Tuesday, 22 December 2015


गोष्ट आठवी


काका: मालकीणबाई, आज आम्ही दिवसभर घरी नाही हे माहीत आहे ना? आमची आज सिनियर सिटिझन क्रिकेट मॅच आहे. नाश्ता झाला की आम्ही जाऊ. एकदम संध्याकाळी परत येऊ. आज ब्रह्मदेव पण आला तरी आम्ही काही बाद होणार नाही. सेंचुरी पक्की.

काकू: अहो मी पण रविवार पाहून आज महिला मंडळाची घरीच मीटिंग ठेवली आहे. वर्ष झालं मीटिंग होऊन. मीटिंग ठरते आणि रद्द होते. अामच्या मंडळात भांडणेच फार. कागाळ्या, चुगल्या यातच सगळ्यांना मजा येते. शेवटी मीच पुढाकार घेतला व घरीच भेंड्यांची मॅच ठेवली. त्यानिमित्ताने तरी काही जणी एकत्र येऊ. दोन टीम्स केल्या आहेत पाचपाचच्या. एका टीमचं नाव शारदा आणि दुसरीचं सरस्वती. मी शारदाची कॅप्टन आहे. सरस्वतीची कॅप्टन तीच आपली घटवाई. ध चा मा करतात तसाच तिच्या नावात कोणीतरी स चा घ केला असे वाटते. अगदी कळीची नारदच! पण आज मात्र बघ म्हणावं, माझ्याशी गाठ आहे.

तुम्ही नं, आरामात घरी या. पाचच्या आधी तर नकोच नको.

काका: तुझ्या सगळ्या साळकाया माळकाया गेल्या की तू मला मेसेज कर. मी मगच येईन. आता मस्त फोडणीचे पोहे कर. मागून पुढून आपलं जंबुद्वीपामृत.

काकू: बस, दहा मिनिटं.

ब्र: नारदा, आपली दोघांचीही नावे आलीत रे. आपले बिंग फुटले की काय? की त्या आंगणातल्या कोरलेल्या जंबुद्वीपासहित सप्तद्वीपांनी व सप्तसमुद्रांनी घात केला? काल रात्री ते मिटवायचे राहूनच गेले. जंबुद्वीपाचा पण उल्लेख आला. आपल्या गोष्टीतले शब्दही नारदा येथे हवेत राहून जातात का रे? आणि मग तेच श्वासाबरोबर आत जाऊन यांच्या मुखाद्वारे बाहेर येतात असे मला वाटते. आपल्याला मूर्त स्वरूप नसले तरी आपल्या काही कृती नक्कीच इथल्या वातावरणात दरवळतात आहे असे मला वाटते. माझा संशय वाढतो आहे नारदा. नाहीतर नेमका आजच जंबुद्वीपाचा पण उल्लेख का?

ना: ब्रह्माजी, असे काही नाही. आपली नावे म्हणजे या मानवांकरिता तोंडीलावणे झाले आहे. आपली कालची गोष्ट भागवत पुराणातली आहे. काकाकाकू तसेही धार्मिक आहेत. शेजारच्या देवळात भागवत सप्ताह ऐकायला बरेचदा जातात. म्हणून तर काकूंच्या पेटकोलीत शंभर शंभर वातींच्या शंभर तरी जुड्या आहेत. पुराणात तुझा तर उद्धार कितीदा तरी होतो. त्यामुळे आपल्या नावाचा केवळ उल्लेख झाला म्हणजे आपले बिंग फुटले असे नाही. हा केवळ योगायोग. आणि ब्रह्मा, कल्पनेला बिंग नसते. ते फुटणार कसे?

ब्रह्मा, चिअर अप! आज आपल्याला भेंड्यांची स्पर्धा पाहायला मिळणार. काकूंची शारदा टीम नक्कीच जिंकणार. वाड्यातले कोणीही कधीही भेंड्यात हारत नाही. सप्तस्पर्धात सप्तढाली मास्तरांचे हे सप्तवीर दरवर्षी मिळवायचे.

ब्र: नारदा, मला वाटायचे पुराणात सहाचा जोर खूप असतो. पण आता वाटते की सात हा कथाकाराचा ज्यास्त आवडता आकडा. सप्तद्वीप, सप्तसमुद्र, सप्तर्षी, भागवत सप्ताह वगैरे वगैरे.

ना: ब्रह्मा, तेवढ्यावरच हे थांबत नाही. राजा वीरव्रताच्या रथाने जी सप्तद्वीपे तयार झाली त्यांतील प्रत्येकावर वीरव्रताने आपल्या सप्तपुत्रांपैकी एकेकाची नेमणूक केली. त्या प्रत्येक पुत्राला प्रत्येकी सात पुत्र झाले. प्रत्येत द्वीपावर सप्तवर्ष, म्हणजे सप्तदेश निर्माण करून त्यातील एकेकावर वीरव्रताचे हे नातू राज्य करू लागले असाही पुराणात उल्लेख आहे.

ब्रह्मा, वीरव्रताच्या रथाच्या चाकांच्या सात खाचा का पडल्या याचेही भागवतात वर्णन आहे. सूर्य रात्री मेरू पर्वतामागे जातो आणि भारतवर्षात अंधार पडतो याचा राजा वीरव्रताला खूप राग आला. सूर्य मेरूच्या उत्तरेला गेला की मेरूच्या दक्षिण प्रदेशात मी स्वतः प्रकाश पाडीन अशी त्याने वल्गना केली. त्या दृष्टीने तो सूर्यासारखेच, पण बारा तास उशिराने रथात बसून मेरूभोवती फेरे मारू लागला. वेगवेगळ्या व्यासाचे सात फेरे त्याने मारले व त्यामुळेच सात खाचा पडून सात समुद्र तयार झाले. ही सत्यकथा मी भागवत पुराणात वाचली आहे.

ब्र: नारदा, वाड्यातील मास्तरांनाही सात मुलीमुले होती ह्यातही काही संकेत असेल का रे?

ना: ब्रह्मा, असेलही. प्रत्येक गोष्टीत योगायोग, संकेत धुंडाळायची मास्तरांना पण सवय होती. तुझेही आजकाल तसेच होते आहे. छान. अविश्रांत विचारचक्राची ती ग्वाही आहे. बुद्धिमान मनुष्याचे विचारचक्र जागृतपणीच नाही, तर निद्रावस्थेतही सुरू असते. म्हणूनच तर स्वप्न पडतात. अगदी सूर्यासारखी अखंड तळपते ह्या मानवाची बुद्धी. दिवसा तर सूर्य असतोच, पण सूर्य बुडला असे आपण म्हटले तरी त्यावेळी तो कुठे दुसरीकडे तितक्याच तेजाने तळपत असतो. सूर्य चालतो तोवर सृष्टी जिवंत, बुद्धी चालते तोवर मनुष्यप्राणी जिवंत.

ब्र: नारदा, पुन्हा तू सूर्याचा विषय काढला. आजतरी सांगणार ना मला तारांगणाची, तारामंडळाची गोष्ट? की आजही कालसारखेच?

ना: ब्रह्मा, आज कसे शक्य आहे? अरे, किती वर्षांनी भेंड्यांचा सामना, अंताक्षरीचा सामना पाहायचा योग आला आहे. वाड्यात असतांना मी मुलामुलींच्या सगळ्या सामन्यांना जात असे. एकही मी बुडविला असे झाले नाही. वाड्यातील भेंड्या आणि पुरणपोळी मी कधीच विसरू शकत नाही. अगदी घरपोच आलेली अशी सुवर्णसंधी दवडणे योग्य नाही. कापुसकोंड्याची गोष्ट काय, उद्याही सांगता येईल. पण भेंड्या, त्याही मास्तरांच्या मुलीचा सहभाग असलेल्या, म्हणजे अहो भाग्यम्! तूही बघ. आल्याच बघ बाया. चहा झाला की केव्हाही सुरू होतील भेंड्या.

ब्र: बरे बाबा. पण मला तू सर्व समजवून सांगत जा. स्पर्धेचे नियम, कवितांचे अर्थ, लौकिकार्थ, मतितार्थ, गर्भितार्थ, व्यंगार्थ, कवि कोण, सारे सारे.

ना: सांगीन कानात. ब्रह्मा, या खेळात ५-५ जणांची चमू असते. आज काकू व त्यांच्या ४ मैत्रिणींची एक चमू, जिचे नाव शारदा. तसेच ५ अन्य मैत्रिणींची दुसरी चमू, सरस्वती. शारदाच्या कॅप्टन, म्हणजे चमूच्या ब्रह्मदेव, काकू आहेत. सरस्वतीच्या कॅप्टन घटवाई बाई. त्याही काही कमी नाहीत. सामना अटीतटीचा होईल. पण शेवटी काकू जिकडे, विजय तिकडे हेच निश्चित.

ब्रह्मा, बघ चहापाणी आटोपले. दोन्ही चमू समोरासमोर स्थानापन्न पण झाल्या. काकू आणि घटवाई बाई आता नाणेफेक करतील.

ब्र: ही नाणेफेक म्हणजे रे काय?

ना: ब्रह्मा, सामन्याला सुरुवात कोणी करायची ते ठरविण्याची पद्धत. काकूंकडे एक नाणे आहेत. वंशपरंपरेने चालत आलेले. त्याच्या एका बाजूस ब्रह्मदेव, व दुसऱ्या बाजूस नारदाचे चित्र कोरले आहे. काकू नाणे वर फेकतील आणि ते पडण्याच्या आत घटवाई बाई नाणे जमिनीवर पडल्यावर वरच्या भागाला ब्रह्म असेल की नारद असेल याचा कयास लावतील. त्यांचा कयास खरा ठरला तर नाणेफेक त्या जिंकतील व पहिली कविता त्या म्हणतील. कयास खोटा ठरला तर काकू नाणेफेक जिंकतील व पहिली कविता म्हणतील.

बघ आपण बोलत असता नाणेफेक झालीही आणि काकू आता कविता म्हणायला सुरुवात करतील. ही मास्तरांची मुले कुठल्या कवितेने भेंड्या सुरू करतात ते मला माहीत आहे.

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
सदानंद आनंद साऱ्या जगाचा

बघ काकू सुरु करीत आहेत. ऐक काय कविता म्हणतात ते.

शारदा चमू:

सुवर्ण मेरु उभा मधोमध, जंबुद्वीपची स्वर्ग असे
चला करू या सुरू आजचे भेंड्यांचे हे युद्ध कसे
सरस्वती, शारदा चमूंचे सैन्य उभे ठाकले असे
कुरुक्षेत्र हे, कविता येथे एकमेव शस्त्रास्त्र असे

ब्र: नारदा, ही तर वेगळीच कविता आहे रे.

ना: हं. आश्चर्यच आहे. काळ खरेच पुढे गेला नारदा. जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षांनी मी भेंड्यांचा सामना बघतो आहे.

ब्र: मला अर्थ सांग आणि थोडे सामन्याचे नियम पण समजावून सांग. आपल्यालाही फावल्या वेळात खेळता येईल कधी.

ना: ब्रह्मा, काकूंनी एक कवितेचे कडवे म्हटले. कविता मी कधीही ऐकली नाही. मास्तरांच्या भेंड्यांच्या वहीतली नाही. माझ्या वाचनातली पण नाही. काकूंना कुठे गवसली हे कळत नाही. ब्रह्मा, कवितेचा अर्थ सोपा आहे. कवी म्हणतो की जंबुद्वीप हे त्याच्याकरिता स्वर्गासमान आहे आणि त्याच्या मधोमध एक सुवर्णाचा मेरुपर्वत उभा आहे. देवा, हे अगदी मी तुला आधी सांगितल्याप्रमाणे, भागवतपुराणात जसे सांगितले आहे तसेच आहे. नंतर कवि म्हणतो की हा आजचा सामना शारदा आणि सरस्वती अशा दोन चमूतील आहे व दोन्ही चमूंचे सैन्य युद्धाला तयार आहे. या युद्धात आणि महाभारत युद्धात एवढाच फरक आहे की येथे कविता हेच एकमेव शस्त्र आहे. कवीने उल्लेख न करता असेही सुचविले आहे की हे भेंड्याचे युद्धही धर्मयुद्धासारखेच लढायला हवे. लबाडी न करता. ब्रह्मा, महाभारत युद्धाच्या कथेचा जनमानसावर जो ठसा आहे तो अवर्णनीय आहे आणि पुराणातील कथा यांच्या मनात नेहमीकरिता वास करतात. म्हणून ब्रह्मा, आपण काल्पनिक की सत्य हा वाद बरेचदा अनाठायी आणि निष्फळ ठरतो.

ब्रह्मा, आता सरस्वतीची पाळी आहे. काकूंच्या कवितेचे शेवटचे अक्षर, अंताक्षर 'से' आहे. सरस्वतीला 'स'च्या बाराखडीतल्या, म्हणजे 'स, सा, सि, सी, सु, सू, से, सै, सो, सौ, सं' पैकी कुठल्यातरी अक्षराने कविता सुरू करावी लागेल. ऐक घटवाई बाई काय म्हणतात ते.

सरस्वती:

सूर्यचि आम्हा प्रकाश देतो, दिन रजनी तोची करितो
तोच स्वतःचा वेग कधी वाढवुनी दिन छोटा करितो
वेग कमी होता दिन मोठा, रात्र होतसे पुन्हा लहान
तोचि करविता सहा ऋतूंचा, शक्तिस्रोत तो, तोचि महान

ना: ब्रह्मा, पुन्हा एकदम न ऐकलेली, न वाचलेली कविता. सूर्याचे गुणगान करणारी कविता. रात्र आणि दिवस सूर्यामुळेच होतात हे सत्य सांगणारी कविता. ब्रह्मा, सध्या दक्षिणायन सुरू आहे. दिवस लहान व रात्र मोठी असते. उद्या, २१ डिसेंबरला दिवस सगळ्यात लहान व रात्र सगळ्यात मोठी असेल. नंतर दिवस हळूहळू मोठा होईल व रात्र लहान होत जाईल. सहा महिन्यांनी, २१ जूनला दिवस सगळ्यात मोठा व रात्र सगळ्यात लहान होईल. २१ सप्टेंबर व २१ मार्चला दिवस आणि रात्र बरोबर १२-१२ तासांचे असतील. हे सर्व सूर्य आपला वेग कमी ज्यास्त करतो म्हणून होते असे कवी म्हणतो. सहा ऋुतु, म्हणजे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे सूर्यामुळेच होतात असेही कवी म्हणतो. सर्व जगाच्या शक्तीचे उगमस्थान सूर्यच आहे, तो महान आहे असेही कवी म्हणतो.

ब्रह्मा, अगदी हेच भागवतपुराणातही लिहिलेले आहे, आणि मी तुला आपल्या गोष्टीतही तेच सांगितले असते.

ब्र: वा, बरेच झाले. तू सांगायला चालढकल करीत होतास. योगायोगाने, सरस्वतीने मला ते सांगितले. नारदा बघ, शारदा चमूने आपसात बरीच कुजबुज केली व खूप आनंदाने आता काकूच पुन्हा कविता म्हणणार असे दिसते. मला माहित आहे त्या 'न'च्या बाराखडीतलेच काहीतरी घेऊन कविता म्हणतील. म्हणतात बघ!

शारदा:

नसे यास सुट्टी, न याला विसावा
तया दर्शने येतसे स्फूर्ति जीवा
दिशा पूर्व लाजे सरे रात्र जैसी
तिच्या गालि लाली पहाटेस कैसी?

ना: ब्रह्मा, आज सूर्याचाच दिवस दिसतो. तसाही रविवारच आहे म्हणा. काकूंची कविताही सूर्यावरच आहे. चाल वेगळी आहे हे तुझ्या लक्षात आले असेल. सुटसुटीत चाल. अशा ठेक्याच्या कवितेला भुजंगप्रयात वृत्तातली कविता म्हणतात. मी आधी म्हटलेली 'गणाधीश जो ईश' पण याच साच्यातली. जंतुकवीची 'उद्या लग्न आहे' तर पूर्ण अशाच वृत्तातली.

ब्र: हं. खरेच. पण नारदा, अशी कुठलीही चाल चालते का रे?

ना: भेंड्यात वृत्तबद्ध कविता हवी. कवितेला त्याने सुरेख चाल येते. जंतुकवी म्हणतो 'कविता म्हणजे कदमताल । एकच ठेका, एकच चाल।।'. नाहीतर मग ते गद्य होईल. भेंड्यामध्ये गद्याला प्रवेश निषिद्ध.

ब्र: मास्तर, जरा अर्थ पण सांगा. तसेच शारदा चमू एवढी खूष कां तेही सांगा.

ना: ब्रह्मा, अर्थ तर फार सोपा आहे. कवी म्हणतो, सूर्याला कधी सुट्टी नसते, न कधी आराम. याच्या केवळ दर्शनाने प्राणिमात्राला स्फूर्ति येते. पूर्व दिशा पहाटे तांबड्या लाल रंगाने उजळते. जणू ती कोणाची चाहूल लागून लाजते व तिचे गाल लाल लाल होतात. ब्रह्मा, सूर्योदयापूर्वीच्या पूर्वरंगाचे नाजुक वर्णन कवी करतो या कवितेत.

ब्रह्मा, आधीची कविता 'न' ने संपली. काकू 'न'च्या बाराखडीतले कुठलेही अक्षर घेऊ शकल्या असत्या. पण त्यांनी ना, नि, नी वगैरे न घेता 'न' पासूनच कविता सुरू केली. याला दाम म्हणतात. दाम साधल्यामुळे त्यांच्या चमूला १ गुण मिळाला. सरस्वतीला अजूनतरी काही नाही. काकूंची चमू आता एक-शून्य ने आघाडीवर आहे. म्हणून सर्वजणी आनंदल्या होत्या.

ब्रह्मा, बघ आता घटवाई बाईंची चमू काय करते. आपसात सल्लामसलत करून बघ कोणीतरी कवितेला सुरुवात करीत आहे.

सरस्वती:

सप्ताश्वा रथि लावुनी अरुण जो सारथ्य त्याचे करी
आणी हा रथ आगळा, नच दुजा विश्वात कोठे तरी
याला एकच चाक, नाहि दुसरे, वेगात धावे तरी
पूर्वेसी अरुणोदयास उधळे आभा किती गोजिरी

ना: ब्रह्मा, शारदाची कविता 'कैसे'वर संपली होती. सरस्वतीने 'स'ने सुरुवात केली. म्हणून दाम झाला नाही. पण कविता सुंदर. कवि सूर्याच्या सात घोड्याच्या, एका चाकाच्या रथाचे वर्णन करून म्हणतो की असा रथ जगात दुसरा नाही. रथाचा सारथी अरुण असून तो रथ वेगाने हाकतो. पूर्वेला अरुण रथ घेऊन येताच जी दिव्य आभा दाटते त्याचे कवी वर्णन करतो.

ब्रह्मा, सूर्याच्या ह्या एक चाकी रथाचे, सात घोड्यांचे, अरुण सारथ्याचे वर्णन अगदी भागवत पुराणातील वर्णनाशी जुळते. सूर्यचंद्राच्या आपल्या कापुसकोंड्याच्या गोष्टीचे अपहरण झाले की काय असा संशय येण्याइतपत आजच्या भेंड्या आगळ्या वेगळ्या आहेत. असो.

ब्र: नारदा, रोजच्या पाहण्यातला हा सूर्योदयाचा मनोवेधक सोहळा. पण आज काळ बदललेला दिसतो आहे. उंचच उंच इमारतीतून सूर्य रे काय दिसणार. आणि दैनंदिन धकाधकीत वेळ तरी कुणाला? लोक सूर्योदय पाहायला माथेरान की कुठेतरी जातात म्हणे. मला काही दिवसापूर्वी अर्नाळपुराणात तू आणि मीही माथेरानला गेलो होतो असा उल्लेख आढळला. खरेच असावे. त्यापुराणाच्या सत्यतेबद्दल मला मुळीच संदेह नाही. 'घडले ते सांगितले' असे ते निर्मळ पुराण.

ना: ब्रह्मा, सांग की रे तो माथेरानचा अध्याय.

ब्र: बघू नंतर कधी. आत्ता नको. केव्हाही शारदाची कविता सुरू होईल. पण नारदा, खरेच का रे सूर्याचा रथ एक चाकाचा?

ना: ब्रह्मा, रथ, रथी, सारथी यांचे वर्णन इतरत्रही आहे. हाच श्लोक बघ.

एकचक्रो रथो यन्ता विकलो विषमे हयाः ।
आक्रामत्येव तेजस्वी तथ्याप्यर्को नभस्तलम् ।

ब्रह्मा, एक चाकाचा रथ, अपंग विकलांग सारथी, विषम घोडे, म्हणजे ३, ५, ७ वगैरे, असूनही तेजस्वी सूर्य आकाशावर आक्रमण करायला चुकत नाही, असे हा कवीही म्हणतो. ब्रह्मा, या कवितेत अमुक नाही, तमुक नाही अशी कारणे सांगून आपल्या नकर्तेपणाचे कौतुक व समर्थन करणाऱ्यांचा कवीने उपहास केला आहे असे वाटते. असो. ही घटवाई बाईंची कविता शार्दूलविक्रीडित वृत्तात होती. अहाहा! मसजसततग!

ब्र: अरे हे ततपप काय म्हणतोस?

ना: ब्रह्मा, ततपप नाही रे. शार्दूलविक्रीडितचे हे गण आहेत, म स ज स त त ग. अहाहा! आता ते नाही सांगत बसत. पुढे कधी. काकू पुन्हा पुढे सरसावल्या बघ कविता म्हणायला.

शारदा:

रथाच्या पुढे चालती देव काही
स्तुतीगान गाती रवीचे सदाही
बसे सारथी पाठमोरा न त्यासी
रवीसी न्याहाळोनी हाके रथासी

ना: ब्रह्मा, पुन्हा भुजंगप्रयात. यययय. अहाहा! सूर्याच्या रथाच्या पुढे अनेक देवगण सूर्यस्तुतीचे नित्य गायन करीत असतात. त्याचा सारथी अरुण सूर्याकडे तोंड करून बसलेला असतो. सूर्याकडे पाठ करून बसणे त्याला प्रशस्त वाटत नाही. तसे केल्यास सूर्यदेवांचा अपमान होईल असे त्यास वाटते. सूर्यदेवांना न्याहाळत तो रथ हाकत असतो. ब्रह्मा, अगदी भागवतातलेच रे हे वर्णन. कधी न ऐकलेल्या अशा आजच्या कविता. अगदी अटीतटीचा आजचा सामना. सरस्वतीवर 'रथासी' आले आहे. 'सी' पासून एखादी कविता म्हणतील तर त्यांना दामाचा एक गुण मिळेल. मग दोन्ही बाजूंचा एक एक गुण होईल. सध्या काकू एक-शून्य पुढे आहेत. बघ सरस्वती पुढे सरसावली.

सरस्वती:

सूर्यरथा सामोरी सहस्र षष्ठादशे मुनी पायी
गाती गान स्तुतीचे, तेजोमय गोल मागुनी येई

ब्र: नारदा, दाम हुकला. सरस्वतीची कविता 'सू'पासून सुरू झाली. मला अर्थही कळला. सूर्याच्या रथासमोर साठ हजार ऋषी पायी चालतात आणि सूर्याची स्तुती करतात. त्यांच्या मागे तेजाचा गोल, सूर्य, येतो असे कवी म्हणतो. वा! पण ब्रह्मा खरेच का रे असे असते?

ना: ब्रह्मा, अगदी भागवतातलेच वर्णन. भागवतातही या साठ हजार ऋषींचा उल्लेख आहे. त्यांचा आकारही अंगठ्याएवढा आहे असे सांगितले आहे. जंतुकवीच्या 'अंगुष्ठीमाल' कवितेची आठवण झाली.

ब्र: हं. मलाही ती आरती आवडली. नारदा, ह्या कवितेची चाल तर आणखीनच निराळी होती रे.

ना: होय ब्रह्माजी. हे आर्यावृत्त होते. खूप वापरातले. मोरोपंत नावाच्या कवीने तर या वृत्तात संपूर्ण महाभारत लिहिले. आर्याभारत नावाचे त्यांचे महाकाव्य प्रसिद्ध आहे. भेंड्यांमधेही हे वृत्त खूपच वापरात येते. मला याची चाल खूपच आवडते. अहाहा! काकू बघ किती आनंदल्या. काय त्यांना सुचले असावे? सरस्वतीच्या कवितेच्या शेवटी 'येई' आले होते.

शारदा:

येई जाग जगाला, पडती किरणे नभातुनी जैसी
आकाशी तो असता, झोपे जो, त्यास सद्गती कैसी

ना: हं. म्हणून एवढा आनंद? म्हणून गालावर एवढी मोठी खळी? ब्रह्मा, काकूंनी 'येई' पासून कविता म्हणून दोन अक्षरी दाम साधला. तीन गुण. आता शारदेची आघाडी चार-शून्य.

ब्र: वा! तू म्हणाला तसेच होत आहे. नारदा, ही सुद्धा आर्या होती. अर्थ पण किती सोपा. किती सोप्या कविता लिहितात रे काही लोक? मलाही खूप मज्जा मज्जा येत आहे.

ना: घटवाई चमू गांगरलेली दिसते. पण त्यांचेही पाठांतर खूपच आहे बरे. बघ, म्हणतात पुढची कविता.

सरस्वती:

सूर्याचा रथ हा विशाल इतुका, सांगू न कोणी शके
लांबी चौपट रुंदिच्या असतसे, रुंदी न थोडी असे
जंबुद्वीप महान, व्यास जितुका, मेरूचिही उंचि हो
मेरू मेरु असे नऊ जुळविता, रुंदी रथाची असे

ब्र: नारदा, पुन्हा ते शार्दूलविक्रीडित. श्रीनिवासच्या लग्नात जे मंगलाष्टक गायले त्या चालीवरही ही कविता म्हणता आली असती असे वाटते. ततपप!

ना: ततपप नाही रे. मसजसततग. याची मंगलाष्टकांसारखी चाल खूप सुंदर असते. त्या विश्रामची सून बागेश्री तर खूपच सुंदर म्हणते. लग्नात तिचेच तू ऐकलेस.

ब्र: पण नारदा, अर्थ मात्र फारसा कळला नाही रे. मराठीचा गोंडच की काय मी?

ना: ब्रह्मा, या कवितेत सूर्याच्या रथाच्या आकाराची माहिती आहे. सूर्याचा रथ विशाल असून विश्वात इतका मोठा रथ दुसऱ्या कोणाचा नाही. या रथाची लांबी रुंदीच्या चौपट आहे. पण रुंदी सुद्धा काही कमी नाही. जंबुद्वीपाचा जितका व्यास, तितकीच मेरुपर्वताची उंची आहे असे कवी सांगतो. आणि सूर्याच्या रथाची रुंदी एकावर एक नऊ मेरु पर्वत ठेवले तर जितके अंतर होईल तितकी आहे असे कवि म्हणतो. गणितसम्राट ब्रह्माजी, हे एक गणिती कोडे आहे. सोडवा.

ब्र: नारदा, सुटले पण. तूच सांगितले काल की जंबुद्वीपाचा व्यास एक लक्ष योजने आहे. मेरू पर्वताची उंची पण तितकीच. एकावर एक नऊ मेरु पर्वत म्हणजे नऊ लक्ष योजने. ही सूर्याच्या रथाची रुंदी. लांबी त्याच्या चौपट, म्हणजे छत्तीस लाख योजने. बरोबर? की चुकले काही?

ना: अरे अगदी बरोबर. ब्रह्मा, भागवत पुराणही म्हणते की सूर्याचा रथ ३६ लक्ष योजने लांब व ९ लक्ष योजने रुंद आहे. यावरून सूर्याच्या आकाराची कल्पना येऊ शकते. सरस्वतीची कविता आणि भागवतातले सूर्यरथाचे वर्णन हुबेहूब एकसारखे आहे. आता तर मला असे वाटायला लागले आहे की आजच्या सगळ्या कविताही एखाद्या पुराणातल्याच आहेत.

ब्रह्मा, आता मला आठवले की रथसप्तमीला मास्तर अंगणात जो सूर्याचा रथ काढायचे त्यालाही एकच चाक काढायचे. अगदी पुराणनिष्ठ प्रतिमा! असो.

ब्र: असो नाही, असे. आधीची कविता 'असे'वर संपली, 'असो'वर नाही. आता पाहू शारदा काय करते. दाम साधतात की काय काकू पुन्हा?

शारदा:

सूर्य फिरतसे गोल गोल मेरूच्या अवती भवती हो
इंद्रपुरी पूर्वेसी ज्याच्या, पश्चिम पुरी वरुणाची हो
दक्षिणेस यमराजपुरी अन् उत्तरेस शशिनगरी हो
इंद्रपुरीहुनी निघतो जेंव्हा, सकाळ भारतवर्षी हो

ना: ब्रह्मा, पुन्हा अगदी भागवत पुराणातलच वर्णन रे! सूर्य रथात बसून मेरुपर्वताभोवती प्रदक्षिणा घालतो. दिवसाकाठी एक प्रदक्षिणा. मेरूच्या पूर्वेस इंद्रपुरी, दक्षिणेस यमराजपुरी, पश्चिमेस वरुणपुरी व उत्तरेस चंद्रपुरी आहेत. सूर्य इंद्रपुरी, यमराजपुरी, वरुणपुरी, चंद्रपुरी करीत करीत पुन्हा इंद्रपुरीला येतो. असे रोज सुरु असते. तो इंद्रपुरीला, म्हणजे पूर्वेला असतो तेंव्हा भारतात सकाळ असते. यमराजपुरीला पोहोचतो तेंव्हा माध्यान्ह. वरुणपुरीला, म्हणजेच पश्चिमेला असतो तेव्हा संध्याकाळ असते. सूर्य मेरुपर्वतापलिकडे, म्हणजे चंद्रपुरीला असतो तेव्हा भारतात मध्यरात्र असते व सारे झोपलेले असतात. असे सविस्तर वर्णन भागवतात आहे. तसेच या कवितेतही.

ब्रह्मा, सूर्याच्या रथाची धुरा मेरुपर्वताच्या शिखरावर आहे. याचाच अर्थ बहुधा सूर्य जमिनीपासून एक लाख योजने अंतरावर फिरत आहे असा विद्वज्जन लावतात. तेलाच्या घाण्याभोवती जसा बैल फिरतो तसाच सूर्य मेरु पर्वताभोवती फिरत राहतो. फिरता फिरता तो क्रमाक्रमाने बारा राशींमध्ये जातो येतो. या राशी कालचक्रावर कोरलेल्या आहेत. सूर्याच्या रथाच्या चाकाला बारा आरे आहेत तेच बारा महिने, त्याच्या गोल काठाचे तीन भाग आहेत तेच उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे सविस्तर वर्णन भागवतात दिले आहे. उद्या मी ही कापुसकोंड्याची गोष्ट सांगितलीच असती. पण आज योगायोगाने तीच आपल्यासमोर घडते आहे. काही योगायोग खरेच विचित्र असतात.

ब्र: नारदा, थांब. पुढची कविता सुरू होते आहे. मागची 'हो'वर संपली होती.

सरस्वती:

होता संध्याकाळ सूर्य जाई वरुणाच्या द्वारी हो
जाता जाता माध्यान्ही तो यमराजांच्या नगरी हो
मध्यरात्री तो चंद्रपुरीला, पुन्हा पहाटे पूर्वेला
नव्या दिनीच्या नव्या पहाटे उजळी भारतवर्षाला

ब्र: नारदा, तू आत्ता सांगितलेले भागवतातलेच हे वर्णन रे. अगदी हुबेहूब. सरस्वतीने दाम साधून एक गुण पण मिळवला बघ. त्यांना आता हुरूप चढलेला दिसतो.

ना: आजचा सामना अद्भुत वाटतो. असो. काकू अजूनही चार-एक नी आघाडीवर आहेत. पुन्हा कुजबुज कुजबुज. पुन्हा गाली खळी. काहीतरी विशेष होणार बघ. मागची कविता 'भारतवर्षाला'वर संपली होती.

शारदा:

वर्षाला राशींच्या चक्राला रवि करूनिया पूर्ण
आयन उत्तर दक्षिण संपवुनी ऋुतु सहा करी पूर्ण

ना: अरे! घात केला बघ या आर्येनी आर्या म्हणून घटवाई आर्येचा. तीन अक्षरी दाम. एका दमात दामाचे पाच गुण. ९-१ ची आघाडी. थोडीसुद्धा दयामाया नाही रे काकूंना.

ब्र: बाकी ब्रह्मा, ही कविता तू म्हणालास तेच सांगते. दर वर्षी सूर्य उत्तरायन दक्षिणायन आटोपतो, सहा ऋतूंचे चक्र पूर्ण करतो, बारा राशींचे चक्रही पूर्ण करतो. कवितेच्या शेवटीही 'पूर्ण' शब्दच आला. सरस्वतीला 'ण' पासून कविता म्हणावी लागेल.

ना: ब्रह्मा, 'ण' पासून एकही शब्द नाही. ङ ञ ण ळ या चार वर्णांपासून एकही शब्द सुरू होत नाही. जंतुकवीची 'ङञणळ' कविता या चारही वर्णांचे सांत्वन करते. त्यांच्यापासून शब्दनिर्माण होत नसला तरी त्यांच्याविना भाषा नाही असे म्हणते. वाच कधी.

ब्र: वाचली एकदा. आता पुन्हा एकदा वाचीन.

ना: एकतर सरस्वतीला 'पूर्ण' पासून कविता म्हणून दाम साधावा लागेल, नाहीतर शारदा त्यांना एखादे दुसरे अक्षर देईल कविता म्हणायला. बघ काय करतात घटवाई बाई.

सरस्वती:

पूर्ण चंद्राला पोर्णिमा म्हणावे
चंद्ररात्रीचे स्तुतीगान गावे
सूर्य ना जाणे कधी क्षीण होणे
तया जैसे मानवानेहि व्हावे

ब्र: नारदा, जमले त्यांंना. दाम साधला. तीन गुण. ९-४ नी अजूनही शारदा पुढे. पण दोघांमधील अंतर मात्र कमी झाले. नारदा, हे रे कोणते नवे वृत्त? कवितेता अर्थ मात्र फार छान हं.

ना: ब्रह्मा, मलाही नाही आठवत रे हे वृत्त. विचार करून, नाहीतर अभ्यासून सांगतो. पण बघ, काकू पुन्हा उत्साहित दिसतात. पुन्हा फटाका फोडणार वाटते.

शारदा:

वाट रवीची बारा कोटी योजन दिवसाकाठीची
प्रदक्षिणा मेरूची रोजच, तेजोमय मार्तंडाची
तापवि चार महीने, तैसे शीतकाल अन् वर्षाही
सूर्याचे रथचक्र ऋतूंचेही, न भिन्न कालाचेही

ना: ओहो, नाही साधला दाम. पण कविता छान! सूर्याची प्रदक्षिणा बारा कोटी योजनांची असते असे कवी म्हणतो. भागवतात बारा कोटी साडे बारा लाख योजनांची असते असे म्हटले आहे. सूर्याच्या रथाचे चाक किंवा रथाची चाकोरी, ऋतुचक्र व कालचक्र हे सारे एकच असावे असे कवी म्हणतो. काळाचे माप सूर्यामुळेच पडले हे तसे खरेही आहे म्हणा.

सरस्वती:

हे तारांगण आहे निर्मिति त्याचीच, सृष्टिही त्याची
स्वर्ग पृथ्विही त्याची, वेद पुराणेहि त्याच ब्रह्माची

ब्र: ही कविता मात्र आवडली हं. ब्रह्मा खुष झाला!
सगळं सगळ माझच आहे असे ही कविता म्हणते. अजुनही काकू ९-४ ने पुढेच आहेत. चुळबुळही सुरू झाली आहे. सामना संपेल लवकरच असे दिसते.

ना: बघू. मला वाटले की आता चंद्र व इतर ग्रहांचा पण समाचार घेतील. भागवत पुराणात ते पण सांगितले आहे.

शारदा:

चंद्र असे सूर्यावर, अंतर दोघात मेरुची उंची
गति चंद्राची बारापट सूर्याच्या, मिती पुराणांची

ना: मला वाटलेच होते. गाडी आता चंद्राकडे वळली आहे. वर्णनही भागवतपुराणनिष्ठ असेच आहे. चंद्र सूर्याच्याही वरती आहे. तोही मेरुपर्वताच्याच प्रदक्षिणा करतो, घाण्याच्या बैलासारखाच. सूर्य पृथ्वितलाच्या एक लक्ष योजने वर, तर चंद्र सूर्याच्याही वर आणखी एक लक्ष योजनांवर. म्हणजेच सपाट पृथ्वीपासून दोन लक्ष योजनांवर. चंद्राचा वेग सूर्याच्या वेगापेक्षा बारापट ज्यास्त आहे. सूर्य एका वर्षात जेवढे अंतर चालतो, चंद्र तेवढेच अंतर एका महिन्यात पार करतो. सूर्याचा एक महिन्याचा मार्ग चंद्र सव्वादोन दिवसात क्रमतो. तसेच सूर्य एक पंधरवाड्यात जेवढा मार्ग चालतो तेवढा मार्ग चंद्र एका दिवसात सर करतो. चंद्र हाच सर्व जीवांचा प्राण व जीवन आहे असे भागवतपुराण म्हणते. चंद्र हा पुरुषस्वरूप देवच आहे आणि तोच देवता, पितर, मनुष्य, भूत, व इतर चराचरांच्या प्राणांचे पोषण करतो. म्हणून चंद्राला सर्वमय असेही नाव आहे. हाच सोमदेव.

ब्र: नारदा, म्हणजे चंद्र तर सूर्यापेक्षाही थोर. मग त्याचा रथ वगैरे?

ना: ब्रह्मा, पृथ्वी, स्वर्ग व सर्व आकाशाला प्रदक्षिणा घालणारा सूर्य महान नाही असे कोण म्हणेल? पण त्यापेक्षा चंद्र तसा मोठाच. त्याच्या रथाचे मात्र वर्णन पुराणात वाचल्याचे मला आठवत नाही. आपले वाचनच कमी पडत असावे. बघ आता सरस्वतीकडून काय कविता येते. 'ची' आला आहे त्यांच्यावर. त्यांना लवकर काहीतरी करून शारदेची आघाडी पार करायला हवी. नाहीतर पराजय निश्चित आहे.

सरस्वती:

चंद्रावरती अंतर लक्षद्वय योजने पुढे शुक्र
तितुकेचि पुढे जाता बुध, मग मंगळ, गुरू, शनी वक्र

ना: नारदा, चंद्रापलिकडे दोन लक्ष योजनांवर शुक्र, आणखी वर दोन लक्ष योजनांवर बुध, आणखी वर दोन लक्ष योजनांवर मंगळ, आणखी वर दोन लक्ष योजनांवर बृहस्पती म्हणजे गुरु, आणि आणखी दोन लक्ष योजने वर शनि स्थित आहे. वर्णन अगदी भागवतात जसे आहे तसेच कवीनेही केले आहे.

ब्र: नारदा, काकू पुन्हा खूपच उत्साहित दिसतात. स्फोट करणार बहुतेक.

शारदा:

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ््नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा

ब्र: दोन अक्षरी दाम. तीन गुण. १२-४ ची आघाडी. पण नारदा, असा संस्कृत श्लोक चालतो का रे? घटवाई बाई आक्षेप घेतात की काय? आणि हो, तुझ्या कानाजवळ भुंगा गुं गुं करतो आहे. वार त्याला. आज पूर्ण वेळ हा भुंगा मात्र येथेच भ्रमण करीत आहे नारदा. कधी शारदेकडे, तर कधी सरस्वतीकडे.

ना: ब्रह्मा, स्पर्धेचे नियम त्यांनी आधीच ठरविले असतील. तसेही हा श्लोक गणेश वंदना आहे. काकाकाकू म्हणजे मोरयाचे वंशज, गणपतीचे परम भक्त. त्यांच्या घरी या श्लोकाला कोणी महामूर्खच आक्षेप घेऊ शकेल.

घटवाई बाईंना घेउनि आक्षेप काय साधेल?
काकूंच्या तळपायी आग वसे, मस्तकात जाईल

ब्र: अरे वा! तू पण पहिल्यांदा आर्या केली व म्हटली. स्वरचित दिसते. शीघ्रकवी! तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

ना: मी कुठे काही म्हणालो? ती आर्या मात्र मलाही ऐकू आली बरे. अगदी उत्सफूर्तपणे निघाली ब्रह्मा मुखातून. असो. सरस्वतीवर 'सर्वदा' आले आहे. दाम अगदी आवश्यक आहे त्यांना. स्पर्धा संपत आली आहे. शारदावर भेंडी बसली तर मात्र सरस्वती अजूनही जिंकू शकेल.

ब्र: भेंडी?

ना: होय ब्रह्मा. भेंडी बसली तर १० गुण मिळतात. आलेल्या अक्षरावर ज्यांचा डाव आहे त्यांना कविता न सुचली तर दुसऱ्या चमूला त्याच अक्षरावर कविता म्हणण्याची संधी मिळते. त्यांना जर तसे तरता आले तर १० गुण मिळतात. भेंडी बसवायचा प्रयत्न असतो सगळ्यांचाच. म्हणूनच तर भेंड्या नाव पडले या खेळाला.

सरस्वती:

दर्शन सप्तग्रहांचे तारांगणि रोज मानवा भावे
सप्तर्षीही असती एकादश लक्ष योजने जावे

ना: ब्रह्मा, पुन्हा तुझी परीक्षा. शनि पृथ्वीपासून किती उंचीवर आहे सांग.

ब्र: बारा लक्ष योजने. एक अधिक एक अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन.

ना: बरोबर. सूर्य म्हणजे रवि, सोम म्हणजे चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे पृथ्वीभोवती फिरणारे सप्तग्रह. म्हणून तर सात दिवसांची नावे यांच्यावरूनच पडली. पंचागात आजही सोमवार ऐवजी चंद्रवारच म्हणतात. ब्रह्मा, शनीच्या वर ११ लक्ष योजनांवर सप्तर्षी आहेत असे कविने सांगितले आहे या कवितेत. अगदी भागवत पुराणातलाच आकडा.

ब्रह्मा, आता काकूंची शेवटची कविता. त्यांच्यावर 'जावे' आले आहे. 'जावे'पासून कविता सुरू झाली तर तीन गुण. 'वे'पासून असेल तर एक. व, वा, वि, वी, वगैरे असेल तर गुण नाही. त्यांना कविता सुचलीच नाही आणि सरस्वतीने व पासून कविता म्हटली तर शारदावर भेंडी बसेल व सरस्वतीला १० गुण मिळतील. अजूनही सरस्वती जिंकू शकते. पण मला नाही वाटत काकू सहजासहजी हारतील. बघ त्या सरसावल्या पुढे.

शारदा:

विधिनिर्मित तारांगण वर्णिति नारद पित्यास ब्रह्मास
ब्रह्मनिर्मिती सांगे निर्मिति ब्रह्माचि आज ब्रह्मास

ब्र: काकूंनी भेंडी बसू नाही दिली. त्या अजूनही १२-४ ने पुढेच आहेत. आता मात्र सरस्वती हारेल असे दिसते.

नारदा, कवी म्हणतो की माझी, म्हणजे ब्रह्माची, निर्मिती असलेला तू नारद मलाच मीच निर्मित केलेल्या तारांगणाची, तारामंडलाची माहिती देत आहेस. हा टोमणा का रे? की ज्या पुराणावरच आधारीत आजच्या साऱ्याच कविता दिसतात त्या पुराणात तूच मला तारामंडलाची माहिती देत आहे?

ना: ब्रह्मा, शनि व सप्तर्षीतले हे ११ लक्ष योजने अंतर भागवतपुराणातही आहे. तसेच नारदपुराणातही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाहीतरी मी तुला ही कापुसकोंड्याची गोष्ट सांगणारच होतो. म्हणजे कवी म्हणतो ते सत्यच आहे.

ब्रह्मा, मला हे कळत नाही रे की आजच नेमके भेंड्यांच्या रूपात तारांगणाचे वर्णन कसे आले. अंताक्षरीत अंतरिक्ष कसा संचारला? विश्वास बसणार नाही असा हा योगायोग. असो. सरस्वतीची शेवटची कविता येत आहे. मग सामना सफळ संपूर्ण.

सरस्वती:

सप्तर्षींच्या पुढती तेरा योजन पुढे पुढे जाता
अढळ धृव आढळतो, विष्णु करी वास, नमवितो माथा

ना: ब्रह्मा, घटवाई बाईंनी एक अक्षरी दाम साधून एक गुण मिळविला खरे. पण तरीही काकू सप्तगुणांनी जिंकल्याच. अपेक्षितच होते. पण नेमक्या सातच गुणांनी का? सप्तसमुद्र, सप्तद्वीप, सप्तग्रह, सप्ताश्व, सप्तर्षी, आणि आता हा सप्तगुणांनी काकूंचा विजय. नारायण नारायण!

ब्रह्मा, कवी म्हणतो, सप्तर्षींच्या पुढे १३ लक्ष योजनांवर अढळ धृव तारा आहे. तेथेच भगवान विष्णूंचाही वास आहे. त्यांना कवी वंदन करतो. अगदी भागवत पुराणाचीच कथा.

ब्र: नारदा, म्हणजे धृव तारा पृथ्वीपासून ३६ लक्ष योजनांवर. सूर्याचा रथ ३६ लक्ष योजने लांबी असलेला. हे ३६ खूपदा आहे बा या भागवत पुराणात.

ना: काय मोजून मापून, आखून रेखून काटेकोरपणे तू सृष्टी निर्मिलीस ब्रह्मा. तू वास्तुविषारद आहेस ब्रह्मा! व्वा!

ब्रह्मा, पुराणात असेही म्हटले आहे की पृथ्वी हा जणू द्विदल धान्यातला अर्धा भाग. तुरीच्या दाण्यातली फक्त एक डाळ. नंतर तारांगण. व त्यावर द्विदलाचा उरलेला भाग. खालची डाळ, म्हणजे पृथ्वी. मध्ये तारांगण. आणि नंतर उरलेला द्विदलार्ध म्हणजे स्वर्गलोक त्या तारांगणावर. अगदी काकू बनवतात तसे सँडविच! सत्य असो वा नसो. पण काय अप्रतिम कल्पनाविस्तार. धन्य ते पुराणकार!

ब्र: नारदा, किती सविस्तर रे हे तारामंडलाचं, भुवनकोशाचं वर्णन. मी नसलो तरी जो कोणी सृष्टीकर्ता असेल त्याने आधी विचार केला असेल, आकडेमोड केली असेल, आराखडा तयार केला असेल, कागदावर आलेख काढला असेल, माॅडेल तयार केलं असेल. त्याशिवाय का एवढा मोठा प्रकल्प सिद्धीस गेला असेल? भागवत सप्ताहातून भुवनकोशाचे व तारांगणाचे हे सर्व ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविले जात आहे हेही वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच ऐकणारे एवढे मंत्रमुग्ध होतात. आहेच हा सर्व प्रकार अद्भुत.

पण नारदा, हे सर्व खरे आहे का रे? कापुसकोंड्याच्या गोष्टीत खरे काय, खोटे काय हे नक्की कळत नाही. वरून तुझा मिस्कीलपणा!

ना: ब्रह्मा, मी कोण रे यावर भाष्य करणारा? पण मास्तरांच्या शाळेत विज्ञानप्रदर्शनात मी नकाशे, माॅडेल्स पाहिली आहेत. नुकताच मी काकूंच्या फोनवर म्हातारीच्या सगळ्यात लहान नातवाने, निनादने तयार केलेल्या सूर्यमालिकेच्या माॅडेलचा फोटो पाहिला. त्यात तर सूर्य मध्यभागी व त्याभोवती मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि फिरताना दाखविले आहेत. आणखीही काही ग्रह होते. नवल म्हणजे पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते. ब्रह्मा, पृथ्वीभोवती फक्त चंद्र फिरतो. तो आपल्याला सगळ्यात जवळचा लहानसा ग्रह. म्हणून तर मानव पहिले तेथे जाऊन आला. सूर्य जर इतका जवळ, तर चंद्रयानाऐवजी आधी सूर्ययान नसते का पाठवले मानवाने?

ब्रह्मा, सूर्य पृथ्वीपासून अंदाजे ९ कोटी मैल दूर आहे. सर्वच ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. ते सर्व आणि सूर्य एका सरळ रेषेत आले असता पृथ्वीपासून इतर ग्रह किती दूर असतील तेही आज शाळकरी मुलाला माहीत आहे. पृथ्वीला शुक्र सर्वात जवळ म्हणजे ३ कोटी मैलांवर, मंगळ साडे चार कोटी मैलांवर, बुध साडेपाच कोटी मैलांवर, गुरू ४० कोटी मैलांवर, शनी ८० कोटी मैलांवर. म्हणजे ८०००००००० मैलांवर. चंद्र फक्त अडीच लाख मैलांवर. म्हणजे २५०००० मैलांवर. धृव किती मैलांवर आहे हे मी तुला आधीच सांगितले आहे. २००००००००००००००० मैलांवर. मी हे सर्व अंदाजे सांगतोय. ब्रह्मा इथून मास्तरांचा वाडा ३ मैलांवर आहे. ते लक्षात घेतले तर या अंतरांची तुला कल्पना येईल. भागवत पुराण त्या पुरातन काळचे ज्ञान असावे, कयास असावा, कविकल्पना असावी. कल्पनाविलास असावा. मला तर ते काहीही असले तरी स्पृहणीयच वाटते. ते सत्य मानणे, त्यातील कथा सत्यकथा आहेत असा अट्टाहास धरणे, हा त्या ज्ञानपिपासू पूर्वजांचा अपमानच नव्हे का? मी आपला एक विचार मांडला. बघ पटतो का?

ब्रह्मा, हे तारांगणातले आपले सोयरे सपाट वर्तुळाकार नसून चेंडूसमान गोलाकार आहेत. आजचे तारांगणाचे चित्र एकदम वेगळे आहे. आज लहान मुलाला जरी हे पुराणोक्त तारांगणाचे चित्र रंगवून सांगितले तर तोही म्हणेल 'गप्पा नका मारू आजोबा'. मला तर वाटते की तुझेही आधुनिक माॅडेल चतुर्मुखी नसून वेगळेच काहीतरी असावे.

ब्रह्मा, जुन्या पुराणोक्त ज्ञानशीळेची झीज ज्ञानसरितेच्या प्रवाहात सतत सुरू आहे. आता जंबुद्वीपावर ऊसाच्या रसाच्या, जांभळाच्या रसाच्या, आंब्याच्या रसाच्या नद्या वाहत नाहीत. फक्त ज्ञानसरिता अखंड वाहते. या नदीचा ओघ आता भगीरथ सुद्धा वळवू शकेल असे वाटत नाही. खरे म्हणजे भागवत पुराणातली गंगेची गोष्टही खूप छान आहे. वाचू कधीतरी.

ब्र: नारदा, मला आज तारांगणाची कथा हवी होती, तुला भेंड्या ऐकायच्या होत्या. दोन्ही गोष्टी झाल्या. मला तर हे सारे खरे वाटते. की याही कापुसकोंड्याच्या कविता झाल्या? हे सारे कोणी जुळवून आणले? आपण नाही. मानवानेही बहुधा नाही कारण त्याला तू मला तारांगणाची गोष्ट सांगतो आहेस हे माहीतही नाही. खरे म्हणजे आपण येथे आहोत हेही त्याला माहीत नाही. मग आजच्या सामन्याचा करविता कोण? हा तिसरा कोण? हासतोस काय? तू आणि काकाकाकू मिळालेले तर नाही? सर्वांनी मिळून हे सारे घडवून तर नाही आणले? नारदा, तू वाटतो तितका साधाही नाहीस रे! सतत काहीतरी कारस्थान! आणि गप्पा म्हणजे रे काय नारदा?

ना: नारायण नारायण! ब्रह्मा! गप्पा मारू आपणही कधी. पृथ्वीतलावर गप्पा मारण्याची कला फार आवश्यक आहे बरे. ब्रह्मा आज जे झाले ते घडविणारा तो तिसरा कोणी दुसरा नसून आज येथे घोंघावणारा भुंगा, भ्रमर असावा. तोच शारदेच्या, सरस्वतीच्या, माझ्या नी तुझ्या कानात मधूनमधून काहीतरी गुणगुणत होता व आपल्या ओठातून ते त्याचे शब्द तसेच्या तसे बाहेर येत होते. आज असे होणार हे त्याने आधीच लिहून ठेवले होते असे मला वाटते. आज फक्त तसेच्या तसे घडले. ब्रह्मा, व्यासलिखित नाही, आज भ्रमरलिखित घडले. ते कोणाला टळत नाही रे! भुंगा हा देवाधिदेव झाला आहे काकाकाकूंच्या घरी आजकाल असे वाटते मला.

ब्रह्मा! खरेच आपला काल्पनिक रूळ व मानवाचा समांतर सत्य रूळ ह्या दोघांच्या मधे आपण आज तोंडबुचक्या पडलो की काय? आता सर्व भ्रमरच ठरवितो की काय? म्हणूनच काल रात्री ती अस्पष्ट आरती ऐकू येत होती की काय? बघ पुन्हा तीच आरती ऐकू येत आहे. गुणुगुणुगुणुगुणु!

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ।
चरण कमळदळु रे भ्रमरा ।
भोगी तू निश्चळु रे भ्रमरा ।।

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विंदिदु रे भ्रमरा ।
सौभाग्यसुंदरु रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरु रे भ्रमरा ।।

_____________________


अनुक्रमणिकेकडे

गोष्ट सातवी


ब्र: कोण आहे, कोण आहे!

ना: ब्रह्मा, अरे घाबरतोस काय असा? तुझी टक्कर आणखी कोणाशी होणार? मीच आहे. ब्रह्मपुत्र नारद. संध्याकाळ झाली तरी काकाकाकूंचे स्टडीरूम, म्हणजे खरे म्हणजे आपली खोली, लावण्याचे काम सुरूच होते. तुझा झाडावरच डोळा लागला होता. म्हणून हळूच जाऊन मी बघून आलो कुठपर्यंत आले काकाकाकूंचे काम ते. आता आटोपत आले आहे. आपली खोली अगदी चकाचक झाली आहे. तिथे आता न जाळी न कोळी. तुझा तो रात्रभर कोळी-चिलटाचा खेळ पाहण्याचा विरंगुळा आता भूतकाळजमा होईल. अर्नाळपुराणातल्या 'रिमोट कंट्रोल' नामक स्कंधामधे त्याचे सविस्तर वर्णन आहे. आठवते ना?

ब्र: हं. आजही त्या कोळ्यावरचा राग गेला नाही माझा. बिचारी चिलटे!

ना: ब्रह्मा, परत येऊन बघतो तो तू झाडावर नाहीस. अंधारही पडलेला. असशील आसपास कुठे म्हणून मी असाच रात्रीचे आकाश न्याहाळत होतो. हा अष्टमीचा चंद्र नेहमीच मला वेड लावतो. तो अर्धप्रकाशित चंद्र डोळ्यात भरतो. पण अर्धा चंद्र अंधारात असतो या जाणीवेने मन गदगदते. तो अर्धचंद्र डोळेभरून पाहता पाहता, नकळत मागून तू येऊन आदळलास.

ब्र: मी आदळलो की तू आदळलास? नारदा, मला जाग आली तर तू खालच्या फांदीवर दिसला नाहीस. अंधार पण झाला होता. झाडाच्या पानातून वर बघतो तर आकाशात लक्ष लक्ष दिवे लागलेले दिसले. आधी एकदा गच्चीवर आपण रात्रभर दोघेच बसलो होतो तेंव्हाच काय ते रात्रीचे आकाश मी पाहिले होते. आज दुसऱ्यांदा. आज मलाही सप्तर्षी व धृवतारा ओळखू आले. असे वाटले जणू धृवबाळ हात हालवून मला अभिवादन करीत आहे. म्हणून मी पण झाडावरून उतरून हात हालविला. बाळ हासला असे वाटले. सप्तर्षींना पण मनोमन नमस्कार करून, नजर आकाशाकडे ठेवून मी अनवधानाने इथवर चालत चालत आलो. तर तू येऊन आदळलास पाठीमागून. तशी माझीच चूक. तुला पाठीमागचे दिसत नसले तरी मला दिसते. सर्व दिशांना माझे डोळे. पण आज ते आठही डोळे हे अवकाशातले अद्भुत तारांगण पाहण्यात मग्न होते. असो! तुला लागले तर नाही?

ना: नाही ब्रह्मा! अरे ज्यांना शरीर नाही, ज्यांना वजन नाही, ज्यांना डास चावत नाही, त्यांना लागणार तरी काय, कसे, आणि कुठे? निर्गुण निराकारांची ही पहिली वहिली टक्कर. थोडा वेगळा अनुभव आला एवढेच.

ब्र: पण नारदा, आपली कोणाशी टक्कर होत नाही असे तूच तर म्हणाला होतास. मग आज आपली टक्कर कशी रे झाली?

ना: ब्रह्मा, काकूंशी किंवा काकांशी किंवा टेबलाशी, पलंगाशी आपली टक्कर होत नाही. कारण त्यांना लौकिकार्थाने अस्तित्व आहे. ते सगुण साकार आहेत समज. आपण पडलो निर्गुण निराकार, काल्पनिक. ते असणारे, आपण नसणारे. अशा भिन्न तत्वांची टक्कर होत नाही. काकांची काकूंशी होऊ शकते. कारण अस्तित्व हे त्यांच्यातले साम्य आहे. आपले अनस्तित्व, काल्पनिक रूप हे आपल्यातले साम्य. म्हणून आपली एकमेकांशी टक्कर होऊ शकते. ब्रह्मा, दोन कल्पनांची, दोन विचारसरणींची टक्कर होऊ शकते. विचारवादळ उभे राहू शकते. जगाच्या इतिहासात विचारांचे युद्ध पुढे जाऊन महाशस्त्रयुद्ध झाल्याचे दाखले आहेत. आपली टक्कर होऊच शकते. जशी आत्ता झाली तशी. तू मी एकमेकाशी संवाद करू शकतो. काका काकू एकमेकाशी भांडण करू शकतात. पण मी काकाकाकूंची, किंवा ते तुझीमाझी टिंगल टवाळी करू शकत नाही.

ब्रह्मा कल्पना आणि सत्य हे कधीही हातमिळवणी करू शकत नाहीत. त्यांचा मिलाप शक्य नाही. पण ते दोघेही सतत एकमेकाला समांतर मार्गाने अनंताकडे जात असतात. आगगाडीचे दोन रूळ, रस्त्याचे दोन काठ, नदीचे दोन तीर आहेत हे सत्य आणि कल्पना. वाटतात दूर कुठेतरी मिळालेले, पण जाऊन पहावे तर वेगवेगळेच दिसतात. एक प्रकारचे मृगजळ आहे सत्य आणि कल्पनेचे मिलन. एक प्रकारची कल्पना.

तरी पण ब्रह्मा, अमीलनाचा शाप असलेले हे दोघे शापित एकमेकापासून फार दूरही नाहीत. आगगाडीचे रूळच बघ. त्यांच्या खाली असंख्य आडव्या लाकडी, लोखंडी पट्या असतात. त्यावरूनच ते दोघेही धावतात. तसेच सत्य आणि कल्पनेला सांधणारे पण अनेक दुवे असतात. मनुपुत्र चंद्राकडे पाहतो, तिथे जाण्याची कल्पना करतो, आणि स्वबळावर कधीतरी तेथे जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतो. कल्पना सत्य करतो. कोण जाणे, त्याने आपली केलेली कल्पना कधीतरी तो सत्य करील. त्यातीलच कोणी कधी त्रिलोकसंचारी नारद होईल. कोणी तुझ्यापेक्षाही सरस सृष्टी निर्माण करेल.

ब्रह्मा, कधी न मिळणारे, कधी न जुळणारे सत्य आणि कल्पनेचे हे रूळ, यावरच या मानवांची आगगाडी पूर्वापार चालत आली आहे.

ब्र: नारदा. अशीच ती चालावी. असेच कधीतरी मानवाला अभिप्रेत सर्वगुणसंपन्न ब्रह्मरूप मानवानेच प्राप्त करावे. सत्यब्रह्म मानव प्रत्यक्षात यावा. आपल्या अनुभवाने शहाणे होऊन त्याने खरोखरच नवसृष्टी निर्माण करावी. फक्त एकच मागणे आहे. त्या सृष्टीत त्या २८ नरकांची गरजच भासू नये. सगळीकडे स्वर्गच स्वर्ग. सारेचे सारे त्रिलोकी झेंडा लावणारे महाज्ञानी नारद. सारेच गणपति, साऱ्याच सरस्वती. त्याच्या सर्व देवत्वाच्या कल्पनांचे साकार रूप त्यानेच घ््यावे. त्यासाठीच तर त्याने पूर्णत्वाची, पूर्णप्ुरुषाची, म्हणजे आपली कल्पना केली.

ना: व्वा! ही तुझ्या कल्पनेतली सृष्टी कधीतरी खरेच निर्माण होईल. मला तर वाटते ४२६८८३ वर्ष उलटण्याआधीच होईल.

ब्र: तथास्तु! पण ४२६८८३ वर्षच कां?

ना: अरे, कलियुग संपायला अजून ४२६८८३ वर्षे आहेत असे तुझ्याच वेदात की उपनिषदात आहे. तूच म्हणाला होतास की हे सातव्या मानवांतरातले शेवटचे युग आहे. मग सातव्या मनूचे, वैवस्वताचे राज्य संपेल. त्याआधीच हा हुशार मानव आपली स्वतःची सत्याधारित सृष्टी निर्माण करेल. आपल्यालाही त्यात खऱ्या अर्थाने सत्यरूप मिळेल. मग तुला तुझा आठवा मनू वगैरे पाठवायची गरज नाही पडणार. तुझीही पन्नाशी उलटेल. तूच म्हणाला होतास की हे तुझे पन्नासावे वर्ष आहे आणि सातव्या मनूचे त्यातले हे शेवटचे कलियुग आहे म्हणून.

ब्र: नारदा, तू बोलायला लागला की वाटते कधी आपण ह्या रूळावर आहो, कधी त्या रूळावर! कधी सत्य आणि कल्पनेच्या नेमके मध्ये आपण तोंडबुचक्या पडणार तर नाही?

ना: ब्रह्मा, काय फरक पडतो? आपल्याला काही लागणार नाही, न काही इजा होणार. आपले पडणे हीही सत्य आणि कल्पनेची टक्करच. असून नसल्यासारखी. नारायण नारायण!

ब्रह्मा: अगदी गोंधळून टाकलेस बघ. असाच गोंधळ हे तारे पाहता पाहता झाला. धृव आणि सप्तर्षी म्हणजे आठ तारे. त्यांची सत्यकथा पण तू सांगितलीस. पण नारदा, ह्या तारांगणात तर असे अगणित तारे आहेत रे. मी मोजायला पण सुरुवात केली. पण धृवाच्या दिशेनेच इतके काही दिसत गेले की मी मोजता मोजता थकून गेलो. ह्या सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी तू मला कधी सांगशील? उत्तानपादाला अनेक हट्टी मुले होती की काय? त्यांनीही तपस्या करून अढळपद प्राप्त केले काय?  हे चमचमणारे तारे ही कोणाची घरे? ही कोणी रे बांधली? ही किती दूर, किती मोठी? ही कोणाभोवती फिरत असतात? ही घरे दिवसा कां दिसत नाहीत? हे सूर्याला घाबरतात का काजव्यासारखे? हे खूप विशालकाय काजवेच तर नाहीत?

ना: ब्रह्मा, सबूर! किती प्रश्न! रात्रीचे तारांगण, रात्रीचा चंद्र, दिवसाचा सूर्य, यांचे मनुपुत्रांनाही फार आकर्षण. आज तू पहिल्यांदा आकाश बघतो आहेस इतके निरखून? तू जसा विस्मयचकित झाला तसाच आदिमानवही. त्या जंतुकवीच्या मानवचंद्र कवितेत या आकाशातील तारांगणाचे, या रांगोळीचे थोडेफार वर्णन आहे. वाच कधी.

दिवसभरी शेतात कष्टुनी शेतकरी थकला
दगड घेउनी डोक्याखाली शेतावर झोपला
झोप येईना, आकाशातील रांगोळी आगळी
किती प्रयत्ने डोळ्यामाजी मावे ना सगळी

रात्रचांदणी रोज अनोखी, चंद्र असे, कधी नसे
काही चांदण्या अंधुक, तर काहींचे स्पष्ट ठसे
काही डोळे मिचकाविती, तर निर्विकार काही
मेघ सांडता खवल्या खवल्या, दृष्य अलौकिक दिसे

अविरत जात राहती तारे सारे एकीकडे
कोणाची त्या ओढ, कोण तो आकाशापलिकडे?
एक परंतु तारा ऐसा जो न कधी ढळतो
रात्रभरी तो तिथेच स्थिर, तो कोण बरे असतो?

सारे तारे पूर्वेकडुनी पश्चिमेस जाती
चंद्र सूर्यही मार्गक्रमणा नित्य तीच करिती
एकच तारा खिळून राही आपुल्याच स्थानी
गूढ काय हे आकाशाचे? प्रश्न सदा तव मनी

ब्रह्मा, मानवाला जसे कुतुहल होते तसेच तू दाखवीत आहेस. मला फार नवल वाटते. अरे ही सारी तुझीच निर्मिती, तूच तारांगणाचाही निर्माता. तुलाच कसे रे विस्मरण झाले? तुला कसा रे पन्नाशीतच स्मृतिभ्रंश? नारायण नाराचण!

ब्र: नारदा! नको रे ते 'नारायण नारायण'. सांग मला तारांगणाविषयी माहिती संपूर्ण. पुराणात असलीच पाहिजे. सांग मला सूर्याबद्दल, सांग मला चंद्राबद्दल, सांग मला ताऱ्यांबद्दल. थोडे सांग. थोडा दिशानिर्देश कर! मी वाचीन.

ना; ब्रह्मा! हे सर्व गूढ अनेक पुराणात उकलले गेले आहे. ताऱ्यांचे नभोमंडळातले स्थान, त्यांचा आकार, त्यांची गती, सारे सारे पुराणात आहे. सारेच सांगणे कठिण आहे. पण आज आपण मोठे जे दोन ग्रह आहेत ते, म्हणजे सूर्य व चंद्र यांची माहिती घेऊ. मग कधी जमल्यास बाकी तरतमदृष्ट्या लहान ग्रह ताऱ्यांची माहिती घेऊ. काकाकाकू जोपर्यंत झोपी जात नाहीत व आपल्याला आपल्या खोलीत जाता येत नाही तोवर सांगतो आजची ही गोष्ट. तुझं एक तोंड राहू दे घरावर केंद्रित. काकाकाकूंनी दिवे मालवले की सांग मला.

सांगू मग आजची कापुसकोंड्याची गोष्ट?

ब्र: अरे सांग. अविलंब!

ना: ब्रह्माजी, ही नुसती राजाराणीची गोष्ट नाही. ही विज्ञानकथा आहे. हे आपण जे तारांगण पाहतो त्याचे विज्ञाननिष्ठ विवरण आहे यात. भागवत महापुराणात मैत्रेय ऋषी ज्ञानपिपासू विदुराला, कधी शुकाचार्य परिक्षिताला, कधी कोणी कोणाला हे ज्ञानदान करतात. भागवत महापुराण म्हणजे गुरुशिष्य संवादच आहे म्हण. कधी मी, म्हणजे नारदाने, सुद्धा त्यात असा वर्ग भरविला आहे. प्रचेत्यांना मी उपदेश केला आहे. तारांगणाचे हे विवरण सत्यनिष्ठ असून सर्व निष्णात लोकांना मान्य आहे असे पुराणात ऋषी अनेकदा प्रतिपादितात. हे पुराण ज्या काळी लिहिण्यात आले, ज्या कोणी लिहिले, त्यांनी ज्ञानविज्ञानाची मोठी सेवाच केली आहे असे म्हणावे लागेल. उत्क्रांती जशी जीवांची होते, तशीच ज्ञानविज्ञानाची पण होते. त्यामुळे यातील प्रत्येक कथन दगडावरची रेघ आहे असे मानणे, न मानणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण वेदपुराणांवर विश्वास न ठेवणारा नरकाचा रहिवासी होतो हेही या पुराणात सांगितले आहे, हेही मला नमूद करायला हवे. मी पट्टीचा पुराणिक आहे असे तूच एकदा म्हणाला होतास. पुराणिकाचे काम पुराणातले कथन जसेच्या तसे सत्यनिष्ठेने सांगायचे. तेच मी करणार आहे.

मग करू कापुसकोंड्याची गोष्ट सुरू?

ब्र: नारदा, तुझं निरुपण फारच लांबतं बा. अरे, घाल कीर्तनाला हात आता. नाहीतर निरुपणातच अडकून पडू दोघे.

ना: ब्रह्मा, सूर्य आपण रोजच पाहतो. इकडून उगवतो, अन तिकडे मावळतो. इकडेला पूर्व म्हणतात, व तिकडेला पश्चिम हे तुला माहीतच आहे. पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले की आपल्या उजव्या हाताला दक्षिण व डाव्या हाताला उत्तर दिशा असते. एवढे तरी तुला नक्कीच माहीत असेल.

ब्र: नारदा, तू सतत छळत असतो. अरे मला चार दिशांना चार तोंडे. कोणचे पूर्वेकडे करावे माणसाने? मला काय उजवे, काय डावे?

ना: ओहो, हे माझ्या लक्षातच आले नाही. जरा वेगळ्या प्रकाराने सांगावे लागेल. मीच पूर्वेकडे तोंड करतो. आता माझ्या या हाताला दक्षिण अन् इकडे उत्तर. उत्तरेला धृव तारा. अढळ तारा. उत्तरेला तोंड करून उभे राहिले तर उजव्या हाताला जी दिशा ती पूर्व. व डाव्या हाताची पश्चिम. पाठीमागची दक्षिण. आले का लक्षात?

ब्र: अरे एकतोंड्या, मला चार चार तोंडे आहेत रे. पुन्हा तुझे तेच.

ना: ब्रह्मा, आता असे बघ. आपल्या खोलीत शिरतांना आपले तोंड जिकडे असते ती उत्तर दिशा. उजवीकडची पूर्व, डावीकडे पश्चिम, मागची दक्षिण.

ब्र: अरे रामचंद्रा! कसे सांगू याला? नारदा मला आता तूच सांग माझे डोळे कोणत्या दिशेला बघत आहेत? माझे तोंड कोणत्या दिशेला आहे?

ना: चारही दिशांना.

ब्र: अरे तेच तर मी सांगतो आहे. नारदा, सूर्योदयाची दिशा पूर्व. सूर्यास्ताची पश्चिम. धृव तारा उत्तरेकडे. आणि उरलेली चौथी दिशा दक्षिण. हे मला समजले. पण याचा आजच्या गोष्टीशी काय संबंध? गोष्ट सुरू कर. सूर्याबद्दल सांग सुरुवातीला. उगवू दे कथासूर्य. तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

ना: ब्रह्मा, तुला दिशा समजल्या असतील तर पुढे जाऊ. तर, ब्रह्मा, प्रियव्रत नावाचा एक राजा होता.

ब्र: नारदा, हा उत्तानपादाचा भाऊच का रे? पहिल्या मनूचा, म्हणजे स्वायंभूवाचा, म्हणजे माझ्या मानसपुत्राचा पुत्र? माझा नातू?

ना: नाही ब्रह्मा, हा प्रियव्रत त्यानंतर मोठ्या कालखंडाने आलेला भरतवंशोत्पन्न महापुरुषांच्या श्रृंखलेतला हा एक महान राजा.

ब्र: अरे पण वंशावळी सांगशील की नाही?

ना: ब्रह्मा, भरतापासून १८-१९ पिढ्यांनी हा आला. म्हणशील तर वंशावळी सांगतो. ब्रह्मा, त्याकाळी एकेकाला अनेक भार्या, अनेक पुत्रकन्या. अरे म्हणूनच तर एका ब्रह्माचे १२५ कोटी झाले ना? पण तुझ्याकडे पूर्ण रेकाॅर्ड असतो. तुला माहीत असावे भरत कोण आणि नंतरचा भरतवंशाचा पूर्ण वंशेतिहास.

ब्र: नाही रे आठवत. तूच सांग.

ना: ब्रह्मा, भरत पृथ्वितलावर आला तीही एक मोठी गोष्ट आहे. मोठ्ठी कापुसकोंड्याची गोष्ट. ती नंतर कधी. आज भरतापासून प्रियव्रतापर्यंतची वंशावळी जशी भागवतात आहे तशी सांगतो. मधे थांबवू नकोस. मी गोंधळून जाईन.

ब्रह्मा, भरताचा पुत्र सुमती. सुमतीला पत्नी वृद्धसेनेपासून देवताजित पुत्र. देवताजिताला असुरीपासून देवद्युम्न नावाचा मुलगा. देवद्युम्नाला धेनुमतीपासून परमेष्ठ. परमेष्ठाला सुवर्चलेपासून प्रतीह नामक पुत्र. प्रतीहाला सुवर्चलेपासूनच प्रतिहर्ता नावाचे पुत्ररत्न. प्रतिहर्त्याला स्तुतीपासून भूमा. भूमाला ऋषिकुल्येपासून उद्गीथ. उद्गीथाला देवकुल्येपासून प्रस्ताव. प्रस्तावाला नियुत्सेपासून विभू. पुढे विभूला रतीपासून पृथुषेण.

ब्र: शेण?

ना: ब्रह्मा, तुला आधीच सांगितले मध्ये टोकू नकोस म्हणून. अरे शेण नाही, षेण. पोटफोड्या ष, शेंडीफोड्या नाही. केलास ना घात. कुठवर आलो होतो आपण?

ब्र: पृथुषेण. पोटफोड्या.

ना: पृथुषेणाला आकूतीपासून नक्त. नक्ताला द्रुतीपासून गय. हा गय सर्वदृष्टीनी उत्तम पुरुष. म्हणून याला विष्णूंचा अंश मानल्या जाते. महापुरुष मानले जाते. गयाला गयन्तीपासून चित्ररथ. चित्ररथाला ऊर्णा पासून सम्राट. सम्राटाला उत्कलेपासून मरीची. मरीचीला बिंदुमतीपासून बिंदुमान. बिंदुमानाला सरघेपासून मधू. मधूला सुमनेपासून वीरव्रत.

ब्रह्मा हाच आपल्या आजच्या गोष्टीतला वीरव्रत राजा. महापराक्रमी. सूर्यदेवांशी स्पर्धा करू पाहणारा भरतवंशी, महाशूर, महाराजा.

ब्रह्मा, म्हणशील तर पुढच्या पिढ्या पण सांगू शकतो. सांगू का?

ब्र: बापरे! एवढे सगळे पुराणात आहे? नको सांगू पुढचे पुत्रपौत्र. पुढे कधी. पण नारदा, एवढे सगळे कोणी लक्षात ठेवले? कोणी कोणाला सांगितले?

ना: तुला काय वाटले? महापुराण आहे म्हटलं ते. शुकाचार्यांनी परिक्षिताला ही सारी माहिती दिली आहे. आपल्या गोष्टीचा संबंध मात्र प्रियव्रताशी आहे. प्रियव्रताचा रथ फारच मोठा होता. प्रियव्रताचा हा विशाल रथ गोलाकारात फिरून फिरून त्याच्या चाकांनी जमिनीवर सात  गोलाकार खाचा पडल्या. या सात गोलाकार खंदकांसारख्या खाचांच्या मधल्या भागातील जमीन उंच येऊन त्याचे विशाल आणि उंचच उंच पर्वत झाले. अशा तऱ्हेनी सहा वर्तुळाकृती पर्वत व सात वर्तुळाकृती खंदक तयार झाले. हे खंदक वेगवेगळ्या प्रकारच्या द्रव्याने भरले गेले व त्यांचे सात समुद्र झाले.

ब्र: नारदा, असे समजत नाही रे. जरा आकृती काढून समजवतोस का? भूगोल शिकवितांना नकाशा काढावा माणसाने. नाहीतर डोळ्यासमोर दृश्य उभे राहत नाही.

ना: चल, टेबलावर काढू.

ब्र: नको नको. पुन्हा भानामतीचा संशय येईल. तो प्रकार नको. इथेच आंगणात मातीवर बोटाने काढून दाखव. नंतर मिटवून टाकू.

ना: ठीक. हे बघ. हा मी काढला माझ्या बोटाने एक गोल. तुझ्या त्या रावणाच्या तोंडासारखा. शून्यासारखा. ह्यालाच वर्तुळही म्हणतात. बोट रुतवून मातीत फिरविल्यामुळे एक वर्तुळाकृती खाच पडली. खाचेत मी जर पाणी टाकले तर ही खाच भरून खंदकासारखी दिसेल. आता ह्या खाचेभोवतीच मी दुसरे थोडे मोठे वर्तुळ काढतो बोटाने. हा दुसरा मोठ्या आकाराचा खंदक. पाणी टाकले तर हाही भरेल. या दोन वर्तुळाकृती खंदकांमध्ये, दोन खाचांमधली माती थोडी वर आली. तो वर्तुळाकृती पर्वत समज.

ब्र: हं. समजायला लागले. आता मी काढतो तिसरे वर्तुळ. हे बघ. ही झाली तिसरी खाच. आणि तिसऱ्या आणि दुसऱ्या खाचेमध्ये हा दुसरा वर्तुळाकृती पर्वत. आता हा चौथा आणखीन मोठा गोल खंदक. चौथ्या आणि तिसऱ्या खंदकामधे हा  तिसरा वर्तुळाकृती पर्वत. हा पाचवा खंदक. हा चौथा पर्वत. हा सहावा खंदक. हा पाचवा पर्वत. हा सातवा खंदक. हा सहावा पर्वत. व्वा, मजा आली.

ना: ब्रह्मा, खरेच. किती दिवसांनी मातीशी खेळलो. काय मजा आली. नखात माती गेली. मज्जा मज्जा आली. मातीत पाणी टाकल्याबरोबर काय सुंदर वास आला. केवडासुद्धा लाजेल. वाड्याच्या आंगणात म्हातारीची मुलेमुली लहानपणी माती खेळायची. उन्हाळ्यात दिवसभर तापून कोरड्या झालेल्या मातीवर ऊन उतरल्यावर सडा टाकला की काय सुवास यायचा? उन्हाळा जाऊन मृगाचा पहिला पाऊस आंगणात पडला की काय सुगंध दरवळायचा? असा खमंग सुवास फक्त पुरणपोळीचाच.

ब्रह्मा, चिखल असेल तर आणखीनच छान. चिखलात तळहात लिडबिडला आणि त्याने गंजाला बूड लावले की ब्रह्मानंद!

ब्र: नारदा, हे बूड म्हणजे काय रे?

ना: ब्रह्मा, सांगणे कठिण रे. पण पातेल्याला बाहेरून अशी माती फासली की चुलीवर पातेलं ठेवलं तरी आतले भात वा वरण जळत नसे, करपत नसे.

ब्र: नारदा, चूल म्हणजे काय रे?

ना: ब्रह्मा, नको विचारूस. चूल म्हणजे काय सांंगायला चिक्कण माती काय सांगावं लागेल. चिक्कण माती काय सांगताना 'घ््या ना बाई चुलीची माऽऽतीऽऽ' सांगावे लागेल. हे सगळं सांगू म्हटलं तर कोणाला समजणार नाही. समजले तर विश्वास बसणार नाही. ते युगच संपले. आजच्या युगात त्या गतयुगातल्या गोष्टी कापुसकोंड्याच्या गोष्टी वाटतील. जशी आजची आपली गोष्टं.

ब्र: बरं राहिलं. नारदा. मला मनापासून असं वाटत आहे की हे सातही खंदक पाण्याने भरावे. आणू का टाक्यातून थोडे पाणी हे समुद्र भरायला?

ना: मी टाकतो. हे बघ भरले खंदक. सात गोलाकार समुद्र. आणि त्यांना एकमेकापासून दूर ठेवणारे हे सहा गोलाकार पर्वताळ प्रदेश. आणि सगळ्यात आतल्या खंदकानी वेढलेला हा जमिनीचा पोळीसारखा गोल तुकडा. तुझ्या निर्मितीची तोड नाही ब्रह्मा! नारायण नारायण!

ब्र: अरे, चिडवणे सोड नारदा. प्रियव्रताच्या रथाच्या चाकांनी निर्माण झालेल्या समुद्रांचा आकार केवढा. त्यांना काही नावे आहेत का?

ना: होय ब्रह्मा! पुराणात सारी सारी माहिती आहे. आपण केलेल्या खाचांची रुंदी आपल्या बोटाच्या जाडी एवढी. प्रियव्रताच्या रथाच्या चाकांनी केलेल्या प्रत्येक समुद्राची रुंदी लाखो योजने. मधले पर्वताळ प्रदेश पण असेच रुंद, पर्वतही हजारो योजने उंच.

ब्रह्मा, हे सहाही गोलाकार पर्वत म्हणजे बेटेच झाली कारण हे सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेले आहेत. एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर पाणी ओलांडूनच जाता येईल. म्हणजे हे सहाही पर्वत म्हणजे सहा द्वीप झाले, सहा बेटे. तसेच, सगळ्यात आतल्या खंदकाने वेढलेला जो गोल जमिनीचा खंड आहे तेही एक द्वीपच. त्या द्वीपावर कोण राहतं ओळख बघू.

ब्र: अरे मला काय माहीत? मी फक्त या भूगोलावर काकाकाकूंना ओळखतो.

ना: ब्रह्मा, ह्या द्वीपाचे नाव जंबुद्वीप. इथेच आपण सध्या राहतो. इथेच वाड्यातले मास्तर, म्हातारी, त्यांची पिल्ले, नातनातू, पणतपणतू, सुनाजावई, नातसुनानातजावई, सारे सारे राहतात. इथेच ती ३३ कोटींची वरातगंगा आली. आपल्या साऱ्यांचा पत्ता: जंबुद्वीप, भूमंडळ, ब्रह्मसृष्टी!

ब्र: नारदा, पत्ता आहे याचाच अर्थ अस्तित्वही आहे असा नाही का?

ना: ब्रह्मा, सोड तो अस्तित्वाचा अनस्तित्वाचा विषय. त्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपण सप्तद्वीपांबद्दल, सप्तसमुद्रांबद्दल बोलू.

ब्रह्मा, सगळ्यात आतले द्वीप, जंबुद्वीप वर्तुळाकार असून एक लक्ष योजने लांब रुंद आहे. मास्तरांनी शिकविलेली भूमिती आठवत असेल तर या वर्तुळाचा व्यास एक लक्ष योजने आहे असे म्हणता येईल.

ब्र: हो आठवते मला. व्यास एक लक्ष योजने म्हणजे त्रिज्या पन्नास हजार योजने हेही आठवते. नारदा, मीही एकदा शिकलेले सहसा विसरत नाही बरे!

ना: अर्थात. ब्रह्मा, जंबुद्वीपावर असलेले पर्वत, देश यांची सविस्तर माहिती नंतर सांगीन. पण जंबुद्वीपावर एक विशाल जांभळाचा वृक्ष आहे एवढे मात्र लक्षात ठेव. म्हणून त्याचे नाव जंबुद्वीप. जंबुद्वीप खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे. या समुद्राचा विस्तार जंबुद्वीपाएवढाच आहे. या खाऱ्या समुद्राला घेरणारे जे द्वीप आहे ते जंबुद्वीपापेक्षा दुप्पट विस्तार असलेले प्लक्ष नामक द्वीप आहे. येथेही एक विशाल सोनेरी प्लक्षवृक्ष आहे. ब्रह्मा, हे द्वीप अग्नीचे वास्तव्यस्थान आहे असेही पुराणात सांगितले आहे. सात जीभा असणारे अग्निदेव येथेच राहतात.

प्लक्षद्वीपाला त्याच्याएवढ्याच विस्ताराच्या समुद्राने वेढले आहे. हा समुद्र ऊसाच्या रसाने भरला आहे. या समुद्राच्या पलिकडे प्लक्षद्वीपापेक्षा दुप्पट शाल्मलीद्वीप आहे. हे द्वीप म्हणजे भगवान गरुडांचे निवासस्थान आहे. विष्णुवाहक गरुड.

अशा तऱ्हेने आधीच्या द्वीपापेक्षा पुढचे द्वीप दुप्पट आकाराचे तसेच प्रत्येक द्वीपाला घेरणारा समुद्र द्वीपाएवढाच अशी ह्या सप्तद्वीपांची व सप्तसमुद्रांची रचना आहे.

ब्रह्मा, शाल्मलीनंतरच्या चार द्वीपांची नावे कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप व पुष्करद्वीप. तसेच ऊसाच्या रसाच्या समुद्रानंतरचे पाच समुद्र अनुक्रमे मद्य, घृत, दूध, ताक व शुद्ध पाण्याने भरले आहेत. ब्रह्मा, या शुद्धोदक समुद्राच्या पलीकडे, म्हणजे खरे म्हणजे त्रैलोक्याच्या काठापर्यंच लोकालोक पर्वत व अतिविशाल भूभाग आहे. येथील जमीन आरशाप्रमाणे स्वच्छ असते व येथे फक्त देवगण राहतात. इथे मानवांना प्रवेश नाही. त्यांचा पदस्पर्श जरी या आरसपानी जमिनीला झाला तरी ते सदेह त्या भूमीत कायमचे लुप्त होतील. ते फक्त आरशातले प्रतिबिंब होतील.

ब्रह्मा, एक गोष्ट तुला खूप आवडेल. शेवटच्या द्वीपावर, म्हणजे पुष्करद्वीपावर एक कल्पनातीत विशाल कमळ आहे. ते तुझे आसन आहे. ते लाखो पाकळ्यांचे कमळ ब्रह्मकमळ आहे. आणि तू आज येथे एका झाडाच्या फांदीवर अंग चोरून बसला आहेस. काय काय खेळ दाखवतो हा काळ!

ब्र: नारदा, मी अगदी भारावून गेलो आहे रे. असे वाटते उडत उडत जावे आणि ही सप्तद्वीपे, हे सप्तसमुद्र, तो लोकालोक पर्वत, तो विशाल आरसा डोळेभरून बघून यावे. गोड्या आणि खाऱ्या पाण्याचे समुद्र सोडले तर बाकी पाच समुद्र म्हणजे पंचामृत स्नानाला योग्य. दुधाचा समुद्र, दह्याचा समुद्र, ताकाचा समुद्र, तुपाचा समुद्र, ऊसाच्या रसाचा म्हणजे गोड साखरेचा समुद्र. पंचामृत स्नान करावे म्हणतो. उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया. वा! जाऊ या का?

ना: ब्रह्मा, कल्पना छान आहे. कल्पनेतले आपण, कल्पनेचे पंख लावून तिथे जाऊ. पण ब्रह्मा, कल्पनेला कल्पनेचे पंख ज्याने आपली मूळ कल्पना केली तोच लावू शकतो असे मला वाटते. मला तर असे वाटते की काल्पनिक मी काल्पनिक तुला ही जी काल्पनिक कापुसकोंड्याची गोष्ट सांगतो आहे ही सुद्धा कोणी तरी माझ्याकरवी तसे करून घेण्याची कल्पना केली असेल म्हणूनच. कोण जाणे कोणी ही कल्पना केली! असो.

ब्र: नारदा, कधीकधी तुझे बोलणे फारच गूढ होत जाते रे. अर्थ कळला कळला असे वाटता वाटता तो हातातून निसटून जातो. साबणाच्या पाण्याचे बुडबुडे नुसते. असू दे. घे गोष्ट पुढे.

ना: ब्रह्मा, आता आपल्याला आपल्या बेटाकडे, जंबुद्वीपाकडे वळायला हवे. तसं म्हणावं तर सप्तद्वीपात हे द्वीप सर्वात लहान. पण 'मेरा भारत महान!'.

ब्रह्मा, जंबुद्वीप एक लक्ष योजने व्यासाचे वर्तुळ आहे हे आपण पाहिलेच. याच्या पूर्व-पश्चिम व्यासावर दहा विभाग करणारे वेगवेगळे वर्ष आहेत. ब्रह्मा, वर्ष म्हणजे ते ३६० दिवसांचे नाही. वर्ष म्हणजे देश समज. यातले ९ देश अंदाजे ९-९ हजार योजने लांब आहेत.

ब्र: म्हणजे नारदा, दहावा देश १९ हजार योजने लांब असेल.

ना: नऊ नऊ ८१ अन् १९ म्हणजे १००. बरोबर ब्रह्मा. अंकगणितात पैकीचे पैकी असतात तुला आजकाल. ब्रह्मा, जंबुद्वीपाच्या मधोमध जे वर्ष आहे ज्याला इलावृत म्हणतात. त्याच्या मधोमध एक खूप मोठा पर्वत, मेरु नावाचा पर्वत आहे. जंबुद्वीप सात समुद्राच्या मध्यावर. इलावृत जंबुद्वीपाच्या मध्यावर, आणि मेरु पर्वत त्याच्या मध्यावर. उंचच उंच पर्वत. एक लक्ष योजने उंच पर्वत. इतर पर्वतांपेक्षा अगदी भिन्न पर्वत. 'पायथ्याला लहान, शिखराला महान' असा उलटा पर्वत. पायथ्याला सोळा हजार योजने लांब, तर शिखराला ३२००० योजने लांब. सुवर्णकांतीने चमचम करणारा पर्वत. सुवर्ण पर्वत! मेरु पर्वत!

ब्र: पण नारदा, पर्वत म्हणजे मोठी टेकडीच ना रे? सीताबर्डीच्या गणपतीला तू एकदा नेलेस तेंव्हा मी ती विशाल टेकडी पाहिली. ती तर पायथ्याला ज्यास्त विस्तार असलेली व शिखराकडे निमुळती होत गेलेली. उलटे कसे शक्य? उलट्या पर्वतावर चढणार कसे? हा पर्वत कलंडून पडणार नाही का?

ना: ब्रह्मा हा कल्पनातीत असा पर्वत आहे. झाडासारखा समज. बुंध्याला लहान, वरचा वृक्षसंभार मोठा. तू लहान मुलांना भोवरा खेळतांना पाहिले असशील. फिरणारा भोवरा कसा खाली टोकदार व वर पसरट होत गेलेला असतो? मेरु पर्वत म्हणजे असेच काही समज. कावळ्याची छत्री! भोवऱ्याची आरू जशी जमिनीत घुसते तसा मेरु पर्वत पण १६००० योजने जमीनीतही घुसला आहे.

ब्र: पण नारदा, हा आपल्याला दिसतो का रे?

ना: ब्रह्मा, हा दिव्य पर्वत दिसायला दृष्टीही दिव्य लागते. हा पायथ्याशी १६००० योजने लांब, शिखराशी ३२००० योजने लांब, उंचीलाही एक लाख योजने उंच पर्वत, १६००० योजने जमिनीत रुतलेला पर्वत, हा अतुल्य पर्वत ज्याला दिसत नाही तो आंधळा. आणखी काय? नारायण नारायण!

ब्र: बरे बाबा. असेल. नाहीतरी मी म्हाताराच. नाही दिसत मला. इतक्या दूरचे सप्तर्षी मला दिसतात. पण हा जवळचा, आपल्याच जंबुद्वीपावरचा पर्वत खरेच नाही रे दिसत.

ना: ब्रह्मा, खरे सांगायचे तर मीही कधी पाहिला नाही. पण पुराणात आहे म्हणजे असला पाहिजे. नारायण नारायण!

ब्रह्मा, मेरुपर्वताच्या उत्तरेकडे जे वर्ष आहेत त्यांची नावे आहेत रम्यक, हिरण्मय आणि कुरू. आणि दक्षिणेकडचे देश म्हणजे हरिवर्ष, किंपुरुषवर्ष आणि भारतवर्ष. ब्रह्मा, या भारतवर्षात आपण राहतो. आणि मुख्य म्हणजे आपण या भारतवर्षाच्या मध्यभागी नागपूर नगरीत राहतो. विशाल त्रैलोक्यात, या विशाल भुवनकोशात हे आपले स्थान.

ब्र: चला, म्हणजे या त्रिभुवनात यावेळेस नेमके आपण कोठे आहो याचा थांगपत्ता लागला. छान!

ना: ब्रह्मा, मेरुपर्वताचे स्तंभ, म्हणजे खांब ज्यांना म्हणता येईल, त्या चार बाजूच्या चार पर्वतांची नावे मंदर, मेरुमंदर, सुपार्श्च आणि कुमुद. या चार पर्वतांवर चार विशाल वृक्ष आहेत. हे वृक्ष अकराशे योजने उंच आणि शंभर योजने वृक्षसंभार असलेले आहेत. आंबा, जांभूळ, कदंब आणि वड अशी ही चार झाडे.

ब्र: नारदा, म्हणजे हे सीताफळाचे झाड म्हणजे तर काहीच नाही रे. अगदी चिंटू!

ना: होय ब्रह्मा! चार पर्वतांवर दूध, मध, ऊसाचा रस आणि गोड पाण्याने भरलेले डोह आहेत. सुंदर उपवने आहेत. इथेच देव, अप्सरांबरोबर राहतात आणि गंधर्व देवस्तुतीगान करतात.

ब्रह्मा, आम्रवृक्षाचे आंबे तर पर्वतशिखराएवढे मोठे. आंबे जमिनीवर पडून फुटून त्यांच्या लाललाल रसाची एक नदी वाहते. आंब्याच्या रसाची नदी. तसेच हत्तीएवढी बिनबियांची जांभळे पडून फुटून त्यांचा रस जंबू नदीतून वाहतो. हा रस जेंव्हा तीरावरील मातीत मिसळतो आणि जेव्हा ती माती वाळते तेव्हा जांबूनद नावाचे सोने तयार होते. देव, अप्सरा, गंधर्व याच सोन्याच्या दागिन्यांनी मढलेले असतात. नारायण नारायण!

ब्रह्मा, तसेच कदंबवृक्षाच्या ढोलीतून मधाच्या धारा निघतात व मधाची नदी वाहते. वटवृक्षाच्या पारंब्यातून अनेक नद नद्या निघतात. ते सर्व नद नद्या इच्छा असेल ते प्रदान करतात. दूध, दही, मध, तूप, घरदार, गादी, घोडा, दागिने, जी वाटेल ती उपभोगाची वस्तू. ह्या कल्पवृक्षाने दिलेले उपभोग भोगणाऱ्यांना वृद्धत्व येत नाही. त्वचेला सुरकुत्या पडणे, केस पिकणे, दात पडणे, मोतिबिंदु होणे, घाम येणे, सर्दी खोकला, रोग, म्हातारपण, मृत्यु काही काही नाही. चिरतारुण्य!

ब्र: नारदा, वाचा बंद होते रे हे ऐकतांना. आपण कधी तेथे जायचे ते सांग. वरातगंगा घेऊन नाही तरी दोघे तरी जाऊ.

ना: तुला मला कोण थांबवेल? तुझीच ही सारी निर्मिती. आणि मी निर्मात्याची निर्मिती. जाऊ कधी. पण आत्ता तुझी एक चाचणी परीक्षा. त्यात पास झाला तरच पुढची गोष्ट.

ब्र: नारदा, ही तुझी शाळा. घे तिमाही परीक्षा. पास कर रे देवा!

ना: सप्तसमुद्र आणि सप्तद्वीपांचे वर्णन आपण पाहिले. मला सांग, सगळ्यात बाहेरच्या द्वीपाचा, म्हणजे पुष्करद्वीपाचा, म्हणजे ज्या द्वीपावर तुझे कमलासन आहे, ब्रह्मकमळ आहे त्या द्वीपाचा विस्तार किती?

ब्र: नारदा, प्रत्येक द्वीपाएवढाच त्याला घेरणाऱ्या समुद्राचा विस्तार असे तू सांगितलेस. तसेच आतल्या द्वीपापेक्षा त्याच्या नंतरचे द्वीप दुप्पट हे सांगितलेस. सर्वात आतले दीप, जंबुद्वीप १ लक्ष योजने सांगितले. तसे असेल तर माझे द्वीप, पुष्करद्वीप ६४ लक्ष योजने विस्ताराचे असले पाहिजे. म्हणजे त्याला घेरणारा शुद्धोदकाचा समुद्रही तेवढाच मोठा.

ना: बरोबर ब्रह्मा. गणितब्रह्मा! जंबुद्वीपापासून सातव्या समुद्रापर्यंत जो भाग आहे, तेवढीच जमीन त्याच्या बाहेरही आहे. आणि त्याच्या भोवताल मग साडेबारा कोटी योजने विस्तार असलेला लोकालोक पर्वत आहे. ती विश्वाची सीमा. पलिकडे काही नाही. ब्रह्मा, पूर्ण हिशोब करून विश्वाचा विस्तार ५० कोटी योजने आहे असेही पुराणात सांगितले आहे.

ब्र: अबब! खरे म्हणजे अबबबबबबबबबबबबबबबबबबबबब.......

पण नारदा, अजून तुझी गोष्ट सूर्यापर्यंत पोहोचलीच नाही. तुला आठवते तरी का रे की आजची गोष्ट सूर्य आणि चंद्राची होती? मूळ गोष्टीला हात घालावा मुनिवर. गोष्टीत सूर्योदय होऊ द्यावा.

ना: ब्रह्मा, कापुसकोंड्याच्या गोष्टीचे असेच असते. कुठे सुरू होईल आणि कुठे संपेल ते सांगता येत नाही. बघ काकाकाकूंचे काम आटोपले. जेवून, सिरियल पाहून, दुधाला विरजण लावून ते केंव्हाच झोपी पण गेले. केव्हा आपल्या खोलीत जाऊ असे झाले आहे. आणि ब्रह्मा, इतक्या मध्यरात्री सूर्य कसा उगवेल रे? कोंबडीला कुकूच्चकू तर करू दे. जगरहाटी पाळावी माणसाने.

ब्र: नारदा, तो मेरू पर्वत उलटा असला तरी त्याला तळ आहे, शिखर आहे. बूड आहे, शेंडा आहे. तुझी आजची गोष्ट मात्र अगदीच 'शेंडा ना बूड'. नारायण नारायण!

_____________________


अनुक्रमणिकेकडे