Thursday, 28 April 2016


गोष्ट अठरावी


ब्र: उठा कम्युनिस्ट, सकाळ झाली. नाश्त्याचा खमंग वास येत आहे. इडली सांबार आहे आज बहुतेक. रसगुल्ले पण असावेत असे वाटते.

ना: कम्युनिस्ट? हा शब्द तुम्हाला कोणी सांगितला? मी तर या शब्दाचा उच्चार पण कधी केला नाही. भारतवर्षात कम्युनिस्ट बिम्युनिस्ट नसतात बरे.

ब्र: अरे चुकला असेल शब्दप्रयोग. पण असाच काहीतरी शब्द तू सांगितला होतास मागच्या वेळेस. अरे ते नाही का, खोटं बोलणारे, काहीही ढाप मारणारे.

ना: ब्रह्मा, कठिण आहे रे बाबा तुझे! अरे ढाप नाही, थाप, थाप. ढापचा अर्थ वेगळा. थापा म्हणजे फोका. थापा मारणारा, फोका मारणारा तो फोकनाडिस्ट.

ब्र: ओहो! फोकनाडिस्ट. तेच ते. कम्युनिस्ट नाही, फोकनाडिस्ट. तरीच मला वाटत होतं की माझं काही तरी चुकत आहे. फोकनाडिस्ट. फोकनाडिस्ट. आता नाही विसरणार.

ना: बरे झाले मलाच कम्युनिस्ट म्हणालास. दुसऱ्या कोणाला म्हणाला असता तर पडली असती पाठीत ती कोपऱ्यातली लाठी. काका घेऊन जातात ती रविवारी सकाळी शाखेत की कुठेतरी. 'संघाची लाठी, कम्युनिस्टांच्या पाठी' अशी म्हण आहे नागपूर नगरीत. विळ्या भोपळ्यासारखे मधुर प्रेमसंबंध आहेत त्यांचे.

बरे, ते राहू दे. चल नाश्ता बघू. खास बेत दिसतो आहे आज. कोणी तरी येणार असेल नाश्त्याला. इडली आणि रसगुल्ले. कालपासून बेत शिजत होता. आपल्याला मात्र नुसतं दृष्टिसुख लाभेल. थोडसं अवघ्राणसुख पण. बाकी नाश्त्याचा नैवेद्य वगैरे नसतोच म्हणा. तू बघ थोडा वेळ इथेच उभा राहून. मी आलोच. हा असा गेलो आणि असा आलो.

काका: अग बघ जरा. बेल वाजली. भैय्याजी म्हणजे अगदी घड्याळ आहेत, घड्याळ. बरोब्बर आठाला हजर.

काकू: या या भैय्याजी. अगदी वेळेवर आलात. एकदम सुरू करू या यज्ञकर्म. आज अगदी स्पेशल बेत केला आहे बरें.

काका: हो म्हणजे, दोन डझन इडल्या अन् दोन डझन रसगुल्ले खाऊन दाखवीन असे म्हणालो होतो मी तुम्हाला. आज प्रात्यक्षिक आहे. आज मीच काय, आज तुम्ही सुद्धा खाऊ शकाल. या असे. बसा.

काकू: अहो भैय्याजी, हे म्हणजे अगदी फोकनाडिस्ट. सहज बोलता बोलता बोलून गेले की हे एका बैठकीत दोन डझन इडल्या अन् दोन डझन रसगुल्ले खातात म्हणून. पतीदेव खोटे पडू नयेत म्हणून आजचा हा बेत. मिनी इडली आणि अंगूरी रसमलाई. द्राक्षाएवढे लहान लहान रसगुल्ले पिळून बासुंदीत टाकलेले. पोटभर खा. मग निघू सारे अखंड भागवत सप्ताहाला. आज समुद्रमंथनाची कथा लागेल असं म्हणतात.

काका: छान. सहज गेले दोन दोन डझन नग पोटात. कळलेही नाही. तरीही पोट भरले असे वाटत नाही. वाड्यातले एका पेढ्याचे एकवीस मोदक आठवले. म्हणायला खूप, पण खरे म्हणजे एकच पेढा. अडजीभ खाते, आणि पडजीभ बोंबल्या मारते. चला आता. 'अथ श्री नारदपुराणे' ऐकायला.

ब्र: बापरे नारदा! कुठे जाऊन आलास रे? ते भैय्याजी आले होते. दहा पंधरा मिनिटात वीस इडल्या, वीस रसगुल्ले खाऊन गेले सुद्धा. सगळेच गेले. काका काकू पण. कुठेतरी भागवत पारायण आहे असे म्हणत होते. समुद्रमंथनाची गोष्ट लागणार आहे म्हणे आज. मी पण जाईन म्हणतो. तू नेहमी सांगतो सांगतो म्हणतो. पण तू काही ती गोष्ट कधी सांगशील असे वाटत नाही मला. कम्युनिस्ट कुठला.

ना: ब्रह्मा, अरे कम्युनिस्ट नाही. फोकनाडिस्ट. कितीदा सांगायचं? आणि काही नको जायला देवळात वगैरे भागवत ऐकायला. मी सांगीन कधीतरी ती सत्यकथा. तुझ्यापाशी अथ ते इति नारद खुद्द असताना तू देवळात ते 'नारद उवाच' वगैरे ऐकायला कां जावे म्हणतो मी.

ब्र: बरं राहिलं. नाही जाणार मी. पण तू थोड्या वेळापूर्वी गायब कुठे झाला होता?

ना: अरे मी आपलं ... म्हणजे ते नाही का... जिथे ते त्यांचं ... म्हणजे ते आपले ...

ब्र: बरं राहू दे. नको सांगू वाटल्यास. थोडासा अंदाज मला आला आहे. तरीच म्हटलं, तू गेला आणि नेमकी तेव्हाच बेल कां वाजली. बरं असू दे.

नारदा, किती सुंदर रे ती मिनी इडली अन् ते अंगूरी रसगुल्ले. अशाच चिटुकल्या मिटुकल्या गोष्टी कां असत नाहीत? मिनीकथा, अंगूरीकथा. द्राक्षकथा.

ना: ब्रह्मा, असतात. अगदी करंगळी एवढ्या गोष्टी असतात. अंगुरी रसगुल्ल्याची चव जशी दिवसभर जीभेवर रेंगाळत राहते तशाच ह्या गोष्टी. लहानश्या असल्या तरी बराच वेळ विचार करायला लावणाऱ्या असतात. ब्रह्मा, पेवंदी बोरेही असतात, आणि गावरानी शेंबडी बोरेही. कुठलाही खाणारा सांगेल गावरानी बोरांचा शेंबूड किती चविष्ट असतो ते. व्वा! अजूनही जीभेवर ती चव आहे. गेलो होतो एकदा असाच राधाबाई होऊन संक्रांतीच्या हळदीकुंकवाला वाड्यात. ओटीमधली ती अर्धवट वाळलेली, धुळीने माखलेली बोरे. व्वा. तशाच ह्या अंगूरी कथा पण असतात. माळरानावरची जंगली बोरे. ह्या अंगूरी रसगुल्ल्यांचे पण तसेच आहे. मिनी इडली तर काही विचारूच नकोस. उम्म्म्म्मा!

ब्र: तुला रे कशी रसगुल्ल्याची चव माहीत. तुला कसे माहीत अंगूरी रसगुल्ले होते म्हणून? तुला कसे माहीत मिनी इडली होती म्हणून? तू तर येथे नव्हतास नाश्त्याच्या वेळेस?

ना: अरे तूच आत्ता सांगितलेस. ते जाऊ दे. आज आपण काय करायचं ते सांग. काका काकू नाहीत आज. आपलं करमणुकीचं साधन नाही. नाही तर बरा वेळ जातो दिवसभर. आज मात्र घर खायला उठेल.

ब्र: नारदा, आपण आज १०-२० चिंटू गोष्टी ऐकायच्या का? तू सांग, मी ऐकतो. मलाही एखादी सुचली तर मी पण सांगतो.  अंगूरी गोष्टी. गावरानी गोष्टी. शेंबड्या गोष्टी. मिनी गोष्टी. गोष्टीच गोष्टी.

ना: मेला कोष्टी. ब्रह्मा, अशा गोष्टी सांगायला मलाही आवडेल. पण अशा सानुल्या गोष्टी विचार मात्र खोल करायला लावतात बरें. प्रत्येक गोष्टीनंतर आपणही वाटल्यास चर्चा करू. पण फार नाही. चर्चेपेक्षा चिंतन फार महत्त्वाचे असते या अशा गोष्टींमधे. पण चिंतन करेल कोण? सारेच जण डोळ्याला पट्टी बांधून आंधळी कोशिंबीर खेळत असतात, आणि झाडाचा बुंधा जरी हातात आला तरी 'सापडला, सापडला, मला देव सापडला' म्हणून ओरडत सुटतात. काय म्हणावे या दुर्गतीला! पण त्यालाच ते positivity म्हणतात. म्हणोत बापडे!

ब्र: नारदा, मला सुद्धा हे चिंतन कठिण आहे रे. कठिण आहे. मला तर समजावून सांगितल्याशिवाय काही समजत नाही. पण बघतो प्रयत्न करून. आणा पहिले द्राक्ष.

ना: ब्रह्मा, एक असेच सिद्धपुरुष होते. फारच अबोल. अगदी मितभाषी. एक दिवस त्यांच्याकडे एक श्रीमंत माणूस आला. शिष्यच त्यांचा. सिद्धाला नमस्कार वगैरे करून म्हणाला, स्वामी, तुम्ही त्रिकालदर्शी आहात. माझे भविष्यसत्य थोडक्यात मला सांगावे, मी आतापर्यंत कधीही वाममार्गाने गेलो नाही. त्यामुळेच की काय, आजपर्यंत कधीही दु:ख फारसे पाहिले नाही. पण म्हणूनच मनात आजकाल अनिष्टाची पाल चुकचुकते. माझ्या भविष्यात काय आहे हे मला संक्षेपाने कथन करावे.

मितभाषी सिद्धाने एका पाटीवर लेखणीने काहीतरी लिहिले व पाटी शिष्याला दिली.   'सुखी रहा' असा आशिर्वादही ते पुटपुटले.

पाटीवर जे लिहिले होते ते वाचून शिष्याचा चेहरा खर्रकन उतरला. सिद्धाने पाटीवर लिहिले होते 'आधी तू मरशील, मग तुझा मुलगा मरेल, मग तुझा नातू मरेल.'.

ब्र: नारदा, अरे पुढे काय? असा अचानक थांबलास कां?

ना: ब्रह्मा, मी थांबलो नाही. गोष्ट सरली. अशाच असतात रे ह्या गोष्टी. संरून जातात. अरे द्राक्षच हे. दाढेखाली दबले की क्षणात रस निघून तोंड गोड करून जाते. मागे काही उरत नाही. बत्तीसदा चावायची गरज नसते अंगूरी गोष्टींना. तूच म्हणालास ना अंगूरी कथा सांग म्हणून?

ब्र: हे रे काय? ही काय कथा? आता मी पण एक गोष्ट सांगतो तुला. ऐक. एक था राजा. एक थी रानी. दोनो मर गए. खतम कहानी.

ना: ब्रह्मा, चिडू नकोस. पण माझी गोष्ट साधी नव्हती. खूप अर्थरस होता त्या द्राक्षात. ब्रह्मा, सिद्धाने जे लिहिले त्याचा अर्थ असा होता की त्या श्रीमंताच्या आयुष्यात तोवर होते तसेच सुख पुढेही राहील. तू मला सांग, सिद्धाने लिहिलेल्या क्रमात जरा तरी बदल केला तर काय होईल? त्याच्या आधी त्याचा पुत्र मेला तर त्याला आवडेल का? त्याचा नातू त्याच्या पुत्राआधीच गेला तर त्यांना आनंद होईल का? ब्रह्मा, आपण अविनाशी आहोत म्हणून आपल्याला मृत्यू ह्या कल्पनेची गहनता कळत नाही. पण मनुपुत्रांचे तसे नाही. मृत्यूचे अटळ सत्य त्यांना नेहमी भेडसावत असते. पण तरी पण आपल्या आधी आपल्या अपत्याने जाण्यासारखे दु:ख नाही. मरायचेच आहे तर नैसर्गिक क्रमाने मृत्यु होणे हेही सुखच आहे. तेच सुख श्रीमंत माणसाच्या भविष्यात होते. पण पाटीवरचे वाचतांना 'मृत्यु' हा शब्दच त्याला इतका दु:खी करतो की मृत्युशृंखलेच्या नैसर्गिक क्रमात दडलेले सुख त्याला जाणवत नाही. ह्याच मानवस्वभावावर हा कथाकण आधारीत होता. मृत्यूच्या विचाराने आपण जिवंत आहोत तोवरही मानव समोर वाढून ठेवलेल्या सुखाचा नकळत अव्हेर  करतो असाही कथेचा बोध आहे. ब्रह्मा, ही पौराणिक कथा नाही. ही सिद्धकथा आहे. सत्यकथन आहे. आपल्याला पौराणिक कथांची खूपच सवय झाली आहे. अद्भुत, विराट, भव्य, अपौरुषेय असे काहीतरी कथेत हवे. शेवटी कथाबोधही स्पष्ट सांगायला हवा. साठा उत्तरांची कहाणी हवी. डोक्याला ताण नको. आजच्या आपल्या कथा औट घटकेचे अस्तित्व असणाऱ्या मानवांच्या आहेत. यात साठ काय, पाच काय, सहज सांगितलेले एकही उत्तर नाही. उत्तर ऐकणाऱ्याला शोधायचे आहे. काय? नसेल पटत तर समुद्रमंथनाची गोष्ट सांगतो. रंगवून रंगवून सांगतो. साठा उत्तरांची कहाणी सहाशे उत्तरात सांगतो. ऐकणाऱ्याला काय सुफळ मिळेल तेही सांगतो. कथा संपली की 'संपूर्णम्' म्हणूनही अनाउंसमेंट पण करतो. काय?

ब्र: नको रे. आवडली मला ही छोटूशी कथा. अशाच आणखी सांग. मीही विचार करीन. माझ्या बुद्धीचा वापर तरी होईल. जंगायला लागली होती पुराणे वाचून. जरा मेंदू उजळेल आजच्या कथांनी. अशा चिंचोक्याएवढ़्या कथा म्हणजे बुद्धीकरिता चिंच आहे. बुद्धिपात्र उजळून निघेल काकूंच्या देवाच्या पात्रांसारखे. चल पुढे. एक कथा झाली, आता दुसरी.

ना: ब्रह्मा, एक अध्यात्मिक माणूस सत्यशोध करण्याकरिता हिमालयात निघून गेला. चालता चालता मार्गात त्याला एक नदी दिसली. नदीचे पात्र फार रुंद नसले तरी नदी दुथडी भरून वाहत होती. माणसाने इकडे तिकडे पाहिले. नाव, नावाडी तर सोडाच, एक काळं कुत्र सुद्धा त्याला दिसलं नाही. अगदी निर्जन नदीचा काठ. अचानक त्याला पलिकडच्या तीरावर एक बालक दिसले. माणसाने मोठ्याने ओरडून त्याचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. मुलाचे लक्ष जाताच त्याने मोठ्या आवाजात त्याला विचारले 'पलिकडे कसे जायचे?'. मुलाने थोडा विचार केला व म्हणाला 'तुम्ही पलिकडेच तर आहात.'.

ब्र: हं. तू थांबलास म्हणजेच गोष्ट संपलेली दिसते. खूपच लहानशी इडली होती. पण मला अर्थ कळला. काकूंच्या त्या आवडत्या गाण्यातही असेच काहीसे होते.

कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती
हाय अभाग्या भगवे नेसुन घर संन्यासुन जाशी

देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होउनी देव भिकारी, अन्‍नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी

ना: शाबाश ब्रह्मा. या गोष्टीतही देव पलिकडच्या तीरावरील बाळमुखातूनच बोलला. पण कथेचे मर्म ऐकणाऱ्याला समजून घ्यायचे आहे. गाण्यातल्यासारखे ते explicitly सांगितलेले नाही. तसे सांगितले की मजा किरकिरी होते रे. 'हा विनोद होता. आता हासा पाहू सगळे.' असे म्हटल्यासारखे होते. टीव्हीवरच्या विनोदी कार्यक्रमात मधून मधून हास्यध्वनी, म्हणजे laugh track लावतात तसे. मला नाही आवडत तसले प्रकार. विनोदाकलन म्हणजे काय बटननी लागावा असा दिवा आहे? मग डोके कशासाठी?

ब्रह्मा, तुला आठवलेले गाणेही खूप सुंदर रे. पण मी हे तीस वर्षांपूर्वी वाड्यात ऐकले होते. त्या म्हातारीच्या सुनेने गायले होते तिच्या स्वयंवरात. छान.

ब्र: कसे प्रत्येक गोष्टीचे धागे कुठे ना कुठे जुळलेले असतात ना नारदा? पण तू म्हणतोस तसे ते सरिताचे स्वयंवर वगैरे नव्हते बरे. ती फक्त मास्तरांचा मुलगा थोडाफार तरी बरा आहे का हे पहायला आली होती. अरे ती तर मी बांधलेली गाठ होती म्हणतात. पक्की असते. असो. एक, दोन. आता तिसरी गोष्ट सांगा मुनिश्रेष्ठ.

ना: ब्रह्मा, एक शेतकरी होता. वृद्ध झाला होता बिचारा. त्याचा मुलगा आता शेती करायचा, आणि हा वृद्ध दिवसभर शेताच्याच बांधावर खाटेवर पडून मुलाकडे-शेताकडे-आकाशाकडे-मुलाकडे-शेताकडे-आकाशाकडे आळीपाळीने बघत राहायचा. एके दिवशी भर दुपारी रणरणत्या उन्हात काम करतांना वळून आपल्या बापाला खाटल्यात पडलेले पाहून त्या मुलाला खूपच राग आला. त्याच्या मनी विचार आला की हा आता काही कामाचा नाही. खायला काळ अन् भुईला भार. घरी येऊन रात्री त्याने लाकडाची एक आडवी पेटी तयार केली. दुसरे दिवशी शेतावर बाप झोपला असता त्याला उठवून म्हणाला 'बापू, ऊन फार आहे. खाटेऐवजी तुम्ही या पेटीत झोपा. झाकण लावले की ऊनही लागणार नाही.'. बाप म्हणाला 'अरे किती छान पेटी केलीस. शवपेटीसारखीच दिसते. मला माहीतच नव्हते की तू सुतारकामातही इतका तरबेज आहेस. शाबास!'. एवढे म्हणून शेतकरी पेटीत जाऊन ऊताणा झोपला. वर सूर्य होता त्याला झोपूनच हात जोडले व त्याने डोळे मिटून घेतले. मुलाने लगेच पेटीचे झाकण लावून घेतले.

पेटी ओढत ओढत मुलाने टेकडीच्या कड्यापाशी आणली. आता तो पेटीचा बापासकट कडेलोट करणार तोच पेटीतून आतून बापाने पेटीच्या झाकणावर टकटक आवाज केला. मुलगाच तो. त्याने पेटीचे झाकण उघडले. बाप म्हणाला 'अरे बाहेर काढून फक्त मलाच ढकलून दे. पेटीला कशाला ढकलतोस? पुढे ती तुझ्या कामी येईल.

ब्र: हं. काय म्हणावे? पुढे काय झाले विचारण्याचीही सोय नसते या अशा गोष्टीत. कलियुग रे बोवा कलियुग! चला पुढे. एक, दोन, तीन. आता चवथी गोष्ट सांगा देवर्षी.

ना: ब्रह्मा, ही गोष्ट गुरु शिष्याची आहे. पूर्वी गुरूच्या आश्रमातच शिष्य बालपणी राहात असत. विद्यार्जन आणि पडेल ते काम करणे हे त्यांचे काम. एक दिवस गुरूने शिष्याला मातीच्या वाडग्यात त्यांच्याकरिता पाणी आणायला सांगितले. शिष्य गेला आणि काही वेळाने रिकाम्या हातीच आला. गुरूंनी विचारले, काय झाले? शिष्य म्हणाला, 'गुरुदेव, नश्वरता म्हणजे काय?'. गुरुजी म्हणाले 'बाळा, ज्याला आदि आहे, त्याला अंत आहे. जन्म आहे त्याला मृत्यु आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस अंत पावतेच. हा निसर्गाचा नियम आहे व याला अपवाद नाही.'. एवढे सांगता सांगता गुरूच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.

ब्र: हं. हा निसर्ग नियम तुझ्या या चिंटू गोष्टींनाही लागू आहे. सुरू होता होता संपून पण जातात. शोधत बसा अर्थ. नारदा, मी जरा पाणी पिऊन येतो. काका काकू नसल्यामुळे आज चहा नाही. कपात नळाचे पाणीच भरून पितो घोटभर.

ना: जातोच आहेस तर मलाही दे आणून कपभर पाणी. हा नागपूरचा उन्हाळा म्हणजे फारच बा! आज काका काकू नाहीत म्हणून कुलर पण नाही.

ब्र: मुनी, तुझ्या ह्या गुरुशिष्याच्या गोष्टीचा अर्थ मला आत्ता कळला रे. शिष्याच्या हातून पाण्याचे वाडगे पडले व फुटले. आता गुरू रागवेल असे वाटून त्याने नश्वरता म्हणजे काय ते विचारले. गुरूंनीही त्याच्या मनातले खरे कारण हेरले व त्याला उत्तर दिले. त्यातच 'बाळा, फुटले तर फुटले. त्यात काय एवढे. वाडगेच ते. नश्वर गोष्ट. चिंता सोड आणि अध्ययनाला लाग' अभिप्रेत होते. गुरुशिष्याचे नाते पितापुत्राचे नाते असते. न सांगताही, न उच्चारताही ते एकमेकांच्या विवंचना हेरू शकतात, वारू शकतात. अवघड सत्य ओठावर आणण्यात जी कुचंबणा होते ती टाळू शकतात.

ना: आले माझ्या लक्षात ब्रह्माजी. तुम्ही माझ्यासाठी पाणी न आणताच आलात तेव्हाच मला थोड्या वेळापूर्वी झालेल्या खळ्ळ्ळ्ळ आवाजाचे मर्म समजले. चिंता नको करूस. भानामती वगैरेचा संशय नाही येणार काकूंना. फारच फार तर मांजरीला एक रट्टा पडेल त्यांचा कप फोडला म्हणून.

ब्र: नारदा, तूही सिद्धच आहेस रे बाबा. शितावरून भाताची परीक्षा करतोस. खरेच माझ्या हातून काकूंचा कप फुटला. नश्वर कुठचा! ते असू दे. पाचवी गोष्ट सुरू कर. काका काकू येईपर्यंत जेमतेम दहाच गोष्टी होतील आज असे वाटते. बाकी नंतर कधी.

ना: ब्रह्मा, हे द्राक्ष खूपच लहान आहे. ऐक. एक शेरपा यात्रेकरूंना म्हणाला 'माझ्या हुशारीने आज आपला फायदाच झाला. आपण काळवीट बरोबर घेऊन गेलो म्हणून जखमी यात्रेकरूला त्याच्या पाठीवर टाकून दिवस बुडण्याआधी येथवर घेऊन येऊ शकलो.'. एका चोंबड्या यात्रेकरूने विचारले 'पण यात्रेकरू जखमी झालाच कसा?'. शेरपा उत्तरला, 'काळवीटाने त्याला लात मारून खाली पाडले म्हणून'.

ब्र: व्वा. हा यात्रेकरू म्हणजे तर चार्वाकच दिसतो. फाजील कुठला. बरे आता सहावी गोष्ट सांग झटपट. दहा तरी व्हायला हव्या आज.

ना: ब्रह्मा, चार आस्तिक माणसांना गुरूने चार दिवस मौनव्रत पाळण्याचा सल्ला दिला. नंतर त्यांना मोक्षप्राप्तीचा मंत्र ते देणार होते. चौघेही मुकाट्याने झोपडीत गेले. रात्र झाली. झोपडीत मिणमिणणारी दिव्याची ज्योत व तितकीच भयाण शांतता. इतक्यात वाऱ्याची झुळुक आली व दिवा विझला. 'अरे, दिवा विझला वाटते' पहिला म्हणाला. 'आपण मौनव्रत धारण केले आहे हे तू विसरलास वाटते.' दुसरा म्हणाला. 'तुम्ही दोघांनीही मौनव्रत तोडले. आता कुठला तुम्हाला मोक्षाचा मंत्र?' तिसरा म्हणाला. 'तुमच्या तिघांचाही व्रतभंग झाला. फक्त मीच यशस्वी झालो' चौथा वदला.

ब्र: छान. गोष्ट होती की मला टोमणा? 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण' हेच सुचवायचे आहे ना? की तुझी नेहमीची आस्तिकवादाची टिंगल? तुझा काही नेम नाही रे बाबा. जे असेल ते असो. आता सातवी गोष्ट सांगा मुने.

ना: ब्रह्मा, एक वृद्ध संन्यासी आणि एक तरुण संन्यासी आन्हिकादि विधी आटपून रानातून जात होते. अचानक पाऊस सुरू झाला आणि पाहता पाहता वाटेतले नदीचे कोरडे पात्र भरून वाहायला लागले. संन्यासी पात्रात उतरून पोहून पलिकडे जाणार तेवढ्यात एक तरुणी धावत धावत आली व तिलाही त्यांनी नदी पार करून द्यावी अशी गयावया करू लागली. वरिष्ठ संन्याशाने तिला लगेच खांद्यावर उचलून नदी पार करून दिली. तिला पैलतीरावर सोडून दोघे आश्रमात परत आले.

दोन तीन दिवसांनी लहान संन्यासी मोठ्याला म्हणाला 'बंधु, संन्याशांना स्त्रीस्पर्श वर्ज्य असतांना तुम्ही त्या तरुणीला कसे उचलून घेतले? मोठा संन्यासी म्हणाला, 'अरे मी तिला पैलतीरावर खांद्यावरून उतरवूनही आलो. तू तर तिचे ओझे अजूनही वाहतच आहेस'.

ब्रह्मा, पुढची गोष्ट पण एका दमात सांगूनच टाकतो.

एकदा डोंगरवाटेने जात असता एका माणसामागे एक भुकेला वाघ लागला. जीव मुठीत घेऊन तो माणूस पळू लागला व पळता पळता डोंगराच्या काठावर आला. पुढे खोल खाई. इकडे आड तिकडे विहीर. वाघ आता झेप घेणार एवढ्यात त्या माणसाने दिसेल ती वेल घट्ट हातात धरून कड्यावरून उडी मारली. वेल बरीच लांब होती. तिला धरून तो माणूस आता कसाबसा अधांतरी लोंबकळू लागला. कड्याच्या टोकावर उभा राहून वाघ रागाने गुरकावत होता. वेल धरून वर जाण्यात अर्थातच काही अर्थ नव्हता. माणसाने खाली पाहिले तर दरी बरीच खोल होती. वेल सोडून उडी मारली असती तर जीव कदाचित वाचला असता पण हाडेकुडे तुटली असती. जरा निरखून पाहता त्याच्या असे लक्षात आले की दरीतही एक वाघ वर पाहून भक्ष्य केंव्हा खाली पडेल याचीच वाट पाहत होता. पुन्हा वर बघतो तर एक काळा व एक पांढरा उंदीर वेलीच्या मुळाशी भराभरा कुरतडत होते.

एवढ्यात त्याची नजर बाजूलाच लोंबकळणाऱ्या एका वृक्षाच्या फांदीकडे गेली. सुंदर आकर्षक फळांनी ती लदलदलेली होती. प्रयत्न करून माणसाचा एक हाक कसाबसा एका फळाजवळ पोहोचला व ते फळ तुटून त्याच्या मुठीत आलेही. त्याने ते फळ आनंदाने चाखले. इतके गोड फळ त्याने उभ्या आयुष्यात चाखले नव्हते.

ब्र: अरे गोष्ट संपली की समाप्त तर म्हणत जा. मी आपला वाट बघत बसतो पुढे काय होणार याची. नारदा, गोष्ट छान हं. मला त्याचे पूर्ण मर्म कळणारही नाही म्हणा. मी आपला अनादी अनंत. पण खरेच. मला हा दोषपूर्ण, सगुण, साकार मानव खूप आवडतो. आस्तिक असो की नास्तिक. आपण देव त्याच्यापुढे अगदीच अळणी रे बाबा. महालक्ष्म्यांच्या फुलोऱ्यातली करंजी तो, साटोरीही तोच. आपण नुसती फुलोऱ्यातली पाती. तो बेसनाचा लाडू, तो बुंदीचा लाडू. आपण मात्र घोळणाचा लाडू. बेचव. पांचट.

ना: ब्रह्मा, ठेविले अनंते, तैसेची रहावे. आपल्या बाबतीत असे म्हणता येईल की 'रेखिले मानवे, तैसेची रहावे'. स्थितप्रज्ञ व्हावे. आपल्या हाती काय आहे? माझ्या हाती आता एकच गोष्ट आहे. ती म्हणजे पुढची गोष्ट सांगणे. तुझ्या हातीही एकच गोष्ट आहे. पुढची गोष्ट ऐकणे. ऐक तर.

एक सिद्ध ध्यानमग्न असतांना अचानक अंगुलीमाल नावाचा एक बलशाली, उन्मत्त डाकू त्याच्यासमोर उभा ठाकला आणि त्याचा जीव घेतो म्हणाला. सिद्ध त्याला म्हणाला 'जीव घेतोस तर घे पण माझी शेवटची इच्छा तरी पुरी कर. तू खरेच बलशाली असशील तर तेवढे तरी नक्कीच करू शकशील. नसेल शक्य तर राहू दे.'.

अंगुलीमाल म्हणाला, एक काय, दोन इच्छा पूर्ण करीन. मला जगात काहीच अशक्य नाही. सांग पहिली इच्छा.

सिद्ध म्हणाला, हा समोरचा वृक्ष भुईसपाट कर. डाकूने क्षणात तलवारीचा एकच घाव वृक्षाच्या बुंध्यावर केला आणि वृक्ष कोलमडून पडला. एक घाव, दोन तुकडे. गर्वाने अंगुलीमाल म्हणाला, 'सांग तुझी दुसरी इच्छा. ती पूर्ण करूनच मी तुझा जीव घेईन.'.

सिद्ध म्हणाला 'माझी दुसरी इच्छा साधी आहे. हा वृक्ष तू पुन्हा पूर्ववत करून दाखव.'.

अंगुलीमाल चिडून म्हणाला 'हे जगात कोणी तरी करून दाखवू शकेल का? देव सुद्धा करू शकणार नाही. मला तरी कसे ते शक्य होईल?'.

सिद्ध म्हणाला, 'मुला, तोडू काय कोणीही  शकतो. त्याकरिता तूच कशाला हवा? त्याकरिता काहीच कला नको. जोडण्यात कला आहे, जोडण्यात पुरुषार्थ आहे.'.

इति श्री नारदपुराणे, द्राक्षकथा नाम, संपूर्णम्

ब्र: अरे वा, असे कसे? नऊच गोष्टी झाल्या. दहाची आपली बोली होती. असे नाही चालणार. नो चीटिंग! नो अक्षदाम् समर्पयामी!

ना: ब्रह्मा, अरे दहा गोष्टी झाल्या. नऊ माझ्या, एक तुझी. तुझी ती राजाराणीची गोष्टही उत्तम होती. तीही मी धरली. एक था राजा. एक थी रानी. दोनो मर गए. खतम कहानी. व्वा. सत्य सत्य ते काय. हेच मानवजीवनाचे प्रखर सत्य. ब्रह्मा, मला तर ही गोष्ट मनापासून आवडली. मी ऐकलेली ही सर्वात सुंदर अंगूरी कथा.

ब्रह्मा, अंगुलीमालाचे गर्वहरण करणारा सिद्ध दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द बुद्ध होता. आपल्या विष्णूचा नववा अवतार. कलियुगातला आतापर्यंतचा एकमेव अवतार. दशावतारातला सगळ्यात अनपाॅप्युलर अवतार. आस्तिकांनीसुद्धा दुर्लक्षिलेला अवतार. पुराणात दोन चार श्लोकात बोळवलेला अवतार. भगवान बुद्ध. हाही तसा चार्वाकच म्हणायला हवा.  म्हणूनच याच्यावर साऱ्यांचा राग. पण आपण या अवताराकडे दुर्लक्ष केले तरी याची शिकवण जगभर पसरली आहे.

ब्रह्मा, बुद्धधर्माचे अनुयायी जगभर आहेत. त्यांना बुद्धिस्ट म्हणता येईल. मला तू बुद्धिस्ट म्हणालास तर आवडेल. मी आज सांगितलेल्या चिंटु कथा सुद्धा झेन बुद्धिझमच्या अगणित कथांमधल्याच काही कथा. वालुकाकणांसारख्या लहान व अमाप कथा. रोज एखादी वाचावी अशा कथा. अंतर्मुख करणाऱ्या कथा. या कथांच्या चिंतनातून प्रत्येकाने स्वबुद्धीने बोध घ्यायचा असतो. गूगलवर zen stories म्हणून सर्च करशील तर हजारो अशा गोष्टी दिसतील. द्राक्षांचे घड चे घड. वेळ मिळेल तेव्हा एक दोन द्राक्ष तोडून चाखावे. काही द्राक्षे आंबट, काही गोड. पण साऱ्याच गोष्टी विचार करायला लावणाऱ्या. यांचे पठण श्रवण केले की पुण्यप्राप्ती होते असे कोठेही लिहिलेले नाही. त्यामुळे यांचा वाचकवर्ग जंबुद्वीपावर फारसा नाही. पण आपल्याला वाचायला काय हरकत आहे? तुला मला पुण्याची काय रे गरज?

मी तर म्हणतो आपणही अशा गोष्टींमधे भर घालायला काय हरकत आहे? मी काही रचल्या पण आहेत. सांगीन कधीतरी.

ब्र: आता पुरे रे बाबा. मीही वाचीन रात्री काही झेन कथा. काका काकू आलेच बघ. आता काही मांजरीचे खरे नाही.

_____________________



अनुक्रमणिकेकडे



Sunday, 17 April 2016


गोष्ट सतरावी

ना: ब्रह्माजी, तुम्ही तर आजकाल पुराणे सोडून इतरच वाचन करीत असता. समुद्रमंथन, भक्त प्रह्लाद, अजामीळ, राहू-केतू यासारख्या मनोरंजक व ज्ञानवर्धक पौराणिक गोष्टी वाचायला हव्या होत्या तुमच्यासारख्या भाविकाने. तुम्हीच जर नास्तिक झाला तर तुमच्या सृष्टीचे काय होईल?

ब्र: नारदा, त्या गोष्टी तर तू आधीच सांगायच्या कबूल केल्या आहेत. पण त्या सांगायची आश्वासने विसरून तू खलील जिब्रान, हँस अँडरसन वगैरेंच्या गोष्टी सुरू केल्या. काल मग मीही जरा गूगल करून त्यांच्याच आणखी काही गोष्टी वाचल्या. आवडल्या. पण नारदा, त्यांचे देव वेगळे असतात काय रे? त्यांच्या एकाही गोष्टीत तुझा-माझा उल्लेख नाही. आपल्या नद्या पर्वतांचा उल्लेख नाही. सुवर्णमेरू, क्षीरसागर सुद्धा नाही. आपले सण त्यांचे नाहीत. काहीच साम्य दिसत नाही. ते जंबुद्वीपाचे रहिवासी नाहीत असे तू म्हणाला होतास. पण मग ते कुठले रहिवासी? त्यांचा स्वर्ग, त्यांचे नरक, त्यांचे चित्रगुप्त, त्यांचे यमदूत सगळे वेगळेच की काय? ते लोक माझ्या अखत्यारीत येत नाहीत का? म्हणजे माझ्या सृष्टीव्यतिरिक्त आणखीही वेगवेगळ्या सृष्ट्या आहेत का? मला काही कळत नाही. पण आपले स्वर्ग-नरक, वेद, पुराणे हे फक्त मोजक्या लोकांसाठीच असावे असे मात्र मला आता वाटू लागले आहे. माझ्या अधिकारवलयाबाहेरही मानवसृष्टी असावी असेही मला वाटू लागले आहे.

ना: ब्रह्मा, तू फार हुशार आहेस रे. खरोखरच तुझ्या ज्युरिसडिक्शनच्या बाहेरही लोक आहेत. इतर जीवही आहेत.  गणितात जशी तुला फटाफट उत्तरे मिळतात तसेच तू जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो, जे अनुभवतो त्यावरून तू पटापट योग्य निष्कर्षाप्रत पोहोचतोस. आणि ते बोलूनही दाखवितो. कारण तुला दुष्परिणामांची भीती नाही. बरेचदा तुझे निष्कर्ष खरे ठरतात. पण तुझी ही विद्या, तुझी ही कला, तुझी ही प्रतिभा, तुझी ही बुद्धीचा सदैव वापर करण्याची मनोवृत्ती तूच निर्माण केलेल्या मानवाला मात्र तू दिलेली दिसत नाही. किंवा दिली असली तरी ती कुठल्यातरी ओझ्याखाली, कुठल्यातरी भीतीने दबून जाते. त्यांना बऱ्याच गोष्टी कळतात, पण वळत नाही रे. ते स्वत:चीच फसवणूक करतात.

ब्र: होय नारदा. तसेच असावे. कालच्या त्या राजाच्या गोष्टीचेही मर्म तेच आहे. आपण आपल्या पदाला अयोग्य समजण्यात येऊ, किंवा आपल्या मनात राजद्रोह आहे असे राजाला किंवा राजसत्तेला वाटेल व आपल्याला शिक्षा होईल या भीतीपोटी राजापासून रंकापर्यंत सारेचे सारे ते धूर्त विणकर बंधू जे काही सांगतील, जे काही अस्तित्वात आहे असे म्हणतील ते ते अनाक्षेप मानायला तयार होते. आपल्या डोळ्यांनी जे दिसते, आपल्या हाताला जे जाणवते, आपल्या बुद्धीला जे पटते ते बाजूला ठेवून फक्त भीतीमुळे जो तो नसलेल्या गोष्टीचेही अस्तित्व मानतो व आपल्याला राजवेष जसा दिसावा अशी दुसऱ्या कोणाची अपेक्षा आहे तसा तो दिसतो याची ग्वाही देतो. नारदा, ह्या भीतीचा पुरेपूर फायदा ते कपटी विणकर बंधू उचलतात. नारदा, हे कपट फक्त त्या लहान मुलापर्यंत पोहोचत नाही. तो ह्या भीतीच्या व दबावाच्या पल्याड आहे. त्याला जे दिसते ते तो सांगतो. त्याच्यावर सामुदायिक अपेक्षेचे वा राजसत्तेचे बल काम करीत नाही. तो खूपच निरागस आहे व फक्त त्याची पंचेंद्रिये जे सांगतील तेच त्याला समजते. त्यामुळे तो सत्य वदून जातो. तेच सत्य व त्याचा उच्चार मग इतरांना साहस देतात व राजा निर्वस्त्र आहे हे चक्षुसत्य समाजात पसरते. नारदा, हा भ्रम लोक वाईट आहेत वा कपटी आहेत म्हणून पोसला जातो असे नाही. तर उलट ते भोळे आहेत, कुठेतरी घाबरलेले आहेत म्हणून उत्पन्न होतो. नारदा, ही तीच भीती आहे, जिला चालाख पण बुद्धिमान लोक खतपाणी घालतात व गैरफायदा घेतात. नारदा, ही भीती व नरकाची भीती, ही भीती व दैवी कोपाची भीती, ही भीती व पापाची भीती ह्या सगोत्री आहेत. राजाचे वस्त्र चतुरंगी आहे, त्यावर दुर्वा व शमीपत्रासारखे दिसणारे बारीक नक्षीकाम आहे असे म्हणणारे समाजाच्या सर्व स्तरातले लोक व आजचे 'देव आहे. आम्हाला देवाचा प्रत्यय आला आहे.' व आमचा त्याच्यावर विश्वास असल्याचे सांगणारे आस्तिक लोक एकच. अगदी सेम टु सेम.

ना: होय ब्रह्मा, नंगू पंगू राजाची ही गोष्ट आस्तिकवादाचे मूळ काय आहे हे मोठ्या खूबीने मांडते. आजही समाजात ते विणकर बंधूही आहेत, राजाही आहे, मंत्रीही आहेत आणि प्रजाही आहे. अगदी काही काही बदलले नाही. बहुधा काही बदलणारही नाही. कारण भागवत पुराणात अठ्ठावीस नरकांची व त्यातील यातनांची माहिती आहे व काय केले की कोणत्या नरकात जावे लागते ते स्पष्ट सांगितले आहे. आणि पाप करूनही नरकप्राप्ती टाळायची असेल तर कुठला यज्ञ करायचा व पुरोहिताला काय दान द्यायचे हेही सांगितले आहे. ब्रह्मा, शतकानुशतके अनेक विणकरांनी अशीच सुंदर, अद्भुत वस्त्रे विणली आहेत आणि अजूनही विणतच आहेत. ती वस्त्रे घालून राजांची मिरवणूक आजही निघतेच आहे. आणि रस्त्याच्या दुतर्फा उभी प्रजा राजाच्या वस्त्राने मोहित होऊन राजाचा जयघोष करतेच आहे. नारायण नारायण!

ब्र: नारदा, पण तो राजा, ते मंत्री, ती प्रजा, ते विणकर आजही आहेत असे तू म्हणतोस. ते खरेही आहे असे देवळातली गर्दी पाहून मला पटतेही. पण मग आज किंवा इतिहासात, पुराणकालात ते लहान बालक कां नाही रे? राजा नंगू पंगू आहे असे म्हणणारा कोणीच झाला नाही का रे?

ना: ब्रह्मा, झाला. आणि आज त्याचीच गोष्ट मी तुला सांगणार आहे. त्या बालकाची, 'राजा निर्वस्त्र आहे' म्हणण्याचे धैर्य दाखविणाऱ्या त्या सत्यवादी बालकाची, नोंद इतिहासाने पद्धतशीर खोडून टाकायचा प्रयत्न केला तरी त्याचे नाव, त्याचे विचार थोड्याफार प्रमाणात आजही उपलब्ध आहेत. ब्रह्मा, नावात काय आहे? आपण त्या बालकाचे नाव नुसते बाळ होते असे म्हटले तर कोठे काय बिघडते? बाळ नाव तसे संस्कृतनिष्ठ नाही कारण संस्कृतमधे 'ळ' नाही. पण आपला हा बाळ संस्कृत पंडित होता. असणारच, कारण तोही वेदकालीन होता. वेद जितके जुने, तितकेच याचेही लिखाण. वेदांग तत्त्वज्ञान जितके प्राचीन, तितकेच याचेही तत्त्वज्ञान. पण प्राचीन तत्त्वज्ञानाची, तर्कशास्त्राची, चिंतनाची, दर्शनाची ही दोन अगदी भिन्न, परस्पर विरोधी टोके. एक उत्तर धृव, तर दुसरा दक्षिण धृव. पण या दोन विचारांचे, यांच्या पुरस्कर्त्या पंडितांचे खलिल जिब्रानच्या कथेतील पंडितांसारखे जाहीर वादरण कधी झाले नाही. पांडित्याच्या अहिंसक विद्युल्लता चमकल्या नाही. फक्त तलवारीची हिंसक पाती तळपली. बाळाचे तत्त्वज्ञान नामशेष करण्याचे प्रयत्न झाले. बहुतांशी ते यशस्वी झालेही. जेमतेम दहा पंधरा श्लोक उरले आहेत असे म्हणतात. आपण त्यातले काही आज बघूही. त्यातल्याही काही श्लोकांना पद्धतशीर विकृत स्वरूप देण्यात आले. मूळ शब्द बदलून अर्थाचा अनर्थ होईल असे शब्द नंतर आलेल्या विद्वानांनी घुसवले आहेत. ते जाणूनबुजून बाटवलेले श्लोक आजही काही विद्वान बाळाच्या नावाने खपवून त्याला पद्धतशीर बदनाम करीत आहेत. काही पुराणात तर या बाळाला राक्षसकुळातला म्हणून रंगविण्यात आले आहे. बाळाचा आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा द्वेष इतका जबर की त्या द्वेषापोटी बऱ्याच वेदकालीन वाङमयात याचा व याच्या विचारांचा उल्लेख आढळतो. तो किती नीच होता हे दाखवून द्यायला तत्कालीन पंडितांनी त्याचे काही श्लोकबद्ध विचार आपल्या वाङमयात घेऊन त्याचा खरपूस समाचार घेतला आहे. पण त्यामुळेच बाळाचे काहीतरी विचार आजही उपलब्ध आहेत. जसे जसे ज्ञान वाढत गेले, जसा जसा मानव विज्ञाननिष्ठ व्हायला लागला, तसेतसे या बाळाचे तत्वज्ञान त्या प्राचीन काळीही किती प्रगल्भ होते ते अभ्यासकांच्या लक्षात यायला लागले. आणि आजतर त्याचा सर्वत्र प्रसार झाला आहे. ब्रह्मा, ह्या बाळाने पेटवलेला एका विचारधारेचा तो वेदकालीन टेंभा कितीही जणांनी, कितीही वेळा विझवायचा प्रयत्न केला, तरी अजून जळतोच आहे. मला एक कविता आठवते.

केला जरी पोत बळेचि खाले
ज्वाला तरी ते वरती उफाळे

ब्र: नारदा, ही बाळाची गोष्ट तुझ्या खूपच आवडीची दिसते. आज तुझा आवेश काही वेगळाच आहे. आज तुझ्या वीणेचे सूर जरा वेगळेच आहेत. घे गोष्ट सांगायला. कोण जाणे, वेदनिर्माता मी पण त्या बाळाचा प्रशंसक होईन. खुद्द माझे मतपरिवर्तन होईल. खलिल जिब्रानची गोष्ट पुन्हा घडेल माझ्याबाबतीत.

ना: ब्रह्मा, तू वेदांचा निर्माता. त्यामुळे वेद अपौरुषेय आहेत असे मत प्रचलित होते. बाळाचे मत मात्र भिन्न होते. वेद हेही इतर वाङमयासारखे मानवनिर्मित आहेत असे त्याचे मत. ते किती वर्षांपूर्वी रचण्यात आले, ते कुणा एकाचे मत आहे की त्याला अनेकांचा हातभार लागून मोठ्या कालावधीत थोडे थोडे निर्मित होत गेले ही वादाची गोष्ट असू शकते. पण वेद सुद्धा मानवप्रतिभेची उपज आहेत असे बाळाचे मत. ब्रह्मदेवाच्या चार दिशांच्या चार मुखातून निघणारे चार वेद हे अपौरुषेय आहेत म्हणणे हे चार हातमागावर, विणकरबंधूंच्या चार हातांनी, चार रंगाचे वस्त्र, चार आठवड्यात विणले हे जितके सत्य तितकेच सत्य आहे. पण तरीही राजाचा असा निर्माण झालेला वेष सर्वांना दिसतो आणि आवडतो असे गोष्टीतले सर्वच म्हणतात. फक्त आपला हा बाळ अतिप्राचीन काळी, जेंव्हा वेदांचा बोलबाला होता तेंव्हा, असे म्हणायला धजला की राजाच्या अंगावर वस्त्रच नाही. वेद अपौरुषेय नाहीत.

ब्रह्मा, वेद देवनिर्मित नाहीत, तर देव वेदनिर्मित आहेत असेही त्याचे म्हणणे. देव वेदनिर्मित आणि वेद मानवनिर्मित. अर्थातच देव ही मानवनिर्मित कल्पना. देव म्हणजे कथेतले राजाचे वस्त्र. अस्तित्वात नसलेले. पण सगळ्यांना दिसणारे, किंवा दिसते असे वाटणारे, किंवा दिसते असे भीतीपोटी म्हणावे लागणारे.

ब्रह्मा, हा प्राचीन, वेदकालीन, पुराणकालीन बाळ 'राजा निर्वस्त्र आहे' असे वदताच गदारोळ माजला. देव नाही असे म्हणणाऱ्या ह्या बाळप्रणित नास्तिकवादाने ढोंगी, कपटी, निशाचर विणकरबंधूंच्या पोटावरच पाय दिला आणि युद्धाला तोंड लागले. कायमची रणधुमाळी. विणकर बंधू आणि बाळ कायमचे वैरी झाले.

ब्र: काय ती हिंमत बाळाची! दाद द्यावी लागेल. नारदा, आपणही शेवटी 'देव नाहीत' ह्याच निष्कर्षाप्रत पोहोचलोच आहोत. पण वेदकालीन परिस्थितीत असे म्हणणे म्हणजे कठिणच गेले असेल त्याला. तेव्हा तर वेदांचा, पुराणांचा दाखला देऊन धर्माचा सत्तेसाठी वापर होत असे. पापपुण्याचा बडगा दाखवून जनतेची पिळवणूक करणारा पौरोहित्य करणाऱ्या पंडितांचा एक वर्गच निर्माण झाला होता. बरीचशी पुराणे राजाशी संगनमत करून जनतेला सदैव दडपणाखाली ठेवण्याकरिता लिहिण्यात आली असे म्हणतात. तीही सारी व्यासांनीच लिहिली असेही सांगण्यात आले. मग काय, पुराणातले अक्षर नी अक्षर सत्य गृहित धरण्यात आले. त्यातील स्वर्ग-नरकाची कल्पना, पाप-पुण्याचा तराजू, अग्निहोत्र, कर्मकांडविधी यात सामान्य जनता दबून गेली. भयजन्य श्रद्धेखाली बुद्धी दबून गेली. अशा पार्श्वभूमीवर जर बाळाने बुद्धिवादाचा पुरस्कार केला असेल तर तो धन्यच रे बाबा.

ना: होय ब्रह्मा. ते करतांना सर्व सत्ता व सत्ताभोगी त्याच्या विरोधात गेले यात नवल ते काय? पण या विरोधाने बाळाचे विचार अधिकच कठोर झाले असावे. त्याच्या तलवारीची धार अधिकच पाजळली. महायुद्धच झाले म्हण ना. त्यात बाळाचे सर्व ग्रंथ नष्ट झाले असे म्हणतात. जे काय त्याचे दार्शनिक वाङमय उरले आहे ते तुटपुंजे आहे. तेही वेद पुराणांसारखे सलग नसून तुटक तुटक आहे. पण आहे ते मात्र परखड, जहाल आहे. उदाहरणच बघ.

त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम्‌

ब्रह्मा राग आला का रे ऐकून?

ब्र: कां? माझ्यावर काही ताशेरे झाडले आहेत की काय? बाकी हे सारे संस्कृतमधे आहे हे मात्र छान. मला काही त्याचा गंध नाही. त्यामुळे आनंदच आनंद! बाकी ते जर्भरी तुर्फरी मात्र आवडले हं. जरतारी वस्त्राचे वर्णन असावे असे वाटले.

ना: ब्रह्मा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! अरे ते दोन शब्द अगदी वायफळ आहेत. त्यांना काही अर्थ नाही. तीन वेदांचे कर्ते लबाड, धूर्त, आणि निशाचर आहेत असे श्लोकात म्हटले आहे. जर्भरी, तुर्फरी वगैरे अर्थहीन बोल वैदिक पंडितांच्या तोंडून निघतांना सारेच जण ऐकतात असे सांगून पंडितांची व ऐकणाऱ्यांची उघड उघड टिंगल केली आहे.

ब्र: नारदा, पण वेद तर चार आहेत अशी आपली समजूत आहे. मग इथे ते तीनच आहेत असे कां म्हटले आहे रे? मला मग एक तोंड स्पेअर असावे म्हणून दिले आहे की काय?

ना: ब्रह्मा, प्रश्न छान. पण मूळ तीनच वेद आहेत असेही बऱ्याच संशोधकांचे मत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद. अथर्ववेद नंतर निर्माण झाला असे म्हणतात. ब्रह्मा, हे वाङमय इतके प्राचीन आहे की नक्की कालावधी खात्रीने सांगणे अशक्य आहे. शहानिशा करायला मानवांना भूतकाळात जाता येत नाही. ते फक्त तुला शक्य आहे. तू उलटी जांभई घेशील तर आपण सहज भूतकाळात जाऊ शकू. एकदा तू तसे केले आहेस. तसा अर्नाळपुराणात उल्लेख पण आहे. वरातगंगा घेऊन आल्यावर तुझ्या उलट्या जांभईने आपण वाड्याच्या भूतकाळात गेलो होतो व आटाळ्यावर जाऊन सीता, राम व हनुमानाला येथे घेऊन आलो होतो. आठवते का?

ब्र: हो तर. ते मी बरे विसरेन.

नारद ब्रह्मा जाती पुन्हा पाताळेश्वर मार्गी हो
नारद दावी जागा जेथे वाडा पूर्वी होता हो
आता तेथे वाडा नाही, तो काळाच्या उदरी हो
रामभक्ती मास्तरांची पूर्वी त्यानेही अनुभविली हो

ब्रह्मनेत्र चमकले, काहीतरी मनात त्याला सुचले हो
उलटी जांभई घेई ब्रह्मा, घड्याळ मागे गेले हो
वाडा तेथे पुनः पूर्ववत, अंगणात झाडे तीच
तेची माजघर, ओसरी, माडी, आटाळेही हो तेच

मुनीस खात्री येथे आले वरातीतले सीता राम
जेथे दोघे, तेथे त्यांचा परमभक्त नक्की हनुमान
आटाळ्यावर निरखुनी पाहता ब्रह्मा दिसले श्री रघुराम
सीता आणि सेवक ओळखती ब्रह्माला, करी प्रणाम

पण नारदा, इतक्या खोल भूतकाळात शिरायला आता उलटी जांभई केवढी घ्यायची? ज्यास्त लांब झाली तर पुन्हा तू माझ्या कपाळात शिरशील व मी एकटा पडीन. ज्यास्तच लांब झाली तर मी पुन्हा हिरण्यगर्भात जाऊन पडीन. नको रे बाबा भूतकाळाच्या खोल डोहात जाणे. थोडीशीही चूक फार महाग पडेल. आपणही मानवांसारखे वर्तमानातच राहू.

ना: जशी आपली इच्छा. ब्रह्मा, बाळाने वेद अपौरुषेय नसून पौरुषेय, म्हणजे मानवनिर्मित आहेत असे म्हटले. देव ही मानवकल्पना आहे असे म्हटले. तसेच परलोक ही सुद्धा केवळ कल्पना आहे असेही म्हटले.

न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः

स्वर्ग, मोक्ष, मृत्यूनंतर परलोकात आत्मा जातो वगैरे कल्पनांचे त्याने खंडन केले. वर्ण, आश्रम व त्यानुसार आखून दिलेले कर्मकांड केल्याने अमुक एक फलप्राप्ती होते ही वेद पुराणातील कल्पना तर त्याच्या टीकेचा मुख्य विषय झाली. जे आहे ते पृथ्वी, आप, तेज व वायू या चार तत्वातून निर्माण होते असे त्याचे परखड मत होते. चैतन्य किंवा जीव दुसरे काही आहे, ते किंवा आत्मा मृत्यूनंतरही जिवंत राहतात, आत्मा अमर आहे ह्या कल्पनाच त्याने खोडून काढल्या. सर्व काही पदार्थमूल आहे असा त्याचा सिद्धांत होता. म्हणून पदार्थविज्ञान हेच ज्ञानमूल आहे. वेद, देव व परलोक याबद्दलच्या कल्पना अशा तऱ्हेने फेटाळून लावल्यामुळे त्याला जबर प्रतिकार सहन करावा लागला.

ब्रह्मा, त्याकाळी वेदप्रणित दर्शन हेच जीवनदर्शन होते. त्यानंतर तेच थोडे पुढे नेऊन अनेक पुराणात पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, प्रायश्चित्त, कर्मकांड, यज्ञ अशा पराकोटीच्या स्वार्थपूरक कल्पना मांडण्यात आल्या. साध्या अवर्षेने दुष्काळ पडायचा व गरीबगुदा कामकरी वर्ग सावकारांकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी व्हायचा. कर्ज न चुकविले तर पाप लागेल व नरकात जावे लागेल म्हणून पुरोहित त्यांच्याकडून पापाचा उतारा म्हणून यज्ञयाग करवून घेवून त्यांना आणखी पिळायचा. या कर्मकांडावरही आपल्या बाळाचे भाष्य मोठे कठोर आहे.

अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृनिर्मिता

अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड, शरीराला भस्म फासणे इत्यादी बाह्यदर्शन विधी बुद्धी आणि पौरुष नसलेल्या या तथाकथित स्वप्रस्थापित धर्मरक्षकांच्या उपजीविकेसाठीच जणू त्यांच्याच विधात्याने निर्माण केल्या आहेत असे उपरोधात्मक भाष्य ह्या श्लोकात आहे.

ब्र: नारदा, हे फारच जळजळीत आहे रे. पण बहुजनसमाजाचे धर्माच्या नावाने, पापपुण्याच्या, मोक्षाच्या, नरकाच्या कल्पनेने आतंकित करून केले जाणारे शोषण असेच क्रोधजनक असावे. हा बाळ मला तर क्रांतिकारीच वाटतो रे नारदा.

ना: होय ब्रह्मा. शोषितांविषयी कळवळा तर त्याला असलाच पाहिजे. पण त्यांचे शोषण होण्याला त्यांची अंधश्रद्धाही कारणीभूत आहे असेही त्याचे मत असावे. अंधश्रद्धेवरचा त्याचा प्रहार प्रबळ आहे. ब्राह्मणांनी सांगितले म्हणून यज्ञ, प्रेतविधी, श्राद्ध लोक कां करतात, हे किती बुद्धिहीन काम आहे याचा जरासाही विचार ते कां करीत नाही असे त्याला वाटायचे. हे सर्व विधी किती हास्यास्पद आहेत हे समजवून सांगण्याकरिता त्याने उपरोधाचा उपयोग पदोपदी केला आहे.

पशुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते

जीवबळी देण्याची प्रथाही त्याकाळी धर्माच्या नावाने बोकाळली असावी. पण ते तर अनेकांना पाप वाटेल. म्हणून मग बळी दिलेला प्राणी सुद्धा मुक्ती पावून स्वर्गात जातो, आणि बळी देऊन आपण त्या जनावराचे हितच करतो असे त्या क्रूर प्रथेचे समर्थन धर्माचे ठेकेदार करू लागले. ज्योतिष्टोम नावाच्या यज्ञात जनावराचा बळी दिला जाई. मारलेले जनावर जर स्वर्गात जाते, तर यजमान स्वतःच्या पित्यालाच का मारत नाही असा प्रश्न बाळाचा हा श्लोक विचारतो.

मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम्‌
निर्वाणस्य प्रदीपस्य स्नेहः प्रज्वलयेच्छिखाम्‌

ब्रह्मा, जंबुद्वीपावरचा श्राद्धविधी तू पाहशील तर तुझ्या अंगावर शहारे येतील. माणूस मरून जातो. तरीपण त्याची स्वर्गाची वाट मोकळी करून देण्याकरिता पुराणात व वेदवाङमयात सविस्तर विधी व मंत्र आहेत. गरुडपुराण कधी वाचशील तर तू पेटून उठशील. त्या विधीबाबतही बाळाने प्रश्न उभे केले आहेत. मेलेल्या जीवांची तृप्ति जर श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल, तर विझलेल्या दिव्याची ज्योतही त्यावर तूप ओतून मोठी होईल असा उपहास ह्या श्लोकात आहे.

ब्रह्मा, माणुस मरून गेला तरी विधी संपत नाहीत रे. त्याचा पुढील प्रवास, त्याची कैलासयात्रा यांचा पण प्रेतकर्मात विचार केला आहे. हसू नकोस, पण स्वर्गारोहण करतांना वाटेत खायला असो म्हणून प्रेताच्या तिरडीला शिदोरी बांधायची पद्धत आहे. नंतर श्राद्धविधीमधेही आत्म्याच्या तृप्तीकरिता कणकीचे गोळे, भाताचे गोळे असतात. हे सगळे हास्यास्पद प्रकार तू निर्मिलेल्या वेदांच्या दुरुपयोगामुळे रूढ झालेले आहेत. पुराणे वाचतांना हसावे की रडावे ते कळत नाही असे तू त्यादिवशी म्हणाला. खरे म्हणजे फोडावे की झोडावे असे वाटायला हवे. असो. हिंसा नको. प्रेताबरोबर शिदोरी देण्याच्या रूढीवर बाळाचे प्रश्न फार मार्मिक आहेत.

गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम्‌
गेहस्थकृतश्राद्धेन पथि तृप्तिरवारिता

जिवंतपणी प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तीबरोबरही शिदोरी द्यायची पद्धत आहे. 'भूक नसो, पण शिदोरी असो' असे म्हणतात. बाळ म्हणतो, ते तरी कशाला? ते प्रवासाला निघाले की घरीच श्राद्धासारखा काहीतरी प्रकार करावा, म्हणजे त्याना असतील तेथे आपोआपच अन्न मिळेल व त्यांची तृप्ती होईल.

स्वर्गस्थिता यदा तृप्तिं गच्छेयुस्तत्र दानतः
प्रासादस्योपरिस्थानामत्र कस्मान्न दीयते

ब्रह्मा, स्वर्ग वर आहे असे म्हणतात. पाताळ खाली व इहलोत मध्ये. म्हणजे पाताळ हा इमारतीचा तळमजला व स्वर्ग हा वरचा मजला. मृत्यूनंतर स्वर्गात, म्हणजे वरच्या मजल्यावर गेलेल्यांच्या नावे इथे मागे राहिलेल्यांनी दान द्यावे अशी रूढी आहे. ते दान अर्थातच पौरोहित्य करणारा वैदिक ब्राह्मणच घेतो. ही जी स्वतःच्या आमदनीची सोय पुरोहितांनी करून ठेवली आहे त्यावर हा उपहास आहे. दानामुळे स्वर्गात असलेल्यांची तिथल्या तिथे तृप्ति होत असेल, तर इमारतीत वरच्या भागात राहाणाऱ्यांसाठी अन्न खालीच कां देत नाहीत असा कुजकट प्रश्न बाळाने विचारला आहे.

यदि गच्छेत्परं लोकं देहादेव विनिर्गतः
कस्माद्भूयो न चायाति बन्धुस्नेहसमाकुलः

मृत्यूनंतर देह सोडून गेलेली व्यक्ती जर परलोकात जात असेल, तर नातलगांच्या जिव्हाळ्यामुळे ती वारंवार परत कां येत नाही? ब्रह्मा, वरील सारे प्रश्न कुजके वाटतीलही. पण तसे पाहिले तर ते कुणाही किमान बुद्धी असणाऱ्या बालकालाही पडावेत असे प्रश्न आहेत. आणि त्या बालमनाने ते विचारलेही आहेत. राजा निर्वस्त्र कां आहे हा साधा सोपा प्रश्न. पण तो एवढ्या मोठ्या प्रजेत कोणी विचारत नाही. फक्त एका बालकाला तो प्रश्न पडतो.

ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहिस्त्विह
मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित्‌

नंतर मात्र या साध्या प्रश्नाचे खरे उत्तरही हा बाळ देतो. हे सर्व विधी मृतात्म्याकरिता वगैरे नसून स्वत:च्या उपजीविकेसाठी ब्राह्मणांनी सांगून ठेवले आहेत असे त्याचे सरळसोट प्रतिपादन आहे. नाहीतर येथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापि अस्तित्वात नसती असे तो सांगतो.

ब्रह्मा, बाळ असे म्हणतो कारण त्याचा आत्मा, मोक्ष, परलोक या सर्वांवर विश्वास नाही. हे सर्व भ्रमजाल आहे असे त्याचे दर्शन आहे. मृत्यु म्हणजे बाळाकरिता THE END आहे.

परलोक, पुनर्जन्म, आत्म्याचे अमरत्व हे तो मानत नाही. जे आहे ते फक्त इहलोक. एकच लोक. म्हणजे मी त्रिलोकसंचारी वगैरे नाही. खरे म्हणजे मीच नाही. ह्या साऱ्या मिथ्या कल्पना आहेत. एकच लोक. म्हणून बाळाच्या ह्या दर्शनाला लोकायतवाद असेही नाव आहे.

ब्र: नारदा, की बाळाचे नावच लोकायत आहे रे. त्याचा वाद म्हणून लोकायतवाद?

ना: नाही ब्रह्मा. इहलोकाचे सत्य हेच फक्त सत्य असे त्याचे तत्वज्ञान आहे म्हणून लोकायतवाद. आणि आपल्या बाळाला स्वत:चे नाव पण आहे. ते मात्र मी तुला कधीतरी नंतर सांगीन.

ब्र: नारदा, छळू नकोस. आता तुला ही वृत्ती सोडली पाहिजे. आता काही तू त्रिलोकसंचारी वगैरे नाही. आपण देव नाही. आत्ता सांग बाळाचे खरे नाव काय ते. आत्ताच्या आत्ता.

ना: ब्रह्मा, बाळाचे नाव चार्वाक आहे असे म्हणतात. अंधश्रद्धेवर, प्रेतविधीवर त्याचा आक्षेप होता. अग्निहोत्र, यज्ञयाग, कर्मकांड याचा तो घोर विरोधी होता. पण हा चार्वाकदर्शनाचा एक लहानसा भाग झाला. त्याचा मूळ सिद्धांत होता की ही सर्व सृष्टी पृथ्वी, आप, तेज, वायु अशा चार परमतत्त्वांपासून निर्माण झाली आहे. आकाश हे महाभूत तो मानीत नाही. प्राणी सुद्धा व त्यांचा प्राण सुद्धा या चार तत्त्वांनीच बनतो. 'भूतेभ्यः चैतन्यम्‌!‘ हा चार्वाकाचा आत्मा किंवा प्राण किंवा जीव याविषयीचा सिद्धांत. पृथ्वी आप तेज व वायू ही चार भूतेच चैतन्यनिर्मितीही करतात असा याचा अर्थ. 'भूतान्येव चेतयन्ते' हा या दर्शनाचा सिद्धांत. 'असे कसे' असा प्रश्न बरेच जण विचारतात. त्याचे उत्तर म्हणून सामान्यांना समजेल असे उदाहरणही तो देतो. विड्याचे पान, चुना, काथ, सुपारी ही तत्त्वे चघळून, त्यांचे चर्वण करून विडा रंगला की आपण विड्यात प्राण आले असे म्हणू का? विड्याचे रंगणे म्हणजेच विड्याचे चैतन्य. त्याचे मूळही तीच चार तत्त्वे. ब्रह्मा, हाच चार्वाकाचा जडवाद.

जडभूतविकारेषु चैतन्यं यत्तु दृश्यते
ताम्बूलपूगचूर्णानां योगाद् राग इवोत्थितम्

ब्रह्मा, हा चार्वाक फार चांगला शिक्षक पण असावा असे वाटते मला. काय सुंदर उदाहरण देतो तो. प्राण्यांचा प्राण, जीव ते आहेत तोवरच आहेत. शरीरातील चैतन्यसुद्धा मृत्यूनंतर नष्ट होते. ते शरीरापासून वेगळे नाही. ती प्राणज्योत सिनेमात दाखवतात तशी कुठे वर वगैरे जात नाही.

चार्वाकदर्शनाचा मुख्य गाभा म्हणजे प्रत्यक्षवाद. 'प्रत्यक्ष' अनुभूती हीच फक्त अस्तित्वाची ग्वाही. 'प्रत्यक्षमेव प्रमाणम्'. अक्ष म्हणजे इंद्रिय. इंद्रियांना ज्याची जाणीव होते व बुद्धीला जे पटते तेच सत्य. यालाच बुद्धिप्रामाण्यवाद, रॅशनॅलिझम म्हणतात. कधीकधी अनुमानाने अस्तित्वाची सत्यता सिद्ध होऊ शकते. किंवा आपला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला जे सत्य पटले आहे तेही सत्य मानायला चार्वाकदर्शनाने तशी थोडीफार सूट दिली आहे. पण कोण असा विश्वासू यावरही मल्लीनाथी आहे. धर्माचे ठेकेदार तर नक्कीच त्या श्रेणीत नाहीत हे त्याचे अढळ मत.

चार्वाकदर्शनात वर्णभेदालाही प्रखर विरोध आहे. हे सारे मनुस्मृतीच्याही आधीचे मत. ब्रह्मा, वर्णभेदाचे खापर हे धूर्त कपटी धर्माचे टेंभेकरी तुझ्याच माथ्यावर फोडतात. भागवत पुराणात तर वेदांचा दाखला देऊन सांगतात की तुझ्या मुखापासून सत्त्वप्रधान ब्राह्मण, तुझ्या भुजांपासून सत्त्वरजप्रधान क्षत्रिय, तुझ्या मांड्यांपासून रजतमप्रधान वैश्य आणि तुझ्या चरणांपासून तमप्रधान शूद्र निघाले. म्हणून ब्राह्मण सर्वश्रेष्ठ.

तूच चार वर्ण निर्माण केले आहेत असे म्हणतात व दाखल्याकरिता कुठलातरी वेदोक्त वा पुराणोक्त श्लोक फेकतात. सर्वत्र वरच्या अर्थाचे श्लोक विखुरले आहेत. चार्वाकाने हे सर्वच खोटे उघडकीस आणले. उच्चवर्णीयांना अर्थातच चार्वाक दर्शन आवडत नाही. आवडेलही कसे? वेदकाळा़त म्हणूनच चार्वाकाचे सर्व साहित्य पद्धतशीर नष्ट करण्यापुरतीच यांची मजल गेली नाही तर त्याला बदनाम करण्याची चढाओढ सुरू झाली. चार्वाक हा राक्षस होता असे पुराणात सुचविले आहे. महाभारतात तर त्याचा खुद्द युधिष्ठिरासमोर खून झाल्याची गोष्ट आहे. पण पुराणातला तो धर्मराज एका शब्दाने बोलला नाही. 'शेवटी विजय माझाच होईल' असे मृत्यूआधी चार्वाक म्हणाल्याचाही कुठेतरी उल्लेख आहे. सत्याचा विजय होईल हे सत्य तर आहेच. आणि खरेच तसे झाले. चार्वाकदर्शन मृत तर झाले नाहीच, पण जसा जसा मानवसमाज प्रगत होत गेला तसे तसे ते अधिक प्रबळ झाले व त्याचे अनुयायीही वाढले. कौटिल्याने तर त्याच्या अर्थशास्त्रात चार्वाक दर्शनाचा आन्वीक्षिकी असा आदरपूर्ण उल्लेख केला आहे. प्राचीन वैज्ञानिक, समाजसुधारक, मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून चार्वाकाचा उल्लेख होतो. बुद्धिप्रामाण्यवादी होता म्हणून तो अनीश्वरवादी व नास्तिक होता हेही खरे.

ब्रह्मा, चार्वाकापूर्वीही हे विचार होते, नाही असे नाही. चार्वाकाच्याही आधी अजीत केशकंबली म्हणून एक विद्वान होता. त्यानेही अशीच मते मांडली. त्याचे केशकंबली नाव त्याच्या विरोधकांनीच त्याला दिले असावे, कारण वाल्मीकी रामायणात अशोकवनातील राक्षसिणींच्या वर्णनात याच नावाचे एक पात्र आहे. तिचे केस इतके लांब की ती तेच पांघरूण म्हणून वापरते. म्हणून केशकंबली. अनीश्वरवाद्यांची ही शृंखला तशी थेट बृहस्पतीपर्यंत पोहोचते असे म्हणतात. देवांचे गुरु. म्हणून या अनीश्वरवादी विचारांना ब्रहस्पैत्य असे काहीसे म्हणतात. केशकंबली याचे तत्त्वज्ञान उच्छेदवाद म्हणूनही प्रसिद्ध आहे. मृत्यूनंतर आत्मा वगैरे असलाच तरी तोही नष्ट होतो असे याचे मत. शाश्वतवादाच्या अगदी विरोधी मत. शाश्वतवाद म्हणजे आत्मा अमर आहे असे मत. म्हणून मग पुनर्जन्म, मोक्ष, स्वर्ग वगैरे वगैरे. म्हणून मग पौरोहित्य करून दक्षिणा उकळणारा लंबोदर वर्ग.

ब्रह्मा, उच्छेदवाद, जडवाद, बुद्धिवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, भौतिकवाद, लोकायतवाद, ब्रहस्पैत्य, निरीश्वरवाद, आन्वीक्षिकी, अनीश्वरवाद, रॅशनॅलिझम, चार्वाकदर्शन हे नास्तिकवादाचे सहस्रनाम असल्यासारखेच आहे. एकूण मत हेच की देव व त्याला निगडित इतर कल्पना वेद पुराणात मांडणारे लोक हे फोकनाडिस्ट आहेत.

ब्र: नारदा, म्हणजे काय रे? मी पहिल्यांदा हा शब्द ऐकतो आहे. शब्दकोशात असेल का?

ना: बहुधा नसावा. अरे फोकनाडिस्ट म्हणजे फोका, फोकनाडा मारणारा. पुड्या सोडणारा. नागपूर नगरीत अब्बुमियाँच्या पुड्या म्हणतात फोकांना.

ब्र: नाही समजले रे.

ना: ब्रह्मा, ही खास नागपुरी भाषा आहे. फोकनाड म्हणजे थाप. फोकनाडिस्ट म्हणजे थापा मारणारा, थापाड्या. ज्या गोष्टींना शेंडा ना बूड अशा गोष्टी ठोकून देणारा. कापुसकोंड्याच्या गोष्टी सांगणारा. कीर्तनकार म्हण वाटल्यास. पण हळू, नाहीतर मार पडेल.

ब्र: व्वा! आवडला हा शब्द. आता मी तुला फोकनाडिस्ट म्हणत जाईन लाडाने कधी कधी. एकदम भारदस्त वाटतं.

ना: म्हण बाबा. मला काय? तू वेदनिर्माता, सृष्टिनिर्माता, अन तुझा पुत्र फोकनाडिस्ट. व्वा!

पण ते असू दे. ब्रह्मा, चार्वाक हा कोणी व्यक्तिविशेष नव्हता तर जडवाद, नास्तिकवादाचे समर्थन करणारे, प्रत्यक्षवादाचे समर्थन करणारे जे कोणी असतील ते सारे चार्वाक असेही म्हणतात. ़चारु म्हणजे सुंदर व वाक् म्हणजे कथन किंवा वाणी. गोड वाणीने लोकांना भुरळ पाडणारे म्हणजे चार्वाक असे हेटाळणी करणारे नाव या नास्तिकवादाचा पुरस्कार करणाऱ्यांचा तिरस्कार करणाऱ्या प्राचीन काळच्या ब्राह्मणांनी त्यांना दिले. चार्वाकांची टिंगल करण्यात आजही तथाकथित आस्तिक लोक मागे पुढे पाहत नाहीत. जो तो चार्वाकाचा एक श्लोक उद्धृत करायला थकत नाही.

यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ ऋणं कृत्वा घृतं पिवेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:

जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाचा उपभोग घ्या. गरज पडली तर कर्ज काढून सुद्धा लोणी खा. एकदा मृत्यूनंतर देह अग्नीत राख झाला की पुन्हा काही पुनर्जन्म वगैरे नाही.

या श्लोकाचा शब्दशः अर्थ घेऊन जो तो चार्वाकावर किंवा चार्वाकदर्शनावर आसूड ओढत असतो. त्याचे सारे तत्त्वज्ञान भोगवादी आहे असे म्हणतो. हे एवढ्याच करिता की आम्ही बघा किती विरक्त वृत्तीचे, किती अलिप्त आणि आध्यात्मिक वगैरे वगैरे सुचविण्याकरिता. चार्वाकाच्या काळात ब्राह्मणवाद खूप बोकाळला होता. पापपुण्याची कल्पना भोळ्या जनतेत रुजवून तिला यज्ञयाग व कर्मकांडात गुरफटून, अमुक करा म्हणजे तुमचा पुढचा जन्म तरी सुखात जाईल म्हणून ब्राह्मण त्यांना लुबाडीत असत. त्या बहुजनसमाजाच्या मनातून ही भीती काढून त्यांचे सशक्तीकरण करणारे तत्त्वज्ञान साऱ्याच चार्वाकांनी मांडले. खरे म्हणजे वरील श्लोकात भोगवाद नाहीच मुळी. चार्वाक तत्त्वज्ञान तर उलट कर्मयोगावर जोर देते. शेती, गोपालन, व्यापार, सरकारी काम व इतर सदुपयोगी काहीतरी विधायक काम करून बुद्धिमान व्यक्तीने उपजीविका कमवावी असे सुचविते.

कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:
एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि

नरकाची वगैरे भीती बाळगून, कर्ज घेणे पाप आहे समजून, गेल्या जन्माचे पाप म्हणून हा जन्म गरीबीतच जाणार असे निराशावादी विचार मनात घेऊन कष्टात जीवन जगू नका. तसेच पुढचा जन्म चांगला जावा म्हणून कर्ज काढून यज्ञयाग करण्यापेक्षा यज्ञात वाया जाणारे लोणी वाटल्यास तुम्हीच प्या असा वास्तववादी सल्ला देणे हाही या श्लोकाचा उद्देश असू शकतो. पण सर्वच लोभी लबाड ब्राह्मणांच्या भाल्याची टोके चार्वाकाकडेच वळल्यामुळे त्याच्या कथनातील सामाजिक, मानवी संदेशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले.

ब्रह्मा, हे सर्व प्रयत्न तात्पुरते यशस्वी झाले तरी चार्वाक तत्त्वज्ञान काही नष्ट झाले नाही. त्यावर आजवर जितके संशोधन झाले तितके दुसऱ्या कशावर झाले नसावे. वैज्ञानिक, सामाजिक, मानवीय अशा कुठल्याही निकषावर घासून पाहिले तरी चार्वाक तत्त्वज्ञान अस्सल बावनकशी सोने आज ठरते. आणि इतर धार्मिक वाङमयाचे पितळ उघडे पडते. ब्रह्मा, त्याकाळचे तथाकथित धर्मरक्षक किती खालच्या पातळीपर्यंत पोहोचले होते हे अलिकडच्या संशोधनाने सिद्ध झाले आहे. चार्वाकाला बडवायला सोटा म्हणून जो वरचा श्लोक नेहमी वापरण्यात येतो तो मुळात तसा नसून असा आहे.

यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्तिमृत्युरगोचर:
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:

पाचशे सहाशे वर्षांपूर्वी एका तत्कालीन प्रतिष्ठित विद्वानाने तो श्लोक जाणूनबुजून बदलून त्याच्या अर्थाचा अनर्थ केला. आणि हेच लोक मग आपल्या सहिष्णुतेचा टेंभा मिरवतात. मूळ श्लोकात कुठेही दूरान्वयानेसुद्धा भोगवादाचे समर्थन नाही.

ब्र: नारदा, आता असे वाटते रे की उलटी जांभई घेऊन काळ मागे न्यावा व या सगळ्या वैज्ञानिक वृत्तीच्या, सुधारकांचा,  मानवतावाद्यांचा सत्कार करावा व दांभिक धर्माचार्यांचा खरपूस समाचार घ्यावा. माझ्या सृष्टीतही माझ्याच नावाचा दुरुपयोग करून धर्माच्या नावाने असा अनाचार झाला याचे मला खूप दु:ख होते आहे.

ना: ब्रह्मा, अन्याय झाला खरा. पण अनीश्वरवादाचे सत्य काही लपलेले नाही. ते सर्वांना माहीत आहे व पटले आहे. नाहीतर खऱ्या देवाला 'अमुकार्थे अक्षदाम् समर्पयामी' असे म्हणून कोणी फसविले नसते. तो नाही, नरक नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून तर पूजेत, यज्ञात असे चीटिंग चालते. पण सारे जण संस्कारांच्या ओझ्याखाली, सामुहिक दडपणाखाली गप्प आहेत, प्रवाहपतित आहेत. म्हणून तथाकथित आस्तिक आहेत. रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत व जयजयकार करीत आहे. तरीपण त्याच प्रजेतील एक भयहीन चार्वाक खरे ते बोलूनच जातो.

प्रत्येत पीढीत चार्वाक होतातच. ब्रह्मा, मिरवणुकीतला लहान मुलगा, अजित केशकंबली, बुद्ध, जैन, आंबेडकर, सावरकर, आगरकर, पु ल देशपांडे, ज्योतिबा फुले व इतर अनेक याच आस्तिकांचे एरवी आवडते असलेले लोक. सारेचे सारे चार्वाक. 'कुणी निंदा, कुणी वंदा, अमुचा मानवहिताचा धंदा' म्हणणारे मृदुभाषी चार्वाक.

ब्रह्मा, आज ही गोष्ट सांगतांना मला विशेष आनंद होतो आहे. आजच माझ्या महती वीणेची ही तार अचानक छेडल्या गेली हाही एक योगायोगच. ब्रह्मा, आजच आणखी एका चार्वाकाचा जन्मदिन आहे. मास्तरांच्या बाळाचा आजच जन्मदिवस. लहानपणी आस्तिकतेचे बाळकडू प्यायलेला हा बाळ मोठा होताच, विज्ञाननिष्ठ, समानतावादी, मानवतावादी झाला. सर्व अभ्यासून, व्यासंगून नंतरच तो तथाकथित नास्तिक झाला. विज्ञान, ज्ञान, समाजावलोकन जर मतपरिवर्तन करू शकले नसते तर मानव आजही आदिमानवच राहिला असता. बाळाच्या बाबतीत तसे झाले नाही, त्याला अभ्यासाचा, व्यासंगाचा फायदा झाला. तो सत्यशोधक, सत्यवादी, सत्यकाम, सत्यार्थी झाला. पिलानी नावाच्या गावी प्रशासनाशी पटले नाही म्हणून बाळाने राजीनामा दिला. तेव्हा त्याला निरोप द्यायला विद्यार्थ्यांची गर्दी लोटली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या मुखपत्रात 'आणखी एका सत्यकामाला निरोप' मथळ्याचा लेख छापला होता. ब्रह्मा, सत्यशोधक, सत्यार्थी, सत्यवादी, सत्यकाम, चार्वाक, प्रमोद हे सारे समानार्थी शब्द आहेत. आणि ते सर्वांना आवडतात. आपण क्रांतिकारी झालो नाही तरी क्रांतिकारी व्यक्ती लोकांना आवडतेच.

चार्वाकाची ज्ञानवेल वाढत राहिली म्हणून आजचा दिवस आला. ब्रह्मा, देवाच्या अस्त्तित्वावर सगळ्यांनाच प्रश्न असतो रे. शंका असतेच. पण लहानपणचे संस्कार, नरकाची भीती, सामाजिक दडपण तसे म्हणू देत नाही. जंतुकवीची एक कविता अशा आस्तिकांच्या गुदमरवणाऱ्या अट्टाहासावरच आहे.

माझ्यामुळे सावली नाही
सावलीमुळे मी आहे
ती मला घेऊन जाते
पाऊल फक्त माझे आहे

आरशामधे तो असतो
जिकडे जातो मला नेतो
त्याला जेव्हा हसू येते
ओठ माझे उलवून जातो

डोळ्यांनी मी जे बघतो
ते केवळ स्वप्न आहे
रात्री बंद डोळा दिसते
तेच सार्थक सत्य आहे

ज्ञानविज्ञानाची मांजर
मला आडवी जात नाही
ॐकाराच्या नादामधे
म्यँाव तिचे उमटत नाही

मी साधा भोळा आस्तिक
तर्काला भीक घालत नाही
गोत्र माझे पुसू नका
चार्वाक तर ते नक्कीच नाही

असो. कोणाला वेड पांघरून पेडगावला जायचेच असेल तर आपण तरी काय करणार? फारच फार तर वेडकंबली म्हणून त्यांचे नामकरण करू.

ब्र: नारदा, तू म्हणजे ... आपल म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

ना: ब्रह्मा, बाळाला वर बोलावून तू स्वत: खाली पृथ्वीवर पळून आला नसता तर तुला आज चार्वाकदर्शन झाले असते. पण तसा योग नव्हता रे!

_____________________



अनुक्रमणिकेकडे

Tuesday, 5 April 2016


गोष्ट सोळावी


ब्र: नारदा, आज पुन्हा काहीतरी पूजेची तयारी दिसते. आज पुन्हा युगद्वारप्रहरी यज्ञ आहे काय रे? पुन्हा रावणाची तोंडे उमटलीत की काय? खरे सांगतो नारदा, मी काही नाही केले रे. मी तर काल काँप्यूटरला हात सुद्धा लावला नाही. खरे म्हणजे गेले काही दिवस मी वाचनसुट्टीवर आहे. अगदी कंटाळा आला आहे ती पुराणे वाचायचा. हसावे की रडावे हे सुद्धा कळत नाही बरेचदा. मग ते काहीच्या बाही अफाट अफलातून वाचलेले स्वप्नात येते. काल परवाच माझ्या स्वप्नातच हे मन्वंतर संपले. हयग्रीवाने माझ्या नाकात शिरून पुन्हा वेद चोरले व समुद्राच्या तळाशी जाऊन बसला. मी खवळलेल्या समुद्रात पडलो. विष्णूने पुन्हा मत्स्यावतार घेऊन चोरलेले वेद परत आणले व माझ्या मेंदूत भरले. मी पाण्यातच पुन्हा चारही वेद चार तोंडातून वदायला लागलो. वेदांचे बुडबुडे समुद्रतलावर येऊन फुटायला लागले. नशीबाने मी डोळे उघडले व हे सारे स्वप्न आहे हे लक्षात आले. खरे सांगतो नारदा, पण स्वप्न स्वप्न असल्याचा व आपणही तसेच काल्पनिक असल्याचा जो आनंद झाला तो केवळ अवर्णनीय. हे सत्य नाही, ही कापूसकोंड्याची गोष्ट आहे हे कळले की हायसे वाटते. जीवात जीव येतो. तेव्हापासून ठरवले की पुन्हा पुराणाकडे ढुंकूनही पाहायचे नाही. नको त्या जादुई गोष्टी. आपल्या समोरची ही सत्यसृष्टी इतकी अद्भुत असतांना दुसरे कृत्रिम मनोरंजन हवे तरी कशाला मी म्हणतो.

ना: ब्रह्मा, मी याच दिवसाची वाट पाहत होतो. वरातगंगा घेऊन आल्यापासूनच मला आजच्या दिवसाची वाट होती. आपण कल्पना की सत्य याचा तुला, आणि त्यामुळे मलाही, बरेचदा संभ्रम पडायचा. बरेचदा असे काही घडायचे की तू पलटी खायचा व जे समोर घडते त्यावरून तू काल्पनिक नसून सत्य आहेस असे अनुमान काढायचा. पुन्हा आपला वाद व्हायचा व तुला आपण केवळ मानवकल्पना आहो हे सत्य तात्पुरते का होईना, पण पटायचे. पुन्हा काही तरी अनाकलनीय घडायचे व तुझ्या मनात पुन्हा शंका यायची. तू खरेच आहेस, तूच वेदनिर्माता आहेस, तूच सृष्टीनिर्माता आहेस असे तुला पुन्हा पटायचे. तुझी ही चलबिचल अर्नाळ पुराणात टिपल्या गेली आहे. कुठे तरी तुझ्या मनाला असे वाटायचे की तू आहेस, देव आहेत हे खरे ठरावे. तुझ्या, खरे म्हणजे मानवांच्या इतक्या युगांच्या विश्वासाला तडा जाऊ नये असेही तुला मनोमन वाटायचे. पोटातून तुझी ती इच्छा असल्यामुळे तुला प्रत्येक गोष्टीत तुझ्या अस्तित्वाचा दाखला दृग्गोचर व्हायचा. पण ब्रह्मा, तू प्रामाणिक असल्यामुळे सारासार विचार केल्यावर, थोडा बुद्धिवाद, युक्तिवाद, वादविवाद केल्यावर तुझे विचारपरिवर्तन व्हायचे. तुझा एक गुण म्हणजे तुझे मत वादातीत आहे असा दुराग्रह तुझा कधीच नसतो. म्हणून तर मला तुझ्याबरोबर वाद करायला मजा येते. आधीच ज्यांचा घडा पालथा असतो त्यांच्यावर कुठल्याही तत्वज्ञानाचा अभिषेक व्यर्थच नाही का?

ब्रह्मा, मी माझे मत बदलणार नाही, काहीही झाले तरी मी माझ्या मतावर ठाम राहीन असा ज्यांचा हट्ट असतो त्यांनी कोणाशी किंवा कोणी त्यांच्याशी वाद करणे हा वेळेचा अपव्यय नाही का? वाद करायला बुद्धीची कवाडे उघडी असावी किंवा ती उघडण्याची क्षमता असावी. मतपरिवर्तन होण्याची थोडी तरी शक्यता असेल, विचारार्ह मुद्यांवर प्रामाणिक, पूर्वग्रहविरहित विचार होणार असेल, मुद्यांचे मूल्यमापन करून त्यानुसार मग काही निर्णय होणार असेल तर माणसाने मुद्दे मांडावे. उगाच कशाला वादावादी?

तुला पुराणे फोल आहेत असे आता वाटते हे योग्य की अयोग्य हा तुझ्यामाझ्याकरिता तसा गौण प्रश्न आहे. आपण काल्पनिक असल्यामुळे कल्पनासृष्टीत वावरलो काय अन् सत्यसृष्टीत वावरलो काय, एकच. आज मी तुला पुराणबाह्य दोन तीन गोष्टी सांगतो. तुला आवडतील. साध्या वाटल्या तरी या पौरुषेय गोष्टी साध्या नाहीत. विचार करायला लावणाऱ्या आहेत. अर्थाची वलये आहेत त्यांना. मला खलील जिब्रानची एक सुंदर गोष्ट आठवते. तिनेच सुरू करू. ऐक.

एका नगरात दोन बुद्धिमान व्यक्ती राहात होत्या. खरोखरच पंडित उपाधी ज्यांना शोभेल असे ते दोघेजण. विद्यावाचस्पती म्हणावे असे. दोघांचाही व्यासंग दांडगा. पण दोघांची मते अगदी परस्परविरोधी. एक अगदी आस्तिक, दुसरा तितकाच नास्तिक. एकाचा देवाच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वास. दुसरा देव आहे ह्या कल्पनेचा सुद्धा कट्टर विरोधी. दोन विचारधारा. नदीचे दोन काठ. कधीही न मिळणारे. पण दोघेही पंडित वादाला, चर्चेला न घाबरणारे. दोघांचेही व्यासंगी पांडित्य जनतेला मोहविणारे. पण परस्परविरोधी मतांचे पुरस्कर्ते असल्यामुळे जनता मात्र नित्यच बावचळलेली. हे घेऊ का ते घेऊ अशी तिची गत? नदीपात्रातले मासे कधी डाव्या नदीकाठाजवळ येत, तर कधी उजव्या.

एके दिवशी जनप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन दोघांना आस्तिकवाद व नास्तिकवादावरच जाहीर वादाचे निमंत्रण दिले. दोघांनीही ते स्वीकारले पण. आणि वादरण माजले. सारा गाव लोटला. पावसाळ्याच्या सुरुवातीला ओले ढग आणि कोरडे ढग एकाच आकाशात एकमेकासमोर आले की जे होते ते झाले. पांडित्य एकमेकाला भिडले. विचारमेघांचा गडगडाट व्हायला लागला. वीजा तळपायला लागल्या. सारा आसमंत पांडित्यतेजाने न्हाऊन निघाला. श्रोत्यांना तर ही पर्वणीच वाटली. 'असा वाद, पांडित्य पुन्हा न होणे' हीच सर्वांची भावना.

शेवटी मेघ बरसले व ओसरले. आकाश पुन्हा स्वच्छ निळे झाले.

दुसऱ्या दिवशी नास्तिकशिरोमणी पंडित सर्व लोकांच्या साक्षीने नगरातील देवळात गेले. देवळात कधीही प्रवेश न करणाऱ्या त्या पंडिताने गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला साष्टांग दंडवत घातले व साश्रुनयनांनी देवाची माफी मागितली.

इकडे आस्तिकशिरोमणी पंडित महाशय भर माध्यान्ही आपली सारी पुराणे, धर्मग्रंथ व साहित्यरचना घेऊन गावाच्या सीमेला लागून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीपाशी गेले. डोक्यावर सारी ग्रंथसंपदा घेऊन, डोळ्यात घळाघळा अश्रू भरून ते हळूहळू नदीच्या पात्रात खोलवर उतरले व त्यांनी डोक्यावरचे सारे ओझे नदीला समर्पण केले. गावकऱ्यांच्या व डोक्यावर तळपणाऱ्या सूर्याच्या साक्षीने हे सारे घडले. मतपरिवर्तन झालेल्या पंडिताने सूर्याला नमस्कार केला व जड पावलाने  तो घरी परतला.

ब्रह्मा, ही कथा मला खूप आवडते. नास्तिक शिरोमणी आस्तिक झाले आणि आस्तिक शिरोमणी नास्तिक झाले. जगाला त्याने काही फरक पडला असे नाही. पण विचारमंथन झाले. दोघांनीही 'काहीही झाले तरी मी माझे मत बदलणारच नाही' अशी टोकाची व मुळातच आढ्यतेची भूमिका घेतली नाही. एकमेकांचे बोलणे आदरपूर्वक ऐकून घेतले. ब्रह्मा, हा खरा ज्ञानादर. हा बुद्धीचा खरा वापर. श्रोत्यांनाही हा सारा उहापोह अनुभवता आला. त्यांनी त्यांना जे योग्य वाटले ते स्वीकारले असेल. न पटलेले सोडून दिले असेल. हीच बुद्धीची कसोटी. खलील जिब्रानलाही गोष्टीद्वारे हेच समजावून द्यायचे असावे. नाहीतरी ब्रह्मा, एवढ्या मोठ्या जगात, आणि ते जंबुद्वीपापेक्षाही मोठे आहे बरे, कोण आस्तिक, कोण नास्तिक याने काय फरक पडतो? कोण विष्णुसहस्रनाम सहस्र वेळा म्हणतो आणि कोण नाही याला काय महत्त्व? कोण आध्यात्माकडे वळला आणि कोण भक्तिमार्गावरून चळला ही क्षुल्लक बाब आहे. भाविकांनी जगन्नाथाचा रथ ओढला काय नी न ओढला काय, पृथ्वीची सूर्याला प्रदक्षिणा तशीच सुरू राहणार. तुझी चार तोंडे चार दिशांकडे पाहतच राहणार. माझी शेंडी हवेवर उडतच राहणार.

ब्रह्मा, मला आणखीन एक गोष्ट खूप आवडते. जगप्रसिद्ध आहे. लहानशा मुलाची आहे. खूप जुनी आहे. जवळजवळ दीडशे वर्ष जुनी. जंबुद्वीपाबाहेरच्या एका हँस अँडरसन नावाच्या लेखकाची आहे. पुराणात त्याचाच कदाचित हंस इंद्रसेन असा उल्लेख होईल. हँस अँडरसनच्या जन्माला गेल्याच आठवड्यात दोनशे अकरा वर्षे झाली. पण त्याच्यासारखा प्रौढांनाही बोधकर ठरतील अशा बालकथा लिहिणारा अजूनतरी दुसरा झाला नाही.

एक आटपाट नगर होतं. तिथला राजा तसा चांगला होता, पण त्याला कपड्यांचा फारच शौक होता. राजाच तो, अपार धनसंपत्ती. त्याला कोणाला हिशोब द्यायची गरज नव्हती. तो म्हणेल ती पूर्व. राज्यातही सुबत्ता आणि संपन्नता नांदत होती. कोणाची दृष्ट लागावी असे ते राज्य होते.

राजाला आपले हातमागावर विणलेले, कशिदा केलेले, विणकाम भरतकाम केलेले, रंगीबेरंगी तलम वस्त्र दाखवायला देशोदेशीचे विणकर यायचे. वर्ष वर्ष खपून राजाच्या नजरेत भरेल असे वस्त्र विणणे व राजाला दाखविणे याची सतत चढाओढ लागली असे. राजाला जर पसंत पडले तर मग काय! राजा भरपूर मोबदला द्यायचा. सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल असा भरभरून द्यायचा. राजाचाही शौक इतका दांडगा की तो दर तासाला कपडे बदलायचा.

एके दिवशी राज्यात दूरदेशीचे दोन विणकर आले. बहुधा भाऊ भाऊ असावे. झाडाखाली, देवळाबाहेर, नदीकाठी ते जात व आपण विणलेल्या तलम वस्त्राबद्दल एकमेकाशीच बोलत. असे वस्त्र न आजवर झाले, न पुढे होणार असे म्हणत. अशा वस्त्रांचा पारखी दुनियेच्या पाठीवर नसावा असे म्हणत व उसासे टाकत. आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या कानावर ही गोष्ट जाई व त्यांचे कुतुहल वाढे. पण त्यांनी काही विचारले तरी ही दोघे 'आमचे अद्वितीय वस्त्र फक्त अद्वितीय राजासाठी आहे. सामान्यांसाठी नाही.' असे म्हणत व दुसरीकडे जात. असे बरेच दिवस गेले. ही गोष्ट राज्यात सर्वत्र सांगोवांगी पसरली व प्रजाजनांच्या चर्चेचा विषय झाली. शेवटी ती राजाच्या प्रधानमंत्र्याच्या कानावर गेली. आपल्या महाराजांचे वस्त्राचे वेड प्रधानाला चांगलेच माहीत होते. अनायासे राज्यात बाहेरचे नवीन विणकर आले आहेत तर त्यांना राजाकडे घेऊन जावे असा विचार त्याच्या मनात आला. राजा खुश झाला की खूप उदार होऊन आपल्यालाही बक्षीस देईल असाही विचार मनात होताच. लोभ कोणाला चुकला आहे?

प्रधानाने दोन्ही विणकरांना राजासमोर पेश केले. राजानेही त्यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या वस्त्रकलेविषयी सांगण्यास सांगितले. त्यातला एक विणकर बोलू लागला.

राजन, आमचे कूळ फार प्राचीन आहे. अत्यंत तलम वस्त्र विणण्याची कला आमच्या कुळात फार पूर्वापार चालत आली आहे. कापड विणणे, रंगविणे, कशिदा काढणे, शिवणकाम हे सर्व आम्हाला अवगत आहे व आम्ही स्वतःच करतो. आमचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही एकच वस्त्र चार हातमागावर मिळून विणतो. चार रंगांचे चार धागे  वापरतो. चार बोटातून जातांना ते चार धागे आणि रंग असे बेमालूम मिसळतात की तयार होणारे नक्षीदार वस्त्र अनन्य. आमच्या देशात तर आम्ही विणलेल्या वस्त्राला अनन्य असेच नाव आहे. तुमच्यासारख्या कदरदान राजाने आमचे वस्त्र स्वीकारले तर आम्हीच काय, आमचे कूळच धन्य होईल. आमच्या जन्मजात कलेची कदर व्हावी म्हणून आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा नाही. आमच्या कलेला राजदेहाचा स्पर्श व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. कलाकाराचा मोबदला धन नाही, कलेची कदर आहे.

राजा त्याचे बोलणे ऐकून भारावून गेला. राजाने त्यांना वस्त्राचे काही नमुने पेश करायला सांगितले.

आता दुसरा विणकर म्हणाला, हे राजन! आम्ही आपल्यासारख्या असामान्य व्यक्तीला असामान्य वस्त्रच देऊ इच्छितो. ते आम्ही आपल्याच राज्यात राहून विणू. त्या वस्त्राची विशेषता अशी की ते पाहणाऱ्याला त्याच्या गुणानुसार दिसेल. हे वस्त्र असे आहे की ते स्वतःच्या पदाला अयोग्य असलेल्या किंवा मनात राजद्रोह असलेल्या व्यक्तीला दिसणारच नाही. अशा अपारदर्शी व्यक्तीसमोर हे वस्त्र स्वतःचे स्वरूप प्रकटच करणार नाही. जी व्यक्ती दिसते तशी नाही तिच्याकरिता हे वस्त्र अदृश्य असेल. ही कला फक्त आमच्याकडेच वंशगत आली आहे. आम्ही असेच वस्त्र आपल्यासारख्या कल्याणकारी, परोपकारी राजाकरिता विणू इच्छितो. आपण आम्हाला अशी संधी द्यावी हीच आपल्या चरणाशी प्रार्थना.

राजा अधिकच प्रभावित व प्रसन्न झाला. त्याने प्रधानजींना आदेश दिला की दोन्ही विणकरांना राज्यात त्यांना हवे तसे घर द्यावे. महिनाभर त्यांची पूर्ण व्यवस्था ठेवावी, त्यांना उत्तम दर्जाचे रेशीम व इतर आवश्यक सामग्री उपलब्ध करावी व राज्याच्या लौकिकाला शोभेल अशी त्यांची खातिरदारी करावी. दोन्ही विणकर नतमस्तक होऊन, आदराने कुर्निसात करीत, राजाला पाठ न दाखवता राजाच्या खाजगी दालनातून बाहेर आले. राजाच्या चेहऱ्यावरचा आनंद अपूर्व होता.

राजाचा आजचा आनंद दुहेरी होता. एकतर त्याला लवकरच असा वेष मिळणार होता जो आगळा वेगळाच होता. पोत, रंग, नक्षीकाम तर वस्त्राचे गुण आहेतच, पण पाहणाऱ्याच्या मनाचा रंग दर्शविणारे वस्त्र त्याच्याही ऐकण्यात नव्हते. हे वस्त्र घातले की मंत्रिपरिषदेत व जनसामान्यात कोण कोण आपल्या पदाला योग्य आहे व कोण नाही, तसेच राज्यात राजद्रोहाचे विष शिरले तर नाही ना हे त्याला कळणार होते. एका दगडात दोन पक्षी मारले जाणार होते. राजाला केव्हा हा महिना जातो व आपण नवीन वेष घालून थाटाने राज्यात मिरवणूक काढतो असे झाले.

इकडे विणकरांनी प्रधानजींंना सांगून उच्च प्रतीचे रेशीम मागवून घेतले. अहोरात्र काम करावे लागणार असल्यामुळे मेणबत्याही मुबलक मागवून घेतल्या. स्वयंपाकात वगैरे विनाकारण वेळ जाऊ नये म्हणून जेवण सकाळ संध्याकाळ राजाच्या मुदपाकखान्यातूनच आले तर बरे होईल असे नम्रपणे प्रधानजींना सुचवून पाहिले, व त्यांनी लगेच तसा आदेश जारीही केला. सारी जय्यत तयारी झाली व रंगीत, रेशमी राजवस्त्र विणण्यास सुरुवात झाली.

एक आठवडा गेला. दोन आठवडे गेले. राजाला काही चैन पडेना. बरेचदा त्याला वाटे, वेष बदलून पाहून यावे काम कुठपर्यंत आले ते. पण असा उतावीळपणा त्याच्या पदाला शोभला नसता. तोच त्याच्या पदाला अयोग्य तर नाही ना अशी शंकेची पाल पण त्याच्या मनात चुकचुकली. छे, असे करणे योग्य नाही. पण चैन काही पडेना. शेवटी त्याला एक युक्ती सुचली. त्याने प्रधानजींना बोलावले. म्हणाला, जा प्रधानजी जरा स्वतः जाऊन बघा विणकरांची व्यवस्था चोख आहे की नाही. त्यांना काय हवे नको ते विचारा. आम्ही आठवण केली म्हणावं. आणि जाताच आहात तर बघून या वस्त्र कुठवर विणून झाले ते. रंग, वीण, नक्षीकाम बघून या. काही सूचना असतील तर जरूर द्या. काम उत्तम व्हायला हवे.

'जशी आज्ञा महाराज!' म्हणून प्रधानजी त्वरित विणकरांच्या घरी आले. हातमागाचा आवाज येत होता. दोन्ही विणकरांच्या हाताची बोटे हवेत हालत होती. पण प्रधानजींना हातमागावर धागे किंवा तयार होणारे वस्त्र काही दिसेना.

विणकरांनी प्रधानजींना येतांना पाहिले व काम न सोडता त्यांना 'या, बसा' म्हणाले. गरीबांच्या कुटीला प्रधानाचे पाय लागले म्हणून आम्ही धन्य झालो असे म्हणाले. रंगसंगती कशी आहे असे विचारून त्यांनी प्रधानजींच्या तोंडाकडे पाहिले तेंव्हा प्रधानजी जरा बुचकाळ्यातच पडले. पण विणकरांनीच जेंव्हा सोनेरी, चंदेरी, घननीळ आणि रक्तवर्ण असे चार रंग कां निवडले ते स्वतः होऊनच सांगितले तेंव्हा 'अप्रतीम, अप्रतीम' असे शब्द ते वदले. चिमटीत वस्त्र घेऊन 'पोत तर बघा' असे विणकर म्हणाले तेव्हा प्रधानजींनीही पोत बघण्याचा आविर्भाव आणला व 'उत्तम उत्तम' म्हणाले. नंतर विणकरांनी वस्त्रावरचे बारीक नक्षीकाम त्यांनी मुद्दामच गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा व शमिपत्रावर आधारीत कसे घेतले व त्यामुळे त्यांचे काम किती वाढले ते सांगितले तेंव्हा प्रधानजींनी 'बहोत खूब, बहोत खूब' म्हंटले. महाराजांना मी या अवर्णनीय कलेचे वर्णन करून सांगीन असे म्हणून प्रधानजींनी त्यांचा निरोप घेतला व विणकरांच्या विनंतीवरून आणखी भारी रेशीम पाठविण्याचे आश्वासन दिले.

राजमहालाकडे परततांना प्रधानजींच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. आपल्याला वस्त्र, धागे, रंग, नक्षी काहीच कसे दिसले नाही? म्हणजे आपण प्रधानपदाला अयोग्य आहोत की काय? की आपल्या मनात कुठेतरी राजद्रोहाचे बीज नांदत आहे? बरे झाले आपण खोटेखोटेच पोत, रंग, नक्षी यांची भरघोस स्तुती केली. नाहीतर त्या विणकरांना आपले खरे स्वरूप कळले असते. महाराजांकडे जाऊन आपल्याला न दिसलेल्या वस्त्राचे साद्यंत वर्णन करून सांगावे आणि झाले गेले विसरून जावे असा विचार करून ते त्वरित राजमहालाकडे वळले.

इकडे महाराज प्रधानजींची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांचा प्रवेश झाल्याबरोबर विचारते झाले 'प्रधानजी, कसे येत आहे रंगरूप आमच्या अद्भुत  नव्या वेषभूषेला? कुठवर आले काम? केव्हा होईल वस्त्र तयार आणि केंव्हा येतील ते आमचे माप घ्यायला?'. राजाची प्रश्नांची सरबत्ती पाहून प्रधानजी हसून म्हणाले 'महाराज, न भूतो न भविष्यति असे ते तलम वस्त्र विणून होत आले आहे. काय तो चंदेरी, सोनेरी, निळा व लाल रंग! काय ती त्यांची स्वाधर्म्य राखूनही झालेली एकरूपता! काय ते बारीक दुर्वा व शमीपत्रांचे नक्षीकाम! मी तर थक्कच झालो आहे. महाराज, थोडे रेशीम कमी पडते आहे. ते जर अर्थमंत्र्यांकरवी पाठवून दिले तर योग्य होईल.'

राजाचा आनंद पोटात मावेना. पण तो ओठात येऊ नये याची काळजी त्याने घेतली व म्हणाले 'बरे, बरे! तुम्ही म्हणाल तर मी त्या दोघांची राज्याचे राजविणकर म्हणून नेमणूक करतो. एवढे वस्त्र विणून झाले की त्यांनी आपल्या प्रजेकरिता वस्त्रनिर्मिती करावी. प्रजेचे हित तेच आपले हित. नाही का?'. 'होय महाराज' म्हणून प्रधानजींनी राजाचा निरोप घेतला.

अगदी वेळेवर अर्थमंत्र्यांचे नाव सुचले म्हणून प्रधानजी स्वतःवरच खूश झाले. अर्थमंत्र्यांची राजाशी सलगी वाढत आहे व राजनिर्णयात राजा त्यांच्या मताला आजकाल जरा जास्तच महत्त्व देतो हे प्रधानजींना नाहीतरी खटकायलाच लागले होते. त्यांना वस्त्र दिसले नाही की ते पदाला किती अयोग्य आहेत हे राजाला परस्परच कळेल हे मनात येताच प्रधानजी मनोमन खुष झाले.

इकडे राजाने अर्थमंत्र्यांना पाचारण केले व त्यांना नवीन राजविणकरांच्या नेमणुकीबद्दल व स्वतःच्या तयार होत असलेल्या अद्भुत वस्त्राबद्दल सांगितले. अर्थमंत्र्यांनी विणकरांना रेशीम घेण्याकरिता हव्या तितक्या सुवर्णमुद्रा स्वहस्ते द्याव्या व प्रजेलाही एक एक वेष राजाकडून राज्यमहोत्सवाआधी देण्याकरिता पैशाची बेगमी करावी असे सुचविले. आणि जाताच आहात तर वस्त्रनिर्मिती कुठवर आली तेही पाहून या व माझे माप घ्यायला येतांना विणलेले वस्त्रही घेऊन येण्यास विणकरांना सांगा
असे सुचविले. 'जशी आज्ञा महाराज!' म्हणून अर्थमंत्री राजमहालातून बाहेर आले.

सुवर्णमुद्रांनी भरलेली रेशमी थैली घेऊन अर्थमंत्री तडक विणकरांकडे गेले. दोघेही हाताच्या बोटांनी आपल्या समोरून सरकणारे काहीतरी चाचपत आहेत, निरखून पाहत आहेत असे त्यांना दिसले. पण ते नेमके काय आहे हे मात्र कळेना. मंत्र्यांना पाहून दोघांनीही हात न जोडता नमस्कार केला. हात त्यांचे कामात गुंतले होते. त्यातला मोठा भाऊ म्हणाला, 'तुमच्याच राजांचे काम सुरू आहे. तहानभूक विसरून गेला पंधरवाडा आम्ही हेच काम करीत आहोत. तुमचे प्रधानमंत्री आले होते. तलम, चतुरंगी, नाजुक नक्षीकाम असलेले हे वस्त्र बघून ते तर चकितच झाले. सोनेरी, चंदेरी, निळा आणि रक्तासारखे लाल रंग कसे जादुई किमया करतात व त्यातच त्रिदल दुर्वा आणि बहुपर्णी नाजुक शमीच्या पानांचा जो नाच या वस्त्रावर चालतो असे वाटते ते पाहून ते तर आऽऽ वासून बघतच राहिले. धनी, 'ज्या कलेत कसर नाही, तीच खरी कलाकुसर' अशी आम्हाला वडिलांची शिकवण आहे. तिचे काटेकोर पालन आम्ही करतो. ह्या वस्त्राचा अंगरखा व चुडीदार आपल्या महान राजांच्या अंगाखांद्यावर खेळेल तेंव्हा राजा हाच देव असे प्रजेला वाटेल. प्रजेलाही आपण या वस्त्राच्या खूबीबद्दल आधीच सांगितले तर बरे होईल. हातातली कामे सोडून ते मिरवणुकीच्या वेळेस रस्त्याच्या दुतर्फा उभे राहतील.

अर्थमंत्र्यांना घाम सुटू लागला. छातीचे ठोके ऐकू यायला लागले. हे वस्त्र आपल्याला दिसत नाही हे महाराजांच्या कानावर गेले तर? मेहनतीने व हुशारीने संपादन केलेला महाराजांचा विश्वास धुळीस मिळेल. एक दिवस प्रधानपदावर आरूढ होण्याची तीव्र मनिषा मनिषाच राहील.

अचानक मंत्र्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले 'व्वा! क्या बात है!'. त्यांनीही बोटे फिरवून वस्त्राचे पोत अलगद चाचपून पाहिले. म्हणाले, 'आमचे महाराज कलेचे व कलाकारांचे कदरदान आहेत. त्यांनी तुमची राजविणकर म्हणून घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्याकरिता ही सुवर्णमुद्रांची पिशवी त्यांनी पाठविली आहे. तिचा स्वीकार करा. नवे रेशीम घ्या. आणखी धन हवे असेल तर तसे सांगा. तुमचे वस्त्र विणून झाले की तसाही सांगावा धाडा. महाराजांचे माप घ्यायला शक्य तितक्या लवकर या. मिरवणुकीच्या आधल्या दिवशी महाराज एकदा हा विलक्षण वेष खाजगीत घालून बघू इच्छितात. आमचे महाराज कुठलीही गोष्ट परखून घेतात.'.

विणकरांनी ४-५ दिवसांनी माप घ्यायला यायचे कबूल केले व मंत्र्यांना निरोप दिला.

मंत्री राजवाड्यात येतांना सुन्न होते. आलेले संकट त्यांनी शिताफीने टाळले होते खरे पण इतरांना नाही तरी त्यांना स्वतःलाच आपण स्वतः पदाला योग्य नाहीत हे कळून बरे वाटले नाही. राजवाड्यात शिरतांना बळेच त्यांनी चेहऱ्यावर आनंदमुद्रा चिकटविली व राजांसमोर दाखल झाले.

उतावीळ राजा उत्सुकतेने उठून बसला. मंत्र्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांनी काय ते ताडले व म्हणाले 'काय अर्थमंत्री, कशी वाटली आमची निवड? आहेत का आमचे विणकर दरबारी होण्याच्या योग्यतेचे?'.

मंत्री स्वतःला सावरत म्हणाले, राजा, खचितच. म्हणून तर ते असे चतुरंगी, सोनेरी रुपेरी लाल निळे आकाशासारखे तलम वस्त्र विणू शकले. त्यावर ते हुबेहूब दुर्वांचा व शमीपत्रांचा आभास करून देणारे नक्षीकाम! सोने पे सुहागा! मी जर राजकवी असतो तर त्यावरच एक महाकाव्य रचले असते. महाराज, आपल्याला जी श्रेष्ठतेची पारख आहे ती त्रिभुवनात कोणात नाही. म्हणूनच ते विणकर सप्तद्वीप ओलांडून आपल्या राज्यात आले. त्यांच्या कलेचे खरोखरच चीज झाले.'.

राजाला खूप विचारावेसे वाटले की विणकर माप घ्यायला कधी येतील. पण उतावीळपणा उच्चपदस्थांना शोभत नाही असे त्याने ऐकले होते. पण त्याला विचारायची गरजच पडली नाही. अर्थमंत्र्यांनीच त्यांना सांगितले की ३-४ दिवसात विणकर मापाला येऊ इच्छितात व येतांना वस्त्रही दाखवायला घेऊन येतील. ते ऐकून राजाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तरी पण जरा गंभीर होऊन त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडी चर्चा केली व मंत्र्यांना निरोप दिला.

पुढचे तीन चार दिवस अर्थमंत्र्यांनी शिपायांकरवी राज्यात घरोघरी येणाऱ्या मिरवणुकीची व राजाच्या नव्या वेषाची व त्याच्या विशेषतेची माहिती पोहोचवली. राज्यातील घरभेद्यांची तर पाचावर धारणच बसली. त्यांनी मिरवणुकीच्या दिवशी घरातून बाहेरच न निघण्याची शपथ घेतली. बहुसंख्य साध्याभोळ्या राज्यप्रेमी जनतेने मात्र राजदर्शनाचा योग येणार म्हणून आगामी मिरवणुकीची आतुरतेने वाट पाहायला सुरुवात केली.

तीन चार दिवस गेले आणि दोघेही विणकर राजदरबारी आले. हाती काहीतरी परीटघडीचे ठेवले असावे असे दोघांचेही हात पुढे केलेले होते. त्यामुळे कोणीच राजाला नमस्कार वा कुर्निसात केला नाही. राजाला जरा रागच आला कारण त्याला तर विणकरांचे हात रिकामे दिसत होते. तेवढ्यात प्रधानमंत्री व अर्थमंत्री पुढे आले व विणकरांच्या हाताकडे बघून 'व्वा, अप्रतिम, अद्भुत' असे म्हणाले. राजाकडे वळून म्हणाले की विणकर विणलेले वस्त्र घेऊन आले आहेत व राजाचे माप घेऊ इच्छितात.

राजाला मात्र कितीही प्रयत्न केला तरी विणकरांच्या हातातली वस्त्रघडी दिसेना. स्वतःला कसेबसे सावरत राजा प्रधानजींना म्हणाला की विणकरांना पाहून त्याला प्रसन्नता आहे व माप देण्यासाठी दोघांना तो खाजगीत भेटू इच्छितो. एवढे बोलून महाराज उठले. सारे दरबारी पण उभे होऊन राजा जाईपर्यंत आदराने कुर्निसात करीत राहिले. विणकर मात्र तसे करू शकले नाही कारण त्यांच्या हाती ते अद्भुत वस्त्र होते. दोन शिपाई त्यांना राजाच्या खाजगी दालनात घेऊन गेले. तेही जाता जाता विणकरांच्या हाताकडे पाहून मधून मधून वाहवा करते झाले.

राजाच्या दालनात आल्याबरोबर दोघाही विणकरांनी त्यांच्या हातातले वस्त्र समोरच्याच सोन्याच्या ताटात ठेवले व आता प्रथमच राजाला लवून कुर्निसात केला. राजाने केवळ स्वीकारार्थ मान हालवली. विणकरांनी वस्त्राची घडी ताटातून उचलून ती उलगडली व लग्नात अंतरपाट धरतात तसे ते वस्त्र दोन बाजूला उभे राहून राजासमोर धरले. रंग, पोत व नक्षीकाम यांचे वर्णन केले व राजाची काय प्रतिक्रिया होते हे जाणून घेण्यास उत्सुकतेने त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले.

राजाच्या मनात काय सुरू होते हे राजाच जाणे. काही वेळ तरी राजा काहीच बोलला नाही. पण नंतर जागीच उभा राहून टाळ्या वाजवत 'शाबाश, शाबाश' म्हणाला. काल माझ्या स्वप्नात हेच चंदेरी, सोनेरी, लाल व निळ्या रंगात न्हायलेले, दुर्वा व शमीपत्राने पवित्र झालेले  अंबरासारखे नीतळ वस्त्र आले होते. तेच आज प्रत्यक्षात उतरले की काय असे मला वाटते, असे तो म्हणाला. दोघेही विणकर कृतकृत्य होऊन एकदमच 'महाराज! आपण कृपावंत आहात. आज आमचे जीवन सार्थक झाले.' असे म्हणाले.

विणकरांनी वस्त्राची नीट घडी करून सुवर्णाच्या ताटात ठेवली. राजाचे माप घेतले. राजानेही त्यांना कंठातली मोत्यांची माळ काढून दिली. मिरवणुकीच्या दिवशी थोडे आधीच येऊन आम्ही आपणाला वेष धारण करण्यास मदत करू असे म्हणून, वस्त्राची घडी करून, ती अलगद हाती घेऊन विणकर परतले.

राजाच्या मनातच राजद्रोह कसा असू शकेल? म्हणजे आपण नक्कीच राजधर्म निर्वहनाला कुठेतरी कमी पडतो आहे व राजपदाला अयोग्य ठरलो आहे असे राजाला वाटले. प्रधानजींनी आधीच आपल्याला वस्त्राचे वर्णन सांगितले होते म्हणून आजचा कठिण प्रसंग टळला हे कळून राजाला हायसे वाटले.

मिरवणुकीचा दिवस आला. संध्यासमयी मिरवणूक निघायची असली तरी मध्यान्हीपासूनच मिरवणूकीच्या मार्गावर दुतर्फा लोक जमायला लागले व मोक्याची जागा अडवायला लागले. इकडे विणकरबंधू राजाचा नवा वेष, सुईधागा, कात्री व एक नवीनच विणलेले वस्त्र घेऊन राजाच्या दालनात दाखल झाले. राजाची उत्कंठा शीगेला पोहोचली होती. विणकर येताच तो पुढे आला व विणकरांच्या हाताकडे बघू लागला. त्यातल्या एकाने राजाचा अंगरखा घडी मोडून, झटकून राजासमोर धरला. दुसऱ्याने राजाचा चुडीदार पायजामा तसाच घडी उलगडून, झटकून राजासमोर धरला. राजाला काही दिसले नाही खरे पण तो तसे बोलला नाही. विणकर म्हणाला, 'महाराज, हा अंगरखा व पायजामा आपण परिधान करावा. नेसूचे कपडे बदलून घ्या म्हणजे आम्ही स्वहस्ते आपल्याला नवे परिधान नेसवून देऊ. राजाने तसेच केले. विणकर म्हणाला, राजा हा वेष अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखा हलका आहे. कदाचित आपणाला आपण काहीच घातले नाही असेही वाटेल. असे म्हणून दोघांनी हलकेच राजाला पायजाम्यात पाय घालायला सांगितले. काहीच दिसत नसूनही राजाने अंदाजानेच पाय टाकले. विणकरांनी  दोन्ही हातांनी तंग पायजामा राजाच्या पायात हळूहळू वर सरकवला. गुदगुल्या तर होत नाही ना असे राजाला विचारले. राजा नाही म्हणाला. नंतर तसेच अंगरख्याच्या बाह्यांतून राजाचे हात ओढले व अंगरखा व्यवस्थित अंगावर बसलेला पाहून त्याच्या नक्षीदार गुंड्या काचातून घातल्या. एवढे झालेले पाहून दोघेही एकदमच 'व्वा' म्हणाले. बंधुद्वय म्हणाले 'राजा, हा वेष फारच फार तर गुंजभर वजनाचा असेल. तुम्हाला तर जाणवतही नसेल. पण आरशात पहाल तर त्याचे स्वर्गीय सौंदर्य आपणाला कळेल. तुम्ही तसेच करा. आम्ही तोवर हे काळ्या रंगाचे अंगवस्त्र कापून व शिवून आपणाला देतो. गेला महिनाभर अहोरात्र राबूनही हे थोडे काम राहूनच गेले.

राजाला आतापर्यंत फक्त विणकरांचे हात हालतांना दिसत होते. वस्त्र काय, वस्त्राचा एक धागाही त्याला दिसला नाही. तरी पण राजा आरशासमोर जाऊन आपला शृंगार न्याहाळू लागला. मागे वळून पाहतो तो दोघेही काहीतरी त्यांनी हातात ताणून धरले असावे असे उभे होते व त्यातला एक भाऊ हवेत सपासप कैची चालवत होता. कापड कापून होताच दुसऱ्याने लगेच सुईत धागा घातल्यासारखे करून धावदोऱ्याने काहीतरी शिवावे अशी बोटांची व हातांची हालचाल केली. राजाने अंदाज बांधला की ते आपले अंगवस्त्र शिवत असावेत. तसेच होतही होते. फक्त राजाला मात्र ते दिसत नव्हते. शिवून होताच विणकरांनी अंगवस्त्राची घडी करून ती अलगद राजाच्या खांद्यावर व्यवस्थित बसवली व सुईधाग्याने खांद्यावरती हलका टाका मारून अंगवस्त्र घसरू नये म्हणून अंगरख्याशी जोडून टाकले. आता दोघेही राजाकडे डोळे विस्फारून बघू लागले व म्हणाले 'राजन, आमचे या जन्माचे सार्थक झाले. आता आमचे हातही जरी कोणी मागितले तरी आम्ही ते आनंदाने देऊ. या हातांनी अशी कलोत्पत्ती पुन्हा होणे नाही'. असे म्हणून दोघेही घळाघळा रडू लागले.

राजाने दोघांचे सांत्वन केले व म्हणाला, 'तुम्हाला आता आजन्म राजाश्रय आहे. तुमचे हे कलापूर्ण हात मागणाऱ्याची गर्दन छाटण्यात येईल.'. एवढे म्हणून राजाने टाळी वाजवली. एक हुजऱ्या लगेच आत येताच 'जा आणि प्रधानजी व अर्थमत्र्यांना बोलावून आण' असा आदेश दिला. 'जी हुजूर!' म्हणत हुजऱ्या बाहेर गेला व क्षणात प्रधानजी व अर्थमंत्री दालनात आले.

दोघे शिरतात, न शिरतात तेवढ्यात विणकर राजाकडे अदबीने हात दाखवत म्हणाला, 'कसा शोभून दिसतो महाराजांना त्यांचा वेष बघा. अंगरखा व पायजाम्याचे वस्त्र तुम्ही आधीच पाहिले होते. कृष्णवर्णी अंगवस्त्र मात्र आम्ही कालच विणले व आजच शिवले. राजवेष आता पंचरंगी झाला आहे. कसा वाटतो?'.

क्षणाचाही विलंब न करता दोघेही उद्गारले 'अति सुंदर, अति सुंदर'. दोघांनीही राजाचे अभिनंदन केले व म्हणाले 'महाराज, मिरवणुकीची वेळ झाली आहे. रथ सुसज्ज आहे. आपण चलावे व रथारूढ व्हावे. समस्त प्रजा आपले महाराज व त्यांचा हा अवर्णनीय राजवेष पहायला आतुर आहे.'.

पुढे वाजंत्री, घोडदळ, दरबारी, अर्थमंत्री, सेनापती, प्रधानमंत्री, रथात नववेषधारी महाराज, नंतर राजकवी, राजवैद्य, राजविणकर, सैन्य, व शेवटी हत्तीवरून साखर वाटणारे राजसेवक अशी भव्य मिरवणूक निघाली. आपला वेष सर्वांना दिसावा म्हणून राजा रथात बसण्याऐवजी ऐटीत उभा होता. राजवेषाचे प्रजाजन करीत असलेले कौतुक कानावर येत होते व राजाला आनंद देत होते. मिरवणूक मुख्य राजरस्त्यावर आली. तेथे तर अमाप गर्दी होता. दुतर्फा उभी जनता वाहवा करीत होती. आपण केलेले राजाचे व राजवेषाचे कौतुक त्या कोलाहलातही सर्वांना ऐकू यावे म्हणून जरा वरच्या आवाजातच स्तुती करण्याची प्रजाजनांत अहमहमिका लागली होती. इतक्यात .....

राजमार्गावरच्या गर्दीत आपल्या तीन वर्षाच्या नातवाला खांद्यावर बसवून एक वृद्ध नागरीक उभा होता. त्या लहानग्या नातवाला प्रथमच राजाचे दर्शन होणार होते. वाजंत्री, घोडे पाहून ते लहान मूल खूपच खूष झाले. आता राजाचा रथ त्याला दिसू लागला. त्यात उभा असलेला राजाही आता त्याच्या दृष्टिपथात आला. मुलगा अचानक हासायला लागला व म्हणाला, 'आजोबा, आजोबा, राजा बघा कसा नंगू पंगू आहे. राजा कपडे घालायलाच विसरला. शेम शेम पप्पी शेम, आॅल द मंकीज नो युवर नेम'. असे म्हणून तो आणखीनच मोठमोठ्याने हासायला लागला.

अचानक सर्वत्र शांतता पसरली. आता कुजबुज कुजबुज सुरू झाली. नंतर एक, मग दोन, मग तीन असे आवाज यायला लागले 'राजा निर्वस्त्र, राजा निर्वस्त्र'. आवाज वाढायला लागले आणि पाहता पाहता सारी प्रजा म्हणायला लागली 'राजा निर्वस्त्र, राजा निर्वस्त्र'.

ब्रह्मा, ही कथा मला खूपच आवडते. आस्तिकवाद, नास्तिकवाद, देवाच्या अस्तित्वावर विश्वास, त्याच्या अनस्तित्वावर विश्वास याकडे व त्यांच्या कारणमीमांसेकडे ही कथा अंगुलिनिर्देश करते असे मला वाटते.

ब्र: नारदा, मलाही दोन्ही कथा आवडल्या रे. त्या पुराणातल्या कथांपेक्षा ज्यास्तच आवडल्या. पण दोन्ही गोष्टींवर चिंतन करायला हवे. नुसत्या गोष्टीच आहेत की यात आणखी काही संदेश आहे ते पाहिले पाहिजे. पण सध्या तरी तू मला आणखी एक गोष्ट सांग. तू म्हणाला होतास दोन तीन गोष्टी सांगीन म्हणून. दोन झाल्या, आता तिसरी सांग. मग पुरे कर वाटल्यास.

ना: ब्रह्मा, आता तिसरी गोष्ट नंतर कधी. लवकरच मी तुला याच श्रुंखलेतली आणखी एक कथा नक्कीच सांगेन. पण आता चल, बघ काकाकाकू काय करतात ते. ते बघ मास्तरांच्या फोटोची पूजा करीत आहेत दोघे. हार घालून नमस्कार करीत आहेत. अगदी देवाला करतात तसा. पण ब्रह्मा, आजचे हे त्यांचे पूज्य देव मात्र खरेच अस्तित्वात होते. हे आताच्या गोष्टीतल्यासारखे नसलेले वस्त्र नव्हते. मास्तर डोळ्यांना दिसत होते. या पृथ्वीवर कधीकाळी चालले होते. या घरी आले होते. आज मास्तरांची पुण्यतिथी आहे. म्हणून हे पुण्यस्मरण. आपणही हात जोडू या. ये असा.

_____________________



अनुक्रमणिकेकडे