गोष्ट नववी
ब्रह्मा: नारदा, रात्रभर झोप नाही रे. सतत ते सप्तद्वीप, सप्तसमुद्र, मेरुपर्वत, तारांगण आलटून पालटून मनात येत जात होते. पहाटे पहाटे प्रकाश पडायला लागला आणि वाटायला लागले की हा सगळा निव्वळ वाङमयविलास आहे. सत्य नाही. कारण कुठे दिसत नाही. असे मधाचे, उसाच्या रसाचे, दह्याचे, दुधाचे समुद्र कुठे असते तर लोक इतके त्रस्त असते का रे? अशा आमरसाच्या नद्या, हत्तीएवढी जांभळे असती तर ह्या बारक्या सीताफळाच्या झाडाचे एवढे कौतुक असते का रे? हे सारे इतके अफाट आहे, म्हणूनच असत्य आहे. आपल्या नसलेल्या स्वर्गासारखे. तुझ्यामाझ्यासारखे. अगदी काल्पनिक. गोष्टी म्हणून ऐकायला, सांगायला छान. पण तू म्हणतो तसे खरेच 'नारायण नारायण' म्हणायला लावणाऱ्या या गोष्टी. आता मला कळते तू कां सतत 'नारायण नारायण' म्हणतोस ते. मी पण आता 'रामायण रामायण' म्हणणार आहे मधून मधून अशा गोष्टी वाचतांना, सांगताना. मीही काल्पनिक. ह्या गोष्टीही काल्पनिक.
नारद:
काय सांगावे तुला परब्रह्मा
ज्यास ना मृत्यू, जो असे अजन्मा
सर्वसामान्या जो असे विधाता
तोचि सांगे तो कल्पना, न कर्ता
नारायण नारायण! ब्रह्माजी, तुम्ही ज्या निष्कर्षाप्रत पोहोचलात तेथे मी फार पूर्वीच पोहोचलो. कोणीही, जो विचार करू शकतो, त्यासही हे कळेल. हे सारे बुद्धिमान प्राणी. यांना कळत नाही असे नाही. पण एकंदरीतच लहानपणापासून तेच ते पुन्हा पुन्हा सांगून, पारायण करून इतके रुजवले जाते की ते खोटे आहे म्हणायला कोणी धजत नाही. खोटे आणि खरे समजायच्या आधीच, विचारशक्ती प्रगल्भ होण्याच्या आधीच हे सर्व रुजवले जाते. बुद्धिवृक्ष, विचारवृक्ष मोठा होण्याआधीच हे कल्पनांचे कलम त्यावर केले जाते. त्यावर मग पुन्हा पुन्हा तेच गळी उतरवणे. अठ्ठावीस नरकांची भिती दाखविणे. स्वर्गाचे आमिष दाखविणे. पुराणसप्ताह करणे. पारायण पारायण!
ब्र: नारदा, समजा लहान मूल मोठे होईपर्यंत त्याला फक्त भाषा, गणित, विज्ञान अशा उपयोगी व विवादातीत गोष्टी, ज्या कालबाह्य होत नाहीत, त्याच शिकविल्या व नंतर त्याला सारासार विचार करण्याची, दूध व पाणी वेगवेगळे करू देणारी नीरक्षीर विवेकाची, कापूस व कोंडा वेगळा करण्याची बुद्धी आल्यावरच पुराणातले 'तारांगण तारांगण' वाचू दिले तर ते अधिक योग्य नाही का रे होणार? मग त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ते मूल ठरवेल. तो त्याचा स्वत:चा निर्णय असेल. असे केले तर ते अधिक योग्य नाही का होणार?
ना: ब्रह्मदेवा, असेच ब्रह्मवाक्य अॅरिस्टाॅटल नावाचा एक महान तत्वचिंतकही वदला होता म्हणे. अडीच हजार वर्षांपूर्वी. ही पुराणे अस्तित्वात येण्याआधीच. पण अशी नवी मते समाजावरचे एका विशिष्ट वर्गाचे प्रभुत्त्व कमी करेल असे तत्कालीन सत्तेला नेहमीच वाटते. अज्ञानाच्या अंधःकारात बुडलेल्या रयतेवर राज्य करणे फार सोपे असते. प्रश्न न विचारणाऱ्या समाजाची पद्धतशीर निर्मिती करणाऱ्या स्वार्थी लोकांना असे नवे विचार पटणे शक्यच नाही. त्यामुळे अशा विचारांची कळी फूल होण्याआधीच खुडून टाकल्या जाते. अशी मते, विज्ञानसिद्ध सत्ये जोवर पुराणातून येत नाहीत तोवर त्यांना वाली नाही. मला तर वाटते, तू आणि मी मिळून एक नवे पुराण लिहावे. नाहीतरी आपल्या नावाने खपविलेले ब्रह्मपुराण, नारदपुराण आहेतच. आपण आणखी एक पुराण लिहू. ब्रह्मपुत्र पुराण!
ब्र: अरे पण ब्रह्मपुत्र म्हणजे नारदच. नारदपुराण म्हणजे ब्रह्मपुत्र पुराणच. मला जसे दुसरे मज्जीवनमणिमाला लिहिता येत नाही, तसे दुसरे नारदपुराणही आपल्याला लिहिता येणार नाही. शिवाय पुराण काव्यबद्ध हवे. श्लोक हवे. ठेका हवा. मला तर कवितेचा अ का ढ येत नाही.
ना: तसे नाही ब्रह्मा. ब्रह्मपुत्र म्हणजे ब्रह्माचा पुत्र हा षष्ठीतत्पुरुष समास. तसा संधिविग्रह नाही म्हणत मी. ब्रह्मपुत्र म्हणजे ब्रह्म आणि पुत्र, द्वंद्व समास म्हणतो मी. ब्रह्म आणि पुत्राने लिहिलेले पुराण. आणि कवितेचं काय! छंदबद्ध रचना करायची. जमेल तुला.
ब्र: बापरे! सगळच डोक्यावरून गेलं. समास काय, संधि काय, षष्ठी काय, द्वंद्व काय, छंद काय. हेच आधि एखाद्या पुराणातून शोधावे लागेल. पण पुराणात फक्त त्या अफाट गोष्टीच असतात. मेरू पर्वत, सूर्याचा रथ वगैरे.
ना: नाही ब्रह्मा. हे सर्व भाषाशास्त्र, काव्यशास्त्र, व्याकरण पण पुराणात व प्राचीन ग्रंथात आहे. अरे नारदपुराणातही भाषा, काव्य, गणित असे अध्याय आहेत. तुलाच ध्रुवबाळाच्या गोष्टी आवडतात त्याला कोण काय करेल?
ब्र: अरे तसे नाही. भाषा, कविता, गणित माझे आवडते. तेवढ्यासाठी तर मला मास्तरांची आठवण येते. ते सारे शिकू आपण. गोष्टीही आवडतात म्हणा! राहू-केतू, समुद्रमंथन, सुदर्शन चक्र, अजामिळ या साऱ्या गोष्टी सांगायचे तू कबूल केले आहे. पण आज नारदपुराणातले काव्यशास्त्र शिकावे म्हणतो. मग मला कविता करता आल्या तर आपण भेंड्या खेळू शकू. स्वरचित कवितांच्या. ब्रह्मपुत्रपुराण पण लिहू शकू. पण मला ब्रह्मपुत्रपुराणापेक्षा भ्रमरपुराण म्हणायला आवडेल. नावापासूनच सत्य हवे. भुंगा सत्य आहे. आपण काल्पनिक. भंुग्यासारखे भ्रमण करताना आपल्याला जे दिसते, ऐकू येते, जाणवते त्यावर आपण आपले मत, आपले विचार मांडायचे. काय?
ना: ठीक तर. पण आज तुलाही तुटक्या फुटक्या, रडक्या फडक्या, हुसक्या फुसक्या, चिटक्या मिटक्या कविता कराव्या लागतील. कोणी हासणार नाही. कोणी चिडवणार नाही. आहेच कोण येथे!
ब्र: ठीक आहे बाबा. पण मला काही येत नाही असे समजून शिकव. ते एकदम हाय लेव्हल नको. भाषा म्हणजे मला एक कुतुहलच आहे. त्यातही काव्यरूप विचार मांडणे. सध्यातरी माझी स्थिती 'उद्या लग्न आहे' मधल्या शाळकरी मुलीसारखीच आहे.
कशी अक्षरे चोख एकत्र येती
कसे शब्द होती, कसा अर्थ घेती
कशा शब्दपंक्ती कसे काव्य होती
विचारास शक्ती, कणा, धार देती
मी सध्या प्राथमिक शाळेतली ही मुलगीच आहे असे समज. तिची आई होऊन तू मला शिकव रे पोरा!
ना: ब्रह्मा, कविता हे एक गणित आहे. कविता हे एक शास्त्र आहे. कविता म्हणजे एक विज्ञान आहे. अॅरिस्टाॅटलने तर काव्याला Poetical Science चा दर्जा दिला आहे. आपल्याही पुराणात काव्यज्ञान प्रत्येक ऋषीला, मुनीला, शिक्षकाला अावश्यक आहे असे म्हटले आहे. काव्यज्ञानाशिवाय जो मंत्रांचा उच्चार, प्रचार करतो तो नरकात जातो असेही म्हटले आहे. काव्याला आपल्याही वेदपुराणात उच्च दर्जा दिला आहे. वेदशास्त्रांच्या सहा अंगांपैकी ते एक अंग आहे. नारद पुराणात तर त्यावर एक अध्याय आहे. मला, म्हणजे नारदाला सनंदन ऋषिमुखाने हे ज्ञान देण्यात आले आहे. तिथूनच आपण सुरुवात करणे इष्ट होईल असे मला वाटते देवा. आदेश असेल तर सुरू करतो.
ब्र: सांग वत्सा! रामायण रामायण!
ना: अथ सप्तपंचाशत्तमोऽध्या़यः
सनन्दन उवाच
वैदिकं लौकिकं चापि छन्दो द्विविध मुच्यते
मात्रावर्णविभेदेन तच्चापि द्विविधं पुनः
मयौ रसौ तजौ भन्नौ गुरुर्लघुरपि द्विज
कारणं छंदसि प्रोक्ताश्छंदः शास्त्रविशारदैः
ब्र: छान वाटलं ऐकून. थोड पुण्य पण मिळालं असेल संस्कृत श्लोक ऐकून. पण अर्थ काय?
ना: ब्रह्मा, आपण ज्या काव्याचा आज अभ्यास करणार आहोत ते छंदबद्ध काव्य असेल. भेंड्यांच्या सामन्यात जसे होते तसे. यात प्रत्येक कडव्यात चार ओळी असतात. फक्त आर्या सोडून. तिच्यात दोनच ओळी असतात. पण तिच्याही प्रत्येक ओळीचे दोन भाग असतातच. प्रत्येक भागाचा ठराविक साचा असतो. ठराविक चाल असते. जंतुकवी म्हणतो ते खरे आहे; 'कविता म्हणजे कदमताल, एकच ठेका एकच चाल'. प्रत्येत ओळीला चरण आणि तिच्या भागाला पाद म्हणतात.
ओळीत किती अक्षरे आहेत, त्यांचा उच्चार ठोकळमानाने किती वेळ घेतो यावर कवितेची चाल अवलंबून असते. अशा साच्यांना छंद म्हणतात. छंदशास्त्र हे कवितेचे विज्ञानच. ते जर आपण समजून घेतले तर आपण चालबद्ध कविता करू शकू. त्या कवितेला अर्थ असेल वा नसेल. ती वायफळ असेल. नुकतच बोलायला शिकणाऱ्या मुलाचे बोल असतील. योग्य शब्दयोजना करून अर्थ भरणे हेच प्रगल्भ कवीचे काम.
ब्र: ते तर आपले वाचन, विचार व ज्ञान यावर अवलंबून आहे. त्या बाबतीत काही आपण अगदीच हे नाही बरें. आपणही जग पाहिले आहे. तू तर त्रिलोक पाहिले आहे.
ना: तर ब्रह्मा, नारद पुराणाप्रमाणे छंद दोन प्रकारचे, वैदिक व लौकिक. वेदमंत्रामध्ये गायत्री मंत्र हा गायत्री छंद आहे. तसाच अनुष्टुप् छंद पण संस्कृत साहित्यात खूप वापरात आलेला आहे. त्यात सहसा आजचा मानव कविता करीत नाही. पुराणात, इतिहासात, काव्यात जे छंद वापरात येतात ते लौकिक छंद, किंवा वृत्त. भेंड्यांमधे भुजंगप्रयात, शार्दूलविक्रीडित, आर्या हे सारे लौकिक छंद. हे आपल्याला समजून घ््याला हवे. असे दहा बारा छंद आज शिकलो तर आपण ब्रह्मपुत्र पुराण लिहायला घेऊ शकू. भ्रमर पुराण म्हण वाटल्यास.
ब्रह्मा, छंदामधे पण दोन प्रकार आहेत. मात्रावृत्त व गणवृत्त. गणवृत्तात पदातील अक्षरांची संख्या ठरलेली असते. मात्रावृत्तात प्रत्येत पदातील व पादातील मात्रांची संख्या ठराविक असते. एकंदरीत काय, की कवितेत अक्षर अन् अक्षर महत्त्वाचे आहे. एक जरी इकडचे तिकडे झाले तरी चाल, लय बिघडते. अगदी स्वयंपाकासारखं आहे ब्रह्मा. कोणालाही पुरणपोळी जमेलच असे नाही. पुरणपोळी म्हणजे कविताच असते स्वयंपाकातली.
ब्र: नारदा, तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! कुठेही तुला पुरणपोळीच आठवते. मात्रा म्हणजे काय ते जरा सांग. त्या कशा मोजायच्या?
ना: ब्रह्मा, हेच कवितेचे गणित. कवितेच्या प्रत्येक ओळीतला शब्द लघु की गुरु धरायचा हे ठरवायचे. लघु म्हणजे ज्याच्या उच्चाराला थोडा कमी वेळ आपण देतो, गुरूला त्या मानाने ज्यास्त. ह्रस्वदीर्घासारखीच बऱ्याच अंशी ही कल्पना आहे. थोडक्यात सांगायचे तर अ, इ, उ लघु. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः दीर्घ. तसेच ककाकिकी, खखाखिखीचे. आता माझेच नाव बघ. नारद. ना गुरू, र लघु, द लघु. म्हणजे माझ्या नावाचा साचा गुरु-लघु-लघु. शारदा म्हणजे गुरु-लघु-गुरु. आता ब्रह्माजीचा साचा तू सांग.
ब्र: ब्र लघु, ह्मा गुरू, जी गुरु. मी लघु-गुरु-गुरु.
ना: छान. पण थोडं चूक. ब्रह्मा, ब्र नंतर जोडाक्षर असल्यामुळे ब्र उच्चारतानाच आपण पुढच्या जोडाक्षराच्या उच्चाराची तयारी करतो. पुढच्या जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर आघात आला असे म्हणतात. म्हणून जोडाक्षराच्या आधीच्या अक्षराला लघु वाटले तरी गुरू धरतात. म्हणून तू गुरु-गुरु-गुरु. ब्रह्मा, तू ब्रह्मदेव आहेस. तुझ्यात रे कोण लघु टाकणार. ते लघु बाकीच्यांना. आता छगन बघ. लघु-लघु-लघु. अरुण बघ. लघु-लघु-लघु. सूर्याचा सारथी तो, कश्यप ऋषींचा पुत्र, सूर्यापेक्षा आकाराने मोठा. पण तरी त्रिलघु. ऋषिपुत्र, सूर्यसारथी अरुणची गोष्ट पण छान आहे बरे. पण ती पुढे कधी. आज फक्त कविता.
ब्र: पेंडिंग गोष्टींच्या यादीमधे आणखी भर पडली. चला पुढे.
ना. ब्रह्मा, मात्रा मोजताना, गुरू असेल तर दोन मात्रा, लघु असेल तर एक मात्रा धरायची असते. नारद म्हणजे दोन अधिक एक अधिक एक. म्हणजे माझ्या मात्रा चार. तसेच ब्रह्माजी म्हणजे दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजे सहा मात्रा. आणखीन एक गोष्ट ब्रह्मा. अक्षरावर अनुस्वार असेल तर गुरू धरायचे. अक्षरापुढे विसर्ग असेल तरी पण गुरू. आता सांग अंधःकार म्हणजे किती मात्रा?
ब्र: दोन दोन दोन एक. म्हणजे सात मात्रा.
ना: बरोबर! आता एकच आणखी नियम. चरणाच्या, पदाच्या, पादाच्या शेवटी जर लघु असेल तर त्यालाही गुरू धरायचे. आता सांग अंध:कार शब्द चरणाच्या शेवटी आला तर किती मात्रा होतील?
ब्र: आठ. कारण शेवटचा र पण गुरु धरायचा. बाकी तीन गुरु आहेतच.
ना: व्वा! आहे की नाही गणित? तुला हे सोपे म्हणा. तुझे डोळे मोजले तरी आठ भरतात.
ब्र: नारदा, तुझ म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!
ना: तर ब्रह्मा, आपण जर आता एक आर्या म्हटली अन् तिच्या मात्रा मोजल्या तर आपल्याला आर्यावृत्ताचे गणित समजेल. आठवते का काकूंची एखादी आर्या?
ब्र:
येई जाग जगाला, पडती किरणे नभातुनी जैसी
आकाशी तो असता, झोपे जो, त्यास सद्गती कैसी
ना: छान! ब्रह्मा, तू म्हटली पण छान. त्या भेंड्यांच्या सामन्याचा तुला खूप फायदा झाला. आता तू कवी होणार असे मला वाटते.
ब्रह्मा, आर्येला दोनच चरण असतात. पण पहिला चरण म्हणताना 'येई जाग जगाला' म्हणून तू थोडा थांबला. नंतर 'पडती किरणे नभातुनी जैसी' म्हणालास. पुन्हा थांबला. मग 'आकाशी तो असता' म्हणून, थोडी उसंत घेऊन 'झोपे जो त्यास सद्गती कैसी' म्हणाला. हे जे मधले विश्रांतीचे क्षण आहेत त्यांना यति म्हणतात. कविता म्हणणारा तेथे थोडा ज्यास्त वेळ व्यतीत करतो. दोनच चरण असले तरी आर्येचे असे चार भाग असतात. ब्रह्मा, मोज प्रत्येक भागाच्या मात्रा.
ब्र: हं. पहिल्या यतिपर्यंत १२, नंतर पहिल्या चरणाच्या शेवटापर्यंत १८, मग दुसऱ्या चरणात यतिपर्यंत पुन्हा बारा, मग पुन्हा १८. बारा अठरा बारा अठरा.
ना: हं ब्रह्मा. हेच आर्येचे सूत्र. मात्रा महत्त्वाच्या. अक्षरे कमीजास्त चालतील. बघ म्हणून:
टाटट टाटट टाटा, टाटा टाटा टटा टटा टाटा
टरटट टरटट टाटा, टटटा टटटा टटा टटा टाटा
ब्र: अरे खरच! अक्षरांची संख्या आता वेगळी. पण मात्रा मात्र बारा अठरा बारा अठरा. व्वा!
ना: म्हणून तर आर्या करायला सोपी असते. आपल्या ब्रह्मपुत्र पुराणाला पण ती एकदम योग्य आहे. बाकीही वृत्त वापरू मधून मधून वाटल्यास. तू करून बघ एखादी आर्या. चल हो सुरू.
ब्र: नाही रे. असे एकदम थोडेच जमणार आहे. तू म्हण एखादी नवी कोरी स्वरचित आर्या. हे वृत्त तसे मलाही जमेल. पण पुढे कधी.
नाः ऐक तर मग.
आली वरातगंगा स्वर्गामधुनी, इथे उतरली ती
आलो मुक्कामासी, काकाकाकूघरी शिकायासी
ब्रह्मा, मात्रावृत्त बरेच असतात. पण गणवृत्तही खूप आहेत. हे मात्र फार शिस्तशीर असतात. प्रत्येक चरणात किती अक्षरे हवीत, अक्षरांचा लघु गुरु क्रम कसा असावा, यति कुठे कुठे, सारे अगदी कडक नियम.
तीन अक्षराच्या जुडीला गण म्हणतात. चरणातली अक्षरे अशी तीन तीन च्या गटात विभागायची. मग प्रत्येक गणात प्रत्येक अक्षराचे आपण आधी ठरवले तसेच लघु गुरु ठरवायचे. त्यावरून गण ठरतात. किती प्रकारचे गण असतील सांग बरे.
ब्र: तूच समजावून सांग.
ना: बरं, असं समज, एकच अक्षरी चरण आहे. ते अक्षर लघु असेल, किंवा गुरु असेल. म्हणजे एकच अक्षर असेल तर त्याचे लघु आणि गुरु असे दोन प्रकार होतील. आता समज, दोन अक्षरी चरण आहे. लघु गुरु प्रमाणे दोन अक्षरी शब्द किती प्रकारचे असू शकतात?
ब्र: चार. दोन्ही अक्षरे लघु किंवा दोन्ही गुरु; किंवा पहिला लघु, दुसरा गुरु; किंवा पहिला गुरू, दुसरा लघु. म्हणजे लघु-लघु, गुरु-गुरु, लघु-गुरु, गुरु-लघु असे चार प्रकार.
ना: बरोबर. मग आता तीन अक्षरी गणाचे किती प्रकार होतील करून पहा. आता आपण गुरूला ग, लघुला ल म्हणत जाऊ. या 'गल'च्या भाषेत तीन अक्षरी गणांचे काय काय प्रकार होतील ते सांग.
ब्र: गगग, लगग, गलग, गगल, ललल, गलल, लगल, ललग. एकूण आठ.
ना: पुन्हा बरोबर. ब्रह्मा, तीन अक्षरांचा समुह जर गगग, म्हणजे सर्वगुरु असेल तर त्याला 'म'गण म्हणतात. म्हणजे ब्रह्माजी म गण आहे. तीन गुरूपैकी पहिला लघुने बदलला तर 'य'गण. लगग म्हणजे य गण. जसे उन्हाळा, हिवाळा. पहिल्याऐवजी दुसरा लघु केला तर 'र'गण. गलग म्हणजे र गण. दे एक दोन उदाहरण र गणाचे.
ब्र: शारदा, अप्सरा
ना: बरोबर. पण वरातगंगा पृथ्वीवर आली तरी ब्रह्माचे मन मात्र स्वर्गातच घुटमळताना दिसते. अप्सरा काही मनातून जात नाही. असो.
आधीचे दोन गुरु व शेवटी लघु असेल, म्हणजे गगल असेल तर 'त'गण. दे उदाहरण.
ब्र: गंधर्व
ना: नारायण नारायण!
ब्रह्मा, असेच सर्वलघु म्हणजे ललल म्हणजे 'न'गण, गलल म्हणजे 'भ'गण, लगल म्हणजे 'ज'गण, ललग म्हणजे 'स'गण. असे हे यरतनभजसम आठ गण.
पण आता समजा चरणात दहा अक्षरे असतील व तीन तीन मोजले तर नऊ अक्षरांचे तीन गट होतील. एक अक्षर उरेल. मग त्याचा गण काय? तो लघु असेल तर 'ल'गण, गुरु असेल तर 'ग'गण. समजा अकरा अक्षरी चरण असेल तर तीन त्रिक नऊ अक्षरांचे तीन गण पडतील. उरलेले दोन सुट्टे जे राहतील त्यांना प्रत्येकी ल किंवा ग गण देता येईल. म्हणजे एकंदरीत य र त न भ ज स म आणि ल ग असे दहा गण असतात. चरणात किती अक्षरे आहेत व त्याची गणविभागणी कशी आहे यावरच वृत्त कोणते ते ठरते व चालही. त्याचे ज्ञान कवीला हवे असे काव्यशास्त्र सांगते.
आता तू मला य र त न भ ज स म गणांंची उदाहरणे दे पाहू. मग वृत्तज्ञान सुरू करू.
ब्र: य म्हणजे लगग म्हणजे उन्हाळा, हिवाळा. र म्हणजे गलग म्हणजे उर्वशी, अप्सरा. त म्हणजे गगल म्हणजे कैलास, वैकुंठ. न म्हणजे ललल म्हणजे नरक, कमळ.
ना: न म्हणजे पुरण पण ब्रह्मा.
ब्र: रामायण, रामायण! तुझ्या डोक्यात पुरण सोडून दुसरा काहीही विचार नसतो नारदा.
भ म्हणजे गलल म्हणजे नारद, अमृत. ज म्हणजे लगल म्हणजे हिरण्य, स म्हणजे ललग म्हणजे गुरुजी, अक्षदा. म म्हणजे गगग म्हणजे ब्रह्माजी.
ना: बस. कवितेचे गणित तुला आले. आता फक्त वेगवेगळ्या वृत्तांचे गण काय असतात एवढे समजले की झाले. पण आता मात्र कविता करावी लागेल ब्रह्माजी. शब्द नाही सुचले तरी गण जुळतील असे वायफळ बोल टाकायचे. आपण टटाटी भरून आर्या केली तसे. कवितेची चाल बसवायला तेवढेही पुरे.
ब्र: नारदा, त्या नारदपुराणातल्या श्लोकांचा अर्थ नाही सांगितला रे.
ना: अरे तेच तर आतापर्यंत सांगत होतो. खरे म्हणजे त्याच्याही पुढच्या श्लोकांचा अर्थ सांगून झाला. ऐक पुन्हा म्हणतो.
वैदिकं लौकिकं चापि छन्दो द्विविध मुच्यते
मात्रावर्णविभेदेन तच्चापि द्विविधं पुनः
मयौ रसौ तजौ भन्नौ गुरुर्लघुरपि द्विज
कारणं छंदसि प्रोक्ताश्छंदः शास्त्रविशारदैः
सर्वगो मगणः प्रोक्तो मुखलो यगणः स्मृतः
मध्यलो रगणश्चैव प्रात्यंगः सगणो मतः
तगणोऽन्तलघुः ख्यातो मध्यगो जो भणादिगः
त्रिलघुर्नगणः प्रोक्तस्त्रिका वर्णगणा मुने
ब्रह्मा, सनंदन ऋषि मला सांगतात की छंदांचे वैदिक आणि लौकिक असे दोन भाग आहेत. त्या दोघातही मात्रा आणि वर्णानुसार पुन्हा दोन प्रकार असतात. म्हणजेच मात्रावृत्त आणि गणवृत्त.
म य र स त ज भ न तसेच गुरु आणि लघु हे दोन असे हे दहा गणच वेगवेगळ्या छंदांना कारणीभूत आहेत असे काव्यशास्त्राचे ज्ञानी सांगतात.
ब्रह्मा, नंतरचे दोन श्लोक गणांची व्याख्या सांगतात. 'सर्वगो मगणः प्रोक्तो' म्हणजेच गणातील तीनही अक्षरे जर गुरु असतील तर त्याला 'म' गण म्हणतात. 'मुखलो यगणः स्मृतः' अर्थात् गणाच्या मुखाशी म्हणजेच पहिले अक्षर जर लघु असेल व बाकीचे दोन्ही गुरु असतील तर 'य' गण आहे असे समजावे. दोन बाजूला गुरु आणि मध्ये जर लघु असेल तर र. पहिले व दुसरे अशी दोन्ही अक्षरे ल असतील तर स गण. गणाच्या शेवटी ल, आधी दोन ग असतील तर त गण. फक्त मधलेच अक्षर ग असेल तर ज गण, सुरुवातीचे ग असेल तर भ गण. तिन्ही ल असतील तर न गण. असे वर्णगण आहेत असे सनंदन ऋषी मुनीला, म्हणजे मला सांगतात.
ब्रह्मा, सगळ्या गणांची व्याख्या दोन श्लोकात आली आहे बघ.
ब्रः आत्ता मला त्या 'मयौ रसौ तजौ भन्नौ' चा अर्थ कळला. मला वाटले की कवितेचा अर्थ दिसतो तसा नसतो आणि ती मयसभेसारखी मायावी असते म्हणून मयौ, कवितेत रस असतो म्हणून रसौ, कवितेत शब्दांचे तेज तळपते म्हणून तजौ, आणि कविता भन्नाट असते म्हणून भन्नौ असे असावे. पण ती नुसती म य र स त ज भ न, म्हणजेच य र त न भ ज स म अशा आठ गणांची यादी आहे. ते नारदपुराण पण तुझ्यासारखचं बंड दिसतं हं! भाषा येत नसली की काय काय अर्थ कळतात!
ना: ब्रह्मा, ही देवभाषा म्हणतात पण देवांनाच येत नाही. असो. तर ब्रह्मा, आता मात्र वृत्त शिकायची वेळ आली हं. मला सांग, सगळीच शिकायची की काही निवडकच?
ब्र: अरे सगळी. आपल्यापाशी खूप वेळ आहे. काही म्हणजे काही सोडायचे नाही. असून असून असणार किती? ७-८ तर भेंड्यांच्या मॅचमधेच होती. आणखी दहा-बारा असतील. त्यात काय धरायचे अन् काय सोडायचे!
ना: बरे बाबा. तर नारद पुराणात पुढे छंदांविषयी जे सांगितले आहे ते ऐक.
एकाक्षरात् समारभ्य वर्णौकैकस्य वृद्धितः
षड् विंशत्यक्षरं यावत्, पादस्तावत् पृथक् पृथक्
तत्परं चण्डवृष्ट्यादि दण्डकः परिकल्पिताः
त्रिभिः षड् भिः पदैर्गाथाः श्रुणु संज्ञा यथोच्तरम्
उत्यात्युत्त्का तथा मध्या प्रतिष्ठान्या सुपूर्विका
गायत्र्युष्णिगनुष्टुप् च बृहती पंत्त्किरेव च
त्रिष्टप् च जगती चैव तथातिजगती मता
शक्वरी सातिपूर्वा च अष्ट्यत्यष्टी ततः स्मृते
धृतिश्च विधृतिश्चैव कृतिः प्रकृतिराकृतिः
इत्येताश्छंदसां संज्ञाः प्रस्ताराद् भेदभागिकाः
ब्र: रामायण रामायण! नारदा, आता मला कळलं काकू भागवतपुराण ऐकताना वाती का वळतात ते. अरे एक अक्षर कळेल तर शपथ. पण पुण्य येत आहे, येत आहे, असं मात्र वाटत होतं. अगदी पवित्र पवित्र वाटत होतं. जरा अर्थ सांगा मुनिवर.
ना: ब्रह्मा, अर्थ तसा सोपा आह. सनंदन मुनी मला सागतात की छंद अनेक प्रकारचे असतात. एका पदात एक अक्षर असलेलेही असतात. दोन अक्षरे, तीन, चार असे सव्वीस अक्षरे पदात असलेलेही छंद असतात. त्याहीपेक्षा ज्यास्त अक्षरे असतील तर मग ते चंडवृष्टिप्रयात नावाच्या प्रकारात मोडतात. नंतर ऋषी अशा सव्वीस छंदांची नावे पण देतात. तसेच ह्या सर्व छंदात चार चरण असतात. कडव्यात तीन किंवा पाच चरण असले तर त्याला छंद न म्हणता गाथा म्हणतात. एक ते सव्वीस अक्षरांच्या छंदांची नावे अशी: उक्ता, अत्युक्ता, मध्या, प्रतिष्ठा, सुप्रतिष्ठा, गायत्री, उष्णिक, अनुष्टुप्, बृहति, पंत्त्कि, त्रिष्टुप्, जगती, अतिजगती, शक्वरी, अतिशक्वरी, अष्टि, अत्यष्टि, धृति, विधृति, कृति, प्रकृति, आकृति, विकृति, संकृति, अतिकृति, उत्कृति. ब्रह्मा, यातली शेवटची काही नावे श्लोकात नव्हती. ती मी इतर ग्रंथातून घेतली.
ब्र: पण नारदा, यात तू म्हणाला ते भुजंगप्रयात वगैरे कुठेच नाही. त्यात प्रत्येक चरणात बारा अक्षरे होती. पण इथे तर त्याला जगती म्हटले आहे. ते शार्दूलविक्रीडित पण कुठे दिसत नाही. इथेही पुन्हा सप्तद्वीप सप्तसमुद्रासारखाच प्रकार आहे काय? मला वाटलं आज कापूसकोंड्याची गोष्ट नव्हता सांगत तू.
ना: ब्रह्मा, जगतीमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक भुजंगप्रयात. पण बारा अक्षरी वृत्त अनेक आहेत. त्या पूर्ण कुळाचं नाव जगती. तसेच १९ अक्षरांचे चरण असलेली अनेक वृत्ते आहेत. त्या कुटुंबाचे नाव विधृति. त्यातलाच एक सदस्य शार्दूलविक्रीडित.
आता तू सांग, एक दोन तीन चार अक्षरे चरणात असतील, तर किती प्रकार प्रत्येकात होऊ शकतील. आपण आधी हा विचार केला आहे.
ब्र: नारदा, एकाक्षरी चरण असेल तर दोन प्रकार. कारण ते एक अक्षर लघु किंवा गुरु असू शकेल. दोन अक्षरे असतील तर चार प्रकार, कारण प्रत्येक अक्षर लघु किंवा गुरु असू शकते. तीन अक्षरे असतील तर आठ प्रकार. चार असतील तर सोळा. पाच अक्षरे असतील तर त्या वृत्तकुटुंबात बत्तीस प्रकार. सहा असतील तर चौसष्ट. सात असतील तर १२८. आठ असतील तर २५६. नऊ असतील तर ५१२, दहा असतील तर १०२४. अकरा असतील तर २०४८, बारा असतील तर ४०९६. म्हणजे, भुजंगप्रयातच्या कुटुंबात ४०९६ सदस्य. तो त्यातला एक मेंबर. बापरे!
ब्र: होय ब्रह्मा. अशी २६ कुटुंबे. व कुटुंबांचा आकार असा दुप्पट दुप्पट होत जातो. या सगळ्यांची बेरीज केली तर जी येईल तितके गणवृत्त कवितेत असतात. बारा अक्षरापर्यंत तू सांगितलेच. आता सव्वीसपर्यंत मी देतो बघ.
१३ अक्षरे : ८१९२
१४ अक्षरे : १६३८४
१५ अक्षरे : ३२७६८
१६ अक्षरे : ६५५३६
१७ अक्षरे : १३१०७२
१८ अक्षरे : २६२१४४
१९ अक्षरे : ५२४२८८
२० अक्षरे : १०४८५७६
२१ अक्षरे : २०९७१५२
२२ अक्षरे : ४१९४३०४
२३ अक्षरे : ८३८८६०८
२४ अक्षरे : १६७७७२१६
२५ अक्षरे : ३३५५४४३२
२६ अक्षरे : ६७१०८८६४
आणि बेरीज केली तर एक ते सव्वीस अक्षरांचे चरण असणाऱ्या कवितांच्या वृत्तांचे एकूण प्रकार किती ते सांग बघू.
ब्र: मला माहीत आहे. पण मी नाही सांगत जा. कविता शिकवतो म्हणता म्हणता तू गणितावर आला. मला गणित आवडते. पण हा आकडा कसा सांगावा ते मला माहीत नाही.
ना: अरे आकड्यातले आकडे सांग. हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष यांच्या पलिकडे काय असते ते आपण नंतर कधी पाहू. तेही नारदपुराणात आहे. गणितावर तर मोठा अध्याय आहे. उद्या तो वाचू. सांगता येत नसेल तर लिही इथे टेबलवर. काय?
ब्र: नारदा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! टेबलवर नाही लिहीत आता आयुष्यात कधी. तू ऐक, मी सांगतो. १३४२१७७२६.
ना: ब्रह्मा बरोबर. तेरा कोटी बेचाळीस लाख सतरा हजार सातशे सव्वीस. इतकी गणवृत्ते सव्वीस किंवा कमी अक्षरेच जर एका चरणात असतील तर तयार करता येतील. गणितात खरेच तुझा कोणी हात धरू शकत नाही. पण तू इतक्या लवकर इतके मोठे गणित कसे सोडवले?
ब्र: अरे मला चार चार प्रोसेसर्स आहेत. चार डोके. पॅरॅलल काँप्यूटिंग म्हणतात याला. सुपरकाँप्यूटर आहे मी अगदी ओरिजिनल.
ना: काय ब्रह्मा, ठीक आहेस ना? काय बोलतोस तू? मग तर आपण खूप पुढे जाऊ शकतो.
ब्र: नारदा, कां ते मला माहीत नाही. पण गणित मला ताबडतोब सुटते हे खरे. कालच मी सुपरकाँप्यूटरबद्दल वाचत होतो. तेव्हा मला माझे हे गुपित कळले. चार तोंडांचा काही तर फायदा. नाहीतर आजपर्यंत फक्त त्रासच व्हायचा त्यांचा. अरे झोपावं कसं माणसानी? कसही झोपलं तरी एक तोंड उशीतच जातं.
ना: हं. हे माझ्या लक्षातच नाही आलं. बरं झालं मी तुझ्यावर नाही गेलो. असो. तर ब्रह्मा सुरू करायचा का एका एका वृत्ताचा अभ्यास? नारायण नारायण!
ब्र: नको रे बाबा. अभ्यास संपेपर्यंत कलियुग संपेल. मग मला आठवा मनू आणावा लागेल. रामायण रामायण! भराभर आटोप. महत्त्वाचे, नित्याच्या वापरातलेच छंद घे. तेवढे पुरे आपल्याला भ्रमरपुराण लिहायला.
ना: ठीक आहे. आपण एकदम अष्टाक्षरी छंदापासून सुरू करू. हे सगळे अनुष्टुप् नावाच्या छंदात मोडतात. याचे २५६ प्रकार आहेत हे आपण आधीच पाहिले आहे. त्यांना वेगवेगळी नावे पण प्राचीन ग्रंथात दिली आहेत. विद्युन्माला, चित्रपदा, नगस्वरूपिणी, समानिका, श्लोक वगैरे. आपण गीतेचा श्लोक म्हणतो तेव्हा श्लोक हे अनुष्टुप् छंदाच्या एका प्रकाराचे नाव आहे हे विसरून जातो. प्रत्येक चरणात पाचवे अक्षर लघु, सहावे गुरू हवे. पहिल्या व तिसऱ्या चरणात सातवे अक्षर गुरु व दुसऱ्या व चौथ्यात ते लघु असले पाहिजे. बाकी अक्षरांवर काही बंधने नाहीत. एवढी शिस्त पाळली की झाला श्लोक नावाचा छंद.
ऊर्ध्वमूलमधः शाखं अश्वत्थं प्राहुरव्ययं
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्
बघ तपासून. गीतेचा श्लोक. अगदी श्लोक छंदाच्या साच्यात बसणारा.
ब्र: खरेच. हा श्लोक छंद आहे. असेच बाकीचे गीतेचे श्लोक असतील. सातशे आहे म्हणतात. मी तपासून पाहीन. आता आपल्या खोलीत गीता पण आहे.
ना: आता हे तुझे आवडते पद बघ. सांग काय वृत्त आहे ते.
मयौ रसौ तजौ भन्नौ गुरुर्लघुरपि द्विज
कारणं छंदसि प्रोक्ताश्छंदः शास्त्रविशारदैः
ब्र: अरे हाही श्लोकच आहे. नारद पुराण सारे अशा श्लोक छंदातच की काय?
ना: होय ब्रह्मा. नारद पुराणात एकूण पंचवीस हजार श्लोक आहेत. भागवत पुराणात अठरा हजार. अठरा महापुराणे मिळून चार लाखावर श्लोक आहेत. इतर प्राचीन ग्रंथही धरले तर लाखो कविता अनुष्टुप्, आणि त्यातल्याही त्यात श्लोक छंदात आहेत. हा विक्रम दुसरे कुठलेही वृत्त तोडेल हे अशक्य. आपण ब्रह्मपुत्र पुराणात समजा आर्यावृत्त वापरले तरी वापरून वापरून किती वापरणार? किती आर्या लिहायचा विचार आहे तुझा?
ब्र: नारदा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! अरे. आधी लिहू तर दे. सुरुवात तर करू दे. आधी केले, मग सांगितले. करायच्या आधीच काय जाहिरात?
ना: बरे बाबा! लिहू फारच फार तर एक हजार कडवे. आता आपण एकदम एकादशाक्षरी चरण असणाऱ्या कवितांकडे वळू. ब्रह्मा, अकरा अक्षरी चरण असणाऱ्या कवितांमध्ये इंद्रवज्रा नावाचे वृत्त प्रसिद्ध आहे. याचे गण आहेत ततजगग. त आणि ज मधे तसा फारसा फरक नाही. त म्हणजे गगल आणि ज म्हणजे लगल. इंद्रवज्राचे उदाहरण बघ.
निर्मानमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख संज्ञैर्गच्छंत्यमूढाः पदमव्ययं तत् ।।
गीतेत या वृत्ताचाही बराच वापर आहे. तपासून बघ ततजगग.
ब्र: अगदी फिट्ट बसते हे ततजगग मध्ये. हेच वृत्त इंद्रानी हनुमानावर फेकले होते का रे?
ना: ती कापुसकोंड्याची गोष्ट तूच सांग मला. मला नाही माहीत. ब्रह्मा, ततजगग ऐवजी जतजगग असेल तर त्याला उपेंद्रवज्रा वृत्त म्हणतात. काका बरेचदा म्हणतात बघ.
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव
ब्र: हं. नारदा दोन वृत्तात फक्त पहिले अक्षरच काय ते वेगळे. एकात ते गुरु, एकात ते लघु. चालही दोन्ही वृत्तांची एकसारखी. अगदी जुळे वाटावे असे.
ना: होय ब्रह्मा. म्हणूनच यांच्यासारखेच आणखी अनेक वृत्त आहेत. चार चरणांपोकी पहिले व तिसरे इंद्रवज्राचे, व दुसरे चौथे उपेंद्रवज्राचे वापरले तर उपजाती नावाचे वृत्त होते. असेच आणखी अनेक वृत्त. तसेही अकरा अक्षरी गणवृत्तात २०४८ प्रकार असतात हे तुला माहीतच आहे. दोनचारच आपण पाहिले.
ब्र: मी करून पाहीन बाकीच्या दोन हजार चौरेचाळीस एकादशाक्षरी वृत्तात कविता. आता बारा अक्षरी वृत्त सांग एखादे.
ना: तूच सांग एखादे माहितीतले. तुला कमीतकमी २०५ अशी कडवी माहीत आहेत ज्यांचे चारही चरण बारा अक्षरी असतात.
ब्र: हं. उद्या लग्न आहे. भुजंगप्रयात. यययय.
ना: खूप सोपे, व खूप वापरातले हे वृत्त. आपल्या खोलीत 'मनाचे श्लोक' नावाचे एक पुस्तक आहे बघ. त्यातही २०५ कडवी आहेत. खरे म्हणजे ते श्लोक वृत्तात नाहीत. भुजंगप्रयात वृत्तात आहेत. पण श्लोक म्हणतात खरे. खरे श्लोक म्हणजे गीतेचे, नारदपुराणातले. असो. नारदा, कविता करणे सुरू करायला हे सोपे वृत्त आहे रे. कर एखादे कडवे.
ब्र: जशी आज्ञा!
मला चार तोंडे, तुला लांब शेंडी
हहाहा हिहीही डडाडा डिडीडी
जरी दृश्य नाही, जरी सत्य नाही
डडाडा डिडीडी हहाहा हिहीही
ना: एकदम छान. अगदी वृत्तबद्ध. कविता अशीच करतात. जिथे शब्द आठवत नाही तिथे गण जुळतील असा वायफळ शब्द ठेवायचा. मग आपल्याला अभिप्रेत अर्थ असलेला शब्द शोधायचा व टाकायचा त्या साच्यात. आपल्या शब्दसंपत्तीची अनायासेच छान उजळणी होते. आणि मग हवा तसा शब्द सापडला की ब्रह्मानंद!
ब्र: नारदा, २०४८ पैकी हा एक छान प्रकार झाला. आणखी असेच गोड चालीचे काही द्वादशाक्षरी वृत्त आहेत का रे?
ना: ब्रह्मा, यययय जर वृत्त असू शकते, तर रररर का नाही? कर प्रयत्न. र म्हणजे गलग म्हणजे गुरु-लघु-गुरु. म्हणजे तुझ्या भाषेत डाडडा.
ब्र:
नारदा नारदा नारदा नारदा
हे तुझे वागणे काय रे नारदा
ना मला आवडे, ना तुला शोभते
लाज रे डाडडा डाडडा वाटते
ना: बघ कशी ठसकेदार चाल आली. या वृत्ताला स्रग्विणी म्हणतात. आता आणखी काही तूच सुचव, तूच गण ठरव. तूच कविता कर. तू गणाधीश होत आहेस आता.
ब्र: हं. यययय झालं. रररर झालं. आता सससस पाहू. स म्हणजे लघु-लघु-गुरु. डडडा.
डडडा डडडा डडडा डडडा
डडडा डडडा डडडा डडडा
छान ठेका येईल नारदा. करता येईल कविता. तू सांग ना काही.
ना: ब्रह्मा, या द्वादशाक्षरी वृत्ताला तोटक म्हणतात. मला एक खूप छान कविता माहीत आहे या तोटक वृत्तावर आधारित. ऐक.
अधरं मधुरं वदनं मधुरं
नयनं मधुरं हसितं मधुरं
ह्रदयं मधुरं गमनं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरं
ब्रह्मा, असेच सजसस गण असतील तर प्रमिताक्षरा वृत्त, ममयय गण असतील तर वैश्वदेवी वृत्त, ततजर असतील तर इंद्रवंशा वृत्त, जतजर असतील तर वंशस्थ वृत्त, नभभर असतील तर द्रुतविलंबित वृत्त. हे व अन्य द्वादशाक्षरी वृत्त वापरून केलेल्या संस्कृत कविता प्राचीन ग्रंथात सापडतात. ब्रह्मा हे सगळे द्वादशाक्षरी वृत्त जगति छंदप्रकारात मोडतात हे तुला माहीतच आहे. छंदशास्त्रात आणखीही याच कुटुंबातले अनेक वृत्त आहेत. नावे सुद्धा सुंदर ठेवलेली आहेत. कुसुमविचित्रा, चंचलाक्षिका, कान्तोत्पीडा, वाहिनी, नवमालिनी, प्रमुदितवदना, प्रियंवदा, मणिमाला, ललिता, मोहितोज्ज्वला, प्रभा, मालती, वगैरे वगैरे. प्रत्येकाला सुंदर चाल.
ब्रह्मा, कवितेचे छंद आणि संगीत यांचे म्हणूनच फार जवळचे नाते आहे. आठ गण आणि सात सूर मिळून विश्व निर्माण करू शकतात. ब्रह्मा, मला तर वाटते की तू गायन शिकायला हवे. तू काय काय गाऊ शकशील! नवे नवे राग निर्माण करू शकशील. तू एकटाच असा गायक होशील जो एकल, युगल, समुहगीत, कोरस सगळ काही स्वतःच गाऊ शकतो. चार तोंडांनी चार आवाज. चार तोंडे एकसाथ गातील तर तू सवाई तानसेन होशील.
ब्र: हं, चला पुढे. त्रयोदशाक्षरी वृत्ताकडे. कुलनाम
अतिजगती. एकूण प्रकार ८१९२.
ना: ब्रह्मा, तेरा नको रे. तेराचा आकडा अशुभ मानतात. काकाकाकूंच्या घरी नेमकं त्रयोदशाक्षरी वृत्त नको. चौदाही नको. आपण सरळ पंधराकडे वळू. हे छंदकुटुंब अतिशक्वरी नावानी प्रसिद्ध आहे. त्यात ३२७६८ प्रकार आहेत. मालिनी नावाचं वृत्त प्रसिद्ध आहे. ननमभभ याचे गण.
टटटट टटटाटा टाटटा टाटटाटा
ब्र: हं. ते करुणाष्टक या वृत्तात होते. पण तू तर तेव्हा हे अनुष्टुभ वृत्त आहे म्हणाला होतास.
ना: अरे माझी ती चूक होती. तू बरी पकडलीस. पण आता तू मालिनी वृत्त वापरून एक कविता कर बघू.
ब्र:
मज तुज अति भावे रोज कापूसकोंड्या
अढळ ध्रुव कधी वा, वा कधी छान भेंड्या
अचपळ मन माझे नावरे आवरीता
गणित मजसि यावे, नारदा तूच त्राता
ना: अरे वा! पूर्ण कडवे केलेस. थोडे वाङमयचौर्य आहे. पण चालेल. व्हेरी गुड!
ब्रह्मा, पंधरा अक्षरी वृत्तात आणखी एक मजेशीर वृत्त आहे. नाव मला आठवत नाही. शोधू पुढे कधी. भेंड्यांच्या वहीत ही कविता होती. आणि ल अक्षर आले की मास्तरांची मुले मोठ्या ठसक्यात ही कविता म्हणायची.
लेह्य पेय चोश्य खाद्य भक्ष भोज्य आणिती
जे जयासि आवडे तयासि तेचि वाढिती
प्रीतिपाद्य बद्धहस्त काैंडणेश लाघवी
स्वस्थ चित्त जेविजे, विवाहियास वीनवी
म्हणजे रजरजर. र गण म्हणजे गलग. ज म्हणजे लगल. म्हणजेे प्रत्येक चरणात अक्षरांचा क्रम गलगलगलगलगलगलगलग. आलटून पालटून गुरु आणि लघु. ही कविता म्हटली की अक्षरशः टाळ्या पडायच्या. तू कर बघू एखादी कविता.
ब्र:
तू मुनी असा कसा, सदैव त्रास देतसे
काय ते तुझे खट्याळ हासणे मला दिसे
मी तुझा पिता जरी, अनादि मी अनंत मी
तीन लोक फक्त तूच रे ध्वजास नेतसे
ना: आता सोळा अक्षरी वृत्त. कुलनाम अष्टि. एकूण प्रकार ६५५३६. पण ते जाऊ दे. तू थकलेला वाटतोस. सतरा अक्षरी बघू. वृत्तसमुदायाचे नाव अत्यष्टि. एकूण प्रकार १३१०७२. त्यातले एक वृत्त खूप प्रसिद्ध. तू रोज ऐकतोस काकाकाकूंना विष्णुसहस्रनामातलं हे पद म्हणताना. आहे आपल्या खोलीत ते पुस्तक पण.
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं
याचे गण मभनततगग. मंदाक्रांता नाव आहे या वृत्ताचे. खूप सुंदर चाल. एक शिखरिणी नावाचे वृत्त पण असेच सुंदर आहे. यमसनभलग.
उभा राहे एके चरणि धरणीते धरुनिया
तपश्चर्या वाटे करित जणु डोळे मिटुनिया
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेचि फसती
परी ज्ञाते त्याचे कपट लवलाही उमजती
आता माझी एक स्वरचित कविता ऐक याच शिखरिणी वृत्तातली.
कसा तू भोळा रे, तुज न उमगे भेद मनिचा
कसा तू ब्रह्मा रे, तुज न शिवला गर्व कणिचा
कसा तू देवा रे, नच तुज असे गंध इथला
इथे सारे काळे, तुज परि दिसे शुभ्र धवला
ब्रह्मा, सतरा अक्षरांचे आणखी एक वृत्त प्रसिद्ध आहे. नाव पृथ्वी. गण जसजसयलग. तू ऐकलं पण आहेस. जंतुकवीच्या बालवेदात चंद्रिका म्हणून एक कविता याच वृत्तात होती. आठवते का? यालाच वसंततिलका म्हणतात काही जण बहुधा. तशाच चालीवर आणखी एक कविता मला अर्धीच आठवते.
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे
ब्र: माहीत आहे. चाल खूप आवडली म्हणून मी पण या चालीवर कविता करायचा प्रयत्न केला होता.
मुनी तव शिरी उडे भुरभुरी तुझी शेंडिका
कका किककिकी कका किककिकी ककाका कका
चाल खूप प्रसन्न. आता अठरा अक्षरी वृत्त सांग.
ना: त्याहीपुढे जाऊ. एकोणीस अक्षरी. अतिधृति गटातले वृत्त. एकूण ५२४२८८ प्रकार. एक फार प्रसिद्ध. तुझ्या आवडीचं. शार्दूलविक्रीडित.
ब्र: हं माहीत आहे. मसजसततग. मंगलाष्टकांचं वृत्त. मी एक कडवे करून पाहिले होते. अर्धवटच राहिले.
आहे पृथ्विवरी अनेक गमती भावे पहाया मला
वाटे वाचुनि सत्वरी समजु या, 'मी कोण' सांगा मला
नाही सत्य, न देव मी, मनुज हा कां मानतो रे मला
लालाला ललला लला लललिला कां नारदाला मला
ना: छान. पण ब्रह्मा तुला कंटाळा आला आहे असे वाटते. झोप येत असेल कदाचित. महत्प्रयासाने तू जांभई जिरवत आहेस. ते फार धोक्याचे रे बाबा. ब्रह्मजांभई उफाळून आली तर काळ पुढे जाईल. कलियुगच संपेल एखाद्या वेळेला. सातव्या मनूचं मानवांतर संपेल. ताबडतोब आठवा मनू अरेंज करावा लागेल तुला. तू सांग, पुढे जायचं, की थांबायचं?
ब्र: यययय
नको फार आता, पुरे रे पुरे रे
मला झोप येते, असा तू कसा रे
उद्या सांग पुन्हा, तुला काय घाई
उद्या सूर्य येईल, कल्पांत नाही
ना: वा ब्रह्मा! तू आता खरोखरच कवी झालास. तुला वृत्तज्ञान आले. छंदशास्त्र समजले. आता खरेच पुरे. शुभरात्री!
_____________________
गोष्ट आठवी
काका: मालकीणबाई, आज आम्ही दिवसभर घरी नाही हे माहीत आहे ना? आमची आज सिनियर सिटिझन क्रिकेट मॅच आहे. नाश्ता झाला की आम्ही जाऊ. एकदम संध्याकाळी परत येऊ. आज ब्रह्मदेव पण आला तरी आम्ही काही बाद होणार नाही. सेंचुरी पक्की.
काकू: अहो मी पण रविवार पाहून आज महिला मंडळाची घरीच मीटिंग ठेवली आहे. वर्ष झालं मीटिंग होऊन. मीटिंग ठरते आणि रद्द होते. अामच्या मंडळात भांडणेच फार. कागाळ्या, चुगल्या यातच सगळ्यांना मजा येते. शेवटी मीच पुढाकार घेतला व घरीच भेंड्यांची मॅच ठेवली. त्यानिमित्ताने तरी काही जणी एकत्र येऊ. दोन टीम्स केल्या आहेत पाचपाचच्या. एका टीमचं नाव शारदा आणि दुसरीचं सरस्वती. मी शारदाची कॅप्टन आहे. सरस्वतीची कॅप्टन तीच आपली घटवाई. ध चा मा करतात तसाच तिच्या नावात कोणीतरी स चा घ केला असे वाटते. अगदी कळीची नारदच! पण आज मात्र बघ म्हणावं, माझ्याशी गाठ आहे.
तुम्ही नं, आरामात घरी या. पाचच्या आधी तर नकोच नको.
काका: तुझ्या सगळ्या साळकाया माळकाया गेल्या की तू मला मेसेज कर. मी मगच येईन. आता मस्त फोडणीचे पोहे कर. मागून पुढून आपलं जंबुद्वीपामृत.
काकू: बस, दहा मिनिटं.
ब्र: नारदा, आपली दोघांचीही नावे आलीत रे. आपले बिंग फुटले की काय? की त्या आंगणातल्या कोरलेल्या जंबुद्वीपासहित सप्तद्वीपांनी व सप्तसमुद्रांनी घात केला? काल रात्री ते मिटवायचे राहूनच गेले. जंबुद्वीपाचा पण उल्लेख आला. आपल्या गोष्टीतले शब्दही नारदा येथे हवेत राहून जातात का रे? आणि मग तेच श्वासाबरोबर आत जाऊन यांच्या मुखाद्वारे बाहेर येतात असे मला वाटते. आपल्याला मूर्त स्वरूप नसले तरी आपल्या काही कृती नक्कीच इथल्या वातावरणात दरवळतात आहे असे मला वाटते. माझा संशय वाढतो आहे नारदा. नाहीतर नेमका आजच जंबुद्वीपाचा पण उल्लेख का?
ना: ब्रह्माजी, असे काही नाही. आपली नावे म्हणजे या मानवांकरिता तोंडीलावणे झाले आहे. आपली कालची गोष्ट भागवत पुराणातली आहे. काकाकाकू तसेही धार्मिक आहेत. शेजारच्या देवळात भागवत सप्ताह ऐकायला बरेचदा जातात. म्हणून तर काकूंच्या पेटकोलीत शंभर शंभर वातींच्या शंभर तरी जुड्या आहेत. पुराणात तुझा तर उद्धार कितीदा तरी होतो. त्यामुळे आपल्या नावाचा केवळ उल्लेख झाला म्हणजे आपले बिंग फुटले असे नाही. हा केवळ योगायोग. आणि ब्रह्मा, कल्पनेला बिंग नसते. ते फुटणार कसे?
ब्रह्मा, चिअर अप! आज आपल्याला भेंड्यांची स्पर्धा पाहायला मिळणार. काकूंची शारदा टीम नक्कीच जिंकणार. वाड्यातले कोणीही कधीही भेंड्यात हारत नाही. सप्तस्पर्धात सप्तढाली मास्तरांचे हे सप्तवीर दरवर्षी मिळवायचे.
ब्र: नारदा, मला वाटायचे पुराणात सहाचा जोर खूप असतो. पण आता वाटते की सात हा कथाकाराचा ज्यास्त आवडता आकडा. सप्तद्वीप, सप्तसमुद्र, सप्तर्षी, भागवत सप्ताह वगैरे वगैरे.
ना: ब्रह्मा, तेवढ्यावरच हे थांबत नाही. राजा वीरव्रताच्या रथाने जी सप्तद्वीपे तयार झाली त्यांतील प्रत्येकावर वीरव्रताने आपल्या सप्तपुत्रांपैकी एकेकाची नेमणूक केली. त्या प्रत्येक पुत्राला प्रत्येकी सात पुत्र झाले. प्रत्येत द्वीपावर सप्तवर्ष, म्हणजे सप्तदेश निर्माण करून त्यातील एकेकावर वीरव्रताचे हे नातू राज्य करू लागले असाही पुराणात उल्लेख आहे.
ब्रह्मा, वीरव्रताच्या रथाच्या चाकांच्या सात खाचा का पडल्या याचेही भागवतात वर्णन आहे. सूर्य रात्री मेरू पर्वतामागे जातो आणि भारतवर्षात अंधार पडतो याचा राजा वीरव्रताला खूप राग आला. सूर्य मेरूच्या उत्तरेला गेला की मेरूच्या दक्षिण प्रदेशात मी स्वतः प्रकाश पाडीन अशी त्याने वल्गना केली. त्या दृष्टीने तो सूर्यासारखेच, पण बारा तास उशिराने रथात बसून मेरूभोवती फेरे मारू लागला. वेगवेगळ्या व्यासाचे सात फेरे त्याने मारले व त्यामुळेच सात खाचा पडून सात समुद्र तयार झाले. ही सत्यकथा मी भागवत पुराणात वाचली आहे.
ब्र: नारदा, वाड्यातील मास्तरांनाही सात मुलीमुले होती ह्यातही काही संकेत असेल का रे?
ना: ब्रह्मा, असेलही. प्रत्येक गोष्टीत योगायोग, संकेत धुंडाळायची मास्तरांना पण सवय होती. तुझेही आजकाल तसेच होते आहे. छान. अविश्रांत विचारचक्राची ती ग्वाही आहे. बुद्धिमान मनुष्याचे विचारचक्र जागृतपणीच नाही, तर निद्रावस्थेतही सुरू असते. म्हणूनच तर स्वप्न पडतात. अगदी सूर्यासारखी अखंड तळपते ह्या मानवाची बुद्धी. दिवसा तर सूर्य असतोच, पण सूर्य बुडला असे आपण म्हटले तरी त्यावेळी तो कुठे दुसरीकडे तितक्याच तेजाने तळपत असतो. सूर्य चालतो तोवर सृष्टी जिवंत, बुद्धी चालते तोवर मनुष्यप्राणी जिवंत.
ब्र: नारदा, पुन्हा तू सूर्याचा विषय काढला. आजतरी सांगणार ना मला तारांगणाची, तारामंडळाची गोष्ट? की आजही कालसारखेच?
ना: ब्रह्मा, आज कसे शक्य आहे? अरे, किती वर्षांनी भेंड्यांचा सामना, अंताक्षरीचा सामना पाहायचा योग आला आहे. वाड्यात असतांना मी मुलामुलींच्या सगळ्या सामन्यांना जात असे. एकही मी बुडविला असे झाले नाही. वाड्यातील भेंड्या आणि पुरणपोळी मी कधीच विसरू शकत नाही. अगदी घरपोच आलेली अशी सुवर्णसंधी दवडणे योग्य नाही. कापुसकोंड्याची गोष्ट काय, उद्याही सांगता येईल. पण भेंड्या, त्याही मास्तरांच्या मुलीचा सहभाग असलेल्या, म्हणजे अहो भाग्यम्! तूही बघ. आल्याच बघ बाया. चहा झाला की केव्हाही सुरू होतील भेंड्या.
ब्र: बरे बाबा. पण मला तू सर्व समजवून सांगत जा. स्पर्धेचे नियम, कवितांचे अर्थ, लौकिकार्थ, मतितार्थ, गर्भितार्थ, व्यंगार्थ, कवि कोण, सारे सारे.
ना: सांगीन कानात. ब्रह्मा, या खेळात ५-५ जणांची चमू असते. आज काकू व त्यांच्या ४ मैत्रिणींची एक चमू, जिचे नाव शारदा. तसेच ५ अन्य मैत्रिणींची दुसरी चमू, सरस्वती. शारदाच्या कॅप्टन, म्हणजे चमूच्या ब्रह्मदेव, काकू आहेत. सरस्वतीच्या कॅप्टन घटवाई बाई. त्याही काही कमी नाहीत. सामना अटीतटीचा होईल. पण शेवटी काकू जिकडे, विजय तिकडे हेच निश्चित.
ब्रह्मा, बघ चहापाणी आटोपले. दोन्ही चमू समोरासमोर स्थानापन्न पण झाल्या. काकू आणि घटवाई बाई आता नाणेफेक करतील.
ब्र: ही नाणेफेक म्हणजे रे काय?
ना: ब्रह्मा, सामन्याला सुरुवात कोणी करायची ते ठरविण्याची पद्धत. काकूंकडे एक नाणे आहेत. वंशपरंपरेने चालत आलेले. त्याच्या एका बाजूस ब्रह्मदेव, व दुसऱ्या बाजूस नारदाचे चित्र कोरले आहे. काकू नाणे वर फेकतील आणि ते पडण्याच्या आत घटवाई बाई नाणे जमिनीवर पडल्यावर वरच्या भागाला ब्रह्म असेल की नारद असेल याचा कयास लावतील. त्यांचा कयास खरा ठरला तर नाणेफेक त्या जिंकतील व पहिली कविता त्या म्हणतील. कयास खोटा ठरला तर काकू नाणेफेक जिंकतील व पहिली कविता म्हणतील.
बघ आपण बोलत असता नाणेफेक झालीही आणि काकू आता कविता म्हणायला सुरुवात करतील. ही मास्तरांची मुले कुठल्या कवितेने भेंड्या सुरू करतात ते मला माहीत आहे.
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
सदानंद आनंद साऱ्या जगाचा
बघ काकू सुरु करीत आहेत. ऐक काय कविता म्हणतात ते.
शारदा चमू:
सुवर्ण मेरु उभा मधोमध, जंबुद्वीपची स्वर्ग असे
चला करू या सुरू आजचे भेंड्यांचे हे युद्ध कसे
सरस्वती, शारदा चमूंचे सैन्य उभे ठाकले असे
कुरुक्षेत्र हे, कविता येथे एकमेव शस्त्रास्त्र असे
ब्र: नारदा, ही तर वेगळीच कविता आहे रे.
ना: हं. आश्चर्यच आहे. काळ खरेच पुढे गेला नारदा. जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षांनी मी भेंड्यांचा सामना बघतो आहे.
ब्र: मला अर्थ सांग आणि थोडे सामन्याचे नियम पण समजावून सांग. आपल्यालाही फावल्या वेळात खेळता येईल कधी.
ना: ब्रह्मा, काकूंनी एक कवितेचे कडवे म्हटले. कविता मी कधीही ऐकली नाही. मास्तरांच्या भेंड्यांच्या वहीतली नाही. माझ्या वाचनातली पण नाही. काकूंना कुठे गवसली हे कळत नाही. ब्रह्मा, कवितेचा अर्थ सोपा आहे. कवी म्हणतो की जंबुद्वीप हे त्याच्याकरिता स्वर्गासमान आहे आणि त्याच्या मधोमध एक सुवर्णाचा मेरुपर्वत उभा आहे. देवा, हे अगदी मी तुला आधी सांगितल्याप्रमाणे, भागवतपुराणात जसे सांगितले आहे तसेच आहे. नंतर कवि म्हणतो की हा आजचा सामना शारदा आणि सरस्वती अशा दोन चमूतील आहे व दोन्ही चमूंचे सैन्य युद्धाला तयार आहे. या युद्धात आणि महाभारत युद्धात एवढाच फरक आहे की येथे कविता हेच एकमेव शस्त्र आहे. कवीने उल्लेख न करता असेही सुचविले आहे की हे भेंड्याचे युद्धही धर्मयुद्धासारखेच लढायला हवे. लबाडी न करता. ब्रह्मा, महाभारत युद्धाच्या कथेचा जनमानसावर जो ठसा आहे तो अवर्णनीय आहे आणि पुराणातील कथा यांच्या मनात नेहमीकरिता वास करतात. म्हणून ब्रह्मा, आपण काल्पनिक की सत्य हा वाद बरेचदा अनाठायी आणि निष्फळ ठरतो.
ब्रह्मा, आता सरस्वतीची पाळी आहे. काकूंच्या कवितेचे शेवटचे अक्षर, अंताक्षर 'से' आहे. सरस्वतीला 'स'च्या बाराखडीतल्या, म्हणजे 'स, सा, सि, सी, सु, सू, से, सै, सो, सौ, सं' पैकी कुठल्यातरी अक्षराने कविता सुरू करावी लागेल. ऐक घटवाई बाई काय म्हणतात ते.
सरस्वती:
सूर्यचि आम्हा प्रकाश देतो, दिन रजनी तोची करितो
तोच स्वतःचा वेग कधी वाढवुनी दिन छोटा करितो
वेग कमी होता दिन मोठा, रात्र होतसे पुन्हा लहान
तोचि करविता सहा ऋतूंचा, शक्तिस्रोत तो, तोचि महान
ना: ब्रह्मा, पुन्हा एकदम न ऐकलेली, न वाचलेली कविता. सूर्याचे गुणगान करणारी कविता. रात्र आणि दिवस सूर्यामुळेच होतात हे सत्य सांगणारी कविता. ब्रह्मा, सध्या दक्षिणायन सुरू आहे. दिवस लहान व रात्र मोठी असते. उद्या, २१ डिसेंबरला दिवस सगळ्यात लहान व रात्र सगळ्यात मोठी असेल. नंतर दिवस हळूहळू मोठा होईल व रात्र लहान होत जाईल. सहा महिन्यांनी, २१ जूनला दिवस सगळ्यात मोठा व रात्र सगळ्यात लहान होईल. २१ सप्टेंबर व २१ मार्चला दिवस आणि रात्र बरोबर १२-१२ तासांचे असतील. हे सर्व सूर्य आपला वेग कमी ज्यास्त करतो म्हणून होते असे कवी म्हणतो. सहा ऋुतु, म्हणजे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे सूर्यामुळेच होतात असेही कवी म्हणतो. सर्व जगाच्या शक्तीचे उगमस्थान सूर्यच आहे, तो महान आहे असेही कवी म्हणतो.
ब्रह्मा, अगदी हेच भागवतपुराणातही लिहिलेले आहे, आणि मी तुला आपल्या गोष्टीतही तेच सांगितले असते.
ब्र: वा, बरेच झाले. तू सांगायला चालढकल करीत होतास. योगायोगाने, सरस्वतीने मला ते सांगितले. नारदा बघ, शारदा चमूने आपसात बरीच कुजबुज केली व खूप आनंदाने आता काकूच पुन्हा कविता म्हणणार असे दिसते. मला माहित आहे त्या 'न'च्या बाराखडीतलेच काहीतरी घेऊन कविता म्हणतील. म्हणतात बघ!
शारदा:
नसे यास सुट्टी, न याला विसावा
तया दर्शने येतसे स्फूर्ति जीवा
दिशा पूर्व लाजे सरे रात्र जैसी
तिच्या गालि लाली पहाटेस कैसी?
ना: ब्रह्मा, आज सूर्याचाच दिवस दिसतो. तसाही रविवारच आहे म्हणा. काकूंची कविताही सूर्यावरच आहे. चाल वेगळी आहे हे तुझ्या लक्षात आले असेल. सुटसुटीत चाल. अशा ठेक्याच्या कवितेला भुजंगप्रयात वृत्तातली कविता म्हणतात. मी आधी म्हटलेली 'गणाधीश जो ईश' पण याच साच्यातली. जंतुकवीची 'उद्या लग्न आहे' तर पूर्ण अशाच वृत्तातली.
ब्र: हं. खरेच. पण नारदा, अशी कुठलीही चाल चालते का रे?
ना: भेंड्यात वृत्तबद्ध कविता हवी. कवितेला त्याने सुरेख चाल येते. जंतुकवी म्हणतो 'कविता म्हणजे कदमताल । एकच ठेका, एकच चाल।।'. नाहीतर मग ते गद्य होईल. भेंड्यामध्ये गद्याला प्रवेश निषिद्ध.
ब्र: मास्तर, जरा अर्थ पण सांगा. तसेच शारदा चमू एवढी खूष कां तेही सांगा.
ना: ब्रह्मा, अर्थ तर फार सोपा आहे. कवी म्हणतो, सूर्याला कधी सुट्टी नसते, न कधी आराम. याच्या केवळ दर्शनाने प्राणिमात्राला स्फूर्ति येते. पूर्व दिशा पहाटे तांबड्या लाल रंगाने उजळते. जणू ती कोणाची चाहूल लागून लाजते व तिचे गाल लाल लाल होतात. ब्रह्मा, सूर्योदयापूर्वीच्या पूर्वरंगाचे नाजुक वर्णन कवी करतो या कवितेत.
ब्रह्मा, आधीची कविता 'न' ने संपली. काकू 'न'च्या बाराखडीतले कुठलेही अक्षर घेऊ शकल्या असत्या. पण त्यांनी ना, नि, नी वगैरे न घेता 'न' पासूनच कविता सुरू केली. याला दाम म्हणतात. दाम साधल्यामुळे त्यांच्या चमूला १ गुण मिळाला. सरस्वतीला अजूनतरी काही नाही. काकूंची चमू आता एक-शून्य ने आघाडीवर आहे. म्हणून सर्वजणी आनंदल्या होत्या.
ब्रह्मा, बघ आता घटवाई बाईंची चमू काय करते. आपसात सल्लामसलत करून बघ कोणीतरी कवितेला सुरुवात करीत आहे.
सरस्वती:
सप्ताश्वा रथि लावुनी अरुण जो सारथ्य त्याचे करी
आणी हा रथ आगळा, नच दुजा विश्वात कोठे तरी
याला एकच चाक, नाहि दुसरे, वेगात धावे तरी
पूर्वेसी अरुणोदयास उधळे आभा किती गोजिरी
ना: ब्रह्मा, शारदाची कविता 'कैसे'वर संपली होती. सरस्वतीने 'स'ने सुरुवात केली. म्हणून दाम झाला नाही. पण कविता सुंदर. कवि सूर्याच्या सात घोड्याच्या, एका चाकाच्या रथाचे वर्णन करून म्हणतो की असा रथ जगात दुसरा नाही. रथाचा सारथी अरुण असून तो रथ वेगाने हाकतो. पूर्वेला अरुण रथ घेऊन येताच जी दिव्य आभा दाटते त्याचे कवी वर्णन करतो.
ब्रह्मा, सूर्याच्या ह्या एक चाकी रथाचे, सात घोड्यांचे, अरुण सारथ्याचे वर्णन अगदी भागवत पुराणातील वर्णनाशी जुळते. सूर्यचंद्राच्या आपल्या कापुसकोंड्याच्या गोष्टीचे अपहरण झाले की काय असा संशय येण्याइतपत आजच्या भेंड्या आगळ्या वेगळ्या आहेत. असो.
ब्र: नारदा, रोजच्या पाहण्यातला हा सूर्योदयाचा मनोवेधक सोहळा. पण आज काळ बदललेला दिसतो आहे. उंचच उंच इमारतीतून सूर्य रे काय दिसणार. आणि दैनंदिन धकाधकीत वेळ तरी कुणाला? लोक सूर्योदय पाहायला माथेरान की कुठेतरी जातात म्हणे. मला काही दिवसापूर्वी अर्नाळपुराणात तू आणि मीही माथेरानला गेलो होतो असा उल्लेख आढळला. खरेच असावे. त्यापुराणाच्या सत्यतेबद्दल मला मुळीच संदेह नाही. 'घडले ते सांगितले' असे ते निर्मळ पुराण.
ना: ब्रह्मा, सांग की रे तो माथेरानचा अध्याय.
ब्र: बघू नंतर कधी. आत्ता नको. केव्हाही शारदाची कविता सुरू होईल. पण नारदा, खरेच का रे सूर्याचा रथ एक चाकाचा?
ना: ब्रह्मा, रथ, रथी, सारथी यांचे वर्णन इतरत्रही आहे. हाच श्लोक बघ.
एकचक्रो रथो यन्ता विकलो विषमे हयाः ।
आक्रामत्येव तेजस्वी तथ्याप्यर्को नभस्तलम् ।
ब्रह्मा, एक चाकाचा रथ, अपंग विकलांग सारथी, विषम घोडे, म्हणजे ३, ५, ७ वगैरे, असूनही तेजस्वी सूर्य आकाशावर आक्रमण करायला चुकत नाही, असे हा कवीही म्हणतो. ब्रह्मा, या कवितेत अमुक नाही, तमुक नाही अशी कारणे सांगून आपल्या नकर्तेपणाचे कौतुक व समर्थन करणाऱ्यांचा कवीने उपहास केला आहे असे वाटते. असो. ही घटवाई बाईंची कविता शार्दूलविक्रीडित वृत्तात होती. अहाहा! मसजसततग!
ब्र: अरे हे ततपप काय म्हणतोस?
ना: ब्रह्मा, ततपप नाही रे. शार्दूलविक्रीडितचे हे गण आहेत, म स ज स त त ग. अहाहा! आता ते नाही सांगत बसत. पुढे कधी. काकू पुन्हा पुढे सरसावल्या बघ कविता म्हणायला.
शारदा:
रथाच्या पुढे चालती देव काही
स्तुतीगान गाती रवीचे सदाही
बसे सारथी पाठमोरा न त्यासी
रवीसी न्याहाळोनी हाके रथासी
ना: ब्रह्मा, पुन्हा भुजंगप्रयात. यययय. अहाहा! सूर्याच्या रथाच्या पुढे अनेक देवगण सूर्यस्तुतीचे नित्य गायन करीत असतात. त्याचा सारथी अरुण सूर्याकडे तोंड करून बसलेला असतो. सूर्याकडे पाठ करून बसणे त्याला प्रशस्त वाटत नाही. तसे केल्यास सूर्यदेवांचा अपमान होईल असे त्यास वाटते. सूर्यदेवांना न्याहाळत तो रथ हाकत असतो. ब्रह्मा, अगदी भागवतातलेच रे हे वर्णन. कधी न ऐकलेल्या अशा आजच्या कविता. अगदी अटीतटीचा आजचा सामना. सरस्वतीवर 'रथासी' आले आहे. 'सी' पासून एखादी कविता म्हणतील तर त्यांना दामाचा एक गुण मिळेल. मग दोन्ही बाजूंचा एक एक गुण होईल. सध्या काकू एक-शून्य पुढे आहेत. बघ सरस्वती पुढे सरसावली.
सरस्वती:
सूर्यरथा सामोरी सहस्र षष्ठादशे मुनी पायी
गाती गान स्तुतीचे, तेजोमय गोल मागुनी येई
ब्र: नारदा, दाम हुकला. सरस्वतीची कविता 'सू'पासून सुरू झाली. मला अर्थही कळला. सूर्याच्या रथासमोर साठ हजार ऋषी पायी चालतात आणि सूर्याची स्तुती करतात. त्यांच्या मागे तेजाचा गोल, सूर्य, येतो असे कवी म्हणतो. वा! पण ब्रह्मा खरेच का रे असे असते?
ना: ब्रह्मा, अगदी भागवतातलेच वर्णन. भागवतातही या साठ हजार ऋषींचा उल्लेख आहे. त्यांचा आकारही अंगठ्याएवढा आहे असे सांगितले आहे. जंतुकवीच्या 'अंगुष्ठीमाल' कवितेची आठवण झाली.
ब्र: हं. मलाही ती आरती आवडली. नारदा, ह्या कवितेची चाल तर आणखीनच निराळी होती रे.
ना: होय ब्रह्माजी. हे आर्यावृत्त होते. खूप वापरातले. मोरोपंत नावाच्या कवीने तर या वृत्तात संपूर्ण महाभारत लिहिले. आर्याभारत नावाचे त्यांचे महाकाव्य प्रसिद्ध आहे. भेंड्यांमधेही हे वृत्त खूपच वापरात येते. मला याची चाल खूपच आवडते. अहाहा! काकू बघ किती आनंदल्या. काय त्यांना सुचले असावे? सरस्वतीच्या कवितेच्या शेवटी 'येई' आले होते.
शारदा:
येई जाग जगाला, पडती किरणे नभातुनी जैसी
आकाशी तो असता, झोपे जो, त्यास सद्गती कैसी
ना: हं. म्हणून एवढा आनंद? म्हणून गालावर एवढी मोठी खळी? ब्रह्मा, काकूंनी 'येई' पासून कविता म्हणून दोन अक्षरी दाम साधला. तीन गुण. आता शारदेची आघाडी चार-शून्य.
ब्र: वा! तू म्हणाला तसेच होत आहे. नारदा, ही सुद्धा आर्या होती. अर्थ पण किती सोपा. किती सोप्या कविता लिहितात रे काही लोक? मलाही खूप मज्जा मज्जा येत आहे.
ना: घटवाई चमू गांगरलेली दिसते. पण त्यांचेही पाठांतर खूपच आहे बरे. बघ, म्हणतात पुढची कविता.
सरस्वती:
सूर्याचा रथ हा विशाल इतुका, सांगू न कोणी शके
लांबी चौपट रुंदिच्या असतसे, रुंदी न थोडी असे
जंबुद्वीप महान, व्यास जितुका, मेरूचिही उंचि हो
मेरू मेरु असे नऊ जुळविता, रुंदी रथाची असे
ब्र: नारदा, पुन्हा ते शार्दूलविक्रीडित. श्रीनिवासच्या लग्नात जे मंगलाष्टक गायले त्या चालीवरही ही कविता म्हणता आली असती असे वाटते. ततपप!
ना: ततपप नाही रे. मसजसततग. याची मंगलाष्टकांसारखी चाल खूप सुंदर असते. त्या विश्रामची सून बागेश्री तर खूपच सुंदर म्हणते. लग्नात तिचेच तू ऐकलेस.
ब्र: पण नारदा, अर्थ मात्र फारसा कळला नाही रे. मराठीचा गोंडच की काय मी?
ना: ब्रह्मा, या कवितेत सूर्याच्या रथाच्या आकाराची माहिती आहे. सूर्याचा रथ विशाल असून विश्वात इतका मोठा रथ दुसऱ्या कोणाचा नाही. या रथाची लांबी रुंदीच्या चौपट आहे. पण रुंदी सुद्धा काही कमी नाही. जंबुद्वीपाचा जितका व्यास, तितकीच मेरुपर्वताची उंची आहे असे कवी सांगतो. आणि सूर्याच्या रथाची रुंदी एकावर एक नऊ मेरु पर्वत ठेवले तर जितके अंतर होईल तितकी आहे असे कवि म्हणतो. गणितसम्राट ब्रह्माजी, हे एक गणिती कोडे आहे. सोडवा.
ब्र: नारदा, सुटले पण. तूच सांगितले काल की जंबुद्वीपाचा व्यास एक लक्ष योजने आहे. मेरू पर्वताची उंची पण तितकीच. एकावर एक नऊ मेरु पर्वत म्हणजे नऊ लक्ष योजने. ही सूर्याच्या रथाची रुंदी. लांबी त्याच्या चौपट, म्हणजे छत्तीस लाख योजने. बरोबर? की चुकले काही?
ना: अरे अगदी बरोबर. ब्रह्मा, भागवत पुराणही म्हणते की सूर्याचा रथ ३६ लक्ष योजने लांब व ९ लक्ष योजने रुंद आहे. यावरून सूर्याच्या आकाराची कल्पना येऊ शकते. सरस्वतीची कविता आणि भागवतातले सूर्यरथाचे वर्णन हुबेहूब एकसारखे आहे. आता तर मला असे वाटायला लागले आहे की आजच्या सगळ्या कविताही एखाद्या पुराणातल्याच आहेत.
ब्रह्मा, आता मला आठवले की रथसप्तमीला मास्तर अंगणात जो सूर्याचा रथ काढायचे त्यालाही एकच चाक काढायचे. अगदी पुराणनिष्ठ प्रतिमा! असो.
ब्र: असो नाही, असे. आधीची कविता 'असे'वर संपली, 'असो'वर नाही. आता पाहू शारदा काय करते. दाम साधतात की काय काकू पुन्हा?
शारदा:
सूर्य फिरतसे गोल गोल मेरूच्या अवती भवती हो
इंद्रपुरी पूर्वेसी ज्याच्या, पश्चिम पुरी वरुणाची हो
दक्षिणेस यमराजपुरी अन् उत्तरेस शशिनगरी हो
इंद्रपुरीहुनी निघतो जेंव्हा, सकाळ भारतवर्षी हो
ना: ब्रह्मा, पुन्हा अगदी भागवत पुराणातलच वर्णन रे! सूर्य रथात बसून मेरुपर्वताभोवती प्रदक्षिणा घालतो. दिवसाकाठी एक प्रदक्षिणा. मेरूच्या पूर्वेस इंद्रपुरी, दक्षिणेस यमराजपुरी, पश्चिमेस वरुणपुरी व उत्तरेस चंद्रपुरी आहेत. सूर्य इंद्रपुरी, यमराजपुरी, वरुणपुरी, चंद्रपुरी करीत करीत पुन्हा इंद्रपुरीला येतो. असे रोज सुरु असते. तो इंद्रपुरीला, म्हणजे पूर्वेला असतो तेंव्हा भारतात सकाळ असते. यमराजपुरीला पोहोचतो तेंव्हा माध्यान्ह. वरुणपुरीला, म्हणजेच पश्चिमेला असतो तेव्हा संध्याकाळ असते. सूर्य मेरुपर्वतापलिकडे, म्हणजे चंद्रपुरीला असतो तेव्हा भारतात मध्यरात्र असते व सारे झोपलेले असतात. असे सविस्तर वर्णन भागवतात आहे. तसेच या कवितेतही.
ब्रह्मा, सूर्याच्या रथाची धुरा मेरुपर्वताच्या शिखरावर आहे. याचाच अर्थ बहुधा सूर्य जमिनीपासून एक लाख योजने अंतरावर फिरत आहे असा विद्वज्जन लावतात. तेलाच्या घाण्याभोवती जसा बैल फिरतो तसाच सूर्य मेरु पर्वताभोवती फिरत राहतो. फिरता फिरता तो क्रमाक्रमाने बारा राशींमध्ये जातो येतो. या राशी कालचक्रावर कोरलेल्या आहेत. सूर्याच्या रथाच्या चाकाला बारा आरे आहेत तेच बारा महिने, त्याच्या गोल काठाचे तीन भाग आहेत तेच उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे सविस्तर वर्णन भागवतात दिले आहे. उद्या मी ही कापुसकोंड्याची गोष्ट सांगितलीच असती. पण आज योगायोगाने तीच आपल्यासमोर घडते आहे. काही योगायोग खरेच विचित्र असतात.
ब्र: नारदा, थांब. पुढची कविता सुरू होते आहे. मागची 'हो'वर संपली होती.
सरस्वती:
होता संध्याकाळ सूर्य जाई वरुणाच्या द्वारी हो
जाता जाता माध्यान्ही तो यमराजांच्या नगरी हो
मध्यरात्री तो चंद्रपुरीला, पुन्हा पहाटे पूर्वेला
नव्या दिनीच्या नव्या पहाटे उजळी भारतवर्षाला
ब्र: नारदा, तू आत्ता सांगितलेले भागवतातलेच हे वर्णन रे. अगदी हुबेहूब. सरस्वतीने दाम साधून एक गुण पण मिळवला बघ. त्यांना आता हुरूप चढलेला दिसतो.
ना: आजचा सामना अद्भुत वाटतो. असो. काकू अजूनही चार-एक नी आघाडीवर आहेत. पुन्हा कुजबुज कुजबुज. पुन्हा गाली खळी. काहीतरी विशेष होणार बघ. मागची कविता 'भारतवर्षाला'वर संपली होती.
शारदा:
वर्षाला राशींच्या चक्राला रवि करूनिया पूर्ण
आयन उत्तर दक्षिण संपवुनी ऋुतु सहा करी पूर्ण
ना: अरे! घात केला बघ या आर्येनी आर्या म्हणून घटवाई आर्येचा. तीन अक्षरी दाम. एका दमात दामाचे पाच गुण. ९-१ ची आघाडी. थोडीसुद्धा दयामाया नाही रे काकूंना.
ब्र: बाकी ब्रह्मा, ही कविता तू म्हणालास तेच सांगते. दर वर्षी सूर्य उत्तरायन दक्षिणायन आटोपतो, सहा ऋतूंचे चक्र पूर्ण करतो, बारा राशींचे चक्रही पूर्ण करतो. कवितेच्या शेवटीही 'पूर्ण' शब्दच आला. सरस्वतीला 'ण' पासून कविता म्हणावी लागेल.
ना: ब्रह्मा, 'ण' पासून एकही शब्द नाही. ङ ञ ण ळ या चार वर्णांपासून एकही शब्द सुरू होत नाही. जंतुकवीची 'ङञणळ' कविता या चारही वर्णांचे सांत्वन करते. त्यांच्यापासून शब्दनिर्माण होत नसला तरी त्यांच्याविना भाषा नाही असे म्हणते. वाच कधी.
ब्र: वाचली एकदा. आता पुन्हा एकदा वाचीन.
ना: एकतर सरस्वतीला 'पूर्ण' पासून कविता म्हणून दाम साधावा लागेल, नाहीतर शारदा त्यांना एखादे दुसरे अक्षर देईल कविता म्हणायला. बघ काय करतात घटवाई बाई.
सरस्वती:
पूर्ण चंद्राला पोर्णिमा म्हणावे
चंद्ररात्रीचे स्तुतीगान गावे
सूर्य ना जाणे कधी क्षीण होणे
तया जैसे मानवानेहि व्हावे
ब्र: नारदा, जमले त्यांंना. दाम साधला. तीन गुण. ९-४ नी अजूनही शारदा पुढे. पण दोघांमधील अंतर मात्र कमी झाले. नारदा, हे रे कोणते नवे वृत्त? कवितेता अर्थ मात्र फार छान हं.
ना: ब्रह्मा, मलाही नाही आठवत रे हे वृत्त. विचार करून, नाहीतर अभ्यासून सांगतो. पण बघ, काकू पुन्हा उत्साहित दिसतात. पुन्हा फटाका फोडणार वाटते.
शारदा:
वाट रवीची बारा कोटी योजन दिवसाकाठीची
प्रदक्षिणा मेरूची रोजच, तेजोमय मार्तंडाची
तापवि चार महीने, तैसे शीतकाल अन् वर्षाही
सूर्याचे रथचक्र ऋतूंचेही, न भिन्न कालाचेही
ना: ओहो, नाही साधला दाम. पण कविता छान! सूर्याची प्रदक्षिणा बारा कोटी योजनांची असते असे कवी म्हणतो. भागवतात बारा कोटी साडे बारा लाख योजनांची असते असे म्हटले आहे. सूर्याच्या रथाचे चाक किंवा रथाची चाकोरी, ऋतुचक्र व कालचक्र हे सारे एकच असावे असे कवी म्हणतो. काळाचे माप सूर्यामुळेच पडले हे तसे खरेही आहे म्हणा.
सरस्वती:
हे तारांगण आहे निर्मिति त्याचीच, सृष्टिही त्याची
स्वर्ग पृथ्विही त्याची, वेद पुराणेहि त्याच ब्रह्माची
ब्र: ही कविता मात्र आवडली हं. ब्रह्मा खुष झाला!
सगळं सगळ माझच आहे असे ही कविता म्हणते. अजुनही काकू ९-४ ने पुढेच आहेत. चुळबुळही सुरू झाली आहे. सामना संपेल लवकरच असे दिसते.
ना: बघू. मला वाटले की आता चंद्र व इतर ग्रहांचा पण समाचार घेतील. भागवत पुराणात ते पण सांगितले आहे.
शारदा:
चंद्र असे सूर्यावर, अंतर दोघात मेरुची उंची
गति चंद्राची बारापट सूर्याच्या, मिती पुराणांची
ना: मला वाटलेच होते. गाडी आता चंद्राकडे वळली आहे. वर्णनही भागवतपुराणनिष्ठ असेच आहे. चंद्र सूर्याच्याही वरती आहे. तोही मेरुपर्वताच्याच प्रदक्षिणा करतो, घाण्याच्या बैलासारखाच. सूर्य पृथ्वितलाच्या एक लक्ष योजने वर, तर चंद्र सूर्याच्याही वर आणखी एक लक्ष योजनांवर. म्हणजेच सपाट पृथ्वीपासून दोन लक्ष योजनांवर. चंद्राचा वेग सूर्याच्या वेगापेक्षा बारापट ज्यास्त आहे. सूर्य एका वर्षात जेवढे अंतर चालतो, चंद्र तेवढेच अंतर एका महिन्यात पार करतो. सूर्याचा एक महिन्याचा मार्ग चंद्र सव्वादोन दिवसात क्रमतो. तसेच सूर्य एक पंधरवाड्यात जेवढा मार्ग चालतो तेवढा मार्ग चंद्र एका दिवसात सर करतो. चंद्र हाच सर्व जीवांचा प्राण व जीवन आहे असे भागवतपुराण म्हणते. चंद्र हा पुरुषस्वरूप देवच आहे आणि तोच देवता, पितर, मनुष्य, भूत, व इतर चराचरांच्या प्राणांचे पोषण करतो. म्हणून चंद्राला सर्वमय असेही नाव आहे. हाच सोमदेव.
ब्र: नारदा, म्हणजे चंद्र तर सूर्यापेक्षाही थोर. मग त्याचा रथ वगैरे?
ना: ब्रह्मा, पृथ्वी, स्वर्ग व सर्व आकाशाला प्रदक्षिणा घालणारा सूर्य महान नाही असे कोण म्हणेल? पण त्यापेक्षा चंद्र तसा मोठाच. त्याच्या रथाचे मात्र वर्णन पुराणात वाचल्याचे मला आठवत नाही. आपले वाचनच कमी पडत असावे. बघ आता सरस्वतीकडून काय कविता येते. 'ची' आला आहे त्यांच्यावर. त्यांना लवकर काहीतरी करून शारदेची आघाडी पार करायला हवी. नाहीतर पराजय निश्चित आहे.
सरस्वती:
चंद्रावरती अंतर लक्षद्वय योजने पुढे शुक्र
तितुकेचि पुढे जाता बुध, मग मंगळ, गुरू, शनी वक्र
ना: नारदा, चंद्रापलिकडे दोन लक्ष योजनांवर शुक्र, आणखी वर दोन लक्ष योजनांवर बुध, आणखी वर दोन लक्ष योजनांवर मंगळ, आणखी वर दोन लक्ष योजनांवर बृहस्पती म्हणजे गुरु, आणि आणखी दोन लक्ष योजने वर शनि स्थित आहे. वर्णन अगदी भागवतात जसे आहे तसेच कवीनेही केले आहे.
ब्र: नारदा, काकू पुन्हा खूपच उत्साहित दिसतात. स्फोट करणार बहुतेक.
शारदा:
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ््नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा
ब्र: दोन अक्षरी दाम. तीन गुण. १२-४ ची आघाडी. पण नारदा, असा संस्कृत श्लोक चालतो का रे? घटवाई बाई आक्षेप घेतात की काय? आणि हो, तुझ्या कानाजवळ भुंगा गुं गुं करतो आहे. वार त्याला. आज पूर्ण वेळ हा भुंगा मात्र येथेच भ्रमण करीत आहे नारदा. कधी शारदेकडे, तर कधी सरस्वतीकडे.
ना: ब्रह्मा, स्पर्धेचे नियम त्यांनी आधीच ठरविले असतील. तसेही हा श्लोक गणेश वंदना आहे. काकाकाकू म्हणजे मोरयाचे वंशज, गणपतीचे परम भक्त. त्यांच्या घरी या श्लोकाला कोणी महामूर्खच आक्षेप घेऊ शकेल.
घटवाई बाईंना घेउनि आक्षेप काय साधेल?
काकूंच्या तळपायी आग वसे, मस्तकात जाईल
ब्र: अरे वा! तू पण पहिल्यांदा आर्या केली व म्हटली. स्वरचित दिसते. शीघ्रकवी! तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!
ना: मी कुठे काही म्हणालो? ती आर्या मात्र मलाही ऐकू आली बरे. अगदी उत्सफूर्तपणे निघाली ब्रह्मा मुखातून. असो. सरस्वतीवर 'सर्वदा' आले आहे. दाम अगदी आवश्यक आहे त्यांना. स्पर्धा संपत आली आहे. शारदावर भेंडी बसली तर मात्र सरस्वती अजूनही जिंकू शकेल.
ब्र: भेंडी?
ना: होय ब्रह्मा. भेंडी बसली तर १० गुण मिळतात. आलेल्या अक्षरावर ज्यांचा डाव आहे त्यांना कविता न सुचली तर दुसऱ्या चमूला त्याच अक्षरावर कविता म्हणण्याची संधी मिळते. त्यांना जर तसे तरता आले तर १० गुण मिळतात. भेंडी बसवायचा प्रयत्न असतो सगळ्यांचाच. म्हणूनच तर भेंड्या नाव पडले या खेळाला.
सरस्वती:
दर्शन सप्तग्रहांचे तारांगणि रोज मानवा भावे
सप्तर्षीही असती एकादश लक्ष योजने जावे
ना: ब्रह्मा, पुन्हा तुझी परीक्षा. शनि पृथ्वीपासून किती उंचीवर आहे सांग.
ब्र: बारा लक्ष योजने. एक अधिक एक अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन.
ना: बरोबर. सूर्य म्हणजे रवि, सोम म्हणजे चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे पृथ्वीभोवती फिरणारे सप्तग्रह. म्हणून तर सात दिवसांची नावे यांच्यावरूनच पडली. पंचागात आजही सोमवार ऐवजी चंद्रवारच म्हणतात. ब्रह्मा, शनीच्या वर ११ लक्ष योजनांवर सप्तर्षी आहेत असे कविने सांगितले आहे या कवितेत. अगदी भागवत पुराणातलाच आकडा.
ब्रह्मा, आता काकूंची शेवटची कविता. त्यांच्यावर 'जावे' आले आहे. 'जावे'पासून कविता सुरू झाली तर तीन गुण. 'वे'पासून असेल तर एक. व, वा, वि, वी, वगैरे असेल तर गुण नाही. त्यांना कविता सुचलीच नाही आणि सरस्वतीने व पासून कविता म्हटली तर शारदावर भेंडी बसेल व सरस्वतीला १० गुण मिळतील. अजूनही सरस्वती जिंकू शकते. पण मला नाही वाटत काकू सहजासहजी हारतील. बघ त्या सरसावल्या पुढे.
शारदा:
विधिनिर्मित तारांगण वर्णिति नारद पित्यास ब्रह्मास
ब्रह्मनिर्मिती सांगे निर्मिति ब्रह्माचि आज ब्रह्मास
ब्र: काकूंनी भेंडी बसू नाही दिली. त्या अजूनही १२-४ ने पुढेच आहेत. आता मात्र सरस्वती हारेल असे दिसते.
नारदा, कवी म्हणतो की माझी, म्हणजे ब्रह्माची, निर्मिती असलेला तू नारद मलाच मीच निर्मित केलेल्या तारांगणाची, तारामंडलाची माहिती देत आहेस. हा टोमणा का रे? की ज्या पुराणावरच आधारीत आजच्या साऱ्याच कविता दिसतात त्या पुराणात तूच मला तारामंडलाची माहिती देत आहे?
ना: ब्रह्मा, शनि व सप्तर्षीतले हे ११ लक्ष योजने अंतर भागवतपुराणातही आहे. तसेच नारदपुराणातही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाहीतरी मी तुला ही कापुसकोंड्याची गोष्ट सांगणारच होतो. म्हणजे कवी म्हणतो ते सत्यच आहे.
ब्रह्मा, मला हे कळत नाही रे की आजच नेमके भेंड्यांच्या रूपात तारांगणाचे वर्णन कसे आले. अंताक्षरीत अंतरिक्ष कसा संचारला? विश्वास बसणार नाही असा हा योगायोग. असो. सरस्वतीची शेवटची कविता येत आहे. मग सामना सफळ संपूर्ण.
सरस्वती:
सप्तर्षींच्या पुढती तेरा योजन पुढे पुढे जाता
अढळ धृव आढळतो, विष्णु करी वास, नमवितो माथा
ना: ब्रह्मा, घटवाई बाईंनी एक अक्षरी दाम साधून एक गुण मिळविला खरे. पण तरीही काकू सप्तगुणांनी जिंकल्याच. अपेक्षितच होते. पण नेमक्या सातच गुणांनी का? सप्तसमुद्र, सप्तद्वीप, सप्तग्रह, सप्ताश्व, सप्तर्षी, आणि आता हा सप्तगुणांनी काकूंचा विजय. नारायण नारायण!
ब्रह्मा, कवी म्हणतो, सप्तर्षींच्या पुढे १३ लक्ष योजनांवर अढळ धृव तारा आहे. तेथेच भगवान विष्णूंचाही वास आहे. त्यांना कवी वंदन करतो. अगदी भागवत पुराणाचीच कथा.
ब्र: नारदा, म्हणजे धृव तारा पृथ्वीपासून ३६ लक्ष योजनांवर. सूर्याचा रथ ३६ लक्ष योजने लांबी असलेला. हे ३६ खूपदा आहे बा या भागवत पुराणात.
ना: काय मोजून मापून, आखून रेखून काटेकोरपणे तू सृष्टी निर्मिलीस ब्रह्मा. तू वास्तुविषारद आहेस ब्रह्मा! व्वा!
ब्रह्मा, पुराणात असेही म्हटले आहे की पृथ्वी हा जणू द्विदल धान्यातला अर्धा भाग. तुरीच्या दाण्यातली फक्त एक डाळ. नंतर तारांगण. व त्यावर द्विदलाचा उरलेला भाग. खालची डाळ, म्हणजे पृथ्वी. मध्ये तारांगण. आणि नंतर उरलेला द्विदलार्ध म्हणजे स्वर्गलोक त्या तारांगणावर. अगदी काकू बनवतात तसे सँडविच! सत्य असो वा नसो. पण काय अप्रतिम कल्पनाविस्तार. धन्य ते पुराणकार!
ब्र: नारदा, किती सविस्तर रे हे तारामंडलाचं, भुवनकोशाचं वर्णन. मी नसलो तरी जो कोणी सृष्टीकर्ता असेल त्याने आधी विचार केला असेल, आकडेमोड केली असेल, आराखडा तयार केला असेल, कागदावर आलेख काढला असेल, माॅडेल तयार केलं असेल. त्याशिवाय का एवढा मोठा प्रकल्प सिद्धीस गेला असेल? भागवत सप्ताहातून भुवनकोशाचे व तारांगणाचे हे सर्व ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविले जात आहे हेही वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच ऐकणारे एवढे मंत्रमुग्ध होतात. आहेच हा सर्व प्रकार अद्भुत.
पण नारदा, हे सर्व खरे आहे का रे? कापुसकोंड्याच्या गोष्टीत खरे काय, खोटे काय हे नक्की कळत नाही. वरून तुझा मिस्कीलपणा!
ना: ब्रह्मा, मी कोण रे यावर भाष्य करणारा? पण मास्तरांच्या शाळेत विज्ञानप्रदर्शनात मी नकाशे, माॅडेल्स पाहिली आहेत. नुकताच मी काकूंच्या फोनवर म्हातारीच्या सगळ्यात लहान नातवाने, निनादने तयार केलेल्या सूर्यमालिकेच्या माॅडेलचा फोटो पाहिला. त्यात तर सूर्य मध्यभागी व त्याभोवती मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि फिरताना दाखविले आहेत. आणखीही काही ग्रह होते. नवल म्हणजे पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते. ब्रह्मा, पृथ्वीभोवती फक्त चंद्र फिरतो. तो आपल्याला सगळ्यात जवळचा लहानसा ग्रह. म्हणून तर मानव पहिले तेथे जाऊन आला. सूर्य जर इतका जवळ, तर चंद्रयानाऐवजी आधी सूर्ययान नसते का पाठवले मानवाने?
ब्रह्मा, सूर्य पृथ्वीपासून अंदाजे ९ कोटी मैल दूर आहे. सर्वच ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. ते सर्व आणि सूर्य एका सरळ रेषेत आले असता पृथ्वीपासून इतर ग्रह किती दूर असतील तेही आज शाळकरी मुलाला माहीत आहे. पृथ्वीला शुक्र सर्वात जवळ म्हणजे ३ कोटी मैलांवर, मंगळ साडे चार कोटी मैलांवर, बुध साडेपाच कोटी मैलांवर, गुरू ४० कोटी मैलांवर, शनी ८० कोटी मैलांवर. म्हणजे ८०००००००० मैलांवर. चंद्र फक्त अडीच लाख मैलांवर. म्हणजे २५०००० मैलांवर. धृव किती मैलांवर आहे हे मी तुला आधीच सांगितले आहे. २००००००००००००००० मैलांवर. मी हे सर्व अंदाजे सांगतोय. ब्रह्मा इथून मास्तरांचा वाडा ३ मैलांवर आहे. ते लक्षात घेतले तर या अंतरांची तुला कल्पना येईल. भागवत पुराण त्या पुरातन काळचे ज्ञान असावे, कयास असावा, कविकल्पना असावी. कल्पनाविलास असावा. मला तर ते काहीही असले तरी स्पृहणीयच वाटते. ते सत्य मानणे, त्यातील कथा सत्यकथा आहेत असा अट्टाहास धरणे, हा त्या ज्ञानपिपासू पूर्वजांचा अपमानच नव्हे का? मी आपला एक विचार मांडला. बघ पटतो का?
ब्रह्मा, हे तारांगणातले आपले सोयरे सपाट वर्तुळाकार नसून चेंडूसमान गोलाकार आहेत. आजचे तारांगणाचे चित्र एकदम वेगळे आहे. आज लहान मुलाला जरी हे पुराणोक्त तारांगणाचे चित्र रंगवून सांगितले तर तोही म्हणेल 'गप्पा नका मारू आजोबा'. मला तर वाटते की तुझेही आधुनिक माॅडेल चतुर्मुखी नसून वेगळेच काहीतरी असावे.
ब्रह्मा, जुन्या पुराणोक्त ज्ञानशीळेची झीज ज्ञानसरितेच्या प्रवाहात सतत सुरू आहे. आता जंबुद्वीपावर ऊसाच्या रसाच्या, जांभळाच्या रसाच्या, आंब्याच्या रसाच्या नद्या वाहत नाहीत. फक्त ज्ञानसरिता अखंड वाहते. या नदीचा ओघ आता भगीरथ सुद्धा वळवू शकेल असे वाटत नाही. खरे म्हणजे भागवत पुराणातली गंगेची गोष्टही खूप छान आहे. वाचू कधीतरी.
ब्र: नारदा, मला आज तारांगणाची कथा हवी होती, तुला भेंड्या ऐकायच्या होत्या. दोन्ही गोष्टी झाल्या. मला तर हे सारे खरे वाटते. की याही कापुसकोंड्याच्या कविता झाल्या? हे सारे कोणी जुळवून आणले? आपण नाही. मानवानेही बहुधा नाही कारण त्याला तू मला तारांगणाची गोष्ट सांगतो आहेस हे माहीतही नाही. खरे म्हणजे आपण येथे आहोत हेही त्याला माहीत नाही. मग आजच्या सामन्याचा करविता कोण? हा तिसरा कोण? हासतोस काय? तू आणि काकाकाकू मिळालेले तर नाही? सर्वांनी मिळून हे सारे घडवून तर नाही आणले? नारदा, तू वाटतो तितका साधाही नाहीस रे! सतत काहीतरी कारस्थान! आणि गप्पा म्हणजे रे काय नारदा?
ना: नारायण नारायण! ब्रह्मा! गप्पा मारू आपणही कधी. पृथ्वीतलावर गप्पा मारण्याची कला फार आवश्यक आहे बरे. ब्रह्मा आज जे झाले ते घडविणारा तो तिसरा कोणी दुसरा नसून आज येथे घोंघावणारा भुंगा, भ्रमर असावा. तोच शारदेच्या, सरस्वतीच्या, माझ्या नी तुझ्या कानात मधूनमधून काहीतरी गुणगुणत होता व आपल्या ओठातून ते त्याचे शब्द तसेच्या तसे बाहेर येत होते. आज असे होणार हे त्याने आधीच लिहून ठेवले होते असे मला वाटते. आज फक्त तसेच्या तसे घडले. ब्रह्मा, व्यासलिखित नाही, आज भ्रमरलिखित घडले. ते कोणाला टळत नाही रे! भुंगा हा देवाधिदेव झाला आहे काकाकाकूंच्या घरी आजकाल असे वाटते मला.
ब्रह्मा! खरेच आपला काल्पनिक रूळ व मानवाचा समांतर सत्य रूळ ह्या दोघांच्या मधे आपण आज तोंडबुचक्या पडलो की काय? आता सर्व भ्रमरच ठरवितो की काय? म्हणूनच काल रात्री ती अस्पष्ट आरती ऐकू येत होती की काय? बघ पुन्हा तीच आरती ऐकू येत आहे. गुणुगुणुगुणुगुणु!
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ।
चरण कमळदळु रे भ्रमरा ।
भोगी तू निश्चळु रे भ्रमरा ।।
सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विंदिदु रे भ्रमरा ।
सौभाग्यसुंदरु रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरु रे भ्रमरा ।।
_____________________
अनुक्रमणिकेकडे