ्यात आधी कोण आले? ढगपाऊस की समुद्र? कोणी आणले? कसे आणले? दे उत्तर.

ब्र: नारदा, म्हणूनच मी म्हणतो की आपली मने एकच आहेत. एखादा विचार माझा की तुझा, प्रश्न मला पडतो की तुला, उत्तर तुला सुचते की मला हेच मला कळत नाही. सारी गुंतागुत झाली आहे. असो.

माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
मना मनाचिये गुंती
राहिले न वेगळाले

ना: ब्रह्माजी, हा गुंता कोणी सोडवावा? सत्यशोध कोणी घ््यावा? सत्य सांगणारे पुराण कोणी लिहावे? अठरा पौराणिक पुराणांनी तर हा गुंता अधिकच वाढवलेला आहे. कोण लिहील नवे पुराण? कोण तो आधुनिक पुराणकार?

ब्र: होय नारदा. मलाही त्या पौराणिक पुराणातल्या पुराणकथा आवडतात, नाही असे नाही. माझ्याकरिता तेच पुरण. पचायला जड. पण भ्रमरपुराण मात्र आपण नक्कीच लिहायला हवे.

नारदा, जरा मला ओशाळल्यासारखं होत आहे रे. पण खरे सांगायचे तर काल रात्री मी थोडे लिखाण केले. आपल्या ब्रह्मपुत्र पुराणाचीच ती नांदी आहे काय हे तूच ऐकून सांग. पण मी वाचत असतांना तू समोर नको बसू. मला जरा लाज वाटते. संकोच वाटतो. पहिल्यांदाच मी काही लिहितो आहे. अगदी भुक्कड पण असू शकते. अगदीच टाकाऊ असू शकते. वाचताना माझा आवाजही कापतो. तू हासशील असे वाटते. तुझे ट्रेडमार्क 'नारायण नारायण' म्हणशील कदाचित. मी नाही वाचत जा. बरे असे कर, माझ्या पाठीमागे बसून ऐक. नजरेआड. पुढे नको.

ना: ब्रह्मा! तू रात्रभर लिखाण केलेले दिसते. कविता लिहिता लिहिता तुलाच तुझा विसर पडलेला दिसतो. अरे तुझी पाठ कोणीकडे? तू चतुर्मुख. चहूकडे तुझी नजर. ती मी कशी टाळू? चिंता नको करू. तू जे लिहिशील ते स्वानुभवाचे बोल आहेत. ते सुंदरच असतील. न भूतो न भविष्यति ब्रह्मकाव्य. ब्रह्मा, तुझीच तर रे ही सारी सृष्टी. तू प्रजापती. तुझ्यासारखा कवी नाही असे सुभाषित मी तुला म्हणून दाखविले होते. ते खरेच आहे. अरे, सृष्टिनिर्मात्याला, वेदनिर्मात्याला एक पुराणनिर्मिती म्हणजे डाव्या हाताचा मळ. वाच काय लिहिले ते. मीच तुझ्याकडे पाठ करून बसतो. मीच डोळे मिटतो. नाही पाहणार. नाही बोलणार. फक्त श्रवण करणार. तू कर सुरू. दिवसही उत्तम निवडलास. मास्तरांचा विश्राम सदुसष्ट वर्षांचा झाला आज. वाघोबा म्हणायचे त्याला लहानपणी. चल होऊ दे भ्रमरपुराणाचा श्रीगणेशा आजच्या दिवशी. म्हण, अथ प्रथमोध्यायः

ब्र: बरे बाबा! करतो हिंमत. नारदा. हे पुराणही इतर पुराणांसारखेच गुरुशिष्यसंवादरूप घेऊनच आले. कधी मी गुरु, तू शिष्य. कधी तू शिष्य, मी गुरु.

ना: व्हा सुरू ब्रह्माजी. अथ प्रथमोध्याय:

ब्र: जशी आज्ञा मुनिवर. ऐका तर!

नारद वदे-

देवा तूचि अजन्मा, बाकी सारी तुझीच रे सृष्टी
साक्षीदार असे तू विश्वोत्पत्तीस, ना मला भ्रांती

पदनत मी तुज ब्रह्मा, द्यावे मज ज्ञान ब्रह्मसृष्टीचे
केंव्हा, कोण, कसे तू केले उत्पन्न विश्व हे साचे

ब्रह्म वदे-

नारद देवर्षी तू, तूची केवळ त्रिलोक संचारी
सत्य तुझे नी माझे आहे एकच, तयास स्वीकारी

मानव मन उदरी मी जन्मा आलो असे कधी वाटे
तो माझा निर्माता आहे हे सत्य वा असे खोटे

मी मानव निर्माता, मनुची ती लेकरे कधी वाटे
मी त्याचा निर्माता आहे हे सत्य वा असे खोटे

पुत्रा रोज सकाळी कानी येते कुकूच्चकू तुजला
कोण जन्म दे तिजला, प्रश्न पडे मज, जसा पडे तुजला

वरवर विचार करता, अंडोत्पन्ना असे मनी येई
अंडोत्पत्ति कशी हो, प्रश्न झणी ये मनात दूजाही

अंड्याची ती जननी, अंडे फोडून ती स्वतः आली
त्या अंड्याची माता, त्यापूर्वीचीच कोंबडी झाली

कोंबडि अंडे कोंबडि अंडे कोंबडि अशी कडी पुत्रा
आधी ती की अंडे? प्रश्ना उत्तर मला हवे मित्रा

नारद वदे-

ब्रह्मा वंदन तुजला, प्रश्न पुन्हा नेतसे जगारंभा
साक्षीदार प्रभो त्या आद्यक्षणा तू, तुझी जगी आभा

काही जेथे नव्हते, तेथे हे जे दिसे कसे आले
तू आला सर्वाद्या, बाकी सारे तवकृपे घडले

माझे कुतुहल आता तुटे प्रभो खूप ताणुनी घेता
सांगावे ह्या पुत्रा पुण्यकथा निर्मितिक्षणाची त्वां

ब्रह्म वदे-

धीर असो देवर्षी, जन्म अजन्मा कुणी बरे दिधला
प्रश्नमूळ हे जैसे, वृक्ष फळा, फळ तसेचि वृक्षाला

सीताफळ वृक्षाच्या फांदोफांदी, बिया फळा माजी
बीला ऊब धरेची मिळता दे जन्म तीच वृक्षासी

वृक्ष जन्म दे बीजा, बीज असे गर्भ वृक्षजन्माचा
बीज, वृक्ष, बीज, पुन्हा वृक्ष कडी, कोण आद्य हो यांचा

नारद वदे-

वंदन पुनःपुन्हा तुज, वर्तुळ फिरुनी पुन्हा तिथे आलो
प्रश्न मूळ तैसाची, प्रदक्षिणा त्यास करुनिया आलो

जे दिसते नेत्रासी, ते आहे आज हे मला ठावे
पण ते कैसे आले, कोण करविता गणाद्य सांगावे

प्रश्न मूळ हा मजला, त्याचे उत्तर प्रभो मला द्यावे
कमलपाद, कमलाक्षा, कमलमुखा वंदनास मम घ््यावे

ब्रह्म वदे-

मानसपुत्रा माझ्या, प्रश्न न जगती नसे जया उत्तर
प्रश्नोत्तर ही जोडी ज्ञानोदर जन्म देत धरतीवर

प्रश्ना उत्तर असते, ज्ञानापोटीच हे जुळे वसते
बुद्धी, प्रयत्न, दृष्टी संगम ज्यामाजि त्यास ते दिसते

मार्तंडाची ऊर्जा सागरजल बाष्परूप आकाशी
शीतवायुवहनाने मेघोत्पत्ती नभात नित्याची

वायुरथी बसुनीया मेघनृप करित स्वैर संचार
पर्वतशिखरे त्याचा मार्ग अडविती, कसा अहंकार

मेघराज ईर्षेने गिरिशिखरोल्लंघनास वर जाती
थंड हवेने होई बाष्प पुन्हा जल, जडत्व ये त्यासी

वर्षा आकाशीची पाणी पुन्हा धरेवरी येई
ओहळ ओढे नि नद्या आता सर्वत्र वाहता दिसती

जल जीवन सृष्टीचे, वर्षा दैवी गमे चमत्कार
जीवपोष हे पाणी, आशीर्वच स्वर्गदान जलधार

नद्योघाला नित्यच ओढ असे सागरास मिळण्याची
सागर मोक्ष नदीचा, स्वर्ग तिचा तोच, ती सदा त्याची

सागरजल दे जन्मा मेघा, की मेघ सागरा जननी
कोण आद्यजन्मा हे सांगावे संप्रती सुजाण मुनी

नारद वदे-

अढळ प्रश्न तसाची, तारे त्याभोवती जणू फिरती
प्रश्न नदी ही आतुर मिळण्या जणु उत्तरा समुद्राशी

देव असो वा दानव, दिनरजनी आणि संधिकालाचा
साधक तू साधन तू, मातपिता तूच सर्व जीवांचा

शतशत प्रणाम तुजप्रत, अनुग्रह भक्ता तुझा हवा नित्य
कथन करावे देवा विश्वोपत्तीक्षणास मज सत्य

ब्रह्म वदे-

मुनी तुझा हा ध्यास पाहुनी
सत्यदेव होई प्रकट
नको मनी शंका इवलीही
जाणू आपण जे सत्य

सत्य काय जे दिसते डोळा
वा जे स्पर्शे आकलते?
किंवा जे पटते मनास जे
बुद्धीलाही झेपवते?

सत्य काय जे ग्रंथांमध्ये
पुराणातही सापडते?
सत्य काय जे बालमनावर
आई आजी बिंबवते?

सत्य काय जे अचाट वाटे
मनात भीती जे भरते?
सत्य काय जे स्वर्गप्रलोभन
मोक्षवाट तुज दाखवते?

सत्य काय जे लय चालीला
भुलून त्यागे आर्येला
सत्य काय जे विसरे बारा
अठरा बारा अठराला

व्याख्या ना सत्याला, अग्निपरीक्षा नसे असत्याला
माना वा ना माना, सोयर सुतुक न मुनी असे त्याला

शृंगाराने मढवा, सजवा धजवा किती असत्याला
कल्हई लावुन चांदीचे ते भांडे म्हणा कुणी त्याला

ढग आकाशी येती, सूर्यासी झाकती जरी काळे
त्यास न त्याची चिंता, तळपे तो सत्य त्याहि पल्याडे

सत्य असे ध्रुवतारा, ध्रुवबाळाची कथा असत्य असे
सत्य असे सूर्य नभी, रविरथ कविकल्पना, न सत्य असे

हिमशिखरावर मानव, हिमगिरि दिसतो, म्हणून सत्य असे
उलटा पर्वत मेरू, असत्य जो ना कधी कुणास दिसे

दुग्धा विरजण देता, होत दही हे त्रिकाल सत्य असे
क्षीरसमुद्रा विरजण लावुनि का मलय मंथने येते

दहि लावाया विरजण, विरजण हे कालचे दही होते
ते लावाया विरजण, ते परवाचे शिळे दही होते

प्रथम जगी ह्या विरजण लावाया कोठले दही होते?
या प्रश्नाचे उत्तर देवर्षी द्या, मला न ठावे ते

नारद वदे-

विरजण, अंडे, सागरजल, वृक्ष, प्रभो असे अजन्मा हे
अंगुलिनिर्देश तुझा समजे मज ना कशाकडे आहे

उत्पत्ती झाली हे सत्य असे हे कुणा नसे मान्य?
कोणी कैसी केली, रहस्य हे भेदुनी करा धन्य

ब्रह्म वदे-

ऋषिवर सत्यकथेला वाचक कां आज नच कुणी उरला
कां रे इतकी गर्दी पारायणि लोटते पुराणाला

अट्टाहास तुझा हा सत्यासाठी मुला मना भिडला
पुष्पामधुनी मकरंदाला टिपण्या जणू भ्रमर आला

भ्रमरा, पुत्रा, वत्सा, बाळा, मुनिवर करा कथा श्रवण
रोज कथा सत्याची गुंफुनि सांगे तुम्हा चतुर्वदन

भ्रमरपुराणश्रवणे पुण्य न हो प्राप्त, ती नको आशा
हे तर विचारमंथन केवळ, भ्रमरास ने मधुप्राशा

ना: व्वा ब्रह्मा! क्या बात है! पुराण असल्यामुळे शेवटी

इति श्री भ्रमरपुराणे
पितापुत्रसंवादनाम
प्रथमोध्याय:
संपूर्णम्

असे म्हणायचे. भारदस्तपणा येतो. मला असे वाटते की 'ब्रह्म वदे', 'नारद वदे' ऐवजी ब्रह्म उवाच, नारद उवाच म्हणावे. आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांना मगच ते पुराण पुण्यदायक आहे असे वाटेल.  पुण्याचे आश्वासन तू देत नाहीस, पुण्य मिळायची आशा ठेवू नये असा प्रांजळ खुलासा करतोस. पण त्या आश्वासनाशिवाय कोण रे वाचणार? थोडं प्रॅक्टिकल व्हावं माणसानं असं मला वाटते. आणि ब्रह्मा, अरे, थापा नाही तरी कमीतकमी अतिशयोक्ती अलंकार तर सढळ हातानी वापर. काहीतरी अद्भुतता हवी पुराणात. थापा मारण्याचाच तो सौम्य प्रकार आहे. वाङमयात ते क्षम्य पण आहे.

बाकी छान हं. आर्यावृत्त तर एकदम फिट. तू गायलास पण मस्त ठेक्यात. अगदी बारा अठरा बारा अठरा. मधे काही कडवे वेगळे होते. अर्नाळ पुराणात तेच वृत्त वापरले आहे बरेचदा. तेही मात्रावृत्त आहे बरे. सोळा चौदा सोळा चौदा. अर्नाळछंद नाव आहे त्याचे. नारायण नारायण!

ब्रह्मा, जरूर रोज लिहीत जा. आपल्याला काही संस्कृत बिंस्कृत येत नाही. आले तरी पुराणातील काव्याचा जो ओघ आहे, जो उच्च दर्जा आहे तो आपल्याला स्वप्नातही येणे अशक्य आहे. तरीपण रोज लिहीत जा. टेबलवर नको मात्र. रात्रभर मनःपटलावर लिहीत जा आणि सकाळी माझ्या कर्णपटलावर आदळत जा. पुराण पूर्ण लिहून झाले की मोठी जांभई दे. जाऊ दे काळ एकदम दोन तीन हजार वर्षे पुढे. मग तुझ्या काव्याला खरेच पुराणाचा दर्जा येईल. मग फक्त व्यासलिखित आहे असे म्हणायचे दोन चार कानात. की झाले. मग सर्व देवळात, देवघरात भ्रमरपुराणाची पारायणे. भ्रमरसप्ताहाचे आयोजन.

ब्र: तू खरेच पृथ्वीवासी झालास रे बाबा. अरे पुराणातील अचाट, अफाट, अद्भुत गोष्टींचा परिणाम म्हणून तर आपण हे नवपुराण लिहायचा विचार केला. आपणही जर तेच केले तर काय होईल? अठरा ऐवजी एकोणीस पुराणे होतील. मग आपण लिहून काय मिळेल? ते काही नाही. आपण शक्यतोवर सत्याधारीत लिहू. लिहू म्हणजे मनातल्या मनात रचू. कधी मी कर्ता, करविता आणि ऐकविता, अन तू ऐकता. कधी तू कर्ता, करविता आणि ऐकविता, अन मी ऐकता. पुरे आता.

माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
मना मनाचिये गुंती
राहिले न वेगळाले

_____________________



अनुक्रमणिकेकडे