Monday, 23 November 2015


गोष्ट चौथी


काकू: अहो! इकडे या पटकन. बघा काय झाले ते.

काका: अगं, मी फुले तोडतो आहे. घटस्थापना आहे ना आज. हार करायला नको का? तिथूनच सांग काय झाले ते.

काकू: अहो! काँप्युटरच्या टेबलवर बघा हे काय दिसते.  मोठमोठे गोल उमटले आहेत. काल रात्रीपर्यंत नव्हते. रात्रीतूनच आले असतील.

काका: अगं तुझ्यामाझ्याशिवाय घरात आहेच कोण? सकाळपासूनही कोणी आले नाही. मोज किती गोल आहेत ते. मी पण आलोच बघ.

काकू: एक, दोन, तीन, ..... नऊ, दहा. अहो दहा आहेत.

काका: अरे रामा! आज घटस्थापना. देवीचे नवरात्र सुरू. दहा दिवसांनी दसरा. आणि हे दहा गोल काय? रावणाची दहा तोंडे की काय? अरे देवा!

नारद: ब्रह्माजी उठा. तुमच्या हातून टेबलावर उमटलेल्या शून्यांनी कहर केला आहे.

ब्रह्मा; खरेच की काय? की तुझी कापुसकोंड्याची गोष्ट?

ना: देवा, खऱ्यात आणि कापुसकोंड्याच्या गोष्टीत फरक ऐकणाऱ्यानी करायचा असतो. सांगणाऱ्यानी नाही. आज मी तुला वा तू मला कापुसकोंड्याची गोष्ट सांगायची गरज नाही. गोष्ट घडणार आहे. कदाचित ह्या घडणाऱ्या गोष्टीत कापुसकोंड्याची गोष्ट दडलेली असेल तर मला माहीत नाही. आज आपण फक्त श्रोते. डोळे उघडे ठेऊन बघायचे व कान उघडे ठेऊन ऐकायचे. शक्यतोवर तोंड उघडा़यचे नाही. काय?

ब्र: ठीक आहे बाबा! आपण अदृष्य असल्याचा आज चांगलाच फायदा होईल. अगदी जवळून सगळे पाहता येईल. मला सगळे समजेलच असे नाही. तू आहेसच शंका निरसन करायला. कानात विचारीन तुझ्या.

काकू: अहो या लवकर. भानामती असेल असे वाटते. माझ्या मैत्रिणीच्या घरच्या बोर्डवर पण रात्रीतून असेच काहीतरी उमटायचे. भानाम़तीचा प्रकार निघाला. नऊ दिवस अखंड नवनाथ मंत्राचा जप केला तेंव्हा कुठे अरिष्ट टळले.

काका: अग, आपल्याला यातलं काही माहीत नाही. समजत नाही. भानुमती का भानामती ऐकलं खरं, पण आपल्याला अनुभव नाही. आज अनायासे पूजा सांगायला गुरुजी यायचेच आहेत. त्यांना विचारू. ते म्हणतील ते करू. सगळं ठीक होईल. तू म्हणजे, ... आपलं म्हणजे, ... हे म्हणजे, ... खूपच बा!

काकू: अहो तसं नाही. काळजी वाटणं साहजीकच आहे. अशा अनपेक्षित गोष्टी बहुतेक अशुभ असतात. नवरात्रच नेमकं अपशकुनानी सुरू झालं तर पुढे काय होईल? केव्हा गुरुजी येतील असे झाले आहे.

काका: अगं बाई, शांत हो आता. भित्यापोटी ब्रह्मराक्षस म्हणतात तेच खरे.

ब्र: नारदा मला राक्षस म्ह्णाले का रे? त्यांना कसे कळले मी टेबलावर गोल काढले म्हणून. तू तर म्हणाला आपण अदृष्य आहोत म्हणून.

ना: ब्रह्मा, 'भित्यापोटी ब्रह्मराक्षस' हा वाक्प्रचार आहे. ज्याला भीती वाटते, जो घाबरतो, त्याच्या मनात वाईटाहून वाईट विचार येतात. त्या वाईट विचारांचे स्वरूप अफाट असू शकते. या विचारांना, भीतीमुळे उठणाऱ्या पोटातल्या अवास्तव, निराकार, निराधार, निर्गुण गोळ्याला ब्रह्मराक्षस म्हटले आहे. तसा तुझ्या निराधार, अवास्तव, पण तरीही सत्य मानण्यात येणाऱ्या अस्तित्वाकडे अंगुलीनिर्देश नाहीच असे म्हणता येणार नाही. पण तू, मी येथे वावरतो हे काका काकूंना कळले वा त्यांना जराही संशय आला असा याचा अर्थ नाही.

ब्र: मग ठीक. मला आपली उगीचच भीती वाटली.

ना: ब्रह्मापोटी ब्रह्मराक्षस, आणखी काय!

ब्र: हास, हास. नारदा, तू म्हणजे, ... आपलं म्हणजे, ... हे म्हणजे, ... खूपच बा!

काका: आलेच बघ गुरुजी. गुरुजी, शंभर वर्षं आयुष्य आहे बघा तुम्हाला. अगदी तुमचीच आठवण करीत होतो आम्ही.

गुरुजी: हं. घरून वेळेवर निघालो. पण येता
येता पुन्हा परतावे लागले. वाटेत नेमके आज मांजर आडवे गेले. आज घरोघरी पूजा, नवरात्र स्थापना तुमच्याकडे. त्यामुळे अपशकुनाकडे दुर्लक्ष केलेले चालणार नव्हते.

काकू: अगं आई! आज सकाळपासून अपशकुनच अपशकुन. गुरुजी, आमच्या घरी पण बघा काय झाले ते.

गुरुजी: आलोच पाय धुऊन.

काका: या गुरुजी. हे बघा. काल रात्री मी बराच वेळ काँप्युटरवर सर्फिंग करीत होतो. झोपायला जाण्याआधी टेबल साफ करून उठलो. सकाळी आम्ही उठलो तर हिला टेबलवर हे १० गोल गोळे उमटलेले दिसले. आम्ही सोडून घरात कोणीच नाही. आणि तसेही इतक्या आतपर्यंत कोणाला घरात प्रवेश नाही. टेबलवर दहा गोळे पाहून आमच्या दोघांच्याही पोटात गोळे उठले.

गुरुजी: म्हणजे एकूण बारा गोळे म्हणा की. हाऽ हाऽ हाऽ हाऽ.

काकू: गुरुजी, तुम्हाला थट्टा सुचते आहे. इथे माझ्या तोंडचे पाणी पळाले आहे. मला तर भानामतीचा प्रकार वाटतो आहे. हल्ली ती आपल्याच एरियात आहे असे म्हणतात.

गुरुजी: असेलही आणि नसेलही. आज नेमका घटस्थापनेचा दिवस. दहा दिवसांनी दसरा. आणि म्हणून रावणदोष पण नाकारून चालत नाही. तो महा भयंकर. भानामती परवडली एक वेळ. तुमच्याकडे येतांना नेमकी मांजर आडवी गेली यातही काही संकेत असेल असे आता वाटायला लागले आहे. आणि आता हा पालीचा चुकचुक आवाज.

काका: गुरुजी, आधी जरा एक कप गरमागरम चहा घ््या बघू. मग सांगा काय उतारा करायचा ते. तुम्ही म्हणाल ते करू. अरिष्ट टळले म्हणजे झाले.

ब्र: नारदा, झालं यांच चहापान सुरू. काहीही झाल तरी त्यावर रामबाण उपाय. मला तर वाटतं की रोज चहाच्या पाण्यानी ते दहा गोल पुसले तरी ते पुसट होत होत नाहीसे होतील. नाहीतरी चहाच्या भांड्यात तळाशी रोज थोडा चहा उरलेला असतोच.

ना: ब्रह्मा, इतका सोपा उपाय इथे नाही चालत बाबा. उपाय कसा भारदस्त असायला हवा. तहान लागली तर 'पाणी प्या' हा उपाय नाही. तृष्णादोष असू शकतो. योग्य तो उपाय करायलाच हवा. दोषनिवारण विधीपूर्वक व्हायला हवे. बघ पुढे काय होते ते.

गुरुजी: चहा मात्र उत्तम हं. वहिनी, दहा कप चहा करायला हवा अजून. तुमच्या घरी दशानन आलेले आहेत. त्यांची काही खातिरदारी नको का?

काकू: गुरुजी, थट्टा नको, पण तुम्हालाही ती रावणाची तोंडे वाटतात का? यांनाही तसेच वाटले. मला वाटते भानामतीचा प्रकार असावा. नवनाथ मंत्राच्या जपाला ती घाबरते असे ऐकले होते.

गुरुजी: वहिनी, एरवी कुठल्या दिवशी अशी तोंडे उमटली असती तर मीही आधी तोच उपाय केला असता. पण नेमकी आज ती उमटली म्हणून रावणाची शक्यता दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यातही तुम्ही बारकाईने पहाल तर डावीकडून ५ नंबरचे तोंड आकाराने थोडे मोठे आहे. त्याखाली रावणाची मान असली पाहिजे. म्हणजे रावण पाठमोरा नाही. आपल्याकडे बघतो आहे. येतो आहे, जात नाही. जात असता तर डावीकडून ६वा गोल थोडा मोठा असता. रावण दहन पाहणाऱ्यांना हे समजेल. मी तर म्हणतो भानामती आणि रावण, दोन्हीचा इलाज करावा. काहीही असले तरी आपली सुटका होईलच होईल.

काका: पण गुरुजी, त्या तोंडांचा तसा आपल्याला काही त्रास नाही. टेबलक्लाॅथ टाकला तर दिसणारही नाहीत. मग असा घाबरून जाऊन उतारा बितारा कशाला? राहतो तर रहा बाबा. तसेही आमच्या घरात असेच आत्मे वावरतात म्हणे. मागे नाही का स्वैंपाकघरातला एक पेलाच दोन दिवस गायब झाला. नंतर आपण होऊनच परत आला. बरेचदा चित्राहुती जेवण होण्याआधीच गायब होते. दशाननाला पण वावरू दे काही दिवस.

गुरुजी: तुम्ही ठरवा बाबांनो. पण कानाडोळा करण्यासारख्या ह्या गोष्टी नाहीत. मोठा अनर्थ होऊ शकतो.

काका: पण मी म्हणतो, रावण कां येईल?

गुरुजी: अहो, रामायण त्रेतायुगात, महाभारत द्वापारयुगात घडून गेले हे खरे. पण रावणाचे रामाशी वैर, भावाभावातील भाऊबंदकी आज कलियुगातही कोणत्या ना कोणत्या रूपात दृग्गोचर होतेच. म्हणूनच तर हरिविजयातले युद्धकांड, रामायणातले अरण्यकांड आजही घरात कोणी वाचत नाही. वाचायचेच झाले तर देवळात वाचावे असे सांगतात. 'युद्धस्य कथा रम्या' म्हणून कोणी महाभारत युद्धाचे घरी पारायण करीत नाही. युगे उलटली तरी राम-रावण भांडण संपले नाही. ते व्यक्तींचे नसून वृत्तींचे युद्ध आहे. सत्यासत्यतेचे युद्ध आहे. त्याला युगसीमा नाही. कलियुगात तर ते अजूनच भयानक रूपात प्रकट होते. तुम्हाला हवे असेल तर होऊ द्या तुमच्या गृहलंकेत राम-रावण युद्ध १० दिवस. दसऱ्याला काय तो निकाल लागेल. मला काय, मी आपला पूजा सांगून परत जातो. पण हितैशी म्हणून सांगतो की संकटाला देठापासून खुडून टाका. विषाची परीक्षा पाहणे योग्य नाही.

काकू: नाही नाही गुरुजी. तसं अजिबात नाही. तुम्ही म्हणाल ते आम्ही करू.

काका: होय गुरुजी. सर्व उपाय करा आणि आमची सुटका करा.

गुरुजी: ऐका तर मग. भानामतीची ट्रीटमेंट तशी स्टँडर्ड आहे. पाच वर्षंाची गॅरंटी पण आहे. फक्त तीन दिवस रोज सकाळी तीन तास तिघांनी तीन खोल्यात नवनाथ मंत्राचा जप करायचा. भानामतीला सळो की पळो होईल. दहा तोंडे जशी अचानक उमटली तशी तिसऱ्या दिवशी अचानक गायब होतील. नंतर पाच वर्ष तरी पुन्हा त्या अवदसेची चिंता नको.

काका: गुरुजी, तसेच करू. पण तिघे कोण? तुम्ही आणखी दोघांना घेऊन याल का? आणि तीन दिवस तीन तीन तासाऐवजी एकाच दिवशी ९ तास करून नाही का होणार. नाही म्हणजे, तीन त्रिक नऊ म्हणून म्हटलं.

काकू: ते मात्र खरच. एका दिवसात काम खतम्.

गुरुजी: काम खतम्, पैसा हजम्! हाऽ हाऽ हाऽ! तसं नसतं हो. तीन तास तीन खोल्यात मंत्रोच्चार झाला की तुमचं ७०० स्क्वेअर फूटचं घर मंत्रशक्तीनी भरून जाईल. नंतर मंत्र म्हणून न म्हणून काही फायदा नाही. मंत्र घरात मावणार नाहीत. मग ते शेजारी पाजारी जातील व त्यांचा फायदा होईल. तो आपण कशाला करायचा. जाऊ दे की भानामतीकाकूंना शेजारी. ही मंत्रशक्ती एक दिवस टिकते. म्हणून दुस-या दिवशी पुन्हा तीन तास जप. असा हिशोब असतो. तुमच्या ७०० स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटप्रमाणेच मी सांगितले. अगदी भानामती स्पेशल ट्रीटमेंट आहे.

काकू: बरं, करू तीन दिवस. पण तिघे कोण?

गुरुजी: तुम्ही दोघे आणि मी. म्हणजे खर्च कमी पडेल. तुम्हाला दक्षिणा नको.

काकू: अहो पण मला आॅफिसमधे inspection आलं आहे. अर्धा दिवस पण सुटी कठिण आहे.

काका: माझी पण तीच अडचण. क्लोजिंगचे दिवस आहेत. अर्धा दिवस काय, एक तास सुद्धा उशिरा जायची सोय नाही. आमचे साहेब म्हणजे भानामतीकाकूंचे यजमानच हो!

गुरुजी: हाऽ हाऽ हाऽ! मग आॅफिसमधे पण म्हणा नवनाथ मंत्र. काय?

काका: ही बरी आयडिया दिली हो.

गुरुजी: आणखी दोघे मंत्रोच्चाराला मिळणे कठिण हो. डबल दक्षिणा देऊन सुद्धा आजकाल कोणी मिळत नाही. असं करू, एका खोलीत मी बसतो, दोन खोल्यात रेकाॅर्ड लावू. मी आणीन सीडी प्लेअर. त्याचे पैसे दक्षिणेपेक्षा जरा कमीच पडतात. तुम्ही आॅफिसमधे गेले की लावून देईन रेकाॅर्ड.

काका काकू: ते उत्तम.

गुरुजी: आता राहिली non-भानामती ट्रीटमेंट. हा जर भानामतीचा प्रकार नसेल तर मग खरेच रावणप्रवेश झाला असावा. त्याचा इलाज करायला हवा. रावण म्हणजे काही साधासुधा नाही. त्याला हँडल करायला विष्णूला सातवा अवतार, प्रभुरामचंद्र अवतार घ््यावा लागला. मी तर नुसता भडभुंजा. तरी पण प्रयत्न करू. आज नवरात्र बसले की चंडिकेचा वास तुमच्या घरात आहेच. त्याचाही फायदा होईलच. जोडीला 'युगद्वारप्रहरी' यज्ञ करू रोज. यामुळे आधीच्या युगात झालेल्या राक्षसांना आजच्या कलियुगात प्रवेश घेणे कठिण जाते. नाकाबंदी सारखा हा प्रकार आहे. त्रेतायुगातल्या रावणाला नाकाबंदी तोडून, द्वापारयुग ओलांडून कलियुगात येणे कठिण जाईल. रोजचा यज्ञ झाला की यज्ञाच्या पवित्र मंत्रभरीत तीर्थाने मंत्रोच्चारासह ती दहा तोंडे पुसली की दहा दिवसात ती लुप्त होतील. पहिल्या तीन दिवसातच हे टेबलवरचे गोल गेले तर भानामतीचा प्रकार म्हणता येईल. मग पुढचे सात यज्ञ करायची गरज नाही. तेवढाच तुमचा पैसा वाचेल. तीन दिवसात गोळे नाहीच गेले तर मग नक्कीच रावणप्रवेश म्हणावा लागेल. मग उरलेले सात दिवस यज्ञ सुरू ठेवावा लागेल. दशमीला रावण पूर्णतया काढता पाय घेईल. खर्च वाढेल. पण रावणसंकटापुढे पैसा गौणच मानला पाहिजे. नाही का?

काका: हो, ते खरेच. पण गुरुजी, आम्हा दोघांना ह्यातले काहीच जमणार नाही. रोज तुम्हीच येऊन काय ते करा. घराची किल्लीच तुम्हाला देतो. आम्ही आॅफिसमधे गेल्यावर तुम्ही तुमच्या सवडीने या व तो जप, यज्ञ, पूजा वगैरे करा. आमची नावे, पूर्वजांची नावे, गोत्र, गण वगैरे आताच लिहून घ््या. पूजेत ती लागतील तुम्हाला. अॅडव्हांस दक्षिणा पण ठेवा. सविस्तर सगळं होऊ द्या. पूर्ण पाॅवर आॅफ अटर्नी तुम्हाला.

काकू: होय गुरुजी. आम्ही आपले संध्याकाळी टेबलवर रावण आहे की नाही तेवढे मात्र बघू.

गुरुजी: तुम्ही पूर्ण कार्यच मला outsource करता आहात. जमानाच तसा आहे. करीन बापडा. तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळा, मी माझा. पण आता मी जातो. पुजेचं, मंत्रोच्चाराचं, यज्ञाचं सामान गोळा करून आणतो. तुम्ही तेवढी घटस्थापनेची तयारी करा. देवीचा परकर, घटाची समई वगैरे तयार ठेवा. फुलं आहेतच. बाकी असू द्या. अक्षदा मात्र भरपूर असू द्या. बाकी देवीचं नवरात्र वगैरे मी मांडून घेईन.

ना: ब्रह्मा, बघ तुझ्या रात्रीच्या करामतीने केवढा प्रसंग आणला बिचाऱ्या काकाकाकूंवर. गुरुजींना दहा दिवस आता काही दुसरं गिऱ्हाईक बघायला नको. काकाकाकूंना मात्र तू खूप खर्चात पाडलस बाबा. रोजचे कमीककमी १०००० रुपये. म्हणजे दहा दिवसांचे १००००० रुपये. एक लाख मानवमुद्रा. एकावर पाच शून्य. ते आता कुठे टेबलवर बीबलवर नको लिहूस. नाहीतर चार तुझी आणि एक माझे मिळून पाच तोंडे आहेत असा अर्थ काढतील. मग तर देव दानव युद्धच सुरू होईल.

ब्र: नारदा, चूक झाली काल रात्री. आता पुन्हा नाही व्हायची हो.

काका: अगं चल, लोकल चुकेल. मग टॅक्सीचा खर्च. आता काटकसर करायला हवी.

काकू: चला. आणि हो. ते पिकनिक वगैरे कँसल हो. पुढच्या वर्षी बघू.

ना: ब्रह्मा बघ. भीतीचा दशानन यांना काय काय करायला लावतो ते. खुट्ट झालं की हे देवाकडे धावतात. वाट्टेल तेवढा खर्च करतात. तुला आणि तुझ्या वंशजांना वश करायला. आणि हे सर्व व्हायला आज आपणच कारण आहो. पण करणार काय? फक्त पाहणे आपल्या हाती.

ब्र: नारदा, बघ गुरुजी आले. रिक्षाभर सामानही घेऊन आले. मदतीला काही लोक पण आलेले दिसतात. बघ. भराभर त्यांनी सर्व खोल्यांमध्ये गाणे लावले.

ना: गाणे नाही ब्रह्मा. भानामतीचा कोंडमारा करायला घरभर नवनाथ मंत्र भरत आहेत. ऐक ते ऱ्हाम ऱ्हुम ऱ्हीम. बघ गुरुजी कसे यज्ञकुंड बांधत आहेत ते.

ब्र: नारदा, कुंडाला नऊ काठ कां रे? पंचकोनी, किंवा अष्टकोनी, किंवा साधे गोल कां नाही?

ना: ब्रह्मा!

सत्य, अहिंसा, निर्लोभता
त्याग, सेवाभाव, शांतता
शील, संयम आणि शुचिता
असा सुरेख नवकोनाचा
घडवा आकार यज्ञकुंडाचा

असे मास्तरांचे एक भक्तीगीत आहे. यज्ञ नाव आहे कवितेचं. त्यांच्याच 'अमृत कलश' संग्रहात मी वाचल्याचे आठवते. लिंक देतो. तूही वाच फुरसतीनी.

http://sadashivsahitya.blogspot.in/2015/10/blog-post.html

ब्र: जरूर! पण हा धूर बघ किती. ह्या धूरानी पण ती भानुमती पळाली असती.

ना: ब्रह्मा, भानुमती नाही, भानामती. तुला ब्रह्माऐवजी ब्रम्ह म्हटलेलं चालेल का? अर्थाचा अनर्थ होतो. पृथ्वीवर नाव अगदी जीव की प्राण बाबा. ते घेण्यात चूक नको. म्हणून तर बायांना म्हाताऱ्या झाल्या तरी नवऱ्याचे नाव घ््यायला सांगतात. ते चुकायला नको. ह्या लोकांना हजार नावे नसतात रे. एक जीव, एक नाव!

ब्र: भानामती, भानामती. आता नाही चुकणार. पण नारदा, तास झाला. यज्ञ केव्हा आटोपेल.

ना: ते बघ. संपतच आला. ॐ शांति: शांति: शांति: झालच बघ. बघ गुरुजी यज्ञतीर्थ घेऊन काँप्युटरच्या टेबलकडे जात आहेत. आता त्याने रावणाची तोंडे पुसतील.

ब्र: नारदा, तीर्थानी पुसून झाल्यावर आता पुन्हा दहा तोंडांना ते काय लावत आहेत? कापसाच्या फोव्यावर बाटलीतले थेंब कशाचे? हा औषधाचा वास कसा येतो?

ना: ब्रह्माजी, हे मात्र मलाही माहीत नाही हं. पण रावणाची तोंडे थोडी पुसट झाली बघा. काका काकू नक्कीच खूश होतील संध्याकाळी आल्यावर.

ब्र: रावणदहन होणार बहुतेक दहाव्या दिवशी. बाकी गुरुजी एकदम पाॅवरफुल हं. गेले पण बघ. ते मंत्र मात्र दिवसभर चालतील असे दिसते. डोकेदुखीच आहे.

ना: ब्रह्मा, भानामती जाईल की नाही मला नाही माहीत. पण आपण आता जाऊ या बाहेर जरा. त्या झाडावर कालपासून दोन पक्षी येऊन बसतात. एक वरच्या फांदीवर, एक जरा खालच्या. तो काय प्रकार आहे मला कळत नाही. अगदी तत्वचिंतकासारखा बसलेला असतो वरचा पक्षी, न बोलता, न हालता. खालचा सतत काहीतरी खात असतो. हे दोन पक्षांच कोडं मला सोडवायचं आहे. बघू त्यांच्या आसपास घोटाळून काही सुगावा लागतो का.

ब्र: नारदा, मी थकलो रे. झोपीन म्हणतो जरा. काका काकू आले की उठीन. त्यांची काय प्रतिक्रिया होते ते मला पहायचे आहे. रावणतोंडे थोडी पुसट झाली पाहून त्यांना खूप आनंद होईल. मानवमुखावर आनंद फार दुर्मिळ असतो नारदा, अगदी ब्रह्मकमळासारखा. आज मला त्यांचा आनंद पाहण्याचा आनंद घ््यायचा आहे.

ना: ठीक ब्रह्मा. कर तू आराम. मी जरा बघतो ते दोन पक्षी. Two Birds. थोडा फेरफटकाही मारीन म्हणतो. शुभनिद्रा!

ब्र: नारदा, खरं म्हणजे मला झोप येणेही कठिणच! हे दहा दिवस काय होते आणि ही मनुपिल्ले हा भानामतीचा उत्पात किंवा रावणाचा उच्छाद कसा सोडवतात आणि यातून कसे सहीसलामत सुटतात हे मला पहायचे आहे. खूप उत्कंठा लागलेली आहे. पण त्यासाठी नऊ रात्री उलटाव्या लागतील. पृथ्वीवर वेळ जाता जात नाही बरें.

ना: ब्रह्माजी, वेळेचा वेग तुमच्या हातात आहे हे तू विसरतो. तुझा एक सेकंद, एक ब्रह्मसेकंद म्हणजे पृथ्वीवर ९८६३० मानववर्षांबरोबर असतो. एका वर्षात ३६० दिवस म्हणजे तुझा एक सेकंद येथे ९८६३० x ३६० = ३५५०६८०० दिवसांचा. तुझा एक नॅनो सेकंद म्हणजे येथे ०.०३५५ दिवस. तुझे साधारण ३० नॅनोसेकंद म्हणजे इथला १ दिवस. ब्रह्मा, तू जर अशा लहान लहान जांभया, मायक्रो-नॅनो जांभया घेशील तर इथे आताच्या आता भराभर दिवस जातील. फास्ट फाॅरवर्ड. उलट्या जांभया घेशील तर काळ तसाच उड्या मारत मागे जाईल. रिवाइंड केल्या सारखा. अर्नाळ पुराणात तू उलटी जांभई घेऊन मास्तरांचा काळाच्या उदरात गेलेला वाडा पुन्हा उत्पन्न केल्याचा उल्लेख आहे. पुराणातच लिहिले म्हणजे ते सत्यच असले पाहिजे. म्हणून मी तुला त्या पुराणाची लिंक दिली होती. तो श्लोक असा बघ.

नारद ब्रह्मा जाती पुन्हा पाताळेश्वर मार्गी हो ।
नारद दावी जागा जेथे वाडा पूर्वी होता हो ।
आता तेथे वाडा नाही, तो काळाच्या उदरी हो ।
रामभक्ती मास्तरांची पूर्वी त्यानेही अनुभवली हो ।।

ब्रह्मनेत्र चमकले, काहीतरी मनात त्याला सुचले हो ।
उलटी जांभई घेई ब्रह्मा, घड्याळ मागे गेले हो ।
वाडा तेथे पुनः पूर्ववत, अंगणात झाडे तीच ।
तेची माजघर, ओसरी, माडी, आटाळेही हो तेच ।।

मुनीस खात्री येथे आले वरातीतले सीता राम ।
जेथे दोघे, तेथे त्यांचा परमभक्त नक्की हनुमान ।
आटाळ्यावर निरखुनी पाहता ब्रह्मा दिसले श्री रघुराम ।
सीता आणि सेवक ओळखती ब्रह्माला, करी प्रणाम ।।

ब्र: नारदा, मग घेऊ का ९-१० नॅनो जांभया?

ना: घे, पण टप्याटप्याने. प्रत्येक दिवशी काय होते ते बघायला हवे. एक जांभई, एक दिवस!

ब्र: ठीक. तू नोट कर आणि मग काय काय घडले ते मला सांग. तुझी नजर फार तीक्ष्ण. तिच्यातून काही महत्त्वाचे सुटायचे नाही.

ना: ठीक देवा. पण प्रत्येक ३० नॅनो सेकंदाच्या जाभईनंतर थोडा थांबत जा. मला सर्व मनात साठवायला हवे. मग ते नारदपुराण मी तुला सांगीन. बाकी ही माझी नॅनो जांभईची कल्पना मात्र मलाच खूप आवडली हं. क्या बात है!

ब्र: तू आहेच नारदा हुशार. घेतो तर मी ८-१० नॅनो जांभया. भेटू इथल्या दहा दिवसांनी. मग सांग मला सर्व साद्यंत कथा. मग जा तुझे ते दोन पक्षी पहायला. हे बघ मी उलवले माझे ओठ जांभईला!

ना: बस बस बस बस बस! उलटले पण दहा दिवस.

ब्र: मग सांग काय झालं ते.

ना: ब्रह्मा! पहिल्या दिवशी गुरुजी नवरात्र बसवून, सगळ्या खोल्यात नवनाथ मंत्राची रेकाॅर्ड लावून, यज्ञ करून, टेबलवरची दहा तोंडे तीर्थाने तसेच आणखी एका शीशीतल्या द्रव्याने पुसून गेले ते तू पाहिलेच. तोंडं थोडीशी पुसट झाली हेही तू मी पाहिले. नंतर दहा दिवसांच्या घडामोडी मी सांगू का? कापूसकोंड्याची गोष्टं सांगू का?

ब्र: अरे पटकन सांग. छळू नको. ब्रह्म सुद्धा उतावीळ होईल असा हा प्रकार. सांग सांग!

ना: ब्रह्मा, पहिल्या दिवशी संध्याकाळी काका काकू आले ते सरळ काँप्युटरच्या खोलीत गेले. टेबलवरचे दहाही गोल, तू वेंधळेपणाने काढलेले, किंचित पुसट झालेले पाहून काकू तर खूप आनंदी झाल्या. त्यांना इतके आनंदी आपण क्वचितच बघतो देवा. काकांनी लगेच गुरुजींना फोन करून त्यांचे आभार मानले. पलीकडून फोनवरच गुरुजी म्हणाले की त्यांनी असे शंभर रावण नी शंभर भानामत्या पाहिल्या आहेत. प्रत्येक वेळी जीत मंत्रांचीच होते. याही वेळी ते पाहून घेतील. काका काकू त्यांना थँक्यू म्हणाले. थँक्यू म्हणजे आजकाल आभार मानणे झाले.

ब्र: बरं, मग दुसऱ्या दिवशी?

ना: जरा सबूर! दुसऱ्या दिवशी पुन्हा यज्ञ आणि रेकाॅर्डचे मंत्र. पुन्हा तीर्थाने व त्या गुरुजींच्या शर्टच्या खिशातल्या शिशीतल्या द्रव्याने दहा तोंडे पुसल्या गेली. ती आणखी थोडी पुसट दिसायला लागली. संध्याकाळी काका काकू पुन्हा अधिक पुसट तोंडे पाहून आनंदी झाले. पुन्हा गुरुजींना थँक्यू. गुरुजी फोनवर म्हणाले की भानामती नसून प्रत्यक्ष लंकाधिपती असावा असे त्यांना वाटते आहे. त्यामुळे दहा दिवस यज्ञविधी करावा लागेल आणि तसा खर्चही वाढेल. खर्चाची मुळीच चिंता नको पण घरात रामरावण संग्राम नको असे काका म्हणाले.

ब्र: पुढे, पुढे चल.

ना: ब्रह्मा, तिसरा दिवस तसाच. यज्ञकर्म थोडे त्रोटक वाटले. टेबलावरचे गोल थोडे आणखी पुसट झाले, पण गेले नाहीत. रात्री काकाकाकू तेवढ्यानेही खुष झाले. रावणाची तोंडे जसजशी फिकट होतात तसतसे काकाकाकूंचे चेहरे उजळत जातात असे मला वाटले. गुरुजी म्हणाले भानामती नक्कीच नाही. त्यांनी नवनाथ मंत्रांची रेकाॅर्ड बंद करायला सांगितली.

चौथ्या दिवशी गुरुजींनी यज्ञ केला. तीर्थाने न पुसता फक्त शिशीतल्या द्रव्यानेच टेबलवरचे गोल पुसले. कॅसेट प्लेअर काढून ते घेऊन गेले. संध्याकाळी काका काकू प्रगति पाहून आनंदले. पण प्रकरण भानामतीचे नसल्यामुळे उपाय १० दिवसावर गेला म्हणून जरा नाराज पण झाले. काका 'आलिया भोगासी असावे सादर' पुटपुटले.

ब्रह्मा, नंतरचे सहा दिवसही यज्ञ झाला. नवव्या दिवशीच दहा तोंडे पूर्णच नाहीशी झाली होती. संध्याकाळी काकाकाकूंनी गुरुजींना विचारलेही की दहाव्या दिवशी, दसऱ्याला यज्ञाची गरज आहे का? गुरुजी म्हणाले की हा उपाय आपण तापावर अँटिबायोटिक घेतो तसा आहे. एकदा सुरू केला की पूर्ण कोर्स करायलाच हवा. ते स्पष्टीकरण काकाकाकूंना पटलेही. आजच दसरा. सकाळीच यज्ञ झाला. रावण पळून गेला. टेबल स्वच्छ झाला.

ब्र: नारदा, आजच दसरा दिसतो. काका काकूही लवकरच आलेले दिसतात. बघ कडी काढून घरात शिरलेही. सरळ टेबलकडे गेले.

ना: ब्रह्मा, तुला हे सर्व बघायला मान सुद्धा वळवावी लागली नाही. चारही दिशांना तोंडे असल्याचा हा फायदाच हं.

काकू: अहो, गेला बघा एकदाचा. काय तोड असते गुरुजींकडे प्रत्येक संकटाची बघा. गेली ती पीडा. शेवटी पुन्हा दसऱ्याला सत्याचा असत्यावर विजय झाला. ही खरी विजयादशमी हो.

काका: खरं आहे तुझं. दुपारी गुरुजींचा पण फोन होता. अभिनंदनाचा. अरिष्ट टळलं म्हणून. AMC करा म्हणाले.

काकू: हे AMC काय?

काका: अगं, ए. एम्. सी. म्हणजे Annual Maintenance Contract. आपल्या काँप्युटरचा असतो तसा. वर्षाकाठी काही पैसे गुरुजींकडे भरायचे. म्हणजे वर्षांतून काहीही बिघाड झाला तर आपल्याला भुर्दंड नाही. तसंच 'रावणोद्भवनिवारण' यज्ञ दरवर्षी एक करावाच म्हणजे रावण पुन्हा अशी हिंमत करणारच नाही असे म्हणाले. मी लगेच हो म्हणालो आणि येतांनाच पैसेही देऊन आलो. कटकट नको.

काकू: तुम्हीच आहा म्हणून बरं हो. एखाद्या अडाणी माणसाला अशी दूरदृष्टी पण नसणार. काय आणि कसे करतील ते बिचारे गरीब लोक देवच जाणे. भोगत बसतील रावणाचा जाच.

काका: अगं, संध्याकाळ झाली. रावण मारायला हवा.

ब्र: नारदा, आता हा काय प्रकार रे? रावण तर गेला.

ना: ब्रह्मा, दसऱ्याच्या दिवशी हे लोक ताटात तांदुळाचा रावण काढतात. त्याच्या नाभीत काकू आपली सोन्याची अंगठी ठेवतील. रावणाचा प्राण त्याच्या नाभीत आहे असे फितूर बिभीषणाने रामाला सांगितले होते. नंतर रामाने नेमका त्याच्या नाभीस्थलावर बाणाने वार केला म्हणून रावण वारला.

ब्र: अरे असे रावण वारला वगैरे काय म्हणतोस? रावणाचा प्राण गेला तरी म्हण. तू म्हणजे, ... आपलं म्हणजे, ... हे म्हणजे, ... फारच बा.

ना: ब्रह्मा, पृथ्वीवर राहून मला पण वारला, मेला, गचकला, off झाला म्हणायची सवय झाली आहे. ब्रह्मा, बघ काकांनी ठेवणीतल्या जंगलेल्या तलवारीने तांदळाचा रावण मारला. ते बघ त्याचा प्राण, म्हणजे काकूंची अांगठी त्यांना सापडली. असा पराक्रम आपल्या नवऱ्याने केला म्हणून काकूंनी काकांना ओवाळले. याला म्हणतात संस्कृति.

ब्र: नारदा थट्टा नको. मला हे सर्व मनापासून आवडते. हे सर्व करून जर असत्यावर सत्याचा विजय होतो अशी यांना शिकवण मिळत असेल तर त्यात काय वाईट, मी म्हणतो.

नारदा, राहून राहून मला एक गोष्ट मनात येते. त्या दिवशी पहाटे टेबलावर रावण उमटला, तेव्हाच मी एक लहानशी उलटी नॅनोजांभई घेतली असती तर काळ थोडा मागे गेला असता. दहा तोंडे आपोआपच नाहिशी झाली असती. होत्याचे नव्हते झाले असते. काकाकाकूंचा हा सर्व त्रास वाचला असता. नाही का?

ना: होय ब्रह्मा. पण विधिलिखित कोणाला टळलं आहे का? जे व्हायचं ते होतच. लक्ष्मी काकाकाकूंकडून गुरुजींकडे जाणार असे कुठेतरी लिहिले होते. ते कसे टळणार!

ब्र: होय. तुला नी मला आता झोप येते आहे ती येणारच. शुभरात्री!

ना: तू झोप. मी आपला ते पक्षी बघतो. शुभरात्री!


गोष्ट तिसरी


नेहमी पडल्याबरोबर गाढ झोप लागणा-या नारदाला कां कोण जाणे काल रात्री शांत झोप लागली नाही. सतत या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर. केंव्हा ब्रह्मा काँप्युटर सोडून येईल असे झाले त्याला. गजर झाला, काका काकूंची चाहूल लागली आणि काँप्युटर सोडून क्षणात ब्रह्मा नारदाजवळ आला. हाती काही चिटोरे होते. जाड जाड अक्षरात, अगदी नवशिक्याने लिहावे तसे, काहीतरी लिहिलेही होते त्यावर असे पहाटेच्या अंधारात नारदाला वाटले.

ब्रह्मा! तुझीच आठवण करीत होतो मी. शंभर वर्ष आयुष्य आहे तुला.

ब्रह्माजी घाबरूनच म्हणाले, तुला कसे माहीत? तुला कोणी सांगितले मला शंभर वर्ष आयुष्य आहे ते?

ना: सांगायला कशाला पाहिजे. पृथ्वीवर असे म्हणायची पद्धत आहे. आपण कोणाची आठवण काढत असावे, व तेवढ्यात त्या व्यक्तीने यावे, असे झाले की असे म्हणतात. त्यात एवढे दचकायला काय झाले? तू म्हणजे, ... आपलं म्हणजे, ... हे म्हणजे, ... खूपच बा!

ब्र: मग ठीक आहे. काय, कशी गेली रात्र? कंटाळा येत असेल तर कापुसकोंड्याची गोष्ट सांगू?

ना: सांग, ऐकीन बापडा! आयुष्यात नाहीतरी तेवढाच एक विरंगुळा उरला आहे.

ब्र: ऐका तर, मुनीवर! काल मी रात्रभर हिरण्यगर्भातून माझा जन्म कधी झाला ते शोधायचा प्रयत्न केला. खूप माहिती मिळाली. मी खूप म्हणजे, खूप म्हणजे, खूप्पच वर्षापूर्वी आलो नारदा. कल्पना करवणार नाही तुला.

ना: शंभर वर्षांपेक्षाही ज्यास्त आधी की काय? तसं असेल तर तुला शंभर वर्ष आयुष्य आहे असे म्हणणे खूपच चुकीचे झाले ब्रह्मा. मग ती शुभेच्छा नाही, ते अभद्र वचन झाले. मला माफ कर देवा.

ब्र: तस नाही नारदा. हे काळ, वेळ, ती तुझी काळाची सरळ रेषा वगैरे खूपच गोंधळात टाकते आता. जे मी काल रात्री वाचलं ते काहीच्या बाहीच आहे. पुराणांच्याही आधी लिहिण्यात आलेल्या वेदांमध्ये माझा जन्म, माझं आजचं वय, माझा मृत्यू यावर सविस्तर व सविस्तार माहिती आहे. ज्यांनी हे सर्व ग्रंथ लिहिले ते नुसते ऋषीच नाही तर वैज्ञानिक असावे असे मला आता वाटते नारदा. मला आता माझा भूत, वर्तमान व भविष्य काळ समजायला लागला नारदा! वाड्यातली ती म्हातारी मला म्हातारा कां म्हणते ते मला आता कळले नारदा. माझं वय किती हे विचारूच नको नारदा.

ना: बरं नाही विचारत. तू ओघाओघात सांगशीलच पुढे. तुझ्या पोटात काही ते फार काळ टिकणार नाही. पण जरा सविस्तर व समजेल असे सांग. मुख्य म्हणजे मला तुझी जन्मशताब्दी कधी ते जाणून घ््यायची इच्छा आहे. मीही एक ब्लाॅग सुरू करीन म्हणतो. स्मरणिकाही काढू. एखादं माझं पुराण पण खपवीन.

ब्र: ऐक तर. नारदा, भिंतीवरच्या ह्या घड्याळापासून सुरू करतो. तूच मला एकदा समजावून सांगितलं होतं ते काय असतं ते. हा बारका, लांब उड्या मारणारा काटा म्हणजे सेकंद काटा. ६० उड्यात हा एक प्रदक्षिणा करतो. याची एक उडी म्हणजे एक सेकंद. याची एक प्रदक्षिणा म्हणजे एक मिनिट. दुसरा थोडा अंगाने भरलेला, पण तितकाच उंच काटा म्हणजे मिनिट काटा. त्याची एक उडी म्हणजे एक मिनिट. त्याची एक प्रदक्षिणा, त्याचे ६० घरे चालणे म्हणजे एक तास. तो बोदा, बुटका काटा पाच घरे पुढे चालतो एक तासात. ६० घरे चालून त्याची प्रदक्षिणा झाली की १२ तास. त्याच्या दोन प्रदक्षिणा म्हणजे एक पूर्ण दिवस, सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत, २४ तासांचा. असे ३६० दिवस म्हणजे मानवांचे १ वर्ष.

ना: माणसांचे म्हणजे? आपले देवांचे काय वेगळे असते? की आपले वर्षही आपल्यासारखे काल्पनिकच?

ब्र: नारदा, सध्यातरी तसेच समज. पण त्यावर आत्ताच चर्चा नको. ते नंतर बघू.

ना: ठीक.

ब्र: नारदा, हिरण्यगर्भातून माझी उत्पत्ती झाली ती खूपच जुनी घटना. त्यावेळी देवही नव्हते. खरे म्हणजे दानव पण नव्हते. दिवस, रात्र, पहाट, संध्याकाळ काहीच नव्हते. हे तूच मला सांगितले होते. पण आज आपण माझ्या जन्मापासून आजपर्यंत पुढे न येता, आजपासून मागे जाऊ. समजायला सोपे जाईल.

ना: असेच त्या जंतुकवीने त्याच्या 'उद्या लग्न आहे' ह्या कवितेत पण केले होते. तो पण काळाच्या उलट्या दिशेनी गेला होता. वेळ मिळाला तर वाचून बघ. लिंक विचारशीलच म्हणून आधीच देतो.

http://udyalagnaaahe.blogspot.com/2015/11/blog-post.html

ब्र: वाचीन, पण नंतर. आधी ह्या पुराणातल्या सत्यकथा तर वाचून होऊ दे. मला खरेच काही घाई नाही. माझ्याजवळ वेळच वेळ आहे. आता कुठे माझी पन्नाशी उलटली आहे.

ना: खरेच. मग म्हातारी तुला म्हातारा म्हणते ते खरे कसे?

ब्र: सबूर नारदा! कळेल, कळेल. तीही खरी आणि मीही खरा. मी पन्नाशीत, ती नव्वदीत. तरी पण मी तिच्यापेक्षा मोठा. असो! तर मुनी, सध्या आपण कलियुगात आहो हे तुला माहीतच आहे. 'कलियुग गं बाई, कलियुग!' असे उसासे टाकतांना तू काकूंना नेहमी ऐकतोच. हे कलियुग हजारो वर्षंापूर्वी सुरू झाले. स्पष्टच सांगायचे तर ५११७ वर्षंापूर्वी सुरू झाले. आज ईसवी सन २०१५ आहे असे हे भिंतीवरचे कालनिर्णय आपल्याला सांगतेच आहे. म्हणजे, कलियुग ईसवी सन सुरू होण्याच्या ३१०२ वर्षे आधीच्या वर्षी सुरू झाले. पक्की तारीख सुद्धा माहीत आहे नारदा. त्या वर्षीच्या १७-१८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजता कलियुग सुरू झाले असा स्पष्ट उल्लेख आहे. तेव्हापासून ४३२०००, म्हणजे चार लाख बत्तीस हजार वर्षे मोजली तर १७-१८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ई. स. ४२८८९८ मधे कलियुग संपेल.

जुनं कालनिर्णय असेल तर बघ. कलियुगाची सुरुवात त्यात नमूद असेल.

ना: ते शक्य नाही ब्रह्मा. तू पाहतोच दर महिन्यात काकाकाकू रद्दी विकतात ते. इतके जुने कालनिर्णय कसे मिळेल? ब्रह्मा, तुझी उत्पत्ती कलियुगाच्या सुरुवातीची दिसते. म्हणजे तू आज ५११७ वर्षंाचा. खूपच म्हातारा रे! बाप रे बाप!

ब्र: नारदा, इतके सोपे नाही ते. जरा धीर धर. काळ हा काळापेक्षा पण भयंकर आहे बरे! तर हे कलियुग अजून ४२६८८३ वर्षे चालणार आहे. म्हणजे कलियुग एकुण ४३२००० वर्षंाचे असते. असे वेद पुराणे सांगतात. बघ मी तसे लिहून आणले आहे काळजीपूर्वक.

ना: पण कलियुग संपल्यावर काय?कलियुगाच्या आधी काय होते?

ब्र: सांगतो, सांगतो. घाईची काय गरज? कलियुग काही इतक्यात संपत नाही. आणि ते संपले तरी आपण आहोच की. आपण ते सुरू व्हायच्या आधी आलो, आणि ते संपल्यावरही राहणार आहो.

ना: हा! अगदी हायसे वाटले. नाहीतर बांधबूध करायचा विचार होता माझा.

ब्र: नारदा! तुला माहीतच आहे की विष्णूचा ९वा अवतार बुद्ध कलियुगाच्या सुरुवातीस झाला. दहावा अवतार अजून व्हायचा आहे. कलकी अजून यायचा आहे. तो या कलियुगाच्या अंताला येईल असे म्हणतात. त्याचे अवतारकार्य संपले की कलियुग संरेल.

ना: पण मी ऐकले की चार युगे असतात, एकामागून एक येणारी.

ब्र: ते खरेच! पण त्या चार युगातले हे चौथे. कलियुगाआधी द्वापार युग आले. कृष्णावतार त्या युगातला. द्वापारयुग कलियुगापेक्षा दुप्पट अवधीचे. तब्बल ८६४००० वर्षे ते चालले. त्या युगात कलियुगापेक्षा कमी पापी लोक होते असे म्हणतात. मानवांमधे दानवाचा अंश कमी प्रमाणात होता असे म्हणतात. त्याची सत्यावरची आस्था आजच्यापेक्षा ज्यास्त. कलियुग त्या मानाने सर्वात भ्रष्ट म्हणतात नारदा. जितका मानव भ्रष्ट, तितका त्या युगाचा अवधी कमी. म्हणून कलियुग सर्वात लहान.

ना: ब्रह्मा, पण काकाकाकू तर तसे चांगले वाटतात. ते आधीच्या युगातले की काय?

ब्र: तसे नाही नारदा. सगळेच कलियुगी खराब असतात असे नाही. पण एकंदरीत वाईट विचार, वाईट कृती, वाईट लोकांचे प्रमाण ज्यास्त एवढेच.

ना: हं.

ब्र: मुनी, द्वापारयुगापूर्वीचे युग त्रेतायुग. ते कलियुगापेक्षा तिप्पट मोठे, म्हणजे १२९६००० वर्षंाचे. लोक द्वापारयुगापेक्षाही ज्यास्त गुणी, ज्यास्त सत्यप्रेमी. पण perfect नाहीत. थोडी तृटी आहेच. विष्णूनी तीन अवतार घेतले ह्या युगात; वामन, परशुराम व रामचंद्र. त्याच्या आधीचे युग सत्ययुग. कलियुगापेक्षा चौपट याचा अवधी. बरोबर गुणाकार करशील तर १७२८००० वर्षंाचे. ह्या सर्वात मोठ्या युगात विष्णूजींनी ४ अवतार घेतले; मत्स्य, कूर्म म्हणजे कासव, वराह व नरसिंह. समुद्रमंथन पण ह्याच युगात झाले. तुला आठवतच असेल. आताआताचीच तर गोष्ट.

ना: ब्रह्मा, कां टोमणे मारतोस. मला एक गोष्ट कळत नाही. काकू गीता वाचतात तेंव्हा एका श्लोकावर आल्या की आनंदतात.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहं ।।

हा श्लोक वाचला की काकू देवाला नमस्कार करतात. पापे जेव्हा जेव्हा बोकाळतील, धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येईल, तेव्हा पाप्यांचा नाश करायला मी अवतार घेतो असे आश्वासन भगवंताने गीतेत दिले आहे. तू आताच म्हणाला की कलियुग सर्वात भ्रष्ट व सत्ययुग अगदी लोणकढे म्हणून. मग सत्ययुगात चार आणि कलियुगात फक्त दोन, द्वापारयुगात फक्त एकच अवतार कां?

ब्रः ते मला नाही माहित. सोपं काही विचार. मी सध्या बालकमंदिरात आहे असे समजून.

ना: बरे, राहू दे. पण म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी चारही युगे जोडली तर असे चातुर्युग एकूण ४३२०००० वर्षांचे म्हण की. कलियुगाच्या बरोब्बर दहापट.

ब्र: नारदा, बरोबर. तू तसा गणितात पक्काच आहेस म्हणा. चार अन् तीन सात, अन् दोन नऊ, अन् एक दहा.

ना: ब्रह्मा, मला इथली एक गंमत सहज आठवली म्हणून सांगतो.

मास्तरनी सांगितले दऽऽहा
आम्ही काढले आऽऽठ
मास्तरला दिसले सऽऽहा
मास्तरचं तोंड पऽऽहा

ब्रह्मा, एकावर शून्य दहा लिहून मग एकाच्या खाली जोडून आठ लिहायचे. आठला खाली सहाचा आकडा जोडायचा. मग उलटी एक गोल रेघ काढत आधी काढलेल्या दहातल्या एकाच्या डोक्याला जोडायची. अगदी काकांसारखा चेहरा दिसतो पाटीवर, कागदावर. असे करत असतांना वरचा श्लोक म्हणायचा. खूप मजा येते.

ब्र: नारदा, पण हे तर मास्तरांनी कधी नाही शिकविले. आता हे राहू दे. पुढे चल.

ना: ब्रह्मा, पण मग कलियुग संपल्यावर पुढे काय?

ब्र: पुन्हा तीच चार युगे, त्याच क्रमानी येतील नारदा. असे वेदात पुराणात सांगितले आहे. कलियुग संपल्यावर पुन्हा सत्ययुग येईल. नंतर त्रेतायुग, नंतर द्वापार युग, नंतर कलियुग, नंतर सत्ययुग, नंतर त्रेतायुग, नंतर द्वापारयुग, नंतर कलियुग, नंतर सत्ययुग, नंतर

ना: पुरे पुरे. आलं लक्षात. पण हे चातुर्युगचक्र कधी सुरू झाले आणि केंव्हा संपेल? आणि पुन्हा तेच युग आले की पुन्हा तेच अवतार होतील की नवे अवतार, नव्या गोष्टी?

ब्र: पुन्हा तेच अवतार होतील की नवे हे मला माहित नाही. पण तुझा प्रश्न मात्र छान हं. बघू काही माहिती मिळते का. नारदा, असे ७१ वेळा हे चातुर्युग, चार युगांचे चक्र फिरते असे म्हणतात. म्हणजे ७१ x ४३२०००० वर्षे, म्हणजे, तूच कर बाबा गुणाकार. माझा गुणाकार त्याच्या चिन्हासारखा नेहमीच चूक, म्हणजे x येतो.

ना: नंतर करू ब्रह्मा. त्या वाड्यातल्या म्हातारीचा सगळ्यात लहान नातू सहज करेल बघ. ते काय अॅबाकस की काय वापरून. किंवा असेच हवेत बोटे फिरवून. वाड्यातल्या मास्तरांसारखे. आपण नंतर करू. मला हे सांग की हे ७१ चातुर्युगं झाले की मग काय?

ब्र: नारदा, अशा ७१ चातुर्युगांसाठी ब्रह्मा, म्हणजे मीच, एक मनु, म्हणजे ह्या मानववंशाचा जनक निर्माण करतो. ७१ चातुर्युग संपले, की त्या मनूचे राज्य संपते. तसे झाले की मी पुढचा मनु पुढे करतो. तोही मग ७१ x ४३२०००० वर्षे पुरतो, मग आणखी एक मनु.

ना: असे किती मनु?

ब्र: असे १४ मनु एकामागून एक मी निर्माण करतो असे मला कळले. सध्या त्यातल्या सातव्या मनूचे राज्य सुरू आहे. त्याचे नाव वैवस्वत आहे असे म्हणतात. म्हणजे काकाकाकू ह्या सातव्या मनूचे वंशज आहेत. ह्या सातव्या मनूचेही हे शेवटचे, म्हणजे ७१ वे चातुर्युग सुरू आहे. त्या शेवटच्या चातुर्युगातलं हे शेवटचे युग, म्हणजे कलियुग सुरू आहे. हे एवढे कलियुग संपले की त्याचा, म्हणजे वैवस्वताचा अवधी संपेल. तेवढे झाले म्हणजे १४ पैकी अर्धे मनु आटोपले. मग मी लगेच, टंगळमंगळ न करता आठवा मनु आणीन. मग त्याला ७१ चातुर्युगे मिळतील. मग मी ९ वा मनु आणीन. मग त्याला ७१ चातुर्युगे मिळतील. मग मी दहावा मनू

ना: पुरे पुरे. चौदा मनूंचे राज्य आटोपले की काय? मग तुझा The End की काय?

ब्र: नाही रे. घाई करू नको. चौदा चौदा मनूंचे राज्य किती वर्ष चालेल ते जरा बघ. एका मनूचे ४३२०००० x ७१ वर्ष असे आधी आपण पाहिले. त्याला एक मानवांतर म्हणतात. १४ मनूंचे मग १४ मानवांतर म्हणजे ४३२०००० x ७१ x १४ म्हणजे ४३२०००० x ९९४ वर्ष जातील. पहिल्या मनूच्या आधी मला तयारीला थोडा काळ हवा. १४ झाल्यावर आवरासावरीला थोडा वेळ हवा. त्याला संधिकाल म्हणतात. तोही हिशोबात घेतला तर १४ मनू आटोपायला ४३२०००० x ९९४ ऐवजी ४३२०००० x १००० वर्ष लागतात. म्हणजे ४३२००००००० वर्ष. चारशे बत्तीसवर सात शून्य.

ना: पण नंतर काय?

ब्र: १४ मनूंची ही शृंखला आटोपली की ह्या सृष्टीचा अंत.

ना: आणि तुझा पण?

ब्र: नाही नाही. एवढे झाले की माझा फक्त १२ तासाचा एक दिवस संपतो. याला कल्प म्हणतात. १४ मनूंचा हा कार्यकाल आटोपला की फक्त कल्पांत. मग माझी १२ तासाची एक रात्र होते. मी रात्रभर फक्त आराम करतो. माझा २४ तासांचा एक दिवस संपतो. नारदा माझा एक दिवस, ब्रह्मदिवस अशा त-हेनी ४३२००००००० + ४३२००००००० म्हणजे ८६४००००००० मानववर्षांचा असतो.

ना: बाप रे बाप!

ब्र: माझ्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी नवीन सृष्टी तयार करतो. पुन्हा १४ मनू एकामागून एक येतात. माझा दिवस संपतो. कल्पांत होतो. सृष्टीचा अंत होतो. मी रात्रभर झोपतो. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा निर्मिती करतो. १४ मनू पुन्हा तयार करून एकामागून एक आणतो. १४ मनू झाले की कल्पांत होतो. मी रात्रभर झोपतो. सकाळी उठून पुन्हा सृष्टीनिर्माण करतो. १४ मनू झाले की

ना: पुरे ब्रह्मा. असे कितीदा?

ब्र: असे ३६० ब्रह्मदिवस झाले की माझे एक वर्ष होते, ब्रह्मवर्ष. एक ब्रह्मवर्ष म्हणजे मानवांचे ८६४००००००० x ३६० वर्ष. म्हणजे ३११०४०००००००० वर्ष. सध्या माझ्या उत्पत्तीला, माझ्या जन्माला ५० ब्रह्मवर्ष होऊन ५१ वे सुरू आहे. मला १०० वर्षे, ब्रह्मवर्षे, आयुष्य आहे. म्हणजे पृथ्वीवरचे ३११०४०००००००००० वर्ष. ३११०४ वर दहा शून्य.

ना: ब्रह्मा, तुझ्या १०० ब्रह्मवर्षातली ५० झाली असे तू म्हणाला. म्हणजे जवळजवळ १५६०००००००००००० मानववर्षे आटोपली. म्हणजे हिरण्यगर्भातून तुझा जन्म १५६०००००००००००० वर्षांपूर्वी झाला. तुझी १०० ब्रह्मवर्षे झाली की मग काय?

ब्र: माझ्या मृत्यूनंतर नारदा, हे विश्वच संपेल. सगळे विश्व एका बिंदूत सामावेल. काळ सुद्धा संपेल. काळ तू म्हणतोस तसा अनादि अनंत नाही नारदा. तो सुद्धा मी मेलो की मरतो. पुन्हा १०० ब्रह्मवर्षांनी नव्या ब्रह्माची नव्या हिरण्यगर्भातून उत्पत्ती होईल असे भाकीत वेदात पुराणात आहे. पुन्हा काळ सुरू होईल. पुन्हा दानव, देव, मानव, रात्र, दिवस, संधिकाळ वगैरे वगैरे. नव्या ब्रह्माला १०० ब्रह्मवर्ष आयुष्य, त्यात पुन्हा एका ब्रह्मदिवसात १४ मनू, एका ब्रह्मवर्षात ५०४० मनू, १०० ब्रह्मवर्षात ५०४००० मनू वगैरे.

ना: ब्रह्मा, मी थोडी आकडेमोड करून पाहिली. ब्रह्मदिवसात जर २४ ब्रह्मतास धरले, ब्रह्मतासात ६० ब्रह्ममिनिटे धरली, ब्रह्ममिनिटात जर ६० ब्रह्मसेकंद धरले, तर तुझा एक ब्रह्मसेकंद पृथ्वीवर ९८६३० मानववर्षांबरोबर असतो. ब्रह्मा रोज पृथ्वीवर कापुसकोंड्याची एक गोष्ट जरी मी तुला वा तू मला सांगितली तर कितीतरी गोष्टी होतील. सगळं कल्पनातीत आहे. कल्प, कल्पांत म्हणजे खरेच कल्पनांत आहे.

ब्र: नारदा, थोडी गडबड झाली आहे रे! काल रात्री हे सर्व वाचत असता मी बरीच टिपणं घेतली. माझ अक्षर अगदीच नवशिक्या मुलासारख भदाडं आहे. ३११०४०००००००००० चिटो-यावर लिहितांना चिटोरा केव्हा संपला ते कळलेच नाही रे. मी लिहीतच गेलो आणि बरीच शून्ये काकूंच्या टेबलवर लिहिल्या गेली. काकाकाकू उठले आणि मी घाईघाईने इकडे आलो. शून्ये टेबलवर तशीच राहिली. काही होणार तर नाही ना?

ना: ब्रह्मा! होणार काय? एक नवे पुराण घडेल आज. बघू काय होते ते! आलीया भोगासी असावे सादर. आणखी काय!

ब्र: नारदा, माझ डोकं पण रात्रभर वाचून बधीर झालं आहे. मीही एक शून्य आहे असे वाटायला लागले आहे. पडावे म्हणतो जरा दिवसाचं.

ना: पड वाटल्यास. पण माझा डावा डोळा लवतो आहे. अपशकुन असतो हा. काहीतरी अघटित घडेल असे वाटते आहे. झोप तू. काही घडलेच तर उठवीन तुला. शुभनिद्रा!


गोष्ट दुसरी


ब्रह्मा: नारदा, आजही कालसारखाच कंटाळा येतो आहे. चुटकीसरशी युगे जायची पूर्वी. पण आता? अगदी पळे घटी मोजत बसतो मी.

नारद: बरं, मग कापुसकोंड्याची गोष्टं सांगू का?

ब्रह्मा: 'कापुसकोंड्याची गोष्ट सांगू का?' काय म्हणतो? कापुसकोंड्याची गोष्टं सांगू का?

नारद: ठीक आहे. सांग.

ब्र: ऐक तर. फार फार दिवसांपूर्वीची, म्हणजे फार फार वर्षांपूर्वीची, म्हणजे शतकानुशतकांपूर्वीची, म्हणजे तुझ्या त्या सरळ 1-D कालरेषेवरच्या खोल खोल भूतकाळातल्या एका कालबिंदूची ही गोष्ट आहे. ब्रह्माचा, म्हणजे माझा, नुकताच जन्म झाला होता. असेच विभाजन करत करत रात्र, दिवस, संधिकाळ, देव व दानवही अवतरले होते. अचानक माझ्या कपाळावर आतून कोणी तोफेचे गोळे डागत असावे असा भास मला झाला. हिरण्यगर्भातून माझी उत्पत्ती झाली तेंव्हाही असाच आंतरिक स्फोट झाला असावा. तू ते काय बिग बँग वगैरे म्हणतो तसा. दुसऱ्याच क्षणी कपाळी काहीतरी झाले, घेरी आल्यासारखे झाले, डोळ्यासमोर अंधारी आली व क्षणात पुढ्यात माझ्यासारखाच दिसणारा, माझच प्रतिरूप म्हण वाटल्यास, एक जीव उभा झाला. जणू काय मी कोणाला जन्म दिला. मी बाप झालो.

ना: असे कधी ऐकले नाही. कोशातून फूलपाखरू वगैरे ठीक. पण कपाळातून, भालप्रदेशातून जन्म? हे म्हणजे, ... तुझं म्हणजे, ... आपलं म्हणजे, ... खूपच बा!

ब्र: मलाही असच वाटलं असतं नारदा. पण काल रात्री मी जे पाहिलं त्यानंतर मलाही विश्वास बसला की हे शक्य आहे. शरीराच्या कुठल्याही भागातून जीवोत्पत्ती होऊ शकते. पालीचं शेपूट तुटलं तरी त्यात जीव असतोच की नाही? कालच मी जंतुकवीची कविता वाचली बच्चमजी!

ना: काल रात्री? मग मी कुठे होतो?

ब्र: नारदा, मला आजकाल झोपेपेक्षा सर्फिंग करायला खूप आवडतं. दोन तीन दिवसापासून मी रात्री जरा समोरच्या बागेत पण जातो. बरेच लोक येतात. आणि एका लहानशा झाडाकडे पाहत असतात. त्याची कळी उमलायची वाट पाहतात. काल रात्री ती उमलली. आणि सर्वांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या. ते फूलही सुंदर, अद्भुत होते. मी तरी असे कधी पाहिले नव्हते. रात्रीच उमलणारे ते फूल आहे असे म्हणतात. सगळ्यांनी त्याचे फोटो पण काढले. गंमत म्हणजे सगळ्यांनी त्या कमळाला नमस्कार पण केला. कमळ देवाला वाहून देवाला नमन करतांना आपण पाहतो नारदा, पण इथे तर फुलाचीच पूजा! फुलालाच नमस्कार! जे जे पहावं ते नवलच!

ना: ब्रह्मा चल, आपण ते फूल बघून येऊ.

ब्र: नाही नारदा, ते दोन तीन तासातच, सूर्योदयापूर्वीच सुकून गेलं. रात्री जे होते त्यांनाच ते पाहता आलं. अजून एक लहानशी कळी आहे. तीही कदाचित काही दिवसांनी उमलेल. तेव्हा आपण पाहू.

ना: अरे मग काल कां नाही उठवल?

ब्र: नारदा, तुझी झोप म्हणजे त्या महाभारतातल्या कुंभकर्णासारखी! तुला कोण उठवणार बाबा!

ना: ब्रह्माजी, महाभारत नाही, रामायण.

ब्र: जे असेल ते. वाचीन कधीतरी तेही सविस्तर. काका फक्त तो रामजन्म वाचतात वर्षातून एकदा. बाकी रामविजय ग्रंथात काय आहे हे कधी ऐकले नाही. हं, हनुमानजन्म पण वाचतात त्यातला. तोही ऐकला. बाकी त्यातल्या गोष्टी कधी ऐकल्या नाही. करीन कधीतरी गूगल.

ना: मला पण सांग त्या गोष्टी कधी. अशा खूप गोष्टी आहे म्हणे त्यात. काही गोष्टींमधे तर मीही आहे असे म्हणतात.

ब्र: बघू. पण ती फुलाची गोष्ट मागेच पडली. तर नारदा, सगळेच त्या फुलाला नमस्कार करून ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटत होते. काहीतरी मागत होते. मनातली इच्छा ते फूल पूर्ण करतं अशी त्यांची धारणा होती. नारदा, सांगायला थोडी लाज वाटते, पण मीही पटकन नमस्कार करून काहीतरी मागितले. मिळालं तर ठीकच, नाहीतर नुकसान काहीच नाही. शिवाय सगळेच लोक नमस्कार करीत होते, तर आपणच न करणे योग्य नाही असे मला वाटले. सगळ्यांचा जिथे विश्वास तिथे आपला पण. जगरहाटी प्रमाणे चालाव माणसानं अस काकूच नाही का नेहमी म्हणत? असो.

ना: ब्रह्माजी, आपण पडलो काल्पनिक, अदृश्य. नमस्कार केला काय, न केला काय! कोणी पाहिला? फुलानी तर नक्कीच नाही पाहिला. मग तो इच्छा पूर्ण तरी कशी करणार? आणि कोणाची? पण तू नेमके मागितले काय ब्रह्मा? तुला रे काय कमी?

ब्र: काहीतरी मागायचं म्हणून मागितलं नारदा. दृष्य रूप मागितलं. पण आता असं वाटतं, चुकलं. मी जर दिसायला लागलो तर काका काकू राहू देतील का रे मला? दिसायला लागलो तर मग मी काल्पनिक पण नाही राहणार. कठिण आहे. अशा सत्यस्वरूपात वावरण्याची सवय व शिक्षण आपल्याला नाही. बापरे! काय हे मागितले?

ना: चिंता नको करूस. पुढच्या वेळेस कमळ उमलेल तेव्हा पुनः अदृश्य रूप माग. देवा, जंतुकवीची ती कविता 'उंदीर' वाच आज रात्री ब्लाॅगवर. अगदी तुला फिट्ट बसते. ब्रह्ममन तरी इच्छाविरहित असावं अस मला वाटलं होतं.

ब्र: वाचीन. पण ते कमळ? सगळे जण त्याला ब्रह्मकमळ म्हणत होते. विष्णूच्या नाभीतून निघणारं कमळ हेच, ब्रह्मदेवाची उत्पत्ती ह्याच कमळातून, ब्रह्मदेवाच्या हातातलं कमळ हेच, असे कोणी कोणी काही काही सांगत होते. बाकी सारे ते ऐकून पुन्हा पुन्हा मनोमन नमस्कार करीत होते. भीड पडून मी ही केला. त्यांनी नमस्कार केला की मीही करीत असे. देवळातल्या कीर्तनात कीर्तनकाराने 'नारदाने कृष्णाला नमस्कार केला' असे म्हटले की बायाबापड्या जशा बांगड्या वाजवत वाजवत आपणही भक्तीभावाने नमस्कार करतात तसे.

ना: वा! काय दृश्य! ब्रह्मदेवाचा ब्रह्मकमळाला त्रिवार नमस्कार! वा!

ब्र: चिडवण्यासारखे नाही नारदा. मला पण संकोच वाटला. पण अरे! एवढ्या गर्दीमध्ये मीच
एकट्यानी नमस्कार न करून कसे होईल? मी उठून दिसलो असतो. असं प्रवाहाच्या विपरीत जाऊन कसे चालेल? उगाच लोकांच्या श्रद्धेला ठेच नाही का पोहोचणार?

ना: ब्रह्माजी, एकतर श्रद्धेला, अंधश्रद्धेला ठेच पोहोचायला नको हा विचारच मला फारसा पटत नाही. प्रत्येकानी जर असाच विचार केला तर अंधश्रद्धानिर्मूलन कधीच शक्य नाही. दुसरं म्हणजे तू नाही, तू काल्पनिक आहे, अदृश्य आहे, हे तू विसरतोस. तू नमस्कार केला काय, न केला काय. एकच. पण असं जर तू करीत राहिलास तर एके दिवशी ब्रह्मदेवच ब्रह्मदेवाचा परमभक्त होईल. स्वतःच स्वतःची आरती करेल. आज जंतुकवीची 'अंगुष्टिमाल' वाचच वाच. ही बघ, सहज मिळावी म्हणून पुन्हा लिंक देतो वाटल्यास.

http://balved.blogspot.com/2015/09/blog-post.html

ब्र: किती होमवर्क देतोस रे? ठीक आहे, वाचीन. नारदा, खर म्हणशील तर पुन्हा माझा माझ्यावर विश्वास बसू लागला आहे. अरे, प्रत्येक जण त्या ब्रह्मकमळाच्या झाडाच्या पानाचा लहान मोठा तुकडा घेऊन जात होता. तो नुसता मातीत खोचला की ब्रह्मकमळाचं नवीन झाड येतं म्हणे. माझ्या कपाळातून जसा माझा पुत्र निघाला तसा. नारदपुराण, का गरुडपुराण अगदीच काही खोटं नाही असं मला वाटायला लागलं. ब्रह्मकमळ उमललं तेव्हा भोवताल काळी रात्र होती. तेही हिरण्यगर्भातून माझी उत्पत्ती झाली तेव्हा जशी काळी रात्र उरली तसेच मला वाटले. काल तू सांगितलेल्या कापुसकोंड्याच्या गोष्टीचा, विश्वोत्पत्तीच्या कथेचा जणू प्रत्यय येत होता. पुराण अगदीच धादांत खोटे नसावे असे मला वाटू लागले नारदा.

ना: हं

ब्र: शिवाय नारदा, परत आल्यावर बराच वेळ मी नेटवर ब्रह्मकमळावर बरीच माहिती वाचली. हे झाड खरेच उंच थंड पहाडी प्रदेशात वाढते. हिमालयावर, म्हणजे आपल्या कैलासावर आढळते. ही गोष्टही मला विलक्षण वाटली नारदा. हाही मला कैलासावर आपली देवांची वस्ती असावी ह्याचा थोडाफार पुरावा वाटला.
मी भोळा आहे जग म्हणते, पण इतकाही नाही रे! मी पण जरा अभ्यास केला रात्रभर. ब्रह्मकमळ मला ब्रह्म व ब्रह्मपुरी खरी असल्याचा संकेत देतं.

ना: ब्रह्मा, मी काय बोलू! कापुसकोंड्याच्या गोष्टीचा ब्रह्मकमळ उमलणे हा प्रत्यय होता, की ब्रह्मकमळ निसर्गात उमलते हे पाहून हुशार मानवाने विश्वोत्पत्तीचं काल्पनिक कथानक गुंफल हाही विचार करावा असा मुद्दा आहे.

तुला आठवतं ब्रह्मा, असाच माझा गोंधळ झाला असता तूच मला 'क्ष = ज्ञ म्हणजेच ज्ञ = क्ष । ह्या गोष्टीकडे असू दे लक्ष ।।' असे म्हणाला होतास.
तुला पुराणे वाचायची सवय लागलेली दिसते. मग अर्नाळपुराणही वाच. त्यातलं वाडा पुराण वाच. आपल्या दोघांचा त्या गोष्टीत उल्लेख आहे. लिंक लक्षात घे.

http://sadashivsrushti.blogspot.in/2015/08/blog-post_98.html

ब्र: आज रात्री तेच काम. आपलं थोडं विषयांतर झालं नारदा. माझी कापुसकोंड्याची गोष्ट अर्धीच राहिली. मी माझ्या भालप्रदेशातून पुत्रोत्पत्ती केली इथवरच आपली गोष्ट आली होती. नंतर बागेचा फेरफटका झाला.

ना: पण ब्रह्मा! हा तुझा पुत्र कोण? काय त्याचे नाव? गोष्टीत पात्रांना नावे हवी. गोष्ट कापुसकोंड्याची असली तरी. गोष्टींचे पण काही नियम असतात. गोष्टींचे यमनियम. ते पाळलेच पाहिजेत. पात्रांना नावे असलीच पाहिजे. नाहीतर गोंधळ व्हायचा.

ब्र: नारदा! तू हुशार आहेस. कर विचार. लाव अंदाज. सांग काय नाव माझ्या भालोत्पन्न मुलाचे.

ना: त्यात काय कठिण? भालेराव. वाड्यातल्या बाळाचा वर्गबंधु!

ब्र: अरे जरा गंभीर हो. हा काय विनोद?

ना: अरे विनोद नाही, प्रमोद भालेराव.

ब्र: जाऊ दे. अरे माझा भाळीचा तो पुत्र दुसरा तिसरा कोणी नाही. तो आहे.... त्याचं नाव आहे.... नाव आहे.... नाव आहे....

ना: ब्रह्मपुत्र

ब्र: नारद. माझ्या भालोत्पन्न पुत्राचे नाव नारद. महाज्ञानी, त्रिलोक संचारी, कलहप्रिय नारद. आगलाव्या नारद! कळीचा नारद! काल तू मला माझ्या जन्माची कथा सांगितली. आज मी तुला तुझ्या जन्माची. दोन्हीही पुराणातल्या. फिट्टमफाट! तुझ्या वांग्याचं मी भरीत करतो. माझ्या वांग्याचं तू कर.

ना: मला कालच वाटले होते माझा जन्म जवळ येत आहे असे. झाला एकदाचा! पुढे काय? मला काही भाऊबहिणी वगैरे? की अस्मादिक एकुलते एक ब्रह्मापत्य? पूर्ण इस्टेटीचे एकमेव वारस!

ब्र: नाही नारदा! तुझ्या उत्पत्तीप्रमाणेच मी कधी इकडून, कधी तिकडून, कधी सहज, कधी हजारो वर्षे तप करून आणखी कन्या पुत्र उत्पन्न केले. यमराज, सरस्वती, चित्रगुप्त वगैरे माझीच मुलेमुली. तुझेच भाऊबहिण. अजून पुराणांचे वाचन पूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे पुढे काय ते मलाही माहीत नाही.

ना: ब्रह्मा! जरूर वाच. पण लक्षात ठेव की पुराण काही एकच नाही. गरुडपुराण एक, पण अशी अनेकांनी वेगवेगळ्या काळी लिहिलेली पुराणे आहेत असे मी ऐकले आहे.

ब्र: होय नारदा. काल मी थोडफार संशोधन केलं. पुराण म्हणजे काय, ते किती आहेत, साधारण कधी लिहिण्यात आले, त्या सर्वांचे ठळक ठळक गोष्टींविषयी एकमत आहे की नाही, वगैरे बाबींवर धावती नजर टाकली. बऱ्याच संशोधकांनी, जुन्या नव्या विद्वानांनी त्यावर व्यक्त केलेले विचार पाहिले. इतके काही ते साहित्य आहे की हिरण्यगर्भात मावणार नाही. समुद्रात तरंगणाऱ्या बर्फाच्या पर्वताच्या टोकाचं टोक पाहण्यात सारी रात्र गेली. सगळं मी वाचू शकीन, वाचलं तरी समजू शकीन असे वाटत नाही. बरेचसे या लोकांचे संदर्भ मला कळत नाहीत. आपण मुळातले ब्रह्मपुरीचे. वरातगंगा घेऊन पृथ्वीवर आलो खरे! पण ह्या लोकांचा सारा इतिहास, यांची भाषा, लोककथा, दंतकथा, रीतीरिवाज आपल्याला माहित नाही. त्यामुळे पुराण वाचणे जडच आहे. पण वाचू आणि समजू आपण कोण आणि आपल्याबद्दल इथे काय समज पसरले आहेत ते.

ना: ब्रह्माजी, नक्कीच वाचू. पण काम किती मोठे आहे याचा थोडाफार अंदाज तरी आला असेल.

ब्र: होय, ते मात्र खरे. नारदा, एकूण १८ महापुराणे व १८ उपपुराणे आहेत म्हणे. माझ्या नावाने पण एक आहे, ब्रह्मपुराण. तुझ्या नावाने पण आहे. नारद पुराण. गरुडपुराण आपल्याला माहीतच आहे. ब्रह्मांड पुराण, देवी पुराण, शिव पुराण, भागवत पुराण, विष्णुपुराण, वराह पुराण, कूर्मपुराण, भविष्यपुराण वगैरे वगैरे. तू वाड्यातल्या म्हातारीच्या पुरणाच्या पोळीचं कौतुक करायचास. मला वाटलं पुरण आणि पुराण एकच असावे. चविष्ट! पण हा प्रकार वेगळाच आहे.

ना: ब्रह्मा, जितकं काम किचकट तितकी मजा ज्यास्त. आपलेही वाचन वाढेल. आपण काम वाटून घेऊ. तू पुराण वाच. मी पुरण चाखतो. काय?

ब्र: नेहमी थट्टा! पण नारदा, तुझ्याशिवाय हे काम अशक्य. तुला जी मानवी विश्वाची जाण आहे ती मला नाही. तू वाचशील तर अर्थप्राप्ती सुलभ होईल. मला आपलं ठोकळ मानानी थोडफार कळतं. उदाहरणार्थ, विद्वान असं म्हणतात की विश्वोत्पत्तीवर पुराणांच एकमत नाही. तू मी जे गरुडपुराण वाचतो आहे त्याप्रमाणे मी निर्मिती केली. हिरण्यगर्भातून मी सर्वप्रथम उत्पन्न झालो. खूप आवडलं वाचून. शेवटी मलाही ego आहेच की. पृथ्वीवर आल्यापासून मानवाच्या सान्निध्याने तर तो वर्धिष्णु आहे.

ना: ते मला दिसतेच आहे. वरून हे ब्रह्मकमळ वगैरे. अदृश्य असला तरी तुला कालपासून मूठभर मांस चढलं आहे ब्रह्मा. स्तुती कोणाला आवडत नाही? त्यातल्या त्यात देवांना तर त्याच्याशिवा़य होत नाही.

ब्र: पण नारदा, सगळ्या पुराणात तसे नाही रे. शिव पुराणात शिव मुख्य, बाकी देव त्याचे सेवक. विष्णुपुराणात विष्णु मुख्य, बाकी देव त्याचे सेवक. प्रत्येकानी आपआपलं पुराण sponsor केलं होतं की काय असा संशय येतो कधी कधी.

ना: तसे नसेल देवा. पण वेगवेगळ्या देवांच्या भक्तजनांनी, अनुयायांनी आपआपल्या आराध्य देवतेच महत्त्व उठून दिसेल अशी पुराणे निर्माण केली असतील, किंवा करवून घेतली असतील हे शक्य आहे.

ब्र: मी जी काही पुराणं चाळली ती एकमेकापासून खूपच भिन्न आहेत. देव तेच आहेत, पण त्यांचा जन्म, रूप, चरित्र व कार्य वेगवेगळे आहेत. मला कुठे ५ तोंडे आहेत, तर कुछे चार. मला एका पुराणात तर १०००० पुत्र आहेत. एका पुराणात तुझी माझी खडाजंगी झाली आहे. वारुळात जितक्या मुंग्या तितक्या पुराणात कथा.

ना: मजा आली असेल. तू मला सहन करतो म्हणून. नाहीतर काय, खडाजंगी आत्ता इथे सुरू होईल.

ब्र: नारदा, पुराणातील कथांवर, त्यांच्या विश्वसनीयतेवर खरेच खडाजंगी सुरू आहे. विज्ञानाचे ज्ञान मिळालेली लहान मुले सुद्धा प्रश्न विचारू लागली आहेत. पुराणकथांंमधली अतिशयोक्तीच आता त्यांच्यावरचा विश्वास कमी करू लागली. जेंव्हा समाजाचा बहुतांश वर्ग शिक्षणाला वंचित होता, तेंव्हा ह्याच अतिशयोक्तीचा भोळ्याभाळ्या जनांचे डोळे दिपवून, त्यांना कथांवर व त्यातील अद्भुत किमयांवर विश्वास ठेवायला भाग पाडण्यात फायदा होत असे. आता तसे नाही. प्रह्लादाची काय किंवा ध्रुवबाळाची काय, त्या अफाट कथा कथा म्हणून आजही सान थोर वाचतील, पण विश्वास ठेवतीलच असे नाही. कथांमध्ये कथाकाराने त्याच्या कलाकार स्वातंत्र्याचा उपयोग करण्याला कोणाचा विरोध नसावा, पण हे सर्व सत्य आहे, म्हणून मला दक्षिणा द्या व नमस्कार करा हा आग्रह आता गळी उतरणे दिवसेंदिवस कठिण होत आहे.

ना: असे होत असेल तर उत्तमच. प्रश्न न विचारणारी मुकाट श्रद्धा फारच मोकाट सुटली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात फारसे अंतर उरले नाही. हे चित्र जर बदलत असेल तर उत्तमच आहे. ब्रह्मा, ह्या पुराणांचा उगम काय, यांचा कालखंड काय, यांचा उद्देश काय याबद्दलही आपल्याला वाचन करायला हवे. त्यादृष्टीने काही मिळाले का?

ब्र: होय नारदा. पुष्कळ काही. पण ते वाचायला एक कल्प वेळ लागेल.

ना: आता हे कल्प काय? दिवस, महिने, वर्ष ऐकले. पण कल्प? कल्प ही काय नवी कल्पना?

ब्र: नारदा, कल्प हेही वेळेचं एक परिमाण. वेदात, पुराणात ते वापरतात. पण आता रात्र फार झाली आहे. काका काकू झोपले आहेत. काँम्प्युटर फ्री आहे. थोडं गूगल करून पुन्हा काही वाचीन म्हणतो. आज थोडी टिपणं पण घेईन म्हणतो. नाहीतर कल्प ही कल्पना सांगणे सुद्धा कठिण आहे. उद्या पुन्हा पुराण पुढे नेऊ. नारदा, कापुसकोंड्याची आजची गोष्ट संपवू का?

ना: संपव देवा. पण वेळ मिळाला तर २-३ नवीन पुराणं आली आहेत तीही वाचून बघ. अर्नाळ पुराण त्यातलं एक. पण हरिपुत्र पुराण आजकाल गाजत आहे. तसेच रजनी पुराण. हिरण्यगर्भातून तू निघाला, तशीच काळ्या कांतीची रात्र, रजनी पण उत्पन्न झाली. तिची ही कथा. थोडीफार या नवपुराणांची मला कल्पना आहे. पण सापडतील इंटरनेटवर तर बघ तूही वाचून. शुभरात्री!