Tuesday, 22 December 2015


गोष्ट सहावी


काकू: अहो, मी काय म्हणते, आपण नं जरा घराची रचना बदलू. मुलांची खोली आपण आता स्टडी रूम करू. काँप्यूटरही तिथेच शिफ्ट करू. सगळी पुस्तकेही तिथेच ठेऊ. त्यानिमित्तानी तरी आपले दिवसाकाठी अर्धाएक तास तिथे जाणे येणे होईल. मीही थोडं वाचन करीन म्हणते. तुम्हीही करा. हळूहळू आपल्यालाही दुसरा काही विरंगुळा हवा. तुमचं रिटायरमेंट सहा महिन्यावर आलं आहे. मीही व्ही. आर. एस. घेईन म्हणते तेव्हाच. मग काय नुसत्या गप्पा मारायच्या? धारावाहिकं बघायचे? आतापासूनच वाचन मनन वाढवलं पाहिजे. नाहीतर रिटायरमेंट खायला उठेल. मलाही कविता करून युग उलटलं. तुम्हाला लेखनाची वाचनाची आवड आहे असं मी फक्त लग्नाआधी ऐकलं तेवढच.

काका: राहू दे, राहू दे. तूही विणकाम भरतकामात एक्सपर्ट होती म्हणे. एम्ब्राॅयडरीत तर स्पेशलायझेशन. स्पेलिंग सोडून बाकी काहीतरी त्याच्याशी नातं आहे का आता कोण जाणे!

काकू: बरं, ते टोमणे सोडा. पण आज अनायासे शनिवार आहे तर करू या का हालवाहालव, उचलदडप? अहो खरंच मला कविता करावीशी वाटते. आपल्याला विचार आहेत, मुळाक्षरे येतात, व्याकरण समजते. विचार उसनेही घेता येतील. दुसऱ्या भाषेतील कवितांचे भाषांतर केले तरी कुठे बिघडते? मोठमोठे लोक तसे करतात. त्यानेही साहित्यसेवा होईल.

काका: नवीन काही करायचं तर ते नेमकं शनिवारी कशाला. नकर्त्याचा वार असतो शनिवार. उद्या करू सुरुवात. पण काय गं, हे नवीन काय खूळ? ते भूत आलं होतं म्हणून की काय? भूत का़य आतल्या खोलीत येणार नाही? ते त्रिलोक संचारी असतात म्हणे. केव्हाही कुठेही जाऊ शकतात. की तू खोलीबाहेर पाटी लावणार 'परवानगीशिवाय आत येणे निषिद्ध. आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बाय आॅर्डर!'.

काकू: करा, करा थट्टा. पण खरं सांगायचं तर तेही एक कारण आहे. मुलांच्या खोलीजवळ देवांची खोली आहे. तेवढाच वचक वाढेल. भूतसुद्धा देवांना घाबरेलच, नाही का? काल मी कुठेतरी वाचलं की दारापाशी सुदर्शनचक्राचा नुसता फोटो जरी असला तरी राहू केतू सुद्धा घाबरतात म्हणून. मग ह्या भानामतीची, भूताची काय बिशाद?

काका: अगं काय हे? भूत, राहू, केतू, सुदर्शन चक्र? कलियुग संपून पुन्हा सत्ययुग सुरू झालं की काय?

काकू: अहो तसं नाही. 'सुदर्शन चक्र जेथे, विष्णुदूत तेथे' असे म्हणतात. आपल्याला दिसत नाहीत पण ते असतात. विष्णुदूतांपुढे यमदूतसुद्धा निष्प्रभ होतात म्हणे. कालच नाही का विष्णुपुराणाच्या एपिसोडमधे दाखविली अजामिळाची गोष्ट? काय अजागळ ते यमदूत अन् काय राजबिंडे ते विष्णुदूत! जीव ओवाळून टाकावासा वाटतो.

काका: अगं मी नाही पहात तसली सिरियल्स. तूही एखादं महापुराण वाचायला सुरू केलेले दिसते. की शेजारच्या देवळातला भागवत सप्ताह?

काकू: अहो! थोडं अध्यात्म कानावरून गेलं तर काय हरकत आहे म्हणते मी. चाळीशी उलटली की आध्यात्माकडे वळावे असे आई सांगायची. थोडा उशीरच झाला. पण बेटर लेट दॅन नेव्हर!

काका: कर बाई काय करायचं ते. मिळव पुण्य. मी आपला तसाच राहीन. पण मग नंतर तू स्वर्गात अन् मी नरकात अशी आपली ताटातूट होईल. मग म्हणत बसू:

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ

आणि देऊ हुंदके.

काकू: अहो असं काय म्हणता. बायकोचं पुण्य नवऱ्याच्याही कामी येतं म्हणे. जाॅइंट अकाउंट असतं. शिवाय, आपण काय इतके पापी आहोत का नरकात जायला? डास ढेकूण सोडून काहीतरी मारतो का आपण? तुमच्या नाकावरची तर माशीसुद्धा उडत नाही असे सासूबाईच म्हणायच्या! इतके आपण सहिष्णु!

काका: अगं पण माशी बसेलच का म्हणतो मी तिथे. नाकाच्या शेंड्यावर काय मध चिकटला असतो की काय?

काकू: अहो! मला एवढच म्हणायचं आहे की आपल्या पुण्याच्या अकाउंटमध्ये बरीच जमा असेल. आपण आपल्या मोतीवर किती प्रेम करतो. सतत घोटाळत असतो मोती आपल्या अवती भवती. प्राणिप्रेमाचे पण काही पुण्य गाठीशी पडेल. भोज राजाला सुद्धा प्राणिमात्रावरील त्याचे प्रेम नोंदनीय आहे असे वाटायचे.

एके दिवशी गाढ झोपेत स्वप्नात मग्न असतांना भोज राजाला अचानक जाग आली आणि सुंदर मंदिरात दिव्य प्रभा फाकलेली दिसली.

स्वप्नी गाढ निमग्न भोज असता ये जागृती त्याजला
पाहे सुंदर मंदिरात भरली दिव्यप्रभा सोज्ज्वला

काका: व्वा! पहिल्यांदाच तुला गाताना बघतो आहे.

काकू: अहो ही भेंड्यांच्या वहीतली कविता मला तोंडपाठ आहे. तर, भोज राजाने जरा निरखून पाहता त्याला व्याघ्राजिनावर बसलेला एक चैतन्यमयी तरुण काहीतरी लिहिताना आढळला. न राहवून भोज राजाने त्यास तो काय लिहीत आहे असे विचारले. तो उत्तरला की तो महान शूर लोकांची यादी करीत आहे. त्यावर भोज राजाची प्रतिक्रिया फार सुंदर आहे.

माझे नाव नसो तयात नसले, जे प्राणिमात्रावरी
सप्रेमा करिती तयातचि मला द्या स्थान कोठेतरी

प्राणिमात्रावर प्रेम करणाऱ्यांच्या यादीत तरी आपल्या नावाची नोंद व्हावी असे त्याला वाटले होते. अहो, प्राण्यांवर दया करणे, प्रेम करणे हे मोठे पुण्य आहे हेच ही कविता सांगते. म्हणून मला खात्री आहे की आपले मोतीवरचे प्रेम आपल्यासाठी पुण्यदायी आहे. शिवाय आपला दानधर्म, देवळात जाणे, चतुर्थ्या एकादश्या आहेतच की. काहीतरी गाठीशी पुण्य पडतच असेल. रिटायर झालो की चारधाम यात्रा पण करू म्हणते. थेंबे थेंबे तळे साचे. आतापर्यंत आपल्या पुण्याचा अंबाझरी नाही तरी शुक्रवार तलाव तरी साचलाच असेल. असं वाकड्यात काय शिरता? राह्यलं. नाही करू बदल. जैसे थे. तुमचं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

काका: तसं नाही गं. आधी तू चहा आण. मस्त फुरके मारीत चहा पिऊ, पेपर वाचू, मग बघू काय ते. होऊ दे तुझ्या मनासारखं. पुन्हा दम्पतीचं भांडण नको. बाबा काय म्हणाले होते? विसरलीस का एवढ्यात?

काकू: आणते चहा. खरच भांडण नको. पण मग काँप्युटर तरी आज हालवूच या.

ब्र: नारदा, काहीही कळलं नाही रे. ती पुराणं तरी समजतात. नाही समजले तर अनुवाद असतो. भावार्थ असतो. एकदा नाही दोनदा वाचता येते. हळू हळू वाचता येते. इथे तसं नाही. काही रिपीट होत नाही. एकदा शब्द गेला की गेला. आधीच संदर्भ कळत नाहीत. त्यात ते काकाकाकूंचे फाडफाड बोलणे. एकच गोष्ट कळली मला. आज तुला काकांनी भूत म्हटले तेवढे आले लक्षात. बाकी सारे तूच सांग बाबा समजावून.

ना: मला बरेच समजले. माझा त्रिलोकी संचार असल्यामुळे आणि काकाकाकूंना मी फार पूर्वीपासून ओळखत असल्यामुळे मला ते काय म्हणाले ते बरेचसे समजले. पण काका मला भूत म्हणाले हे तुला कसे समजले ते मात्र मला नाही समजले. ते सांग बघू आधी समजावून.

ब्र: मुनी, काकाच नाही का म्हणाले भूत त्रिलोकसंचारी असते म्हणून. तुला सोडून कोणी आहे का त्रिलोक संचारी? म्हणजे मग तू आणि भूत एकच नाही का?

ना: ब्रह्माजी, भाषेत असे सुतावरून स्वर्गाला जायचे नसते.

ब्र: मी कुठे रे स्वर्गाला गेलो? त्या नसलेल्या स्वर्गाला परत जायचे असते तर मग आलो असतो का वरातगंगा घेऊन आपण पृथ्वीवर? बाकी तुझं ते अर्नाळपुराण अगदी सत्याला धरून हं. वाचले मी त्याचे आठही स्कंध. वरातगंगा नावाचा स्कंध पण वाचला. जे घडले ते लिहिले त्या अर्नाळ ऋषींनी. कुठेही अतिशयोक्ती वा असत्यकथन नाही बघ. म्हणूनच मला वाटते की अर्नाळपुराणासारखीच अठराच्या अठरा महापुराणे, हरिपुत्र पुराण व रजनीपुराणही खरी असली पाहिजेत.

ना: वा! तुझी गाडी पुन्हा मूळपदावरच येते. अरे, सुताने स्वर्गाला जाणे म्हणजे छोट्याश्या कथनाचा संदर्भविरहित शब्दश: अर्थ घेऊन अवास्तव निष्कर्षाप्रत पोहोचणे. अरे, मनुपुत्र बरेचदा जे बोलतात ते त्यांच्या मनात नसते. जे मनात असते ते ते बोलत नाहीत. वाक्प्रचार, म्हणी, उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती, व्यंजना वगैरे अलंकार ते भाषेत वापरतात. नक्की काय म्हणायचे ते कळायला ऐकणाऱ्याला कष्ट पडतात. त्यात हे मूळचे वाड्यातले लोक. कधी सरळ बोलतील तर शपथ. जपून रे बाबा. भूत त्रिलोकसंचारी असते म्हणजे मी भूत आहे असे हे देवभक्त काकाकाकू कसे म्हणतील? त्यांना हा अर्थ अभिप्रेत नसावा. आता मला कळले आज तुला काहीच कां कळले नाही ते. म्हणशील तर आज तेच मी तुला समजावून सांगतो. आज कापुसकोंड्याच्या गोष्टीला सुट्टी. काय?

ब्र: हे मात्र छान. असे रोज केले तर मलाही हे लोक हळू हळू कळतील. मग मलाही कापुसकोंड्याच्या गोष्टीतला कापुस व कोंडा वेगळा करता येईल. हो सुरू.

ना: ब्रह्मा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काकू म्हणाल्या ती म्हणजे काँप्यूटर आता आपल्या खोलीत येणार. या खोलीलाच ते मुलांची खोली म्हणतात. मुले परदेशी गेल्यापासून ही खोली तशी रिकामीच असते. त्याचा फायदा घेऊनच तर आपण वरातगंगेत आल्यापासून येथे आपले बिऱ्हाड मांडले. बहुधा या खोलीत भानामती किंवा रावण येणार नाही असे काकूंना वाटत असावे. काकांची तशी फारशी इच्छा दिसली नाही. पण ब्रह्मा, शेवटी घरात बाईचीच इच्छा गरीयसी.

ब्र: झालेच. आपली तर खूपच कुचंबणा होणार. आपण जायचे कोठे? माझे तर कुठे देऊळही नाही जिथे जाऊन मूर्तीत रहावे. मला तर खूपच भीती वाटते.

ना: ब्रह्माजी, काय हे! आपल्याला स्थितप्रज्ञ असायला हवे ना? अरे काकू लहानपणापासूनच चंचल स्वभावाच्या आहेत. काहीतरी उलथापालथ करीत असतात. 'म'चा प्रभाव असावा बहुधा.

ब्र: 'म'चा प्रभाव? म्हणजे?

ना: अरे त्या लग्नापूर्वीच्या मोहरीर. महालातल्या त्या मास्तरांच्या वाड्यातली ती मुलगी. मास्तरांच्या वडिलांची, म्हणजे मोरेश्वर मार्तंड मोहरीरांची ती नात. महाल, मास्तर, मुलगी, मोरेश्वर, मार्तंड, मोहरीर. नुसता म, म, म चा प्रादुर्भाव. हा म फार चंचल असतो, मनस्वी असतो. 'म' मुळे हे मानवही मनस्वी व चंचल असतात. सतत बदल हवा असतो या 'म'कार लोकांना.

ब्र: काहीही काय सांगतोस? असे कुठे लिहिले आहे? असे नावावरून काय स्वभाव ठरतात?

ना: नारायण नारायण! ब्रह्मा, असे संस्कृत सुभाषित आहे. संस्कृतमधे आहे म्हणजे खरेच असले पाहिजे. नाही का?

ब्र: नारदा, मला तुझ्या ह्या 'नारायण नारायण' ची खूप भीती वाटते. जांभई दाबायची म्हणून जसे काही लोक खोकला किंवा शिंक आल्याचे नाटक करतात व तोंडावर हात ठेवून जांभई आतल्याआत जिरवतात, तसेच तूही खट्याळ हसू दडविण्यासाठी नारायण नारायण म्हणतो, हे मला कळले आहे. आताही तुझ्या मनात तसेच काहीतरी आहे. सांग बरे काय ते सुभाषित आहे ते.

ना: ऐका तर.

मनो मधुकरो मेघो मद्यपो मत्कुणो मरुत् ।
मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचलाः ।

ब्र: आता अर्थही सांगा. कमीतकमी संधीविग्रह करून द्या. तरच कळेल ही देवभाषा ब्रह्माला.

ना: ब्रह्मा! मन, मधुकर म्हणजे मधमाशी किंवा भ्रमर, मेघ म्हणजे ढग, मद्यपी म्हणजे दारुडा, मत्कुण म्हणजे ढेकूण, मरुत म्हणजे वारा, मा म्हणजे लक्ष्मी म्हणजे संपत्ती, मद म्हणजे मस्ती, मर्कट म्हणजे माकड व मत्स्य म्हणजे मासा हे मकाराने सुरु होणारे दहाही लोक चंचल असतात.

ब्र: वा! म्हणून ही महालातली मोहरीर मास्तरांची मुलेमुलीही चंचल का? छान. पण मुनी, मग मकाराने ज्यांचे नाव संपते त्यांचा स्वभाव कसा असतो याबद्दलही काही आहे का संस्कृतात?

ना: ब्रह्माजी, तसे मला माहीत नाही खरे. पण त्यांचा स्वभाव चंचलच्या उलट धीरगंभीर असावा असे मला वाटते. अशी एक व्यक्ती मला माहीत आहे.

ब्र: कोण?

ना: ब्रह्मा, तुम्हीच. तुमच्या नावात मकार शेवटी आहे. तुमचा स्वभाव स्थितप्रज्ञ हवा. पण तुमचे मन तर काकूंपेक्षाही कधीकधी अधिक चंचल दिसते. जसे आत्ता.

ब्र: पण नारदा, माझ्यापुरते माझे नाव 'मी' आहे म्हणून तसे असेल. 'मी', 'माझे', 'मला' हे मकार जेंव्हा मनात शिरतात तेंव्हा चंचलपणा येत असावा. मनुपुत्र मानव तर मकारीच आहे. म्हणून सर्वच मानव चंचल.

ना: उत्तम ब्रह्माजी. तुम्हीही आता भाषेशी खेळू लागला. मानव चंचल कां हे दाखवून दिले. तुम्ही शब्दांना गोंजारू लागला. ब्रह्माजी, शब्दब्रह्माशी खेळण्यात ह्या मनुपुत्रांचा बराच वेळ जातो. तसे करणे हाही साहित्यनिर्मितीचाच एक भाग आहे असे यांना वाटते. तू यांना दिलेली वर्णमाला ह्या मानवांनी खूप वापरली, नव नव शब्दोत्पत्ती केली, वापरातल्या शब्दांना नवे नवे अर्थ दिले. भाषा समृद्ध केली. यांच्या प्रगतीत भाषेचा मोठा सिंहाचा वाटा आहे. जंतुकवीच्या मानवचंद्र काव्यात भाषा हा मानव व मानवेतर प्राण्यातला मुख्य फरक आहे असे सुचविले आहे.

आवाजांचे विविध विश्व हे प्राणीजगत असे
अर्थ काय आवाजांना त्या, प्रश्न तुला हा असे
युगे उलटली, मांजर करते म्याँव म्याँव फक्त
नव नव उच्चारांची शेती तूच करी फक्त

आवाजांना अर्थ दिला तू, शब्दांना शक्ती
भाषेला तू जन्म दिला रे, तू केली क्रांती
बोळा निघता पाणी जैसे प्रवाहास मुक्त
विचारधारा तुझी वाहते जगात स्वच्छंद

अग्नीचा तू स्वामी झाला, तू प्राणी भिन्न
अन्न स्वतःचे स्वतः पिकवितो, दुजा नसे अन्य
भाषेचे तू शस्त्र मिळविले, विचार तू करतो
सृष्टीमध्ये एकमेव तू जो प्रगती करतो

चतुष्पाद-उत्क्रांत द्विपादी, पाया राऊळीचा
पंचमहाभूतज्ञान होतसे वास्तू प्रगतीचा
विचार, भाषाज्ञान जणू हो कळस देऊळीचा
पुजारी रे तू गाभाऱ्यातील ज्ञानदेवतेचा

ब्र: नारदा, मी पण 'उद्या लग्न आहे' वाचले. त्यात तर भाषेची आरती आहे. मला पाठ पण झाली आहे.

असे शास्त्र भाषा, असे शस्त्र भाषा
असे जात भाषा, असे गोत्र भाषा
असे प्रेम भाषा, असे वैर भाषा
असे संस्कृतीची गणाधीश भाषा

असे देव भाषा, असे धर्म भाषा
असे शक्ति भाषा, असे युक्ति भाषा
असे व्याघ्र भाषा, असे गाय भाषा
असे माय भाषा, अशी मायभाषा

जंतुकवीचा बालवेद कवितासंग्रह पण मी वाचला. बालवेदमध्ये पण वर्णमालेवर बऱ्याच कविता आहेत. पण नारदा, वर्णमाला मी मानवांना दिली असे तू कां म्हणतो ते मात्र मला कळले नाही. असे कुठे लिहिलेले मला दिसले नाही. असे काही मी केल्याचे मला आठवतही नाही.

ना: ब्रह्मा, असे लिहिलले आहे. भागवत पुराणात असे स्पष्ट सांगितले आहे. अ आ इ ई, 'क'वर्ग म्हणजे क ख ग घ ङ, 'प'वर्ग म्हणजे प फ ब भ म, तसेच य र ल व वगैरे, ऱ्हस्वदीर्घ, सारे सारे तूच निर्माण केलेस ब्रह्मा. नंतर तू तुझ्या प्रत्येक मुखातून एक असे एकूण चार वेद निर्माण केले, असाही उल्लेख आहे. आणि आता तूच वेद पुराणे वाचून त्यात काय आहे, त्यात तू कुठे आहे, ते शोधतो आहेस. कालचक्र काय काय खेळ पाहायला लावते ब्रह्मा! निर्मात्यालाच त्याची निर्मिती माहीत नाही इतकी त्याची निर्मिती विशाल!

ब्र: नारदा, प फ ब भ म म्हणजे 'प'वर्ग असे तू म्हणालास म्हणून मला पण वाचलेला एक श्लोक आठवला. म्हणू का? त्याचा अर्थ मला जेमतेम समजला, पण पूर्ण नाही. पूर्ण अर्थ समजावून सांगा मुनीबाबा.

ना: म्हण म्हण. आपल्याला देवभाषा हळूहळू समजायला लागली आहे असे वाटते. अरे असे वाचता वाचताच आपणही मराठी, संस्कृत समजायला लागू. थोडेफार आले की मग म्हातारीच्या त्या दोन भाषाविदुषी असलेल्या मुलींकडे काही दिवस जाऊ म्हणजे आणखी प्रगती होईल. भाषेत १५० अलंकार आहे असे त्या म्हणतात. साहित्यशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांच्या आश्रमात काही दिवस राहिलो तर आपणही भाषेत पारंगत होऊ. मग आपणही सालंकृत भाषेत लिहू लागू काहीतरी. म्हण की ती कविता 'पफबभम'ची.

ब्र: ऐक तर.

पिनाक फणि बालेन्दु भस्म मन्दाकिनी युता ।
पवर्ग रचिता मूर्तिः अपवर्ग प्रडास्तु नः ।

ना: ब्रह्माजी सुंदर. मीही हाच श्लोक थोड्या वेगळ्या रूपात वाचला आहे. हा श्लोक म्हणावे तर शिवस्तुती आहे. पण त्यात एक खोच पण आहे. कदाचित शिवाला टोमणा पण असेल. व्यंग पण असेल. व्यंजना पण असेल. भाषेतले हे अलंकार दिसले की खूप छान वाटतं ब्रह्मा.

ब्रह्माजी, पिनाक म्हणजे भाला, त्रिशूळ. फणि म्हणजे नागाची फणी. बालेंदु म्हणजे बाल इंदु, म्हणजे बाल चंद्र, म्हणजे चंद्रकोर. भस्म म्हणजे राख. मंदाकिनी म्हणजे गंगा नदी. प फ ब भ म पासून सुरू होणाऱ्या ह्या पाचही गोष्टी शंकर धारण करतो. हाती त्रिशूळ, गळ्यात नाग, कपाळी चंद्र,  शरीरभर भस्माचा लेप, डोक्यावर गंगा धारण केलेले शंकर 'प' वर्गातील पाचही व्यंजनांनी सजलेले आहेत असे कवी म्हणतो. अशा 'प'वर्गाने सजलेल्या देवाने आम्हाला अपवर्गाचा म्हणजेच स्वर्गाचा रस्ता दाखवावा अशी प्रार्थना कवीने केली आहे. अपवर्ग म्हणजे स्वर्ग, मोक्ष, मुक्ती. पवर्गयुक्त देव अपवर्ग दाखवतील हा उपहास पण असू शकतो. ह्या श्लोकात शिवस्तुती, शिवोपहास किंवा शब्दांचा सुंदर खेळ करून भाषास्तुती पण असू शकते. कवितेचा अर्थ ऐकणाऱ्याने लावायचा असतो. अनेक अर्थ जेथे, तीच कविता. 'जे न देखे रवी, ते देखे कवी' असे म्हणतात. त्याहीपुढे जाऊन असे म्हणता येईल 'जो अर्थ न कवीच्या मनी, तो उमटतो जनांच्या कानी'. पुराणात, संस्कृत साहित्यात असे काव्य पदोपदी विखुरलेले दिसते.

ब्र: वा! पण नारदा, हा शिवाचा पोशाख असा आगळा वेगळा कां रे?

ना: ब्रह्माजी, ती एक मोठी गोष्टच आहे कापुसकोंड्याची. नंतर कधी सांगीन. समुद्रमंथनाची ती कथा खूप मजेशीर आहे. पण आज नको. नाहीतर तूच पुन्हा म्हणशील 'एक ना धड, भाराभर चिंध्या'.

ब्र: बरे बाबा! मर्जी तुझी. पण मुनी, मला कां हो कविता करता येत नाही? वाट्टेल तो उठल्या सुटल्या कविता करतो, माझ्यावर इतक्या कविता, पण मला एखादी अर्थपूर्ण कविता कां सुचत नाही?

ना: अरे, असे काय म्हणतोस? त्या दिवशीचा तुझा श्लोक काही अगदीच टाकाऊ नव्हता. सुरुवात अशीच ट ला ट, री ला री ने होते.

आधी, आता आणि नंतर
past, present and future
भूत, वर्तमान आणि भविष्य
मी पण मोठ्ठा कवी झालो, इश्श!

पुढे पुढे मग कविता जन्म घेते. जंतुकवीची 'इडकीत जाऊ, खिडकीत जाऊ' कविता वाच कधी. ब्रह्मा, प्रत्येकानी कविता करावी. भाषेच्या लवचिकपणाशी छान ओळख होते त्याने. लोकांना आवडो वा न आवडो. कविता करणाऱ्याचा, लिखाण करणाऱ्याचा नेहमी फायदाच असतो.

कुणी निंदा, कुणी वंदा
अमुचा स्वहिताचा धंदा

अशा वृत्तीने कविता लिहावी, लेख लिहावे. आणि ब्रह्मा, तुलाच माहित नाही, पण तू सर्वात थोर कवी आहे असे म्हणतात. मला हे माहीत नव्हते. पण माझ्या वाचनात तसे आले आहे. मी कविपुत्र आहे.

ब्र: थट्टा काय करतोस रे!

ना: ब्रह्माजी, थट्टा नाही. ऐका.

अपारे काव्यसंसारे कविरेकः प्रजापतिः ।
यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते ।

कवितेच्या अथांग विश्वात, प्रजापति, म्हणजे ब्रह्माच एक असा कवि आहे जो पूर्ण विश्व, म्हणजे त्याचा अर्थ, त्याला वाटेल तेव्हा आणि वाटेल तसा बदलू शकतो.

ब्रह्मा, हे विश्वच तुझी कविता. मग ह्या छोट्यामोठ्या कविमत्कुणांशी, स्वतःला कवी म्हणणाऱ्या व म्हणवून घेणाऱ्यां ढेकणांशी तुझी काय रे स्पर्धा? तुझी थोरवी निर्विवाद आहे. तुझी काव्यनिर्मिती वादातीत आहे.

ब्र: बरे वाटले ऐकून. खोटी असली तरी स्तुती प्रथमश्रवणी मधुरच वाटते. असो. पण नारदा, माझी मूळ विवंचना काकाकाकूंचे या खोलीवरचे आक्रमण आहे. तसे झाले तर आपण विस्थापित होऊ रे. ती खरी भीती काही या खोट्या स्तुतीने शमत नाही.

ना: ब्रह्मदेवा! तुम्ही उगाच काळजी करता. मला तर ही चालून येणारी सुवर्णसंधी वाटते. जर काँप्यूटर खरेच आपल्या खोलीत आले तर आपली चंगळच आहे. काका फारसे काँप्यूटरवर बसत नाहीत. काकूंना वेळ नसतो. मुलांनी घेतला म्हणून काँप्यूटर घरी आहे एवढेच. खोलीत त्यांची पुस्तके पण ठेवणार म्हणतात. तेही आपल्याला फावेल. भागवतपुराण, विष्णुपुराण, हरिविजय, रामविजय, विष्णुसहस्रनाम, असे अनेक ग्रंथ यांच्याकडे आहेत. तेही वाचता येतील. ब्रह्मदेवा, आता मला वाटते की १८ महापुराणे, तितकीच उपपुराणे, वेद, उपनिषदे व इतर ग्रंथ आपल्याला वाचता येतील.  आपण कोण हे आपल्याला कळेल. सगळं सगळं वाचून काढू.

ब्र: पण वेळ पुरेल का रे? इतकं वाचायचं म्हणजे?

ना: ब्रह्मा, एकट्याला कठिण वाटले तरी दोघांना नाही. आणि तुला तर चार तोंडे. तू जर वर्णमाला निर्मून चार तोंडांनी चार वेद निर्माण करू शकतो तर तुझी चार व माझे एक अशी पाच तोंडे व १० डोळे मिळून काय अशक्य आहे? अरे आपण दोघे आहोत हे तू विसरतोस. तू नेहमी संकटाच्या चाहुलीने हबकून जातोस, नाहीतर स्तुतीने हरखून जातो. शांत हो. दोघे मिळून आपण काय करू शकत नाही?

एकचित्ते द्वयोरेव किमसाध्यं भवेदिति

दोन व्यक्ती जेंव्हा एकसारखाच विचार करतात तेव्हा अशक्य असे काय असू शकते?

ब्र: खरे आहे तुझे नारदा. सगळं सगळं वाचून काढू. 'आपण कोण?' ह्या प्रश्नाचं उत्तर केव्हा मिळेल असं झालं आहे मला. आपली आपल्याशीच ओळख झाली की मीही 'मज्जीवनमणिमाला' लिहीन म्हणतो.

ना: तसं नसतं ब्रह्मा. तू स्वत:चं आत्मचरित्र लिहू शकतो. पण त्याचं नाव असं उधार घेऊन चालणार नाही. मज्जीवनमणिमाला हे मास्तरांच्या आत्मचरित्राचं त्यांनी ठेवलेलं नाव. तुला तुझ्या आत्मचरित्राचं दुसरं काही नाव ठेवावं लागेल. जसं की चतुर्मुख. एक कल्पना म्हणून सुचवलं. माझ्या आत्मचरित्राचं नाव मी 'नारायण नारायण' ठेवू शकतो.

ब्र: 'शेंडी' शीर्षक पण ठेवले तरी चालेल नारदा. अरे पण काकूच तर म्हणाल्या की विचार उसने घेतले, भाषांतर केले तरी साहित्यसेवा होते म्हणून. खरेच असे चालते का?

ना: नारदा, कविता, लिखाण स्वत:साठी करतात. इतर लोक ते वाचतात. वाचोत. आवडले तरी ठीक, नावडले तरी ठीक. आणि भाषांतर तर मोठमोठे कवी करतात. इतर भाषातील साहित्य आपल्या भाषेत आणणे, किंवा दुसऱ्याची एखादी कृती घेऊन, तिलाच थोडी कलाटणी देऊन नव्याने मांडणे यात फारसे वावगे मोठे लोक पण मानत नाहीत.

ब्रह्मा, काका बरेचदा आंघोळ करून आल्यावर कुडकुडत कां होईना पण 'अनुदिनि अनुतापे' म्हणतात. एक दिवस मला तो श्लोक व तसेच आणखी ७ श्लोक इंटरनेटवर सापडले. आपल्या रामाचा तो धावा आहे म्हणतात. त्या मकाराने नाव सुरु होणाऱ्या व्यक्ति जशा चंचल मनाच्या असतात तसेच चंचल मन असणारा हा कवी रामाचा धावा करतो व म्हणतो 'चपळपण मनाचे नावरे आवरीता ।  तुजविण शिण होतो, धाव रे धाव आता ।'. ब्रह्मा, तू म्हणालास तसा मानव पण मकारी, त्याचे मन पण मकारी आहे. म्हणूनच बहुधा चंचल असावे. तुझ्यासारखेच. तू पण म्हणत जा ही कविता. करुणाष्टक म्हणतात याला. चालही खूप सुंदर. अनुष्टुभ छंद. सांगायची गोष्ट अशी की करुणाष्टक देवभाषेतही आहे, काकाकाकूंच्या भाषेतही आहे. मराठीत:

अनुदिनि अनुतापे तापलो रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुज विण शिण होतो, धाव रे धाव आता!

तर संस्कृतमध्ये:

अनुदिनमनुतापेनास्म्यहं राम तप्तः ।
परमकरुण मोहं छिन्धि मायासमेतम् ।
इदमतिचपलं मे मानसं दुर्निवारं ।
भवति च बहु खेदस्त्वां विना धाव शीघ्रम् ।

बहुधा हे मूळ मराठीतले श्लोक आहेत व भाषांतर होऊन संस्कृतात गेले. चाल एकच, छंद एकच, भाव एकच. आत्मा तोच, फक्त शरीर बदलते, तसेच. नाही का? नारायण नारायण!

ब्र: अरे हासतोस काय? कवितेचा भाव हाच कवितेचा आत्मा. तो अमरच नाही का?

ना: जाऊ दे ब्रह्मा. आत्मा नसला तरी आत्म्याची कल्पना मात्र अमर आहे. कल्पना जन्माला आली की तिला मृत्यू नाही. ती अजन्मा नसली तरी अमृत्यु मात्र आहेच आहे. आपल्यासारखीच!

ब्रह्मा, सर्व चांगली वाईट निर्मिती तुझीच आहे. अज्ञान सुद्धा तूच निर्माण केलं आहे असे म्हणतात.

स्वायत्तमेकान्तहितं विधात्रा ।
विनिर्मितं छादनमज्ञतायाः ।
विषेशतः सर्वविदां समाजे ।
विभूषणं मौनमपण्डितानाम् ।

अज्ञानाचं कवच सुद्धा लोकांच्या भल्यासाठी तूच निर्माण करतोस. पंडित, ज्ञानी लोक जे सांगतात त्यास अज्ञानी माणूस म्हणूनच मूक संमती देतोच देतो. गुरुजींनी सांगितलेल्या युगद्वारप्रहरी यज्ञाला काका तसे तयार नव्हते. पण त्यांनी शेवटी संमती दिलीच ना?

ब्रह्माजी, या श्लोकाचेही मराठी भाषांतर आहेच.

विनिर्मिले झाकण अज्ञतेचे ।
स्वाधीन जे पद्मभवे फुकाचे ।
मूर्खास जे मौनचि फार साजे ।
सभेस त्यांच्या बहु जाणते जे ।

ब्रह्माजी, अशी उदाहरणे अनेक आहेत. गीता, रामायण व इतर प्राचीन संस्कृत साहित्य तर सर्व भाषात अनुवादित झाले आहे. म्हणून ते सर्वदूर पोहोचलेही. साहित्यकारांनी जरी ते स्वांतःसुखाय लिहिले असले तरी त्याचा प्रकाश सर्वदूर पोहोचला. ब्रह्मा, काकू दारासमोर दिवा लावतात, उंबरठ्यावर प्रकाश पडावा म्हणून. पण त्याचा प्रकाश अंगणात व रस्त्यावरही पडतोच की. स्वानंदासाठी लिहिलेली कविताही तशीच असते. ती इतरांनाही आनंद देऊन जाते. कविता तशी परोपकारी स्वभावाची असते ब्रह्मा.

आत्मनः परितोषाय कवेः काव्यं तथापि तत् ।
स्वामिनो देहलीदीपसमं अन्योपकारकम् ।

पण ब्रह्मा! तुला ह्यात काय रे रस? तू कां कविता लिहावी? तू कां साहित्यिक व्हावे? हे सर्व तुझेच तर आहे. तूच तर वेद लिहिलेस. तूच तर पुराणे लिहविलीस. सर्व तू तू तू केलेस, करतोस, करशील. नारायण नारायण!

ब्र: असू दे रे. मलाच 'नारायण नारायण' म्हणायची वेळ आणतोस तू. नारदा, मला आणखी एक गोष्ट कळत नाही रे. ते आपल्या खोलीच्या बाहेर सुदर्शन चक्र लावतील व राहू केतू सुद्धा त्याला घाबरतात म्हणजे रे काय? मला तर काहीच संदर्भ कळला नाही.

ना: ब्रह्मा, तीही एक मोठी गोष्ट आहे. कापुसकोंड्याची सुंदर गोष्ट. समुद्रमंथनाचीच पुढची गोष्ट. ती पुढे कधी सांगीन.

ब्र: समुद्र घुसळण्याची गोष्ट? काकू दही घुसळतात, त्यातून लोणी निघते तसेच? त्याची रे काय गोष्ट? त्यात काय तू रवीचे वर्णन करशील? की दह्याचे? की लोण्याच्या गोळ्याचे?

ना: मंथन म्हणजे घुसळण हे खरे. समुद्रमंथनातही रवी वापरावी लागली होती हेही खरे. तिला नावही आहे, मेरु. पण हा प्रकार फार प्राचीन, फार महान आहे रे. यातून लोण्याचेही अनेक प्रकार निघाले. ती गोष्ट आज नको. पुढे कधीतरी.

ब्र: बरे मुनी. मग ते अजामिळ, विष्णुदूत, यमदूत हे कोण ते तरी सांग. तेही माझ्या डोक्यावरून गेले. आज काकू काय बोलत होत्या हे अजिबात कळले नाही बघ. असे आजवर कधी झाले नाही. त्यांचे बोलणे कळायचे मला.

ना: ब्रह्मा, अजामिळाची गोष्ट पण मोठी आहे रे. माझ्या नारायण नारायण म्हणण्यामागे काय कारण आहे तेही तुला अजामिळाच्या गोष्टीद्वारे कळेल. तूही आज एकदोनदा नारायण नावाचा उच्चार केलास हे योग्यच झाले. आता आपले काहीही वाईट होऊ शकत नाही. पण ही अजामिळाची कापुसकोंड्याची गोष्ट पुन्हा कधी. आज नको आग्रह करूस.

ब्र: अरे मग आज काय? आज फक्त गोष्टींची अनुक्रमणिकाच तयार करायची काय? काकूंच्या ५ मिनिटांच्या बोलण्यात इतक्या गोष्टींचे संदर्भ? त्या सगळ्या एकत्र केल्या तरी एक पुराण, काकूपुराण, लिहिता येईल. अरे काहीतरी तर सांग. बरे ते डास मारणे, ढेकूण मारणे, पाप वगैरे काय होते? ढेकूण म्हणजे मत्कुण हे आता मला कळले आहे. ते काकूंसारखेच चंचल असते हेही कळले. डासाची ढेकणाचीच गोष्ट सांग. आजची कापुसकोंड्याची गोष्ट.

ना: हं. ती आज समजून घेऊ. पुराणात ह्या गोष्टीचा उल्लेख आहे.

ब्र: सांगा मुनी. ढेकणाची पौराणिक गोष्ट. डासांची पण गोष्टं. उवांची पण गोष्टं. नारदपुराणातली की काय?

ना: ब्रह्मा, अनेक पुराणात आहे ही गोष्टं. मी भागवतपुराणात व नारदपुराणात वाचली आहे. दोन दोन पुराणात आहे, म्हणजे खरीच असली पाहिजे. नारायण नारायण!

ब्र: अरे, जे सांगायचे ते न हासता सांग.

ना: ब्रह्मा, तू बरेचदा काकाकाकूंना स्वतःच्याच कपाळावर, गालालर, किंवा हातावर जोराने चापटी मारताना बघितले असशील. चापटी मारल्यावर ते हळूच हात काढून बघतात की तिथे काही आहे का. काही चिकटलेले दिसले तर बोटाच्या टिचकीने ते उडवतात. 'मेला एकदाचा' म्हणून निश्वास सोडतात व खुष होतात. ब्रह्मा, त्यांनी डास मारलेला असतो. काही क्षणापूर्वीच तो उडणारा डास, तूच निर्मिलेला जीव, त्यांच्या हातावर बसून, नांगी टोचून, त्यांचे रक्त शोषत असतो. ह्या डास मारण्याच्या क्रियेचा उल्लेख काकूंनी केला होता. अशा डासहत्येत पाप नसते असा त्यांचा समज आहे.

ब्र: आणि ढेकूण?

ना: ब्रह्माजी, हाही डासासारखाच मानवरक्तशोषक, पण न उडणारा जीव. मास्तरांच्या वाड्यात लाकडी खाटांच्या फटीत हा लपलेला असायचा. खाटेवर जो झोपेल त्याला हा हळूच फटीतून बाहेर येऊन, चावून, रक्त शोषून, मानवरक्ताने टर्र फुगायचा. पुन्हा चपळतेने फटीत जाऊन लपायचा. हाच तो श्लोकातला 'म'कार मत्कुण. याला दिसताच हाताच्या किंवा पायाच्या आंगठ्याने चिरडून टाकायचे असते. याची अशी हत्या, मत्कुणमर्दन, केले की मग एक विशिष्ट वास येतो. अजूनही तो वास माझ्या नाकात भिनलेला आहे. डास किंवा ढेकूण यांच्या हत्येचे पातक लागत नाही आणि म्हणून काकाकाकूंना पाप लागले नाही असे काकू म्हणत होत्या. माशी तर डास व ढेकणापेक्षाही चपळ असते. असणारच! तीही 'म'कार आहे. तिला असे चापट मारून वा चिरडून मारणे शक्य नाही. ती त्या दोघांसारखी रक्तपिपासू पण नसते. म्हणून काका तिला ती नाकावर बसली तरी उडवत सुद्धा नाहीत. बसली तर बसो बिचारी घटकाभर, अशी संतवृत्ती त्यांची आहे. ह्या संतवृत्तीची काकू टिंगल करीत होत्या. आले का लक्षात?

ब्र: बापरे, एका एका शब्दात भारूड सामावलेले असते. कसे कळावे अत्रिलोकसंचारी देवांना पृथ्वीवास्यांचे हे संदर्भ? त्याकरिता तुझ्यासारखाच त्रिलोकी झेंडा लावणारा पुत्र हवा. तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... कितीही केलं तरी कमीच बा! पण नारदा, हे पाप म्हणजे काय रे?

ना: ब्रह्मा, पाप म्हणजे अपुण्य. हे मनुपुत्र जे काही करतात त्याचे त्यांना पाॅइंट्स मिळतात. चांगले काम केले तर काही पाॅइंटस्, म्हणजे काही गुण यांच्या खात्यात जमा होतात. वाईट काम केले तर गुण कटतात. जन्मभर केलेल्या पापपुण्याचा प्रत्येक मानवाचा हिशोब तुझा चित्रगुप्त अगदी चोख ठेवतो. माणसाचे आयुष्य संपले की पापपुण्याचा हिशोब करून जमेला पुण्य असेल तर विष्णुदूत पुण्यकऱ्याला स्वर्गात घेऊन जातात. स्वर्गात आपण त्यांचे कसे आदरातिथ्य करतो, सर्व सुखे कशी त्यांच्या पायाशी लोटांगण घालतात ते तुला मी कशाला सांगायला हवे? स्वर्ग म्हणजे अपवर्ग म्हणजे तुझेच घर. तुझ्या घरीच ते पुण्यात्मे युगानुयुगे येत असतात. तुला सर्व माहीतच आहे. नारायण नारायण!

ब्र: पुन्हा तेच हसू! पण नारदा, जे पापी आहेत त्यांचे काय? त्यांना पृथ्वीवरच ठेवतात काय?

ना: नाही ब्रह्मा. पापांचे गुण पुण्याच्या गुणांपेक्षा अधिक असतील तर ती व्यक्ति एकूण पापी समजण्यात येते. मग मृत्यूनंतर तिला यमदूत, म्हणजे आपल्या यमराजाचे चाकर, नरकात घेऊन जातात. विष्णुदूत पुण्यकऱ्याला स्वर्गात नेतात, तसेच यमदूत पाप्याला नरकात घेऊन जातात. मृत्यूनंतर आत्म्यांना कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक ह्या दोनपैकी एका काॅलनीत जावेच लागते. पृथ्वीवर राहता येत नाही. मृत्यूनंतर इथे त्यांचा फक्त फोटो आणि आठवणीच राहू शकतात.

ब्र: मग पाप्यांचे नरकात कसे स्वागत होते?

ना: ब्रह्मा, तुला आठवत असेल तुला अधर्म व मृषा नावाचे पुत्रकन्या होते. त्यांचाच खापर खापर पणतू मृत्यू. मृत्यूचा मुलगा नरक व मुलगी यातना हेही सांगितले मी तुला. पापात्म्यांची सर्व जबाबदारी नरकावर असते. तिथेच त्यांना त्यांच्या पापाच्या वर्गवारी नुसार योग्य त्या यातना देण्यात येतात.

ब्रह्माजी, हे सर्व सविस्तर वर्णन भागवत पुराणात व नारद पुराणातही आहे. अघोषित असे यात काहीच नाही. सगळं above the board अाहे. तक्रारीचा काही वाव नसतो.

थोडक्यात सांगायचे तर ब्रह्माजी, पुण्यात्म्यांना विष्णुदूत स्वर्गात आणून तुझ्या हवाली करतात, पापात्म्यांना यमदूत नरकात आणून यातनेच्या हवाली करतात. दोन्ही ठिकाणी खातिरदारी करणाऱ्या यजमानांचा वंश एकच. सगळे ब्रह्मवंशी. पिढीत फक्त बदल एवढेच! नारायण नारायण!

ब्र: नारदा, देतोस का नरकाबद्दल सविस्तर माहिती? कसे वागतात माझे नरक व यातना पाप्यांशी हे मला जाणून घ््यायचे आहे. की तेही नंतर कधीतरी सांगणार? आज तू नुसती तोंडाला पाने पुसतो आहेस बघ! हे तरी आज सांग.

ना: ब्रह्माजी, ही पण कापुसकोंड्याची गोष्ट फार मोठी आहे. बराचसा गोष्टीचा भाग पितापुत्रांनी संवाद करावा असा नाही. अनेक पापांचा व त्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा ह्या काकाकाकूंच्या सात्विक घरी उच्चारही नको. ते सर्व तुला काँप्युटरवरच वाचावे लागेल. भागवतपुराणाचा हा अंश आवडीने वाचावा असा नाही. तरी थोडीफार मला जी माहिती आहे ती देतो बापुडा!

ब्र: छान! तुला जे प्रशस्त वाटेल ते सांग. बाकी मला माझा मानसपुत्र गूगल सांगेल. तो आजकाल माझा आवडता पुत्र आहे.

ना: आणि मी? मी आता नावडता झालो की काय? तसे असेल तर मीही तपस्या करून अढळपद मागीन.

ब्र: तसे नाही रे. तू जवळ नसतांना तो. तू नंबर वन, गूगल नंबर टू! दोघेही मला ज्ञानदान करत असतात. प्रायव्हेट ट्यूशन!

ना: मग ठीक!

ब्रह्मा, स्वर्ग एक असला तरी नरक एक नाही. ते सहाजिकच आहे म्हणा! स्वर्गापेक्षा नरकात पोहोचणाऱ्यांची संख्या कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे नरक अतिविशाल आणि बहुविध आहे.

देवा, एकूण २८ वेगवेगळे नरक आहेत. त्यांची नावेही भागवतपुराणात आहेत. नारदपुराणात पण तीच नावे आहेत.

ब्र: अठ्ठावीस? सांग बरे नावे. एखादे तरी कानावरून गेले आहे का बघू.

ना: ब्रह्मा, भागवत पुराणात २८ नरकांची नावे व त्यात ज्यांना ब्रह्मपुत्र यमराजांचे दूत घेऊन जातात त्या पापी लोकांची पापे यांचे सविस्तर वर्णन आहे. नरकांची नावे तामिस्र, अंधतामिस्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सूकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संन्दंश, तप्तसूर्मी, वज्रकंटकशाल्मली, वैतरणी, पूयोद, प्राणरोध, विशसन, लालाभक्ष, सारमेयादन, अवीची, अयःपान, क्षारकर्दम, रक्षोगणभोजन, शूलप्रोत, दन्दशूक, अवटनिरोधन, पर्यावर्तन अशी आहेत.

ब्र: पण नारदमुनी, ही तर सत्तावीसच झाली. अठ्ठावीसावे नरक मुंबई की काय? मुंबई म्हणजे अगदी नरक असे जंतुकवीच्या बालवेदातील नरकचतुर्दशी कवितेत वाचल्याचे आठवते म्हणून अंदाज केला.

ना: नाही ब्रह्मा. तसे तर मग भारतवर्षात पुष्कळच नरक असतील. ते पृथ्वीवरचे नरक वेगळे. ते सारे मनुष्यनिर्मित नरक. ब्रह्मदेवनिर्मित नाहीत. तू निर्माण केलेल्या अठ्ठावीसाव्या नरकाचे नाव सूचीमुख. माझ्या यादीतून ते चुकून सुटलेले दिसते. बाकी तू मात्र गणितात आता बराच तीक्ष्णबुद्धी झालास हं. सतत मोजत असतोस. हाच सतत अभ्यासाचा फायदा ब्रह्मा. मास्तरांच्या शाळेत तू अंकगणित शिकलास त्याचा हा फायदा.

ब्र: नारदा, वेळ असेल तर काय पाप केले की कुठल्या नरकात जावे लागते व तेथे काय काय यातना देतात ही माहिती दे.

ना: ब्रह्माजी, सांगतो, पण मन घट्ट करून ऐकावे लागेल. अजिबात अतिशयोक्ती न करता, भागवत पुराणात शुकाने परिक्षिताला जे कथन केले ते थोडेफार सौम्य करून सांगतो. त्या नरकाच्या विचाराने सुद्धा मला घाम फुटतो आहे. बघ जमीनीवर घर्मबिंदू पडलेले आहेत. आपण अदृश्य असलो तरी आपला घाम दृश्य आहे ब्रह्मा. तो दिसला तर पुन्हा भानामती भानामती होईल. त्यापेक्षा आपण झाडाखाली बसून हे विवेचन करू. घाम जमीनीत जिरून जाईल व कोणाला कळणारही नाही. त्या सीताफळाच्या झाडाखाली बसू. खूप सीताफळं पण लागली आहेत. चाखू एक दोन. सकाळीच काकू कौतुकाने बघत होत्या. एक दोन दिवसात तोडतील पण. मग सीताफळाचे कालवण! आधीपण तू चव पाहिली आहेस बरें.

ब्र: नारदा, चल जाऊ. पण फळ चाखणे राहू दे. फळे कमी झाली तरीही मग भानामतीचा संशय येईल.

ना: नाही ब्रह्माजी. फोतर आणि बिया तिथेच जमीनीवर टाकल्या की झाले. पक्षांवर आळ येईल. नाहीतरी पक्षी बरीच नासधूस करतातच. त्यामुळे एकदोन फळे आपण घेतलेली चालतील. नैवेद्य समज वाटल्यास. नाहीतरी आपण भक्तिभावाने दिलेला नैवेद्य हातही न लावता प्रसाद म्हणून परत करतोच की रोज. ब्रह्मा, ही सारी सृष्टी तुझीच रे!

ब्र: बरे बाबा. तुझ्यासारखा त्रिलोकज्ञानी, त्रिकालज्ञानी सोबत आहे म्हणून माझे बरे चालते हो. नाहीतर ह्या पृथ्वीवर काही माझी धडगत नव्हती रे बाबा.

ना: ब्रह्माजी, सुरू करू या. तुम्ही इथे वरच्या फांदीवर बसा. मी जरा खालच्या फांदीवर बसतो. दोन पक्षांसारखे.

ब्र: बरे मुनी. सुरू करा तुमची नरकलोकाची गोष्ट. नारायण नारायण!

ना: ब्रह्मा, दुसऱ्यांचे पैसे व बायकापोरांचे जो अपहरण करतो त्याला यमदूत तामिस्र नावाच्या नरकात लोटतात. अत्यंत अंधःकारपूर्ण ह्या नरकात त्याचे अन्नपाणी बंद करून छडीने मारणे, भीती दाखवणे वगैरे प्रकार करतात. सहन न होऊन तो बेशुद्ध होतो.

वरीलप्रमाणेच जो फसवणूक करतो व अपह्रत स्त्रीबरोबर दुर्व्यवहारही करतो त्याची रवानगी अंधतामिस्र नरकात होते. येथे देण्यात येणाऱ्या यातना इतक्या की त्याची स्थिती मूळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे होते व त्याची शुद्ध हरपते.

ब्र: नारदा, थोडे पाणी हवे रे. तोंडाला खरेच कोरड पडते आहे.

ना: जरूर ब्रह्मा. तू खरोखरच कोमल ह्रदयाचा आहेस बरे! हे घे. शांत हो. अरे पाप करणाऱ्यांना काही लाज नाही, आणि तू मात्र हळवा होतोस. तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... दयासागरच बा!

ब्रह्मा! पृथ्वीवर बरेच लोक असे असतात ज्यांचे स्वतःवरच प्रेम असते. बायको, धन हे सर्व माझेच आहे अशी त्यांची धारणा असते. असे लोक स्वकेन्द्रित असतात व स्वतःच्या व कुटुंबाच्या पालनपोषणातच मग्न असतात. स्वार्थासाठी ते इतर प्राण्यांचा द्वेष करतात. मृत्यूनंतर असे लोक आपण होऊनच रौरव नावाच्या नरकात जाऊन पडतात. तेथे ज्या जीवप्राण्यांना त्याने स्वतःच्या आयुष्यात त्रास दिला ते रुरु नावाच्या प्राण्याचे रूप घेऊन त्याला अगदी तसाच त्रास देतात. रुरु म्हणजे सापापेक्षाही क्रूर असा प्राणी असतो जो फक्त रौरव नरकातच सापडतो. 'करावे तसे भरावे' असे म्हणतात. तशीच काहीशी स्थिती अशा पाप्यांची होते.

महारौरव नरक याहीपेक्षा भयंकर. स्वतःच्या कुटुंबाकरिताही नाही, जो फक्त स्वतःकरिताच जगतो व इतर प्राण्यांचा द्वेष करतो व त्यांना त्रास देतो तो महाभाग महारौरव नरकात पडतो. इथे तर रुरु प्राणी त्या पाप्याला फाडूनच खातात.

ब्रह्मा, जे लोक मांसाहार करतात त्यांना तर राक्षसांपेक्षाही क्रूर समजण्यात येते. मृत्यूनंतर ते कुंभीपाक नरकात जातात. तेथे त्यांनाच उकळत्या तेलात शिजवितात म्हणे. म्हणून तर ह्या नरकाचे नाव कुंभीपाक. मोठमोठ्या कुंभात येथे असा मांसाहारी स्वंयंपाक सुरू असतो.

जे लोक मातापिता, ब्राह्मण व तू निर्मिलेल्या वेदांचा विरोध करतात त्या पापी लोकांना यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात. हे फार मोठे नरकस्थान आहे. तिथले पटांगण तांब्याचे आहे. हे पटांगण वरून सूर्य व खालून जाळामुळे खूपच तापलेले असते. अशा दाहक पटांगणावर हा पापात्मा हजारो वर्षे पोळल्या जातो व तडफडत राहतो.

ब्र: नारदा, थोडा ब्रेक घ््यायचा का रे. हे सर्व पचायला फारच जड आहे.

ना: ठीक ब्रह्मा. सांगणाऱ्याला सुद्धा हे काही सोपे नाही. तुझ्या डोळ्याला डोळा भिडवून सांगणे सुद्धा मला जड जात आहे. एक एक सीताफळ खाऊ या. नाहीतर भेंड्या खेळू. आता आपल्याला पुष्कळ कविता येतात. वाड्यातली भेंड्यांची वही आणली असती तर बरे झाले असते.

ब्र: नको. भेंड्या नको. तूच जिंकशील. मलाही थोड्या कविता वाचू दे. मग कधी खेळू. आता सध्या सीताफळ खाऊ या.

ना: ब्रह्मा, सीताफळ खरेच गोड होते. आता पुन्हा नरकात जाऊ. जाऊ नाही, पण त्यांची माहिती घेऊ.

जो मनुपुत्र जेवण्याआधी पंचयज्ञ करून आधी दुसऱ्या कोणाला अन्नदान करीत नाही व फक्त स्वत:च खातो त्यात आणि कावळ्यात काही फरक नाही असे म्हणतात. मृत्यूनंतर अशा पाप्याची रवानगी थेट कृमिभोजन नावाच्या नरकात होते. अठ्ठावीस नरकांमध्ये सुद्धा हे अत्यंत खालच्या दर्जाचे नरक मानण्यात येते. या नरकात एक लक्ष योजने लांब एक अगणित किड़्यांनी भरलेले विशाल टाके आहे. या कुंडात या पाप्यालाही कीडा बनून राहावे लागते. तेथे तो कीडे खातो व कीडे त्याला चावतात. हेच त्याच्या पापांचे फळ.

ब्र: नारदा एक योजन म्हणजे किती रे अंतर? ग्रह ताऱ्यातील अंतरही योजनांमधे दिलेले मी वाचतो. पण एक योजन म्हणजे किती? इथून आपल्या खोलीपर्यंत, की रस्त्यापर्यंत?

ना: ब्रह्मदेवा, नक्की माहीत नाही. पण विश्वकर्मा सांगत होता की काकूंच्या घरापासून मास्तरांच्या वाड्यापर्यंतचे अंतर अंदाजे तीन योजने आहे म्हणून. त्यावरून कल्पना कर.

ब्र: बापरे, म्हणजे हे कीडाकुंड खूपच मोठे आहे. हा जंतुकवी पण त्या कुंडातलाच की काय?

ना: नाही रे. ते त्याचे टोपणनाव आहे. खरे नाव छगन बापू मोरे आहे म्हणे.

ब्रह्मा, इतरांचे सोने, जडजवाहिरांची चोरी करणारा संदंश नरकात जातो. येथे त्याला गरमागरम लोखंडी गोळ्यांनी चटके देतात व चिमट्यांनी त्याची कातडी सोलतात.

जे राजे किंवा राजाचे सेवक धर्माच्या मर्यादांना उल्लंघून धर्मबाह्य वर्तन करतात ते वैतरणी नरकात त्याच नावाच्या नदीत पडतात. ही नदी म्हणजे मल, मूत्र, विष्टा, चिपड, शेंबूड, कानमळ, नखे, व तत्सम घाण गोष्टींचे गटारच आहे म्हण. त्या पाप्याला नदीतले जीव ओरबाडतात. ब्रह्मा, नरकात कोणी राजा नाही, कोणी रंक नाही. सगळे फक्त पापी.

ब्र: नारदा पुरे! हे सर्व ऐकणे सुद्धा कठिण आहे. त्या वैतरणीचा वास मला येतो आहे असे वाटते. कदाचित जवळच्या नाग नदीचा पण असेल. जाऊ दे. मी वाचीन कधीतरी हा यमराजाचा पापपुण्य निवाडा. लोकांनी पापे करावीच कां मी म्हणतो. जसे वेद पुराणात सांगितले आहे तसेच वर्तन ठेवले तर सारे नरक ओसाड पडतील.

ना: ब्रह्मा, होत आहे ते मात्र अगदी उलट बरे. पापे वाढत आहेत असे काकूच नाही का म्हणत? असू दे. पण एक आणखी पाप व त्याची भागवतपुराणात सांगितलेली शिक्षा मात्र ऐक. बाकी तू स्वतः वाच. आपल्या हातून पण असे पाप घडू नये असे वाटते.

ब्रह्मा, जे मानव पृथ्वीवर ढेकूण व तत्सम जीवांना मारतात ते अंधकूप नरकात पडतात. डास, ढेकूण माणसाला चावतात यात त्या बिचाऱ्या कीटकांचा काही दोष नाही. तूच ही त्यांची उपजीविका ठरविली आहेस त्यांना निर्माण करतांना. असे करण्यात आपण इतरांना कष्ट देतो हे समजण्याइतकीही त्यांची बुद्धी नाही. पण मानवाला मात्र पापपुण्याचे ज्ञान आहे, योग्यायोग्यतेची जाणीव आहे. त्यामुळे पशू, मृग, पक्षी, साप, गेंडूळादि सरपटणारे प्राणि, डास, ढेकूण, माशा, उवा मारणे अक्षम्य पाप आहे. अंधकूप नरकात हे सर्व त्रस्त प्राणी त्या पाप्यावर तुटून पडतात. अशा नरकात कुठली झोप अन् कुठले काय! तो पापी तसाच तडफडत राहतो व पापाची फळे भोगतो.

ब्र: बापरे बाप. मग तर नारदा सारेच पापी. आजकाल तर डास, उवां इत्यादींची आम कत्तल करतात औषधाने. आता पुरे नारदा. नाही ऐकवत.

ना: ब्रह्मा, येथे सारेच पापी रे. नारायण नारायण! पण ब्रह्मा, ही पापे पुण्य कमावले तर कँसल होत असावी. म्हणून तर ही पुण्य कमावण्यासाठी चढाओढ लागलेली असते. सतत पोथीपाठ, देवदर्शन, उपासतापास, गंगास्नान, दानधर्म.

ब्र: पण त्यात वाईट काय? स्वार्थासाठीच कां होईना, लोक अशा गोष्टी करतात. दान देणे, फुकट जेवू घालणे वगैरे चांगले नाही का?

ना: तूच सांग ब्रह्मा. एक दोन गोष्टी नरकाच्या भीतीपाई व स्वर्गप्राप्तीच्या मोहापाई कदाचित चांगल्या घडतही असतील. पण सर्वच विधींबद्दल तसे म्हणता येईल का?

ब्र: नको प्रश्न विचारूस नारदा. माझ्याजवळ तरी कोठे उत्तर आहे? तू काही सांगत असतोस, मी फक्त ऐकत अाहे. केव्हा संपतील ही पुराणे? कधी संपेल रे पारायण? माझ्यापेक्षा तूच ज्ञानी. नारायण नारायण!

ना: ब्रह्मा! तुझ्या लक्षातही आले नसेल. पण आत्ता तुझ्या मुखातून जे बोल निघाले तो तुझ्या ह्रदयाचा पाझर होता. हीच खरी कविता. तुझी आजची कविता. फक्त कवितेसारखी लिहायला व म्हणायला हवी.

नको प्रश्न विचारूस नारदा
माझ्याजवळ तरी कोठे उत्तर आहे?
तू काही सांगत असतोस,
मी फक्त ऐकत आहे
केव्हा संपतील ही पुराणे?
कधी संपेल रे पारायण?
माझ्यापेक्षा तूच ज्ञानी
नारायण नारायण!

व्वा! छान!  ब्रह्मा, तू निर्माण केलेल्या विश्वातली पहिली वहिली कविताही अशीच क्रूरतेच्या दर्शनाने झाली होती.

मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौंचमिथुनादेकं अवधीः काममोहितम् ।

ब्रह्मा, असं म्हणतात की क्रीडामग्न क्रौंचदम्पतीला शिकाऱ्याने बाण मारून त्यातील नरक्रौंचाला घायाळ करताना पाहून वाल्मिकी ॠषींच्या मुखातून हे उत्स्फूर्त शब्द निघाले. ते शब्द म्हणजे तुझ्या विश्वातील पहिली कविता आणि वाल्मिकींना म्हणूनच आद्यकवीचा मान. नंतर अनेक कवी आले, येतील. पण पहिला तो पहिला. ब्रह्मा! पहिले असणे, किंवा पहिले येणे याचा काय आनंद असतो हे मी थोडेफार अनुभवले आहे. आपला पहिला मुलगा मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला आला तो आनंद काय असतो हे मास्तरांनी मज्जीवनमणिमालेत वर्णिले आहे. मी साक्षी पण होतो त्या मंतरलेल्या दिवसांचा. तू, वाल्मिकी, सदाशिवसुत प्रमोद सारेच आपापल्या परीने पहिले.

ब्र: नारदा, तूही काही कमी नाहीस. तू तर पहिलाच नाही, तर पहिला व शेवटला एकमेव त्रिलोकसंचारी आहेस. खट्याळपणातही तूच पहिला. गोष्टम्या तर एकमेवाद्वितीयम्. सर्वप्रथम! सदा सर्वदा! गर्वाने माझी सुद्धा छाती फुलून जाते.

नारदा! मला एक प्रश्न नेहमी सतावतो रे. आपण अदृश्य हे खरे. पण आपला अदृश्यपणा आपले शरीर पारदर्शक आहे म्हणून, की आपण अशरीर आहो म्हणून? एवढ्यासाठी विचारतो की काकाकाकू आता ह्या खोलीत काँप्यूटर आणण्याची तयारी करीत आहेत. तसे होत असतांना आपण खोलीत जावे की नाही? नाहीतर नेमकी त्यांच्याशी अनवधानाने टक्कर व्हायची. पुन्हा काकू पडायच्या. पुन्हा भुंग्यावर आळ यायचा. किंवा टक्कर टाळतांना आपलीच आणखी कशाशी तरी टक्कर व्हायची. काहीतरी पडायचे, फुटायचे. मग पुन्हा भानामती. पुन्हा गुरुजी.

ना: ब्रह्माजी, मलाही माहीत नाही ह्या प्रश्नाचे उत्तर. देवाचा वास सर्वत्र असतो असे म्हणतात. पण कोणी देवाशी टक्कर होऊन पडला असे ऐकिवात नाही. म्हणजे बहुधा देवांना शरीर नसावे. म्हणून कदाचित तुला निर्गुण निराकार म्हणत असावेत. असो. होऊ दे काकाकाकूंचे काम. मग जाऊ आपल्या खोलीत. म्हणजे चिंताच नको.

ब्रह्मा, आणखीन एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल. साधी मांजर जरी झाडाच्या फांदीवर चढली तरी मांजरीच्या वजनाने फांदी वाकते. किंवा फांदीचे फळ तोडले तरी वजन कमी झाले म्हणून फांदी, थोडी का होईना, वर जाते. पण तू मी झाडाच्या फांदीवर चढून बसलो तरी ती जराशीही वाकली नाही. याचा अर्थ तुला मला वजन नाही. काकूंना वजन आहे. कितीदा त्या वजन करीत असतात. कितीदा त्या १०० ग्रॅम वजन कमी झाले म्हणून आनंदतात. वजन आहे म्हणून त्या खऱ्या आहेत. आपण त्यांच्यासारखे नाही. म्हणजेच आपण नाही.

ब्रह्मा, आणखी एक गोष्ट लक्षात घे. आपल्याला कधी डास चावत नाही. ना कपाळाला, ना हाताला. कधी डास चावून धामे येत नाही. वाड्यात सुद्धा मला कधी ढेकूण चावले नाही. फक्त त्याचा तो विशिष्ट वास आल्याचे मात्र अंधुकसे आठवते. म्हणजेच आपल्याला रक्त नाही. पण म्हणजे आपण नाही का? मला नाही माहीत. मला वाटते की आपण नाही अन् आहोत पण. पण आपली ह्या अस्तित्व असलेल्या मनुपुत्रांबरोबर टक्कर होऊ शकते असे मला वाटत नाही. पण मला खात्री नाही.

ब्रह्मा, आपण नाही म्हणावे तर सगळ्या पुराणात, वेदात, उपनिषदात, काव्यात आहोत. मानवाच्या  डोक्यात, विचारात, स्वप्नात आपण आहोत. जोवर तो आहे, जोवर तो आपल्याला पुसून टाकत नाही, तोवर आपणही आहोत.

ब्र: ठीक आहे मुनीश्रेष्ठ. तुम्हाला पहिल्यांदा मी उत्तर देतांना इतके गोंधळून गेलेले पाहिले. आपण असू वा नसू. पण जोपर्यंत ह्या मनुवंशजांचा आपण आहोत असा ठाम विश्वास आहे तोपर्यंत आपण आहो.

चल. तू पक्षीद्वय बघ. मी जरा ब्रह्मकमळाची दुसरी कळी कुठपर्यंत आली ते बघून येतो. काँप्युटर आपल्या खोलीत आला की मग जाऊ खोलीत. आता वाचनाचा वेगही वाढवायला हवा. केवढा अफाट हा साहित्यसागर. सागरमंथन करायलाच हवे. त्यातूनच अमृत निघेल.

ना: ब्रह्मा, खरेच रे. मंथन करून युगे उलटली. तळवे अगदी सुळसुळतात रवीने ताक घुसळायला, नवनीत काढायला. ते बघ झाडावर दोन पक्षी. खालचा सतत काहीतरी खात आहे. वरचा निर्विकारपणे बघत आहे. ह्यांचे गूढ उपनिषदात उकलले आहे म्हणतात. तेही वाचायला हवे. विचारमंथन करायला हवे. तत्त्वामृत काढायला हवे.

ब्रह्मा! हे दोन पक्षी म्हणजे आपणच दोघे तर नाही? हे सीताफळाच्या झाडावर बसलेले ब्रह्म व ब्रह्मपुत्र तर नाहीत? हेच आपले दृश्यरूप तर नाही?

_____________________


अनुक्रमणिकेकडे

Tuesday, 1 December 2015

गोष्ट पाचवी


रोज सकाळी दोनतीनदा स्नूझ दाबून शेवटी नाईलाजाने उठणाऱ्या काकू आज न जाणे कां, पण गजर व्हायच्या एक तास आधीच उठल्या. उठून आधी काँप्यूटरच्या खोलीत आल्या. माऊस मागेपुढे होताना पाहून, त्याची डावी बटन मधूनमधून दबतांना पाहून, स्क्रीनवर वेगवेगळ्या विंडोमध्ये काही ना काही उघडतांना पाहून, विंडोज मॅक्झिमाईज मिनिमाईज होतांना पाहून त्यांचा स्वतःचाच स्वतःवर विश्वास बसेना. सर्व खर्च वाया गेला की काय असे त्यांना वाटले. पुन्हा भानामती, पुन्हा लंकापती आला तर नाही असा विचार येऊन त्या धावत धावत काकूपतीला, म्हणजे काकांना, उठवायला गेल्या. सकाळच्या शाळेसाठी मुलांना आया जसे झोपेतच उभे करून तोंडात पेस्ट लावलेला ब्रश कोंबतात तसेच काहीसे करून त्या अर्धवट झोपेत काकांना काँप्यूटरच्या खोलीत घेऊन आल्या. अहो, काँप्यूटर वर कोणी अदृश्य भूत आहे असे पुटपुटत खोलीत येतात तो काय! काँप्यूटर अगदी शांत, रोज पहाटे असतो तसा.

काकाः इथे तर कोणीच नाही. कोणाची चाहूल पण नाही. कुठे आहे भूत?

काकूः अहो, मीही भूताला नाही पाहिलं. पण आत्ता मिनिटापूर्वी माऊस चालत होता, माऊस की खालीवर होत होती की, स्क्रीनवर काही येत जात होते की. नक्कीच कोणीतरी समोर बसून ते करत होते की. आता तसे काही नाही. पण नक्की होते तुम्ही यायच्या आधी.

काका: मग काय भूत मला घाबरले की काय? काय हे! तुला भास झाला असेल. झोप पूर्ण उघडली नसेल. आता त्या भानामतीला काढ मनातून.

काकू: नाही हो. मी पूर्ण जागी आहे. काँप्यूटर खरेच सुरू होता. बहुधा खुर्चीवर भूत होते.

काकाः असू दे. असला तरी व्हायरस असेल. स्कॅन करू. काढून टाकू. त्यासाठी का पुन्हा यज्ञ करायचा? तुझं पण खूळ, अंधविश्वास फारच वाढतो आहे बरं. भूत वगैरे वर्तमानकाळात कशाला येईल. माझा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

काकूः बरं, जाऊ दे. उद्या पुन्हा मी लवकर उठून पाहीन. पण मी झोपेत वगैरे नव्हती हे मात्र खरे. आणि काँप्यूटरवर कोणीतरी होते हेही तितकेच खरे.

काका: जाऊ दे. सकाळी सकाळी भांडण नको. नवराबायकोचं कधीतरी पटतं का? त्यांच्या भांडणातून काही निष्पन्न होतं का?

काकू: हं. आपलं पहिलं वहिलं भांडण झालं तेव्हा अचानक बाबा आले होते. आपण लगेच भांडण बंद करून 'all is well' च नाटक केलं तरी त्यांनी सत्य हेरलं होतं व म्हणाले होते:

अजायुद्धमृषिश्राद्धं प्रभाते मेघडम्बरम् ।
दम्पत्योः कलहश्चैव परिणामे न किञ्चन ॥

आपण दोघेही ओशाळं हसलो होतो. पण आपल्याला काहीही कळलं नाही हे हेरून बाबांनी मग आपल्याला मराठीत अर्थ पण सांगितला होता.  एडक्यांच भांडण, ऋषींच श्राद्ध, सकाळी ढगांच गडगडणं व पतीपत्नींचे भांडण यातून काहीही निष्पन्न होत नाही.

तेंव्हापासून भांडायला लागलं की मला ते सुभाषित आठवतं व माझी खुमखुमीच जिरून जाते. You are lucky? नाही का?

काका: हो ना. बाबांची संस्कृत सुभाषितं म्हणजे गाढवापुढे वाचली गीता. तुला काहीतरी कळत असेल. आपल्याला तर ते आपलं कौतुक करतात की थट्टा चेष्टा करतात ते कधी पण कळलं नाही. असो. भाषा हा आपला प्रांतच नव्हे. संस्कृत तर नाहीच नाही. चला आता. चहा करा व लागा कामाला.

ना: ब्रह्मा, आज इतक्या पहाटे पहाटे माझ्या उशाशी? काँप्यूटर क्रॅश झाला की काय? की टेबलवर आज अळी बळी काढून आला?

ब्र: नारदा, आज पुन्हा गडबड झाली रे. खूप सर्च केल्यावर मला ते हरिपुत्र पुराण सापडलं. तूच मला वाचायला सांगितलं होतस. मूळ संस्कृत ग्रंथ तर नाही सापडला. पण बहुधा त्याचाच इंग्रजी अनुवाद 'Harry Potter' सापडला. ते पुराण सहा खंडात आहे. पहिल्या खंडात मी अगदी रमून गेलो असतांना काकू केव्हा खोलीत आल्या ते कळलेच नाही. काँप्यूटरवर कोणीतरी आहे हे त्यांना कळले. पण आपण अदृश्यरूप असल्यामुळे मी वाचलो. त्या घाबरून काकांना उठवायला गेल्या अन् मी संधीचा फायदा घेऊन काँप्यूटर आॅफ करून तातडीने इकडे आलो. घाम फुटला रे बाबा गुलाबी थंडीत. बरे झाले ब्रह्मकमळाने माझी दृश्य स्वरूप धारण करण्याची इच्छा पूर्ण केली नाही ते.

ना: ब्रह्माजी! शांत व्हा. आपण कल्पनेतले का होईना पण देव आहोत. आपल्याला ह्या वैवस्वतपुत्रांसारखे घाबरून कसे चालेल. आपण निर्गुण निराकार. आपण स्थितप्रज्ञाची लक्षणे त्यांना सांगतो. त्यावर गीताध्याय लिहितो. आपल्याला सूर्यासारखे नको का असायला?

ब्र: सूर्यासारखे? तो कुठे स्थितप्रज्ञ? तो तर सतत भ्रमण करीत असतो. आग पाखडत असतो.

ना: तसे नाही रे. त्याची वृत्ती स्थितप्रज्ञ!  मास्तर एकदा म्हणाले होते:

उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा ।
सम्पत्तौ च विपत्तौ च साधुनामेकरूपता ॥

जसे, उदय असो वा अस्त, दोन्ही समयी सूर्य रक्तवर्णच असतो, तसेच वेळ चांगली वा वाईट असो, साधुवृत्तीच्या लोकांचा भाव तोच असतो. ब्रह्मा, आपण तर देव. एवढ्या साध्या गोष्टीनी विचलित होऊन कसे चालेल?

ब्र: नारदा, मला आपली चिंता नाही रे. पण ही पोरे पुन्हा घाबरतील व यज्ञ वगैरे करतील अशी भीती वाटते.

ना: ब्रह्मा, तसे काही होईल असे वाटत नाही. बघ ते दोघे खोलीतून बाहेर पण आले आणि शांत पण झाले. काकूंच्या मनात शंकेनी व चिंतेनी घर केले असेल. चिंता मनुपुत्रांना कायमचीच असते. त्यावरही मास्तरांनी एकदा उन्हाळ्यात एक सुंदर संस्कृत श्लोक ऐकवला होता. तुला सांगतो ब्रह्मा, ही संस्कृत भाषा इतकी समृद्ध आहे आणि या भाषेत इतकं काही लिखाण झालं आहे की विचारू नको. देवभाषा म्हणतात खरे, पण ती भाषाच नाही, मानवांची संस्कृती आहे. देवांवर, मुख्यत्वेकरून तू, शिव व विष्णु ह्या त्रिमुर्तीवर, खूपच काही लिहिण्यात आले आहे. आता ती भाषा फारशी वापरात नाही. तिचा फक्त अभिमान उरला आहे. पण ती आहे मात्र साहित्याचा खजिना.

ब्र: अरे पण तो चिंतेवरचा श्लोक सांग नं.

ना: ऐका तर.

चिता चिन्ता समाप्रोक्ता बिन्दुमात्रं विशेषता ।
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ॥

ब्रह्माजी, चिता आणि चिंता यात फक्त अनुस्वाराचाच काय तो फरक. चिंता माणसाला जिवंतपणी जाळते, चिता मृत्यूनंतर.

ब्रह्माजी, तसे पाहिले तर ह्या श्लोकात भाषेत प्रत्येक गोष्टीला कसे महत्त्व आहे व साध्या अनुस्वारानेही कसा अर्थ बदलून जातो हे ही अंडरलाईन केले गेले आहे. जंतुकवीचीही अशीच एक कविता आहे ज्यात ङ ञ ण ळ ह्या वांझ मुळाक्षरांचे महत्त्व दर्शविले आहे.

ब्र: हं. वाचीन. पण लिंक जरा सांगशील तर बरे. त्या रावणप्रतापात ते सर्व विसरल्या गेले.

ना: घे तर.


ब्र: पण नारदा, आता मला रात्री काँप्यूटरवर बसणे धोक्याचे वाटते. काकूंना दाट संशय आला असावा. त्या नक्कीच अपरात्री उठून चेक करतील. भूत भूत ओरडतील. ते मला आवडणार नाही. मी काही भूत नाही.

ना: ब्रह्मा, तू केवळ भूतच नाही, तर भूत, वर्तमान, भविष्य सारे काही आहे. खरे म्हणजे तुझ्याइतके 'भूत' कोणीच नाही. First to arrive तूच आहेस. १५६०००००००००००० वर्षांपूर्वी तू आलास. मीही तसा जुनाच. एखादे शून्य कमी. काकू फक्त ६० वर्षांच्या.

ब्र: नारदा, नको आठवण देऊस मला माझ्या वयाची. एकदम ते डिप्रेशन का काय ते येतं बघ. सगळे पृथ्वीवरचे रोग मला त्रस्त करतील असे वाटते. आज तर मी खरेच डिप्रेशनमधे आहे. एकच विरंगुळा होता रात्री काँप्यूटरवर बसून पुराणे वाचायचा. मग दिवसभर मनन करायचा. संध्याकाळी एखादी तुझी कापुसकोंड्याची गोष्ट. दिवस कसा छान जायचा. आता पुन्हा रात्री काँप्यूटरवर जायची भिती वाटते. आता रात्रभर करायचे काय? तू झोपलेला असतो. बरे, कंटाळा यायला नको. जांभया येण्याचा धोका. जांभई दिली की काळ पुढे निघून जातो. अक्षरश: तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे बाबा ही पृथ्वी तुझी.

ना: देवा, थोडा टाईमटेबल बदलू. दिवसा काकाकाकू नसतात. तेव्हा वाचत जा. ते यायच्या आधी काँप्यूटर बंद करत जाऊ. रात्री मग मनन, चर्चा, कापुसकोंड्या वगैरे. प्रत्येक समस्येला समाधान पण असतं देवा. काका काकू बघ सतत कसे संकटाला सामोरे जातात, तडजोड करतात. असे डिप्रेशनमधे नाही जात खुट्ट झाले की.

बरे, सोड आता. वाटल्यास कापुसकोंड्याची गोष्ट सांगतो. त्या गोष्टीत मी पण आहे. सांगू का?

ब्र: सांग बाबा, पण ते रामायण महाभारत नको. त्यात खूप गुंतागुंत आहे. एकदम लहान मुलांची असते तशी गोष्ट सांग. काकू नातवाला मांडीवर बसवून सांगतात तश्शी.

ना: मांडीवर बसणाऱ्या पोराचीच गोष्ट आहे ब्रह्मा. मांडीवर बसणाऱ्या पोरांनाच खूप आवडते. खूप म्हणजे खूप्पच आवडते. आणि अगदी सत्यकथा बरे!

ब्र: सांग तर मग! हसू नकोस.

ना: ब्रह्मा, ही गोष्ट साधारणतः आई आपल्या बाळाला, आजी आपल्या नातवंडांना, कधीमधी बाप आपल्या मुलाला सांगतात. मुलाने बापाला सांगितल्याचे मी तरी ऐकलेले नाही. आज आपण नेमके ते करणार आहोत. त्यामुळे मला गोष्ट सोपी किंवा रसाळ करायची गरज नाही. 'मग काय झालं माहित आहे क्का?' वगैरेची गरज नाही. त्यामुळे गोष्ट थोडी तशी बोअरिंगच होईल असे वाटते. त्या स्वर्गातल्या आयुष्यासारखी. गोष्ट ऐकताना तुला जांभई येऊ शकते. तेवढी मात्र आवर. नाहीतर त्या म्हातारीच्या मोठ्या मुलीसारख्या जांभयावर जांभया देशील तर कल्पांतच यायचा.

ब्र: नारदा! मी जांभईवर बराचसा विजय प्राप्त केला आहे. पुतना, शूर्पणखा परवडतील, पण ही जांभई राक्षसीण फार वैताग आणते बघ. सुरू कर तू गोष्ट.

ना: ब्रह्मा, गोष्ट फार फार वर्षांपूर्वीची आहे. कलियुगातली नाही, द्वापारातली नाही, त्रेता पण नाही. गोष्ट सत्ययुगातली. विष्णूंच्या पहिल्या अवताराच्या, मत्स्यावताराच्या आसपास घडलेली ही सत्यकथा. सत्ययुगातल्या पहिल्या मनूच्या वेळेची. सध्या सातवा मनू वैवस्वताचा काल आहे हे तूच मला सांगितले. आठवतात तरी का रे तू निर्मितोस त्या चौदा मनूंची नावे? कमीत कमी पहिल्यातरी?

ब्र: झाली परीक्षा सुरू. अरे सरळ गोष्ट सांग. प्रश्न काय विचारतोस?

ना: ब्रह्मा, पहिला तू पाठवलेला मनू म्हणजे स्वयंभूव. बाकी तू बारशाला नावं मात्र मस्त ठेवतोस हं. एक माझं सोडलं तर. नारद म्हणे! हे काय नाव झालं?

ब्र: अरे नावात काय आहे. बाळ काय, बेबी काय! हं, पण ते अडोण्याचे की माोहरीरांचे हे मात्र महत्त्वाचे.

ना: असो. तर स्वयंभूवाला दोन मुलगे. उत्तानपाद आणि प्रियव्रत. स्वयंभूव जर तुझी निर्मिती, तर हे दोघे तुझे नातू लागतात. तिसरी पिढी. त्यातल्या उत्तानपादाची ही गोष्ट. तुझ्या लाडक्या नातवाची. काही आठवते का?

ब्र: नाही रे नारदा! म्हातारी नेहमी म्हणते, ब्रह्मदेव विसराळू, ते खरेच आहे. मला वाचन वाढवायला हवे. कमीतकमी आपली वंशावली तरी माहीत असावी माणसाला. काकू बघ कशा मानाने सांगतात आम्ही मोरयाचे वंशज म्हणून. मलाही आपले ज्ञान वाढवायला हवे. तुम्हाला काही माहीत असेल माझ्या वंशावळीबद्दल तर सांगा जगद्गुरु!

ना: ब्रह्मा, देवांची वंशावळी पुराणात आहे. तुझी तर आहेच आहे. ही जी गोष्ट मी तुला सांगतो आहे ती मी सुद्धा पुराणातच वाचली आहे. म्हणून तर मला कळले की ह्या गोष्टीत मी सुद्धा एक पात्र आहे. ब्रह्मा, भागवत पुराणासारखे लोकप्रिय पुराण नाही. त्यात मी वाचली. गोष्टीच्या सुरुवातीलाच मैत्रेय ऋुषी विदुराला तुझ्याबद्दल माहिती देतात. विषयांतर होईल म्हणून सांगत नाही.

ब्र: अरे असं नको करू. सांग. सांग.

ना: ब्रह्मा, तुझी मुले; जसे की मी, रिभु, हंस, अरुणी वा यति; सांसारिक नाही. आम्ही सारे ब्रह्मचारी असल्यामुळे ही फांदी इथेच संपते. पण तुझा आणखी एक पुत्र, अधर्म, व कन्या मृषा यांना, दंभ आणि माया अशी दोन अपत्ये. त्यांना पुढे लोभ आणि निकृता असे पुत्र-कन्या. त्यांच्यापासून पुढे पुन्हा क्रोध व हिंसा हे भाऊबहिण, व त्यांना पुढे कली व दुरुक्ती असे पुत्र व कन्या. कली व दुरुक्तीपासून पुढे भय आणि मृत्यु जन्म पावले. त्यांनी पुढे निरय (म्हणजे नरक) आणि यातना यांना जन्म दिला. अधर्मापासून यातना व नरकापर्यंतची ही वंशावली सांगूनच मग मैत्रेय ऋषी आजच्या, तितक्याच सत्य गोष्टीला हात घालतात.

ब्र: बरे, आता ही अधर्माची फांदी नको. मला तो माझा मुलगा होता हेही आठवत नाही. नंतर आलेले नातनातू-पणतपणतू वगैरे तर सोडच. आपण त्या दुसऱ्या फांदीवर जाऊ.

ना: इथेच तर गोम आहे ब्रह्मा. वरची वंशावली जरा वेगळ्या शब्दात सांगितली असती तर वेगळाच अर्थ तू घेतला असता. धर्मबाह्य किंवा अधर्मी कृत्याचे पर्यवसान पुढे दंभ व मायेत होते. त्यातूनच पुढे लोभ आणि निकृता व नंतर क्रोध, हिंसा, दुरुक्ती असे दुर्गुण जन्म घेतात. शेवटी यातना, मृत्यु व नरक ठेवलेला आहे. असे जर सांगितले तर ही वंशावली फक्त मानवांच्या पतनाची कारणमिमांसा वाटेल. तो एक फक्त इशारा वाटेल. पण त्याच अधःपतनाच्या पायऱ्यांना मुले मुली म्हटले आणि ही कथा आहे म्हटले की आपण ती कथा आहे, पुराणातली कथा आहे, तीही संस्कृतमधे आहे, म्हणून सत्यकथा आहे म्हटले तर गोष्टच संपली. ही तुझी वंशावली खरेच तुझी वंशावली आहे म्हणून काही जन तुझ्या वंशात किती अनाचार, कदाचार, दुराचार, व्यभिचार माजला होता त्याकडे अंगुलीनिर्देश करतात. तर काही त्याचा शब्दशः अर्थ घेऊन त्या नावाच्या व्यक्ती खरोखरीच होत्या असे समजतात. दोन्ही प्रकारचे लोक तुला 'अज्ञान' नावाचा पुत्र व 'अबुद्धी' नावाची कन्या होती त्यांचेच वंशज दिसतात.

ब्र: आता ही कोणची माझी नवीन वंशशाखा?

ना: कुठल्याही पुराणात या फांदीचा उल्लेख नाही ब्रह्मा. पण एकंदरीत आज लोकांचा भोळेभाबडेपणा पाहिला की ही दोघेही तुझीच मुले असावीत व त्यांचा वंशविस्तार पिढी दर पिढी होत आजचा समाज बनला असावा असे वाटते. तसे नसते तर पुराणातली वरच्यासारखी कथा ही केवळ महारूपकात्मक आहे, काल्पनिक आहे, दीर्घोत्प्रेक्षा आहे हे कोणालाही कळेल. तसेच बाकीच्या कथांचेही. त्यात उपदेश आहे. चिंतन आहे. ते सर्व दुर्लक्षिल्या गेल्यामुळे त्या कथांची मजाच गेली ब्रह्मा. कथाकारांना पण त्याची झळ पोहोचली व त्यांच्या कल्पनाविलासाचे व साहित्य निर्मितीचे हवे तेवढे प्रांजळ कौतुक झाले नाही. मला याची फार हळहळ वाटते.

ब्र: नारदा, आपण आजच्या कथेकडे वळायचे का? तुझी कथा म्हणजे 'एक ना धड, भाराभर चिंध्या' अशी गत होत आहे बघ. कथेवर लक्ष केंद्रित कर पाहू.

ना: ब्रह्मा, मी ही कथा जशी भागवत पुराणात आहे तशी सांगतो आहे. संस्कृत श्लोकांच्या रूपात भागवत पुराण आहे. श्लोक म्हणजे कविताच. तीही प्राचीन काळची, म्हणजे वृत्तबद्ध. कवितेचा अर्थ शब्दशः घेतला तर त्या जंतुकवीला पण अपमानित झाल्यासारखे वाटते. पुराणे तर महाज्ञानी, महापंडित, महाकवींनी लिहिली आहेत.  त्यांच्या काव्याचा नुसता संधिविग्रह करून शब्दार्थच घेतला तर त्यांचा घोर अपमानच होईल.

जंतुकवीनी आपल्या गद्य नामक कवितेत वृत्तबद्ध शिस्तबद्ध छंदबद्ध पद्याचे हळूहळू पतन होत होत आता आधुनिक कविता पद्य नसून मुक्तछंद पद्य व अत्याधुनिक कविता तर गद्य झाली म्हणून उसासा सोडला आहे. पण जंतुकवीची ती कविता फक्त एका वंशाची वंशावली आहे असे कोणी म्हणेल तर डोक्यावर दगड किंवा दगडावर डोके मारणे असे दोनच पर्याय त्याला उरतील.

पद्याला मुलगी झाली
नाव ठेवले कविता
कविताला मुलगी झाली
नाव ठेवले छंदा
छंदाला मुलगी झाली
नाव ठेवले वृत्ता
वृत्ताला मुलगी झाली
नाव ठेवले मुक्ता
मुक्ताला नुकताच मुलगा झाला

ब्र: नारदा, आले माझ्या लक्षात. मीही तुझी भागवतकथा रसाळ कथा म्हणून न ऐकता थोडा खोलात शिरीन. थोडं डोकं वापरीन. पण तू सांग तर आधी. गाडी येऊ दे मूळपदावर. उत्तानपादावर.

ना: ब्रह्मा, उत्तानपाद राजा तसा चांगला राजा होता. राजधर्माचे पालन करणारा. प्रजेचा लाडका. त्याला दोन राण्या. एक आवडती, एक नावडती. असे सर्वच गोष्टीत असते. दोघींमध्ये मोठी सुनीती. पण ती नावडती झाली होती. दुसरी सुरुची. ती आवडती राणी. सुनीती पण सुरुची येईपर्यंत राजाला आवडत असावी. पण सुरुची आली व ती जास्त रूपवान असल्यामुळे सहज आवडती झाली. सुनीती नावडती झाली. नशीबच! नाही का?

ब्र: नारदा, मला काय विचारतोस? पण असेल नियतीची तशी इच्छा.

ना: सुनीतीला एक मुलगा, धृव. पट्टराणीसाहेबा सुरुचीलाही एकच, उत्तम. म्हणजे एकच मुलगा आहे हे उत्तम म्हणतो असे नाही, मुलाचे नावच उत्तम.

ब्र: उत्तम!

ना: वयाने पाहिले तर धृव मोठा, उत्तम लहान. नियमाप्रमाणे, त्या काळच्या रीतीप्रमाणे, उत्तानपादानंतर धृवाचा राजसिंहासनावर हक्क. तो राजा झाला असता. पण पट्टराणी सुरुचीच्या मुठीत राजा असल्यामुळे व स्वतःच्या मुलावर तिच्या मातृसुलभ प्रेमाने राजसिंहासनावर तिचा मुलगा बसावा असे तिला वाटत असल्यामुळे धृवाचा ती नेहमीच खार खायची.

ब्र: म्हणजे? तिला तो आवडायचा की नावडायचा? नाही, लोणच्याचा खार खूप चविष्ट असतो आणि सर्वांनाच आवडतो म्हणून विचारले.

ना: ब्रह्मा, खार खाणे म्हणजे पाण्यात पाहणे. दुश्वास करणे.

ब्र: सरळ सरळ सांग. तिला धृव आवडायचा की नाही?

ना: नावडायचा. ती त्याचा द्वेष करायची. एके दिवशी उत्तानपाद राजा उत्तमला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसला होता. सुरुचीही बाजूलाच होती. तेवढ्यात धृवही तेथे आला. त्यालाही बाबांच्या मांडीवर बसावे वाटले. साहजिक आहे. सुनीती नावडती असली तरी तो राजाचा नावडता नव्हता. सुरुची त्याची सावत्र आई असली तरी उत्तानपाद त्याचा सख्खा पिता होता.  शिवाय कुठेतरी त्याला त्याच्या अधिकाराचीही जाणीव होती. त्याला माहीत होते की सिंहासनावर बाबांनतर आपला हक्क आहे. तसा तो जेमतेम सहा वर्षांचा होता. आजच्या काळात पहिलीत जाईल एवढा. पण तो राजपुत्र होता. उत्तम त्याहीपेक्षा लहान.

धृवबाळ राजाच्या मांडीवर बसणारच होते की सुरुचीने त्याला बळेच खाली खेचले. त्या बळजबरीने बाळ जबर घाबरले. त्यातून सावरते न सावरते तेवढ्यात सुरुचीराणींचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. 'बाबांच्या मांडीवर बसायचा तुझा हक्क नाही. सिंहासनावर तर दूरच राहिले. तिथे बसायचेच असेल तर नारायणाची आराधना कर, त्याला प्रसन्न कर आणि माझ्या उदरी जन्माला ये.'.

ब्र: नारदा, तो माझा पणतू रे. सुरुची माझी नातसून. काय हे! मला कळले असते तर काही तिचे खरे नव्हते. आणि माझा तो नातू, तो उत्तानपाद? तो काय करीत होता?

ना: ब्रह्मा, राजा उत्तानपाद माझा पुतण्या रे. सत्ययुगातला धृतराष्ट्र. फक्त पुत्रासाठी नाही तर पत्नीसाठी प्रेमांध! माझा त्यावेळी बहुधा पृथ्वीचा टूर नसावा. नाहीतर मी असे होऊ दिले नसते. असो. पण खरेच, तो राजा एक शब्द बोलला नाही. कदाचित हाच त्याचा पतिधर्म असेल. पण पिताधर्माला तो चुकला. असो.

६-७ वर्षांचा धृव रडत रडत आपल्या आईकडे गेला. तिला सर्व वृत्तांत सांगितला. ती तरी काय करेल बिचारी. ती स्वतःच तिरस्कार सहन करीत होती. तिने बाळाला समजवायचा लटका प्रयत्न केला. आपली असहायताही व्यक्त केली. सहज म्हणाली की फक्त नारायणच त्याची मदत करू शकेल. तोच सत्य, न्याय, योग्यायोग्यतेचा खरा भोक्ता व प्रतिपालक. तोच सर्व काही.

ब्र: नारदा, दोन्ही राण्यांमधे मला एक साम्य जाणवते. दोघींचाही नारायणावर, विष्णूवर, देवावर विश्वास दिसतो.

ना: ते खरेच ब्रह्मा. राणीने दाखविलेला तिरस्कार व बाबांनी दर्शविलेली हताशा धृवाच्या बालमनावर खोल आघात करती झाली. हा अन्याय, हा अपमान त्याला सहन न होऊन नारायणाची आराधना करून, कठोर तपस्येने त्याला प्रसन्न करायचा त्याने निर्णय घेतला. कोणाचेही काहीही न ऐकता तो वनाकडे चालता झाला.

ब्र: नारदा तू म्हणालास गोष्टीत तू पण एक पात्र आहेस. अजून दिसला नाहीस. नाटकात पडदे ओढण्याचेच काम मिळाले होते की काय?

ना: ब्रह्मा, आताच माझी एंट्री बघ. धृवबाळ वनात तपाला जात असता मी त्याला गाठले. त्याचा जो अपमान झाला व त्याच्यावर जो अन्याय झाला तो झालाच, पण आता माझे काम त्याची समजूत काढून त्याला बालवयात कठोर तप वगैरे करण्यापासून प्रवृत्त करणे होते. तसे मला जमेल याची मला गर्वभरित खात्री पण होती. मोठमोठ्यांना शब्दपेचात अडकवणारा म्हणून माझी त्रिलोकी कीर्ती काही उगाच का होती? हा तर सहा वर्षांचा कोवळा नातू. नारायण नारायण!

वनात जातांना मी त्याला आडवा गेलो. त्याच्या बालमनातला राग काढून टाकणे माझे कर्तव्य आहे असे माझे मन मला सांगत होते. मी त्याला म्हणालो की मनुष्याचे थोरपण तो राजा होता म्हणून नाही तर त्याने कार्य काय केले यावर अवलंबून आहे. कर्तृत्त्ववान मनुष्याला यशाच्या अनेकानेक वाटा आहेत. बाबांची मांडीच हवी हा हट्ट हक्काच्या जाणीवेतून अाला असावा. पण देवकृपा व मोक्षप्राप्ती पद बघत नाहीत. ते जन्मभर धर्माला धरून केलेल्या आचरणाचाच निकष लावतात. पद, अधिकार, मान, मरातब हे सर्व तितके महत्त्वाचे नाहीत जितकी ज्ञानप्राप्ती करणे व तत्कालीन ज्ञानात भर टाकणे आहे. त्या बालकाने ते सर्व ऐकले खरे, पण तो त्याच्या निर्णयापासून तसूभरही हलला नाही.

धृवबाळ मला म्हणाला, हे देवर्षी, तुम्ही त्रिलोक संचारी आहात. महाज्ञानी आहात. तुमचे दृष्टिक्षेत्र फार व्यापक आहे. भगवान श्रीकृष्णही स्वतःचे अनन्य स्थान समजवितांना 'देवर्षींमध्ये जसे नारदमुनी, तसा सर्व देवगणात मी' असे म्हणतात. तुम्ही जे म्हणता ते माझ्या एका मनाला पुरेपूर पटतेही आहे. पण माझे दुसरे मन, माझे राजपुत्राचे मन, मला ही अवहेलना सहन न करण्यास बाध्य करते. माझे आचरण बहुधा माझे हे दुसरे मनच ठरविते. पहिले मन इशारा नेहमीच देते, योग्य काय तेच सांगते, पण दुसऱ्या मनाचा कल ऐहिक गोष्टींकडेच असतो. माझा तपस्येचा निर्णय बदलणे अशक्य आहे. तो व्यर्थ अभिमानजन्य आहे हे मला कळत असूनही.

ब्र: नारदा, खरेच का रे त्या लहानग्याचे हे कथन? हे सखोल विश्लेषण व तुझी केलेली स्तुती मोठ्यांसारखी वाटते.

ना: मी जे सांगतो ते पुराणनिष्ठ आहे. असेच झाले की नाही मी नाही सांगू शकत. मला आठवतही नाही. अरे सत्ययुगाच्या सुरुवातीची गोष्ट. म्हणजे लाखो वर्षांपूर्वीची. विस्मरण होते माणसाला.

ब्र: बरे. पुढे सर.

ना: खरे म्हणजे धृवबाळाला तपःसाधनेपासून प्रवृत्त करणे माझे कार्य होते. ते सिद्धीस नेलेच पाहिजे असे माझे मन मला सांगत होते. पण बाळाने माझ्या केलेल्या स्तुतीने मी जरा पाघळलोच. त्याला पुढे म्हणालो 'बाळा, नारायणाला, विष्णूला प्रसन्न करणे वाटते एवढे सोपे नाही. तपस्या करण्याचे तुझे वय नाही. एकदा पुनर्विचार कर'.

पण कसचे काय, अन् कसचे काय. तो मानत नाही हे पाहून मग मीही त्याला तप कुठे व कसे करावे म्हणजे विष्णुभगवान प्रसन्न होऊन प्रकट होतील ते सांगितले.

ब्र: म्हणजे नारदा, तुलाही दोन मने आहेतच की. एक सद्सद्विवेकी मन तुला सांगते की प्रवृत्त कर बाळाला तपस्येचा हट्ट सोडायला, आणि दुसरे मन प्रशंसेला भाळून त्याला तपस्येचे दिव्य ज्ञान देऊ पाहते.

ना: ब्रह्मा, ते खरे असावे. या देहरूपी वृक्षावर ही दोन मने, हे दोन पक्षी नित्य वास करतात असे वाटते. एक सत्यमार्ग दाखविते, आणि दुसरे प्रलोभनांना बळी जात स्वैराचाराला संमती देते. हेच ते झाडावरचे दोन पक्षी ब्रह्मा. 'Two birds in Vedas and Upnishadas' म्हणजे वेदोपनिषदातील दोन पक्षी अशी शोधमाला देऊन गूगल करशील तर खूप संदर्भ मिळतील. खूप म्हणजे खूपच! ह्या दोन पक्षांवर अफाट संशोधन व लिखाण आहे. वाच कधी. लिंक देत नाही. तुलाही सर्च करणे यायला हवे. नाहीतर आपल्याला आपण कोण कसे कळणार? तुलाही ब्रह्म आणि परब्रह्म, आत्मा आणि परमात्मा, यातील फरक कसा कळणार. खरेच, वाचन कर दोन पक्षांवर.

ब्र: करीन बापडा. ब्रह्म आणि परब्रह्म! पण तू चल पुढे. कथेची परकथा नकोस करू.

ना: ब्रह्मा, मी बाळाला तपस्येची योग्य रीत सांगितली. तपस्या तेथेच करणे योग्य जेथे ज्याला प्रसन्न करायचे आहे त्याचा वास असतो. काकूंना प्रसन्न करून पुरणपोळी मागायची असेल तर आपल्याला येथेच काहीतरी करावे लागेल. न्यूयाॅर्कला जाऊन धरणे धरण्यात काय अर्थ? कालिंदीच्या काठावर मधुवनात विष्णूंचा वास असतो हे मला माहीत होते. तेच स्थळ मी त्याला सुचविले. कालिंदी म्हणजे यमुना नदी बरे. विष्णूंची आवडती.

ब्र: नारदा! पण ती तर कृष्णाची आवडती जागा. तिथे तर राधा नृत्य करायची, कृष्णाचा शोध घ््यायची. ही धृवाची गोष्ट तर सत्ययुगातली गोष्ट. विष्णूंचा जेमतेम पहिला अवतार, मत्स्यावतार शक्य. तूच म्हणाला. सत्ययुग संपून, त्रेतायुग जाऊन, द्वापारयुगात यायला तर लाखो वर्ष जातील. मग ह्या गोष्टीत मधुवन, कालिंदी यांचा कसा उल्लेख? पुराणकारांची काही चूक तर नाही ना यात?

ना: ब्रह्मा! छान. प्रश्न विचारयोग्य आहे. पण उत्तर मलाही नाही रे माहीत. विष्णूंनी कदाचित आधीच कृष्णावताराचा आराखडा तयार करून ठेवला असेल. आग लागल्यावर का कोणी विहीर खणतं? आग लागणारच, धर्माला ग्लानी येणारच, आणि धर्माभ्युत्थानाकरिता आठवाही अवतार पुढे घ््यावा लागणारच म्हणून त्याची कथा लिहून तयारही असेल धृवकाळी. व्यासांनी नाही का आधी महाभारत लिहिले, व मग ते घडले? देवा, देवांच सगळच वेगळं रे!

ब्र: हं.

ना: ब्रह्मा, मी धृवाला सगळी तपाची सिस्टीम समजावून सांगितली. तपाची जागा कशी तयार करावी ते सांगितले. तीनदा कालिंदीत आंघोळ करूनच कसे तपाला बसावे ते सांगितले. सहा महिन्यांच्या तपकाळात मनात विष्णूच्या रूपाशिवाय दुसरा विचार नको. पण बाळाने तर विष्णूला पाहिले नाही. तो दिसावा म्हणून तर तो तपप्रवृत्त झाला. विष्णू ज्या रूपात प्रकट होणार तेच रूप तपस्व्याच्या मनात तप करतांना असणे आवश्यक अाहे. हे शक्य नसल्यामुळे बरेचदा तपसिद्धी होत नाही. कोंबडीशिवाय अंड नाही, अंड्याशिवाय कोंबडी नाही. अशी स्थिती. नशीबाने मी निर्गुण निराकार विष्णूला बरेचदा पाहिले असल्यामुळे त्याचे सगुण रूप मला चांगलेच माहीत होते. ते मी साद्यंत धृवबाळाला वर्णन केले. मुखकमल, चरणकमल, नयनकमल, नाभीकमल सारे सारे. हे रूप मनात कल्पून सहा महिने जप करायचा. जपाचा अत्यंत काॅन्फिडेंशियल द्वादशाक्षरी मंत्र मी त्याला कोणी ऐकू नये म्हणून त्याच्या कानात सांगितला. तप करतांना तो मोठ्याने म्हणायचा हे ही सांगितले. गायत्री मंत्र जसा बाप मुंजीच्या वेळी बटूच्या कानात सांगतो आणि मग तो जन्मभर त्रिसंध्येत त्याचा मोठ्याने उच्चार करतो तसेच काहीसे.

ब्र: नारदा, पण मग तप सुरू असतांना कोणी ऐकतीलच की रे. हे उघडे गुपितच की. मला उत्सुकता आहे तो मंत्र जाणून घ््यायची. सांगतोस का?

ना: कानात सांगतो. कर इकडे कान.

ब्र: घे तर, केला.

ना: उजवा नाही रे. डावा कान. डावा कान ह्रदयाच्या जवळ असतो म्हणून गुपित नेहमी डाव्या कानात सांगावे म्हणतात. हं, असा! ऐक तर.

ब्र: अरे लबाडा. हा मंत्र तर काका काकू रोज पूजेत म्हणतात. दहावीसदा म्हणतात. ॐ नमो भगवते वासुदेवाय. पण मला पुन्हा तोच प्रश्न नारदा. सत्ययुगातल्या तपस्येत लाखो वर्षे नंतर येणाऱ्या द्वापारयुगातल्या वासुदेवाला, म्हणजे वसुदेवसुत कृष्णाला नमन कसे? माझ्यासारखाच तूही त्रिकालदर्शी होतास आणि आहेस की काय?

ना: ब्रह्माजी, तसे असते तर मी ही गोष्ट तुला सांगायला घेतलीच नसती. मला तू कठिण प्रश्न विचारणार हे आधीच दिसले असते. मी चिऊ काऊची गोष्ट सांगितली असती. ती बालवेदातली गोष्ट आहे असे म्हणतात.

ब्र: बर. हो पुढ.

ना: पण ब्रह्मा, मला खरेच आवडायला लागले तू प्रश्न विचारतोस हे. अरे ह्या साध्या, केवळ कथानक असणाऱ्या गोष्टी नाहीत. 'पण मग पुढे काय' असा रेटा ह्या गोष्टींना नसतो. ह्या कापूसकोंड्याच्या गोष्टी आहेत. कापूस आणि कोंडा ऐकणाऱ्यानी वेगळा करायला हवा. शुभ्र मुलायम कापूस तेवढा स्वीकार करायला हवा आणि कथानकाचा कोंडा त्याज्य म्हणून टाकून द्यायला हवा. मऊ मुलायम कापसाची उशी डोक्याशी ठेवून त्यातला गर्भितार्थ, मतितार्थ, बोध डोक्यात साठवायला हवा. म्हणून तर कापूस भरलेली उशी आणि मेंदू भरलेल्या डोक्याचे इतके जवळचे नाते. मगच तर ही गोष्ट कापूसकोंड्याची गोष्ट म्हणून पात्रता पावेल.

ब्र: वा नारदा वा! पण थोड कथानक पण पुढे जाऊ दे.

ना: ब्रह्माजी, नंतर मग मी धृवाला तपस्याकालात घ््यायच्या आहाराचा पण पूर्ण कार्यक्रम आखून दिला. पायरी पायरीने जीना चढायचा असतो. यशशिखराला लिफ्ट नसते हे त्याला समजावून सांगितले. पहिल्या महिन्यात फक्त दर तीन रात्रींनंतर फळेबोरे खायची. शरीररक्षणाकरिता. दुसऱ्या महिन्यात आहार कमी करून दर सहा रात्रींनंतर बोरेफळे खायची. तिसऱ्या महिन्याच फक्त पाणी. असे करत करत सहाव्या महिन्यात फक्त हवेवर निर्वाह करायचा. असे करण्याची शक्ती व निर्धार, मनात साठवलेले कमलबाहुल्यित विष्णुरूप, मंत्रशक्ती, आणि इंद्रियविजयच देऊ शकतात. शेवटच्या महिन्यात उजवा पाय उचलून फक्त डाव्या पायावर तोल सांभाळायचा. मंत्रजप अव्याहत सुरूच हवा. शेवटी हळूहळू मंत्राबरोबरच श्वास घेण्याची व सोडण्याची गती कमी करायची व या दोघांमधला श्वास कोंडून धरायचा अवधी वाढवायचा. शेवटी या श्वास आणि उश्वास, प्राण आणि अपान, यांच्या मध्ये स्थिर व्हायचे. हे सर्व जमेल, मन जर फक्त नारायण रूपावर स्थिर असेल तरच, आणि फक्त तरच, ध्येयप्राप्ति होईल असे मी त्यास सांगितले.

सर्व लक्ष ध्येयप्राप्तीवर आहे, त्यात श्वासोश्वास पण व्यत्यय आणत नाही, अशी स्थिती प्राप्त झाली तर भक्तवत्सल धाऊन येईल असे सांगून, त्याला शुभेच्छा देऊन, त्याचे वंदन स्वीकारून, त्याचे धन्यवाद घेऊन, मेंशन नाॅट म्हणून मी रानातून बाहेर येऊन सरळ उत्तानपाद राजाकडे गेलो.

ब्र: नारदा आता मीही तपस्या करू शकेन इतके व्यवस्थित तू सांगितलेस. पण ते मेंशन नाॅट वगैरे हातचे लावलेस बरे. ते पुराणात शक्य नाही. तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

ना: अरे आपण कलियुगात, पृथ्वीवर आहोत. गोष्टींचे थोडेफार आधुनिकीकरण करायला नको का? चिऊ काऊच्या गोष्टीत सुद्धा आजकाल कावळा डोअरबेल दाबतो, टेक्स्ट करतो. कडी नाही वाजवत.

बरे असो. नंतर मी उत्तानपाद राजाच्या दरबारात गेलो. राजाला सगळं घडून गेल्यावर, आपण साधा विरोधही केला नाही याचा पश्चात्ताप होत होता. मी त्याची समजूत काढली. धृवबाळ यशस्वी होऊन, भगवंताचा आशिर्वाद घेऊन परत येईल. तेंव्हा त्याचे राज्याच्या वेशीवरच स्वागत करावे व दरबारात घेऊन यावे असे सांगितले. तुझ्यानंतर तोच राजा होईल हेही बजावले. धृवाचा निर्धार व कृपालसिंधूचे औदार्य मला सांगत होते की विष्णुदेव नक्कीच प्रकट होणार व धृवाला मनोवांछीत वर देणार.

ब्र: इतके केल्यावर, इतक्या कठोर दिव्यानंतर प्रसन्न होणाऱ्या वरद नारायणाला काय तो क्षुल्लक राज्य मागणार? त्याने तर त्यांच्या चरणकमलाशी अढळ स्थान मागावे. काय मागावे हे तू त्यास सांगितले की नाहीस? तो बालबुद्धी रे. चाॅकलेट मागेल. त्या विषयी तू त्याला काही सल्ला दिलास की नाही?

ना: ब्रह्मा, मी सगळेच कसे रे फिक्स करीन. पुढे काय होणार हे मला माहित असायला काय मी अजन्म आहे. मूळ आहे? ब्रह्मदेव आहे? मार्ग दाखवणे माझे काम. माझ्यावर विश्वासून त्या मार्गाने जाणे तपस्व्याचे काम. प्रसन्न होणे न होणे हा नारायणाचा निर्णय. नारायण नारायण!

ब्र: नारदा पुढे काय झाले?

ना: ब्रह्मा, त्या बालकाने अगदी सांगितले तसेच कठोर तप केले. शेवटी शेवटी तर तो जमीनीत पायाचा अांगठा रुतवून, श्वास रोखून, एका चरणी उभा झालेला, प्रकाशवलयाने आवृत्त मला आठवतो. तसे होताच त्रिलोकात कंपन सुरू झाले. इंद्राचेही सिंहासन हालायला लागले म्हणतात. केवळ उत्तानपादानंतर त्याचे सिंहासन त्याला नाकारले गेले, ते परत मिळावे म्हणून केलेले तप इतके प्रखर व शुद्ध की त्याची झळ राजा इंद्रापर्यंत पोहोचली. त्यांचेच राज्य जाईल की काय असे त्यांना वाटू लागले. काहीतरी उपाय करणे त्यांना आवश्यक भासले.

ब्र: काय केले इंद्राने?

ना: आधी त्याने रानातील हिंस्र श्वापदांकडून तपस्येत अडथळे आणायचा प्रयत्न केला. एकीकडे कोवळे बालक, आणि दुसरीकडे वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, साप. पण बालक अविचलित. श्वापदांनी हल्ला अधिकच तीव्र करता बाळाभोवती सात ऋषींनी संरक्षक घेरा तयार केला. त्यांच्या तपसामर्थ्याने व सुरक्षा कवचाने श्वापदे निष्प्रभ झाली.

नाईलाज म्हणून इंद्राने मग कपटनीती अवलंबिली. धृवबाळाची आई, सुनीतीचे रूप घेतले. वनात जाऊन त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी काहीच उपाय न चालल्यामुळे सर्व देव भगवान विष्णूकडे गेले. त्रिलोककंपन सुरूच होते. धरती चळचळा कापतच होती. देवांची स्थिती पाहून नारायणाने काय तो निर्णय घेतला व निश्चिंत होण्याचा त्यांना अनुरोध केला.

ना: बापरे! एवढे सर्व एका बालकाच्या तपस्येमुळे? पण नारदा, हे त्रिलोककंपन, हे इंद्राचे सिंहासन डळमळणे हा काय रे प्रकार? असे शक्य तरी आहे का?

ना: हेही रूपकच असावे. हवा, प्राणवायू हा चराचर सर्व प्राण्यांना हवा. त्याच्यावर सर्वांचा सारखा हक्क. एकाचाही जर जीव त्याच्या अभावामुळे कोंडला तर त्याची झळ सर्वांनाच लागते. असा उदात्त अर्थ असावा. असो.

शेवटी विष्णुभगवान मी जसे वर्णनिले होते त्याच सगुण रूपात धृवासमोर प्रकटले. बाळाने डोळे उघडले तर समोर तेच दिव्य रूप जे मी त्याच्या मनात ठसविले होते व त्याच्या मनातही व्यापले होते. क्षणभर त्याला वेगळे काहीच वाटले नाही. क्षणभर वाटले हा भास असावा वा आपलेच मन आपल्या चक्षूसमोर आले असावे. पण नंतर नारायणाचे बोल कानांवर आले आणि तो थक्क झाला. त्याचे तप भगवंताने मान्य केले होते व दिव्यदर्शन दिले होते हे त्याच्या गळी उतरले व त्याने जगन्नियंत्यापुढे लोटांगण घातले. नेत्रातून घळाघळा अश्रू वाहू लागले.

नारायण वदले, वत्सा! तू माझा सर्वात लहान योगी. बालवयातच काय, पण कधीच कोणीही आजपर्यंत न असे तप केले, न कोणी करेल. तुझी माझ्यावरची अढळ श्रद्धा पाहून मी प्रसन्न झालो आहे. माग, जे हवे ते माग.

ब्र: नारदा, माझेही डोळे पाणावले रे. धन्य ते बालक आणि धन्य तो दयाळू दाता! काय, मागितले तरी काय त्या महायोगी बालकाने?

ना: ब्रह्मा! अघटित घडले. साक्षात नारायणाने नराला इच्छावर दिला. पण त्या नराचे, त्या बालकाचे, त्या मनुवंशजाचे, त्या मानवाचे मुखातून शब्दही निघेना. त्याची वाचाच जणू त्याच्यावर रुसली. शरीरबाह्य देव प्रसन्न, पण शरीरच अप्रसन्न!

ब्र: मग पुढे?

ना: अगदी लहान मुलासारखा 'पुढे सांग ना' म्हणतो आहेस. तुझे समोरचे दोनही डोळे बघ कसे विस्फारले गेले. मला खात्री आहे, डाव्या, उजव्या, व मागच्या चेहऱ्यावरचे सहा डोळेही विस्फारले असतील. पुराणातलीच भाषा वापरायची तर तुझे आठही कमलनयन आता पूर्ण उमलले असतील. ब्रह्मा, पुराणातली भाषा किती सुंदर, सालंकृत, सुसंस्कृत, शालीन, मृदु, समृद्ध, मधाळ, वगैरे वगैरे असते. मला खूप आवडते! त्यासाठी तरी वेदपुराणांचा अभ्यास करावा. हा आस्तिक नास्तिक धुमाकूळ त्याच्या आड तरी येऊ नये असे मनोमन वाटते.

ब्र: नारदा, तू भाषेच्या बाबतीत तसा फार हळवा आहे. पट्टीचे कीर्तनकार असतातच म्हणा. ते दक्षिणामूर्ति मंदिरातले बाळशास्त्रीच घे ना,  ज्यांच्याबद्दल तू मला नेहमी सांगायचास. तू बाळधृव म्हणाल्यापासून मला सारखी त्यांची आठवण येते आहे. पण तूर्तास बाळधृवाकडे वळावे मुनी!

ना: ब्रह्मा, भक्ताची ही स्थिती नारायणाला समजली. त्याच्या मनात काय हेही त्याला कळलेच होते. अरे, अंतर्बाह्य नारायणच नारायण. बाळच पूर्ण नारायणमय झालेला. त्याने खरे तर तोंड उघडून काही मागावेच असे आवश्यक नव्हते. मनातली अप्रकट, निःशब्द इच्छा पण त्या मनोवेधी देवाने पूर्ण केलीच असती. पण, काय त्याच्या मनात आले कोण जाणे. त्याने बालकाच्या गालाला पाञ्चजन्याने हलकेच स्पर्श केला. आणि मग?

ब्र: मग काय? सांग सांग. पुढे सांग. त्वरित सांग.

ना: ब्रह्माजी, आज जरा थकल्यासारखे वाटत आहे. उद्या इथूनच सुरू केले तर चालेल का?

ब्र: नारदा! छळू नको. पट्टीच्या कीर्तनकारांची ही ट्रिक वापरू नको. उत्कंठा ताणू नको.

ना: बरे बरे. शंखस्पर्श होताच बालमुखात शब्द आले. लहान मूल अचानक बोलायला लागते तसे. पण त्याने काही मागितले नाही. नारायणाचे अद्भुत रूप पाहून त्याच्या तोंडातून स्तुतिवचने निघायला लागली. ब्रह्मा, त्याने केवळ बारा श्लोकात केलेली विष्णुस्तुती 'धृवस्तुती' म्हणून प्रसिद्ध आहे.

ब्र: हे बरं कळतं रे सगळ्यांना लहान वयापासून! आधी तुझी स्तुती. आता नारायणाची. आधीच तो प्रसन्न. आता तर तो अतिप्रसन्न होईल. समजावून सांगतो का मला ती स्तुती? बाराच तर श्लोक. आधी एक एक श्लोक म्हण, मग संधीविग्रह कर, मग शब्दार्थ सांग, मग साध्या सोप्या भाषेत लौकिकार्थ, गर्भितार्थ व व्यंगार्थ सांग. ते तुझं व्यंजना वगैरे.

ना: ब्रह्मा, ते आता सोड. तुला मी श्रीमद्भागवताची लिंकच देईन. नाहीतर गूगल कर. नाहीतर शेजारच्या देवळात भागवत सप्ताह नेहमीच होतो. जाऊन बैस.

ब्रह्मा, धृवस्तुती फक्त बारा श्लोकांची आहे. तेवढ्या संक्षिप्त उत्स्फूर्त काव्यात सहा वर्षाच्या बालकाने नारायणाच्या नारायणत्वाचे गुणगान गाईले आहे. खरे तर इश्वरस्तुतीला अंत नाही.

असितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धु पात्रं
सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वी ।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं
तदपि तव गुणानां ईश पारं न याति ॥

काळ्या पर्वताला समुद्रात विरघळून समुद्रालाच शाईची दौत केली व एखाद्या देववृक्षाची, उदाहरणार्थ कल्पतरूची, फांदी टाक किंवा बोरू म्हणून वापरली, आणि साक्षात सरस्वतीने नारायणाची स्तुती पृथ्वीला कागद मानून लिहिली, तरी अपुरी पडेल असा ह्या श्लोकाचा अर्थ.

धृवस्तुतीत एका श्लोकात धृव मर्त्यलोकातल्या मनुपुत्रांच्या संकुचित दृष्टीचं वर्णन करतो. तो विष्णूला म्हणतो की तुझे भक्त तुला फक्त कल्पवृक्ष समजतात. त्यांच्या तुच्छ इच्छापूर्तीसाठी ते तुला सतत काहीतरी मागत असतात. ह्या हाडाच्या सापळ्याकरिता ते जे मागतात ते तर नरकात सुद्धा प्राप्त असते. पण मागणाऱ्यांचा दृष्टिकोनच संकुचित असेल तर दाता तरी काय करेल?

आणि म्हणून हा ज्ञानी घृव भगवंताला काहीच मागत नाही. फक्त भक्त म्हणून पादारविंदाजवळ जागा द्यावी एवढेच मागणे मागतो.

ब्र: पण नारदा, यात तर सुरुचीचाच विजय आहे. उत्तमच पुढे राजा होईल. धृवाने ते तर मागितलेच नाही जे नाकारल्यामुळे त्याने आहत होऊन कठोर तपस्येचा निर्णय घेतला. काकूंच्या भाषेत, सगळं मुसळ केरात! अगदी ऐनवेळी धृवबाळाचा अवसानघात झाला.

ना: पण ब्रह्मा, धृवाचं मन नारायणमय झाल्यामुळे नारायणाला सर्वच माहीत होते. त्याने सर्व काही ऐकले, धृवाचे अभिनंदन केले व त्याला वरदान दिले. वरदानाप्रमाणे धृवाला परतून घरी जायला सांगितले. त्याचे प्रेमाने स्वागत होऊन पित्यानंतर त्याचाच राज्याभिषेक होईल व तो ३६००० वर्षे राज्य करेल असे भाकीत केले. त्यानंतर त्याने वैकुंठास नारायणाकडे यावे व नारायणाकडून अढळ स्थान प्राप्त करावे असे सांगितले.

ब्र: नारदा, हे ३६ चे कां एवढे महत्त्व रे गोष्टींमधे? धृवानी राज्य केले ३६००० वर्षे. रामानीही तेवढेच. कृष्णाचेही तसेच. एका तासात ३६०० सेकंद. एका वर्षात ३६० दिवस.

ना: ब्रह्मा तुला गणितात रस यायला लागला. नाहीतर तुझा ३६चा आकडा होता गणिताशी. ते आता असू दे. गोष्ट जाऊ दे पुढे.

तर ब्रह्मा! बाळ घरी आला. काळ पुढे गेला. विष्णुवचन सत्य झाले. आज तोच धृवबाळ रात्री उत्तरेला दिसणाऱ्या अढळ धृवताऱ्यावर विराजमान आहे. अमर आहे. मधुवनात तपस्याकालात त्याचे संरक्षण करणारे सात ऋषी, सप्तर्षी आजही आकाशात, अरण्यात बाळाभोवती जसे फेऱ्या मारून त्यास सुरक्षाकवच प्रदान करीत असत, तसे देतात. धृवताऱ्याजवळच आणखी एक तारा आहे त्यावर त्याची आई सुनीती विराजमान आहे.

ब्रह्मा, धृवतारा आजही रात्रीच्या आकाशात दिसतो. त्याभोवती फेरा मारणारे सप्तर्षी पण दिसतात. माझ्या गोष्टीच्या सत्याची ते प्रचीतीच देतात. नाही का?

ब्र: अरे मग असा हासतोस कां? दिसते तसे नसते । म्हणून जग हसते।। असे तू एकदा म्हणाला होतास. कापूसकोंड्याच्या ह्या गोष्टीतही तसेच आहे की काय? नाहीतर मला वाटले की गोष्ट खरी, म्हणून तू खरा. तू खरा, म्हणून मी खरा.

ना: मी आधीच सांगितले की कापुसकोंड्याच्या गोष्टीतले कापुस आणि कोंडा हे ऐकणाऱ्याने वेगवेगळे करायचे असतात. नीरक्षीर विवेक त्याच्या ठायी असावा लागतो.

तुला मदत म्हणून मी थोडी आणखी माहिती देऊ शकतो. ब्रह्मा, धृवतारा स्थिर दिसण्याचे व सप्तर्षी त्याच्याभोवती पिंगा घेतात ह्या सत्य निरीक्षणाचे विज्ञाननिष्ठ कारण सूर्याभोवती फिरतांना पृथ्वी रोज स्वत:भोवती पण तिच्या उत्तर-दक्षिण धृवांना जोडणाऱ्या रेषेभोवताल एक गिरकी घेते हे आहे. पूर्ण ३६० डिग्री! अरे, पुन्हा ३६. असो. त्याच रेषेवर अवकाशातील धृवतारा असल्यामुळे तो स्थिर आहे असे पृथ्वीवरून पहाणाऱ्यांना वाटते. ब्रह्मा, पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील मनुपुत्रांना तर हा तारा दिसतपण नाही. अवकाशयानातल्या यात्रींना तो अढळपदी नाही हे माहीत आहे.

आणखी सांगायचे म्हणजे, ब्रह्मा, धृव तारा हा स्वयंभू सूर्य आहे. त्यावर आपल्या सूर्यावर असते तशी आग आहे. त्याचे तापमान अंदाजे ४५०० सेंटिग्रेड आहे. १०० डिग्रीवर पाणी उकळते, १५०० वर लोह वितळते. ४५००-५००० वर फक्त उदजन वायू व हिलियमच असतात. ना आपल्या सूर्यावर, ना धृवावर इतर काही असू शकते. जीवजंतू तर सोडच.

आणखी एक गोष्ट म्हणजे धृवतारा हा पृथ्वीपासून वा कैलासापासून अंदाजे २००००००००००००००० मैल दूर आहे. दोनावर पंधरा शून्य. तुझी चार, माझे एक व रावणाची दहा तोंडे मिळून पंधरा. तिथला प्रकाश इथे यायला ४०० वर्ष लागतात ब्रह्मा. आणि प्रकाशाचा वेग सेकंदाला १८६०००, म्हणजे १ लक्ष ८६ हजार मैल आहे. गंमत नाही. तिथे कसा जाणार रे धृव सदेह?

ब्र: बापरे! सगळे अफाटच. काय ही गोष्ट. कल्पकतेची खरोखरच कमाल! कौतुक करावं वाटतं कथाकाराचं ज्यानी अवकाशात नित्य दिसणाऱ्या ग्रहताऱ्यांना घेऊन ही सुंदर गोष्ट गुंफली व गोष्टीद्वारे बोध दिला. धन्यच नाही का जो कोणी असेल तो? आणि गोष्टीच्या अचाटतेतच ही सत्यकथा मानू नये असा प्रामाणिक इशारा आहे.

ना: होय ब्रह्मा. माथा झुकवावा अशी ही गोष्ट. लहानांना जरूर सांगावी अशी ही गोष्ट. कापुसकोंड्याची गोष्ट.

ब्र: नारदा, मग सप्तर्षींची पण नावे आहेत का रे?

ना:अर्थातच! पुराणातल्या सगळ्या गोष्टी सर्वार्थाने संपूर्ण आहेत. सगळ्या गोष्टीतल्या सगळ्या पात्रांची पाळेमुळे खणून सर्व धागेदोरे व्यवस्थित जोडलेले आहेत. ब्रह्मा, हे प्राचीन कथाकार सामान्य नाहीत रे. सामान्यांनी त्यांची थट्टा करणे म्हणजे सूर्यावर पाण्याचे शिंतोडे उडविणे. 'तसा बालगंधर्व पुन्हा न होणे' मधे जो कलाकाराविषयी आदर आहे तोच त्यांच्याविषयी सुद्धा हवा.

ब्र: पण ते सप्तर्षी कोण कोण?

ना: ब्रह्मा, धृवाची गोष्ट भागवत पुराणात आहे, विष्णुपुराणात पण आहे. गोष्ट तीच आहे तरी थोडीफार वेगळी पण आहे. सप्तर्षींची नावे पण वेगवेगळी आहेत. एक दोन नावे इकडची तिकडे होतात. असे वाटते की जो कोणी कथा लिहितो तो आपल्या आवडत्या ऋषीचे नाव घुसवतो व नावडत्या ऋषीचे नाव बाहेर काढतो. एकूण आकडा सात असला म्हणजे झाले.

एका प्राचीन ग्रंथाप्रमाणे वसिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, गौतम, भारद्वाज आणि अत्रि हे ते सप्तर्षी. हेही सत्ययुगापासून आलेले दिसतात. ब्रह्मा, हे सारेही तुझेच मानसपुत्र असेही म्हणतात. सर्वांचेच वंश फोफावले. मास्तर किती अभिमानाने 'वसिष्ठगोत्रोत्पन्नोहं' म्हणायचे संध्यापूजा करतांना.  असो! नंतर एका ग्रंथात भृगु ऋषींचे नावही सप्तर्षीत समाविष्ट करण्यात आले. आठ ऋषींचे सप्तर्षी.

ब्र: असे कसे होईल? आठ दिसत असतांना सात मोजणे मास्तरांना आवडले नसते बरे नारदा! केळ्याचे बरोबर ९ तुकडे ते करायचे असे तूच सांगायचा.

ना: अरे चालतं. सात दिवसांचा आठवडा चालतो तर आठ ऋषींचे सप्तर्षी का चालू नये? इतका काटेकोरपणा गोष्टीत, कवितेत नसावा. थोडासा लवचिकपणा असावा.

ब्र: तेही खरेच म्हणा. नारदा! आणखी एक गोष्ट मला राहून राहून वाटते. आजच वाचलेल्या हरिपुत्र पुराणात, म्हणजे त्या हॅरी पाॅटर मध्ये व आपल्या धृवबाळामधे काहीतरी साम्य आहे असे मला वाटते.

ना: ब्रह्माजी, असेलही. भागवताच्या ज्या खंडात ही गोष्ट आहे त्याचे शीर्षक 'नशीबवान बालकाची कथा' असे काहीसे आहे. हॅरी पाॅटरला पण 'मुलगा, जो जिवंत राहिला', 'The boy who lived' किंवा 'द लकी वन' असे म्हणतात. शत्रूनी ज्यांच्या मृत्यूची इच्छा केली पण जे स्वकर्तृत्वाने टिकले अशी ही दोन्ही नशीबवान मुले. कवी काय किंवा कथाकार काय? आधीच्या गोष्टी ऐकत ऐकतच मोठा होतो. भोवतालच्या अनुभवांनीच समृद्ध होतो. त्याचेच घुसळण त्याचे मन करते व ताजे कथालोणी जन्म घेते. म्हणून तर कापुसकोंड्याच्या गोष्टींचे महत्त्व. त्या ऐकणे, वाचणे, सांगणे, कापुस व कोंडा वेगळा करणे व तत्कालीन परिस्थितीनुरूप आपला भाषाविलास करीत नवनिर्मिती करणे हीच साहित्यसेवा. ती सर्वांनीच करावी. सर्वच जण साहित्यिक.

ब्रह्माजी, मला नेहमी असे वाटते, ही आजपर्यंतची साहित्यसंपदा, हे संचित पिढी दर पिढी वाढत वाढत पुढे जायला हवे. पौराणिक कथांमागची कल्पकता, त्यांची सुसूत्रता, त्यांची काव्यबद्धता, काव्याची वृत्तबद्धता, त्यांची लयबद्धता, वृत्तांचे सौंदर्य अनोखे आहे. त्या सत्यकथा मानणे हा त्या अलौकिक साहित्यनिर्मात्यांचा व त्यांच्या तितक्याच अलौकिक निर्मितीचा खरे तर अपमान आहे.

आयुष्य सारे अनंत कापुसकोंड्याच्या गोष्टींचे पठण, चिंतन, मनन करण्यात जावे. अशीच एखादी कापुसकोंड्याची कधी न संपणारी गोष्ट मनात घोळता घोळता .....

ब्र: घोळता घोळता काय?

ना: ब्रह्मा, आपल्याला तेही भाग्य नाही. आपण पडलो अमर.

ब्रह्माजी, जंतुकवीच्या मला आवडणाऱ्या एका कवितेने आजची कापुसकोंड्याची गोष्ट संपवू या.

कापुसकोंड्या स्वप्नात आला
गोष्ट झाली सुरू
सकाळ झाली, दुपार गेली
स्वप्न आपले सुरू

या स्वप्नाला अंतच नाही
कुठे न या एक्झिट
अनंत धाग्याचे भेंडोळे
प्रवास याचा सुरू

_____________________